Did you like the article?

Showing posts with label Konkani. Show all posts
Showing posts with label Konkani. Show all posts

Thursday, September 22, 2022

 फादर थॉमस स्टीफन्स ‘क्रिस्तपुराण’

जैसी हरळांमाजी रत्नकिळा की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । की पदिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी । मराठिया ॥
पखिया माजी मयोरू । वृखिआंमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानु थोरू । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमाजी रवी शशी ।
या दीपीचेआ भाषांमध्ये तैसी । बोली मराठिया ॥
 
मराठी भाषेची अशा प्रकारे स्तुती करून सतराव्या शतकाच्या सुरुवातीस फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ‘क्रिस्तपुराण’ या ग्रंथाची निर्मिती केली. ‘ओं नमो विश्वभरिता’ या नमनापासून सुरू होणारे हे पुराण पुढील दहा हजार ओव्यांमध्ये आपला हा एतद्देशीय थाट कायम राखते.
 
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या तिशीनंतर गोमंतकात आलेल्या फादर स्टीफन्स यांना पूर्णतः देशी अवतारातील क्रिस्तपुराणाची निर्मिती शक्य झाली हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. 
 
क्रिस्तपुराण वाचताना या ग्रंथाची भाषाशैली, म्हणी आणि वाक्‌प्रचार, हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अनेक संदर्भांचा मुबलक वापर यामुळे परदेशातून आलेल्या धर्माचा ग्रंथ आहे असे जाणवतदेखील नाही. 
 
अकराव्या शतकात महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रापासून सुरू झालेल्या ग्रांथिक मराठी भाषेच्या इतिहासातील क्रिस्तपुराण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
.
बायबलमधील अनेक संकल्पना, ग्रीक पारिभाषिक शब्द, बायबलच्या जुन्या आणि नव्या करारामधील अनेक घटना मध्ययुगीन काळातील गोमंतकीय सामान्य जनतेला समजतील अशा शब्दांत सांगण्याचा यशस्वी प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये वाढलेल्या नवख्रिस्ती लोकांची धर्मग्रंथाची गरज लक्षात घेऊन फादर स्टीफन्स यांनी क्रिस्तपुराणाची रचना केली.
.
फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इंग्लंडमधील विल्टशायर परगण्यात बुशटन गावी 1549 साली झाला. थॉमस स्टीफन्सने 20 ऑक्टोबर 1575 रोजी रोम येथे संत इग्नाती लोयोलाकर यांनी स्थापन केलेल्या येशूसंघात प्रवेश केला. फादर थॉमस स्टिफन्स हे गोव्यात येणारे पहिले ब्रिटिश जेसुईट फादर. 24 ऑक्टोबर 1579 रोजी थॉमस स्टीफन्सने आपले मिशनकार्य सुरू केले.
 
फादर स्टीफन्स यांचे गोव्यातील सासष्टी भागात धर्मगुरुपदाचे कार्य सुरू झाले. गोव्यातील रायतूर येथील येशूसंघाच्या कॉलेजचे रेक्टर म्हणून 1590 ते 1594 या काळात त्यांनी काम पाहिले. वसईतील 1611-12 या काळातील मराठी अध्यापनाचा काळ वगळता स्टीफन्स यांनी भारतातील आपली सर्व हयात गोव्यातच घालविली. 35 वर्षे त्यांनी मडगाव, बेनावली आणि नावेली या भागात धर्मगुरू म्हणून काम केले.
 
`दौत्रिना क्रिस्ता’ किंवा `क्रिस्तीधर्मतत्त्वसार, आर्त द लिंग्वा कानारी हे कोकणी भाषेचे व्याकरण आणि क्रिस्तपुराण यांचा फादर स्टीफन्स यांच्या साहित्यसंपदेत समावेश होतो.
या साहित्यकृतीपैकी दौत्रिना क्रिस्ता हे पुस्तक कॅथेकिझम स्वरूपाचे म्हणजे कॅथोलिक धर्माची मूळ तत्त्वे समजावून सांगणारे आहे. मात्र गोमंतकीय कोकणीचे हे पहिलेच ज्ञानपुस्तक असल्याने भाषिक इतिहासाच्या संदर्भात हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. दौत्रिना क्रिस्ता लिंग्वा ब्रामण कानारी या शीर्षकाखाली हे पुस्तक सर्व प्रथम 1622 साली छापण्यात आले. 
 
या आवृत्तीची एक प्रत सध्या पोर्तुगालमधील लिस्बन सरकारी ग्रंथालयात असून दुसरी प्रत रोमच्या व्हॅटिकन ग्रंथालयात आहे.
 
कोकणी भाषेतील पहिले व्याकरण लिहिण्याचे श्रेय फादर स्टीफन्स यांना दिले जाते. ‘आर्त द लिंग्वा कानारी’ या नावाने हे व्याकरण प्रसिद्ध आहे. ‘कानारी’ म्हणजे कन्नड भाषा नव्हे. त्याकाळात कोकणी भाषा कानारी म्हणून ओळखली जात असे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची भाषा म्हणजे कानारी भाषा असे स्पष्टीकरण इतिहाससंशोधक अ.का. प्रियोळकर यांनी दिले आहे. अतिपूर्वेकडील भाषेचे एका युरोपियन व्यक्तीने रचलेले हे पहिलेच व्याकरण. 
 
‘क्रिस्तपुराण’ ही फादर थॉमस स्टीफन्स यांची सर्वात महत्त्वाची साहित्यकृती. पूर्णतः भारतीय पारंपरिक शैलीत लिहिलेल्या या क्रिस्तपुराणामुळे फादर स्टीफन्स यांचे नाव मराठी भाषेच्या इतिहासात चिरंतन राहणार आहे. या पुराणाचे लेखन फादर स्टीफन्स यांनी 1614 साली पूर्ण केले आणि या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1616 साली छापण्यात आली.
त्याकाळात देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित न झाल्याने हा ग्रंथ त्यांना रोमन लिपीत छापावा लागला. 
 
क्रिस्तपुराण ज्यांच्यासाठी लिहिले गेले त्यांना मूळचा आशियाई असणाऱ्या परंतु पाश्चात्यांमार्फत भारतात पोहोचलेल्या ख्रिस्ती धर्माचा परिचय व्हावा यासाठी फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाला पूर्ण भारतीय पेहराव दिला. या पेहरावामुळे ख्रिस्ती धर्माची ओळख करून घेण्यास स्थानिक लोकांना अडचण आली नाही. 
 
