Did you like the article?

Tuesday, June 28, 2022

 

 
फॅमिली डॉक्टर ही संकल्पना तशी काही वर्षांपूर्वीच नामशेष होत चालली आहे. मात्र माझ्या कुटुंबासाठी आजही एक फॅमिली डॉक्टर आहेत. आमची स्वतःची फॅमिली झाल्यावर काही महिन्यांची आमची मुलगी काही केल्या रडायची थांबेना तेव्हा आम्ही पहिल्यांदा घराशेजारी असलेल्या एका डॉक्टरांकडे गेलो होतो. 
 

बाळाला हातात घेतल्यावर `एका पायातले चांदीचे वाळे रुतते आहे म्हणून ती रडते आहे' असे म्हणत त्यांनी ते वाळे सैल केले आणि आदिती रडायची थांबली. तेव्हापासून हे आमचे फॅमिली डॉकटर झाले ते आजतागायत.

काहीही दुखणेफुकणे झाले की आम्ही या डॉक्टरांकडे जातो आणि औषधे लिहून झाली की मग आम्ही आमच्या घरातल्या सुखदुःखाच्या गोष्टी डॉक्टरांना सांगतो. बाहेर कितीही पेशंट असले तरी डॉकटर आमच्याशी बोलत असतात, मागे डॉकटर स्वतः एका जीवघेण्या वाहन अपघातातून वाचले तेव्हा तेच पेशंट म्हणून आम्हीच त्यांना भेटायला जात असू. 

 

मागच्या दिवाळीला डॉक्टरांना नव्या कपड्याचा जोड द्यायचा असे आम्ही आम्ही नवराबायकोने ठरवले. डॉक्टरांना त्यांचें अंगाचे माप विचारले तर ते म्हणाले ``मी रेडिमेड कपडे कधीच वापरत नाही, नेहेमीच शिवून घेतो. ‘’

``नाही डॉकटर, तुम्ही यावेळी फक्त दोन रेडीमेड कपड्यांचे जोड वापरा, नाही आवडले तर पुन्हा रेडिमेड कडे वळा पाहिजे तर. पण एकदा रेडिमेड कपडे ट्राय तर करा..’’

 

पण डॉकटरसाहेब आपल्याच हट्टाला हटून बसले आणि माझा नाईलाज झाला.

 

खरं पाहिलं तर डॉक्टरांना हे समजावून सांगण्यामागे माझा स्वतःचा याबतीतला अनुभव होता. अनेक वर्षे कापड घेऊन नेहेमीच्या टेलरकडून मी कपडे शिवून घेत असे. कधीतरी बायकोच्या हट्टावरुन रेडिमेड कपडे घेतले, त्यांची फिटिंग, किंमत वगैरे पाहता मी आता कधीही शिवलेले कपडे वापरत नाही. तीच गोष्ट टी-शर्ट बाबत. गोव्यात अगदी कॉलेज जीवनातसुद्धा नेहरु शर्ट मी वापरत असते. जाड खादीचे नेहरु आणि कॉटनचे नेहरु शर्ट. आज या पेहेरावातील जुने फोटो पाहताना गम्मत वाटते. 

 

हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला चॉकलेट हिरो असणाऱ्या राजेश खन्नाने सत्तरच्या दशकात नेहरू शर्ट जाम लोकप्रिय केला होता. नेहरु शर्ट घालणाऱ्या राकेश खन्नावर किशोर कुमारने गायलेली अनेक गीते चित्रित करण्यात आली आहेत. आज पंडित नेहरु इतिहासातून गायब होत असताना `नेहरु शर्ट' हे विशेषण कधीच कालबाह्य झालेले आहे.

तर हे नेहरु शर्ट अनेक वर्ष वापरणारा मी वापरणारा मी गेली अनेक वर्षे आरामदायक, सोयिस्कर आणि नव्या जीवनशैलीशी साजेसे म्हणून टी-शर्टचा फॅन बनलो आहे. 

 

ब्रँडेड कपडे आणि बूट वापरण्याचे फायदेसुद्धा मला आता कळाले आहेत. या सर्व बदलाचे प्रमुख कारण म्हणजे कुठल्यातरी टप्प्यावर मी माझ्या आवडीनिवडीत आणि सवयीत बदल करण्यास होकार दिला होता.

 

आमच्या घरी घरकामासाठी मदतनीस म्हणून गेली अनेक वर्षे येणाऱ्या लताबाईंचे उदाहरण मला आजही हसू आणते. आधीच्या तीनमजली इमारतीतल्या वन बेडरुम फ्लॅटमधून आम्ही शेजारच्याच पाचमजली इमारतीत टू-बेड- रुम फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो तेव्हाची ही गोष्ट. इथे लिफ्टची सोय असूनही लताबाई जिना चढून यायच्या आणि मग पाच मिनिटे घरात धापा टाकत बसायच्या. 

 

‘’मी नाय बया लिफ्टमधून येनार, भ्या वाटतंय,;; असे त्या म्हणायच्या. दोनतीन वेळीस त्यांना मी बळजबरीने लिफ्टमधून वर आणले, खाली पोहोचवले, तेव्हा लिफ्टच्या एक कोपऱ्यात घाबरुन डोक्याला हात लावून डोळे बंद करुन त्या बसायच्या. एक आठवडाभर असे चालले असेल.

 

आता परिस्थिती बदलली आहे. लताबाई नेहेमीच लिफ्ट वापरतात, खालच्या मजल्यावर जाताना शक्यतो लोकांनी पाच माजले खाली चालत जावे अशी अपेक्षा असते, लताबाई खाली जायचे असल्यास तळमजल्यावरुन पाचव्या मजल्यावर लिफ्ट वर बोलावतात आणि नंतरच लिफ्टने खाली जातात, एखादे वेळेस वीज नसल्यास पाचव्या मजल्यावर चालून येण्यास कुरकुर करतात. 

 

आहे कि नाही मानवी स्वभावाची ही गंमत?

 

गोव्याला मी नियमितपणे जात असतो. गेली कित्येक वर्षे एकाच खासगी कंपनीच्या वातानुकूलित बसने आम्ही प्रवास करत असायचो. पणजीला सकाळी पोहोचेपर्यंत माझे एकूणएक सांधे दुखायला लागायचे, रात्रभर झोप तर नसायची. दोनतीन वर्षांपूर्वी कसे कुणास ठाऊक, स्लिपर कोचने प्रवास केला आणि त्या आरामदायक प्रवासाचा अनुभव घेतल्यावर यापूर्वीच या सुविधेचा लाभ का नाही घेतला याचे मलाच आश्चर्य वाटले.

