Did you like the article?

Showing posts with label Laxmibai Tilak. Show all posts
Showing posts with label Laxmibai Tilak. Show all posts

Sunday, June 28, 2026

 


पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या काही सदस्यांबरोबर क्वार्टर गेट येथील यंग ख्रिश्चन्स मेन्स असोसिएशन (YMCA) इमारतीत काल शुक्रवारी २६ जून संध्याकाळी जवळजवळ दिडतास खूप चांगली भेट आणि चर्चा झाली.

आठ दिवसांपूर्वीच नियोजन झालेल्या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाची ही मासिक बैठक चार तासांआधी पुणे कॅम्पातील मिरवणुकीमुळे रद्द करण्यात आली होती.
तरीही हा निरोप वेळेत न पोहोचल्यामुळे काही साहित्यप्रेमी बैठकीला लांबलांबून येतील असे मला वाटले होते.
अगदी तसेच झाले.
संघाचा सचिव या नात्याने कार्यक्रमस्थळी मी पाचच्या दरम्यान आलो होतो, तिथे तळघरातल्या `ओम बुक स्टॉलमध्ये पुस्तके चाळताना वयाची ऐंशी ओलांडलेले आशाकांत रामटेके भेटले.
विमाननगरहून खास रिक्षा करुन साहित्य संघाच्या बैठकीसाठी आले होते. त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून बैठक रद्द झाली नाही हे मी त्यांना सांगितलेच नाही.
आशाकांत रामटेके यांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करुन खूप आनंद वाटला.
महाराष्ट्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास एजन्सी विभागातून निवृत्त झालेले आशाकांत रामटेके सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत.
संघाच्या कालच्या या बैठकीला उपस्थित राहून ते आज शनिवारी पुन्हा YMCA आवारात पूर्ण दिवसीय शिबिरात उपस्थित राहणार आहेत.
ख्रिस्ती धर्माच्या पवित्र भूमीला भेट देऊन त्यावर ११२ पानांचे गुळगुळीत कागदांवर भरपूर रंगीत चित्रांसह छापलेले त्यांचे `होली लँड पिलग्रिमेज' (इस्राएल, जॉर्डन, पॅलेस्टाईन अँड इजिप्त ) हे इंग्रजी पुस्तक या बैठकीत त्यांनी मला दिले.
ही `होली लँड' हल्ली अनहोली लँड बनली आहे असे या पुस्तकाच्याच एका प्रस्तावनेत लिहिले आहे.
मागे एकदा पुण्यात शिवाजीनगरच्या नरवीर तानाजीवाडीमध्ये `सकाळ टाइम्स' हापिसात नागपूरचे विलास शेंडे यांच्यासह ते मला भेटले होते त्यावेळी माझी काही पुस्तके मी त्यांना भेट दिली होती अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
YMCA च्या समोर असलेल्या इराणी हॉटेलात बन मस्का आणि चहावर ताव मारताना आमची ही भेट आणि चर्चा रंगली होती.
आशाकांत रामटेके हल्ली काही महिने आखातात मुलाकडे आणि काही महिने ऑस्ट्रेलियात आपल्या मुलीकडे राहतात. आखातातील ख्रिस्ती समाजाविषयी त्यांनी काही रंजक गोष्टी सांगितल्या.
याविषयी पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या `शब्दसेवा' या अनितकालिकाच्या आगामी अंकात लेख लिहिण्याचा मी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.
YMCA आवारात परतल्यानंतर इंडियन एक्सप्रेस- लोकसत्ता पत्रकारितेतील माझे सहकारी दयानंद ठोंबरे भेटले. सत्तरी पार केलेले रेव्हरंड सॅम्युएल चोपडे लांब अंतरावरून दुचाकीने या बैठकीला पोहोचले होते.
त्यानंतर YMCA कॅफेटेरियात आम्हा चौघांची बैठक झाली आणि साहित्य, समाज अशा विविध विषयांवर गप्पा आणि चर्चा झाल्या.
