Did you like the article?

Showing posts with label Camil Parkhe. Show all posts
Showing posts with label Camil Parkhe. Show all posts

Tuesday, October 6, 2026

 

``कुठे आहात?'' मोबाईलवर अनपेक्षितपणे एक कॉल आणि नंतर अचानक असा प्रश्न आला.

``कुठे चाललात? मीही तिकडेच चाललोय, या चला, बरोबरच जाऊ या.." असे संभाषण झाले
अन विसेक मिनिटांत एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित नॉन-स्टॉप `शिवाई' बसऐवजी माझा कारचा तिनेक तासांचा प्रवास घडला.
दुपारी आणि तेही रविवारच्या जेवणानंतर वातानुकूलित कारचा प्रवास झाल्यास कि पुणेरी भाषेत म्हटलं तर एक छानशी वामकुक्षी आणि गोव्यातील पोर्तुगाळलेल्या सुशेगाद भाषेत सिएस्ता (Siesta) हवीच.
जेसुईट फादर होण्यासाठी प्रशिक्षणासाठी मी गोव्यात असताना दुपारच्या जेवणानंतरच्या सक्तीच्या सिएस्ताच्या त्या एक तासाला आम्ही 'होली अवर' असे म्हणत असू.
तेव्हापासूनच मी या सिएस्ताच्या कायमच्या प्रेमात पडलो आहे.
अशावेळी कारमध्ये मागच्या सिटवर बसलो तरी शिरस्त्याप्रमाणे मी आधी सिटबेल्ट लावतो आणि मग मस्तपैकी ताणून देत असतो.
कारमध्ये बरोबर इतर कुणीही असले तरी.
मात्र यावेळी आम्हा दोघांना या चैनीवर पाणी सोडावे लागले.
मी तरी याबाबत नाखूष नव्हतो.
खरे पाहिले तर बरोबर एक आठवड्यापूर्वीच महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात रविवारी डॉ बाबासाहेब आंबडेकर सांस्कृतिक भवनात आम्ही दोघे तब्बल पाच तास एकत्र होतो.
आमचे समान मित्र दिल्लीतील मयूर के. आणि नागपुरातले राम W. या दोघांनी आम्हाला एकाच मंचावर आणले होते.
त्यावेळी मंचावर एकमेकांपासून फक्त दिडेक फुटांच्या अंतरावर आम्ही दोघे बसलो होतो, मात्र दोघांत एक शब्दाचे संभाषण झाले नव्हते.
त्याची कसर काल भरून निघाली.
एकमेकाला आधी कधीही न भेटलेले दोन गाववाले आणि व्यवसायबंधू अचानक भेटतात आणि त्या दोघांमध्ये ज्या काही गप्पा झडतात, तसेच आमचे झाले.
`बीबीसी मराठी' चे संपाद्क अशा मोठ्या पदावर असलेल्या दिल्लीस्थित अभिजीत कांबळे त्यांची काल रविवारी अशी अचानक मुलाखत झाली.
तसा बीबीसी आणि माझा (तसेच माझ्या पिढीतल्या लोंकांचा) फार जुना संबंध.
यात विनोद अथवा अतिशयोक्ती बिलकुल नाही.
अमिन सयानी यांच्या बुधवारच्या `बिनाका गीत माला' वगैरे सारख्या कार्यक्रमांसाठी श्रीलंका रेडिओ सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत तुफान लोकप्रिय होते
तसे बीबीसी वृत्तवाहिनी विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी त्याकाळी जगभर प्रसिद्ध होते.
बेधुंद गोळीबारात पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मृत्यू झाल्याची बातमी बीबीसीने ३१ ऑकटोबर १९८४ रोजी सकाळी साडेनऊला दिली होती आणि ऑल इंडिया रेडिओने हीच बातमी संध्याकाळी उशिरा राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दिली होती.
`बीबीसी'च्या या वृत्ताच्या आधारेच गोव्यात पणजीत आम्ही `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाची आणि नवप्रभा या मराठी दैनिकाची मिळून त्यादिवशी दुपारी एक वाजता एकपानी बुलेटिन काढले होते.
बीबीसीचे दिल्ली प्रतिनिधी मार्क टुली यांच्याबद्दल खूप आदराने बोलले जायचे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण असू असे जाहीर केले होते.
त्यावेळी मतदानाच्या काळात `बीबीसी'चे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांचे पुण्यात आणि बारामतीत स्थानिक सहाय्यक आणि भाषांतरकार म्हणून तीन दिवस मी काम केले होते.
त्यावेळी पुणे कॅम्पातल्या अरोरा टॉवर्समध्ये सॅम मिलर वापरत असलेले एक खास उपकरण मी पहिल्यांदा पाहिले.
"This is called laptop,'' सॅमने मला त्यावेळी सांगितले होते.
जवळजवळ चौतीस वर्षांपूर्वो..
अभिजीत कांबळे आणि आणि मी, आम्ही दोघेही, पत्रकारितेत असल्याने एकमेकांचा व्यावसायिक प्रवास तसा एकमेकांना परिचित होताच.
विषयापरत्वे अनेकदा मोबाईलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संपर्क नेहेमी असतोच.
त्यामुळे अनेक अवांतर विषयांवरच खूप छान चर्चा आणि देवाणघेवाण झाली.
अनेक जुन्या घटनांना उजाळा मिळाला,
मज्जा आली.
Thank you, Abhijit Kamble Sir ..

Camil Parkhe, October 5, 2026

Monday, July 27, 2026

 


काल दुपारी पावसाची रिपरिप चालू असताना डोक्यात पावसाळी कॅप, हातात छत्री अशा संरक्षणात नारायण पेठेतल्या मुंजाबाचा बोळमध्ये चालत असताना नजर सहज जवळच्या इमारतीकडे गेली.

