जोतिबा फुले १८८२ साली सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या जबानीत म्हणतात :
“शैक्षणिक विषयांतील माझा अनुभव प्रामुख्याने पुणे शहर व आसपासच्या गावांपुरताच मर्यादित आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात मिशनरींनी मुलींसाठी एक शाळा सुरू केली होती; परंतु त्या वेळी देशी (स्थानिक) मुलींची एकही शाळा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मला अशी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्या शाळेत मी व माझी पत्नी अनेक वर्षे एकत्र काम केले.”
आपल्या जबानीत फुले पुढे म्हणतात :
“स्त्री-शाळा सुरू केल्यानंतर एका वर्षाने मी खालच्या वर्गांसाठी—विशेषतः महार व मांग समाजासाठी—एक देशी मिश्र शाळाही सुरू केली. पुढे या वर्गांसाठी आणखी दोन शाळा काढण्यात आल्या.. मी सुमारे नऊ-दहा वर्षे या कार्यात कार्यरत होतो; या स्त्री-शाळा आजही अस्तित्वात आहेत. समितीने त्या शिक्षण खात्याकडे सुपूर्त केल्या असून त्या सध्या मिसेस मिचेल यांच्या व्यवस्थापनाखाली आहेत.”
कोण आहेत या मिसेस मिचेल?
शिक्षणपद्धतीबाबत आपले मत मांडताना, त्याच जबानीतील पुढील परिच्छेदात फुले म्हणतात :
“महार व मांग समाजासाठी एक शाळा आजही अस्तित्वात आहे; मात्र तिची स्थिती समाधानकारक नाही. तसेच काही वर्षे मी एका मिशनरी मुलींच्या निवासी शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले आहे.”
जोतिबा फुले हे प्रथम जेम्स मिचेल यांच्या मिशनरी शाळेतील विद्यार्थी होते आणि नंतर १८५० च्या दशकात त्याच शाळेत शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे जेम्स मिचेल व मिसेस मिचेल या मिशनरी दांपत्याचा जोतिबा–सावित्रीबाई फुले या सुधारक दांपत्याशी दीर्घकाळ संबंध राहिला होता.
जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रांत जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांची नावे अनेक ठिकाणी येतात. मात्र या स्कॉटिश मिशनरी दांपत्याने फुले दांपत्याच्या जीवनावर नेमका कसा व किती प्रभाव टाकला, याबाबत फारसा प्रकाश टाकलेला दिसत नाही.
धनंजय कीर यांनी ‘महात्मा जोतिराव फुले – भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक’ या चरित्रात लिहिले आहे :
“जोतिराव आणि त्यांची पत्नी कोणताही मोबदला न घेता निष्ठेने व नि:स्वार्थपणे शाळांमध्ये सेवा देत होते. या कार्यात ते काही वर्षे पूर्णपणे गुंतून राहिले होते. या कामासाठी अखंड लक्ष देणे आवश्यक होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिले होते आणि आता त्यांना नोकरीची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ही शाळा जुलै १८५४ मध्ये मिशनच्या आवारात सुरू झालेली मुलींची निवासी शाळा होती. या संस्थेत अनाथ व निराधार मुलांसाठी आश्रम तसेच धर्मांतरित पालकांच्या किंवा ज्यांची योग्य काळजी घेता येत नव्हती अशा मुलांसाठी निवासी शाळा होती.”
या शाळांच्या कार्याबाबतच्या अहवालात पुढील निरीक्षण नोंदवले आहे :
“सध्या आमच्याकडे १३ निवासी विद्यार्थिनी आहेत. दिवसा त्यांच्यासोबत ४० दिवसाळू विद्यार्थिनी येतात. पुण्यातील अत्यंत उत्साही व कुशल शिक्षकांपैकी एक—ज्योती गोविंदराव फुले—यांची आम्हाला दररोज सुमारे चार तास अध्यापनासाठी मदत मिळते, याचा आम्हाला आनंद आहे. स्त्रीशिक्षण व खालच्या जातींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले चिकाटीचे प्रयत्न शिक्षण मंडळ व सरकार यांनीही विशेष प्रशंसनीय ठरवले आहेत. आमच्या त्यांच्याबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत. मुलींची प्रगती अत्यंत समाधानकारक आहे.”