उदा. स्वर्ग, सैतान, नरक या संकल्पना स्थानिक जनतेला समजणे शक्यच नव्हते. फादर स्टीफन्स यांनी त्यासाठी वैकुंठ, देवचर, यमपुरी अशा सर्वांनाच सुपरिचित असलेल्या संकल्पनांचा वापर करून वाचकांशी अधिक जवळीक साधली. 
 
येशूच्या नावाचे देशीकरण करण्यासाठी या ग्रंथकर्त्याने स्वामी, तारक, आनंदनिधी, परमेश्वर, जगद्गुरू, मोक्षराज, गोसावी अशा अनेक उपाधींचा आधार घेतला.
फादर स्टीफन्स यांनी आपल्या पुराणाची सुरुवात पुढील ओवींनी केली आहे.
 
ओ नमो विश्वभरिता । देवा बापा सर्वसमर्था ।
परमेश्वरा सत्यवंता । स्वर्ग पृथ्वीचा रचणारा ॥1॥
तूं ॠद्धिसिद्धिचा दातारू । कृपानिधी करूणा करू
तूं सर्व सुखाचा सागरू । आदि अंतु नातुडे ॥2॥
तूं परमानंदु सर्वस्वरूपु । विश्वव्यापकु ज्ञानदिपु ॥
तूं सर्वगुणी निर्लेपु । निर्मळू निर्विकारू स्वामिया ॥3॥
तूं अदृष्टु तूं अव्यक्तू ।समदयाळू सर्वप्राप्तु ।
सर्वज्ञानु सर्वनितीवंतू । एकूची देवो तूं ॥4॥
तू साक्षात परमेश्वरू । अनादसिद्धू अपरांपरू ।
आदि अनादि अविनाशु अमरू । तुजें स्तवन त्रिलोंकी ॥5॥
 
शांताराम बंडेलू संपादित क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 962 ओव्या आहेत, तर लंडन येथील स्कूल ऑफ ओेरिएंटल ॲन्ड आफ्रिकन स्टडीज येथील विल्यम मर्सडन यांच्या संग्रहातील क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 641 ओव्या आहेत.
 
या पुराणग्रंथात ग्रंथकर्त्याने ओवी छंदाचा वापर केला आहे. ओवी छंदात चार पंक्ती असून पहिल्या तीन पंक्तीत यमक साधलेले असते.
 
गोव्यातील वादग्रस्त ठरलेल्या इन्क्विझिशनच्या काळात प्रत्येक साहित्याचा मजकूर काळजीपूर्वक तपासला जात असे, आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब नष्ट केला जाई. इन्क्विझिशन मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलाही मजकूर प्रसिद्ध करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इन्क्विझिशन मंडळाची परवानगी मिळाल्यानंतरच क्रिस्तपुराण छापण्यात आले. 
 
इंग्रजी भाषेतील अनेक म्हणी आणि वाक्‌प्रचारांचे क्रिस्तपुराणातील मराठी भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. उदा. ‘Rome was not built in a day' े’ या सुपरिचित म्हणीचे क्रिस्तपुराणात ‘एके दिवशी रोमनगरी । उभविली नाही’ असे भाषांतर करण्यात आले आहे. ‘वार्म लव्ह’ या वाक्‌प्रचारास ‘उन्हु मोहो’ असे संबोधण्यात आले आहे.
 
फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाच्या तीन आवृत्त्या 1616,1649 आणि 1654 साली प्रसिद्ध केल्या. आज यापैकी कुठल्याही आवृत्तीची एकही प्रत कुठेही उपलब्ध नाही. 
 
गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सिस द लाव्होर याने 1648 साली कायदा करून तीन वर्षांच्या आत गोव्यातील सर्व स्थानिक भाषांची हकालपट्टी करून सर्व व्यवहार पोर्तुगीज भाषेतच करण्याचा निर्णय घेतला. या धोरणानुसार मराठी भाषेतील सर्व पुस्तके जप्त करण्यात आल्यामुळे फादर स्टीफन्स यांचे क्रिस्तपुराणही लोकांच्या नजरेआड झाले. पोर्तुगीजांच्या या धोरणामुळे क्रिस्तपुराणाच्या वापरावर बंदी आली. 
 
व्हॉईसरॉयच्या या आदेशामुळे गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेची आणि त्याचबरोबर तेथील मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचीही वाढ खुंटली. 
 
क्रिस्तपुराणाच्या आणि मराठी भाषेच्या सुदैवाने गोव्याबाहेर मेंगलोर वगैरे भागातील ख्रिस्ती समाजात क्रिस्तपुराणाचे वाचन आणि निरूपण कायम राहिले आणि या साहित्यिक ऐवजाचे अशाप्रकारे जतन झाले. या क्रिस्तपुराणाची अनेक हस्तलिखिते तयार झाली. अशी अनेक हस्तलिखिते जमवून त्यांच्या साहाय्याने 1907 साली मेंगलोर येथे जोसेफ साल्ढाणा यांनी क्रिस्तपुराणाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली.
 
क्रिस्तपुराणाच्या वरील चारही आवृत्त्या रोमन लिपीत छापलेल्या होत्या. त्यामुळे मराठीतील या श्रेष्ठ साहित्यकृतीकडे मराठी सारस्वतांचे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे क्रिस्तपुराण मराठी साहित्यक्षेत्रात पूर्णतः दुर्लक्षित राहिले. 
 
दरम्यान पुणे धर्मप्रांताचे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांनी क्रिस्तपुराणातील येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील काही भाग देवनागरी लिपीत आणला. आर्चबिशप डोरिंग हे मूळचे जर्मनीचे. आर्चबिशप डोरिंग यांनी क्रिस्तपुराणाच्या देवनागरीत आणलेल्या काही भागांच्या तीन पुस्तिका छापल्या होत्या. 
 
संपूर्ण क्रिस्तपुराण मराठीच्या देवनागरी लिपीत प्रकाशन होण्यासाठी मात्र 1956 साल उजाडावे लागले. त्यावेळी शांताराम बंडेलू यांनी संपादित केलेली ही देवनागरी आवृत्ती य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनने प्रसिद्ध केली.
 
फादर स्टीफन्स यांचे वयाच्या 70 व्या वर्षी ओल्ड गोव्यातील बॉम जेजू या चर्चच्या आवारातील धर्मगुरू निवासात निधन झाले. संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष असलेल्या या चर्चशेजारील हे धर्मगुरू निवास अजूनही आपल्याला पाहायला मिळते. 
 