`हिंदी राष्ट्रभाषा भवन' हे नाव वाचून मी चमकलो. एकदम अण्णा आठवले.
कुठली वस्तू, वास्तू आणि व्यक्ती आपल्यासमोर अचानक येईल हे सांगता येत नाही. तरी दिल्लीत आणि देशभर चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कालचा हा योगायोग पाहून गंमत वाटली.
`सुगावा प्रकाशना'चे कार्यालय अलीकडेच `बेडेकर मिसळ' समोर स्थलांतरीत झाले आहे, तिकडे जाताना हे घडले.
साडेतीन दशकांपूर्वी हिंदी राष्ट्रभाषा भवन या वास्तूला मी नियमितपणे आणि भक्तिभावाने भेट देत असे.
सन १९८९ च्या अखेरीस `इंडियन एक्सप्रेस'च्या नव्याने सुरु झालेल्या पुणे आवृत्तीत बातमीदार म्हणून रुजू झालो होतो.
त्यावेळी एका बातमीच्या संदर्भात अण्णा हजारे यांच्याशी एकदा गाठभेट झाली होती आणि आमच्या दोघांचा स्नेहसंबंध हळूहळू वाढत गेला होता.
पारनेर तालुक्यातून राळेगण सिद्धी या आपल्या गावातून पुण्यात आल्यावर अण्णांचा या `हिंदी राष्ट्रभाषा भवन'मध्ये मुक्काम असायचा.
त्याकाळात पुण्यातले अण्णा म्हणजे `वनराई' या पर्यावरण चळवळीचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया या राष्ट्रभाषा भवनचे काम पाहत असत.
नव्वदच्या दशकात घरोघरी लँडलाईन फोन नसायचे, मोबाईलचा जमाना येण्यास फार वेळ होता. रानडे इन्स्टिट्यूटसमोर असलेल्या हॉटेल हिल व्ह्यूच्या प्रिया लॉज येथे मी मंथली कॉटबेसिस राहायचो.
आता नक्की आठवत नाही, मात्र अण्णा पुण्यात कधी येणार आहेत, `राष्ट्रभाषा भवन' मध्ये किती दिवस राहणार आहेत हे मला आधीच कळायचे.
तेथे जाऊन मी त्यांना भेटायचो, गप्पा मारायचो, त्यांची बातमीसाठीचे प्रसिद्धीपत्रके अण्णा मला यावेळी द्यायचे.
`इनलँड लेटर'वर टाईप केलेली प्रसिद्धी पत्रके अण्णा मला पोस्टाने पाठवत असत, त्याखाली किसन बाबुराव अण्णा हजारे अशी सही असायची.
त्याकाळात नगर जिल्ह्यातले स्थानिक पत्रकार अण्णांच्या जवळसुद्धा फिरकत नसत, त्यांना प्रसिद्धी देण्याचे तर फारच दूर.
अण्णांना राज्यपातळी आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर आणण्याची घोडचूक म्हणा कि पाप म्हणा इंग्रजी पत्रकारितेतील आम्ही काही मोजक्या लोकांनी केले.
त्यावेळी इंडियन एक्सप्रेससाठी मी आणि माझा सहकारी नरेन करुणाकर पुण्यातून बातम्या द्यायचो, टाइम्स ऑफ इंडियाची पुणे आवृत्ती नव्हती तरी अभय वैद्य हे या दैनिकासाटीं पुण्याच्या बातम्या द्यायचे.
नरेन करुणाकर आणि अभय वैद्य यांना घेऊन मी राळेगण सिद्धीला गेलो होतो,
तेथे अण्णांसोबत फोटोसेशन झाले होते. ती कृष्णधवल आणि रंगीत फोटो आजही माझ्याकडे आहेत.
अण्णा त्यावेळी साठीत होते तर मी तिशीच्या उंबरठ्यावर. पत्रकारितेत येऊन मी दशक पार केले होते आणि अण्णा किती मिडिया सॅव्ही आहेत याचे अनुभव मला अनेकदा येत होते.
एकदा तर अण्णांच्या विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता.
मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती.
शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या शबनम बॅगेत अगदी अलगदपणे टाकले होते.
अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत पहिल्यांदा मला जाणीव झाली !
बातम्या देणे हे आम्हा पत्रकारांचे दैनंदिन काम. आमच्या या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांत अण्णा झळकू लागले आणि त्यांच्याभोवतीचे प्रसिद्दी वलय
वाढू लागले.
संजय सोनवणी यांनी १९९३ साली प्रकाशित केलेल्या `उत्तुंग' या माझ्या व्यक्तिचित्रण संग्रहात डॉ. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर, सय्यदभाई, शिरूभाऊ लिमये, डॉ जयंत नारळीकर, फादर डॉ. मॅथ्यू लेदर्ले आणि शकुंतला परांजपे, यांच्यावर प्रकरणे आहेत.
त्याच पुस्तकात अण्णा हजारे यांच्यावरसुद्धा एक प्रकरण आहेच.
अण्णांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नंतर त्यावेळचे भलेभले लोक सामिल झाले. एके काळचे तरुण तुर्क असलेल्या मोहन धारिया यांनी हजारे यांना आधीच पाठबळ दिले होते.
समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव आणि हरीत वसई बचाव चळवळीचे नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो अशी काही मंडळीसुद्धा अण्णांच्या आंदोलनात सक्रियरित्या सामिल झाली होती.
मात्र अण्णांनी या मंडळींचा अवसानघात केला आणि हे लोक त्यांच्यापासून दूर गेले ते परत कधी न येण्यासाठी.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, उपोषण स्थगिती याबाबत अण्णा आपल्या या सवंगडी लोकांना पूर्ण अंधारात ठेवत असत, मनमानी निर्णय घेत असत हे त्यामागचे एक कारण होते.
हिंदी राष्ट्रभाषा भवनाजवळ काल आलो आणि अचानक हे सर्व आठवले.

Camil Parkhe July 24, 2026



Tuesday, July 14, 2026

 

बातम्यांचा पाठलाग करणाऱ्या पत्रकारांवर पाळत, सत्ताधारी पक्षाचे कान आणि डोळे असणाऱ्या गृहखात्याचे महत्त्व आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांनी नेहेमी स्वतःकडे राखण्याचे कारण .......