आता या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाविषयी आणि ख्रिस्ती समाजातील मराठी साहित्य चळवळीबाबत.
न्यायमूर्ती म. गो, रानडे यांनी दिडशे वर्षांपूर्वी पहिले मराठी ग्रंथकर्त्यांचे संमेलन भरवले, त्यानंतर या मराठी साहित्य संमेलनांपासून पहिल्यांदा म्हणजे १९२७ साली नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी चूल मांडली होती.
वेगवेगळी साहित्य संमेलनांची अशी प्रथा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने सुरु केली.
`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या नागपूरला १९३३ साली भरलेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाने १९७२ साली आठवे ख्रिस्ती साहित्य संमेलन नगर रोडला रामवाडीला डी नोबिली कॉलेजात आयोजित केले होते.
`अगा जे कल्पिले नाही' हे मराठी भाषेतले पहिले आत्मकथन लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते तर धर्मगुरु (फादर) होण्याचे प्रशिक्षण पेपल सेमिनरीत घेणारे ब्रदर नेल्सन मच्याडो आयोजक होते.
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाने पंधरावे ख्रिस्ती साहित्य संमेलन १९९२ साली मॉडेल कॉलनीतल्या विद्या भवन स्कुलमध्ये भरवले होते,
विद्या भवन स्कुलचे प्राचार्य फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते तर कवयित्री शांता शेळके उद्घाटक होत्या.
नाशिकमध्ये या जानेवारीत सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली २७वे ख्रिस्ती साहित्य संमेलन पार पडले.
कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथांत विसंवाद नसला तरी संवाद मुळीच नसतो. महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी या समाजातील दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचे फार मोठे काम केले आहे.
गेल्या शंभर वर्षांच्या या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा आढावा आणि गेल्या पंचवीस वर्षांतील मराठी ख्रिस्ती आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे `शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या ग्रंथात मी संग्रहीत केली आहेत.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेले हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे.
सहा महिन्यांपूर्वी या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचा सचिव म्हणून मी सूत्रे घेतली आहे. दर महिन्यात एकदा भेटावे, विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा व्हावी, काही साहित्यिक उपक्रम राबवावे असा या मासिक बैठकीचा माफक उद्देश आहे.
साहित्य संघाच्या प्रत्येक बैठकीला नवनवे लोक हजर असतात. त्यामुळे प्रत्येक बैठकीनंतर हजर असणाऱ्या सर्वांबरोबर एक ग्रुप फोटो घेण्याबाबत मात्र मी आग्रही असतो.
नोंदवहीतल्या इतिवृत्तापेक्षा असे फोटो बरे.
कालच्या बैठकीचा हा फोटो.
गेटपाशी हा ग्रुप फोटो घेत असताना फेसबुकवर मित्र असणारे यवतमाळचे आणि आता मध्य प्रदेशात कार्यरत असणारे प्रतिक विजया सुधाकर यांनी मला पाहिले.
फेसबुकवर वेळोवेळी आपली छबी टाकल्याचा हा एक फायदा.
त्यांनी आपली ओळख करुन दिल्यानन्तर त्यांच्याबरोबर सुद्धा एक वेगळा फोटो काढून झाला.
Camil Parkhe

