Did you like the article?

Showing posts with label Jesus Christ. Show all posts
Showing posts with label Jesus Christ. Show all posts

Tuesday, July 30, 2024

सेंट ॲन्स चर्च

 विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आणि प्रतिके सामान्य माणसांनासुद्धा ओळखता येतात.

पुणे कॅम्पात पुलगेट बस स्टँडच्याजवळ सोलापूर बझार येथले हे प्रार्थनास्थळ मात्र त्याला अपवाद असेल.
अगदी जवळ आल्यानंतरसुद्धा हे कोडे लवकर सुटत नाही, याचे कारण या वास्तूच्या प्रथमदर्शनी असणारे गोपुर शैलीचे बांधकाम.
त्याशिवाय समोरच्या खालच्या भागात असलेली नक्षीवजा कलाकुसर आणि गोपुराच्या केंद्रस्थानी असलेले कमळाच्या पाकळ्यांवर असलेले शिल्प या कोड्यात भर घालते.
वास्तूच्या कळसाच्या टोकाला असलेला छोटासा लाल रंगाचा क्रूस ही वास्तू म्हणजे एक ख्रिस्ती देऊळ आहे हे सांगत असतो.
पुण्यातील सोलापूर बझार येथील हे सेंट ॲन्स चर्च हे मात्र केवळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोपुर शैलीच्या वास्तुबाबतच प्रसिद्ध नाही.
या रोमन कॅथोलिक चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे दर रविवारी इंग्रजी भाषेशिवाय तामिळ भाषेतसुद्धा एक मिस्साविधी साजरा केला जातो.
पुणे आणि कोल्हापूर शहरांसह आणि चार महसूल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे डायोसिस म्हणजे पुणे धर्मप्रांतातील काही अगदी मोजक्या चर्चेसमध्ये तामिळ भाषेत प्रार्थनाविधी होत असतो.
आता या चर्चमधल्या गोपुर बांधकामशैलीविषयी.
पुण्यात पहिले चर्च बांधले गेले ते सवाई माधवराव पेशवे यांनी १७९२ साली दिलेल्या जमिनीवर. पेशव्याच्या सैन्यात असलेल्या पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील पोर्तुगीज अधिकारी आणि सैनिकांसाठी हे चर्च बांधले गेले तेव्हा साहजिकच ते युरोपियन बांधकाम शैलीत होते.
क्वार्टर गेटला सेंट ऑर्नेलाज स्कुलच्या आवारात असलेले हे अवर लेडी ऑफ इम्यॅक्युलेट कन्स्पेशन चर्च हे आज `सिटी चर्च' या छोट्याशा आणि सर्वांना कळेल अशा नावानेच ओळखले जाते.
मुंबई आणि वसई वगळता महाराष्ट्रातील हे सिटी चर्च सर्वात जुने चर्च.
त्यानंतर पुणे शहरात बांधली गेलेली सर्वच विविध रोमन कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चेस पाश्चात्य गॉथिक बांधकाम शैलीत आहेत.
स्वातंत्र्यानंतर सोलापूर बझार परिसरात नवे चर्च बांधताना मूळचे युरोपियन असलेल्या येशूसंघीय किंवा जेसुईट फादरांनी मात्र भारतीय बांधकाम शैलीचा वापर केला.
गोपुर शैलीतील हे सेंट ॲन्स चर्च नावाचे हे देऊळ अशाप्रकारे १९६२ साली उभे राहिले.
हे चर्च जर्मन फादर जॉन बाप्टिस्ट हॅश (मृत्यू १९८९) यांनी बांधले. या परिसरात त्यांनी तामिळ माध्यमाची प्राथमिक शाळासुद्धा सुरु केली होती.
फादर हॅश स्वतः उत्तम तामिळ बोलत. तामिळ शिकण्यासाठी ते चेन्नई येथे काही वर्षे राहिले होते. पुण्यातच त्यांचे निधन झाले आणि हडपसर येथे त्यांची कबर आहे.
स्थानिक वास्तुपरंपरेनुसार आणि प्रतिकांनुसार प्रार्थनास्थळांचे बांधकाम हा कॅथोलिक चर्चच्या सांस्कृतीकरण किंवा inculturation चा भाग असतो, त्यात विशेष असे काही नाही
सेंट ॲन ही येशू ख्रिस्ताची आजी, मदर मेरी किंवा मारीयाची आई.
या गोपुराच्या प्रथमदर्शनी भागाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी कमळाच्या पाकळ्यांवर काचेने आच्छादित असलेले एक शिल्प आहे.
सेंट ॲन आपल्या लहानग्या मुलीकडे - मदर मेरीकडे - प्रेमभावनेने पाहत आहे असे हे शिल्प आहे.
आता या चर्चमध्ये तामिळ भाषेत होणारा रविवारचा मिस्साविधी.
पुण्यातल्या या चर्चमध्ये तामिळ लोकांसाठी त्यांच्या तामिळ मातृभाषेत दर रविवारी सकाळी सात वाजता प्रार्थनाविधी होतो.
जगभरातील प्रत्येक चर्चच्या सदस्यांची एक आगळीवेगळी ओळख असते. सेंट ॲन्स चर्चसुद्धा त्याला अपवाद नाही.
या परिसरातील अनेक कॅथोलिक लोक मूळचे तामिळनाडू येथील आहेत. अशीच स्थिती खडकीच्या सेंट इग्नेशियस चर्च आणि इतर काही चर्चेसची आहे.
त्यामुळे येथे दर रविवारी तामिळ भाषेत प्रार्थना होते, त्यासाठी इतर चर्चमध्ये असणारे तामिळ भाषक धर्मगुरु खास बोलावले जातात. फादर रॉक अल्फान्सो हे सेंट ॲन्स चर्चचे धर्मगुरु आहेत.
ख्रिस्ती धर्मात चर्चमध्ये नेहेमीच सामुदायिक प्रार्थना होत असते, कॅथोलिक चर्चमध्ये या उपासनेला Holy Mass किवा मिस्साविधी (प्रभुभोजन) म्हणतात.
Missa हा मूळचा लॅटिन शब्द. रविवारच्या मिस्साविधीला चर्चच्या सर्व सदस्यांनी हजर राहावे अशी अपेक्षा असते. इस्लाम धर्मात जसे शुक्रवारच्या प्रार्थनेला महत्वाचे स्थान आहे तसेच
सेंट ॲन आणि सेंट जोकीम यांचा २६ जुलै रोजी असणारा सण आजीआजोबांचा - ग्रॅन्डपॅरेन्ट्स डे - म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी सोलापूर बझार इथले हे सेंट ॲन्स चर्च पुढील रविवारी, २८ जुलै रोजी, सेंट ॲनचा सण -फेस्त - साजरा करणार आहे.
पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रीग्स या सणाच्या मिस्साविधीचे मुख्य पुरोहित असतील.
Camil Parkhe, July 20, 2024

