Did you like the article?

Showing posts with label Anupama Uzgare. Show all posts
Showing posts with label Anupama Uzgare. Show all posts

Thursday, November 27, 2025


ऐंशीच्या दशकाच्या मध्यात रशिया-बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन मी गोव्याला परतलो ते पत्रकारितेच्या व्यवसायातील दोन अतिशय महत्त्वाची आयुधे घेऊन.

पणजी येथे `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात क्राईम, मुंबई हायकोर्टाचे गोवा खंडपीठ आणि एज्युकेशन कॅम्पस या बिट्स मी हाताळत असताना मला आणि इतर काही सहकाऱ्यांना आमच्या ऑफिसात बसण्यासाठी स्वतंत्र लाकडी टेबल किंवा लाकडी खुर्ची नव्हती.
बसायची जी काही व्यवस्था होती ती सामाईक होती.
त्याचप्रमाणे बातम्या टाईप करण्यासाठी माझ्यासाठी वेगळा असा टाईपरायटरपण नव्हता.
एका जाडजूड आकाराच्या आणि वजनदार गोदरेज कंपनीच्या टाईपरायटरवर मी, ऑफिसातील काही उपसंपादक आणि उशिरा संध्याकाळी अर्धवेळ असलेला स्पोर्ट्स रिपोर्टर काम करत असत.
आता परदेशातून येताना मी बरोबर एक नाजूक, वजनाने अतिशय हलका आणि पाचसहा इंचांची रुंदी असलेला रेमिग्टन कंपनीचा पोर्टेबल टाईपरायटर आणला होता.
रशियन ऐरोफ्लोट विमानाने मॉस्कोतून मी दिल्ली विमानतळावर उतरलो तेव्हा माझ्या थ्री-पिस सुटावरील ओव्हरकोटवर गळ्याभोवती घातलेला एक रशियन-मेड छोटासा कॅमेरासुद्धा होता.
आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना बल्गेरियात प्रशिक्षणाच्या काळात छोटासा पॉकेटमनी दिला होता, त्यातून मी ही माझ्या जीवनातली एक अतिशय मौल्यवान खरेदी केली होती.
या दोन उपकरणांचा मी पुढील दहाबारा वर्षे भरपूर वापर केला. पत्रकारितेतील ही दोन वैयक्तिक उपकरणे बाळगणारा त्या काळात गोव्यातला मी एकमेव बातमीदार होतो.
त्यानंतरसुद्धा तीनचार वेळेस नवनवीन कॅमेरे खरेदी केले. बातमीदारी करताना फोटोग्राफर नसल्यास स्वतःच छायाचित्रे घ्यावी हा त्यामागचा हेतू.
त्या जुन्या काळात फोटोग्राफ घेणे, त्यांची प्रिंट्स घेणे हा खूप खर्चिक मामला असायचा.
जग दुसऱ्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात `इंडियन एक्सप्रेस'मध्ये बातमीदार असताना मराठी साहित्यिकांचा एक कार्यक्रम मी कव्हर केला.
मला त्या कार्यक्रमाची असाईनमेन्ट नसताना स्वतःहून मी या कार्यक्रमाला गेलो होतो. याचे कारण तेथे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता.
सूर्यवंशी हे सत्तरच्या दशकात नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते.
मी दहावीला असताना माझ्या दोन लघुकथा 'सूर्यवंशी यांनी `आपण' मध्ये बाल सदरात छापल्या होत्या आणि त्यानंतर श्रीरामपूरच्या माझ्या घराच्या पत्त्यावर पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पाठवल्या होत्या.
पत्रकारितेच्या माझ्या भावी व्यवसायातील ही पहिलीवहिली कमाई.
तर त्या दिवशी सूर्यवंशी यांना पुरस्कार दिला जात असताना मी काही छायाचित्रे घेतली.
व्यासपीठावर इतर जण होते मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे इतर चार माजी संमेलनाध्यक्ष :
पुण्यातल्या नाना पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य विजया श्यामराव पुणेकर, कर्वे रोडवरील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतकुमार त्रिभुवन, नगरच्या सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंट (सीएसआरडी) चे संचालक आणि `ज्ञानोदय' मासिकाचे संपादक प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा आणि कवी निरंजन उजगरे.
दुसऱ्या दिवशीच्या `इंडियन एक्सप्रेस'च्या न्यूजलाईन मध्ये या कार्यक्रमाची बातमी मी घेतलेल्या छायाचित्रासह माझ्या नावानिशी प्रसिद्ध झाली.