Wednesday, January 14, 2026


नाशिकला सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार जानेवारी ९ पासून सुरु होणाऱ्या २७ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' हे माझं पुस्तक आलं आहे.

मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनाविषयी औत्सुक्य निर्माण झालं आहे. रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी हजर असतील.
मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी शंभरी पूर्ण करणार आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनसुद्धा पुढच्याच वर्षी शतक गाठणार.
नाशिक शहरातच शरणपुरात पहिले महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन १९२७ साली भरलं होतं.
नागपुरात झालेल्या चौथ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष लक्ष्मीबाई टिळक होत्या.
त्यानंतर दीर्घ कालखंडानंतर पन्नासच्या दशकात लागोपाठ चार साहित्य संमेलने झाली. पुन्हा खंड पडून १९७२ पासून आतापर्यंत नियमितपणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. त्याशिवाय १९९२ पासून वेळोवेळी मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत.
पुण्यात १९९२ला झालेल्या संमेलनाचे अध्यक्षस्थान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवलं होतं.
इतर माजी साहित्य संमेलनाध्यक्षांमध्ये सत्यवान नामदेव सूर्यवंशी, बिशप डॉमनिक ऑब्रिओ, अरविंद पी. निर्मळ, निरंजन उजगरे, सिसिलीया कार्व्हालो, अनुपमा उजगरे, नाटककार फादर मायकल जी. यांचा समावेश होतो.
सुनिल श्यामसुंदर आढाव यांच्या ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा ! - शतकातील ख्रिस्ती संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात १९२७ ते २००१ या दरम्यान झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची तसेच मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे आहेत.
त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणे या पुस्तकात मी संकलीत केली आहेत.
या ग्रंथामुळे गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य विश्वात झालेल्या संमेलनांतील महत्त्वाचा दस्तऐवज संकलीत होत आहे याचा विशेष आनंद आहे.
सातारच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी तारा भवाळकर यांनी नाशिकच्या आगामी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा आणि संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आवर्जून उल्लेख केला.
मराठी समाजाचा एका आगळावेगळा घटक असणाऱ्या ख्रिस्ती समाजाच्या भावविश्वाचं नातं उलगडणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या दस्तऐवजाचं वाचक स्वागत करतील असा विश्वास आहे.
नाशिक साहित्य संमेलनात व्हाईट लाईट पब्लिकेशनच्या स्टॉलवर हे पुस्तक मिळेल,
त्याशिवाय ऑनलाईन वर सवलतीच्या दरात हे पुस्तक उपलब्ध आहेच. त्यासाठी लिंक खाली दिली आहेच.

Camil Parkhe January 7, 2026



Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025

Saturday, August 30, 2025

 

                                                                    पौलस वाघमारे 

त्या दिवशी सकाळीसकाळी फोन लावला. ``गुड मॉर्निंग पौलस, कवी `विश्वासकुमार' हे नाव ऐकले आहे का?''


``हो, त्यांचे पूर्ण नाव संपत विश्वास गायकवाड. केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) आणि केशवकुमार (आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे) यांच्या धर्तीवर त्यांचे नाव विश्वासकुमार. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात ते शिक्षक होते.

``पाणी लाजलं, `जाता साताऱ्याला' या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती. ``सशाचे कान, झालेत लांब'' ही त्यांची बालभारती पाठ्यपुस्तकात असलेली कविता आम्हाला शाळेत होती, '' पौलस वाघमारे सांगत होते अन फोनच्या या बाजूला अवाक होऊन मी ऐकत होतो.

कधी काही अडचण झाली, आतासारखा असाच लेख लिहिताना लॅपटॉपवर माऊस अडखळला, पुस्तकांत शोधूनसुद्धा संदर्भ न सापडल्यामुळे आणि आठवण न राहिल्यामुळे गाडी अडली, पुढे जाईना कि पौलस वाघमारे यांना मग मी फोन करतो.

एकतर ते त्या शंकेचे समाधान करतात किंवा कुठे आणि कुणाकडे पाहिजे असलेली माहिती मिळू शकेल हे सांगतात.

पौलस वाघमारे हे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे (२०२३) विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्षही आहेत.

गंमत म्हणजे त्यांची आणि माझी पहिली गाठभेट मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्तानेच झाली आणि आतापर्यंत आमचे सर्व समोरासमोरचे आणि फोनवरचे संभाषण आणि चर्चा ख्रिस्ती साहित्य आणि ख्रिस्ती साहित्य संमेलनांबाबतच असते.

पुण्यात मॉडेल कॉलनीत चर्चच्या विद्याभवन स्कुलमध्ये १९९२ साली मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवण्यात येणार होते.

शाळेचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते, फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलानाध्यक्ष होते, शांता शेळके संमेलनाच्या उदघाटक होत्या आणि पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचे पदाधिकारी म्हणून पौलस वाघमारे यजमान समितीत होते.

त्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि आम्हा दोघांची अशी पहिली मुलाखत झाली.

साहित्य संमेलनाचे ते प्रवक्ते आणि मी एक पत्रकार, आमच्या दोघांमध्ये असलेले हे नाते गेली तीस वर्षे आजतागायत कायम राहिले आहे.