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी स्थापन केलेल्या स्त्री-शिक्षक प्रशिक्षण शाळेत शिक्षण घेतले होते. फुले दांपत्याच्या जीवनाशी संबंधित अनेक दस्तऐवजांत याची नोंद आढळते. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका म्हणून गौरवले जाते.
जेम्स मिचेल यांचा जन्म स्कॉटलंडमधील स्टर्लिंग परिसरात १८०० साली झाला. परदेशात सुवार्ता प्रसारित करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती, जरी त्यांच्या नातेवाइकांचा त्याला विरोध होता. पुरेसे शैक्षणिक प्रशिक्षण घेतल्यानंतर ऑगस्ट १८२२ मध्ये भारतासाठी मिशनरी म्हणून त्यांची दीक्षा झाली. त्यांना स्कॉटिश मिशनरी सोसायटीच्या वतीने पश्चिम भारतात पाठवण्यात आले.
जुलै १८२६ मध्ये जॉन कूपर, जॉन स्टीव्हन्सन व अलेक्झांडर क्रॉफर्ड यांच्यासह ते मुंबईत आले. डोनाल्ड मिचेल काही महिने आधी आले होते; परंतु त्यांचा काळ फारच अल्प ठरला.
`पुणे शहरचे वर्णन' या नारायण विष्णू जोशी यांनी १८६८ साली लिहिलेल्या पुस्तकात जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले हयात असताना हे पुस्तक प्रसिद्ध झालेले असल्याने या पुस्तकातील माहिती अधिक विश्वासार्ह आहे.
ना, वि. जोशी यांनी लिहिलेला हा पुढील मजकूर मुळातून वाचण्यासारखा आहे.
इंग्लिशांची कारकीर्द. (१८३१-१८५४) स्कॉटिश मिशनची स्थापना- मिशन शाळा- मुलांच्या व मुलींच्या-मिशन विद्यालयाची सांप्रतची स्थिति- बोर्डिंग स्कूल- आंधळे, पांगळे, रोगी यासाठीं धर्मशाळा.
या शहरांत इंग्रजी अंमल बसून बरेच दिवस झाल्यावर सन १८३१ या साली स्कॉटिश मिशनाकडून दोन मिशनरीं (पाद्रीं)ची नेमणूक झाली. त्यांचीं नावे रेव्हरंड जेम्स मिचल आणि रेव्हरंड डॉक्टर स्टिविनसन. हे उभयता येथे आल्यावर त्यांनी आपला उपदेश करण्याचा क्रम चालविला.
पण त्यांचा उपदेश ऐकण्यास लोक जमत नसत. जरी कोणी हिंदु त्या वेळेस त्यांच्या धर्मात आला नाही, तरी त्यांनी तसेच दिवस त्यांच्या शास्त्रांतल्या एका ओवीवर नजर देऊन काढले. ती ही की "आपण बरे करितांना थकू नये. न थकलो तर यथा काळी पीक पावू.’’
मिचेल साहेब उपदेशास बाहेर निघाले म्हणजे लोक त्यांचे फार हाल करीत, शिव्या देत, टोपी उडवीत, हुयों हुर्यो करीत, त्यांच्या पाठीस लागत, धोंडे मारीत, कोणी थापट्या मारीत, कोणी शेणमार करीत, तरी ते इतके सहनशील होते की कोणास चकार शब्दही न बोलता उलटे त्यांस चांगल्या गोष्टी सांगत, त्यावर होईल तितकी दया करीत, त्यांचे बरे इच्छीत, त्यांना आपले घरी बोलावीत. त्यांस शास्त्रांतील काही पुस्तके वाचण्यासाठी बक्षीस देत. मिचल साहेबापासून बूक उपटून आणले नाही, असा पुरुष पुण्यात विरळा सापडेल.
मिचेल साहेब इतक्या सहनशीलतेने चालले म्हणूनच या वेळेच्या लोकांत त्यांचा टिकाव झाला. त्यांची सहनशीलतेची गोष्ट अशी एक पहाण्यात आहे की ते रस्त्यांत उपदेश करीत असता कोणी टोपी उडविली तर उभे राहून रागावल्यासारखे करून म्हणत की आता वेळ नाहीं, उद्या चार वाजता तुम्ही सर्व लोक येथे जमा, म्हणजे शिपाई येऊन तुम्हास घेऊन जाईल.
