Did you like the article?

Showing posts with label Thomas Stephens. Show all posts
Showing posts with label Thomas Stephens. Show all posts

Tuesday, November 22, 2022

अँजेला त्रिनदाद Nuestra Senora Del Rosario भारतीय रुपात



 आपल्या बाळाला घेऊन दुसऱ्या हातात जपमाळ घेतलेली ही स्त्री आहे मदर मेरी.

गोव्यातल्या चित्रकार अँजेला त्रिनदाद (१९०९ - १९८०) यांनी बाळ येशूसह मारियेला म्हणजे `अवर लेडी ऑफ रोझरी' ( Nuestra Senora Del Rosario ) भारतीय रुपात रेखाटली आहे.

भारतीय रुपात आणि प्रतिकांसह अँजेला त्रिनदाद यांनी ख्रिस्ती धर्मातले इतरही अनेक विषय आणि पात्रे साकारली आहे. ख्रिस्ती धर्मांतील सांस्कृतिकरण (Inculturation) असे या प्रक्रियेला संबोधले जाते.
साठीच्या दशकात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनुसार सांस्कृतिकरणाला अधिकृत मान्यता मिळाली.
१९७२ पर्यंत श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यापाड्यांत कॅथोलिक चर्चेसमध्ये मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या, पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो, मराठीचा वापर नंतर सुरु झाला यावर आता कुणाचा विश्वासही बसणार नाही !
असे असले तरी त्याआधीही सांस्कृतिकरणाची प्रक्रिया जगभर वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर अनेक शतकांपासून चालूच होती.
आपल्याकडं सतराव्या शतकात गोव्यात `ख्रिस्तपुराण'कार फादर थॉमस स्टीफन्स आणि मागच्या शतकात रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरेंनीं सांस्कृतिकरणाची ही प्रक्रिया अत्यंत प्रभावीरित्या राबवली
नव्या धर्मातही आपली जुनी संस्कृती, परंपरा चालू ठेवणारा ( नाव, आडनाव, काही विशिष्ट सणवार वगैरे ) महाराष्ट्रातला मराठी ख्रिस्ती समाज हा या सांस्कृतिकरणाचं एक स्थानिक आणि उत्तम उदाहरण.
मीसुद्धा याच समाजाचा एक प्रतिनिधी.

हे चित्र गोव्यातले फेसबुक मित्र Parag Hede यांच्या सौजन्यानं

Camil Parkhe

Thursday, September 22, 2022

 फादर थॉमस स्टीफन्स ‘क्रिस्तपुराण’

जैसी हरळांमाजी रत्नकिळा की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । की पदिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी । मराठिया ॥
पखिया माजी मयोरू । वृखिआंमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानु थोरू । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमाजी रवी शशी ।
या दीपीचेआ भाषांमध्ये तैसी । बोली मराठिया ॥
 
मराठी भाषेची अशा प्रकारे स्तुती करून सतराव्या शतकाच्या सुरुवातीस फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ‘क्रिस्तपुराण’ या ग्रंथाची निर्मिती केली. ‘ओं नमो विश्वभरिता’ या नमनापासून सुरू होणारे हे पुराण पुढील दहा हजार ओव्यांमध्ये आपला हा एतद्देशीय थाट कायम राखते.
 
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या तिशीनंतर गोमंतकात आलेल्या फादर स्टीफन्स यांना पूर्णतः देशी अवतारातील क्रिस्तपुराणाची निर्मिती शक्य झाली हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. 
 
क्रिस्तपुराण वाचताना या ग्रंथाची भाषाशैली, म्हणी आणि वाक्‌प्रचार, हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अनेक संदर्भांचा मुबलक वापर यामुळे परदेशातून आलेल्या धर्माचा ग्रंथ आहे असे जाणवतदेखील नाही. 
 