गोव्यात पणजी येथें नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना माझ्याकडे गुन्हा आणि कोर्ट म्हणजे क्राईम आणि कोर्ट अशी एकमेकांशी निगडित असलेल्या दोन बिट्स होत्या. साधारणतः नव्याने कुणी बातमीदार म्हणून रुजू झाला कि सिंदबादच्या कथेप्रमाणे त्याच्या गळ्यात ही दोन्ही बिट्स अडकवून त्यापासून थोड्या सिनियर बातमीदारांनी मोकळे व्हायचे अशी त्याकाळात अनेक दैनिकांत पद्धत होती.
नवहिंद टाइम्समध्ये १९८०च्या दशकात मी नऊ वर्षे या दोन्ही बिट्स हाताळल्या, याचे एक कारण म्हणजे त्याकाळात मला ज्युनियर असलेला शिकाऊ बातमीदार आमच्या दैनिकात रुजू झालाच नाही. राहत्या घरी साधा लँडलाईन टेलिफोन नसताना आणि रात्री आठ ही आतल्या पानांसाठी बातमी स्विकारण्याची डेडलाईन असताना कुठल्याही गुन्ह्यांची आणि अपघातांची बातमी चुकू न देता क्राईम बिट सांभाळणे खरेच खूप अवघड आणि जोखमीचे काम होते.
मला आठवते त्यावेळी मूळचे गोव्याचेच असलेले एक पोलीस अधिकारी त्यावेळी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस होते तर शर्मा नावाचे एक आयजीपी होते.
त्यावेळी मांडवीच्या तीरावर असलेल्या मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा, दमण आणि दीवच्या दुमजली सचिवालयात खाली एका कोपऱ्यात प्रेस रुम होती. त्या प्रेसरुममध्ये येऊन वेगवेगळ्या संघटनांचे, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आम्हा बातमीदारांना प्रेस नोट्स किंवा मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली निवेदने देत असत.
अनेकदा यात पुढील आंदोलनांची माहिती किंवा धमकी दिलेली असायची. काही वेळेस खास बोलावलेल्या पत्रकार परिषदांत ही माहिती लेखी स्वरुपात दिली जायची, अनेकदा काही बाबी कागदावर न मांडता तोंडी स्वरुपात सांगितल्या जायच्या, आणि त्याच्यातच खूपदा खरी आणि मोठी बातमी असायची.
प्रेसरुममध्ये मी बसायला सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट आहे. सचिवालयाच्या वरच्या मजल्यावर पर्यटनमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा किंवा शिक्षणमंत्री हरिष झांटये यांची मुलाखत घेऊन आम्ही पत्रकार मंडळी लाल गालीचा असलेल्या लाकडी जिन्यावरून उतरुन प्रेस रुमकडे वळण्याआधीच एकदोन व्यक्ती काही सिनियर पत्रकारांना भेटत असत.
त्यांच्या देहबोलीवरुन आणि ते ज्या पद्धतीने पत्रकारांना बाजूला घेऊन संभाषण करत असत त्यावरुन मला ते कोण असावेत याविषयी विलक्षण कुतूहल वाटायला लागले. एकदोनदा पत्रकार परिषदांना सिनियर पत्रकार नव्हते अन त्यामुळे त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मग मला सर्व उलगडा झाला.
आम्हा पत्रकारांकडून विशिष्ट पत्रके मागवून त्यातील मजकूर आपल्याकडील नोंदवहीत लिहून घेणारी, पत्रकार परिषदांत तोंडी सांगितली जाणारी माहिती विचारणारी सध्या वेषातील ते लोक एसआयबी म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो या केंद्रिय गुप्तचर खात्याची तसेच स्पेशल ब्रांच म्हणजे सीआयडी (क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट)ची लोक आहेत हे मला समजले तेव्हा पत्रकारितेत नविन असलेल्या मला धक्काच बसला होता.
नंतर कळाले कि पणजी शहरात आणि केंद्रशासित प्रदेशात विविध राजकिय पक्ष, विरोधी पक्ष, विविध सामाजिक आणि कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, सत्ताधारी पक्षातील असंतृष्ट मंत्री वा आमदार काय करत आहेत, त्यांचे मोर्चा-आंदोलने, बंद दारातील बैठका किंवा खुल्या परिषदा वगैरे कधी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती केंद्र आणि राज्य सरकारकडची पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतत गोळा करत असते.
वृत्तपत्रांत बातम्या छापून येण्याआधीच किंवा ज्या गोष्टी वृत्तपत्रांत कधी छापूनही येणार नाही अशा सर्व हालचाली, घटना आणि वक्तव्ये यांची सत्ताधारी नेत्यांना माहिती असायला हवी, या यासाठी हा सर्व खटाटोप गुप्तचर यंत्रणा करत असतात.
गंमतीची गोष्ट म्हणजे या स्पेशल ब्रांच किंवा आयबीच्या कर्मचाऱ्यांकडे काही जण अगदी संशयाच्या नजरेने पाहत असायचे तरी सामाजिक, कामगार आणि इतर काही संघटनांमधली नेतेमंडळी मात्र त्यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून असायची.
मला आठवते गोव्यात विद्यार्थी संघटनांचे खासगी इंजिनियरिंग कॉलेजविरुद्ध आंदोलन चालू होते त्यावेळी ऑल गोवा स्टुडंट्स युनियनचे नेते असलेले सतीश सोनक वगैरे मंडळी या गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना स्वतः आपली प्रेसनोट्स देत असत. पत्रकार परिषद संपल्यानंतर सीपीआयचे कामगार नेते जॉर्ज वाझ यांनाही असेच प्रेसनोट्स देताना मी पाहिले आहे.
त्याकाळात राम्पणकारांचे नेते असलेले मथानी साल्डाना आणि ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या मागावर कायम सरकारी गुप्तकर यंत्रणा असायची. आम्हा पत्रकारांशी हे नेते बोलताना स्पेशल ब्रांचचे हे लोक आसपास घुटमळत असायचे, नंतर आम्हाला गाठून बोलण्याचा तपशील मागायचे.
आंदोलन, मोठ्या राजकिय व्यक्तीचा राजिनामा किंवा बंद दारांमागील गुप्त खलबते अशासारखी अत्यंत स्फोटक माहिती असल्यास पत्रकार आपल्या ऑफिसांत जाण्याआधीच संबंधित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मग ती मुख्यमंत्री वगैरे सत्ताधारी नेत्यांकडे पोहोचली जायची.
असेही व्हायचे कि अनेकदा सरकारी जासूसगिरी करणाऱ्या अनुभवी आणि कुशल कर्मचाऱ्यांकडे आम्हा पत्रकारांपेक्षा विस्तृत आणि अधिक विश्वासार्ह माहिती असायची !
गोव्यात मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या प्रतापसिंह राणे यांनी १९८०च्या दशकात आपल्या आसनावरची मांड भक्कम ठेवली होती, त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर कायम डोळा असणारे डॉ. विली डिसोझा यासारखे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी राणे यांच्या आसनाला सतत सुरुंग लावत बसायचे,