 

आपल्यापेक्षा अनुभवाने शिक्षणाने आणि वयाने कितीतरी मोठे असलेल्या कितीतरी लोकांना असा लहान तोंडी मोठा घास घेऊन शहाणपणा सूनावण्याचे धाडस मी अनेकदा केले आहे, करत असतो. माझ्या शेजारी राहणाऱ्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्या बाबत असेच झाले. मोठ्या तीन बेडरूम मध्ये राहणारे हे माझे मित्र काही वर्षांपूर्वी सांगत होते कि त्यांच्या घरी येणाऱ्या नातवंडांना तिथे फार करमत नाही कारण त्यांच्या घरात वातानुकुलीत यंत्रणा नाही आणि या आजोबांना तर एयरकंडिशनरची मुळी सवय नाही. मी त्यांना म्हटले `निदान एका रुममध्ये तरी एअरकंडिशनर बसवा.’’ हो-ना करत एकदाचे त्यांनी एअरकंडिशनर बसवला. 

 आता मला कळाले कि त्यांनी इतरही रुम्समध्ये वातानुकूलित यंत्रणा लावली आहेत आणि ऑकटोबरमध्ये आणि उन्हाळ्याच्या दोनतीन महिन्यांत गरमीची आतात्यांची कुठलीही तक्रार नसते.

 आणि ही घटना माझ्या बाबतीत घडलेली. मोबाईलचा जमाना सुरु झाला तरी प्रसारमाध्यमात असूनही मी मोबाईल घ्यायला मी तयार नव्हतो. माझ्या घरी लँडलाईन फोन आहे आणि शिवाजीनगरच्या `सकाळ टाइम्स'च्या कार्यालयात माझ्या टेबलावर फोन आहे. चिंचवडहून घरुन कार्यालयात येण्यासाठी पाऊण-एक तासाचा प्रवास होतो, त्याकाळात माझ्याशी संपर्क नाही झाला तर काय आभाळ कोसळणार आहे असा माझा प्रश्न असायचा. 

 

अखेरीस २००८ साली मी मोठया अनिच्छेनेच मोबाईल घेतला आणि स्वतःचा बावळटपणा मग लक्षात आला. आजकाल या मोबाईलवाचून जगणे आणि चारितार्थ चालवणे शक्य तरी आहे का असे वाटते.

 

कामावर जाताना, घरी येताना दुचाकीऐवजी मी नेहेमी सिटी बसचा वापर करायचो. काही वर्षांपूर्वी घरी कार विकत घेण्याची चर्चा सुरु झाली तेव्हा ती चर्चा मी साफ उडवून लावली होती. त्यानंतर पाचसहा वर्षांनी मी कार घेतली, तेव्हा माझी चाळीशीकडे वाटचाल सुरु होती. साहजिकच कार चालवायला शिकणे खूप अवघड गेले. आता शहरात रोज कार चालविल्याशिवाय मला चैन पडत नाही, मात्र कार चालवत दूरच्या प्रवासावर निघण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास नाही. त्यामानाने कॉलेजात जाणारी माझी मुलगी आदिती खूप लवकर आणि अधिक सफाईदारतेने गाडी चालवायला शिकली. आता वाटते कार विकत घ्यायला मी खूप उशीर केला. 

 

माझ्या वयाचेच इतर काही जण मात्र आजही कार चालवू शकत नाही, हे पाहिले कि आपण उशिर केला तरी एकदमच टाळले नाही हे बरेच केले असे वाटते.

 

रविवारच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांसाठी चर्चमध्ये धर्मगुरु प्रवचन देतात ते `संडे सर्मन’ म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी या `संडे सर्मन’ची वेगळीच आवृत्ती मी अनुभवली. कॅथोलिक चर्चच्या ज्येष्ठ धर्माचार्यांना म्हणजे बिशप आणि कार्डिनल यांना अनुक्रमे वयाच्या ७५ आणि ८० ला निवृत्त व्हावे लागते. पुणे धर्मप्रांताचे ३३ वर्षे बिशप असणाऱ्या व्हॅलेरियन डिसोझा यांनी प्रशासकीय कामाच्या निवृत्तीनंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना फेसबुकवर आपली रविवारची प्रवचने पोस्ट करायला सुरुवात केली होती ! 

 

आध्यात्मिक सेवा कार्यातून निवृत्ती अशी त्यांना मुळी मान्यच नव्हती. त्यावेळी समाजमाध्यमांचा जमाना नव्यानेच सुरु झाला होता. उत्तम वक्ते असल्याने बिशप महोदयांच्या या विद्ववत्तापूर्ण आणि रंजक प्रवचनाचा त्यांचे विविध शहरांत असलेले फेसबुक मित्र लाभ घेत होते आणि तत्क्षणी प्रतिसादही देत होते. नाविन्याची ओढ असली तर काय करता येते याचे हे उत्तम उदाहरण होते.

 

आपल्या सर्वांनाच 'जैसे थे' किंवा `status quo' स्थिती पसंत असते, या स्थितीतून किंवा `कम्फर्ट झोन'मधून बाहेर येण्यास आपण सहसा तयार नसतो. या स्थितीतुन बाहेर आल्यावरच आपण आतापर्यंत काय आनंद किंवा सुख गमावत होतो हे उमजते. 

 

हा मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचा जमाना आहे, या युगात नेहेमीचे चाकोरीबद्ध जीवनशैली, सवयी किंवा विचार सोडून नवी वाट तुडवावी लागते तेव्हा कुठे आनंद, यश आणि काहीतरी नाविन्यपूर्ण केल्याचा आनंद मिळतो. यालाच `आऊट ऑफ बॉक्स’ थिंकिंग असे नाव देण्यात आले आहे.

 

साचेबद्ध आणि कंटाळवाणे जगणे टाळायचे असेल तर असा चाकोरीबाहेरचा नवा विचार आणि कृती करायला हवी. प्रयत्न करून तर बघा आणि मी काय म्हणतो आहे हे तुम्हालाही पटेल. 

 

(दिव्य मराठी' मधला लेख)

Friday, June 24, 2022

  May be an image of 1 person

 `गोयंचो सायबा........

दारु कि बोटल मे
साहब पानी भरता है
फिर ना कहना मायकल
दारु पिके दंगा करता है
हे हे हे हेे
हांव गोयंचो सायबा
लल्ला लल्ला ला
हे हे हे हेे
हांव गोयंचो सायबा
लल्ला लल्ला ला
 
अमिताभ बच्चन नायक असलेल्या `मजबूर’ चित्रपटात प्राण आणि जयश्री टी. यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे आठवते? सत्तर-ऐंशीच्या दशकांत हे गाणे खूप गाजले होते. 
 
कोकणी भाषेतली वाक्ये घेऊन हिंदी चित्रपटातले हे एक दुसरे महत्त्वाचे गाणे. त्याआधी `बॉबी' चित्रपटात 'ना मांगू सोना चांदी,... घे घे घे रे घेरे सायबा, माका नाका गो, माका नाका गो' हे ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडियावर चित्रित झालेले गाणे खूप गाजले होते. ही कोकणी ओळ `देखणी' या गोव्यातील सर्वात प्रसिद्ध कोकणी लोकगीतातली आहे. घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या सुरांत गायले जाणारे हे `देखणी' गीत तुमच्यापैकी अनेकांनी पणजी येथे मांडवीच्या आणि अरबी समुद्रावरच्या बोट क्रुझवर ऐकले असेल. 
 