Monday, April 1, 2024

 

लेंट सिझन : ख्रिस्ती धर्मियांमधील उपवासाचे चाळीस दिवस

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सध्या सुरु आहेत. ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ-लेंट सिझन-दरवर्षी मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमजान महिना सौरवर्षीय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सध्या सुरु आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. 

खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. मौंडी थर्सडे किंवा पवित्र गुरुवार. याच दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर'ला आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. या जेवणाआधी येशू आपल्या बारा शिष्यांचे चक्क पाय धुतो! कुणीही लहानथोर नाही, असा संदेश या कृतीतून देतो. 

या लास्ट सपरच्या वेळी ख्रिस्ताने धर्मगुरु संस्थेची स्थापना केली असे म्हणतात. "हे माझ्या आठवणीसाठी करत जा,'' असे येशू म्हणाला आणि अशाप्रकारे चर्चमध्ये दरदिवशी आणि रविवारी मिस्साविधी होतो आणि 'लास्ट सपर'ची उजळणी होते. हे शेवटचे भोजन झाल्यावर या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो. रात्रभर येशूचा छळ होऊन दुसऱ्या दिवशी रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : "हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही.'' हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार.

उपवासकाळ म्हटले की हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो,' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या 'भस्म बुधवारा'ने किंवा 'अँश वेन्सडे' या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आदल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हलला सुरुवात होते आणि या उत्सवाची 'भस्म बुधवारा'च्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता. 

भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो. 

माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले. उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही. 

हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात. उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, या काळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात. श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. 
 
कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता! इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिकात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, 'पेनान्स' म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे. 

माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे. त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत. 
 
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे. मध्ययुगीन 'इन्क्विझिशन'च्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की. 

विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही. या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते. यावेळी २४ मार्चला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली. २९ मार्चला गुड ३१ मार्चला ईस्टर संडे आहे.

ख्रिस्ती धर्मातील सर्वपंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात. ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला महत्व आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी 'भस्म बुधवार', गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही. येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. या स्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना!' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले. 

विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना!' हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात. जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये, मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते.

जेरुसलेमी बाळे जमली, 
प्रभुला गाणी गाऊ लागली 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

गाढवावरी येशू स्वार होई 
मधू गाण्यांचा नाद होई 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे ते बोल बोबडे 
रहिवाश्यांच्या कानी पडे 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

शहरवासी डोकावती 
कान देऊन ऐकती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

पंडितशास्त्री धावून येती 
दडपशाही करु लागती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे जरी तोंडे दाबिली 
गाण्याची गती तरी नाही थांबली 
होसान्ना होसान्ना होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो द व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले 'द लास्ट सपर' हे चित्र आहे. या 'लास्ट सपर' चित्रात येशूला तीस मोहरांसाठी ज्याने विकले तो ज्युडास त्या पैशाची थैली घेऊन बसलेला दाखवला आहे. पावित्र्याचे प्रतीक असलेली आणि इतर सर्वांच्या चेहेऱ्याभोवती असलेली प्रभावळ मात्र ज्युडासच्या चेहेऱ्याभोवती नाही! 

याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने. 

चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो, गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते. लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा.

गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभर कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करण्यासाठीच. ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो. काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दया याचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. 

येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे. जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके. 

त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे. आता 'अँश वेन्सडेआणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात. हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.
 
- कामिल पारखे 
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.) 

Friday, March 22, 2024

Muslim Christians fasting seasons 




 मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सद्या चालू आहेत.

ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात.

मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना सौरवर्षिय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो.
ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म यांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे या धर्मांतील लोकांनाच माहिती नसते, तर या तिन्ही धर्मांचे नसलेल्या लोकांबद्दल काय बोलायचे ?
विशेष म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याचे बारा शिष्य अन सुरुवातीचे बहुतेक सर्व ख्रिस्तीजन हे यहुदी, ज्यू, होते याकडे दुर्लक्ष होते.
ज्यू हा सुरुवातीचा धर्म, त्यानंतर ख्रिस्ती धर्म आणि त्यानंतर इस्लाम धर्म असा क्रम आहे.
ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे उगमस्थान एकच आहे, ते म्हणजे पश्चिम आशिया. या तिन्ही धर्माची पवित्र भूमी एकच आहे आणि अनेक पवित्र स्थळे एकतर समान आहेत किंवा शेजारी लागून आहेत.
या होली लॅडच्या धार्मिक पर्यटनावर जाणाऱ्या लोकांनी हे चांगले अनुभवलेले असते.
या तिन्ही धर्मांच्या लोकांनी एकदुसऱ्याकडे कुठल्या नजरेने पाहिले आहे, काय वागणूक दिले हे मध्ययुगीन इतिहासातून दिसून येते.
या तिर्थक्षेत्रांवर हक्क सांगण्यासाठी आणि कब्जा मिळवण्यासाठी मध्ययुगात क्रुसेड्स किंवा धर्मयुद्धे झालेली आहेत. .
मध आणि दुधाचा सुपीक प्रदेश देवाने अब्राहामाच्या वंशजांना म्हणजे आपल्याला देऊ केला, ती ही वचनभूमी The Promised Land, असा ज्युंचा दावा आहे.
ज्युंचे या प्रदेशातून झालेले विस्थापन, गेल्या शतकातील इस्राएलची निर्मिती, स्थानिकांची हकालपट्टी आणि त्यातून निर्माण झालेले सद्याचे प्रश्न या अगदी अलीकडच्या घटना.
संपूर्ण जग या संघर्षाच्या आगीचे चटके अधूनमधून भोगत असते.
या तिन्ही धर्मांच्या धर्मग्रंथांत अनेक प्रसंग आणि पात्रे समान आहेत.
उदाहरणार्थ, अब्राहामाने - इब्राहिमने - आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी तयारी करणे.
या तिन्ही धर्मांचे भौगोलिक उगमनस्थान एकच असल्याने या तिन्ही धर्मातील नावे समान आढळतात. अब्राहम - इब्राहिम, ,
`जे; J या रोमन लिपीतील अक्षराचा हिब्रू आणि लॅटिन भाषांत उच्चार य असा होतो, त्यामुळे जिझस - येशू, जोसेफ- युसुफ, जेकब- याकुब
किंग डेव्हिड, दाविद राजा, हा ज्यूंच्या इतिहासातील सर्वांत मोठा, वंदनीय राजा. डेव्हिड.म्हणजेच दाऊद. गॅब्रिएल- गिब्राईल, मायकल- मिखाईल, मारिया- मिरियम, फातिमा अशी काही इतर समान नावे आहेत.
अब्राहाम- इब्राहिम , मोझेस- मोशे, वगैरे व्यक्ती ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तिन्ही धर्मांत वंदनीय आहेत. इतकेच नव्हे तर इसा किंवा येशूला इस्लाम धर्मियांतसुद्धा प्रेषित म्हणून मान्यता आहे, मात्र देव म्हणून नाही.
कॅथोलिक चर्चच्या गुड फ्रायडेच्या उपासनेत अब्राहाम यांचा खास उल्लेख `Abraham, Our Father in Faith' ' म्हणजे ``अब्राहाम, श्रद्धेत आमचे पिता' असा होतो.
या संज्ञेतून अप्रत्यक्षरीत्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांना जोडणारा एक समान दुवा म्हणून अब्राहामाकडे पाहिले जाते.
गुड फ्रायडेची ही एक छोटीशी प्रार्थना कॅथोलिक चर्चमध्ये खास महत्त्वाची आहे.
या गुड फ्रायडेच्या प्रार्थनेत ज्या लोकांच्या माध्यमातून मानवजातीपुढे देव प्रकटला त्या ज्यू लोकांसाठीही खास प्रार्थना केली जाते,
इतर धर्मियांसाठी आणि अगदी नास्तिकांसाठी, देवधर्म न मानणाऱ्यांसाठीसुद्धा प्रार्थना केली जाते.
या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा या रविवारपासून २४ मार्चपासून चालू होईल. २९ मार्चला गुड फ्रायडेला उपवास काळ संपतो,
त्यानंतर ईस्टर संडेला आनंदोत्सव.
एम एफ हुसेन यांनी चित्रित केलेले हे `लास्ट सपर' किंवा येशूचे शेवटचे भोजन चित्र
Camil Parkhe, March 22, 2024

Friday, January 26, 2024


बायबलमध्ये येशू ख्रिस्त आणि मंदिरासंबंधीच्या काही घटना सांगितलेल्या आहेत ``मंदिर आपल्या बापाचे आहे'' असे येशू किमान दोन प्रसंगांत ठणकावून सांगतो.