अकराव्या शतकात महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रापासून सुरू झालेल्या ग्रांथिक मराठी भाषेच्या इतिहासातील क्रिस्तपुराण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
.
बायबलमधील अनेक संकल्पना, ग्रीक पारिभाषिक शब्द, बायबलच्या जुन्या आणि नव्या करारामधील अनेक घटना मध्ययुगीन काळातील गोमंतकीय सामान्य जनतेला समजतील अशा शब्दांत सांगण्याचा यशस्वी प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये वाढलेल्या नवख्रिस्ती लोकांची धर्मग्रंथाची गरज लक्षात घेऊन फादर स्टीफन्स यांनी क्रिस्तपुराणाची रचना केली.
.
फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इंग्लंडमधील विल्टशायर परगण्यात बुशटन गावी 1549 साली झाला. थॉमस स्टीफन्सने 20 ऑक्टोबर 1575 रोजी रोम येथे संत इग्नाती लोयोलाकर यांनी स्थापन केलेल्या येशूसंघात प्रवेश केला. फादर थॉमस स्टिफन्स हे गोव्यात येणारे पहिले ब्रिटिश जेसुईट फादर. 24 ऑक्टोबर 1579 रोजी थॉमस स्टीफन्सने आपले मिशनकार्य सुरू केले.
 
फादर स्टीफन्स यांचे गोव्यातील सासष्टी भागात धर्मगुरुपदाचे कार्य सुरू झाले. गोव्यातील रायतूर येथील येशूसंघाच्या कॉलेजचे रेक्टर म्हणून 1590 ते 1594 या काळात त्यांनी काम पाहिले. वसईतील 1611-12 या काळातील मराठी अध्यापनाचा काळ वगळता स्टीफन्स यांनी भारतातील आपली सर्व हयात गोव्यातच घालविली. 35 वर्षे त्यांनी मडगाव, बेनावली आणि नावेली या भागात धर्मगुरू म्हणून काम केले.
 
`दौत्रिना क्रिस्ता’ किंवा `क्रिस्तीधर्मतत्त्वसार, आर्त द लिंग्वा कानारी हे कोकणी भाषेचे व्याकरण आणि क्रिस्तपुराण यांचा फादर स्टीफन्स यांच्या साहित्यसंपदेत समावेश होतो.
या साहित्यकृतीपैकी दौत्रिना क्रिस्ता हे पुस्तक कॅथेकिझम स्वरूपाचे म्हणजे कॅथोलिक धर्माची मूळ तत्त्वे समजावून सांगणारे आहे. मात्र गोमंतकीय कोकणीचे हे पहिलेच ज्ञानपुस्तक असल्याने भाषिक इतिहासाच्या संदर्भात हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. दौत्रिना क्रिस्ता लिंग्वा ब्रामण कानारी या शीर्षकाखाली हे पुस्तक सर्व प्रथम 1622 साली छापण्यात आले. 
 
या आवृत्तीची एक प्रत सध्या पोर्तुगालमधील लिस्बन सरकारी ग्रंथालयात असून दुसरी प्रत रोमच्या व्हॅटिकन ग्रंथालयात आहे.
 
कोकणी भाषेतील पहिले व्याकरण लिहिण्याचे श्रेय फादर स्टीफन्स यांना दिले जाते. ‘आर्त द लिंग्वा कानारी’ या नावाने हे व्याकरण प्रसिद्ध आहे. ‘कानारी’ म्हणजे कन्नड भाषा नव्हे. त्याकाळात कोकणी भाषा कानारी म्हणून ओळखली जात असे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची भाषा म्हणजे कानारी भाषा असे स्पष्टीकरण इतिहाससंशोधक अ.का. प्रियोळकर यांनी दिले आहे. अतिपूर्वेकडील भाषेचे एका युरोपियन व्यक्तीने रचलेले हे पहिलेच व्याकरण. 
 
‘क्रिस्तपुराण’ ही फादर थॉमस स्टीफन्स यांची सर्वात महत्त्वाची साहित्यकृती. पूर्णतः भारतीय पारंपरिक शैलीत लिहिलेल्या या क्रिस्तपुराणामुळे फादर स्टीफन्स यांचे नाव मराठी भाषेच्या इतिहासात चिरंतन राहणार आहे. या पुराणाचे लेखन फादर स्टीफन्स यांनी 1614 साली पूर्ण केले आणि या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1616 साली छापण्यात आली.
त्याकाळात देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित न झाल्याने हा ग्रंथ त्यांना रोमन लिपीत छापावा लागला. 
 
