Did you like the article?

Showing posts with label Khristpuran. Show all posts
Showing posts with label Khristpuran. Show all posts

Thursday, April 6, 2023

कुठल्याही घटनांकडे आणि व्यक्तीकडे नव्या उपलब्ध माहितीनुसार पाहायला हवे,

 सत्तरच्या दशकात आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांत प्राचीन काळापासून तो थेट अर्वाचीन काळातल्या विविध विषयांवर आणि व्यक्तींवर धडे होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास इतिहास आणि मराठी भाषा यामध्ये मध्ययुगीन काळापासून म्हणजे महानुभाव पंथाच्या स्वामी चक्रधर यांच्या ` लिळाचरित्र’' पासून तो त्या काळातल्या हयात असलेल्या अनेक लोकांविषयी आणि लोकांचे लेख या पाठ्यपुस्तकांत होते. स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, इरावती कर्वे (परिपूर्ती) दुर्गा भागवत, विनायक दामोदर सावरकर, आनंदीबाई शिर्के, वि द घाटे वगैरेंचे लेख होते. संत कवी आणि पंत कवीच्या रचना पद्म विभागात होत्या

पद्म विभागात केशवसुतांपासून भा रा तांबे, बा भ बोरकर, नारायण वामन टिळक (क्षणोक्षणी पडे.), बा. सी. मर्ढेकर (गणपत वाणी, पिपात मेले ओल्या उंदिर) असे नामवंत कवी होते. गोव्यात माझ्या कॉलेजातल्या मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात नारायण सुर्वे यांच्या `ऐसा ग मी ब्रह्म' आणि `माझे विद्यापीठ' या काव्यसंग्रहांचा समावेश होता.
नामदेव ढसाळ वगैरेचा नंतरच्या काळात उदय झाला. मराठी आणि संपूर्ण भारतीय साहित्यात क्रांती करणाऱ्या ढसाळ यांच्या कविता आणि काव्यसंग्रह आता शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत असतात कि नाही याबाबत मला माहिती नाही.
पण या शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत पोर्तुगीज इंडियात म्हणजेच गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनीं रचलेल्या `ख्रिस्तपुराण' या महाकाव्याविषयी मी एकही ओळ वाचली नव्हती.
याचे कारण बहुधा हे मराठी महाकाव्य पोर्तुगीज गोव्यात चक्क रोमन लिपीत छापले छापले गेले होते. मराठीतले हे पहिले मात्र रोमन लिपीत छापले गेलेले पुस्तक (इ स १६१६). पोर्तुगीजांनीं स्थानिक भाषांची आणि संस्कृतीची गळचेपी करायला सुरुवात केल्याने या महाकाव्याकडे गोव्यात आणि महाराष्ट्रातसुद्धा दुर्लक्ष झाले. हे महाकाव्य देवनागरी लिपीत आणले ते अहमदनगरच्या शांताराम बंडेलू आणि पुण्यातील प्रसाद प्रकाशनाच्या य. गो. जोशी यांनीं १९५६ साली. तोपर्यंत गोवा पोर्तुगिजांच्याच ताब्यात होता.
थॉमस स्टीफन्स मराठी भाषेची स्तुती खालील शब्दांत वर्णिली आहे
" जैसी हरळांमाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा निळा |
तैसी भाषांमाजी चोखळा | भाषा मराठि ||
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी | की पदिमळांमजी कस्तुरी
तैसी भाषांमाजि साजिरी | मराठिया ||
पाखिया माजी मयोरू | वृखियांमाजि कल्पतरू |
भाषांमाजि मानु थोरु | मराठियेसी ||
तारांमध्ये बारा रासी | सप्तवारांमाजि रवी शशी |
या दीपाचेआ भाषांमध्ये तैसी | बोली मराठिया || "
ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या पुस्तकात फादर स्टीफन्स यांच्या या काव्यपंक्ती मुखपृष्ठावर आहेत.
आता अशी भाषाशैली असलेले आणि सतराव्या शतकात लिहिले गेलेले मराठी महाकाव्य शाळा-कॉलेजांत शिकवले गेले पाहिजे कि नाही ?
` विज्ञानात `स्टेट्स को ‘किंवा `जैसे थे’ स्थिती कधीच नसते. नवे संशोधन आधीच्या संशोधनाची पुढची पायरी असते. नवनवे संशोधन येते, तसे आपले व्यक्ती, जुन्या घटना याविषयीचे आपले मत बदलत जाते. त्यासाठी इतिहासात सतत खोदत राहावे लागते. मागे मी लिहिलं होते कि गोव्यात मी तत्त्वज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत होतॊ तेव्हा महात्मा जोतिबा फुले यांचा विचार आमच्या कुठल्याही विद्याशाखेच्या अभ्यासक्रमातच नव्हता.