`हांव गोयंचो सायबा’ या गाण्याच्या संगीतासाठी ट्रम्पेट, व्हायोलिन आणि गिटार या खास पारंपरिक गोवन वाद्यांचा वापर केलेला आहे. 
 
`हांव गोयंचो सायबा' हे गाणे जुन्या पिढीतल्या लोकांना चांगले आठवत असेल. हा चित्रपट मी स्वतः पाहिला नसला तरी हे गाणे रेडिओवर आणि रस्त्यावरच्या लग्नाच्या आणि इतर मिरवणुकीत हजारदा ऐकले आहे.
 
`मजबूर' पिक्चर बहुधा फार चालला नाही, त्यातलं किशोर कुमारने गायलेले हे गाणं मात्र आजही लोकांच्या ओठांवर असतं. 
 
मागच्या वर्षी घरातल्या एका लग्नाच्या वेळी सेलेब्रेशनच्या शेवटी मग यजमान असलेल्या मायकल नावाच्या व्यक्तीला काहींनी उचलून धरले आणि मग लाईव्ह म्युझिकच्या ठेक्यावर 'फिर ना कहना मायकल दारु पिके दंगा करता है- हांव गोयंचो सायबा' ' हे गाणे म्हणत सर्वच जण भरपूर नाचले होते. 
 
कुठल्याही पार्टींत आणि सेलेब्रेशनमध्ये बर्थडे बॉय किंवा यजमान `मायकल' असेल तर 'फिर ना कहना मायकल दारु पिके दंगा करता है - हांव गोयंचो सायबा'’’ या गाण्यावर सर्वांनी नाचण्याचे शास्त्रसंमत असते.
 
हे नमनालाच घडाभर तेल झालं, तर आता मूळ मुद्द्यावर येतो.. 
 
पारंपरिकरित्या `गोयंचो सायबा' म्हणजे सेन्ट फ्रान्सिस झेव्हियर. ओल्ड गोवा येथे त्याच्या शरीराचे अवशेष (रिलिक ) जपवून ठेवण्यात आले आहेत.
 
(मूळ इटालियन असलेले `मॅडोना' हे नाव येशूच्या आईसाठी -मदर मेरीसाठी - सर्रासपणे वापरले जाते तसे गोव्यात मदर मेरीला कोकणी भाषेत `सायबिणी' अशी एक उपाधी आहे, जसे मध्य महाराष्ट्रात `मारियाबाई' असे संबोधले जाते. )
 
सतराव्या शतकातील फ्रान्सिस झेव्हियर हा स्पॅनिश जेसुईट धर्मगुरु. सोसायटी ऑफ जिझस किंवा येशूसंघ ही कॅथॉलिक धर्मगुरुंची संस्था त्याने सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला यांच्याबरोबर स्थापन केली होती. गोव्यात आणि भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यात त्याचे मोठे योगदान आहे. चीनकडे जाण्यासाठी जहाजाची वाट पाहत असताना त्याचे निधन झाले आणि त्याचे शरीर गोव्यात आणले गेले. ते कुजले नव्हते म्हणून मग जपले गेले आणि गेली काही शतके पारदर्शक पेटीत ठेवण्यात आले आहे. 
 
तीन डिसेंबर हा सेंट फ्रान्सिस झेव्हियर याचा सण (फेस्त) , त्यादिवशी ओल्ड गोव्यात मोठी यात्रा भरते, तीन डिसेंबरला गोवा राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. 
 
महाराष्ट्रातून काही मंडळी, विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील बार्देसकर लोक, या गोयंचो सायबाला वंदन करण्यासाठी पदयात्रा करत ओल्ड गोव्याला दोन डिसेंबरच्या संद्याकाळी पोहोचत असतात. 
 
गोवा राज्य शासनातर्फे या संताच्या अवशेषाचे दशकातून एकदा प्रदर्शन (Exposition) भरवले जाते. या संताचे अवशेष ओल्ड गोवा येथल्या बॉम जेसू बॅसिलिकातून रस्त्यापलिकडच्या सफेद रंगातल्या भव्य सी कॅथेड्रलमध्ये हलवले जातात आणि तिथे हे प्रदर्शन भरते. 
 
कॅथोलिक चर्च संत फ्रान्सिस झेव्हियरच्या या अवशेषाला शरीर मानत नाही तर केवळ अवशेष (रिलिक) मानते हे महत्त्वाचे. या अवशेषाचे फार अवडंबर माजवले जात नाही, ते बॅसिलिकाच्या मुख्य वेदीवर नाही तर डाव्या बाजूच्या उंच चोथऱ्यावर ठेवलेले असतात. वेदीवर मुख्य सन्मान अर्थातच येशू ख्रिस्तालाच असतो. 
 
अशाच एकदोन प्रदर्शनात सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे हे अवशेष मी जवळून पाहिले आहे. सर्व अवयव असलेले शरीर म्हणता येईल असे यात काही नाही. म्हणूनच अवशेष किंवा रिलिक असा शब्दप्रयोग केला जातो. काचेच्या पेटीत हाडांच्या सापळ्यावर सुकलेली कातडी आणि कवटी असलेल्या या अवशेषावर धर्मगुरुचे रंगीत, चमकीदार झगे घातलेले असतात एव्हढेच.
 
मध्ययुगीन काळातल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर याला त्याच्या काळाचे काही गुण आणि अवगुणसुद्धा चिकटलेले आहेत. ख्रिस्ती धर्मगुरु असल्याने त्याकाळच्या रितीरिवाजानुसार धर्मप्रसार करणे हेच फ्रान्सिस झेव्हियरच्या आयुष्याचे मुख्य मिशन होते आणि यात त्याला बऱ्यापैकी यश आले. 
 
ख्रिस्ती धर्मातील पाखंडी लोंकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी युरोपाप्रमाणेच गोव्यातसुद्धा इन्क्विझिशन बोर्ड स्थापन करावे असा या संताचा आग्रह होता. पोर्तुगाल, स्पेन वगैरे कॅथोलिक असलेल्या देशांत इन्क्विझिशन बोर्डकडून तथाकथित पाखंडी लोकांचा खूप छळ झाला होता. 
 
संत फ्रान्सिस झेव्हियरला कॅथोलिक चर्चने गोव्याचा आश्रयदाता म्हणजे Patron Saint हा दर्जा दिला आहे. प्रत्येक कॅथोलिक धर्मप्रांताचा स्वतःचा पॅट्रन सेंट असतो. गोव्यात, भारतात आणि जगभरात सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या नावाने अनेक चर्चेस आणि शाळा-कॉलेजेस आहेत. 
 
पण प्रश्न असा कि संत फ्रान्सिस झेव्हियरला `गोयंचो सायबा’ हा उपाधी कुणी दिली? चर्चने तरी अशी काही उपाधी दिलेली नाही. 
 