याकाळात दोतोर विली आणि इतर असंतृष्ट मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या होणाऱ्या गुप्त बैठकांवर, त्यांच्या सततच्या दिल्लीवारींवर तसेच काँग्रेस श्रेष्ठींनी पाठवलेल्या आर. एल. भाटिया, जी के मूपनार आणि रवी वायलर या पक्ष निरीक्षकांच्या भेटीगाठींवर लक्ष ठेवायचे काम पत्रकार करायचे आणि गुप्तचर यंत्रणाही.
या भेटींत कुणी काय सांगितले, काय शिजले, पक्षनिरीक्षकांनी कुणाला काय कानपिचक्या दिल्या, कुणाची नेतेपदी निवड होणार वगैरे माहिती गोळा करणे एकाहाती शक्य नसायचे.
अनेकदा मग समोरासमोर आल्यावर पत्रकार आणि गुप्तचर कर्मचाऱ्यांमध्ये गुफतगू व्हायचे, भरपूर हातचे राखून नोट्सची देवाणघेवाण व्हायची आणि अशाप्रकारे दोघेही एकमेकांच्या मदतीस यायचे.
याकाळात बर्डे नावाचे डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस (डीवाय एसपी) हुद्द्याचे गोवा पोलिसांचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (पीआरओ) होते. पणजीतल्या आझाद मैदानासमोरच्या भव्य पोलीस मुख्यालयात पहिल्या मजल्यावर बसणारे बर्डे हे क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांच म्हणजेच सीआयडी खात्याचा कारभार पाहायचे.
दररोज त्यांच्याकडे गोव्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा अहवाल यायचा आणि त्याआधारे ते आम्हा क्राईम बिट्सच्या पत्रकारांसाठी एक दोन पानांची सायक्लोस्टाईल (फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्सचा हा आधीचा अवतार) केलेली प्रेस नोट तयार करायचे.
साधारणतः संध्याकाळी पाचच्या नंतर मी बर्डेच्या केबिनमध्ये पोहोचायचो, तेव्हा त्यांची प्रेस नोट तयार होत असायची. त्यानंतर बर्डे मला पंधरावीस मिनिटे बसवून घ्यायचे आणि शहरात, गोव्यात काय चालले आहे, माझ्या संपर्कातील म्हणजे माझ्या बिट्समधील विविध कामगार, विद्यार्थी संघटनांत काय घडामोडी चालल्या आहेत याची ते विचारपूस करायचे.
सुरुवातीला मीही निरागसपणे त्यांना ही माहिती द्यायचो, माझी अपेक्षा अशी कि संभाषणादरम्यान त्यांच्याकडूनही मला काही बातम्या मिळाव्यात, काही स्कुप होतील अशा बातम्यांचे लीड मिळावे.
नंतर माझ्या लक्षात आले कि आमच्या संभाषणाची दिशा एकतर्फी असायची, त्यांच्याकडून मला त्या पंधरावीस मिनिटांत चहाबिस्किटे आणि ती प्रेसनोट याशिवाय काहीच मिळत नसायचे.
हेच बर्डे आठवडयात कधीतरी सकाळी किंवा कार्यालयीन कामानंतर आमच्या `नवहिंद टाइम्स’ दैनिकात वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना भेटायला यायचे. पन्नाशीच्या जवळपास आलेल्या या दोघांच्या अर्धा-एक तास विविध विषयांवर गप्पा व्हायच्या.
त्यावेळी मुदलियार यांच्याकडून मला कळाले कि गोव्यात चाललेल्या राजकीय आणि इतर घटनांचे हालहवाल जाणून घेण्यासाठी सीआयडीचे डिवाय- एसपी असलेल्या बर्डे यांच्या कामाचाच हा एक भाग होता.
याचकाळात मला गोवा क्राईम आणि सीआयडीचे अधिकारी असलेल्या बर्डे यांच्या एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाचा भाग माझ्या लक्षात आला.
गोव्यातील दैनिकांसाठी क्राईमसंदर्भातील दैनंदिन प्रेसनोट तयार करण्याबरोबरच बर्डे दररोज त्यांच्या वरच्या दोन अधिकाऱ्यांसाठी म्हणजे क्राईम सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस आणि आयजीपी यांच्यासाठी एक वेगळे, हायली क्लासिफाईड म्हणजे गुप्त स्वरुपाचे टिपण तयार करायचे.
त्यादिवशी चोवीस तासांत झालेल्या राजकीय आणि इतर विविध क्षेत्रांतील झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींची अगदी संक्षिप्त स्वरुपात त्या टिपणात माहिती दिली जायची.
दरदिवशी रात्री ते क्लासिफाईड टिपण राज्याच्या गृहमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे पोहोचले जायचे. अगदी याच कारणांसाठी गृहमंत्री हे खास करून मुख्यमंत्री स्वतःकडेच राखून ठेवत असतो. त्याकाळात गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे गृहमंत्रीही होते.
अशा प्रकारे गोव्यासारख्या चिमुकल्या राज्यात त्या दिवशी काय घडले, कुठल्या मंत्र्यांनी पत्रकारांशी बातचीत केली, कुठला असंतृष्ट मंत्री वा आमदार कुणाला भेटला, कुणी दिल्लीकड़े कुच केले ही सर्व माहिती त्या कॅप्सूल स्वरुपात टिपणात असायची. भले, या टिपणाचा उपयोग होवो ना होवो, मात्र पुढेमागे त्या टिपणातील माहितीचा संदर्भ उपयोगी पडायचा .
रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीत पेशवेकालीन हेरगिरीचा एक प्रसंग आहे. तुरुंगात असलेल्या राघोबादादा यांच्याशी बुद्धिबळ खेळत असताना ‘तुमचा राजा दोन घरे मागे घ्यावा’ असे बोलले जाते आणि त्याचे टिपण माधवराव पेशवे यांच्याकडे दिले जाते.
त्यानंतर पेशव्यांच्या मदतीला निघालेले नागपूरकरांचे सैन्य माघारी परतते. त्या वेळी त्या वाक्याचा अर्थ समजून माधवराव पेशवे संबंधितांवर योग्य ती कारवाई करतात.
आधुनिक काळातही अशा प्रकारे स्वपक्षीय मंत्र्यांवर, आमदारांवर, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवून अशाच प्रकारे टिपणे तयार केली जातात आणि ती सत्ताधाऱ्यांकडे, राज्यकर्त्यांकडे पोहोचवली जातात. योग्य वेळी आवश्यक ती कारवाईही केली जाते.
थोडक्यात सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करून आपल्या पक्षातील नेत्यांवर, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही टेहळणी केली जाते. स्वतःची सत्ता आणि स्थान जपण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचा वापर केला जातो. आणि हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ठाऊक असते.
विरोधी पक्षांचे लोक सत्तेवर आल्यावर तसेच करतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन वागणे आणि बोलणे, हे पथ्य सर्वच राजकारणी आणि गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर असलेले इतर लोक पाळत असतात.
सन १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीने गृहखाते आणि इतर महत्त्वाची खाते स्वतःकडे ठेवली होती,
आताही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मात्र गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे गेली तीन-चार दिवस आपल्या राज्यात आणि राजधानीत काय घडत होते याचा राजाला पत्ताही नव्हता..



