Did you like the article?

Monday, November 3, 2025

 

                                                                            Jemimah Rodrigues

झेनिया डिकुन्हा ESPN Sports Media Ltd.

एक सामना अजून बाकी आहे, पण वांद्रे गर्ल जेमिमा रॉड्रिग्ज त्याआधीच एक दंतकथा बनली आहे. 
नवी मुंबईत जेमिमा रॉड्रिग्जने भारताला महिला क्रिकेटच्या विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचवले, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत एक क्रिकेटिंग चमत्कार घडवला.

नवी मुंबई तिच्यासाठी “घरचं मैदान” असलं तरी ती मनाने वांद्रेचीच आहे. तिच्या वांद्रे ओळखीत काही गुण ठळक आहेत — घट्ट कौटुंबिक नाती, प्रगाढ श्रद्धा (बांद्रात १६व्या शतकात पहिलं चर्च बांधलं गेलं) आणि संगीताची आवड.

गेले दोन दिवस तिच्याबद्दल समाजमाध्यमांत चर्चा चालली आहे. ती एक सोशल मीडिया सेलेब्रिटी बनली आहे.

पण याचबरोबर ती वारंवार ऑनलाईन ट्रोलिंगची बळीसुद्धा ठरली आहे, विशेषतः तिच्या धार्मिक श्रद्धांमुळे — कारण ती अल्पसंख्याक समुदायातील आहे.

जेमिमा तिच्या श्रद्धा आणि आत्मविश्वास अभिमानाने दाखवते. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, “बायबल म्हणतं, ‘रात्री रडणं असतं, पण सकाळी आनंद येतो.’ आज आनंद आला, पण मी अजूनही रडते आहे.”

ती एकटी नाही — तिचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे. तिचे वडील इव्हान तिच्या सातव्या वर्षापासून तिचे प्रशिक्षक आहेत. तिचे भाऊ इनॉक व एली, यांच्याकडून तिने क्रिकेट शिकायला सुरुवात केली.

ह्याच कुटुंबातून तिला शक्ती मिळाली — प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी, प्रत्येक ट्रोलिंगनंतर हसण्यासाठी.

जेमिमा तिच्या जीवनाबद्दल उघडपणे बोलते — तिचं संगीत, तिची श्रद्धा, तिचं चर्चमधील गायन, आणि बायबलमधील वचने ती खुलेपणाने शेअर करते. ती गिटार वाजवते.

ती ज्या वांद्रे वेस्ट भागात वाढली, तिथे श्रद्धा सर्वत्र आहे — रस्त्यांवरील क्रॉस, मारियामातेच्या उत्सवातले जल्लोष, ख्रिसमसचा आनंद आणि उपवासकाळ लेन्ट सिझनचे गांभिर्य — हे सर्व तिथे एकत्र अनुभवले जाते.

तिचा गिटार आणि बॅट दोन्ही तिच्या ओळखीचा भाग आहेत. ती परदेशी लीगमध्ये सहकाऱ्यांसोबत गाणी गाते, नाचते, रील्स बनवते — अगदी कोणत्याही तरुण भारतीयासारखी.

तिने उपांत्य फेरीतील पत्रकार परिषदेत रडत सांगितलं, “मी हे बोलते कारण जर कोणीतरी हेच अनुभवत असेल, तर त्यांना समजेल की एकटी नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला मला प्रचंड चिंता होती.”

त्या वेळीच तिने बायबलमधील वचन उद्धृत केलं — “रात्री रडणं असतं, पण सकाळी आनंद येतो.”

शतकानंतर मातीने माखलेली तिची जर्सी, अश्रूंनी भरलेला चेहरा — हीच खरी जेमिमा आहे. एकेकाळची हसरी, ब्रेसेस घातलेली मुलगी आता भावनांनी ओथंबलेली योद्धा बनली आहे.

एक सामना अजून बाकी आहे, पण जेमिमा रॉड्रिग्ज आधीच एक दंतकथा बनली आहे. आणि हे सर्व तिने जेमिमा स्टाईलमध्ये केलं आहे.

Camil Parkhe  

No comments:

Post a Comment