फादर स्टीफन्स यांच्या स्मारकाची मात्र नक्कीच गरज नाही. ‘क्रिस्तपुराण’ या आपल्या वाङ्मयकृतीमुळे मराठी साहित्यात त्यांना चिरंतन स्थान लाभले आहे.

^^^

शांताराम बंडेलूकृत 'क्रिस्तपुराण' ग्रंथाचे कव्हर - मूळ चित्र " द मास्टर - अँजेलो डी फोन्सेका 
 
---
`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २००३) या पुस्तकातील एक प्रकरण
 
Camil Parkhe 

Friday, June 24, 2022

  May be an image of 1 person

 `गोयंचो सायबा........

दारु कि बोटल मे
साहब पानी भरता है
फिर ना कहना मायकल
दारु पिके दंगा करता है
हे हे हे हेे
हांव गोयंचो सायबा
लल्ला लल्ला ला
हे हे हे हेे
हांव गोयंचो सायबा
लल्ला लल्ला ला
 
अमिताभ बच्चन नायक असलेल्या `मजबूर’ चित्रपटात प्राण आणि जयश्री टी. यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे आठवते? सत्तर-ऐंशीच्या दशकांत हे गाणे खूप गाजले होते. 
 
कोकणी भाषेतली वाक्ये घेऊन हिंदी चित्रपटातले हे एक दुसरे महत्त्वाचे गाणे. त्याआधी `बॉबी' चित्रपटात 'ना मांगू सोना चांदी,... घे घे घे रे घेरे सायबा, माका नाका गो, माका नाका गो' हे ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडियावर चित्रित झालेले गाणे खूप गाजले होते. ही कोकणी ओळ `देखणी' या गोव्यातील सर्वात प्रसिद्ध कोकणी लोकगीतातली आहे. घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या सुरांत गायले जाणारे हे `देखणी' गीत तुमच्यापैकी अनेकांनी पणजी येथे मांडवीच्या आणि अरबी समुद्रावरच्या बोट क्रुझवर ऐकले असेल. 
 
`हांव गोयंचो सायबा’ या गाण्याच्या संगीतासाठी ट्रम्पेट, व्हायोलिन आणि गिटार या खास पारंपरिक गोवन वाद्यांचा वापर केलेला आहे. 
 
`हांव गोयंचो सायबा' हे गाणे जुन्या पिढीतल्या लोकांना चांगले आठवत असेल. हा चित्रपट मी स्वतः पाहिला नसला तरी हे गाणे रेडिओवर आणि रस्त्यावरच्या लग्नाच्या आणि इतर मिरवणुकीत हजारदा ऐकले आहे.
 
`मजबूर' पिक्चर बहुधा फार चालला नाही, त्यातलं किशोर कुमारने गायलेले हे गाणं मात्र आजही लोकांच्या ओठांवर असतं. 
 
मागच्या वर्षी घरातल्या एका लग्नाच्या वेळी सेलेब्रेशनच्या शेवटी मग यजमान असलेल्या मायकल नावाच्या व्यक्तीला काहींनी उचलून धरले आणि मग लाईव्ह म्युझिकच्या ठेक्यावर 'फिर ना कहना मायकल दारु पिके दंगा करता है- हांव गोयंचो सायबा' ' हे गाणे म्हणत सर्वच जण भरपूर नाचले होते. 
 
कुठल्याही पार्टींत आणि सेलेब्रेशनमध्ये बर्थडे बॉय किंवा यजमान `मायकल' असेल तर 'फिर ना कहना मायकल दारु पिके दंगा करता है - हांव गोयंचो सायबा'’’ या गाण्यावर सर्वांनी नाचण्याचे शास्त्रसंमत असते.
 
हे नमनालाच घडाभर तेल झालं, तर आता मूळ मुद्द्यावर येतो.. 
 
पारंपरिकरित्या `गोयंचो सायबा' म्हणजे सेन्ट फ्रान्सिस झेव्हियर. ओल्ड गोवा येथे त्याच्या शरीराचे अवशेष (रिलिक ) जपवून ठेवण्यात आले आहेत.
 
(मूळ इटालियन असलेले `मॅडोना' हे नाव येशूच्या आईसाठी -मदर मेरीसाठी - सर्रासपणे वापरले जाते तसे गोव्यात मदर मेरीला कोकणी भाषेत `सायबिणी' अशी एक उपाधी आहे, जसे मध्य महाराष्ट्रात `मारियाबाई' असे संबोधले जाते. )
 
सतराव्या शतकातील फ्रान्सिस झेव्हियर हा स्पॅनिश जेसुईट धर्मगुरु. सोसायटी ऑफ जिझस किंवा येशूसंघ ही कॅथॉलिक धर्मगुरुंची संस्था त्याने सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला यांच्याबरोबर स्थापन केली होती. गोव्यात आणि भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यात त्याचे मोठे योगदान आहे. चीनकडे जाण्यासाठी जहाजाची वाट पाहत असताना त्याचे निधन झाले आणि त्याचे शरीर गोव्यात आणले गेले. ते कुजले नव्हते म्हणून मग जपले गेले आणि गेली काही शतके पारदर्शक पेटीत ठेवण्यात आले आहे. 
 
तीन डिसेंबर हा सेंट फ्रान्सिस झेव्हियर याचा सण (फेस्त) , त्यादिवशी ओल्ड गोव्यात मोठी यात्रा भरते, तीन डिसेंबरला गोवा राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. 
 
महाराष्ट्रातून काही मंडळी, विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील बार्देसकर लोक, या गोयंचो सायबाला वंदन करण्यासाठी पदयात्रा करत ओल्ड गोव्याला दोन डिसेंबरच्या संद्याकाळी पोहोचत असतात. 
 
गोवा राज्य शासनातर्फे या संताच्या अवशेषाचे दशकातून एकदा प्रदर्शन (Exposition) भरवले जाते. या संताचे अवशेष ओल्ड गोवा येथल्या बॉम जेसू बॅसिलिकातून रस्त्यापलिकडच्या सफेद रंगातल्या भव्य सी कॅथेड्रलमध्ये हलवले जातात आणि तिथे हे प्रदर्शन भरते. 
 
कॅथोलिक चर्च संत फ्रान्सिस झेव्हियरच्या या अवशेषाला शरीर मानत नाही तर केवळ अवशेष (रिलिक) मानते हे महत्त्वाचे. या अवशेषाचे फार अवडंबर माजवले जात नाही, ते बॅसिलिकाच्या मुख्य वेदीवर नाही तर डाव्या बाजूच्या उंच चोथऱ्यावर ठेवलेले असतात. वेदीवर मुख्य सन्मान अर्थातच येशू ख्रिस्तालाच असतो. 
 