येशू स्वतःला `देवपित्याचा पुत्र' म्हणवून घेत असे हे त्यामागचे कारण.
खुद्द येशूचे मंदिरासंबंधींचे दोनतीन तर अत्यंत कटू अनुभव आहेत.
देवळाचा आणि येशूचा संबंध अगदी सुरुवातीला बाळ येशूचे देवापुढे समर्पणाच्या निमित्ताने येतो. यहुदी लोकांमध्ये पहिला पुत्र जन्मल्यानंतर त्याला देवळात आणून तेथे दोन कबुतरे अर्पण करण्याची प्रथा होती.
मारिया आणि जोसेफने नवजात येशूला जेरुसलेमच्या मंदिरात आणून त्याप्रमाणे केले होते. दरम्यानच्या काळात यहुदी परंपरेनुसार येशूची सुंताही झालेली असणार.
त्यानंतर बारा वर्षांचा येशु आपल्या आईवडलांसह पुन्हा एकदा जेरुसलेम मंदिरात येतो आणि गावी परत जाताना त्यांची चुकामूक होते. अखेरीस येशूचे आईवडील त्याला शोधत पुन्हा जेरुसलेमला परततात आणि येशु मंदिरात धर्मशास्त्री पंडित यांच्याशी धर्मशास्त्राबाबत चर्चा करताना दिसतो.
मारिया त्याला ``बाळा, तू आमच्याबरोबर असे का वागलास ? आम्ही तुझी काळजी करत होतो''
त्यावर येशू म्हणतो. ``तुम्ही माझा शोध करण्याचे कारण काय? मी माझ्या पित्याच्या घरातच असणार हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?'' '
पृथ्वीतलावरचे आपले अवतारकार्य अगदी सुरू करण्याच्या वेळीच येशू प्रस्थापित मंदिरव्यवस्थेशी पंगा घेतो.
येशू आपल्या नाझरेथ गावी जातो, तेथे मंदिरात धर्मग्रंथ घेऊन संदेष्टा यशयाच्या पुस्तकातून एक उतारा वाचतो:
``देवाचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण त्याने मला गोरगरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी अभिषेक केला आहे. मी बंदीवासांची सुटका करावी, आंधळ्यांना दृष्टी द्यावी, पिडीतांना मुक्त करावे आणि देवाचे राज्य आले आहे ही सुवार्ता सांगावी म्हणून त्याने मला पाठवले आहे ''
नंतर तो धर्मग्रंथ गुंडाळून सर्व लोक त्याच्याकडे पाहत असताना येशू म्हणतो,
''तुम्ही आता जे ऐकले त्या लिहून ठेवलेल्या वचनाची आता पूर्तता झाली आहे!''
म्हणजे ज्यांच्याविषयी हे लिहिले गेले आहे , तो मीच आहे!'
जुन्या करारातल्या अनेक पुस्तकांत वर्णिलेला तो मसिहा आपणच आहोत असे येशू जाहीर करतो.
कल्पना करा, जोसेफ सुताराचा मुलगा असणारी, सर्वांच्या परिचयातील एक व्यक्ती असा दावा करत असेल तर जमलेल्या लोकांची भावना काय झाली असणारा?
साहजिकच प्रक्षुब्ध होऊन लोक येशूला गराडा घालून त्याचा कडेलोट करण्यासाठी घेऊन जातात.
पण येशू तेथून निघून जातो,
प्रार्थनेसाठी म्हणजे आपल्या देवपित्याशी संवाद साधण्यासाठी येशू दूर डोंगरांत जाण्याचे पसंत करतो किंवा एकांत पत्करतो.
तीच गोष्ट त्याच्या प्रवचनांची. येशूचे सात धन्यवादाचे, डोंगरावरचे ते प्रसिद्ध प्रवचन The Sermon on the Mount मंदिराबाहेरच्या घटना आहेत.
अनेकदा लोकांच्या गर्दीमुळे त्याला प्रवचन देणे अवघड जाते तेव्हा येशू चक्क सरोवरात एका माचव्यात बसतो अन तेथून लोकांशी संवाद साधतो.
विशेष म्हणजे मंदिरात जे सांगितले जात असते त्याच्या अगदी विरुद्ध येशूची शिकवण असते.
`दाताच्या बदल्यात दात, डोळ्याच्या बदल्यात डोळे'' An eye for an eye, a tooth for a tooth अशा जुन्या करारातल्या शिकवणीऐवजी येशू अहिंसेचा, प्रेमाचा संदेश सांगत असतो.
आपल्या शत्रूवर प्रेम करा, एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा अशी त्याची विचित्र शिकवण असते.
वेश्येला, व्यभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून जीवे मारण्याची शिक्षा धर्मग्रंथात असताना येशू म्हणतो '' तुमच्यापैकी जो निष्कलंक असेल त्याने पहिला दगड मारावा!''
अशी धर्मग्रंथांविरुद्ध शिकवण देणाऱ्या येशूला त्यामुळे मंदिरात प्रवेश देणे धर्मपंडितांना सोयीचे नसते.
मंदिरात कुठे उभे राहावे, कशी प्रार्थना करावी, कशी प्रार्थना करू नये याचा एक वस्तुपाठच येशूने दिला आहे. त्यासाठी एक दाखलासुद्धा दिला आहे.
प्रार्थना करताना एकांतात जा, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ते सर्वांच्या नजरेस पडेल, तुम्ही केलेली प्रार्थना सगळ्यांच्या कानी पडेल अशा पद्धतीने प्रार्थना करू नका. जसे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू देऊ नका, अगदी तसेच.
हा, पुन्हा फक्त एकदा येशू देवळात परततो ते हातात चाबूक घेऊनच.
संपूर्ण बायबलमध्ये येशू असा रागावलेला, खवळलेला फक्त यावेळी दिसतो.
त्याला कारण असे असते कि जेरुसलेम मंदिरात पूजाअर्चेसाठी लागणारी साधनसामुग्री विकणारे अनेक विक्रेते असतात. मंदिरात असा बाजार बसलेला पाहून येशू हातात चाबूक घेतो, ते सगळे विक्रीचे सामान उलथुनपालथून टाकतो.
'' माझ्या पित्याचे घर बाजार बनवू नका' असे तो म्हणतो.
देवाचे मंदिर म्हणजेच त्याचे स्वतःचेच घर होते. मात्र धर्मपंडित आणि शास्त्रीबुवा येशूचा हा दावा कसा मान्य करतील?
नंतर काय घडले हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.
कल्पना करा, पृथ्वीतलावर सदेह येशू पुन्हा एकदा अवतरला आणि कालांतराने त्याच्याच नावाने बांधल्या गेलेल्या एखाद्या मंदिरात जाण्याचा त्याने प्रयत्न केला तर?
तुम्हांला काय वाटते?
येशूला त्या मंदिरात स्वगृही म्हणजे आपल्या बापाच्या घरात आल्यासारखे वाटेल?
की येशूला या मंदिरात प्रवेश नाकारला जाईल?
Camil Parkhe, January 24, 2024

Thursday, September 15, 2022

तऱ्हेतऱ्हेच्या संस्कृतींबद्दल ना अभिमान आहे, ना न्युनगंड. 
 


``आजवर सगळ्या अभिनेत्यांनी `नटसम्राट'मधील गणपतराव बेलवळकरांची मुख्य भुमिका साकारलेली सगळी नाटकं मी पाहिली आहेत. अगदी थेट डॉ. श्रीराम लागू यांच्यापासून..'' 
 
नाना पाटेकर यांचा `नटसम्राट' चित्रपट मी पाहून आल्यावर आमच्या इमारतीत राहणाऱ्या एका शेजाऱ्याशी याविषयी बोलत असताना त्यांचं हे वरचं वाक्य ऐकलं तेव्हा मी थक्क झालो होतो. 
 