Sunday, June 28, 2026

 


पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या काही सदस्यांबरोबर क्वार्टर गेट येथील यंग ख्रिश्चन्स मेन्स असोसिएशन (YMCA) इमारतीत काल शुक्रवारी २६ जून संध्याकाळी जवळजवळ दिडतास खूप चांगली भेट आणि चर्चा झाली.

आठ दिवसांपूर्वीच नियोजन झालेल्या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाची ही मासिक बैठक चार तासांआधी पुणे कॅम्पातील मिरवणुकीमुळे रद्द करण्यात आली होती.
तरीही हा निरोप वेळेत न पोहोचल्यामुळे काही साहित्यप्रेमी बैठकीला लांबलांबून येतील असे मला वाटले होते.
अगदी तसेच झाले.
संघाचा सचिव या नात्याने कार्यक्रमस्थळी मी पाचच्या दरम्यान आलो होतो, तिथे तळघरातल्या `ओम बुक स्टॉलमध्ये पुस्तके चाळताना वयाची ऐंशी ओलांडलेले आशाकांत रामटेके भेटले.
विमाननगरहून खास रिक्षा करुन साहित्य संघाच्या बैठकीसाठी आले होते. त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून बैठक रद्द झाली नाही हे मी त्यांना सांगितलेच नाही.
आशाकांत रामटेके यांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करुन खूप आनंद वाटला.
महाराष्ट्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास एजन्सी विभागातून निवृत्त झालेले आशाकांत रामटेके सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत.
संघाच्या कालच्या या बैठकीला उपस्थित राहून ते आज शनिवारी पुन्हा YMCA आवारात पूर्ण दिवसीय शिबिरात उपस्थित राहणार आहेत.
ख्रिस्ती धर्माच्या पवित्र भूमीला भेट देऊन त्यावर ११२ पानांचे गुळगुळीत कागदांवर भरपूर रंगीत चित्रांसह छापलेले त्यांचे `होली लँड पिलग्रिमेज' (इस्राएल, जॉर्डन, पॅलेस्टाईन अँड इजिप्त ) हे इंग्रजी पुस्तक या बैठकीत त्यांनी मला दिले.
ही `होली लँड' हल्ली अनहोली लँड बनली आहे असे या पुस्तकाच्याच एका प्रस्तावनेत लिहिले आहे.
मागे एकदा पुण्यात शिवाजीनगरच्या नरवीर तानाजीवाडीमध्ये `सकाळ टाइम्स' हापिसात नागपूरचे विलास शेंडे यांच्यासह ते मला भेटले होते त्यावेळी माझी काही पुस्तके मी त्यांना भेट दिली होती अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
YMCA च्या समोर असलेल्या इराणी हॉटेलात बन मस्का आणि चहावर ताव मारताना आमची ही भेट आणि चर्चा रंगली होती.
आशाकांत रामटेके हल्ली काही महिने आखातात मुलाकडे आणि काही महिने ऑस्ट्रेलियात आपल्या मुलीकडे राहतात. आखातातील ख्रिस्ती समाजाविषयी त्यांनी काही रंजक गोष्टी सांगितल्या.
याविषयी पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या `शब्दसेवा' या अनितकालिकाच्या आगामी अंकात लेख लिहिण्याचा मी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.
YMCA आवारात परतल्यानंतर इंडियन एक्सप्रेस- लोकसत्ता पत्रकारितेतील माझे सहकारी दयानंद ठोंबरे भेटले. सत्तरी पार केलेले रेव्हरंड सॅम्युएल चोपडे लांब अंतरावरून दुचाकीने या बैठकीला पोहोचले होते.
त्यानंतर YMCA कॅफेटेरियात आम्हा चौघांची बैठक झाली आणि साहित्य, समाज अशा विविध विषयांवर गप्पा आणि चर्चा झाल्या.
आता या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाविषयी आणि ख्रिस्ती समाजातील मराठी साहित्य चळवळीबाबत.
न्यायमूर्ती म. गो, रानडे यांनी दिडशे वर्षांपूर्वी पहिले मराठी ग्रंथकर्त्यांचे संमेलन भरवले, त्यानंतर या मराठी साहित्य संमेलनांपासून पहिल्यांदा म्हणजे १९२७ साली नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी चूल मांडली होती.
वेगवेगळी साहित्य संमेलनांची अशी प्रथा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने सुरु केली.
`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या नागपूरला १९३३ साली भरलेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाने १९७२ साली आठवे ख्रिस्ती साहित्य संमेलन नगर रोडला रामवाडीला डी नोबिली कॉलेजात आयोजित केले होते.
`अगा जे कल्पिले नाही' हे मराठी भाषेतले पहिले आत्मकथन लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते तर धर्मगुरु (फादर) होण्याचे प्रशिक्षण पेपल सेमिनरीत घेणारे ब्रदर नेल्सन मच्याडो आयोजक होते.
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाने पंधरावे ख्रिस्ती साहित्य संमेलन १९९२ साली मॉडेल कॉलनीतल्या विद्या भवन स्कुलमध्ये भरवले होते,
विद्या भवन स्कुलचे प्राचार्य फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते तर कवयित्री शांता शेळके उद्घाटक होत्या.
नाशिकमध्ये या जानेवारीत सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली २७वे ख्रिस्ती साहित्य संमेलन पार पडले.
कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथांत विसंवाद नसला तरी संवाद मुळीच नसतो. महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी या समाजातील दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचे फार मोठे काम केले आहे.
गेल्या शंभर वर्षांच्या या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा आढावा आणि गेल्या पंचवीस वर्षांतील मराठी ख्रिस्ती आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे `शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या ग्रंथात मी संग्रहीत केली आहेत.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेले हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे.
सहा महिन्यांपूर्वी या पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचा सचिव म्हणून मी सूत्रे घेतली आहे. दर महिन्यात एकदा भेटावे, विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा व्हावी, काही साहित्यिक उपक्रम राबवावे असा या मासिक बैठकीचा माफक उद्देश आहे.
साहित्य संघाच्या प्रत्येक बैठकीला नवनवे लोक हजर असतात. त्यामुळे प्रत्येक बैठकीनंतर हजर असणाऱ्या सर्वांबरोबर एक ग्रुप फोटो घेण्याबाबत मात्र मी आग्रही असतो.
नोंदवहीतल्या इतिवृत्तापेक्षा असे फोटो बरे.
कालच्या बैठकीचा हा फोटो.
गेटपाशी हा ग्रुप फोटो घेत असताना फेसबुकवर मित्र असणारे यवतमाळचे आणि आता मध्य प्रदेशात कार्यरत असणारे प्रतिक विजया सुधाकर यांनी मला पाहिले.
फेसबुकवर वेळोवेळी आपली छबी टाकल्याचा हा एक फायदा.
त्यांनी आपली ओळख करुन दिल्यानन्तर त्यांच्याबरोबर सुद्धा एक वेगळा फोटो काढून झाला.
Camil Parkhe



भारतात पहिल्यांदा आधुनिक शाळा उघडणाऱ्या, सार्वत्रिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या (१८१४-१८१५), मुलींची पहिली  शाळा सुरु करणाऱ्या (१८२४) गॉर्डन हॉल यांची चरित्रकथा त्यांच्या नातवाच्या शब्दांत :  
आद्य अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्सचे प्रतिनिधी म्हणून १९१३ साली मुंबईत आले होते. 


यावेळी बोलताना त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे. 


``या प्रसंगी तुम्ही मला दिलेल्या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. हा सन्मान माझ्या स्वतःच्या गुणवत्तेमुळे नसून माझे आदरणीय आजोबा रेव्हरंड गॉर्डन हॉल यांच्या नावामुळे आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. हा त्यांच्या पवित्र स्मृतीला अर्पण केलेला आदर आहे, म्हणूनच तो मला शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका अधिक मोलाचा वाटतो.
हा समारंभ माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज येथे उभे राहून या उल्लेखनीय कार्यक्रमात सहभागी होणे हे माझ्यासाठी अवर्णनीय सौभाग्य आहे. या क्षणाची मी अतिशय उत्कंठेने वाट पाहत होतो. तुम्हा सर्वांना भेटताना माझ्या मनात जे विचार आणि भावना दाटून आले आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. 


अनेक वर्षांपासून माझ्या जीवनात एक स्वप्न होते—देवाच्या कृपेने कधीतरी या भारत देशाला भेट देण्याची संधी मला मिळावी. या देशाशी माझ्या अनेक प्रिय आठवणी जोडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारत माझ्या मनात आणि हृदयात वसलेला आहे. माझ्या आजोबांच्या मिशनरी जीवनातील प्रसंगांचा मी इतका विचार केला आहे की, मला भारत आणि येथील लोकांविषयी एक आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे. जणू मी एखाद्या अपरिचित देशात नव्हे, तर आधीच परिचित असलेल्या भूमीत आलो आहे.


मला असे वाटते की मी यापूर्वी येथे आलो आहे आणि तुम्हा बांधवांना पूर्वीपासून ओळखतो. जसे एखादा मनुष्य आपल्या पूर्वजांच्या घरी परत येतो, आणि त्या जागेशी व लोकांशी पुन्हा संपर्क आल्याने त्याच्या मनात कोमल भावना जागृत होतात, तसेच काहीसे मला आता वाटत आहे आणि या शब्दांमध्ये कल्पनेपेक्षा अधिक सत्य दडलेले आहे.  कारण शंभर वर्षांपूर्वी माझे आजोबा या भारतात आले आणि त्यांनी आपले निवडलेले कार्य सुरू केले. येथेच त्यांनी आपले जीवन व्यतीत केले आणि मिशनकार्य चालवले. येथेच कार्यरत असताना आयुष्याच्या ऐन उमेदीत त्यांचे निधन झाले. येथे या देशातच माझ्या वडिलांचा जन्म झाला होता.
आता मी जे काही सांगणार आहे त्यात कदाचित काही वैयक्तिक बाबी येतील आणि त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करताल अशी मला खात्री आहे; याचे कारण परिस्थितीच अशी आहे की तसे न करणे मी टाळू शकत नाही. जर मी या आद्य मिशनरीबद्दलआदराची भावना ग्याक्त केली नाही आणि त्यांनी जपलेल्या ख्रिस्ती आदर्शांबद्दल माझे वैयक्तिक ऋण व्यक्त केले नाही, तर ते कृतज्ञतेचा अभाव ठरेल.