क्रिस्तपुराण ज्यांच्यासाठी लिहिले गेले त्यांना मूळचा आशियाई असणाऱ्या परंतु पाश्चात्यांमार्फत भारतात पोहोचलेल्या ख्रिस्ती धर्माचा परिचय व्हावा यासाठी फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाला पूर्ण भारतीय पेहराव दिला. या पेहरावामुळे ख्रिस्ती धर्माची ओळख करून घेण्यास स्थानिक लोकांना अडचण आली नाही. 
 
उदा. स्वर्ग, सैतान, नरक या संकल्पना स्थानिक जनतेला समजणे शक्यच नव्हते. फादर स्टीफन्स यांनी त्यासाठी वैकुंठ, देवचर, यमपुरी अशा सर्वांनाच सुपरिचित असलेल्या संकल्पनांचा वापर करून वाचकांशी अधिक जवळीक साधली. 
 
येशूच्या नावाचे देशीकरण करण्यासाठी या ग्रंथकर्त्याने स्वामी, तारक, आनंदनिधी, परमेश्वर, जगद्गुरू, मोक्षराज, गोसावी अशा अनेक उपाधींचा आधार घेतला.
फादर स्टीफन्स यांनी आपल्या पुराणाची सुरुवात पुढील ओवींनी केली आहे.
 
ओ नमो विश्वभरिता । देवा बापा सर्वसमर्था ।
परमेश्वरा सत्यवंता । स्वर्ग पृथ्वीचा रचणारा ॥1॥
तूं ॠद्धिसिद्धिचा दातारू । कृपानिधी करूणा करू
तूं सर्व सुखाचा सागरू । आदि अंतु नातुडे ॥2॥
तूं परमानंदु सर्वस्वरूपु । विश्वव्यापकु ज्ञानदिपु ॥
तूं सर्वगुणी निर्लेपु । निर्मळू निर्विकारू स्वामिया ॥3॥
तूं अदृष्टु तूं अव्यक्तू ।समदयाळू सर्वप्राप्तु ।
सर्वज्ञानु सर्वनितीवंतू । एकूची देवो तूं ॥4॥
तू साक्षात परमेश्वरू । अनादसिद्धू अपरांपरू ।
आदि अनादि अविनाशु अमरू । तुजें स्तवन त्रिलोंकी ॥5॥
 
शांताराम बंडेलू संपादित क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 962 ओव्या आहेत, तर लंडन येथील स्कूल ऑफ ओेरिएंटल ॲन्ड आफ्रिकन स्टडीज येथील विल्यम मर्सडन यांच्या संग्रहातील क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 641 ओव्या आहेत.
 
या पुराणग्रंथात ग्रंथकर्त्याने ओवी छंदाचा वापर केला आहे. ओवी छंदात चार पंक्ती असून पहिल्या तीन पंक्तीत यमक साधलेले असते.
 
गोव्यातील वादग्रस्त ठरलेल्या इन्क्विझिशनच्या काळात प्रत्येक साहित्याचा मजकूर काळजीपूर्वक तपासला जात असे, आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब नष्ट केला जाई. इन्क्विझिशन मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलाही मजकूर प्रसिद्ध करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इन्क्विझिशन मंडळाची परवानगी मिळाल्यानंतरच क्रिस्तपुराण छापण्यात आले. 
 
इंग्रजी भाषेतील अनेक म्हणी आणि वाक्‌प्रचारांचे क्रिस्तपुराणातील मराठी भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. उदा. ‘Rome was not built in a day' े’ या सुपरिचित म्हणीचे क्रिस्तपुराणात ‘एके दिवशी रोमनगरी । उभविली नाही’ असे भाषांतर करण्यात आले आहे. ‘वार्म लव्ह’ या वाक्‌प्रचारास ‘उन्हु मोहो’ असे संबोधण्यात आले आहे.
 
फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाच्या तीन आवृत्त्या 1616,1649 आणि 1654 साली प्रसिद्ध केल्या. आज यापैकी कुठल्याही आवृत्तीची एकही प्रत कुठेही उपलब्ध नाही. 
 
गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सिस द लाव्होर याने 1648 साली कायदा करून तीन वर्षांच्या आत गोव्यातील सर्व स्थानिक भाषांची हकालपट्टी करून सर्व व्यवहार पोर्तुगीज भाषेतच करण्याचा निर्णय घेतला. या धोरणानुसार मराठी भाषेतील सर्व पुस्तके जप्त करण्यात आल्यामुळे फादर स्टीफन्स यांचे क्रिस्तपुराणही लोकांच्या नजरेआड झाले. पोर्तुगीजांच्या या धोरणामुळे क्रिस्तपुराणाच्या वापरावर बंदी आली. 
 