फक्त जुन्या चालत आलेल्या परंपरेनुसार `गोयंचो सायबा' म्हणजेच संत फ्रान्सिस झेव्हियर असेच आहे.
`गोयंचो सायबा’ अधिकृत उपाधी किंवा किताब नाही. 
 
त्या निमित्ताने `हे हे हे, हांव `गोयंचो सायबा' या गाण्याची उजळणी झाली, यु-ट्यूबवर हे खूप जुने गाणे पाहणे झाले, हेही नसे थोडके ... .. 
 
पोर्तुगीज पासपोर्टचे वरदान असलेले गोंयकार सगळ्या जगात पसरले आहेत, तेथे ते आपली `माय भास' कोकणी आणि  या  ` गोंयचो  सायबा' घेऊन गेले आहेत. तेथे त्याची तीन डिसेंबरला  फेस्त साजरी होते आणि सां फ्रान्सिस साव्हेरा हे कोकणी गायन गायले जातेच.

जगभर जिथेजिथे गोवन कॅथोलिक आज हा सण साजरा करतील तिथेतिथे हे कोकणी गायन गायले जाते.  या गायनाची चाल अत्यंत सुंदर आहे. यु ट्यूबवर एकदा ऐकून तर पहा.

गेली काही शतके गोव्यात कॅथोलिक समाज कोकणी लिहिण्यासाठी रोमन लिपीचा वापर करत आला आहे. बायबल आणि इतर धार्मिक कोकणी पुस्तके रोमन लिपीतच असतात.  

 हे कोकणी गायन रोमन लिपीत आहे पण वाचल्यावर त्याचा अर्थ मराठी वाचकाला बऱ्यापैकी कळेल.

 

SAM FRANCIS XAVIERA

 

Sam Francis Xaviera, vodda kunvra

Raat dis amchea mogan lastolea

Besanv ghal Saiba sharar Goyenchea

Samballun sodankal gopant tujea

Beporva korun sonvsarachi

Devachi tunven keli chakri

Ami somest magtanv mozot tuzi,

Kortai mhonn milagrir, milagri

Aiz ani sodam, amchi khatir

Vinoti kor tum Deva lagim

Jezu sarkem zaum jivit amchem,

Ami pavo-sor tuje sorxi

 

 

Tuesday, June 21, 2022

 Manjula Chellur sworn-in as the Chief Justice of Bombay High Court-Politics  News , Firstpost 

 

न्यायमूर्ती सुजाता मनोहर

 

खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. गोव्यातून  The  Navhind Times हे इंग्रजी दैनिक सोडून आणि गोवा सोडून मी महाराष्ट्रात आलो होतो. काही महिन्यांनी औरंगाबादला लोकमत टाइम्स या दर्डा उद्योग समूहाच्या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून रुजू झालो. पणजीला मी मुंबई हाय कोर्टाचे खंडपीठ कव्हर करत होतो. साहजिकच मग मला औरंगाबाद येथे असलेल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे बिट देण्यात आले. झाले, माझे रुटीन सुरु झाले. 
 
सकाळी एकदोन ठिकाणी बातम्या गोळा करुन झाल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास क्रांती चौक ओलांडून मी उच्च न्यायालयाकडे यायचो, तेथे ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर वगैरेंना भेटून मग मी तडक खंडपीठाच्या रजिस्ट्रारकडे यायचो. गोव्यातही माझा असाच नित्यक्रम असायचा. रजिस्ट्रारकडे अधिकृत बातमी मिळायची आणि ती गोळा केल्यावर मी निघायचो. 
 
तर त्या दिवशी माझ्याकडे उच्च न्यायालयातली कुठलीही हार्ड बातमी नव्हती. त्याऐवजी एक मोठी पण आम्हा पत्रकारांच्या भाषेत सॉफ्ट बातमी मला मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती आणि या पहिल्या महिला न्यायाधीश नुकत्याच औरंगाबाद खंडपीठात व्हिझिटिंग जज्ज म्हणून आल्या होत्या. त्यांची मला लोकमत टाइम्ससाठी मुलाखत घ्यायची होती. 
 
ही घटना आहे १९८८ ची. त्याआधी ऐंशीच्या दशकात गोव्यात जवळजवळ सातआठ वर्षे मी उच्च न्यायालयाची जबाबदारी सांभाळली होती. त्याकाळात पणजीला मिरामार येथे नुकतेच व्ही एम साळगावकर लॉ कॉलेज सुरु झाले होते. गोव्यातले हे बहुधा पहिलेच लॉ कॉलेज. मात्र कायद्याचा पदवीधर नसतानाही मी हाय कोर्टाच्या बातम्या व्यवस्थित दिल्या होत्या. फिलिप कुटो या नावाचे ज्येष्ठ न्यायाधीश त्यावेळी पणजी इथल्या खंडपीठात होते, बाकीचे एकदोन न्यायाधीश मुंबई किंवा इतर खंडपीठांतून व्हिजिटिंग जज्ज म्हणून काही महिन्यांसाठी येत असत. 
 
एक मात्र खरे कि हाय कोर्टाच्या बातम्या देणे हे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम होते. यात चुकीला क्षमा नसायची. दुसरे म्हणजे हाय कोर्टाच्या बिट्सचा इतका अनुभव गाठीला असताना एकदाही कुणाही न्यायाधिशाच्या चेंबरमध्ये जाण्याचा, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. 
 
रजिस्ट्रार ओळखीचे होतेच, त्यांनी लगेच नव्या न्यायाधीश मॅडमची मला भेटण्यासाठी परवानगी मागितली आणि मी त्या चेंबरकडे वळालो. 
 
सुजाता मनोहर हे त्या मुंबई हाय कोर्टाच्या पहिल्यावहिल्या महिला न्यायाधिशांचे नाव होते. मुंबई हाय कोर्ट हे भारतातील एक सर्वात जुने उच्च न्यायालय, या न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती. मूळच्या नागपूरच्या असलेल्या सुजाता मनोहर यांच्याकडे उच्च न्यायालयातील वकिलीचा अनुभव होता. 
 
हातात बातमीदाराचे नोटपॅड आणि दुसऱ्या हातात पेन घेऊन त्या मोठ्या दालनात मी त्या न्यायाधिशांसमोर आलो. न्यायमूर्तींना युवर लॉर्डशिप म्हणायचे असते. या पहिल्या युवर लेडीशिप बनल्या. न्यायाधीश मॅडम टेबलावरच्या फिती बांधलेल्या फाईल्स पाहत होत्या. आपले काम चालू ठेवत त्यांनी माझ्याकडे पाहिले, मला खुर्चीवर बसण्यास हातानेच सुचना केली. 
 
खुर्चीवर 'बसा' म्हणून स्पष्ट सूचना झाल्याशिवाय कुठल्याही कार्यालयात स्थानापन्न व्हायचे नाही हा नियम मी नेहेमीच पाळत आलो आहे, शिष्टाचाराचे नियम यजमानाने आणि पाहुण्याने दोघांनीही पाळायचे असतात. 
 