देवाच्या या साध्या भक्ताने आम्हाकडे सोपवलेल्या आध्यात्मिक वारशामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात जे आशीर्वाद आले आहेत, त्यांची गणना करणे अशक्य आहे. माझ्या बालपणातील घरात “मिशनरी गॉर्डन हॉल” हे नाव अत्यंत आदराने घेतले जाई आणि भारतातील त्यांच्या जीवनाची कथा, त्यांचा विश्वास, त्याग, आणि ख्रिस्ताच्या कार्याप्रती निष्ठा ही आमच्या बालपणातील परिचित शिकवण होती आणि त्याचा आमच्यावर खोल परिणाम झाला.  त्यांचा वारसा माझ्या वडिलांकडे आला, माझे वडीलसुद्धा सुवार्तेचे सेवक होते आणि परदेशी मिशनच्या कार्याचे ठाम समर्थक होते. 
त्या काळात फारच थोडे ख्रिस्ती लोक या कार्यात रस घेत होते. आमच्या घरी परदेशातून परतलेले मिशनरी नेहमीच आदरणीय पाहुणे असत आणि त्यांचा सन्मान करण्यास आम्हाला आनंद वाटे.



ख्रिस्ताचा सेवक आणि बोर्डाच्या समितीचा सदस्य म्हणून ज्या बोर्डाचे गॉर्डन हॉल यांनी पहिले मिशनरी म्हणून कार्य सुरू केले, त्याच बोर्डाची आता सेवा करताना मला मोठा आनंद होत आहे. जगाच्या सुवार्तिकरणाच्या कार्यात, जे आज आपल्या ख्रिस्ती धर्माचे वैभव आहे, त्यात थोडासा का होईना सहभाग घेणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. 


या वेळी मी गॉर्डन हॉल यांच्या जीवनाचा सविस्तर आढावा घ्यावा अशी तुमची निश्चितच अपेक्षा नाही. मात्र त्यांच्या जीवनातील काही ठळक गोष्टींचा थोडक्यात उल्लेख घेणे येथे पुरेसे ठरेल.  
गॉर्डन हॉल यांचा जन्म ८ एप्रिल १७८४ रोजी मॅसॅच्युसेट्समधील टोलंड येथे एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणी ते खूप अभ्यासू होते आणि पुढे विल्यम्स कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांच्या शिक्षणकाळात  त्यांचे धार्मिक परिवर्तन झाले.
सत्याच्या शोधात असताना ते सॅम्युएल जे. मिल्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रभावाखाली आले. या गटाला “हेस्टॅक बँड” (गवताच्या गंजीची टीम)  म्हणून ओळखले जाते. 


आपल्या मिशनरी इतिहासात प्रसिद्ध असलेल्या या तरुणांनी बिगरख्रिस्ती राष्ट्रांमध्ये मिशनरी कार्य करण्यासाठी एक संस्था स्थापन केली. या तरुणांनी परदेशी मिशनसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार केला होता.  या संस्थेच्या नियमांनुसार ज्या व्यक्तीवर अशा मिशनमध्ये सहभागी होण्यास अडथळा असणारी कुठलीही बांधिलकी असेल अशा व्यक्तींना सदस्यत्व दिले जात नसे.  कर्तव्य ज्यावेळी आणि ज्याठिकाणी हाक देईल तेव्हा परदेशी मिशनवर जाण्यास ते सदैव तयार असतील अशी प्रत्येक सदस्याने अशी प्रतिज्ञा केली होती.  


गॉर्डन हॉल या संस्थेत सामील झाले होते की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही.  परंतु य संस्थेच्या उद्दिष्टांशी ते मनापासून सहमत होते.  त्यांच्या पुढील जीवनातील घटनांमधून त्या भावनेची प्रचीती येते. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अँडोव्हर सेमिनरीत शिक्षण घेतले.  येथे सॅम्युएल जे. मिल्स, ल्युथर राईस, अडोनिरम जडसन आणि इतर सहकाऱ्यांसोबत शिकत असताना परदेशात येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  


अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून सेवा करण्यासाठी अनेक आकर्षक संधी असूनही गॉर्डन हॉल यांनी त्या नाकारल्या आणि ठामपणे म्हटले:  “नाही, ख्रिस्ती जगातील कुठल्याही ठिकाणी वा धर्मग्रामात मी स्थायिक होणार नाही. येथे स्वगृही सेवा करण्यासाठी खूप लोक आहेत. देव मला बाहेर परदेशी जाण्यासाठी बोलावत आहे. जर बिगरख्रिस्ती जनांस मी सुवार्ता सांगितली नाही तर माझ्यावर शाप येईल.”


सॅम्युएल मिल्स यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: “गॉर्डन हॉल यांना देवाने निवडून स्वहस्ते दीक्षा दिली आहे आणि मिशनरी  म्हणून नियुक्त केले आहे.”
गॉर्डन हॉल यांनी बोस्टन आणि फिलाडेल्फिया येथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. दिनांक ६ फेब्रुवारी १८१२ रोजी सालेम, मॅसेच्युसेट्स येथे त्यांच्या चार सहकाऱ्यांसह त्यांचा धर्मगुरु म्हणून दीक्षाविधी झाला.  त्यानंतर लवकरच ल्युथर राईस आणि सॅम्युएल नॉट (ज्युनियर)   यांच्यासह ते फिलाडेल्फियाहून जहाजाने निघाले व ८ ऑगस्ट रोजी कोलकात्यास पोहोचले.


यानंतर त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्यांच्या देवावरील विश्वासाची अशाप्रकारे कठोरपणे परीक्षा घेतली जात होती.त्याना मिळालेल्या संधीची द्वारे आता पूर्णतः बंद झाली असावी अशीच सर्व चिन्हे होती.  त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली जात नव्हती. मुंबईत स्थायिक होण्यासाठी आणि आपले मिशनकार्य सुरू ठेवण्यासाठी ब्रिटिश संसदेच्या औपचारिक कायद्याने परवानगी मिळेपर्यंत त्यांना जो दीर्घ विलंब सहन करावा लागला ती तर अगदी वेगळीच, रोमहर्षक कथा आहे.


ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या देखरेखीखाली कायम ठेवण्यात आल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळून जाण्याचे वारंवार प्रयत्न केल्यानंतरसुद्धा त्यांना पुन्हापुन्हा अटक करण्यात आली. आपल्या कार्यास प्रारंभ करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीला स्थानिक जनतेकडून नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विरोध केला गेला आणि त्यांना भारताबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला.  विविध प्रकारच्या अडचणींना आणि विरोधास धैर्याने तोंड देत कधीही माघार न घेता गॉर्डन हॉल यांनी अमेरिकन मिशनच्या अगदी सुरुवातीला जे यश मिळवले ते माझ्या मते त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठे यश होते. 


ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या मुंबईतील गव्हर्नरसमोर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली बाजू मांडली आणि त्यामुळे अमेरीकन मिशनची भक्कम पायावर उभारणी आणि स्थापना करणे शक्य झाले.
त्यांनी याहून अधिक फारसे यश मिळवले नसते तरी त्यांचे मिशनरी कार्य व्यर्थ ठरले नसते.  तसे पाहिले तर त्यांच्या मिशनरी कालावधीचे केवळ वर्षे विचारात घेतल्यास त्यांचे मिशन फार अल्पावधीचे ठरते.   
दिनांक २० मार्च १८२६ रोजी नाशिकजवळ अचानक आजारी पडून ते निधन पावले तेव्हा त्यांचे वय फक्त ४१ वर्षे होते.