स. ना. सूर्यवंशी यांची जयंतकुमार त्रिभुवन आणि `निरोप्या' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड यांनी या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मी शब्दबध्द केलेला लेखसुद्धा `निरोप्या' मासिकात प्रसिद्ध झाला.
या दोन्हींची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
हे फोटो मी घेतले, कार्यक्रमाच्या बातम्या आणि लेख लिहिले आणि नंतर ते मी विसरून गेलो.
या पाचही मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या एकत्रित फोटोच्या रुपाने माझ्याकडे एक किती मौल्यवान ऐवज राहिला आहे हे मला खूप काळानंतर कळाले.
या पाचही साहित्य संमेलनाध्यक्षांपैकी आज कुणीही हयात नाही.
याआधीही विविध संमेलनांच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र आले होते, मात्र त्यांचा असा एकत्रित फोटो कुठेही नसावा.
हा फोटो किती दुर्मिळ आणि त्यामुळे अमूल्य आहे याची जाणीव मला अलीकडच्या काळात प्रकर्षाने झाली.
नूतन २०२६ वर्षांच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यांत सातारा येथे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचप्रमाणे सत्ताविसावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसईचे कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होत आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन एक शतकापूर्वी १९२७ साली नाशिक शहरातच भरले होते हे मराठी साहित्य विश्वात अनेकांना माहिती नसेल.
`स्मृतिचित्रे' कार लक्ष्मीबाई टिळक नागपुरातल्या १९३३सालच्या चौथ्या महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
तर या दोन्ही आगामी साहित्य संमेलनांच्या निमित्ताने गेल्या शतकातील मराठी साहित्य संमेलनांचा संक्षिप्त आढावा घेणारे आणि २००५ ते २०२२ या काळात झालेल्या पंधरा ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या संमेलनाध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे संकलन मी केले आहे.
या आधीच्या काळातील म्हणजे १९२७ ते २००१ सालापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील श्यामसुंदर आढाव यांनी आपल्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात संकलीत केली आहेत.
माझ्या या पुस्तकाची सुरुवात होते ती मुळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना १८८५च्या मराठी ग्रंथकारांच्या दुसऱ्या संमेलनास आपण येणार नाही असे सांगणारी, विद्रोहाची भुमिका घेणाऱ्या जोतिबा फुले यांच्या पत्रापासून.
या पुस्तकाची संहिता चेतक बुक्सचे कुणाल हजेरी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर या पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांध्यक्षांचा हा फोटो कालच मी माझ्या पोतडीतून शोधून काढला आहे.
असाच एकूण पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांचा आणखी एक दुर्मिळ फोटो मला डॉ अनुपमा निरंजन उजगरे यांच्या सौजन्याने मला मिळाला आहे.
वसईत २०१९ साली झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्र जमले होते.
ते होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक आंग्रे, डॉ. नाझरेथ मिस्किटा, फादर मायकल जी. आणि स्वतः अनुपमा उजगरे.
या घडीला या सर्वांचे वयमान अवघे सत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यान.
पाच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष एकत्रित येणे हा तसा एक दुर्मिळ योग आहे याची जाणीव होऊन अनुपमा उजगरे यांनी कुणाला तरी हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची विनंती केली होती.
त्याबद्दल धन्यवाद अनुपमाताई !
मराठी साहित्य संमेलनांविषयीच्या माझ्या या आगामी पुस्तकातील हे दोन फोटो महत्त्वाचे आकर्षण असतील याबद्दल शंकाच नसावी.
Camil Parkhe




Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025