आणि तेथून निघून पुढे काही अंतरावर एक जागा पाहून तेथे बसून उपदेश करीत. ते उपदेशास बाहेर निघाले म्हणजे राग हा काय पदार्थ है विसरून जात.
येथले लोग मिशनरीचा इतका द्वेष करणारे होते तरी त्यांच्या मुलांस व मुलींस शिकविण्याच्या त्यांनी अकरा शाळा घातल्या व त्यांस दोन प्रकारची विद्या देऊ लागले. हे साहेब येथे आले तेव्हा इंग्रेजी शाळा येथे नव्हती; ती प्रथम यांनीच स्थापिली. ती थोडेच दिवस त्यांच्या ताब्यांत होती. पुढे सरकाराने त्यापासून मागून घेतली. तेव्हां त्यांनी लष्करांत एक मराठी शाळा घातली ती अद्याप आहे.
नंतर इंग्रेजी शाळा स्थापिली तीही लष्करांतच होती. पुढे शहरांत इंग्रजी शाळा केली व मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा स्थापिली, मग मराठी तीन चार शाळा घातल्या.
या सर्व शाळा या वेळेस चांगल्या चालत नव्हत्या. मुले व मुली जमत नसत. थोरली जी इंग्रेजी शाळा तेथेही शंभरांहून अधिक मुले नव्हती. अभ्यासही बराबर चालत नसे. कारण शिक्षक चांगले मिळत नसत. ज्यास स्वतः आपल्या शिकण्याची काळजी नाही अशी टवाळखोर पोरे येत. मग काय बिगारीचा घोडा आणि तरवडाचा फोक याप्रमाणे होई.
यांची पुस्तके ही सरकारी शाळेतील नव्हती. शाळेत मुले फुकट घेत. काही मुलांस पगार देत, बुके देत. इतके करीत तरी मुले जमत नसत. पण त्यांनी पिच्छा सोडला नाही. शनै:शनै: आपले काम चालविले, मिशनरींची शाळा म्हटली म्हणजे मुले निघून जात, पंतोजी ओ, ना, म्या, देखील मिळणे कठीण पडे. कारण, त्या वेळचे लोक मिशनरी म्हणजे पोतेऱ्याप्रमाणे समजत असत. त्यांच्या घरी जायाचे नाही. शाळेत जायाचे नाही. त्यांची चाकरी करायाची नाही. त्यांचा उपदेश ऐकावयाचा नाही. जर उपदेश कोठे रस्त्यांत चालला असला तर मात्र तेथे थट्टा करायास काही लोक जमत.’’
नारायण विष्णू जोशी यांनी जेम्स मिचेल यांच्या शाळांविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``पुण्यात अगदी पहिली अशी इंग्रजी शिकण्याची शाळा रेव्हरंड जेम्स मिचेल साहेब, मिशनरी नेस्बिट स्कॉटिश मिशन यांची होती, ती सरकाराने मागून घेऊन बुधवारच्या वाड्यात घातली. तेथे मूले फार नव्हती व मुलांपासून दरमहा फी घेत नसत, पण योग्यतेच्या मुलांस उत्तेजन येण्यासाठी दरमहा पगार देत. वार्षिक परीक्षेचे वेळेस शेलापागोटे बुके इत्यादि फार चांगली बक्षिसे देत.
पुढे थोडीसी लोकांस शिकण्याची गरज दिसल्यावर दर मुलास आठ आणेप्रमाणें फी बसविली. त्यात मराठी शाळेत शिकून तयार झालेल्या मुलास मात्र फुकट घेत, ही चाल अद्याप चालत आहे. याप्रमाणे विद्येचा प्रसार होत चालला.