त्याकाळात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि आता आपणांस उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा तुलना केल्यास त्यांनी केलेल्या त्यागाची आणि तोंड दिलेल्या आव्हानांची कल्पना येऊ शकेल. त्यावेळी वाफेचे आणि विजेचे अद्भुत शोध, तसेच आधुनिक विज्ञानामुळे शक्य झालेल्या सर्व सोयी-सुविधांनी आणि सुरक्षिततेच्या साधनांनी सुसज्ज अशा विशाल जहाजांद्वारे जलद प्रवासाची साधने नव्हती. 


अशावेळी आपले घरदार, मित्रमंडळी आणि मातृभूमी सोडून, महिनोनमहिने चालणाऱ्या प्रवासासाठी एका असुरक्षित नौकेवर बसून अज्ञात आणि दूरदेशी जाणे या लोकांसाठी किती मोठे धाडस असेल ! 
गॉर्डन हॉल आणि त्यांचे मिशनरी सहकारी यांनी हाती घेतलेला उपक्रम खूप आव्हानात्मक होता.  अशा साहसाचा सामान्य लोकांनी अगदी स्वप्नातही विचार केला नसता. पण हे सर्व मिशनरी  दूरदृष्टी, श्रद्धा आणि समर्पणाची भावना असलेले लोक होते.  एका खूप विलक्षण उदात्त हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आपले जीवन देवाच्या हातात सोपवण्याची तयारी दाखवली, देवाने त्यांना या महान कार्यासाठी निवडले होते.  


गॉर्डन हॉल यांनी आपले कार्य सुरू केले, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी एकही भारतीय ख्रिस्ती नव्हता आणि खूप कमी भारतीय लोकांनी येशू ख्रिस्ताचे नाव ऐकले होते. त्यांच्या कार्याच्या बाह्य परिणामांचा विचार केल्यास गॉर्डन हॉल यांचे मिशन कार्य आज आपण मराठी मिशनच्या भव्य कार्याशी तुलना केल्यास अत्यंत अल्प वाटते.
गॉर्डन हॉल यांचे कार्य हे एका अग्रदूताचे होते. त्यांच्यामागून श्रद्धा आणि संयमाने येणाऱ्यांसाठी त्यांनी पायाभरणीचे काम केले.  त्यांच्या जीवनात रोमांचकारी साहसे नव्हती किंवा इतरांना सांगण्यासारख्या चमत्कारिक यशोगाथासुद्धा नव्हत्या. त्याचा जीवनप्रवास कठोर आणि सततच्या परिश्रमांनी भरलेला होता, आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत यशाची एखादी किरकोळ झलकही त्यांना क्वचितच दिसली असेल.  असे असले तरी त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या सर्व अडीअडचणी आणि संकटांमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या अंतिम परिणामाबद्दलचा विश्वास कधीही गमावला नाही.


गॉर्डन हॉल यांच्यासाठी ते खरोखर देवाचेच कार्य होते आणि म्हणून ते यशस्वी होणारच, असा त्याचा ठाम विश्वास होता. 



शेतात बी पेरण्यात ते समाधानी होते आणि त्याचा अंतिम परिणाम ते देवावर सोपवत असत. त्यांच्या दैनंदिन कार्याच्या नोंदींच्या प्रत्येक पानातून आपल्या भावंडांच्या उद्धारासाठी जीवन अर्पण करण्याचा महान सन्मान मिळाल्याबद्दल देवाबद्दलचा आनंद आणि कृतज्ञता स्पष्टपणे दिसून येते.  माझ्या आजोबांचा आत्मा आजही आपल्याबरोबर आहे असे आपल्याला मानता येणार नाही का ?  तसेच त्यानंतरच्या या अनेक वर्षांत देवाच्या कृपेने त्यांनी सुरू केलेल्या त्या लहान कामातून आज जे भव्य यश मिळाले आले आहेत ते पाहून त्यांना किती आनंद होत असेल!


आज आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक मर्यादांनी त्यांचे जीवन सीमित होते, तरीही केवळ दोन वर्षांत त्यांनी मराठी भाषेवर इतके प्रभुत्व मिळवले की लवकरच ते लोकांना त्यांच्या भाषेत आणि अत्यंत प्रभावीपणे सुवार्ता सांगू शकले. 


काही वर्षांपूर्वी कोणीतरी लिहिले होते:  “पश्चिम भारतात कुणाही मिशनरीला ब्राह्मण आणि उच्चवर्गीयांमध्ये चर्चासत्रे आणि व्यासपीठावरील प्रवचनांसाठी त्यांच्यापेक्षा अधिक मान कधीच मिळाला नाही.”


बायबलच्या नव्या कराराचा एक मोठा भाग त्यांनी मराठीत अनुवादित केला आणि शुभवर्तमानांबद्दलची आणि इतर अनेक धार्मिक पुस्तके लिहिली.  


अमेरिकेतील चर्चच्या जीवनावर त्याच्या प्रभावाबद्दल येल विद्यापीठाचे डॉ. बीच म्हणतात:  “अँडोव्हर सेमिनरीतील विद्यार्थ्यांना हॉल यांनी लिहिलेली पत्रे, तसेच त्यांची पुस्तिका गेल्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेला तिच्या मिशनरी कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी सर्वात प्रभावी ठरलेल्या घटकांपैकी होती.”


माझ्या आजोबांच्या कार्याच्या सुरुवातीला आलेल्या विविध संकटांचा मी याआधीच उल्लेख केला आहे. या संकटांत त्यांनी आपल्या ध्येयात आणि कृतीत दाखवलेला निर्धार पुढील मिशनरी कार्यासाठी मार्ग मोकळा करणारा ठरला. आता त्यांच्या जीवनातील एक-दोन प्रसंगांचा मी थोडक्यात उल्लेख करू इच्छितो. माझ्या मते हे प्रसंग ख्रिस्ताच्या कार्याचा एक समर्थ मिशनरी या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांचे दर्शन घडवतात.
``माझ्या आजोबांच्या आयुष्यातील एकदोन प्रसंग मी येथे सांगेल.  सर्वप्रथम ती घटना जेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून वेगळे व्हावे लागले. त्यावेळी हयात असलेल्या त्यांच्या दोन मुलांची प्रकृती खूपच नाजूक होती. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना अमेरिकेला नेणे आवश्यक असल्याचे ठरले होते.


निरोप घेण्याची वेळ जवळ येत असताना माझ्या आजीने आपल्या पतीला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली.


त्यावर गॉर्डन हॉल यांनी उत्तर दिले: ''“तू काय म्हणते आहेस हे तुला माहीत आहे ना ? मी निरोगी आहे. माझ्या आसपास असलेल्या आत्म्यांना मी ख्रिस्ताचा संदेश सांगू शकतो. मी माझ्या स्वामीचे काम सोडून तुमच्यासोबत अमेरिकेत यावे असे तुला वाटते का?  तर मग तू आपल्या या आजारी बाळांना घेऊन अमेरिकेत जा. मी स्वतः येथेच राहून तुंम्हा सर्वांसाठी प्रार्थना करीन आणि आपल्या प्रभूच्या कार्यात येथे परिश्रम करीन.  आपण अशी आशा करु या की आपल्या या प्रिय मुलांचे जीवन वाचवण्यासाठी देव आशीर्वाद देईल.”