व्हॉईसरॉयच्या या आदेशामुळे गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेची आणि त्याचबरोबर तेथील मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचीही वाढ खुंटली. 
 
क्रिस्तपुराणाच्या आणि मराठी भाषेच्या सुदैवाने गोव्याबाहेर मेंगलोर वगैरे भागातील ख्रिस्ती समाजात क्रिस्तपुराणाचे वाचन आणि निरूपण कायम राहिले आणि या साहित्यिक ऐवजाचे अशाप्रकारे जतन झाले. या क्रिस्तपुराणाची अनेक हस्तलिखिते तयार झाली. अशी अनेक हस्तलिखिते जमवून त्यांच्या साहाय्याने 1907 साली मेंगलोर येथे जोसेफ साल्ढाणा यांनी क्रिस्तपुराणाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली.
 
क्रिस्तपुराणाच्या वरील चारही आवृत्त्या रोमन लिपीत छापलेल्या होत्या. त्यामुळे मराठीतील या श्रेष्ठ साहित्यकृतीकडे मराठी सारस्वतांचे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे क्रिस्तपुराण मराठी साहित्यक्षेत्रात पूर्णतः दुर्लक्षित राहिले. 
 
दरम्यान पुणे धर्मप्रांताचे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांनी क्रिस्तपुराणातील येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील काही भाग देवनागरी लिपीत आणला. आर्चबिशप डोरिंग हे मूळचे जर्मनीचे. आर्चबिशप डोरिंग यांनी क्रिस्तपुराणाच्या देवनागरीत आणलेल्या काही भागांच्या तीन पुस्तिका छापल्या होत्या. 
 
संपूर्ण क्रिस्तपुराण मराठीच्या देवनागरी लिपीत प्रकाशन होण्यासाठी मात्र 1956 साल उजाडावे लागले. त्यावेळी शांताराम बंडेलू यांनी संपादित केलेली ही देवनागरी आवृत्ती य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनने प्रसिद्ध केली.
 
फादर स्टीफन्स यांचे वयाच्या 70 व्या वर्षी ओल्ड गोव्यातील बॉम जेजू या चर्चच्या आवारातील धर्मगुरू निवासात निधन झाले. संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष असलेल्या या चर्चशेजारील हे धर्मगुरू निवास अजूनही आपल्याला पाहायला मिळते. 
 
फादर स्टीफन्स यांच्या स्मारकाची मात्र नक्कीच गरज नाही. ‘क्रिस्तपुराण’ या आपल्या वाङ्मयकृतीमुळे मराठी साहित्यात त्यांना चिरंतन स्थान लाभले आहे.

^^^

शांताराम बंडेलूकृत 'क्रिस्तपुराण' ग्रंथाचे कव्हर - मूळ चित्र " द मास्टर - अँजेलो डी फोन्सेका 
 
---
`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २००३) या पुस्तकातील एक प्रकरण
 
Camil Parkhe 

Sunday, February 28, 2010

Book salutes missionary contributions




28 Sep 2003, Times of India, Pune

PUNE: A compilation of biographies (in Marathi) of early Christian missionaries in India, emphasising their social saga and triumph was released in the city on Saturday. Authored by The Times of India journalist Camil Parkhe, the book 'Christi Missionaryanche Yogdaan' (Christian missionaries' contribution) was released in the presence of the Bishop of Pune Valerian D'Souza by Sada Dumbre, editor, Saptahik Sakal. The function was held at the Patrakar Bhavan. On the cover page is an ode to the Marathi language, written amazingly in flowing Marathi, nearly 400 years ago around Chhatrapati Shivaji's birth) by British-born, Goa-based Fr Thomas Stephens. And on the back cover is a verse by Rev. Narayan Waman Tilak. These quotes set the tone for the series of 24 inspirational biographies. From well-known names like Pandita Ramabai, Mother Teresa and Fr Graham Staines, to less ‘famous' missionaries who walked the remote countryside, embraced local language and culture and set benchmarks in various fields.