या वेळेस या शाळेत ख्रिस्ती शास्त्र शिकवीत असत, परंतु ते बंद करण्याचे कारण असे ऐकण्यात आहे की पापी लोकांच्या हातात पवित्र शास्त्र देणे ही गोष्ट चांगली नाही असे इंग्लिश चर्चच्या एका पाद्रीचे मत होते. सन १८३३ या साली सरकारी इंग्रेजी व मराठी शाळेत भूगोल, खगोल, सिद्धपदार्थविज्ञान इत्यादी विषय शिकवू लागले. याचे अगोदर पुण्यातील लोकांस त्यांच्या ज्योतिषात भास्कराचार्याने केलेले जे खगोलाचे सिद्धांत ते मात्र माहीत होते; तेही सर्वांस माहीत नव्हते, जेवढे जोशी तेवढ्यासच माहीत होते.
भूगोलाविषयीं तर पुराणातील कहाण्या म्हणजे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे, नऊ खंडें सप्तसमुद्र आहेत येवढी कायती माहिती होती. सिद्धपदार्थविज्ञान म्हणजे काय विद्या आहे, हे तर मुळीच माहित नव्हते.
या शाळेवर इजदेल साहेब प्रोफेसर होते. यांनी फार श्रम घेऊन शाळा चालविली होती. कारण इंग्रजी शिकणे हे यावेळच्या लोकांस अगदी आवडत नसे. इंग्रजी शिकले म्हणजे मोठ्या पगाराच्या जागा मिळतील म्हणून शिकत असत. विद्येची अभिरुची नव्हती. ''
जेम्स मिचेल यांनी १८४५ साली सदर बझार (कॅम्प बझार) आणि शहरातील शाळा तात्पुरत्या एकत्रित केल्या तेव्हा या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १२५ पासून ९० पर्यंत घसरली होती. कॅम्प बझार शाळेत १८४९च्या जुलैत ९० विद्यार्थी होते तर शहरातल्या शाळेत ५० विद्यार्थी होते.
स्कॉटिश मिशनच्या पुण्यातल्या या दोन शाळांपैकी कॅम्प (सदर) बझारमधील किंवा मुख्य शहरातील एका इंग्रजी शाळेत जोतिबांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिक्षण झालेले असणार हे उघड आहे.
जेम्स मिचेल यांचे एक चिरंजिव विल्यम किंनैर्ड मिचेलसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे धर्मगुरु बनले आणि नंतर स्कॉटिश मिशनच्या पुणे केंद्रात आपल्याबरोबर काम करत होते असे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
विल्यम किंनैर्ड मिचेल यांचा पुण्यातल्या स्कॉटिश मिशनस्थानासाठी धर्मगुरु म्हणून १० ऑगस्ट १८५२ रोजी दिक्षाविधी झाला आणि २० जानेवारी १८५३ रोजी आपल्या पत्नीसह त्यांचे पुण्यात आगमन झाले. रेव्हरंड विल्सन किंनैर्ड मिचेल यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार १८५६च्या अखेरीस युरोपला जावे लागले आणि त्यानंतर ते परत भारतात कधी परतले नाहीत.
पुणे स्कॉटिश केंद्राच्या मिशनकार्यातली जेम्स मिचेल यांची आपल्या पुत्राबरोबरची अल्पकालीन भागीदारी अशाप्रकारे संपृष्टात आली. जेम्स मिचेल आणि मार्गारेट शॉ मिचेल या दाम्पत्याला सात मुले होती. विल्यम किंनैर्ड मिचेल यांची जागा रेव्हरंड जेम्स वॉर्डरोप गार्डनर यांनी घेतली.
जेम्स मिचेल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्कॉटिश शाळांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मिचेल यांनी १८५५ साली लिहिले कि आता त्यांच्या शाळांत २५० विद्याथी आहेत. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांसह एकूण संख्या ९०० पर्यंत होती. मात्र या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या इमारती अपुऱ्या पडत होत्या.
