Papal visit to Bangladesh and Myanmar brings hope for minorities
Did you like the article?
Tuesday, November 26, 2024
Papal visit to Bangladesh and Myanmar brings hope for minorities
Thursday, February 22, 2024
नोकरीतील `दि एन्ड
वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.
Wednesday, February 22, 2023
चार दशकांतली माझी पत्रकारिता
वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले
वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले
आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर
सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.
एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी
गेलो. समोरच्या दालनात प्रवेश करुन तिथल्या बाजूच्या छोट्याशा केबिनमध्ये जाऊन नोकरीविषयी
चौकशी केली. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी माझी
जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी
इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो.
नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत मी क्राईम- कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा
मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन
एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ
टाइम्समध्ये सोळा वर्षे अशी इंग्रजी भाषेतील पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली.
गोव्यात कॅम्पस रिपोर्टर नात्याने मे महिन्याचा अखेरचा आठवडा माझ्या दृष्टीने अगदी तणावाचा
असायचा. या काळात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेले गोवा, दमण आणि दीव एसएससी बोर्ड दहावीचा
निकाल जाहीर करत असे. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होई. दुदैवाने एसएससी बोर्डाची ही पत्रकार परिषद मला कधीच एन्जॉय करता आली नाही. याचे कारण परीक्षेच्या निकालाची छापील प्रत हातात पडतात मला तातडीने ते हॉटेल सोडून बातमीसाठी बाहेर पडावे लागायचे.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही
दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स
दिली जात असत. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा
विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत
आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती.
त्या हॉटेलातून बाहेर पडताच आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक
मोटारसायकल पायलट गाठत असे. (मोटारसायकल पायलट ही प्रवासाची आगळीवेगळी सुविधा भारतात
फक्त गोव्यातच आढळते. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास
प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने
आम्ही निघत असू.
गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या गावी पोहोचल्यावर पहिल्यांदा मी त्यांच्या
शाळेत जात असे, तेथून त्या विद्यार्थ्यांचा निवासी पत्ता घेतल्यानंतर त्या मुलाचा/मुलीचा फोटो शाळेच्या
दप्तरातून उचकटून घेऊन मार्गस्थ होत असे.
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय
असे.
‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस.
त्याबद्दल अभिनंदन !’
त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे.
त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत
फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद घ्यावा लागे.
कालांतराने एससीसी बोर्ड परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत सर्वच दैनिकांनी बंद
केली. आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर
अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत आहे.
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही
दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. एखादी खूप मोठी महत्त्वाची बातमी असेल तर
टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. एके दिवशी सकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना
सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला
धक्काच बसला. केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती.
तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते : प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट
अँट ....'';
टेलिप्रिंटरच्या मशिनमधून सतत बाहेर पडणाऱ्या कागदांवरच्या बातम्या वाचायची माझी सवय खूप काळ
टिकली. नंतर बातम्या टाईप करताना ऑफिसांतल्या टेलिव्हिजनवरील बातम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो.
`टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुण्यातल्या ऑफिसांत एका रविवारच्या संध्याकाळी टेलिव्हिजनच्याबी एका
दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले. त्या बातम्यांत मध्येच असे काय दाखवतात तेच क्षणभर कळेना.
टेलिव्हिजन म्यूट मोडमध्ये होता, त्यानंतर तसेच आणखी एक दृश्य दाखविले गेले. आपण काय पाहतो
आहे याबाबत स्वतःवर विश्वास न बसल्याने मी इतर पत्रकारी सहकाऱ्यांचे त्या बातम्यांकडे लक्ष वेधले.
ती त्या दिवसाची नव्हे तर आगामी दोन दशकांतील सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज होती.
काही क्षणांपूर्वी अमेरिकेत न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर दहशतवाद्यांनी दोन विमाने हायजॅक करुन
आत्मघाती हल्ला केला होता. मागच्या महिन्यातच ११ सप्टेंबर २००१ च्या या घटनेचा विसाव्या वर्षांचा
स्मृतिदिन पाळला गेला. .
प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा
बातमीदार असताना कोल्हापुरच्या 'पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा होतो.