न्यायाधीश सुजाता मनोहर यांनी फाईलींमधून डोके वर काढून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि आता संभाषण सुरु करणे मला भाग होते. `लोकमत टाइम्स'चे माझे व्हिझिटिंग कार्ड रजिस्टारमार्फत त्यांच्याकडे त्याआधीच पोहोचले होते. 
 
मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधिश म्हणून त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी आलो आहे असे मी त्यांना सांगितले. सुजाता मनोहर या औरंगाबाद खंडपीठात यावेळी पहिल्यादांच आल्या होत्या तरी मुंबई न्यायालयात त्यांनी बरेच दिवस काम होते, अनेक पत्रकारांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या असणार. पहिल्या महिला न्यायाधीश असण्याची नवलाई त्यांना आता वाटतही नसणार किंवा त्याबाबतचे नाविन्य मिरवायची गरज त्यांना वाटत नसावी हे त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहताच मला जाणवले. 
 
झाले, माझ्या मुलाखतीची हवा मुलाखत सुरु होण्याआधीच निघून गेली होती. 
 
त्यावेळी पत्रकारितेत येऊन मला सात-आठ वर्षे झाली होती तरी तिशीच्या आत असलेला मी अनुभवाने आणि वयाने तसा कोवळाच होतो. आता कसे तरी वेळ मारुन जाणे भाग होते. 
 
पत्रकारितेतील माझ्या दीर्घ कारकिर्दीतील ही एक फसलेली मुलाखत. कारण मुंबई हाय कोर्टाच्या आपण पहिल्या महिला न्यायाधीश असलो तरी त्यामुळे आपण काही फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे अशी जस्टिस सुजाता मनोहर यांची भावना नव्हती. `SO What..? '' this was her attitude, I realised it. 
 
त्यामुळे एक महिला न्यायाधीश म्हणून त्यांची मुलाखत घेण्यात काहीच अर्थ नाही हे माझ्या वेळीच लक्षात आले. 
 
''This is just a courtesy call. Thanks for permitting this visit'' असे बोलून मी ही मुलाखत आणि भेट आवरती घेतली. 
 
सुजाता मनोहर नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आणि फातिमा बी यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश बनल्या. 
 
या घटनेनंतर गेल्या तीस वर्षांत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत, या काळात अनेक महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदांवर अजूनही महिलांची ने
 
महिलांच्या कर्तबगारीचा आणि कर्तृत्वाचा विषय निघाला कि मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश सुजाता मनोहर यांच्याशी झालेल्या या अल्पकालीन मुलाखतीची मला हमखास आठवण येते. 
 
परवा भाजपचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना 'राजकारण सोडून स्वयंपाकघरात किंवा मसणात जा' असा सल्ला दिला तेव्हाही हा खूप जुना प्रसंग माझ्या नजरेसमोर तरळला.  
 

Saturday, June 4, 2022

मृत्युलेख महिमा आणि माहात्म्य 

नव्वदच्या दशकात पुणे कॅंपातल्या अरोरा टॉवर्समधल्या इंडियन एक्सप्रेस कार्यालयात काम करतानाची ही गोष्ट. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व असलेल्या इंग्रजी दैनिकात काम करत असल्याने अनेकदा पुण्यातील किंवा आमच्या आवृत्तीत येणाऱ्या परिसरांतील महत्त्वाच्या घटनांचे वृत्तांकन देशपातळीवर वापरले जाई. तसेच पुणे शहर म्हणजे राष्ट्रपातळीवरच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या राहण्याचे ठिकाण, यापैकी एखादी महत्त्वाची म्हणजे व्हिआयपी व्यक्ती अचानक किंवा वृद्धापकाळाने किंवा आजाराने निधन पावल्यास मग अशा व्यक्तींची ऑबिट किंवा मृत्युलेख तयार करुन लगेच मुंबई कार्यालयात राष्ट्रपातळीवर वितरीत करण्यासाठी पाठवावा लागे.

`इंडियन एक्सप्रेस’ आणि याच समुहाच्या असलेल्या `लोकसत्ता’च्या आवृत्त्या पुण्यात नव्यानेच सुरु झाल्या होत्या, त्यामुळे इथे `केसरी', `सकाळ' सारख्या इतर स्थानिक वृत्तपत्रांकडे होत्या तशा लायब्ररी किंवा कुठल्याही प्रकारचे आर्चिव्ह असे नव्हते. त्याकाळात अशा वृत्तपत्रांच्या वाचनालयात प्रत्येक महत्त्वाच्या घटनांचे आणि व्यक्तींबाबतच्या वृत्तांचे कात्रण विशिष्ट सदरांत जपून ठेवले जाई आणि गरज भासेल तसे संपादकीय खात्यातील वरिष्ठांना संपादकीय किंवा बातमी लिहिण्यासाठी ही कात्रणे संदर्भ म्हणून पुरवली जायची. त्यामुळे अशा संदर्भसाधनांच्या अभावी एक मोठी व्यक्ती निधन पावली त्यावेळी त्या व्यक्तीची माहिती आणि मृत्युलेख तयार करताना धमछाक झाली होती.
ओशो किंवा आचार्य रजनीश यांचे १९ जानेवारी १९९० ला संध्याकाळी निधन झाले. त्यावेळी आमचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे हे ओशोईट किंवा ओशो यांचे शिष्य असल्याने त्यांनी तातडीने स्वतः बातमी टाईप केल्याने आम्हा बातमीदारांची गोची टळली होती आणि अब्रूही बचावली होती. मात्र अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून संपादक कर्दळे यांनी आम्हा बातमीदारांना `पुर्वतयारी' करण्याची सूचना केली.
ती एक आगळीवेगळी पूर्वतयारी होती.
आम्हा सर्व बातमीदारांना आपापल्या बिट्समधल्या आयुष्याच्या धोकादायक पातळीपाशी आलेल्या म्हणजे सत्तरीच्या आसपास आलेल्या आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची, त्यानंतर या सर्व व्यक्तींचा बायोडेटा टाईप करुन ठेवण्याची आम्हाला सूचना करण्यात आली. यावेळी १९९० मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या आम्हा बातमीदारांच्या चमूमध्ये नरेन करुणाकरन, माधव गोखले, शुभा गोखले, संगिता जैन, विश्वनाथ हिरेमठ आणि मी स्वतः ( कामिल पारखे) यांचा समावेश होता.
त्या नव्वदच्या दशकात त्यावेळी सत्तरीकडे आगेकूच करणाऱ्या, सत्तरी आणि ऐंशी किंवा अगदी नव्वदी पार केलेल्या व्हिआयपी लोकांची संख्या पुण्यात लक्षणीय आहे हे तेव्हा लक्षात आले. गोव्यातून पुण्यात मी आल्यावर `पुणे तिथे काय उणे' ही म्हण मी ऐकत होतो, त्याचे प्रत्यंतर असे वेळोवेळी यायचे.
अर्थात आम्हा बातमीदारांपैकी काहींनी या लोकांचा बायोडेटा तयार करण्यापर्यंत मजल मारली तरी तो वापरण्याची किंवा अपडेट करण्याची पाळी कुणावरही आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे म्हणजे त्यावेळी या शॉर्टलिस्टमध्ये झळकलेल्या सत्तरी पार केलेल्यापैकी अनेकांनी नंतर ऐंशी गाठली, काहींनी नव्वदी गाठली आणि जेव्हा त्यांनी हे जग सोडले, त्याच्या कितीतरी आधीच आम्हा बातमीदारांपैकी अनेक जण `इंडियन एक्सप्रेस’ला रामराम ठोकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वृत्तपत्रसमुहात रुजू झाले होते.
त्याकाळात म्हणजे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी आम्ही अशी यादी केलेल्या काही व्यक्तींची नावे आता सांगायला हरकत नाही, त्यापैकी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या लोकांचा अपवाद वगळता आता या भुतलावर कुणीही नाही.. वयाच्या शंभरीपाशी आलेले क्रिकेटपटू प्रा. दि. ब देवधर, माजी केंद्रिय मंत्री आणि पर्यावरणवादी नेते मोहन धारिया, समाजवादी नेते ग. प्र, प्रधान, भाई वैद्य, वगैरे नावे आम्ही शॉर्टलिस्ट केली होती,
मी स्वतः कॅथोलिक असल्याने सत्तरीच्या आसपास असलेल्या पुणे डायोसिस म्हणजे धर्मप्रांताचे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचाही या कामासाठी बायोडेटा तयार करून ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती
गंमत म्हणजे बिशप व्हॅलेरियन यांचे नाव अशाप्रकारे मृत्यूलेखासाठी शॉर्टलिस्ट केल्यानंतर बिशपमहोदय आणखी तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक काळ अगदी आरामात जगले होते आणि त्यांच्या या दीर्घ आणि कृतार्थ आयुष्याचा मी स्वतः साक्षीदार होतो.                                                    
 