जेम्स मिचेल यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना १८६० मध्ये स्कॉटलंडला जावे लागले होते. जेम्स मिचेल यांनी स्कॉटलंडच्या या दौऱ्यात आपल्या मायदेशाचे घेतलेले दर्शन अखेरचेच असणार होते,
जेम्स मिचेल यांचे मदतनीस म्हणून रेव्हरंड जेम्स वॉर्डरोप गार्डनर १८५६ पासून पुण्यात स्कॉटिश मिशनकेंद्रात कार्य करु लागले. जॉन मरे मिचेल आणि रेव्हरंड गार्डनर यांच्याबद्दल नारायण विष्णू जोशी यांनी आपल्या `पुणे शहरचे वर्णन' मध्ये पुढील शब्दांत लिहिले आहे:
``पण पुढे जसजसे लोक सुधारु लागले तसतसी मुले शाळेत जमू लागली, मुले जमतात असे वाटल्यावर त्यासही चांगली व्यवस्था करण्याचे उत्तेजन आले. व जसी दुधात साखर तसे या समयास महाविद्वान डॉक्टर (जॉन) मरे मिचल साहेब यांची नेमणूक येथे झाली. त्यांनी तर मिशनरी शाळा फारच चांगले योग्यतेस आणली. मुले घेणे म्हणजे चांगली, विद्या शिकण्यास दक्ष अशी पाहून घेऊ लागले. उगीच टवाळखोर पोरे घेणे बंद केले. त्यावर थोडीसी फी साडेतीन आणे बसविली. जेव्हा थोडेसे पैसे पडू लागले, तेव्हा अर्थातच मुलांस काळजी लागली. असे काही दिवस चालवून शाळा बरीच उदयास आणली व आठ आणेपर्यंत फी चढविली.
त्यांच्या मागे रेव्हरंड गार्डनर साहेब यांची नेमणूक झाली. हे स्वतः मेहनती, हुशार, ज्यास सर्व विषयांची सारखी माहिती, असल्या विद्वान पुरुषाचे हाती ही शाळा आल्यावर यांनी तर या शाळेचे रुपच बदलून तिला महाविद्यालयाचे रूप आणले; या कारणाने मुलेही फार वाढली, एक वेळ तर या शाळेत सहाशे मुले हजर झाली. त्यास ही जागा पुरेना म्हणून दुसरी जागा घ्यावी लागली. मुलांची भरती इतकी झाली की, मुले घेत नाही, असे म्हणणे या दयाळू साहेबास भाग पडले.
असे कोणी मनात आणू नये की बायबल शिकविणे बंद केले असेल म्हणून मुले येऊ लागली असतील तर असे नाही. ही शाळा घातल्यापासून जो त्यांचा क्रम आहे तोच आहे. किंबहुना जास्ती म्हणण्यास चिंता नाही. आता या विद्यालयात सुमारे पाचशे मुलें आहेत. प्रत्येकापासून आठ आणेप्रमाणे फी घेतात. अभ्यास फारच चांगला चालतो.’’
``गार्डनर साहेबांच्या वेळीच प्रथम मुले मुंबईत युनिव्हर्सिटीमध्ये पसार (उत्तीर्ण) होऊ लागली. एक वेळ तर या विद्यालयांतील अकरा असामी परीक्षेस गेले होते त्यापैकी दहा पास झाले. या मानाने त्या वर्षी सरकारी कोणतेही विद्यालयांतील विद्यार्थी पसार (म्हणजे उत्तीर्ण) झाले नाहीत. गार्डनर साहेब इतकी मेहनत घेत होते की शाळेत मुलांस शिकविण्यास वेळ मिळेना म्हणून एक वर्ग घरी केला होता. अशी मेहनत चालवून ही शाळा उदयास आणली. याच वेळेस तिला सरकारी मदत मिळाली.’’
``याच मिशनचे एक अनाथ मुलींचे बोर्डिंग स्कुल आहे, हे (जेम्स) मिचेल साहेब यांनी स्थापून सुमारे पंधरा वर्षे झाली. या शाळेत सर्व जातीच्या मुली घेतात. या शाळेत सर्व जातीच्या मुली घेतात. पोरक्या मुली व ज्यांस आईबाप आहेत अशा मुलींसही घेतात. त्यास दरमहा तीन रुपये द्यावे लागतात. या शाळेत सुमारे पन्नास मुली आहेत. त्यास अन्नवस्त्र तेथे मिळते. त्यास राहाण्यासाठी एक जागा रेव्हरंड गार्डनर साहेबांनी बांधली आहे. तेथे त्यास घरी गेल्यावर उपयोगी पडणारी कामे शिकवितात; खेरीज इंग्रेजी व मराठी या दोन्ही विद्या शिकवितात; आणखी शिवण, जाळ्या, नाना त-हेचे कशिदे, टोप्या, मोजे इत्यादि कामे फारच चांगली शिकवितात व त्यास सुंदर व मनोरंजक असी भक्तिपर व इतर प्रकारची गाणी शिकवितात.