बातम्या पाठविण्यासाठी 'पुढारी'ने मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
गोव्यातून पुण्याला आल्यावर इंडियन एक्सप्रेसने सुद्धा मला टेलिग्राम कार्ड दिले होते. 'कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस (पुणे) , टेलिग्राम कार्ड एक वर्षासाठी (१९८९) ' असे लिहिलेले ते कार्ड मी अजून जपून ठेवले आहे.
काही घटना अगदी काही क्षणांच्या, मिनिटांच्या किंवा एक-दोन तासांच्याच असतात, पण कायम
आठवणीत राहतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती.
असेच एकदा कुठल्याशा एका साहित्य संमेलनासाठी पणजीहून आम्ही काही बातमीदार कारने निघालो
होतो. बहुधा रणजित देसाई उद्घाटक असलेले म्हापसा येथील ते कोकणी साहित्य संमेलन असावे.
संमेलनासाठी पत्रकारांना घेऊन जाणाऱ्या आयोजकांनी आमच्या गाडीत एका महनीय पाहुण्यालाही घेतले
होते. ही व्यक्ती होती मानेपर्यंत रुळणारे केस असणारे आणि खांद्यावर घडी केलेली शाल टाकलेले ज्येष्ठ
कवी बा. भ. बोरकर!
‘बाकीबाब बोरकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कवीच्या कविता आपण शाळेत शिकलो, तो कवी
आज आपल्यासोबत बसून गप्पा मारतो आहे, हे माझ्यासारख्या तरुण बातमीदारासाठी अविश्वसनीय होते.
पणजीला कंपाल येथे कला अकादमीचे भव्य, देखणे संकुल उभारले, त्यानंतर लवकरच तेथे गोवा, दमण
आणि दीव सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एक नाट्यक्षेत्रातील लोकांसाठी चार दिवसांची कार्यशाळा
आयोजित करण्यात आली होती. बातमीदार म्हणून मला मात्र त्या चारही दिवसांच्या कार्यशाळेला
उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आपण रंगभूमीवरील काही मोठ्या व्यक्तींबरोबर वावरत आहोत, याची
मला लगेचच जाणीव झाली होती.
रंगभूमीवर मोठे योगदान आणि वावर असलेल्या त्या व्यक्तींपैकी केवळ एकच नाव मला तेव्हा परिचित
होते. ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी. सर रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच प्रदर्शित
झाला होता. या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका केल्याने रोहिणी हट्टंगडी या एकदम
प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांचे पती जयदेव हट्टंगडीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी इथे मराठी रंगभूमीवरील दादा मंडळी आहेत, हे लक्षात आले होते. त्यापैकी एक होत्या
विजया मेहता, दुसरे होते महेश एलकुंचवार. मी स्वतः त्या वेळी नुकतीच विशी ओलांडली होती आणि
रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, निळ्या जिन्सवर इन-शर्ट असणारे महेश एलकुंचवार हे लोकसुद्धा त्या
वेळी ऐन तरुणाईतच होते. मूळ गोव्याचे असलेल्या दामू केंकरे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनात
महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
गोव्यात १९८३ साली राष्ट्रकुलातील ३९ देशांतील प्रमुखांची - राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान- यांची
अनौपचारिक बैठक (कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग - चोगम रिट्रीट) पार पाडली, तेव्हा
गोव्यातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. बेदी या भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) पहिल्या महिला अधिकारी. ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून बेदी यांच्याशी त्या काळात जवळपास रोजच संबंध आला. या काळात वॉकी-टॉकीचा अवजड बॉक्स असलेल्या जिप्सी जीपमधून त्यांच्यासह मी दाबोळी विमानतळ ते आग्वाद ताज व्हिलेजपर्यंत रंगीत तालमीसाठी फिरायचो. पुढे देशभर नाव कमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याशी बातमीदार म्हणून एकेकाळी अगदी वैयक्तिक संबंध होते, याचा आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो.