या `शॉर्टलिस्टिंग'नंतर तीनचार वर्षांनी ताडीवाला रोडवरच्या चर्चमध्ये झालेल्या माझ्या आणि जॅकलिनच्या लग्नाचे बिशप व्हॅलेरियन यांनी पौराहित्य केले होते, माझ्या तीन पुस्तकांचे त्यांनी प्रकाशन केले, यापैकी `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकाच्या छपाईसाठी त्यांनी मला निधी मिळवून दिला आणि पुण्यातल्या पत्रकार भवनात `टाइम्स ऑफ इंडिया’तले माझे बॉस आणि निवासी संपादक रवि श्रीनिवासन आदींच्या हजेरीत या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांचे केले.
वयाच्या पंचाहत्तरी नंतर रोमन कैथोलिक चर्चच्या कॅनन लॉनुसार ते निवृत्त झाले, आणि त्यांनी वयाची ऐशी वर्षे पूर्ण केली तेव्हा यानिमित्त बातमी करण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा बिशप महाशय आपल्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे डोक्यावरील कॅपसह अगदी टिपटॉप वेशात आपल्या लॅपटॉपवर आपल्या फेसबुकवरच्या फ्रैंड्ससाठी संडे सर्मन म्हणजे रविवारचे प्रवचन टाइप करत बसले होते ! सकाळ टाईम्स’ साठी मी लिहिलेली केलेली याबाबतची बातामी संपादक राहुल रोहित चंदावरकर यानी पान एकवर ठळकपणे अँकर म्हणून वापरली होती.
आणि या प्रत्येक प्रसंगी बिशप व्हॅलेरियन यांना भेटताना त्यांचे नाव आम्ही बातमीदारांनी विशिष्ट संदर्भात शॉर्टलिस्ट केले होते याची आठवण हटकून व्हायचीच आणि मला अपराध्यासारखे वाटायचे.
दोन वर्षांपूर्वी पुण्याचे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या दफनसंस्काराला मी आवर्जून हजार होतो. त्यांच्यासंबंधी मृत्युलेख मी लिहिला तो मात्र या फेसबुकवरच. `क्रुसाभोवतालचा मराठी समाज' या माझ्या पुस्तकात `सिंगिंग बिशप व्हॅलेरियन डिसोझा’ हा लेख पहिलेच प्रकरण आहे.
तर मृत्यूची बातमी आणि मृत्युलेख या तशा अत्यंत गंभीर आणि दुःखद घटनेविषयी असे अनेक गंमतीदार प्रसंग आणि किस्सेही घडले आहेत.
आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या वृद्धापकाळी म्हणजे वयाच्या ८८ व्या वर्षी प्रकृती खूप बिघडल्यावर प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला, म्हणजे अन्नत्याग केला आणि त्याचबरोबर आयुष्य लांबणीवर नेण्यासाठी कुठल्याही प्रकाराची वैद्यकीय सेवा स्विकारण्यास नकार दिला. याकाळात आचार्यांचे वास्तव्य त्यांच्या पवनार आश्रमात होते. विनोबा यांच्यावर आत्महत्याविरोधीचे कलम लावून त्यांच्यावर सक्तीने वैद्यकीय उपचार सुरु करावे अशी विनंतीही त्याकाळात कांहींनीं केली होती. मात्र प्रायोपवेशनाच्या निर्णयाची बातमी कळल्यावर तातडीने पवनारला येऊन विनोबांना भेटणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधींनीं विनोबांचे वय आणि प्रकृती पाहता त्या मागणीकडे सरळसरळ दुर्लक्ष केले होते.
ही घटना आहे १९८२ च्या नोव्हेंबरातली. विनोबांचा अंतकाळ आता जवळ आला हे स्पष्टच होते, त्यामुळे नागपुरातील, मुंबईतली आणि इतर शहरांतील पत्रकार मंडळी पवनारमध्ये ठाण मांडून बसली होती. ती अपेक्षित घटना घडताच बातमी देता यावी यासाठी तासागणिक पवनार आश्रमाकडे सर्व जण लक्ष लावून बसले होते.
पण तसे काही लवकर घडले नाही, त्यामुळे एक दिवशी अनेक पत्रकार काही तासांसाठी वा एक दिवसासाठी नागपुरात परतले.
नेमके त्याच दिवशी पुण्याहून युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे यूएनआय या वृत्तसंस्थेचे बातमीदार किरण ठाकूर पवनारला आले होते. त्याच दिवशी - १५ नोव्हेंबर १९८२ ला सकाळी- विनोबांनी अखेरचा श्वास घेतला आणि आश्रमात हजर असलेल्या युएनआयच्या ठाकूर यांनी लगेचच फोनवरून त्यांच्या वृत्तसंस्थेच्या कार्यालयाला कळवली.
झाले, काही मिनिटांतच ``विनोबा इज नो मोअर'' अशा आशयाच्या शिर्षकाच्या बातमीचा फ्लॅश (म्हणजे आजच्या काळातली ब्रेकिंग न्युज) युएनआय वृत्तसंस्थेने देशभरातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांना पाठवला.
नागपुरात थोडा काळ आपल्या घरी विश्रांतीसाठी गेलेल्या पत्रकारांनाही मग ही बातमी कळाली. त्यांना अशावेळी काय वाटले असेल याची आपल्याला कल्पना करत येईल. आचार्यांनी अचूक वेळ निवडली होती. पण करणार काय, चरफड़त सर्व पत्रकार घाईघाईने पुढच्या सोपस्कारासाठी पवनारकड़े परतले. नागपुरात परतलेल्या पत्रकारांमध्ये असलेल्या ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी `डायरी' या आपल्या पुस्तकात ही घटना सांगितली आहे. किरण ठाकूर यांनीही एका लेखात विनोबांच्या मृत्यूच्या बातमीमागची ही बातमी सांगितली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या शेवटच्या आजाराच्यावेळी वृत्तांकनासाठी `जोड-इंजिन’ म्हणून मुंबई कार्यालयातून पुण्याला पाठवण्यात आलेल्या `महाराष्ट्र टाइम्स'चे मुकेश माचकर यांनीं आपल्याबाबतीत जवळपास असाच किस्सा घडला असे लिहिले आहे.        
                                                              