नाना पाटेकरांच्या `नटसम्राट' विषयी बोलताना '' दत्ता भट आणि शांता जोग यांच्या भूमिका असलेलं 'नटसम्राट' नाटक मी पाहिलं आहे' असं त्यांना मी सांगितल्यावर ``आपण सर्वच अभिनेत्यांनी नटसम्राट गणपतराव बेलवळकरांची भूमिका साकारलेली नाटकं पहिली आहेत'' अशी माहिती त्यांनी पुरवली होती. 
 
हे सद्गृहस्थ तसे माझे समवयस्क, दोनतीन वर्षांनी मला लहानच. ही सर्व नाटकं आपण लहानपणी आणि पुण्यात नंतर कॉलेजात असताना पाहिली होती असं त्यांनी मला सांगितलं आणि मी अंतर्मुख झालो. आम्ही दोघे जवळजवळ एकाच वयाचे असलो तरी आमच्या अभिरुचिंत आणि सवयींमध्ये किती फरक होता ! 
 
श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या आईवडलांसह आणि भावंडांबरोबर पाहिलेलं पहिलं नाटक मला आजही आठवतं. `स्वयंसिद्धा' नाव असलेलं हे नाटक नायिकाप्रधान होतं. आणि त्या नाटकाच्या अखेरच्या भागात नायिका चाबूक घेऊन तिचा छळ करणाऱ्या कुटुंबातील एकाचा समाचार घेते अशी कथा होती. बाजारतळापाशी असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या `ओपन थिएटरमध्ये लोखंडी खुर्च्यांवर बसून (शेवटी असलेल्या भारतीय बैठकीत नाही ) आम्ही हे नाटक पाहिलं होतं.
 
`नटसम्राट' हे मी आमच्या कुटुंबियांसह पाहिलेलं दुसरं आणि अगदी शेवटचं नाटक. त्यानंतर आमच्या घरातले कुणीही नाटकांच्या वाटेला गेलं नव्हतं. 
 
त्याऐवजी मग आम्हा सर्वांना हिंदी आणि मराठी चित्रपट पाहण्याची सवय लागली. वसंत टॉकीज, किशोर टॉकीज यानंतर श्रीरामपूरात रेल्वेपलिकडॆ नवं लक्ष्मी थिएटर सुरु झाले होते. दिलीप कुमारचा डबल रोल असलेला `राम और श्याम' हा तिथं लागलेला पहिला सिनेमा. त्याकाळात हिंदी आणि मराठी चित्रपट अनेक आठवडे चालत. पहिली काही आठवडे या चित्रपटांची तिकिटे ब्लॅकने विकत घ्यावी लागायची किंवा तिकीट खिडकी उघडण्याच्या वेळेआधी काही तास तिथं कुणालातरी रांगेत राहावं लागायचं. प्रत्येकाला फक्त दोन तिकिटं मिळायची, लेडीज लाईन वेगळी असायची पण लेडीज लाईन तशी मोकळीच. 
 
त्याकाळात सुनील दत्त आणि नूतन यांची, सिल्व्हर ज्युबिली हिरो म्हणून नाम कमावलेल्या राजेंद्र कुमारची, शम्मी कपूरची, आणि शशी कपूरची अनेक हिट फिल्म्स आईवडिलांसह मी पाहिली, रेडिओवर या सिनेमांतली गाणी सतत ऐकून आतापर्यंत तोंडपाठ आहेत. 
 
दादा कोंडके यांची `सोंगाड्या’ या चित्रपटापासून नंतर आलेले `पांडू हवालदार’, `एकटा जीव सदाशिव’ अशी सुरुवातीची काही सिनेमे अशीच कुटुंबियांसह पाहिली. दादा कोंडके नंतर द्विअर्थी सिनेमा शिर्षकांकडे आणि संभाषणाकडे वळाले तेव्हा त्यांची सिनेमे पाहणे एकदम बंद झाले. 
 
लहान असल्याने एकट्याने किंवा मित्रांसह पाहणे शक्यच नव्हते. व्ही शांताराम यांचा `पिंजरा' असाच पाहिला. डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा `सामना' सुद्धा पाहिला, त्यावर नंतर पणजीतल्या आमच्या धेम्पे कॉलेजाच्या वार्षिक अंकात परीक्षण सुद्धा लिहिलं, 
 
'आराधना' सिनेमानंतर राजेश खन्ना याचा चढता काळ सुरु झाल्यानंतर मात्र मोठ्या भावांबरोबर हे सिनेमे पाहिले. राजेश खन्नाचा कुठलाही सिनेमा सोडायचा नाही असा त्याकाळी आमचा नियमच होता. 
 
त्याकाळात सर्व घरांघरांत अशीच परिस्थिती होती. अगदी गरीब कुटुंबातील लोकसुद्धा शेवटच्या रांगेतले तिकिटे विकत घेऊन सिनेमे पाहायचेच. त्याकाळात सिनेमा, सर्कस हीच करमणुकीची साधने होती. 
 
आमच्या घराशेजारी असलेल्या बाजारतळापाशी शुक्रवारी आठवडी बाजार भरायचा, त्यादिवशी तिथल्या मोकळ्या जागेवर तमाशाच फड भरायचे. त्यासाठी तिथं तंबू उभारला जायचा. घरापाशी इतक्या जवळ असूनसुद्धा घरातले कुणी किंवा नात्यातले इतकेच नव्हे तर माहितीतले कुणीही या तमाशाला जात नसत. घोगरगाव इथल्या माझ्या मामांच्या घरातले, माझे मामेभाऊ आणि इतर काही जण तमाशा पाहायला जात असावेत असं आता अधुंकसं आठवतं. तमाशा हा प्रकार ग्रामीण लोकांत लोकप्रिय होता, शहरी आणि सभ्य लोकांसाठी तमाशा म्हणजे `करमणुकीचं अश्लील साधन' अशीच भावना होती. 
 
तमाशा लोककलेचे मूळ, इतिहास, या लोककलेच्या प्रयोगांवर मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी घातलेली बंदी वगैरे काही घडामोडी आणि या लोककलेचे सामाजिक स्थान यावर मी एक मोठा लेख लिहिला आहे, पण खूप वर्षांपूर्वी कुठेतरी एकदाच मी तमाशाच्या प्रयोगाला हजर होतो. 
 