याचे कारण म्हणजे जोतिबा फुले यांचे पहिलेवहिले आधारभूत धनंजय कीरकृत चरित्र लिहिले गेले ते १९६४ साली, तेसुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी धनंजय कीर यांचे याबाबत संभाषण झाल्यामुळे. जोतिबांच्या मृत्यूनंतर सात दशकांनी. पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी त्याआधी १९३७ साली एक छोटेखानी मात्र अत्यंत मोलवान असे जोतिबांचे चरित्र लिहिले होते.
जोतिबांकडे संशोधकांचे आणि विचारवंतांचे झालेले हे दुर्लक्ष अलीकडेच माझ्या लक्षात आले आणि ही जाणिव अचंबित करणारी होती.
महाराष्ट्रात आणि संपुर्ण भारतातही विदुषी आणि प्रकांड पांडित्यपण असलेल्या अगदीच मोजक्या, एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या महिला आहेत. क्षणभर ही नावे पटकन आठवतात का पाहा. या मोजक्या विदुषींमध्ये पंडिता रमाबाई हे नाव अग्रस्थानी आहे. इंग्रजी, संस्कृत, कन्नड, मराठी वगैरे भाषांवर प्रभुत्व असलेल्या रमाबाईंनी अनेक पुस्तके इंग्रजीत लिहिली आहेत जी आजही वाचली जातात, संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात.
इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशनात सहभागी होणाऱ्या पहिल्या काही महिलांमध्ये असणाऱ्या भारतातल्या या आद्य महिला ख्रिस्ती मिशनरीचे पहिले आधारभूत चरित्र कुणी लिहिले हे ठाऊक आहे का?
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी !
मात्र या पंडिता रमाबाई यांच्या चरित्रावर किंवा लिखाणावर आधारित एकही धडा माझ्या पाठ्यपुस्तकांत कधीही नव्हता, आता आहे का ? रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून त्यांची खूप परवड आणि उपेक्षा झाली, वैतागून बाईनीं मग पुणे सोडून दूर केडगावात आपले कार्य चालू ठेवले. पंडिता रमाबाईंच्या कार्यांची उपेक्षा आजही चालूच आहे, कारण अर्थातच तेच, जुनेच आहे.
मागे मी एकदा इरावती कर्वे यांच्यावर `अक्षरनामा' मध्ये लेख लिहिला होता. त्यामध्ये मी म्हटले होते कि १९४५ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या इरावतीबाईंच्या `परिपूर्ती' या पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या निघालेल्या आहेत, त्यावरून या पुस्तकाच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकेल.
त्यावर इथेच प्रतिक्रिया सदरात एकाने म्हटले कि पुस्तकांच्या आवृत्या आणि लोकप्रियता याचा असा संबंध लावणे या पुस्तकाच्या बाबतीत तरी लागू होणार नाही याचे कारण म्हणजे हे पुस्तक अनेकदा विद्यापीठांत अभ्यासक्रमाला होते. या कारणाने वेळोवेळी या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत गेल्या !
सत्तरच्या दशकात त्याकाळात मध्यमवयाचें पण त्यांच्या ऐन उमेदीत असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्यावरचे धडे आमच्या पाठ्यपुस्तकांत होते. सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी सांगितले कि गेली अनेक वर्षे सामाजिक चळवळीत असलेल्या आता नव्वदीत असलेल्या डॉ बाबा आढाव यांच्याविषयी एक धडा उच्च माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सद्या आहे. आनंदाची बाब आहे.
प्रकांड पंडित असलेले कॉम्रेड शरद पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार किंवा त्यांच्याविषयीचे लेख पाठ्यपुस्तकांत असतात का? आता लगेच नव्हे, पण आगामी काळात या लेखांचा तसेच नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा शालेय आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांत अंतर्भाव केला जाऊ शकतो काय?
इतिहासात उपलब्ध माहितीनुसार काही व्यक्तींचीच थोरवी गायली जाते, नव्या संशोधनामुळे अनेक मतांची, पूर्वग्रहांची, पूर्वी थोर मानल्या गेलेल्या व्यक्तींची पडझड होते. पूर्वी नाकारले गेलेल्या, उपेक्षित असलेल्या व्यक्तींची नव्याने थोरवी पटते.