येथे देखरेख करण्यास एक मॅडम नेमली आहे. व विद्या शिकविण्यास शिक्षक आहेत व याखेरीज मुख्य मिशनरीची व त्यांच्या मॅडमेची वरचेवर देखरेख आहेच.
ह्या बोर्डिंग स्कुलाचे कायदे फारच चांगले आहेत. सकाळी मुलींस मराठी व इंग्रजी शिकवितात. नंतर जेवण झाल्यावर एक शिक्षक ख्रिस्ती शास्त्र त्याजकडून वाचवून त्याचा अर्थ सांगतो व गीत गाऊन ईश्वराची प्रार्थना करितो. नंतर दुपारी त्यास शिवण काम देतात. संध्याकाळीं त्यास खेळायास व फिरायास पुष्कळ वेळ मिळतो. रात्री निजण्यापूर्वी सकाळच्याप्रमाणें ईश्वरभजन होतें,
मोठ्या मुलींच्या दिमतीस लहान मुली दिल्या असतात. त्या त्याची वेणी फणी करितात, व त्यांची साडीचोळी करतात. मुलीच स्वतः आपला स्वैपाक करितात.
अशा विद्यालयापासून देशास केवढे फायदे आहेत हे उघडच आहे. पोरकी मुले यात धर्म, नीती व विद्या मिळून त्या फार चांगल्या स्थितीत येतात. याच मुली जर मोकार राहिल्या असत्या तर कोणी भ्रष्ट बायकांनीं त्यास घेऊन आपला दुष्ट धंदा शिकविला असता, किंवा त्या रस्तोरस्ती हिंडून भामटेगिरी करू लागल्या असत्या. तर त्याच मुली इथल्या शिक्षणाने सगुणी, नम्र, नीतिमान, प्रामाणिक, उद्योगी आणि विद्वान होतात. पुढे त्या घरचारिणी झाल्यावर त्यांच्या कुटुंबाकडून देशास लाभ होणार नाहीं असे कोणाच्याने म्हणवेल ?
याशिवाय शहरांत मुलींच्या व मुलांच्या मराठी शाळा आहेत. व हिंदुस्थानी मुलींची व मुलांची शाळा सन १८५४ साली मिस्टर वझीर बेग नामक एका ख्रिस्ती उपदेशकाने नानाच्या पेठेत घातली ती आता नुकतीच मोडून टाकली.
याच मिशनाच्या ताब्यात आंधळे, पांगळे, महारोगी, जखड ह्यातारे, व ज्या कोणास काम करण्याची शक्ती नाही, अशा लोकांसाठीं एक धर्मशाळा आहे. ही स्थापून सुमारे पंचवीस वर्षे झाली. यातही पाहिजेल त्या जातीचे मनुष्यास घेतात. त्यास येथे दर आठवड्यास शिघा ५। शेर बाजरी, जोंधळे किंवा गहू व अदपावकम शेर डाळ व १८ पैसे इतका देतात, सहा महिन्यांनी कपडे देतात. यावर एक मनुष्य नेमलेला असतो, तो तेथील लोकांस नेमाने नित्य उपदेश करतो. खेरीज धर्मशाळेच्या कारकुनाचेही काम पाहतो. ही जागा लष्करात सदर बाजारात आहे. व येथे सुमारे तीसपासून चाळीसपर्यंत मनुष्ये असतात. हिचा सर्व खर्च लष्करांत राहणारे परोपकारी साहेब लोक व क्वचित इतर लोक पुरवितात.
आता एकंदरींत विचार करून पाहिले असता, असे सहज ध्यानात येते की, पुण्यात प्रथम इंग्रजी शाळा स्थापक मिशनरी, मुलींची शाळा स्थापक मिशनरीच, मराठी शाळा स्थापक मिशनरीच, हिंदुस्थानी शाळा स्थापक मिशनरीच, गरीब लोकांसाठी धर्मशाळा स्थापक मिशनरीच. मिळून सुधारणुकेची व लोककल्याणाची कामे करण्यास हेच मूळ. यावरून असे दिसते की मिशनरी हे पुण्यांतील लोकांचे कल्याण करण्याकरिता ईश्वराने पाठविले आहेत.