अशाच एकदोन प्रदर्शनात सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे हे अवशेष मी जवळून पाहिले आहे. सर्व अवयव असलेले शरीर म्हणता येईल असे यात काही नाही. म्हणूनच अवशेष किंवा रिलिक असा शब्दप्रयोग केला जातो. काचेच्या पेटीत हाडांच्या सापळ्यावर सुकलेली कातडी आणि कवटी असलेल्या या अवशेषावर धर्मगुरुचे रंगीत, चमकीदार झगे घातलेले असतात एव्हढेच.
 
मध्ययुगीन काळातल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर याला त्याच्या काळाचे काही गुण आणि अवगुणसुद्धा चिकटलेले आहेत. ख्रिस्ती धर्मगुरु असल्याने त्याकाळच्या रितीरिवाजानुसार धर्मप्रसार करणे हेच फ्रान्सिस झेव्हियरच्या आयुष्याचे मुख्य मिशन होते आणि यात त्याला बऱ्यापैकी यश आले. 
 
ख्रिस्ती धर्मातील पाखंडी लोंकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी युरोपाप्रमाणेच गोव्यातसुद्धा इन्क्विझिशन बोर्ड स्थापन करावे असा या संताचा आग्रह होता. पोर्तुगाल, स्पेन वगैरे कॅथोलिक असलेल्या देशांत इन्क्विझिशन बोर्डकडून तथाकथित पाखंडी लोकांचा खूप छळ झाला होता. 
 
संत फ्रान्सिस झेव्हियरला कॅथोलिक चर्चने गोव्याचा आश्रयदाता म्हणजे Patron Saint हा दर्जा दिला आहे. प्रत्येक कॅथोलिक धर्मप्रांताचा स्वतःचा पॅट्रन सेंट असतो. गोव्यात, भारतात आणि जगभरात सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या नावाने अनेक चर्चेस आणि शाळा-कॉलेजेस आहेत. 
 
पण प्रश्न असा कि संत फ्रान्सिस झेव्हियरला `गोयंचो सायबा’ हा उपाधी कुणी दिली? चर्चने तरी अशी काही उपाधी दिलेली नाही. 
 
फक्त जुन्या चालत आलेल्या परंपरेनुसार `गोयंचो सायबा' म्हणजेच संत फ्रान्सिस झेव्हियर असेच आहे.
`गोयंचो सायबा’ अधिकृत उपाधी किंवा किताब नाही. 
 
त्या निमित्ताने `हे हे हे, हांव `गोयंचो सायबा' या गाण्याची उजळणी झाली, यु-ट्यूबवर हे खूप जुने गाणे पाहणे झाले, हेही नसे थोडके ... .. 
 
पोर्तुगीज पासपोर्टचे वरदान असलेले गोंयकार सगळ्या जगात पसरले आहेत, तेथे ते आपली `माय भास' कोकणी आणि  या  ` गोंयचो  सायबा' घेऊन गेले आहेत. तेथे त्याची तीन डिसेंबरला  फेस्त साजरी होते आणि सां फ्रान्सिस साव्हेरा हे कोकणी गायन गायले जातेच.

जगभर जिथेजिथे गोवन कॅथोलिक आज हा सण साजरा करतील तिथेतिथे हे कोकणी गायन गायले जाते.  या गायनाची चाल अत्यंत सुंदर आहे. यु ट्यूबवर एकदा ऐकून तर पहा.

गेली काही शतके गोव्यात कॅथोलिक समाज कोकणी लिहिण्यासाठी रोमन लिपीचा वापर करत आला आहे. बायबल आणि इतर धार्मिक कोकणी पुस्तके रोमन लिपीतच असतात.  

 हे कोकणी गायन रोमन लिपीत आहे पण वाचल्यावर त्याचा अर्थ मराठी वाचकाला बऱ्यापैकी कळेल.

 

SAM FRANCIS XAVIERA

 

Sam Francis Xaviera, vodda kunvra

Raat dis amchea mogan lastolea

Besanv ghal Saiba sharar Goyenchea

Samballun sodankal gopant tujea

Beporva korun sonvsarachi

Devachi tunven keli chakri

Ami somest magtanv mozot tuzi,

Kortai mhonn milagrir, milagri

Aiz ani sodam, amchi khatir

Vinoti kor tum Deva lagim

Jezu sarkem zaum jivit amchem,

Ami pavo-sor tuje sorxi

 

 

Thursday, October 28, 2021

 ‘गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा'



 ‘गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा’ या माझ्या नव्याकोऱ्या पुस्तकाची प्रत अर्ध्या तासापूर्वीच माझ्या हातात पडली. या पुस्तकाला गोव्यातील माझा मित्र आणि इंग्रजी वृत्तपत्र माध्यमातील पत्रकार फ्रेडरिक नरोन्हा ( Frederick Noronha ) याने प्रस्तावना लिहिली आहे.