एव्हढे सांगून जॉर्ज हॉल म्हणतात: ``माझ्या आजीने म्हटले कि “त्या क्षणापासून मी त्यांना आमच्याबरोबर येण्याची विनंती करणे थांबवले.”
अशा प्रकारच्या अनुभवातून जाण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना लाभते. निव्वळ मानवी दृष्टिकोनातून पाहता गॉर्डन हॉल यांचे मिशनकार्य त्या वेळी पूर्णपणे निष्फळ आणि भविष्यासाठी आशादायक नसल्यासारखे दिसत होते. अशा परिस्थितीत हॉल यांनी जर आपली पत्नी आणि मुलांच्या विनवण्यांना मान देऊन भारतातील मिशनकार्य सोडून दिले असते तर त्याच्या निर्णयाच्या शहाणपणावर प्रश्न उपस्थित करण्याचा विचार तरी कुणाच्या मनात आला असता काय?


परंतु त्यांच्या मते त्यांनी करावयाची केवळ एकच गोष्ट होती आणि ते साध्य करण्यासाठी पुष्कळ प्रार्थनेद्वारे त्यांना सामर्थ्य मिळाले. असे करून त्यांनी केवळ या मिशनच्या कार्यात सातत्य राखले नाही तर ख्रिस्तामधील त्यांच्या सर्व बांधवांनी अनुसरण्यासारखा आपल्या प्रभूप्रती प्रेमपूर्ण समर्पणाचा एक आदर्श निर्माण केला आहे. आणि त्याच्या जीवनातील तो अंतिम प्रसंग तर या मिशनच्या इतिहासात सदैव स्मरणीय राहील. त्या प्रसंगाचे वर्णन करण्याचा मी प्रयत्न करणार नाही; हा प्रसंग तर सौंदर्याने उजळलेला आहे.
विश्वासाचा हा सैनिक आपल्या जीवनाबाबत किती उदार होता! अनेक दिवस  आजारी आणि मरणासन्न लोकांमध्ये राहून गॉर्डन हॉल त्यांच्या शरीर आणि आत्म्याच्या गरजांची सेवा करत होते. त्यांच्यासाठी आपले स्वतःचे जीवन मुक्तहस्ताने अर्पण करत होते. आता त्यांच्याकडे असलेला औषधांचा साठा संपत आला होता आणि अविरत श्रमांनी ते थकले होते.  पुन्हा औषधे मिळवून पुन्हा गरजूंना मदत करण्यासाठी ते  जात असतानाच ते  स्वतःच आजारी पडले.


प्रभूबद्दल बोलले गेलेले शब्द येथे आपण आदरपूर्वक वापरू शकत नाही का ?


“त्याने इतरांना वाचविले, मात्र स्वतःला तो वाचवू शकला नाही?” 
ख्रिस्ताशी असलेल्या त्यांच्या निकट सहवासाची जाणीवच त्यांच्या मरणाच्या क्षणी त्यांच्या आत्म्याला परम आनंदाने भरून टाकत होती. आठ तासांच्या वेदनेनंतर, आपल्या सोबत असलेल्या दोन भारतीय मुलांसाठी, अमेरिकेतील आपल्या प्रियजनांसाठी आणि भारतातील लोकांसाठी उत्कटतेने प्रार्थना करत, त्यांनी म्हटले: “हे देवा, तुझा गौरव असो.”


अशा प्रकारे त्या रात्रीसाठी आश्रय घेतलेल्या एका मंदिराच्या ओट्यावर त्यांचे निधन झाले. ज्या भीषण रोगाच्या घातक परिणामांपासून इतरांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती त्याच रोगाचे ते बळी ठरले होते.

 
एक सरळ, एकनिष्ठ मनाचे, आपल्या प्रभूप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे ते कोणत्याही प्रयत्नासाठी किंवा कोणत्याही त्यागासाठी समर्थ ठरले. आपल्या कार्यात मग्न असताना आणि सेवा करत असताना आणि अगदी त्यांनी स्वतःच  निवडले असते अशाचप्रकारे या जगाचा  त्यांनी निरोप घेतला. देवाच्या सेवकाची अशीच वृत्ती असते. ‘’ 

Camil Parkhe



Saturday, May 23, 2026

 

`हं, बोला, विचारा तुमच्या मनातील प्रश्न..'

असं साक्षात भारताच्या पंतप्रधानांनी आम्हा पत्रकारांना म्हटलं आणि त्यानंतर आम्ही पत्रकार त्यांच्याबरोबर पाचदहा मिनिटे नव्हे तर चक्क अर्धा तास गप्पा मारत बसलो होतो.
साल होते 1990.. पंतप्रधान होते विश्वनाथ प्रताप सिंग आणि त्याच्या शेजारी बसलेल्या होत्या जनता दलाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मृणाल गोरे
आणि समोर फक्त आम्ही दोन पत्रकार होतो.
इंडिया एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचा मी बातमीदार कामिल पारखे आणि टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या पुणे प्लसचे बातमीदार मुकुंद संगोराम.
सद्याच्या परिस्थितीत अविश्वसनीय वाटतं ना ? पण अगदी खरं आहे.
पुणे विमानतळावर एका छोटयाशा केबिनमध्ये आम्ही चौघे बसलो होतो, पंतप्रधानांसोबत एकही सरकारी अधिकारी किंवा बॉडी गार्ड नव्हते.
कर्नाटकातील सीमाभागातील एका पोटनिवडणुकीत आपल्या जनता दल पक्षाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान प्रवासी विमानाने दिल्लीहून पुण्याला आले होते, तेथून पुढे कारने त्यांनी प्रवास केला होता.
निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी सरकारी खास विमान टाळले होते.
अविश्वसनीय नाही का? पण अगदी खरे आहे.
तर संगोराम आणि मी पंतप्रधानांबरोबर खूप वेळ बोलत बसलो होतो, आयत्या वेळी impromptu त्या पत्रकार परिषदचे निमंत्रण आले होते,
निवडणुक आचारसंहितेमुळे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो - पीआयबी -ने पत्रकारांना नेण्या-आणण्याची व्यवस्था केली नव्हती.
संगोराम यांच्या दुचाकीवर बसून मी विमानतळावर आलो होतो.
पंतप्रधानांनी कुठलेही प्रश्न टाळले नाही किंवा `ऑफ द रेकॉर्ड' असं काही म्हटलं नव्हतं.
विषय संपले तेव्हा आमच्या गप्पा चक्क हवापाण्यावर आल्या होत्या.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग अधूनमधून आम्हा दोघांनाही समोरच्या प्लेटमधील आणखी बिस्किटे खाण्याचा आग्रह करत होतो. शेवटी आम्ही दोघेच पत्रकार परिषदेचा शेवट करून केबिनबाहेर आलो होतो.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि मृणालताई गोरे प्रवासी विमानाची वेळ होईपर्यंत तेथेच ताटकळत बसले होते.
पंतप्रधानांबरोबर असे दिलखुलास गप्पागोष्टी करण्याची अशी संधी कुणा पत्रकारांना मिळाली असेल असे मला वाटत नाही.
मात्र मुकुंद संगोराम आणि मला अशी संधी मिळाली होती.
आजही मला ही पत्रकार परिषद एखाद्या स्वप्नासारखी वाटते.