अशीच गोष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबाबाबत. गोवा सोडून पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला
रुजू झाल्यानंतर हजारे यांच्या राळेगण सिद्धीला अनेकदा गेलो, तेथे काही दिवस मुक्कामही केला. अण्णा
पुण्यात शनिवार पेठेतल्या राष्ट्रभाषा भवनात राहायला आल्यावर हमखास आमच्या भेटी व्हायच्या,
पत्रव्यवहारही असायचा. नंतर या भेटी विरळ होत गेल्या, गेली कित्येक वर्षे तर प्रत्यक्ष भेट किंवा
फोनवरही संभाषण नाही. मात्र राळेगण आणि हजारे यांच्याशी असलेले जुने संबंध आजही विसरलेलो नाही.
आम्हां दोघांचे कृष्णधवल, काही रंगीत फोटो आणि काही पत्रव्यवहार आजही मी जपून ठेवले आहेत.
पुण्यातील ‘आयुका’चे संचालक असलेले डॉ. जयंत नारळीकरांची खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संगीता
जैन-जहागिरदार आणि मी मुलाखत घेतली. एक तास चाललेल्या या मुलाखतीत नारळीकर यांनी
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज त्यांना जगातील कुठल्याही व्यक्तीचा शोधनिबंध ‘इलेक्ट्रॉनिक मेल’मुळे काही
क्षणात उपलब्ध होतो, असे म्हटले तेव्हा मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. ते साल होते १९९१ आणि
सर्व क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार होते.
त्या वेळी माझ्या अगदी डोक्यावरून गेलेल्या ‘ई-मेल’शिवाय आज कुणाचे चालू शकणार आहे का?
छापलेल्या मुलाखतीची वृत्तपत्रांतील कात्रणे मी डॉ. नारळीकरांना एक छोटेशा पत्रासह पोस्टाने पाठवली,
तेव्हा उलटटपाली मला पाठवलेल्या माझ्या त्याच टाईप केलेल्या पत्रावर नारळीकरांनी दोन ओळींत
धन्यवाद दिले होते. नारळीकरांच्या स्वाक्षरीचा तो ३० वर्षांपूर्वीचा तो कागद आजही माझ्या संग्रही आहे.
काही महिन्यांपूर्वी डॉ. नारळीकरांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याची बातमी
ऐकली, तेव्हा त्या भेटीची चित्रफित नजरेसमोर झळकली.
शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेत म्हणून बीबीसीचे दिल्लीतील वार्ताहर पुण्यात आले आहेत.
उद्या पुणे आणि बारामतीच्या लोकसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या ते देणार आहेत. त्यांना एक
स्थानिक बातमीदार मदतीला हवाय. तुला हे काम करायला आवडेल काय?
पुण्यातील इंडियन एक्सप्रेसचे वार्ताहर नरेन करुणाकरन याने मला विचारले आणि मी ताबडतोब होकार
दिला. बीबीसीचे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांच्या पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील
निवडणुकीच्या वृत्तसंकलनाच्या कामात असा मी सहभागी झालो.
ही घटना जून १९९१ मधली आहे. दिनांक २० मेला लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या पहिल्या फेरीतील
मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीव गांधींची हत्या झाली होती. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसचे
अध्यक्षपद रिते झाले आणि या पक्षाला पंतप्रधानपदासाठीही उमेदवार राहिला नाही. राजकारणातून निवृत्ती
जाहीर केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. व्ही. नरसिंह राव अचानक काँग्रेसचे अध्यक्षच बनले. त्याकाळात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते काँग्रेसला सत्ता मिळाल्यास आपण पंतप्रधानपदासाठी उमेदवार असू
शकतो हे पवारांनी जाहीर केले होते. त्यामुळे शरद पवारांवर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झाले होते.
बारामतीत आम्हा पत्रकारांशी बोलणे संपवून शरद पवार आपल्या गाडीकडे वळणार तोच सॅम मिलर आणि आमच्याबरोबर असणाऱ्या काही पत्रकारांनी त्यांना इंग्रजीत मुलाखत देण्याची विनंती केली. बीबीसी आणि राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींकडून ही विनंती आल्यावर पवारांनी क्षणभरच विचार केला.
