अरुंधती रॉय यांची `द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' ही कादंबरी प्रकाशित होऊन आणि त्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळून अनेक वर्षे झालीयेत. पण अजून ते पुस्तक मी वाचले नाही.
हे खूप विचित्र वर्तन असेल हे मला ठाऊक आहे. पण एखाद्या साहित्यिकाची मूळ कादंबऱ्या वाचण्याऐवजी त्या साहित्यिकावर लिहून आलेले लिखाण वाचण्याची मला अधिक हौस आहे.
कादंबऱ्या किंवा फिक्शन वाचणे मी खूप वर्षांपूर्वी बंद केले आहे.
अरुंधती रॉय यांचे नवे ताजे पुस्तक `मदर मेरी कम्स टू मी' हे पुस्तक काल केरळमध्ये कोची शहरात सेंट तेरेजा कॉलेजमध्ये भरगच्च गर्दीत प्रकाशित झाले.
मात्र त्याआधीच या भारतातील एक सर्वाधिक जगप्रसिद्ध असलेल्या लेखिकेच्या मुलाखती अनेक इंग्रजी दैनिकांत छापून आल्या आहेत, त्या मी उत्सुकतेने वाचल्या आहेत.
`मदर मेरी कम्स टू मी ' हे पुस्तक येशूची आई मदर मेरीवर नसून अरुंधती रॉय यांच्याच आई असलेल्या मेरी रॉय यांच्यावर आहे.
या मायलेकींचे आयुष्यभर कधीच जमले नाही, त्या तणावपूर्ण आणि प्रेमाच्या नातेसंबंधी या पुस्तकात अरुंधती रॉय यांनी लिहिले आहे.
प्रकाशनप्रसंगी आपल्या भाषणात अरुंधती रॉय हसतहसत म्हणाल्या : "ज्यांच्यावर मी सर्वाधिक प्रेम करते असे जवळपास सर्व लोक या सभागृहात जमले आहेत. आपल्या सरकारचा विचार करता, ही खूपच धोकादायक गोष्ट आहे..'
आपल्या नेहेमीच्या स्वभावानुसार रॉय यांनी लगेचच जगभरातील आणि देशातील दु:खद घटनांवर टिपण्णी केली. .
“आता मी मंचावर येण्याची तयारी करत असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने गेली पाच वर्षे तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि माझ्या अनेक मित्रांना पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे,” असे त्या म्हणाल्या.
अरुंधती रॉय यांची ओळख करून देताना मल्याळम साहित्यिक के. आर. मीरा यांनी त्यांचे वास्तुविशारद, अभिनेत्री, पटकथालेखिका, कादंबरीकार, निबंधकार, कार्यकर्त्या असे वर्णन केले.
मात्र या वर्णनांत सर्वाधिक टाळ्या मिळाल्या त्या मीरा यांनी रॉय त्यांची “एक अधिकृत `अर्बन नक्सल' आणि व्यावसायिक देशद्रोह प्रेरक' अशी ओळख करून दिली तेव्हा.
“त्या भारतातील एकमेव लेखिका आहेत ज्यांच्या बोलण्याकडे जगातील सर्व फॅसिस्ट सरकारे लक्ष देत आहेत. त्या खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय भारतीय लेखिका आहेत,” असे मीरा यांनी अरुंधती रॉय यांचे वर्णन केले, असे `प्रिंट' वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
पुस्तक प्रकाशनाआधीच त्यांच्या पुस्तकांना मिळालेली प्रसिद्धी त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाते.
अर्थात रॉय यांच्या पुस्तकांची व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग केली जाते, यासाठी इतर अनेक लेखकांप्रमाणे त्यांचा स्वतःचाही एजंट आहेच.
याबाबत भारतीय किंवा मराठी प्रकाशन व्यवसाय खूप, खूप मागे आहे हे सांगायलाच नको.
अरुंधती रॉय यांच्या पुस्तकांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. `क्रॉस वर्ल्ड'च्या बुक गॅलरींत जगातील प्रसिद्ध लेखकांच्या फोटोमध्ये अरुंधती रॉय यांचाही हमखास समावेश असतो.
Camil Parkhe September 4, 2025