Did you like the article?

Showing posts with label Fr Francis Shubiger. Show all posts
Showing posts with label Fr Francis Shubiger. Show all posts

Monday, September 8, 2025

 


कॅथोलिक चर्चमध्ये `संत' हा सन्मान मिळण्याबाबत भारी कडक, किचकट, वेळकाढू नियम आणि प्रक्रिया आहेत.
तिथे संतपदाची पायरी गाठण्याची अनेक लोक दोनशे-तीनशे वर्षे वाट पाहत आहेत.
यापैकी अनेकांना त्याआधीच्या पायरीवर म्हणजे व्हेनरेबल (आदरणीय), बिऍटीफाईड (धन्यवादित) अशा पहिल्या आणि दुसर्या पायरीवरच कायमस्वरुपी समाधान मानावे लागणार आहे.
भारतात विविध ठिकाणी कार्य केलेल्या आणि संतपदाचा सन्मान मिळवण्याच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या मिशनरींची संख्या फार मोठी आहे.
गोव्यातील फादर अग्नेलो डिसोझा, संगमनेरचे स्विस जेसुईट फादर फ्रान्सिस शुबिगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलया माळीघोगरगावचे फ्रेंच फ्रान्सलियन मिशनरी गुरियन जाकियरबाबा ही माझ्या माहितीतील काही नावे.
अर्थात संतपदाची ही प्रक्रिया अलीकडच्या काळात राबवली गेली आहे.
प्राचीन काळात येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी अकरा जणांना आपोपाप संत मानले गेले. गालावर चुंबन घेऊन येशूचा विश्वासघात करणाऱ्या ज्युडास इस्किर्योतचा याला अपवाद.
येशूची आई मदर मेरीसुद्धा, त्यानंतर सेंट पॉल, आणि इतर सेंट ऑगस्टीन, सेंट थॉमस आक्वीनाससारखे धर्मपंडित संत बनवले गेले.
मध्ययुगात उदयास आलेल्या प्रोटेस्टंट पंथांत मात्र नव्याने संत बनवण्याची प्रक्रिया अजिबात नाही.
मात्र विविध सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान असलेल्या व्यक्तींना कॅथोलिक चर्चचे संतपद मिळेलच असे नाही.
भारतात गोव्यात मिशनरी कार्य केलेल्या फ्रान्सिस झेव्हियर यांना संतपद मिळाले आहे.
मात्र सतराव्या शतकात मदुराईत आणि दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे, ख्रिस्ती धर्मात विविध जातींना मागच्या दाराने प्रवेश देणारे आणि 'व्हाईट ब्राह्मण' म्हणून ओळखले जाणारे इटालियन मिशनरी रॉबर्ट डी नोबिली आणि गोव्यात `ख्रिस्तपुराण' हे मराठी महाकाव्य १६१६ साली रोमी लिपीत छापणारे ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स हे संतपदापासून आजही वंचित राहिले आहेत.
कॅथोलिक चर्चमध्ये एखाद्या व्यक्तीला संत बनवण्याच्या प्रक्रियेत आधी त्या व्यक्तीचे जीवन, चारित्र्य यावर संशोधन केले जाते, त्यानंतरच संतपदाच्या प्रक्रिया सुरु करायची कि नाही याचा निर्णय घेतला जातो.
त्या मृत व्यक्तीच्या माध्यमातून किमान एकदोन चमत्कार झाले आहेत याची वैद्यकीय अहवालांनुसार शहानिशा केली जाते.
ज्यांना त्यांच्या हयातीत संत मानले गेले अशा मदर तेरेसांच्या संतपदाबाबतसुद्धा अशीच प्रक्रिया राबवली गेली होती
आजच्या युगात देव, धर्म आणि चमत्कार या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे तरी कॅथोलिक चर्चच्या संतपदाच्या प्रक्रियेत चमत्काराला आजही स्थान आहे.
आपल्या श्रद्धा आणि कार्यामुळे तुरुंगांत हुतात्मे झालेल्या जगभरातील अनेक लोकांना कॅथोलिक चर्चने संतपदाचा सन्मान बहाल केला आहे.
ओडिशा राज्यात आदिवासी आणि कृष्टरोग्यांमध्ये कार्य करणारे ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांची दोन कोवळी मुले रात्री जीपमध्ये झोपलेली असता एका जमावाने त्यांना १९९९ साली जिवंत जाळले.
ग्रॅहॅम स्टेन्स जर कॅथोलिक मिशनरी असते तर संतपदाच्या प्रक्रियेसाठी ते हुतात्मा होण्यामुळे नक्कीच नैसर्गिकरित्या पात्र ठरले असते.
ग्रॅहॅम स्टेन्स हे प्रोटेस्टंट मिशनरी होते.
`अर्बन नक्सल' आणि `देशद्रोही कारवायां'च्या आरोपाखाली भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी मुंबई तुरुंगात असलेले वयोवृद्ध जेसुईट फादर स्टॅन स्वामी जामिनाची सुनावणी चालू असताना २०२१ साली मरण पावले.
झारखंडमधील आदिवासी लोकांमध्ये काम करणारे आणि आता `कॉम्रेड', `शहिद' म्हणून गणले जाणारे फादर स्टॅन स्वामी कॅथोलिक चर्चच्या संत प्रक्रियेसाठी भविष्यकाळात नक्कीच पात्र ठरु शकतात.
सतराव्या शतकात श्रीलंकेत मिशनरी कार्य करणार्या मूळचे गोव्यातले फादर जुझे किंवा जोसेफ वाझ यांना तीन शतकांनंतर पोप फ्रान्सिस यांनी २०१५ साली सिलोन येथे समारंभपूर्वक संतपदाचा सन्मान दिला.
संतपदाच्या प्रक्रियेबाबत `भारतरत्न' मदर तेरेसा अणि पोप जॉन पॉल दुसरे हे अपवाद अणि सर्वाधिक नशिबवान ठरले आहेत त्यांच्या मृत्यूनंतर अल्पावधीत अनेक नियम बाजूला सारुन चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर केले.
संतपद प्रधान करण्याच्या या सोहोळ्याला `कॅननायझेशन (canonisation) असे म्हणतात.
पोप फ्रान्सिस यांनी २०१६ साली व्हॅटिकन सिटीत मदर तेरेसा यांना संत म्हणून जाहीर केले त्या खास विधीला भारताच्या तत्कालीन परदेश मंत्री सुषमा स्वराज भारतीय प्रतिनिधींसह खास निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.
अशीच एक संतपदाची प्रक्रिया आज रविवारी व्हॅटिकन सिटीत पार पडली आहे.
अवघे पंधरा वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या कार्लो अकुटिस (Carlo Acutis) या मुलाला पोप लिओ यांनी सेंट पिटर्स बॅसिलिकातल्या झालेल्या खास विधीमध्ये संत म्हणून जाहीर केले आहे.
रविवारच्या या सोहळ्यात तरुणपणीच पोलिओने निधन झालेल्या इटालियन पियर जॉर्जियो फ्रासाती पियर जॉर्जियो फ्रासाती (१९०१–१९२५) यांनाही संतपदाचा बहुमान देण्यात आला.
`इंडियन एक्सप्रेस'च्या काल सात सप्टेंबरच्या अंकात कार्लो अकुटिस (३ मे १९९१ - १२ ऑकटोबर २००६) याच्या संतपदाबाबत पान दोनवर अँकरची बातमी होती.
लंडन येथे इटालियन कुटुंबात १९९१ साली कार्लो अकुटिस याचा जन्म झाला होता. त्याच्या जन्मानंतर त्याचे आईवडील अंतोनिया सालझानो आणि अँड्रयू अकुटिस मिलानला स्थलांतरित झाले होते.
कार्लो याला फुटबॉल, व्हिडिओ गेम्स आणि पाळीव प्राणी यांची आवड होती. धार्मिक कार्यासाठी तो इंटरनेटचा वापर करत असे.
कार्लो अकुटिस याने आपल्या स्थानिक चर्च किंवा पॅरिशसाठी आणि कॅथोलिक चर्चसाठी संकेतस्थळे विकसित केली होती. आपल्या डिजिटल कौशल्यांचा वापर करून कॅथोलिक शिकवणींचा या मुलाने ऑनलाइन प्रसार केला होता.
`गॉड्स इन्फ्ल्यूनसर' असे कार्लो अकुटिसचे वर्णन करण्यात आले आहे.