''मी पुण्यातून दुपारच्या विमानाने दिल्लीला जात आहे, त्यामुळे घाईत आहे. तुम्ही असे करा, तुम्ही माझ्या गाडीतच बसा. लोहगाव विमानतळापर्यंत माझ्याबरोबर या. प्रवासात आपल्याला बोलता येईल
आणि माझे विमानही चुकणार नाही.' पवार यांनी सुचविले.
हे ऐकताच आम्ही त्यांच्या गाडीच्या दिशेने अक्षरश: झेपावलोच.
पवार स्वतः: गाडीत पुढे ड्रायव्हरशेजारी बसले. त्यांचा स्टेनगनधारी बॉडीगार्ड ड्रायव्हरच्या सिटमागे बसला
होता. मी स्वत: पवारांच्या मागे, माझ्याशेजारी सॅम आणि पुण्याच्या इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण
बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसण्याचा असा योग्य क्वचित कुणाला लाभतो.
बारामती ते लोहेगाव विमानतळापर्यंत प्रवास करत पवार यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर
पवार यांची विस्तृत मुलाखत मी माझ्या पोर्टबल टाईपरायटरवर टाईप केली आणि पोस्टाने गोव्यात
पणजीला `नवहिंद टाइम्स’ला पाठवून दिली. मुलाखतीच्या घटनेनंतर सहासात दिवसांनी ही मुलाखत
माझ्या बायलाईन म्हणजे नावानिशी पान एकवर आठ कलमांत प्रसिद्ध झाली. इतक्या दिवसांच्या
उशिरानेसुद्धा त्या मुलाखतीचे बातमीमूल्य संपले नव्हते.
आज वृत्तपत्रांकडे कुठलीही बातमी, पत्र किंवा लेख पाठविण्यासाठी पोस्टाच्या सेवेची गरज भासत नाही. ईमेलच्या मदतीने काही क्षणात हा मजकूर हव्या त्या वृत्तपत्रांत आणि योग्य व्यक्तींकडे पाठवता येतो, याबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीला अजूनही नवल वाटते.
प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही,
सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. दिनांक २९ जुलै १९८१ला पार पडलेला हा शाही विवाह त्या
काळात सर्वाधिक लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिलेली घटना होती.
जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेली या घटनेचा वृत्तांत देण्याबाबत पणजी येथे 'नवहिंद
टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी मोठी व्यूहरचना केली होती. लग्नाची बातमी पीटीआय वगैरे
वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते.
१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस लंडन येथील या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी भारतात
मिळणे अशक्यच होते.
जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यात टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले
तरी 'द नवहिंद टाइम्स'चे संपादक बिक्रम व्होरा हे मिरामार येथील आपल्या बंगल्यात गोव्यात
टेलिव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये होते.
गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे संपादक व्होरांनी
ठरविले होते. त्यानुसार लग्नाच्या तारखेच्या आधी काही दिवस फोटोग्राफर संदिप नायक याने संपादकांच्या
घरी जाऊन रंगीत तालीम घेतली.
लग्नाच्या दिवशी संध्याकाळी त्या शाही लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे
संदिप कॅमेराची बटणे खटाखट दाबू लागला. लग्नाचे व्हिजुल्स संपेपर्यंत संदिप तणावाने घामाघूम झाला
होता.
त्यानंतर . एक तासानंतर संदिप फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता. संपादकांनी
त्यापैकी एका फोटोची छापण्यासाठी निवड केली.
दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्सच्या पान एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला आणि
फोटो कॅप्शनवर दूरदर्शन फोटो संदिप नाईक यांचा' अशी बायलाइनही होती !
त्याकाळात द नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते. दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच
मराठी वृत्तपत्रांनीं चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद
टाइम्सकडेच होता !
नोव्हेंबर १९८९च्या निवडणुकीनंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काही महिन्यानंतर राजीव गांधी यांनी
पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मी हजर होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने मीही माझा प्रश्न
वाचला होता आणि त्यास राजीव यांनी उत्तर दिले होते.