पुणे शहरात सरकारी व लोकांची आणि मिशनरींची कल्याणाचीं कामे सारखीच आहेत. म्हणून याविषयीं सरकारापेक्षा मिशनरींस हे अधिक भूषण आहे. सरकारी इंग्रजी शाळा, मिशनरी इंग्रजी शाळा; सरकारी मराठी शाळा, यांची मराठी शाळा. कमेटीची मुलींची शाळा, यांची मुलींची शाळा; कमेटीची महारांची शाळा, यांची महारांची एक व भंग्यांची एक शाळा, त्यांची आंधळे लोकांसाठीं धर्मशाळा, यांची धर्मशाळा; त्यांचे बोर्डिंग स्कूल, यांचे बोर्डिंग स्कूल; यांच्या सभा, त्यांच्या सभा, हे धर्मार्थ पैसा देतात, ते देतात. यांची वाचण्याची पुस्तके, त्यांची पुस्तके; त्यांचे सरकारी इतिहास, यांचे इतिहास; त्यांचे गणित, यांचे गणित; जितकी सरकारी शाळेत चालणारी पुस्तके आहेत, तितकी त्यांची आहेत.
सरकार वर्षास शाळाची परीक्षा घेतात, मिशनरी हे घेतात. सरकार बक्षिसे देते. मिशनरीही देतात, सरकारच्या शाळेत फी घेतात, हेही घेतात, सरकारच्या शाळेतील विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत पसार होतात, यांच्या शाळेतील पसार होतात, खेरीज सरकार व कमेटी यांपेक्षा अधिक हे ईश्वरी ज्ञान शिकवितात, ही तर सर्वांत मोठी गोष्ट आहे.''
``स्कॉटिश मिशनच्या एका मिशनरीचे शैक्षणिक प्रशिक्षण असे फारसे झालेले नव्हते. तरी हा मिशनरी खूप चांगल्या मनाचा, सद्गृहस्थ होता. त्यांनी खूप दीर्घकाळ आपले मिशनकार्य अत्यंत तळमळीने पार पाडले. या मिशनरीबद्दल स्थानिक तसेच युरोपियन लोकांमध्ये खूप आदराची भावना होती,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी जेम्स मिचेल यांचे वर्णन केले आहे.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या भारत देशातच माथेरान येथे २८ मार्च १८६६ रोजी वयाच्या ६६ वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्यावेळी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, ज्येष्ठ कन्या डॉ. फ्रेझर आणि रेव्हरंड जॉन स्मॉल उपस्थित होते.
मिचेल यांचा पार्थिव देह माथेरानहून पुण्यात आणण्यात आला आणि तेथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली. या अंत्ययात्रेला मुंबईहून डॉ. जॉन विल्सन आले होते आणि पुण्यातील विविध स्तरांतील अनेक लोक या मिशनरीला अखेरची मानवंदना देण्यासाठी हजर होते.
अलीकडेच म्हणजे दोनेक महिन्यांपूर्वी मला एक सुखद धक्का बसला. रेव्हरंड जेम्स मिचेल हे पुण्यातील क्वार्टर गेटपाशी असलेल्या लक्ष्मी रोडवरील ख्राईस्ट चर्चचे संस्थापक आहेत असा मला अचानक शोध लागला.
जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल याच ख्राईस्ट चर्चचे १८३४ ते १८६३ या दीर्घकाळात धर्मगुरू होते. चर्चच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी असलेल्या त्या संगमरवरी फलकावर त्यांचे अगदी पहिलेच नाव आहे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे हे या ख्राईस्ट चर्चचे सदस्य आहेत.
सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या या ज्येष्ठ मिशनरी व त्यांच्या पत्नी मिसेस मिचेल यांच्या पाऊलखुणा येथे सापडणे, हा माझ्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव ठरला.
Camil Parkhe January 3, 2026




