Did you like the article?

Showing posts with label Fr. Thomas Stephens. Show all posts
Showing posts with label Fr. Thomas Stephens. Show all posts

Saturday, September 6, 2025

 

                                            मराठी वाड्मयाचा (गाळीव ) इतिहास पु. ल. देशपांडे

`वाट चुकलेला फकीर मशिदीत' असा एक वाक्प्रचार मराठीत पूर्वी प्रचलित होता. (आता नाही. असे खूप काही वाक्प्रचार, म्हणी, कव्वालीसारखी गाणी आपण आता हद्दपार केली आहेत).

तर त्या दिवशी शहरात मी असाच बिनकामी फिरत होतो आणि मग समोरच दिसलेल्या पुस्तक प्रदर्शनाकडे पाय ओढले गेले.
अर्ध्यापाऊण तासांच्या चाळणीनंतर दोन पुस्तके बॅगेत टाकली.
त्यापैकी एक अगदी छोटेसे पुस्तक होते पण शिर्षक आणि लेखकाचे नाव आकर्षक होते.
`मराठी वाड्मयाचा (गाळीव ) इतिहास', मात्र मुकेश माचकर लिखित `मराठी वाड्मयाचा (घोळीव) इतिहास' याच्याशी गफलत नको.
हे पुस्तक मूळ म्हणजे ओरिजिनल होते, लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण अर्थात पु. ल. देशपांडे.
मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे वसंत सरवटे यांची ! .