पत्रकार परिषदेनंतर राजीव गांधी हॉलच्या दरवाज्यापाशी उभे राहिले आणि आम्हा प्रत्येक बातमीदारांशी
हस्तांदोलन केले. सफेद कपडे आणि गळ्याभोवती उपरणे असलेल्या राजीव गांधींशी हस्तांदोलन करताना
‘कामिल पारखे फ्रॉम इंडियन एक्सप्रेस’ अशी मी स्वतःची ओळख करून दिली, तेव्हा मंद स्मितहास्य
करणाऱ्या राजीव यांचा चेहरा आजही माझ्या नजरेसमोर ताजातवाना राहतो.
पंतप्रधानांबरोबर अर्धा तास बोलत बसण्याची एक संधी मला अचानक मिळाली. त्याची कथा अशी :
“पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आज दुपारी बारा वाजता पुणे विमानतळावर काही वेळ थांबणार आहेत.
त्यांना भेटायचं असेल तर पत्रकारांसाठी वाहन व्यवस्था व्यवस्था केली आहे.!” एका सकाळी हा निरोप
मला मिळाला. त्या वेळी म्हणजे १९९० मध्ये मोबाइल फोन नव्हते.
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात हा निरोप मिळाल्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो.
माझ्याबरोबर बातमीदार मुकुंद संगोराम होते. पण ठरलेल्या जागी प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरो (पीआयबी)चे
कुणीही अधिकारी नव्हते. थोडा वेळ वाट पाहून संगोराम यांच्या दुचाकीनेच विमानतळावर आम्ही पोहोचलो.
पत्रकार म्हणून आम्हाला लगेच तेथील व्हीआयपी कक्षाकडे नेण्यात आलं आणि मला आश्चर्याचा धक्काच
बसला. त्या अत्यंत छोट्याशा काचेच्या कक्षात दोनच व्यक्ती बसल्या होत्या. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप
सिंग आणि जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा मृणाल गोरे !
त्यावेळी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी हवाई दलाच्या खास विमानानं दिल्लीहून पुण्याला येण्यास नकार
दिला होता.. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत
जनता दलाच्या प्रचारासाठी पंतप्रधान सिंग आले होते आणि हा निवडणूक प्रचार दौरा, हे पक्षाचं काम
असल्यानं त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यास सिंग यांनी नकार दिला होता.
पंतप्रधान सिंग आणि मृणालताई गोरेंसमोर आम्ही दोघं बसलो. त्या कक्षात पंतप्रधानांचे कुणीही सचिव,
शासकीय अधिकारी वा शरीररक्षकही नव्हते. त्या दृष्टीनं ही एक अभूतपूर्ण प्रेस कॉन्फरन्स म्हणावी
लागेल! असा अनुभव एखाद्या पत्रकारास क्वचितच आला असेल असं मला वाटतं. यापुढे तर असा प्रसंग
कधीही येणार नाही, असं आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या समस्येच्या
कारणामुळे वाटतं.
१९८०च्या दशकापर्यंत केवळ अतिश्रीमंत लोकांकडे आणि वरच्या हुद्द्याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे
लँडलाईन टेलिफोन असायचे. पत्रकार वगैरेंना खास बाब म्हणून टेलिफोन दिले जायचे. गोव्यात आमच्या
नवहिंद टाइम्समध्ये केवळ म्हापसा, मडगाव आणि वॉस्को शहरांत स्ट्रिंगर बातमीदार होते, त्यांच्याशी
आणि पणजीबाहेरील पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलण्याची गरज असे. .
त्याकाळात एसटीडी (म्हणजे सबस्क्रायबर ट्रँक डायलिन्ग) सुविधा नसल्यास बीएसएनलच्या ऑपरेटरशी
बोलून ऑर्डीनरी, अर्जंट किंवा लायटनिंग कॉल बुक करावा लागे. ऑर्डिनरी कॉल कधी लागेल याची खात्री
नसायची, लायटनिंग कॉल खूप महाग असायचा, मात्र नोंद होताक्षणी बोलणे शक्य असायचे.
पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हाची गोष्ट. त्याकाळात म्हणजे १९८९ साली नव्यानेच सुरु
झालेल्या `इंडियन एक्सप्रेस’ आणि `लोकसत्ता’च्या पुणे आवृतींचे बातमीदार पुण्यात तर डेस्कचा स्टाफ
मुंबईत असायचा. आमच्या इंग्रजीतल्या बातम्या टेलिप्रिंटरमार्फत मुंबईला पाठवल्या जायच्या. मात्र
मुंबईतल्या डेस्कवरच्या आणि इतर लोकांशी संभाषण करण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा होती, ती
म्हणजे हॉटलाईन. लॅण्डलाइनसारखेच असणारे ते उपकरण उचलले कि तिकडे मुंबईत घंटी वाजायची आणि
कुणीतरी तिकडे ते उपकरण उचलले तर लगेच संभाषण व्हायचे.
मोबाईलचा जमाना येण्याच्या दोन दशके आधीची ही सुविधा, त्यामुळे या हॉटलाईनचे खूपच अप्रूप
वाटायचे. त्याआधी पाचसहा वर्षे आधी गोव्यात कॉमनवेल्थ राष्ट्रप्रमुखांची फोर्ट आग्वाद येथे शिखरपरिषद
झाली तेव्हा ताज कॉटेजमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी, ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर,ऑस्ट्रेलियाचे
पंतप्रधान रॉबर्ट (बॉब) हॉक वगैरेसाठी त्यांच्या सुसज्ज कॉटेजेसमध्ये त्यांच्या-त्यांच्या देशांशी संपर्क
साधणारी हॉटलाईन्स नावाच्या संपर्काच्या अत्याधुनिक यंत्रणा देण्यात आल्या होत्या हे बातमीदार या
नात्याने केवळ ऐकून होते, इंडियन एक्सप्रेसमध्ये आता हॉटलाईन म्हणजे नक्की काय, ती कशी
वापरायची याचे प्रात्यक्षिक मिळाले.
गोव्यात टेलिव्हिजनचे युग यायला तसा उशीरच लागला. मुंबईतल्या टेलिव्हिजन टॉवर आल्यानंतर काही
काळानंतर पणजीत अल्तिन्हो येथे टेलिव्हिजन टॉवर उभारला गेला आणि आम्ही पहिल्यांदाच ब्लँक अँड
व्हाईट का होईना पण टेलीव्हिजनच्या पडद्यावर वर धावती चित्रे पाहू लागलो. त्याकाळात नवहिंद
टाइम्सचे फोटोजर्नालिस्ट असलेले सुनील नाईक हे मुंबई दूरदर्शनसाठी व्हिडीओजर्नालिस्ट (आधुनिक
तंत्रज्ञान, त्यानुसार नवे पद !) म्हणूनही काम करत असत. खांद्यावर एक छोटासा कॅमेरा खांद्यावर घेऊन
नाईक एखाद्या कार्यक्रमाची शूटींग करत असत, त्यावेळी त्या कॅमेरातून घर्रघर्र असा आवाज येत असे.
शूटींग काही सेकंदांचेच असायचे.
अनेकदा नाईक प्रेसकक्षात बसलेल्या आम्हा लोकांवरूनसुद्धा कॅमेरा फिरवत असत. दुसऱ्या दिवशी त्या
शुटिंगचे रील्स विमानाने मुंबई दूरदर्शनच्या कार्यालयात पाठविले जाई आणि संध्याकाळच्या सात
वाजताच्या प्रादेशिक बातम्यांत त्या कार्यक्रमाची झलक दिसायची, क्वचित त्यात आमचीही छबी
झळकायची. विशेष म्हणजे त्याकाळात खासगी टेलिव्हिजन चॅनेल्स किंवा न्यूज चॅनेल्सही नव्हते आणि
राष्ट्रीय व प्रादेशिक बातम्या दिवसातून एकदोनदाच दाखविल्या जायच्या !
१९८६ साली मला पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रशिया,-बल्गेरिया येथे
जाण्याची संधी मिळाली होती. परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू
म्हणजे अडीच किलो वजनाचा एक नाजुकसा आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा. त्याकाळात
पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो ! याच
काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.