ल्यूकेमियामुळे २००६ साली निधन झालेला कार्लो अकुटिस हा आता मिलेनियल पिढीतला पहिला कॅथोलिक संत ठरला आहे.
कार्लो अकुटिस याच्या माध्यमातून दोन चमत्कार झाले आहेत असे कॅथोलिक चर्चने म्हटले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी या मुलाच्या संतपदास मंजुरी दिली होती. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पोप लिओ यांनी संतपदाची ही प्रक्रिया आज रविवारी पूर्ण केली.
काल रविवारच्या कॅननायझेशन समारंभात एक ऐतिहासिक घटना घडली.
व्हॅटिकनच्या त्या प्रसिद्ध सेंट पिटर्स चौकात कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या संतपदाच्या समारंभाला त्याचे आईवडील, मिचेल आणि फ्रान्सेसा हे जुळे बहीणभाऊ असे संपूर्ण कुटुंब जातीने हजर राहून या अभिमानास्पद घटनेचे साक्षीदार ठरले आहे.
चर्चच्या इतिहासात केवळ दोनच आयांना आपल्या लेकरांना संत घोषित होताना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
याआधी १९५० साली मारिया गोरेत्ती यांना पोप बारावे पायस यांनी संतपदाचा सन्मान देण्यात आला तेव्हा त्या समारंभाला त्यांची आई असुंता कार्लिनी सेंट पिटर्स चौकात उपस्थित होत्या.
या मिस्साविधीमध्ये मिचेल या कार्लो अकुटिसच्या धाकट्या भावाने बायबलमधील एक उतारा असलेले पहिले वाचन वाचले.
कार्लो अकुटिसच्या निधनानंतर चार वर्षांनी त्याच्या या जुळ्या बहीणभावांचा जन्म झाला होता.
तरुण कॅथोलिकांसाठी जवळचा आणि समजण्यासारखा असे एक आधुनिक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून व्हॅटिकन सिटीने कार्लो अकुटिसला म्हणून सादर केले आहे.
तरुण पिढीला चर्चकडे आकर्षित करण्यासाठी हे एक पाऊल आहे हे नक्की.

Camil Parkhe, September 8, 2025