आमची संपूर्ण चाळ कुडाच्या भिंती असलेल्या आणि वर पत्र्यांचे छप्पर असलेल्या घरांची होती. आमच्या भिंतीला लागून एका बाजूला मुसलमान शेजार तर दुसऱ्या बाजूला मराठा शेजार होता आणि त्याला लागून दुसरं एक मुसलमान कुटुंब होते. अगदी समोर दुसरे मुसलमान कुटुंब आणि बाकी सगळे शेजारी माळी होते. 
 
हा सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची. या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं आजही आठवतं. 
 
नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती. ख्रिस्ती धर्माचा प्रसार बिगरयहुदी लोकांमध्ये होऊ लागला तेव्हा ख्रिस्ती धर्मातही सुंता परंपरा असावी कि नाही यावेळी बराच उहापोह झाला होता. सेंट पॉल याने ही सामाजिक रीत ख्रिस्ती धर्मियांचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही असे मत दिल्यावर या चर्चेवर पडदा पडला होता. 
 
ख्रिस्ती धर्मांतलं हे इतरांशी मिळतंजुळतं घेणारं अगदी पहिलं सांस्कृतिकरण किंवा Inculturation म्हणावं लागेल ! 
 
दैनंदिन घनिष्ट संबंध असणाऱ्या या कुठल्याही शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरांत मुंज, मंगळागौर असे कार्यक्रम नसायचे. अशा प्रथा असणारे लोक शेजारी असंणाऱ्या दगडी बांधकामाच्या घरांत किंवा इमारतींत राहत असत. 
 
मुसलमान शेजाऱ्यांच्या आणि मित्रांच्या लग्नसमारंभांतल्या आणि इतर कार्यक्रमांतल्या जेवणाची विशेषतः मटणाच्या लाल रस्सा असलेल्या चमचमीत कालवणाची आणि मसालेदार बिर्याणीची सगळेजण नंतर अनेक दिवस तारीफ करत असायचे. 
 
या सगळ्यांचा जातधर्म वेगळा असला तरी या सर्वांचा आर्थिक थर , शिक्षणाची पातळी एकच होती, प्रगतीच्या बाबतीत सगळेच जण धडपडत होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सामाजिक अथवा सांस्कृतिक असमानता अशी नव्हती. 
 
आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानात पुण्यात छापलं जाणारं `सकाळ' हे दैनिक यायचं, त्याशिवाय `स्वराज्य' आणि नाशिकचं सत्यवान नामदेव सूर्यवंशी संपादित 'आपण' साप्ताहिक यायचं, चांदोबा मासिक आम्हा मुलांसाठी. मात्र आसपासच्या सर्वच सुशिक्षित लोकांना कुठेही, न्हाव्याच्या दुकानांत, हॉटेलांत, गल्लीबोळांतील सार्वजनिक वाचनालयांत दैनिकं, साप्ताहिकं दिसली कि वाचायची सवय होती. 
 
जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी श्रीरामपूर सोडले आणि गोव्याला आलो तेव्हा मराठी आणि हिंदी सिनेमे पाहणे एकदम बंद झाले. त्याऐवजी इंग्रजी चित्रपट पाहणे सुरु झाले. विशेष म्हणजे मिरामार इथल्या आमच्या प्री-नॉव्हिशिएटमध्ये चित्रपट पाहिल्यावर त्यावर आम्हा तरुणांमध्ये विविध अंगांमधून चर्चा व्हायची. 
 
आमचे जेसुईट सुपिरियर फादर इनोसंट पिंटो आम्हाला चित्रपटांचे रसग्रहणं कसे करावे याबाबत मार्गदर्शन करायचे. या चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच चित्रपट आम्ही पुन्हा पाहायचो. यालाच फिल्म अप्रेसिएशन म्हणताच असं नंतर कळालं. रॉबिन्सन क्रुसो, बेनहर, टेन कमांडमेंट्स, टू सर विथ लव्ह, असे कितीतरी सिनेमे आणि अकिरा कुरोसावा यांचे विविध चित्रपट याकाळात आम्ही पाहिले. 
 
आजही टिव्हीवर इंग्रजी चित्रपट पाहण्याकडेच माझा अधिक कल असतो. अर्थात खूप वर्षांपासून टिव्हीसमोर बसणे मी टाळत असतो तो भाग वेगळा. 
 
गोमंतकातील हिंदू समाजातून देशातील अभिजात संगीत आणि गायन क्षेत्रांत खूप मोठे योगदान दिलं आहे, मात्र कॅथोलिक समाजातील एकाही व्यक्तीचे याबाबत नाव घेता येणार नाही. गोव्यात अशी सरळसरळ विभागणी होत असते आणि त्याला विविध कारणं आहेत, गोव्यात अनेक कॅथोलिक घरांत एकतरी मुलगा किंवा मुलगी गिटार वाजवत असते आणि जवळजवळ सर्वच मुलं शाळेत आणि शाळेबाहेर फ़ुटबाँल खेळात असतात. गोव्यातल्या कॉलेज जीवनात मीसुद्धा फ़ुटबाँल खूप खेळलो. 
 
पुण्यात `इंडियन एक्सप्रेस’ला रुजू झालो तेव्हा काही महिन्यांतच विजय तेंडुलकरलिखित आणि मोहन आगाशे यांची भूमिका असलेले 'घाशीराम कोतवाल' हे नाटक पाहिलं. सतीश आळेकर लिखित `बेगम बर्वे’ हे नाटकसुद्धा पाहिलं. गोव्यातली कॉलेजेस तेव्हा मुंबई विद्यापीठाशी संलग्न होती. आमच्या बीए अभ्यासक्रमात मराठी विषयात पु ल. देशपांडेंचं 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक होतं. पुण्यात हे नाटकसुद्धा भरत नाट्य मंदिरात पाहिलं. 
 
`इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाच्या आम्हा बातमीदारांनी ही मराठी नाटकं पहिली ती आमचा बातमीदार सहकारी माधव गोखले याच्यामुळं. इतर बातमीदारांमुळं `अलका थिएटर' आणि कॅम्पातल्या वेस्ट एन्ड थिएटरला भरपूर इंग्रजी सिनेमे पाहिले. शेवटी संगत सुद्धा महत्त्वाची असतेच. 
 
लग्नानंतर पिंपरी चिंचवडला स्थायिक झालो, इथं घरापासून दीडशेदोनशे मीटर अंतरावर महापालिकेचं रामकृष्ण मोरे सभागृह आहेत तिथं अगदी वर्षभर नाटकं आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मी तिथं फक्त दोनदाच नाटकाला पत्नीसह गेलो होतो. योगायोगानं दोन्ही नाटकांत भक्ती बर्वे याच मुख्य भूमिकेत होत्या. यापैकी एक नाटक होतं भक्ती बर्वे यांनी दुसऱ्यांदा भूमिका केलेलं पु. ल. देशपांडे यांचं 'ती फुलराणी' आणि दुसरं नाटक होतं ' आई रिटायर होते' 
 
बस्स. माझं मराठी नाटकप्रेम इतकंच राहिलंय. मी पाहिलेली नाटकं केवळ दोन्ही हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी आहेत. 
 
नव्व्दच्या दशकाच्या अगदी सुरुवातीस भाऊ महाराज बोळात राहणाऱ्या पत्रकार मित्र पराग रबडे याच्या नादाने मी सवाई गंधर्व फेस्टिव्हलचे सिझन तिकीट काढले आणि रमणबाग शाळेच्या मैदानात पूर्ण रात्रभर चालणाऱ्या त्या संपूर्ण संगीत महोत्सवाला मी हजेरी लावली. यावेळी उस्ताद झाकिर हुसेन, पंडित हरिप्रसाद चौरासिया, बेगम परवीन सुलताना, गंगुबाई हंगल, पंडित जसराज, सरोदवादक अमजद अली खान, संतूरवादक शिवकुमार शर्मा वगैरे दिग्गजांना पाहण्याची अन त्यांचे त्यांच्या क्षेत्रांतले कसब पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मला मिळाली. 
 
शेवटच्या दिवशी किंवा भल्या पहाटे पंडित भीमसेन जोशी यांना पूर्णवेळ ऐकले. अर्थात संगीताच्या कुठल्याही क्षेत्रातले मला काही काळात नाही मात्र आपण काहीतरी दिव्य, अद्भुत अनुभवत आहोत याची मात्र मला पूर्ण जाणीव होती. 
 
दाद देण्याची पध्दत वेगवेगळी असते. आपल्याकडं केवळ टाळ्याच असतात. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी बल्गेरियात असताना तिथे वेगवेगळ्या शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असायचो. तिथं व्हायोलिन, पियानो वगैरे वादकांनी आपले संगीतवादन संपवलं कि प्रेक्षागृहातले सर्व प्रेक्षक कितीतरी वेळ उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत, टाळ्या संपत नाही तोपर्यंत त्या कलाकाराने विविध दिशांकडं पाहत न कंटाळता कमरेपर्यंत झुकत त्या प्रतिसादाचा स्वीकार करत 
 
एखाद्या पूर्ण संगीत महोत्सवाला उपस्थित राहण्याची ही माझी पहिलीच आणि आतापर्यंतची एकमेव घटना. 
 
काही वर्षांपूर्वी आदितीमुळं घरात एक मोठा किबोर्ड आला आहे, तिच्यामुळं मीसुद्धा तो शिकण्याचा क्लास लावला आणि जिंगल बेलसारखी काही गाणी आणि चर्चमधली काही गायनं मला आता वाजवता येतात, अर्थात हे वादन असतं स्वान्तसुखाय, फक्त स्वतःसाठी ! 
 
पुण्यात जेसुईट फादरांच्या `स्नेहसदन' आश्रमात कुठलासा कार्यक्रम होता त्यावेळी झालेली ही घटना. `स्नेहसदन'चे संस्थापक जर्मन फादर डॉ मॅथ्यू लेदर्ले यांच्या काळापासून येथे एक भलीमोठी समई विविध प्रसंगी वापरली जाते. 
 
`स्नेहसदन'मध्ये गेल्यागेल्या पहिल्यांदा दारासमोरच असलेल्या या समईचेच दर्शन घडते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला समई प्रज्वलन करायचे होते. मी पुढे आलो तेव्हा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मला आधी पायांतले बूट काढण्याची सूचना केली आणि समई पेटवण्याची शिष्टसंमत पद्धतसुद्धा सांगितली 
 
ही प्रथा मला माहित असणं शक्यच नव्हते. 
 
आमच्या घरात समई कधीही नव्हती, दररोज रात्रीच्या अर्धा तास चालणाऱ्या कौटुंबिक प्रार्थनेआधी अल्तारावर दोन मेणबत्त्या पेटवल्या जायच्या. आमच्या घरात अगरबत्तीची पाकिटे दिवाळीच्या वेळी फक्त फटाके फोडण्यासाठीच यायची. 
 
आणि ही मागच्या आठवड्यातली घटना. स्वतःसाठी वाढून जेवायला बसलो होतो. मी स्वतःच स्वयंपाक केला होता. ताटात भात घेतला, त्यावर वरण टाकलं आणि आणि एकदम आठवलं. सकाळी मेथीचे पराठे बनवल्यावर जॅकलीनने त्यावर तुपाची हलकीशी धार सोडली होती. मी लगेच तुपाची ती बरणी घेतली आणि चमच्यानं ते तूप गरमागरम भातावर टाकलेल्या वरणावर टाकलं. खरं तर थोडं जास्तच टाकलं (हे नंतर खाताना लक्षात आलं ) आणि मग जेवण केलं. 
 