१९८०च्या दशकाअखेरीस दैनिकांनी आपला कृष्णधवल रंग बदलून रविवारच्या पुरवण्यांसाठी रंगीत पाने
देण्यास सुरुवात केली. मी १९८८ ला औरंगाबादला `लोकमत टाइम्स’ला रुजू झालो तेव्हा `लोकमत’च्या
रविवार पुरवण्यांची सर्व रंगीत पाने मुंबईत तयार होऊन छपाईसाठी दोनतीन दिवस आधी औरंगाबादला
येत असत. या वृत्तपत्र समूहात औरंगाबादला रंगीत पानांसाठी मोठे महागडे स्कॅनर मशिन आणले गेले,
तेव्हाचा जल्लोष आणि कौतुकाचे वातावरण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.
एखाद्या पत्रकार परिषदेतून, राजकिय किंवा इतर कार्यक्रमांनंतर दैनिकाच्या कार्यालयाकडे परतताना त्या
बातमीची लीड किंवा इंट्रॉ काय करावा असा विचार मनात घोळत असे. हल्ली मोठी किंवा लहान बातमी
हाती पडली कि लगेच मोबाईलवर ऑनलाईन आवृत्तीसाठी एकदोन वाक्यांची बातमी पाठवली जाते,
बातमीदार ऑफिसांत पोहोचेपर्यंत त्या बातम्या कधीच वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालेल्या असतात.
टेलिव्हिजनच्या आउट ब्रॉडकास्टिंग व्हॅन्समुळे (ओबीव्ही ) घटना किंवा कार्यक्रम होत असताना थेट लाईव्ह
प्रक्षेपण आता केले जाते याचे आता आपलयाला नाविण्य वाटत नाही इतकी तंत्रज्ञानाच्या बाबतीत
मानवाने मोठी मजल मारली आहे.
दहा वर्षांपूर्वी जॅकलिन आणि आमची मुलगी आदिती यांच्यासह युरोपमध्ये सहलीवर असताना तेथे
प्रवासवर्णन लिहिण्याची उबळ मला स्वस्थ बसू देईना. आम्ही राहत होतो त्या हॉटेलांत लॉबीमध्ये
पाहुण्यांना मोफत इंटरनेट सुविधा असायचे किंवा तासाला एक युरो फी असायची. तीन आठवड्यांच्या त्या
सुट्टीत मी तीनचार लेख लिहिले आणि ईमेलने पुण्याला `सकाळ टाइम्स’ला पाठवून दिले. तिसऱ्या किंवा
चौथ्या दिवशी हे लेख प्रसिद्ध व्हायचे, ते आमच्या दैनिकाच्या वेबसाईटवर, ईपेपरवर मला युरोपमध्ये
पॅरीस, रोम आणि व्हेनिस या शहरांत दिसायचे, ते पाहून खूप आनंद व्हायचा, वेगाने प्रगत होणाऱ्या
तंत्रज्ञानाविषयी कौतुक वाटायचे. `
फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि
`सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या
निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार
असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.
`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी
आजही जपून ठेवले आहे.
पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्या
एकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो.
कोरोना साथीने थैमान मांडले तेव्हा एप्रिल २०२० ला सकाळ टाइम्स बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने
घेतला. त्या दिवशी पिंपरी चिंचवडच्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले.
डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही
मजकूर आणि फोटो पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन मग तिथले सर्व डिलीट केले. डेस्कमधील सगळ्या
ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या. त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून
त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून
घेतले.
पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ
माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.
पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, खूप खूप अनुभवले
होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
ओ, व्हॉट अ फिलिंग !
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते..
Thursday, September 8, 2022
मर्सिडीझ कार आणि बिझिनेस कॉरस्पॉन्डन्ट
Sunday, March 14, 2021
The Shaping Of A Destiny: Moving From Aurangabad To Pune
Saturday, October 27, 2018
पत्रकारितेतील स्त्रिया Women in Journalism
वृत्तपत्रांतील पुरुषप्रधान संस्कृतीस हादरा बसला तो जेव्हा महिलांनी वेगवेगळ्या विभागातील प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्या हाताखाली अनेक पुरुष आणि महिला काम करू लागली तेव्हा. तोपर्यंत अनेक पुरुषांनी बॉस महिलाच्या हाताखाली काम केलेले नसायचे. त्यामुळे अनेक पुरुषांना महिलांच्या हाताखाली काम करणे, एक महिला आपली बॉस असणे अशी कल्पनाच भयानक वाटत असे.