Did you like the article?

Tuesday, March 5, 2019

अभिनंदन, दहावीत बोर्डात तुझा पहिला नंबर आला! SSC results


अभिनंदन, दहावीत बोर्डात तुझा पहिला नंबर आला!
कॅम्पस रिपोर्टर नात्याने मे महिन्याचा अखेरचा आठवडा माझ्या दृष्टीने अगदी तणावाचा असायचा. या काळात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेले गोवा, दमण आणि दीव एसएससी बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करत असे. त्यानिमित्त पणजीतल्या मांडवी हॉटेलात एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद एक वार्षिक सोहोळा असे.
त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होई.  दुदैवाने एसएससी बोर्डाची ही पत्रकार परिषद मला कधीच एन्जॉय करता आली नाही. याचे कारण परीक्षेच्या निकालाची छापील प्रत हातात पडतात मला तातडीने ते हॉटेल सोडून बातमीसाठी बाहेर पडावे लागायचे. तो दिवस म्हणजे माझ्या कॅम्पस रिपोर्टिंगचा वर्षातील सर्वांत अधिक कष्टाचा, ताणतणावाचा आणि अगदी व्यावसायिक तृप्ततेचाही असायचा.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात गोवा बोर्डाचे एसएससीचे एकूण विद्यार्थी असायचे बारा हजारांच्या आसपास आणि बारावीचे विद्यार्थी असायचे चार हजार! त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. या निकालाची तारीखही आधी जाहीर केली जात नसे. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती. संपूर्ण गोव्यात फिरून संध्याकाळपर्यंत पणजीला नवहिंद टाइम्स कार्यालयात येऊन डेडलाईन संपायच्या आत मला बातमी देणे भाग होते. ‘संपूर्ण वर्षभरात या दिवशी एक दिवस तरी कामिल भरपूर,चांगले काम करत असतो,” असे आमच्या इंग्रजी दैनिकाचे माझे मुख्य बातमीदार थोडे गंमतीने आणि अधिक तथ्य अशा शैलीमध्ये म्हणायचे. याचे कारण त्याकाळात मी नोकरीबरोबरच पदव्युत्तर शिक्षणही घेत होतो.
त्या हॉटेलातून बाहेर पडताच आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. (मोटारसायकल पायलट ही प्रवासाची आगळीवेगळी सुविधा भारतात फक्त गोव्यातच आढळते. आपल्याकडे चौकाचौकात ऑटोरिक्षा स्टॅण्ड असतात तसे त्याकाळात जागोजागी मोटारसायकल पायलट आपल्या काळ्या-पिवळ्या मोटसायकलसह गिऱ्हाईकांची वाट पाहत असत.) पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या गावी पोहोचल्यावर पहिल्यांदा मी त्यांच्या शाळेत जात असे, तेथून त्या विद्यार्थ्यांचा निवासी पत्ता घेतल्यानंतर त्या मुलाचा/मुलीचा फोटो शाळेच्या दप्तरातून उचकटून घेऊन मार्गस्थ होत असे. १९८०च्या दशकात विद्यार्थ्यांचे फोटो त्यांच्याकडे वा त्यांच्या पालकांकडे असतीलच याची शाश्वती नसायची आणि पटकन फोटो काढून घेण्याची यंत्रणाही नव्हती. शाळेच्या रजिस्टरमध्ये चिटकवलेले विद्यार्थ्यांचे फोटो उचकटून आम्हा पत्रकारांनांदेण्यास शाळांचे मुख्याध्यापक आणि इतर मंडळींनीही आधी आढेवेढे घेतले नाही याचे मागे वळून पाहताना मला आता विशेष कौतुक वाटते!
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे. ‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’  त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद  घ्यावा लागे. तो पाहुणचार चालू असताना विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यावी लागे. प्रश्न नेहेमीचेच म्हणजे पुढे काय करणार आणि होणार असे असायचे आणि त्यांची उत्तरेही एकाच पठडीतली  असायची. विशेष म्हणजे या सात-आठ वर्षांच्या काळात माझ्यावर कुणीही कधी अविश्वास दाखविला नाही वा माझे ओळखपत्र, व्हिझिटिंग कार्ड विचारले नाही. मात्र प्रत्येक कुटुंबातला पाहुणचार काही मिनिटांत आटपून मला उरलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी निघावे लागे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी तोच उपक्रम असायचा.  काही वेळेस टॉप रँकरच्या घरी गेल्यावर तेथे घराला टाळे असायचे, विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी मुंबईला वा दुसरीकडे गेलेला असायचा. अशावेळी शाळेतून घेतलेला तिचा/त्याचा फोटो कामाला यायचा.