लहानपणी आमच्या घरी आणि तांदूळ पिकत नाही अशा अनेक ठिकाणी भात फक्त सणासुदीलाच म्हणजे पुरणपोळी, आमटी आणि भाजी कुरडया असं जेवण असल्यावर व्हायचा किंवा कुणी आजारी असलं तर हलका आहार म्हणून भात शिजला जायचा. दररोजच्या जेवणात भातावर साजूक तूप आणि लिंबाची फोड असा थाट केवळ पुस्तकात वाचला होता. 
 
हा, पुरणपोळी, गुळवणी वगैरे असल्यावर त्या दिवशी दुकानातून थोडं तूप आणलं जायचं आणि गरमागरम गुळवणीवर तुपाची धार सोडली जायची हे मात्र आठवतं. गुळवणी म्हणजे गुळापासून बनवलेला गरमागरम पातळ रसा. 
 
तर त्यादिवशी स्वतः भात आणि वरणावर तूप टाकून जेवल्यावर जाणवलं, आमच्याकडं ही प्रथा कधीच नव्हती ! 
 
भात वरण आणि लिंबाच्या फोडीवरुन आठवलं. पूर्ण वेळ सेवेत असणारे दोन पत्रकार दुपारी नेमकं दोन ते चारपाच या वेळात कार्यालयात नसायचे. संपादकांनी खूप प्रयत्न करून आणि फतवे काढून, धमक्या देऊन सुद्धा या बाबतीत काही सुधारणा झाली नाही. काही कार्यक्रम किंवा एखादी घटना असली तरच हे दोन्ही पत्रकार महाशय हजर असायचे. कामावर येताना संपादक आणि आमच्या सारखी मंडळी बरोबर डबा आणायची तसं त्यांनीही करावं असा आदेश दोघं झुडकावून लावत असत. 
 
त्यावेळी हे दोघे `दुपारच्या भात वरण, त्यावर तुपाची धार आणि लिंबाची फोड’ या जेवण्याच्या मेंन्यूबाबत आणि त्यानंतरच्या वामकुक्षीबाबत आग्रही असल्यानं ऑफिसात जेवणाचा डबा आणत नाही असं संपादकांनी भर मीटिंगमध्ये म्हटल्याचं आठवतं. 
 
यावरुन गोव्यातील खाद्यसंस्कृतीबाबत. गोव्यात शाळाकॉलेजात आणि नोकरीनिमित्त असताना आठवड्यातून दररोज दुपारी आणि रात्री केवळ बिफ असायचं, एकदोनदा मासळी असायची. मात्र बिफची एक डिश कधीही रिपीट होत नसायची, आज चिली-फ्राय, उद्या कटलेट्स, परवा बिफ स्टिक, तेरवा बटाटा (पोर्तुगीजांची देणगी) घालून करी आणि रविवारी शाकुती. दररोज दुपारी भात आणि सकाळ मऊ पाव आणि रात्री मध्यभागी चिर, वरुन कडक आणि आत मऊ असलेला उंडो पाव ! 
 
ख्रिसमस आणि ईस्टर या फेस्तांना पोर्क सोरपोतर किंवा विंदालू!
 
एक ताजा कलम म्हणजे गेली कितीतरी वर्षे या अन्नपदार्थांवरील वासना उडाल्यामुळे बिफ आणि पोर्क खाणे मी पूर्णतः बंद केले आहे, याला अपवाद फक्त माझा युरोपचा आणि इतर परदेशांतील दौरा होता. 
 
मला वाटतं ही आहे विविध जातिधर्मांच्या विविध सामाजिक, आर्थिक थरांतल्या लोकांची संस्कृती आणि कलाव्यववहार. 
 
खूपदा आपल्या शेजाऱ्यांची, मित्रांची वा कार्यालयीन सहकाऱ्यांची अशी संस्कृती आहे याची एकमेकांना जाणीवही नसते, या संस्कृतीची ओळख करुन घेण्याची इच्छा होणे तर फारच लांब राहिलं. 
 
अलीकडेच लोकसत्तानं रविवारच्या अंकांत पाच तज्ज्ञांचे संस्कृतीच्या विविध अंगांबाबत लेख छापले. या पाचही लेखांच्या लिंक्स उपलब्ध आहेत. या लेखांवरुन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गेले काही दिवस मोठी धुमश्चक्री किंवा चिचारमंथन चालू आहे. विविध गट दुसऱ्या, तिसऱ्या गटाचं म्हणणं खोडून काढतायत. 
 
ही चर्चा वाचताना माझ्या लक्षात आलं कि अनेक मोठमोठी नावं घेतली जातायत, यापैकी अनेक नावं मी गेली कित्येक वर्षे नुसती ऐकूनच आहे, त्यांच्या कलाव्यवहारांकडं, साहित्याकडं आणि नाटकांकडं मी कधी वळलो नाही. याला सांस्कृतिक करंटेपणा म्हटलं तरी चालेल पण ती वस्तुस्थिती आहे. 
 
विविध क्षेत्रांतले कलाव्यवहार समाजाच्या केवळ तीनचार टक्के लोकांत चालतात असं शेवटच्या लेखात महेश एलकुंचवार यांनी म्हटलं आहे. `सर्वसामान्य माणूस व कलाव्यवहार केवळ एकमेकांपासून दूरच नाहीत, तर त्यांना एकमेकांशी काही देणेघेणे नाही’ असं त्यांचं एक वाक्य आहे. साहित्यप्रकाराचा काही प्रमाणात अपवाद सोडला तर मग मी स्वतः या सामान्यजनांत मोडतो हे माझ्या लक्षात आलं. 
 
मात्र दुसऱ्याच्या चालीरिती, भिन्न मते आणि संस्कृतीबाबत आदर तर ठेवायला हवा. 
 
या विभिन्न, तऱ्हेतऱ्हेच्या संस्कृतींबद्दल ना अभिमान बाळगण्याची गरज आहे, ना न्युनगंड. 
 
 
Camil Parkhe, September 14, 2022