महात्मा जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची दुर्लक्षित असलेली समाधी शोधून काढली, महाराजांवर पहिलावहिला पोवाडाही लिहिला. त्यामुळे त्याकाळातल्या इतर लोकनेत्यांचेसुद्धा शिवाजी महाराजांकडे लक्ष गेले आणि मग शिवाजी महाराजांच्या चरित्र आणि कार्यावर नव्याने प्रकाशझोत पडू लागला.
जोतिबा फुले यांनी १८५७च्या बंडाबाबत असाच आगळावेगळा, अपारंपरिक दृष्टिकोन घेतला होता.
इतिहासांत आणि सामाजिक जीवनांत असेच सातत्याने व्हायला हवे.
काही वेळेस हे दुर्लक्ष, ही अपेक्षा अज्ञानातून म्हणजे उपलब्ध माहितीच्या अभावी तर अनेकदा अगदी ठरवून, सहेतुक असते. यापैकी दुसरा प्रकार वाईट आणि अन्यायकारक आहे.
सद्य परिस्थितीत अशा नजरेने डोकावले तर खूप काही पूर्वग्रह आणि खूप काही अवास्तव मतधारणा उघडकीस येतील.
आणि वेळोवेळी असे होणे गरजेचे आहे
शालेय अभ्यासक्रमात १९०५ सालच्या बंगालच्या संदर्भात त्यावेळच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनबाबत अतिशय प्रतिकूल मत बनवण्यात आले होते. कर्झन चार काळ कर्दन काळ मानला जाई. नंतर लक्षात आले भारतात सर्वात उत्तम काम केलेल्या लॉर्ड विल्यम बेंटिंगसारख्या गव्हर्नर जनरल मध्ये लॉर्ड कर्झनचाही समावेश होतो. चार वर्षांपूर्वी `सकाळ टाइम्स' च्या वतीने बातमीदार म्हणून एका `जंकेट असाईनमेंट'वर म्हणजे मौजमजेच्या कामगिरीवर कोलकात्याला गेलो होतो तेव्हा तिथे एका प्रमुख स्मारकात लॉर्ड कर्झनचा पूर्णाकृती पुतळा पाहिला आणि यावर शिक्कामोर्तब झाले.
लॉर्ड कर्झनबरोबरच इतरही काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा असाच उल्लेख करता येईल.
कुठल्याही घटनांकडे आणि व्यक्तीकडे नव्या उपलब्ध माहितीनुसार पाहायला हवे, चिकित्सक वृत्ती जोपायला हवी आणि त्यानुसार आपण आणि आपली मते बदलायला हवी. जसजसे नवे लेखक, नवे लिखाण, नवी माहिती समोर येते तसतशी आपले पूर्वग्रह, आवडीनिवडी बाजूला ठेवायला हवेत. संजय मेणसे यांचे ` ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे ’ हे पुस्तक वाचल्यानंतर हे मला विशेषतः जाणवले.
अर्थात हे पुस्तक वाचून पुलंबद्दल माझा आदर तीळभरही कमी झाला नाही. याचे कारण म्हणजे अनेकदा मी स्वतः सुद्धा माझा समोरचा वाचक लक्षात ठेवून तसे आवडणारे किंवा अप्रिय नसणारे लिखाण करत असतो हे मेणसे यांचे पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आले. त्यामुळे यासंदर्भात अगदी याउलट आपल्या स्वतःच्या संस्कृतीबाबत ठाम भूमिका घेणाऱ्या, प्रतिवाद करणाऱ्या औरंगाबादचे शाहू पाटोळे यांचे निश्चितच कौतुक वाटते.
`बहिष्कृत’ आणि `त्रिशंकू’ कादंबऱ्या लिहिणारे अरुण साधू, मालती बेडेकर (विभावरी शिरुरकर), `शाळा’ लिहिणारे मिलिंद बोकील, `बनगरवाडी’ लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांचे साहित्य अब्राह्मणी आहे असे मेणसे यांनी म्हटले आहे. तर `स्वामी’ आणि `श्रीमान योगी’ लिहिणारे रणजित देसाई, अशा ब्राह्मण नसलेल्या लेखकांचीसुद्धा मेणसे यांनी ब्राह्मणी मानसिकतेच्या लेखकांत गणना केली आहे.
इतकेच नव्हे तर लेखक बहुजन आणि नायक बहुजन असलेल्या भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' कादंबरीचा आशय मात्र ब्राह्मणी असे धक्कादायक विधान मेणसे करतात. बहुजन समाजातले असलेल्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा आशय पूर्णपणे ब्राह्मणीच असतो हे मेणसे यांचे असेच आणखी एक दुसरे विधान आहे. अशी कितीतरी उदाहरणे या पुस्तकात आहेत.
एखाद्या ऐतिहासिक घटनेबाबत किंवा व्यक्तींबाबत पुर्वग्रह असणे साहजिकच आहे. मात्र बदललेल्या , नव्याने समोर आलेल्या पुराव्यांनुसार हे पूर्वग्रह आणि मते बदलायला हवीत आणि त्यानुसार योग्य ती पावले उचलायला हवीत. कुणाही व्यक्तींवर अगदी ठरवून अडगळीत ठेवले, त्यांच्यावर अन्याय केला आणि काही व्यक्तींना निष्कारण, देव्हाऱ्यात किंवा अल्ट्रारावर ठेवले असे होता कामा नये.
Camil Parkhe, March 29, 2023