पणजीतल्या `द नवहिंद टाइम्स'मध्ये रिको याचे येथे साप्ताहिक सादर असते, हो, पत्रकारितेची सुरुवात मी याच दैनिकांत केली. आपल्या सदरात रिको याने माझ्याविषयी आणि माझ्या लेखनाविषयी लिहिले होते, त्यातील काही मजकूर येथे प्रस्तावना म्हणून वापरली आहे.
डेक्कन हेराल्डमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या फ्रेडरिक नरोन्हा याचे इंग्रजी आणि कोकणी प्रसारमाध्यमात, प्रकाशनक्षेत्रात आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरही काहीबाही उद्योग चालू असतात. पत्रकारांच्या लिखाणावर भाष्य करणारी त्याची ही प्रस्तावना :
----
पत्रकार त्यांच्या कथा का सांगत नाहीत? दिलेल्या वृत्ताच्या पलीकडे पत्रकार त्यांच्या कथा का सांगत नाहीत? कुणालाही असेच वाटेल की, त्यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक कथा असतील.
साथीचा रोग सर्व देशभर किंवा जगभर फैलावलेला असलेल्या काळात, आपल्यापैकी बरेच जण दीर्घकाळापर्यंत घरात अडकले आहेत. तर, वाचणे आणि आठवण काढणे जवळजवळ नैसर्गिकरित्या येते. काहींना हे ऑनलाइन होणे जास्त पसंत नाही. पण, माझ्या मते मेमरी लेनमध्ये जाणे हा आपला अलीकडील इतिहास समजून घेण्याचा एक मार्ग आहे.
काही पत्रकार सहकारी अलीकडच्या काळात आम्हाला गोव्यातील माणसे आणि कार्यक्रम, समस्या आणि प्रवाह समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, १९८०च्या आणि १९९०च्या दशकात गोव्यात पणजीतल्या इंग्रजी दैनिक ‘नवहिंद टाईम्स’मध्ये काम करणारे पत्रकार कामिल पारखे हे ‘फेसबुक’च्या माध्यमातून गोव्यातील त्यांच्या पत्रकारितेतील अनेक घटनांवर मनोरंजक आणि रंगतदार लिखाण करत आहेत.
कामिल पारखे यांची बायलाइन म्हणजे नाव ‘नवहिंद टाईम्स’च्या ज्येष्ठ वाचकांना नक्कीच परिचित असेल. अर्थात्, त्या काळात पत्रकारांना त्यांनी लिहिलेल्या बातम्यांना बायलाइन मिळवणे खूप कठीण होते.
त्यांनी निवडलेल्या विषयांव्यतिरिक्त, कामिलची लेखनाची शैली देखील अतिशय मोहक आणि वाचकांना खिळवून ठेवण्यासारखी आहे. म्हणूनच, पत्रकारांनी वापरावी अशी (आतापेक्षा पूर्वी) अपेक्षा केली जाणाऱ्या अहवालात्मक म्हणजे रिपोर्टरीयल शैली ते जास्त वापरतात. पत्रकारितेतील या शैलीनुसार या कथानकांत कामिल स्वत: पडद्यामागे राहतात आणि या कथांमध्ये विविध घटनांवर, प्रमुख व्यक्तींवर आणि त्या काळातील विविध प्रश्नांवर प्रकाश केंद्रित राहतो.
मूळचा अहमदनगरचा असलेला कामिल हा जेसुइट धर्मगुरू म्हणजे फादर होण्यासाठी गोव्याला (‘माझे पहिले नाव बरोबर उच्चारले जाणारे एकमेव स्थळ’) आला होता आणि शेवटी तो पत्रकार बनला. त्याने येथे गोव्यात, पुणे व इतर ठिकाणी काम केले आहे.
हा, तर मुख्य मुद्दा म्हणजे पत्रकार त्यांच्या कथा का सांगत नाहीत? म्हणजे, त्यांनी ज्या बातम्या दिल्या, त्यापलीकडे जाऊन ते त्या बातम्यांविषयी, बातम्यांमागे दडलेल्या बाबींविषयी आणि छापून आले, त्यापेक्षा अधिक काही, खोलवर का सांगत नाहीत?
गोव्यावर लिहिलेली पुस्तके मी संग्रही ठेवत आलो आहे, या पुस्तकांवर परीक्षणे लिहीत असतो आणि काही पुस्तके प्रकाशित करत असतो. त्यामुळे मला वाटते की, या पत्रकारांकडे अजूनही सांगण्यासारख्या अशा बऱ्याच काही गोष्टी नक्कीच असतील.
‘नवहिंद टाइम्स’चे पूर्वीचे बातमीदार गुरुदास सिंगबाळ, गोव्यातील बस्तोरा गावचे ‘इंडियन एक्सप्रेस’चे वृत्तसंपादक दिवंगत एर्व्हेल मिनिझेस वगैरेंनी आपल्या पुस्तकांत अशा कथा सांगितल्या आहेत. अशा प्रकारे त्यांच्या काळातील गोव्यातील झालेली एखादी घटना आपल्या मताप्रमाणे मांडून (भले त्यांच्या मताशी आपण सहमत होऊ वा न होऊ) त्यांनी त्यांच्या काळातील गोव्यातील या घटना जतन करून ठेवल्या आहेत.
कधीकधी पत्रकारांना त्यांचे लिखाण, स्तंभ किंवा जे काही छापील स्वरूपात आहे, त्याचे संकलन करण्याचा मोह असतो. मी स्वत: असे केल्याने, संकोच न करता असे म्हणू शकतो की, ही कल्पना अगदी वाईट नसली तरी गोष्टी सांगण्याचा हा एक आळशी मार्ग आहे. एक तर पत्रकारितेतील बहुतेक लिखाण सहसा काळाच्या कसोटीवर टिकत नाही. या व्यतिरिक्त भूतकाळातील बऱ्याच वर्षांपूर्वी, दररोजच्या वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या गोष्टीचा संदर्भ नंतर समजणे कठीण आहे.
...तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पत्रकारितेतील अशा कितीतरी गोष्टी अजूनही सांगण्यासारख्या आहेत.''
----
‘गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा’ – कामिल पारखे
चेतक बुक्स, पुणे , मूल्य - ३०० रुपये अमेझॉनमार्फत रुपये २५० फक्त (पोस्टेज खर्चासह )
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी ही लिंक -

Saturday, May 22, 2021

 

डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना ‘अमेरिकेचे महात्मा गांधी’ संबोधले जात असले, तरी त्यांचे चरित्र आणि कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिक जवळचे आहे!
‘अक्षरनामा’  पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Fri , 14 May 2021
  • पडघमसांस्कृतिकडॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर)Martin Luther KingJr.डॉ. बाबासाहेब आंबेडकरBabasaheb Ambedkarवर्णभेदApartheidअस्पृश्यताUntouchabilityजातीयताCasteismमहात्मा गांधीMahatma Gandhi

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कोकणी साहित्यिक रवीन्द्र केळेकर यांनी एका लेखात म्हटले आहे -  “मी भाग्यवंत गोवेकर. खूप मोठमोठी माणसं जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं मला. काही जणांच्या अगदी जवळही पोहोचलो. त्यातलाच एक मार्टिन ल्युथर किंग. १९५८-५९ सालातील गोष्ट. (गांधीवादी विचारवंत) आचार्य काकासाहेब कालेलकर अमेरिकेचा दौरा करून आले होते. आल्यानंतर अमेरिकेत आपण काय पाहिलं, ते भेटायला आलेल्या आपल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं होतं- ‘नायगाराचा धबधबा पाहिला आणि तिशीतला एक निग्रो वीर पाहिला. दक्षिण आफ्रिकेत कार्य करणाऱ्या बापूंचाच अलीकडचा अवतार वाटला. त्याच्याकडे जाऊन राहिलो. बापूंच्याच प्रेरणेने तो तिथे निग्रोंमध्ये कार्य करत आहे.’ ”

कालेलकरांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या कार्याविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा केली आणि गांधी निधीच्या वतीने त्या तरुणाला भारतभेटीसाठी येण्या-जाण्याची तिकिटे पाठवून दिली. केळेकर लिहितात – ‘त्याप्रमाणे मार्टिन पत्नीला आणि सोबत्याला घेऊन हिंदुस्थानात आला. खूप ठिकाणी फिरला. खूप जणांना भेटला.’