संध्याकाळी उशिरा पणजीत ऑफिसांत पोहोचेपर्यंत पहिल्या दहा गुणवंतांपैकी दुसऱ्या, सातव्या किंवा दहाव्या गुणवंताचा फोटो वा मुलाखत नसायची. अशावेळी नवहिंद टाइम्सचे जुळे भावंड असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या स्थानिक वार्ताहराने पाठवलेला फोटो, मुलाखत माझी अब्रू वाचवायची. सर्व गुणवंताचे फोटो आणि मुलाखती छापण्यासाठी पणजीतील गोमंतक वा मडगावच्या राष्ट्रमत या दैनिकांशी आमची स्पर्धा असायची. शिवाय मिळालेला एक फोटो दुसऱ्यांशी शेअर करणे त्यावेळच्या वेळखाऊ ब्लॉक मेकिंगच्या जमान्यात अशक्य होते.
त्यावेळच्या गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात गोव्यातील दहा तालुके, दमण तालुका आणि दीव तालुका आहि एकूण बारा तालुके समाविष्ट होते. यापैकी गुजरातपाशी असलेले दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो कोस आहेत. केवळ पोर्तुगीजांचे गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांवर डिसेंबर १९६१ पर्यंत राज्य होते केवळ याच कारणांमुळे हे तीन प्रदेश एकत्र होते. बाकी भौगोलिक व सांस्कृतिकदृष्टया त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्रिही दमण आणि दीव या तालुक्यांना क्वचितच भेट देत असत. त्याकाळात दमण आणि दीव या ग्रामीण तालुक्यांतील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला नाही, या यादीत तेथील विद्यार्थी झळकले असते तर, गुणवत्ता यादीत त्यांचे केवळ नाव छापून असते, त्यांचे फोटो छापणे शक्यच नव्हते. (गोव्याला १९८६ला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर दमण आणि दीवशी या प्रदेशाचा उरलासुरलेला संबंध संपला)   
दहावी आणि बारावीच्या बोर्डांच्या निकालांचे अशा प्रकारे सूप वाजल्यानंतर मी मोटारसायकल पायलटच्या खर्चाची बिले संपादकांच्या सहीसह अकाउंट्स खात्यांकडे जमा करी, तेव्हा तेथे नेहेमीच तेच तेच सवाल-जबाब झडत असत. “एका दिवसात तीनशे रुपये प्रवास भाडे ?मोटारसायकल पायलट कशाला, बसने जाता  आले नसते का?”  या प्रश्नाला काय उत्तर देणार?  त्याकाळात पालेकर वेतन आयोगानुसार माझा मासिक पगार पाचशे तीस रुपये होता. मात्र, संपादकांकडून बिल मंजूर झाले असल्यामुळे मला ती रक्कम मिळत असे.
काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात एसएससी महामंडळाचे विभागवार बोर्ड नसायचे, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य स्तरीय, प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवरचे सगळे दैनिके संपूर्ण राज्याचा निकाल छापत असत. त्यादिवशी या सगळ्याच दैनिकांच्या खपात प्रचंड वाढ होत असे. मात्र त्याकाळात बोर्डाचा दहावीचा निकाल तीस टक्क्यांच्या आसपास असे यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. बहुतांश विद्यार्थी गणित आणि इंग्रजी विषयांत गटांगळी खाऊन शिक्षणाचा नाद सोडत असत. त्यामुळे पास झालेल्या फक्त तीस टक्केच विद्यार्थ्यांचे क्रमांक दैनिकांत छापले जायचे.
कालांतराने विभागवार एससीसी बोर्ड स्थापन झाले, आणि स्थानिक वृत्तपत्रांत फक्त त्या विभागाचा दहावी आणि बारावीचा निकाल छापून येऊ लागला. काही वर्षांनंतर परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत  सर्वच दैनिकांनी बंद केली.
आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत आहे. चाळीस वर्षांपूर्वी टेलिग्राम हिच सर्वाधिक वेगवान संपर्क सेवा होती. त्याकाळात बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यांनतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना सोळा-अठरा तासांच्या आत कळवण्यात वृत्तपत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असत. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे आज तशी गरजही राहिलेली नाही.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)