ख्रिस्ती संमेलनांबाबत किंवा ख्रिस्ती साहित्यिकांबाबत कसलीही माहिती हवी असली कि पहिला फोन मी वाघमारे याना लावत असतो,

त्यानंतर मालवणला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आमची दुसऱ्यांदा गाठभेट झाली. निरंजन उजगरे त्यावेळी अध्यक्ष होते, मिलाग्रिस चर्चचे फादर गॅब्रिएल डिसिल्व्हा स्वागताध्यक्ष होते. शिवसेनेचे त्यावेळचे स्थानिक आमदार नारायण राणे उदघाटक होते.

नारायण राणे यांचे जोश निर्माण करणारे भाषण, संमेलनाच्या तीन दिवसांत माशांच्या जेवणाची मेजवानी आणि पौलस वाघमारे यांची भेट अशा काही या संमेलनाच्या आठवणी आहेत.

ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे गेली खूप वर्षे पौलस वाघमारे सचिव वगैरे पदांवर सतत राहिले आहेत आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी आपण मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊच अशी मनीषा आणि आकांक्षा बाळगून होते.

दरम्यानच्या काळात सिसिलिया कार्व्हालो यांची प्रस्तावना असलेला `मोगळ्यांचा कळ्यांचा सुवास' हा एक काव्यसंग्रह (साल २०००) त्यांच्या नावावर जमा झाला होता. अर्थात एकही साहित्य कलाकृती नसलेल्या काही व्यक्ती ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी लोक कायकाय खटपटी करतात हे त्यांनी जवळून पाहिले आणि एकदा त्यावर पदरमोड करून अनेक जणांची नावे देऊन एक पुस्तिकाच छापली आणि भरपूर लोकांना वाटली.

याची पौलस वाघमारे यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली.

एका व्यक्तीने त्यांच्यावर पुण्यात शिवाजीनगर कोर्टात बदनामीचा दावा दाखल केला, सुनावणी काही वर्षे चालली, वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला तर अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले, तिथेही वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला.

त्या अर्जदाराने सुदैवाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले नाही आणि वाघमारे यांची अशाप्रकारे या कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांतून सुटका झाली.

त्यांचे एक वकील मित्र असलेल्या मराठी साहित्य परिषदेचे एक पदाधिकारी प्रमोद आडकर यांनी न्यायालयात वाघमारे यांची बाजू लढवली होती.

हे प्रकरण ऐकले तेव्हा खूप वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या असलेल्या एका साहित्यिकाने राबवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेबद्दल वृत्तपत्रांत टीका वाचल्याचे आठवले.

उमेदवार असलेल्या त्या नामदार महोदयांनी चक्क विमानप्रवास दौरे केले होते असे काहीसे आठवते.

त्यानंतर लगेचच पौलस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली, तो पण एक वेगळाच किस्सा आहे. असो.

बीड येथे २०२३ साली पार पडलेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती संमेलनाचे अध्यक्षपद पौलस वाघमारे यांनी भूषवले.

तीन दशकांपूर्वी झालेल्या मालवणच्या संमेलनानंतर आतापर्यंत एकही संमेलनाला मी हजर राहिलो नाही आणि वाघमारे यांनी एकही संमेलन चुकवलेले नाही.

फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या आग्रहास्तव मला ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या समितीत घेतले होते, मी एकाही बैठकीला गेलो नव्हतो.

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे एक पदाधिकारी म्हणून वाघमारे यांची सगळीकडे मांडवात आणि मंचावरसुद्धा उपस्थिती असते.

आता होऊ घातलेल्या नाशिक येथील संमेलनाचे अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत आणि संमेलनाची तयारी करण्यात ते गर्क आहेत.

नंतरच्या भावी संमेलनांत एक माजी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान असणार आहेच.

तर सांगायचा मुद्दा असा कि पौलस वाघमारे साहित्य संमेलने असे प्रत्यक्ष जगत आले आहेत.

त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचा मोठा साठा आहे, अनेक पुस्तके वाळवीला भक्ष्य पडली आहेत तरी रस्त्यावर नवनवी दुर्मिळ पुस्तके घेण्याची त्यांची हौस थांबत नाही.

विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह बाळगणारे वाघमारे स्वतः ही पुस्तके वाचत नाहीत. त्यांना फक्त पुस्तक संग्रहाचा छंद आहे. काही हजार पुस्तके त्यांच्याकडे असतील.

त्यांची ही बाब आता कळल्यामुळेच त्यांना सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या मिचेल दाम्पत्य आणि सिंथिया फरार यांचे माझे नवे पुस्तक काल मी त्यांना दिले नाही.

त्यांनी त्यांचा `व्यक्त सत्य' हा नवा लघुकथासंग्रह मला दिला, तो मात्र मी स्विकारला. अर्थात मी हे पुस्तक वाचणार आहे. कालच्या भेटीतील भर पावसात रस्त्यावर घेतलेला हा फोटो.

साहित्य वाचण्याऐवजी साहित्यिक आणि माणसे वाचण्याची, जोडण्याची त्यांची प्रचंड हौस आहे.

या साहित्य संमेलनांकडे मी फिरकत नसतो तसेच पत्रकार असलो तरीही नामवंत साहित्यिकांशी माझा कधी संबंधसुद्धा आलेला नाही.

माजी संमेलनाध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हरेगावच्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी प्रवचनाला आले होते तेव्हा शाळेत असताना त्यांना मी पहिल्यांदा ऐकले होते.

तेव्हापासून फादरांना मी जेमतेम तीनवेळा भेटलो. संभाषण असेल केवळ पाचसहा वाक्यांपुरते.

जवळपास अशीच बाब इतर साहित्य संमेलनाध्यक्षांबाबत.

वाघमारे यांचे अगदी याउलट आहे.

सत्यवान नामदेव सुर्यवंशी हे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतले पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे लेखक. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपल्या `प्रसादचिन्हे' या ग्रंथात हे स्पष्ट केले आहे.

पत्रकारितेची माझी सुरुवात मुळी स. ना. सूर्यवंशींच्या आपण साप्ताहिकातून झाली असे म्हणायला हरकत नाही.

श्रीरामपूरला मी दहावीत शाळेत असताना सूर्यवंशींच्या नाशिक येथल्या `आपण' साप्ताहिकात माझ्या दोन कथा बाल सदरात छापल्या होत्या आणि पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पोस्टाने मला घरी पाठवल्या होत्या.

लिखाणाचा हा माझा पहिला मोबदला.

त्यानंतर दैनिकांत बातम्या लिहितच माझी संपूर्ण कारकिर्द झाली.

सूर्यवंशींचे अल्पचरित्र माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत आहे.

तर या सूर्यवंशींना मी एकदाच पाहिले आणि ऐकले, त्यांच्या निधनापूर्वी सहा महिने आधी पुण्यात २००० ला.

या सुर्यवंशी यांच्या भेटीचा वाघमारे यांनी एक अनुभव काल सांगितला तेव्हा मी थक्क होऊन मी ऐकत होतो.

वाघमारे यांचा संमेलने आणि साहित्यिक त्यांच्याबाबत असा अगदी समृद्ध अनुभव आहे

हे सर्वच कडूगोड अनुभव लिहिण्यासारखे नसले तरी त्यांव्याकडून ऐकण्यासारखे निश्चितच आहेत.

सन १८२७ पासून सुरु झलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षस्थानी थोर लोक राहिलीयेत,

`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, स. ना. सूर्यवंशी, निरंजन उजगरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो ही त्यापैकी काही नावे.

पौलस वाघमारे या यादीतील अलीकडचे शेवटचे नाव.

या लोंकांसारखे आपण बुद्धिमान, थोर साहित्यिक नाही याची जाणीव वाघमारे यांना आहे. तरी संमेलनाध्यक्ष झाल्याबद्दल ते कृतार्थ आहेत.

अलीकडेच पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सत्कार झाला. तिथे लोक त्यांच्याविषयी भरभरून बोलले.

लेखक, कवी आणि एक साधा, निर्मळ मनाचा माणूस म्हणून अनेक लोक पौलस वाघमारे यांना ओळखतात.

अशी माणसे विरळ असतात.

Camil Parkhe August 30, 2025 



Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025