ते ७६ पानांचे पुस्तक पूर्ण चाळले. मध्यवर्ती पानांवरचे एक उपशिर्षक वाचले आणि ते पुस्तक घेण्याचा लगेच निर्णय झाला.
पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत या दोघांचीही अनेक पुस्तके मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात वाचली आहेत.
कारण हे दोन्ही साहित्यिक याच क्रमाने घोषित आणिबाणी पर्वात इचलकरंजी आणि कराड इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे लागोपाठ अध्यक्ष झाले होते.
अशाच प्रकारे वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर नववी-दहावीला असताना मी `ययाती' कादंबरी वाचली होती.
त्यानंतर लगेचच श्रीरामपूर सोडून गोव्यात गेल्यावर तेथे इंग्रजी शिकून मी मराठी साहित्य वाचनाला काही काळापुरता रामराम ठोकला होता.
गोव्यातच इंग्रजी पत्रकारितेत आल्यावर पणजीला मी पु. ल. देशपांडेंची सलग तीन व्याख्याने ऐकली होती.
त्या भरगच्च सभागृहातला त्यांचा तो बोलण्याचा आणि प्रेक्षकांच्या हास्याचा धबधबा आजही कानावर कायम राहिला आहे.
पुलंना ऐकण्याचा तो माझा पहिला आणि शेवटचा प्रसंग.
मात्र श्रीरामपूर सोडल्यानंतर पुलंचे एकही पुस्तक मी वाचलेले नाही, त्यांच्यावर लिहिलेले मात्र सतत वाचत आलो आहे.
उदाहरणार्थ संजय मेणसे यांचे ` ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे' हे सर्वांत अलीकडचे पुस्तक.
आणि तरीही पुलंचे हे पुस्तक मी फारसा विचार न करता बॅगेत टाकले, याची दोन कारणे होती.
मुकेश माचकर यांनी या पुस्तकाच्या धर्तीवर नवी साहित्यरचना केली होती, त्यामुळे या मूळ साहित्यकृतीबाबत माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकात पुलंनी परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीं मध्ययुगीन काळात गोव्यात निर्माण केलेल्या कोकणी आणि मराठी साहित्यकृतींबाबत आपल्या बोचऱ्या भाषेत भाष्य केले आहे.
`मराठी वाड्मयाचा (गाळीव ) इतिहास' हा लेख पु. ल. देशपांडे यांनी १९६७ सालच्या `मौज'च्या दिवाळी अंकात लिहिला होता.
प्राचीन मराठी वाड्मयाच्या इतिहासाचे पु. ल. देशपांडे यांनी आपल्या विडंबनशैलीत या पुस्तकात कथन केले आहे.
या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्यापासून नंतरचे अनेक संतकवी, पंतकवी, शाहीर वगैरेंविषयीसुद्धा आपल्या याच विनोदी, बोचऱ्या शैलीत लिहिले आहे.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास वगैरेंबाबत या पुस्तकात पुलंनी विनोदी शैलीत लिहिले आहे.
याप्रमाणेच अर्वाचीन मराठी वाङमयाचेही विडंबन करण्याचा त्यांचा बेत होता. त्यासाठी आवश्यक ती वाड्मयेतिहासाची पुस्तकेसुद्धा देशपांडे यांनी मिळवली होती. हा दुसरा लेख `मौज'च्या १९६८ सालच्या दिवाळी अंकासाठी लिहिला जाणार होता.
या दोन्ही लेखांचे मिळून एक पुस्तक प्रकाशित करण्याचा संकल्प होता. दुसऱ्या लेखाचा हा बेत मात्र कधीच साकार झाला नाही. तो लेख होण्याची शक्यता धूसर झाल्याने मौज प्रकाशनाने पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त १९९४ साली हा एकच लेख पुस्तकरुपाने पहिल्यांदा प्रकाशित केला होता.
मौज प्रकाशनाने हे पुस्तक १९९४ साली पहिल्यांदा प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे २०२३ सालचे हे सतरावे पुनर्मुद्रण आहे.
पुलंनी हे लिखाण त्याकाळात लिहिले हे तसे बरेच झाले. नाहीतर सांप्रतच्या काळात त्यांची आणि रेखाचित्रकार वसंत सुरवटे यांची काही धडगत नसती.
घराकडे परतीच्या प्रवासात या लहानशा पुस्तकाचा बराचसा भाग वाचूनही झाला होता आणि पुलंच्या बाबतीत असलेला आदर दुणावला होता.
गोव्यातल्या मध्ययुगीन मराठी-कोकणी साहित्याची तसेच ख्रिस्ती धर्मातत्त्वांची पुलंना चांगली जाण होती हे या छोट्या लेखातून स्पष्ट होते.
या पुस्तकातील काही वाक्ये मी वानगीदाखल देत आहे.
कोकणी आणि गोव्यासंदर्भांत असल्याने `शितावरून भाताची परीक्षा' ही म्हण येथे सर्वार्थाने लागू होऊ शकेल.
``सोळाव्या शतकातील कवी, एकनाथ, सोनोपंत वगैरेंच्या ओव्याआख्याने वाचण्यात गुंतलेले पाहून हळूच काही ख्रिस्ती पादरी गोव्यात आले. ग्रंथांच्या आकारावरुन मराठीत पुस्तकांना बरा सेल आहे असे त्यांना वाटले आणि फादर स्टीफन्स नावाच्या फादराने `ख्रिस्तपुराण' मराठीत लिहिले.
फादर स्टीफन्सच्या ख्रिस्तपुराणाचा खरा हेतू गोवा हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे हे सिद्ध करण्याचा होता. पण `अविभाज्य घटक' म्हळ्यार कितें रे सायबा? असे जो तो विचारु लागला.
'पुस्पामाजी मोगरी - परिमळामाजी कस्तुरी' वगैरे ऐकल्यावर '' खैचे कस्तुरे, फोंड्याचं कि म्हाड़डोळचं ग शणैनो ? आनी मांग्रे म्हळ्यार म्हापश्याचं व्हयहॉ?'' असे सवाल आले. त्यामुळे ख्रिस्तपुराणाचा दाखलवता गेला.
शिवाय `अविभाज्य घटक', कलापथके आणि मराठी साहित्य संमेलने यामुळे फादर स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण महादेवशास्त्री जोशी यांनी टोपणनांवाने लिहिले आहे असा त्यांचा समज झाला.
``फादर स्टीफन्स मात्र चतुर होता. त्याने ख्रिस्तापेक्षाही मराठी भाषेची अधिक तारीफ करून फादरांविषयी आदर निर्माण केला.
या ख्रिस्तपुराणाचे वैशिष्ट्य असे : ते मराठीत असल्यामुळे ज्या गोंयकार ख्रिस्तांवासाठी होते ते लोक ते पुराण वाचीत नाहीत.
आणि मराठी लोक एकशे एकवीस ते एकशे पंचवीस या पाच ओव्या वाचून, ``भासांमधे मानू थोर / मराठीयेसी // इतके वाचल्यावर पुराण मिटतात.
`फादर स्टीफन्सनंतर संपूर्ण ख्रिस्तपुराण फक्त अ. का. प्रियोळकर यांनीच वाचले आहे असे आम्हांस खात्रीलायक कळते. ''
कोकणीचे व्याकरण रचणाऱ्या फादर गास्पार द मायगेल यांच्याबाबत पुलंनी लिहिले आहे:
```मराठी-कोकणी वादाचे आपणच आद्य जनक किंवा `ओरिजिनल फादर' म्हणून बरेच लोक आपला अग्रहक्क सांगतात. पण तो मान भौ मानेस्त फादर गास्पार द मायगेल यांचा आहे.
गास्पार द मायगेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान. त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले, त्यामुळे ''अँ ! हॅ कित्य रेSS '' म्हणून बरेचसे गोंयकार क्रिस्तांव परत हिंदू झाले. ‘’
काही जुने साहित्य या ना त्या निमित्ताने पुन्हापुन्हा वर येत राहते. आपले महत्त्व अधोरेखित करत राहते.
पुलंचे हे छोटेखानी पुस्तक असेच.
Camil Parkhe September 3, 2025



https://www.esakal.com/blog/wandering-fakir-finds-his-way-into-the-masjid-marathi-vadmayacha-galiv-itihas-book-pjp78