 पु. ल. असलेल्या दवाखान्यातून माचकर पुण्यातल्या आपल्या घरी काही क्षणांसाठी आले होते तेव्हा मुंबईहून फोनवरुन महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनीं पुलंच्या निधनाची बातमी त्यांना कळवली होती !
पुण्यात पुलंचे निधन झाले ही बातमी पुण्यातच नुकत्याच सुरु झालेल्या `टाइम्स ऑफ इंडिया’च्या आवृत्तीत छापलीच गेली नव्हती यावर अनेकांचा आज विश्वास बसणार नाही. त्यावेळी स्वतः पुणेकर असलेले दिलीप पाडगावकर हेच `टाइम्स ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक होते.
मी `टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये पुण्यात काम करत असल्याने पुलंच्या निधनाची बातमी आपल्या दैनिकात नाहीच हा आम्हा सर्व पत्रकारांना हा मोठा धक्का होता. कुणाही निधनाच्या बातमी मुळी छापायचीच नाही असे अजब धोरण काही महिने `टाइम्स ऑफ इंडिया’च्या व्यवस्थापनाने स्विकारले होते, त्याचा हा परिणाम होता.
त्यानंतर आठवड्याने झालेल्या पुण्यात आमच्या संपादकीय विभागाच्या बैठकीत दिलीप पाडगावकरांनी या धोरणाचे जोरदार समर्थन केले होते. सुदैवाने हे विचित्र धोरण सहासात महिन्यांत रद्द झाले आणि निधनाच्या बातम्या आणि मृत्युलेख पुन्हा छापले जाऊ लागले. काही वर्षांनी खुद्द पाडगावकरांचे निधन झाले तेव्हा `टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांच्यावर विविध लोकांनी लिहिलेले मृत्युलेख छापले होते आणि त्यासाठी जवळजवळ एक पूर्ण पान दिले होते.
काही महिन्यांपूर्वी एका मार्क्सवादी विचारवंताचे निधन झाले तेव्हा त्यांच्याविषयी एका आघाडीच्या दैनिकात छापून आलेल्या एका मृत्युलेखात त्यांना 'स्वर्गवासी' असे संबोधण्यात आले. मार्क्सवादी व्यक्तीला उद्देशून वापरले गेलेले `स्वर्गवासी' संबोधन वाचताना मला खूप वर्षांपूर्वी मृत्यूची बातमी लिहिताना `कैलासवासी' आणि `वैंकुठवासी' या दोन परलोकनिवासांबाबत झालेली ही गडबड म्हणजे अदलाबदल आठवली.
सुदैवाने आमच्या इंग्रजी पत्रकारितेत मृत व्यक्तीसाठी कैलासवासी किंवा वैकुंठवासी किंवा कुठलेही वासी हा शब्दप्रयोगच मुळी नसतो त्यासाठी वापरला जाणारा `द लेट’ (दिवंगत) हा शब्द सर्व जातीधर्माच्या आणि पंथांच्या लोकांना लागू असतो.
मृत्यूची बातमी किंवा मृत्यूलेख लिहिणे किती जोखमीचे असते याचा हा अनुभव मी पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळात घेतला.
पत्रकारांच्या आयुष्यात नात्याने किंवा स्नेहाच्या दृष्टीने अगदी जवळच्या असलेल्या व्यक्तींच्या मृत्यूंची बातमी आणि मृत्युलेखसुद्धा त्यांना लिहावा लागतो. आणि हा मृत्यू अनपेक्षित असेल तर मग ते भावनाविवश होणे साहजिकच असते. माझ्या बाबतीत पत्रकारितेत शिरल्यावर खूप लवकर असा प्रसंग आला.
गोव्यात पणजी येथे मी धर्मगुरुपदाचे प्रशिक्षण घेत असलेल्या जेसुईट प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्व-सेमिनरीचे सुपिरियर फादर इनोसंट पिंटो युरोपला गेले असताना एका वाहन अपघातात त्यांचे निधन झाले.. नुकतीच पस्तिशी पार केलेल्या आमच्या या सुपिरियरच्या निधनाची आणि अंत्यविधीची बातमी देण्याची माझ्यावर वेळ आली तेव्हा मी पार हबकूनच गेलो होतो.
कुणाच्याही मृत्यूचा वा मृत्युलेखाचा विचार मनात यावा किंवा त्याची कार्यालयीन म्हणजे संपादकीय बैठकीत चर्चा व्हावी हे वाईटच. पण तरीही ही आमच्या पत्रकारितेतील व्यावसायिक बाब म्हणून सर्वांना अशा प्रोफाईल्स तयार कराव्याच लागतात, वेळोवेळी त्या अद्यायावत कराव्या लागतात, न जाणो अगदी वृत्तपत्राची डेडलाईन जवळ येताक्षणी अशा बातम्या येऊ शकतात. आज इंटरनेटच्या जमान्यात अर्थात हे काम खूप सोपे झाले आहे.
मृत्युलेख लिहिणाऱ्या लोकांना त्यांचा केवळ बायोडेटा पुरेसा नसतो तर त्यांच्या कामाविषयी आधीच माहिती असायला हवी अन्यथा हा मृत्युलेख केवळ निधनाची बातमी आणि अल्पचरित्र असे रुप घेते. त्यामुळेच विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींवरील मृत्युलेख लिहिण्याची जबाबदारी कुठल्याही दैनिकांतील त्या क्षेत्रांतील सर्वांत अनुभवी आणि दर्दी व्यक्तींकडे आणि शक्य असल्यास एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराकडे सोपवली जाते.
मृत्युलेख लिहिणे म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या कामांची जंत्री देणे किंवा योगदान सांगणे इतकेच नाही. उत्कृष्ट मृत्युलेख लिहिण्यासाठी खास कसब लागते, मृत व्यक्तीच्या चरित्राचे आणि कर्तृत्वाचे वेगवेगळे कंगोरे माहित असायला हवे. त्याविषयी तटस्थतेने त्या व्यक्तीचे मूल्यमापन आणि इतिहासातील स्थान याविषयी टिपण्णी असायला हवी. कुणाही व्यक्तीचे निधन झाल्यावर तिच्यासंबंधीचे वैरत्व संपते किंवा मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल वाईट काही बोलू नये ही भावना मृत्युलेख लिहिताना खूपदा प्रबळ ठरते. निधन पावलेल्या व्यक्तीविषयीच्या आदराने वा कर्तृत्वाने वाहवून जाऊन अनेकदा मृत्युलेख एकांगीसुद्धा होतात, त्या व्यक्तीचे अवगुण, अपयश आणि वादग्रस्त विषय याकडे कानाडोळा केला जातो हे खरेच आहे.
एखाद्या व्यक्तीविषयी खूप माहिती असली तरी त्या व्यक्तीवर प्रेम करणारे, त्या व्यक्तीविषयी आदराची भावना असणारे लोक त्या व्यक्तीच्या निधनावर आलेले मृत्युलेख लोक आवर्जून वाचत असतात. महनीय आणि तारांकित व्यक्तींवर मृत्युलेख लिहिणे तसे आव्हानात्मक लिहिणे असते. अशावेळी मृत्युलेख लिहिणाऱ्या व्यक्तीला मृत व्यक्तीविषयी असलेली माहिती, मृत व्यक्तीसंबंधीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभव, लिहिण्याची शैली आणि कौशल्य पणाला लागते. यामुळेच इंग्रजी पत्रकारितेत अगदी मृत्युलेखालासुद्धा तो लिहिणाऱ्या बातमीदाराची/ पत्रकाराची बायलाईन देण्याची प्रथा आहे. तसेही इंग्रजी वृत्तपत्रे आपल्या बातमीदारांना बायलाईन देण्याबाबत मराठी वृत्तपत्रांपेक्षा खूप उदार असतात.
अलिकडेच महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील एक अग्रणी आणि जुने राजकारणी शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यापाठोपाठ मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे जुने कार्यकर्ते सय्यदभाई यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. याच आठवड्यात मराठी लिखाणासाठी देवनागरीऐवजी सर्व जगभर वापरल्या जाणाऱ्या रोमन लिपीचा वापर व्हावा यासाठी चळवळ राबवणारे मधुकर नारायण (म. ना ) गोगटे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. या तिन्ही व्यक्तींवर मृत्युलेख लिहिणाऱ्या व्यक्तीला गेल्या तीन-चार दशकांपूर्वीच्या सामाजिक आणि राजकीय घडामोंडीचे ज्ञान आवश्यक होते.
आताच्या नव्या पिढीला ही नावे किंवा त्यांचे योगदान माहित असण्याची शक्यता कमीच याचे कारण म्हणजे वयोपरत्वे या व्यक्ती खूप वर्षाआधीच प्रसिद्धीच्या झोकातून बाहेर पडल्या होत्या.
आज मराठीसाठी वा हिंदीसाठी रोमन लिपीचा वापर करणे काहींना हास्यास्पद वाटले तरी न जाणो भविष्यात तसे होऊ शकते. मराठी बोलू शकणाऱ्या मात्र लिहू न शकणाऱ्या नव्या पिढीला यासाठी रोमन लिपी उपयोगी ठरू शकते. सध्यातरी केवळ कोकणी या भारतीय भाषेसाठीच गोव्यातला ख्रिस्ती समाज रोमन लिपीचा गेली काही शतके वापर करत आला आहे. त्यादृष्टीने गोगटे यांनी भूमिका आणि काम महत्त्वाचे ठरते.
म. ना. गोगटे यांच्यावरचा मृत्युलेख `महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी वाचला आणि तीस वर्षांपूर्वी १९९१च्या आसपास पणजीतल्या नवहिंद टाइम्समध्ये संपादकीय पानावर मराठीसाठी रोमन लिपीचा आग्रह धरणाऱ्या गोगटे यांच्यावर मी लेख लिहिला होता याची आठवण झाली. जुन्या काळात आपल्या प्रत्येक बायलाईनची कात्रणे जपवून ठेवण्याचा हा एक फायदा.
मृत्युलेख लिहिण्याबाबत दैनिक `मराठा'चे आचार्य प्र. के. अत्रे तसेच इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतील खुशवंत सिंग यांचे खासकरुन नाव घेतले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर दैनिक `मराठा' तून जहरी टीका केली तरी त्यांच्या निधनानंतर आचार्य अत्र्यांनी `सुर्यास्त’ या शीर्षकाच्या हृदयस्पर्शी मृत्युलेखांची मालिकाच लिहिली होती. अत्रे यांनीं इतरही अनेक व्यक्तींवर लिहिलेल्या मृत्युलेखांचा मराठीतील उत्कृष्ट मृत्यलेखांमध्ये समावेश केला जातो. एका अर्थाने अत्रे मृत्युलेखांचे बादशाह.

आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच `महाराष्ट्र टाइम्स'चे दीर्घकाळ संपादक असलेल्या गोविंद तळवलकर त्यांनी महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील विविध क्षेत्रांतील लोकांवर लिहिलेले मृत्यूलेखही खूप नावाजले गेले. त्यापैकी काही निवडक मृत्युलेखांचे `पुष्पांजली' या शिर्षकाचे दोन खंडही नंतर प्रसिद्ध झाले.
इंग्रजी पत्रकारितेतील खुशवंत सिंग यांचे मृत्युलेखाबाबतीत मात्र वेगळेच धोरण होते. मृत्यूनंतर कुठलीही व्यक्ती आपल्यावर बदनामीचा दावा दाखल करु शकत नाही त्यामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या विविध सवयी आणि चारित्र्य यावर ते अगदी बिनधास्तपणे लिहित असत. स. का. पाटील यांच्याप्रमाणेच मुंबईतील एक सामर्थ्यवान व्यक्ती गणल्या जाणाऱ्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या बॅरीस्टर रजनी पटेल यांच्यावर अशाच पद्धतीने लिहिलेला खुशवंत सिंग यांचा मृत्युलेख असाच खूप गाजला आणि वादग्रस्त ठरला होता.
 
असा आहे हा मृत्युलेख महिमा आणि माहात्म्य.
 
तात्पर्य काय तर मृत्यूची बातमी आणि मृत्युलेख या तशा अत्यंत गंभीर आणि दुःखद घटनेसंबंधीसुद्धा अनेक गंमतीदार प्रसंग आणि किस्सेही घडू शकतात. .
 
(दिव्य मराठी मधला मूळ लेख )