निग्रोंच्या हाल अपेष्टांबद्दलही केळेकर यांनी लिहिले आहे, ‘‘अमेरिकेतील निग्रोंनी गोऱ्यांचा खूप त्रास सहन केला आहे. आपल्या दलित बांधवांनी सोसला त्याच्यापेक्षा थोडाही कमी नाही. जास्तच म्हटलं तरी चालेल. मार्टिन ल्युथरच्या नेतृत्वाखाली या लोकांनी गांधीजींच्या मार्गाने आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार केला. मार्टिनच्या आत्मकथेत त्यांच्या या छळाची वर्णने आली आहेत आणि त्याच्या प्रतिकारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वृत्तांतही आलेला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. इतकं असूनही अन्याय करणाऱ्यांविषयी मार्टिनच्या लेखनात एकही वाईट शब्द आलेला नाही. गांधीजींच्या वाटेने तो आपल्या सोबत्यांना घेऊन एक-एक विजय मिळवत पुढे गेला आणि गांधीजींसारखीच शरीरावर गोळी झेलून एक दिवशी त्याने मरणाला मिठी मारली.”

या डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना ‘अमेरिकेचे महात्मा गांधी’ संबोधले जाते. असे असले तरी त्यांचे चरित्र आणि कार्य गांधींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या अधिक जवळचे आहे असे मला वाटते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाचे लेखन मी पूर्ण केले, तेव्हा माझा असा ठाम विश्वास निर्माण झाला. 

‘बाबासाहेब आंबेडकरांचे जीवित कार्य नि:संशय ऐतिहासिक स्वरूपाचे होते. त्यांना आपले कार्यक्षेत्र सापडावे लागले नाही. ते जन्मत:च त्यांच्या वाटेला आले होते. त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी निःशंकपणे स्वीकारले.’’ असे गं. बा. सरदार यांनी म्हटले आहे.

ही वाक्ये मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनाही लागू पडतात. हे महान नेते बहुसंख्य समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील कुटुंबात जन्माला आले. या दोन्ही नेत्यांच्या समाजाला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी कायद्याने रद्द केली होती. विसाव्या शतकाच्या अखेरीस मोहनदास करमचंद गांधी या भारतीय व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवून समानतेच्या हक्कासाठी पुढे दीर्घकाळ चालणाऱ्या या लढ्यासाठी शिंख फुंकले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अस्पृश्‍य समाजाच्या लोकांना ज्या प्रकारच्या मानहानीची वागणूक मिळत असते, त्याच प्रकारे अमेरिकेत काळ्या वर्णाच्या लोकांना अत्यंत वाईट प्रकारे वागवले जात असे. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे अस्पृश्‍यता पाळणे कायद्यानुसार गुन्हा झाला.

त्यानंतरही दोन दशके म्हणजे १९६५पर्यंत पुढारलेल्या, एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत काळ्या मुलांसाठी वेगळ्या शाळा, काळ्या लोकांसाठी वेगळे बगीचे, वेगळ्या वस्त्या, वेगळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वेगळे थिएटर आणि बसमध्ये मागे बसण्याची जागा असायची.

आता इतिहासकाळात जमा झालेल्या अस्पृश्‍यता पद्धतीविषयी आणि जाती-पोटजातींनी निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेविषयी आपल्याकडे बरेच लिखाण झाले आहे. मात्र अमेरिकेसारख्या प्रगत देशाने चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी केली, तोपर्यंत तिथे काळ्या लोकांना बसमध्ये गोऱ्या लोकांच्या रांगेत बसण्याची, बगीच्यात किंवा चित्रपटगृहांत बसण्याची आणि मतदान करण्यास कायद्याने बंदी होती, हे वाचून धक्काच बसतो.

विसाव्या शतकाच्या पाचव्या-सहाव्या दशकात रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांनी अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी संघर्ष केला. रोझा पार्क्स या काळ्या महिलेने १९५५ साली माँटगोमरी शहरात बसमधील आपली जागा गोऱ्या प्रवाशास खाली करून देण्यास नकार दिला, तेव्हा काळे लोक एकत्र आले. माँटगोमरी शहरातील बससेवेवर काळ्या लोकांनी बहिष्कार टाकला. हा बहिष्कार तब्बल वर्षभर चालू राहिला. एक वर्षांनंतर बसमध्ये काळ्या प्रवाश्‍यांना गोऱ्या प्रवाश्‍यांप्रमाणे समानतेची वागणूक मिळण्याचा हक्क आहे, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि या लढ्याची यशस्वी सांगता झाली. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) हा नेताही या लढ्यातूनच उदयास आला.

एक ख्रिस्ती धर्मगुरू या नात्याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची अहिंसा तत्त्वावर पूर्ण श्रद्धा होती. प्रथम मॉटगोमेरी बस बहिष्कार प्रकरणात आणि नंतर विविध आंदोलनांत किंग यांची अहिंसेंवरची श्रद्धा कधीही ढळली नाही. येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपला वर्णविरोधी लढा हिंसक होणार नाही, याची किंग यांनी सतत पुरेपूर काळजी घेतली. यामुळे त्यांना अनेकदा आपल्या अनुयायांचा, चळवळीतील लोकांचा रोष पत्करावा लागला.

डॉ. आंबेडकरांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात आणि दीर्घकाळ चाललेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांच्या अनुयायांना डिवचण्याचे, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचे अनेक प्रसंग घडले. अहिंसा तत्त्व शिकवणाऱ्या गौतम बुद्धाच्या तत्त्वप्रणालीचा बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्वीकार केला. मात्र त्याआधी काही दशके त्यांनी आपले लढे सनदशीर मार्गाने लढवले.

डॉ. आंबेडकर ‘कायदेपंडित’ होते. कुठल्याही प्रथेला कायदा वा समाजाची मान्यता असली तरी ती प्रथा वा तो कायदा न्याय्य असतोच असे नाही, याची त्यांना कायदेपंडित या नात्याने जाणीव होती. अस्पृश्‍य समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी अनेक सनदशीर मार्ग हाताळले. गोलमेज परिषदांसारख्या बैठकीत त्यांनी अस्पृश्‍यांचे प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत गव्हर्नरांच्या कौन्सिलात त्यांनी मजूरमंत्री म्हणूनही काम केले. या सनदशीर मार्गाचा कळस म्हणून शेवटी त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करून हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अस्पृश्‍यता प्रथेचे कायमचे उच्चाटन केले. सनदशीर, कायदेशीर मार्गाचा यशस्वी वापर करण्याचे डॉ. आंबेडकरांसारखे दुसरे असे कोणते मोठे उदाहरण दाखवता येईल?

महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक चळवळीचा आणि त्यांच्या सत्याग्रह या अस्त्राचा किंग (ज्युनियर) यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. किंग यांनी पत्नी कॉरेटा हिच्यासह १९५९ साली भारताला भेट दिली, त्या वेळी डॉ. आंबेडकरांचे निर्वाण होऊन केवळ तीन वर्षे झाली होती. वर्णभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या किंग यांना तशाच प्रकारच्या सामाजिक विषमतेविरुद्ध म्हणजे अस्पृश्‍यतेविरुद्ध यशस्वी लढा लढणाऱ्या डॉ. आंबेडकरांविषयी फारसा परिचय नव्हता असे दिसते. अन्यथा मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना तेच अधिक जवळचे वाटले असते. राजघाट, साबरमती आश्रम वगैरे ठिकाणी भेट देताना त्यांनी आपल्या भारत दौऱ्यात चैत्यभूमीला नक्कीच भेट दिली असती!

डॉ. आंबेडकरांनी सामाजिक विषमतेविरुद्ध चालवलेल्या लढ्याची डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना फारशी कल्पना नसावी वा या लढ्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले नसावे, हेसुद्धा साहजिकच आहे. याचे कारण म्हणजे हिंदुस्थानातील परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाललेल्या लढ्याकडे जगाचे जितके लक्ष गेले, तितके या देशातील गावकुसातील आणि गावकुसाबाहेरच्या लोकांमधील विषमतेविरुद्ध चाललेल्या संघर्षाकडे जागतिक पातळीवर फार चर्चा झाली नाही.

कृष्णवर्णीयांनी वर्णभेदाविरुद्धचा आपला लढा काव्य, कथा-कादंबरीसारख्या साहित्याच्या माध्यमातून आणि तेही इंग्रजी भाषेतून मांडून आपली व्यथा संपूर्ण जगासमोर मांडली. हिंदुस्थानातील अस्पृश्‍यतेच्या प्रश्‍नावर त्यामानाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर जागृती केली गेली नव्हती. या संदर्भात जे काही लिहिले गेले, साहित्यनिर्मिती केली गेली, ती हिंदुस्थान पातळीवर, स्थानिक भाषांपुरती मर्यादीत राहिली. जागतिक पातळीवर या प्रश्‍नाचे गांभीर्य प्रकर्षाने मांडले गेले नाही. त्यामुळे या प्रश्‍नाची जगानेही तितक्या प्रखरतेने दखल घेतली नाही.

महात्मा फुले यांनी सर्वप्रथम आणि त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी हा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात मांडला. त्याची समाजाला, तत्कालीन राज्यकर्त्याला दखल घेणे भाग पाडले. किंबहुना अस्पृश्‍यतेच्या प्रश्‍नाला जागतिक स्तरावर मानवी हक्काचा मुद्दा म्हणून उभारण्यास अनेकदा आपल्या देशातूनच नेहमीच प्रखर विरोध झाला आहे. त्यामुळे आपल्या देशाची, संस्कृतीची नाचक्की होते, अशी काही जणांची भावना असते.

किंबहुना हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून चालत आलेली जन्मावर आधारित जातिनिष्ठ सामाजिक विषमतेविरुद्ध दीर्घकाळ लढा करून आणि नंतर राज्यघटनेद्वारे ही विषमता कायद्याने दूर करणाऱ्या डॉ. आंबेडकरांची ‘आधुनिक मनू’ ही प्रतिमा तोपर्यंत प्रकर्षाने जगासमोर आलीच नव्हती. अन्यथा रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग यांच्याप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनाही नोबेल हे जागतिक स्तरावरचे पारितोषिक नक्कीच प्रदान झाले असते!

डॉ. आंबेडकर आणि किंग (ज्युनियर) या दोघांचाही लढा मानवजातीच्या समानतेसाठी होता. स्वत:स श्रेष्ठ म्हणवून घेतल्या जाणाऱ्या समाजघटकांनी इतर समाजघटकांना वाळीत टाकल्यामुळे या उपेक्षित घटकातील लोकांना काय वेदना भागाव्या लागतात, याचा या दोन्ही महान नेत्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. दोघांनी दोन वेगळ्या देशांत विषमतेविरुद्ध संघर्ष केला. या दोन्ही नेत्यांचा प्रवास मानवजातीत समता स्थापन करण्यासाठी समांतर दिशेने चालू होता.

स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील अस्पृश्‍यांची सामाजिक स्थिती आणि त्या काळातील अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची स्थिती यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळेच येथील दलित चळवळीला निग्रो लोकांनी आपल्या हक्कांसाठी चालवलेल्या लढ्याचे आणि निग्रो लोकांच्या विद्रोही साहित्याचे अप्रूप वाटले. रेव्ह. किंग यांचे चरित्र वाचताना हिंदुस्थानात डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशलढ्यांचे स्मरण होते. हे दोन्हीही संघर्ष शांततामय मार्गानेच लढवण्यात आले होते.  

नरहर कुरूंदकर म्हणतात, “व्यापक करुणेचे नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय समता आणि स्वातंत्र्याचा लढा चालवता येत नाही, एरव्ही हा लढा फक्त द्वेष आणि कटुता वाढवणारा, हिंसा आणि अत्याचार वाढवणारा, विध्वंस आणि विभाजन वाढवणारा ठरतो. तुम्ही नाव बुद्धाचे घ्या, गांधींचे घ्या, बाबासाहेबांचे घ्या अगर किंगचे घ्या, कोणत्या वंदनीय नेत्याचे नाव आपण घेतो हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मुद्दा एकात्म राष्ट्रवादात गृहीत असणाऱ्या बंधुत्वाचा व त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या व्यापक करूणेचा आशय आपणास मान्य आहे काय, हा आहे.”

हिंदुस्थानात अनेक शतकांपासून चालत असलेली अस्पृश्‍यता आणि जागतिक पातळीवर अनेक देशांत काळ्या लोकांना दिली जाणारी वंशभेदाची वागणूक, या दोन्हीं बाबींना एकाच पारड्यात टाकता येणार नाही, असे अनेकदा म्हटले जाते. तरीदेखील अस्पृश्‍यता आणि काळ्या लोकांना त्यांच्या वर्णामुळे दिली जाणारी वागणूक यात गुणात्मक काहीही फरक नाही हे वास्तव मान्य करायलाच हवे.

रावसाहेब कसबे यांनी डॉ. आंबेडकरांच्या या व्यक्तिमत्त्वाचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे - “बाबासाहेबांचा विचार दोन पातळ्यांवर करावा लागतो. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्‍यवर्गाच्या हक्कासाठी केलेले संघटन, प्रबोधन, चळवळ आणि संघर्ष अभ्यासावे लागतात, तर दुसऱ्या पातळीवर संपूर्ण भारतीयांसाठी आणि अंतिमत: एकूण मानवजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजून घ्यावे लागते. यापैकी कोणत्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर बाबासाहेबांचे एकारलेले, संकुचित, विकृत चित्र रंगवले जाण्याचा धोका असतो.”

डॉ. आंबेडकरांच्या कार्याविषयी गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे- “अस्पृश्‍यतानिवारणाचा प्रश्‍न बाबासाहेबांनी दयाधर्माच्या, उद्धाराच्या, पापक्षालनाच्या वा सेवाभावाच्या पातळीवरून हक्काच्या पातळीवर नेला. याचकधर्म सोडून देऊन स्वत:च्या बळावर आपले नैसर्गिक हक्क प्राप्त करून घेण्याची त्यांनी शिकवण दिली. आपण दलित समाजाला विशेषाधिकार मागत नाही, केवळ समान हक्क आणि अधिकार मागत आहोत, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. चवदार तळ्यातील पाणी म्हणजे काही अमृत नव्हे की ते प्राशन करण्यासाठी अस्पृश्‍यांची मने हपापलेली होती, तसेच मंदिरप्रवेशासाठीचा आग्रह हा काही स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीसाठी नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, हिंदू समाजाचे घटक आहोत, तेव्हा स्पृश्‍यांच्या बरोबरीने विहिरी, देवालये, शाळा, बाजारहाट यासारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे प्रवेश करण्याचा आम्हाला हक्क आहे असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.’’ 

रेव्ह. मार्टिन किंग यांचीही भूमिका याहून काही वेगळी नव्हती. अमेरिकेचे समान नागरिक म्हणून ते कृष्णवर्णीयांना शाळात, सार्वजनिक वाहनात, बागबगीच्यात आणि प्रेक्षागृहात प्रवेशाची मागणी करत होते. आपल्याला काही विशेषाधिकार द्यावेत, अशी या कृष्णवर्णीयांनी कधीही मागणी केली नव्हती.

किंग (ज्युनियर) आणि डॉ. आंबेडकर या दोघांमधील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे हे दोन्ही सामाजिक नेते उपेक्षितांचे अनभिषिक्त राजे होते. या दोघांनाही आपल्या समाज बांधवांचे खूप  प्रेम लाभले. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे एक आघाडीचे नेते म्हणून कार्य केले. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या चाहत्यांची, अनुयायांची संख्या अमर्याद राहिली आहे. दलितांच्या हृदयात त्यांच्याइतके आदराचे स्थान इतर कुणाही नेत्यास त्या काळी वा नंतरही कधी मिळाले नाही.

भारताच्या तुलनेत अमेरिकेत सणानिमित्त वा राष्ट्रनेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची संख्या अगदी कमी आहे. ‘आय जस्ट काल्ड टू से आय लव्ह यू’  हे गाणे म्हणणारे लोकप्रिय अंध गायक स्टिव्ही वंडर यांनी किंग (ज्युनियर) यांच्या जन्मदिनानिमित्त अमेरिकेत सुट्टी जाहीर करावी, यासाठी १९८०च्या दशकात मोहीम लढवली. १५ जानेवारी हा मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचा जन्मदिन. त्यामुळे जानेवारी महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मार्टिन ल्युथर किंग यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेत ‘सार्वजनिक सुट्टी’ असते!  

अमेरिकेत वर्णभेदाविषयीचा लढा शिगेला पोहोचला होता. तेव्हा म्हणजे १९६३ साली सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्तीचे आणि समानतेविषयी स्वप्न पाहणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी ‘आय हॅव अ ड्रीम’ (माझे एक सुंदर स्वप्न आहे) या शीर्षकाचे भाषण दिले होते. कातडीच्या रंगावरून कुणाही व्यक्तीचे मूल्य ठरवले जाणार नाही, अमेरिकेतील वर्णभेद संपून पूर्वाश्रमीच्या काळ्या गुलामांचे वंशज आणि या गुलामांच्या मालकांचे वंशज यांना समान वागणूक मिळेल, असे स्वप्न व्यक्त करणाऱ्या किंग यांच्या त्या शीर्षकाच्या भाषणाचा चिरंतन मूल्य असणाऱ्या भाषणांमध्ये समावेश केला जातो. वयाच्या ३५व्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषक देऊन किंग (ज्युनियर)  यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय किंवा आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी २००९ रोजी शपथविधी घेण्याच्या आदल्या दिवशी बराक ओबामा यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त वर्णभेदाविरुद्ध लढा उभारणाऱ्याया नेत्यास आदरांजली वाहिली.  

बराक ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, तो क्षण म्हणजे मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी त्या दिवशी पाहिलेल्या स्वप्नाची ती प्रतीकात्मक पूर्तताच होती असे म्हणावे लागेल. कारण त्या देशात अनेक शतके अस्तित्वात असलेल्या वर्णभेदाची भिंत प्रतीक स्वरूपात ढासळली.

मानवी हक्कांच्या चळवळीत अमेरिकेतील निग्रो लोकांचा नागरी हक्कांसाठी चाललेला प्रदीर्घ लढा एक महत्त्वाचे प्रकरण आहे. त्यानंतरही पुढे अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाची प्रथा चालूच राहिली होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नेल्सन मंडेला यांनी तब्बल २७ वर्षे तुरुंग कोठडीत राहून जागतिक पातळीवरील वर्णभेदाचा हा लढा अखेरीस जिंकला.

हिंदुस्थानातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील, दक्षिण आफ्रिकेतील किंवा इतर राष्ट्रांतील वर्णभेद यांमध्ये फरक नाही. दोन्ही पक्षपाती प्रथांची दाहकता सारखीच होती. त्यामुळेच अस्पृश्‍यता प्रथेविरुद्धच्या लढ्यात एकांडे शिलेदार असूनही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवी समानतेसाठी लढणारे नेते म्हणून अब्राहाम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ. नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीने जागतिक पातळीवर स्थान असायला हवे.