पंडित भीमसेन जोशी
पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या  इंडियन एक्सप्रेसला मी रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. साल होते १९९०. 
गोव्यात पणजीला हायर सेकंडरी, पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिथेच `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात पत्रकारीतेला सुरुवात केली होती. या दीर्घ कालावधीत महाराष्ट्रातल्या  सांस्कृतिक घडामोडींशी फारसा संबंध राहिला नव्हता. 
पुण्यात तर कधी राहिलोही नव्हतो.  या शहरात बातमीदारी करताना हळूहळू येथील लोकजीवनाची आणि विविध क्षेत्रांतली  प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख होत होती. 
गोव्याच्या तुलनेत विविध क्षेत्रांत आपापला दबदबा  राखून असलेली अशी दिग्गज मंडळी येथे खूप मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे  नरुभाऊ लिमये, पु ल देशपांडे, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरूप, शकुंतला परांजपे, विद्या बाळ ही त्यापैकी काही  ठळक नावे. 
त्या एका रविवारच्या संद्याकाळी आम्हा बातमीदाराच्या दैनंदिन डायरीत माझ्या नावावर एक कार्यक्रम लिहिला होता. 
पुण्यातल्या आमच्या `इंडियन एक्सप्रेस'मध्ये त्यावेळी मुख्य वार्ताहर नव्हता. आताचे आम्ही सर्व बातमीदार लोक विशीतले होतो, नरेंद्र करुणाकरन, शुभा गडकरी, संगीता जहागिरदार-जैन, अवर्तिन्हो मिरांडा, विश्वनाथ हिरेमठ, माधव गोखले आणि मी स्वतः.  
प्रकाश कर्दळे `मास्तर'  हे निवासी संपादक होते आणि बातमीदारांची कामकाजाची दैनंदिन डायरी आम्हापैकी एक बातमीदार लिहित असे.   
तर शहरातील कन्नड संघ या संस्थेने भरत नाट्य मंडळ येथे  एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भीमसेन जोशी होते. 
बातमीच्या दृष्टीने भाकड असलेल्या रविवारी  शहर आवृत्ती असलेल्या दैनिकांची स्थानिक पाने भरण्यासाठी बातम्या आणि फोटो कमी पडतात, त्यामुळे एक बऱ्यापैकी लांबीची बातमी मिळेल अशा हेतूने मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो. 
त्या मोठ्या हॉलमध्ये गर्दी तशी कमीच होती. मला वाटते हॉल निम्मासुद्धा  भरला नव्हता, कारण कन्नड संघ या सांस्कृतिक संस्थेची ती सभा होती. 
व्यासपीठावर अगदी मोजकीच म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासह पाचसहा माणसे होती.  कन्नड संघाच्या अध्यक्ष, सचिव  आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती दिली, अहवाल वाचले. 
कुठल्याही कार्यक्रमाची बातमी घेण्याऱ्या   बातमीदाराच्या नशिबी हा रटाळपणा त्याच्या नेहेमीच्या कामकाजाचा  भाग असतो, मुख्य वक्ता आपले भाषण सुरू करीपर्यंत बातमीदाराला अशी भाषणे ऐकून घेण्यावाचून इतर काही पर्याय नसतो. 
बातमीच्या अनुषंगाने मी मोजकीच टिपणे घेत होतो.  रविवार संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला बातमीदार असा मी एकटाच होतो. पण अनेक कार्यक्रमांना पुष्कळशी बातमीदार मंडळी फिरकतसुद्धा  नसतात असा अनुभव असल्याने त्याबद्दल मला विशेष असे काही वाटले नाही.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी भाषणासाठी उभे राहिले. 
आधी आलेली मरगळ झटकून मी पेन सरसावून मी त्यांच्या संपूर्ण भाषणाचे टिपण काढण्यासाठी सज्ज झालो
खांद्यावर असलेली शाल ठिकठाक करत  पंडितजींनी उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने मी सर्द झालो. 
संगीतातले मला काहीएक कळत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमात पंडितजी संगीताविषयी बोलतील किंवा श्रोत्यांच्या आवडीचा असलेला एखादा राग किंवा गीत गातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती. 
त्याआधी पंडितजींची कितीतरी मराठी गीते मी ऐकली होती, त्यापैकी अभंगवाणीसारखी `इंद्रायणीकाठी',  `कानडा हो विठ्ठलु', अशी काही लोकप्रिय गायने मला बऱ्यापैकी तोंङपाठसुद्धा  होती.  
ण तरीसुद्धा पंडितजींनी यावेळी जो राग आळवायला सुरुवात केली होती तो  राग खूपच अनपेक्षित होता, एकदम अनोळखी होता.  मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. 
पंडितजींनी सुरु केलेल्या त्या रागाने मी वगळता इतर सर्व श्रोते एकदम खुश झाले होते, कान देऊन ते पंडितजींना ऐकत होते. 
मोठ्या उत्सुकतेने  बातमीसाठी  टिपणी घेण्यासाठी पेन सरसावून बसलेलो मी मात्र एकदम दिग्मूढ झालो होतो. 
पुढील पाचदहा मिनिटे पंडितजींचा आवाज  कानावर पडत होता, काहीच अर्थबोध होत नसल्याने मी चुपचाप होतो. 
अर्थात जे काही घडत होते त्यात वावगे असे काहीच नव्हते.  
तो कार्यक्रम पुण्यातल्या कन्नड संघाचा होता, पंडितजींसह तिथे हजर असलेली सर्व मंडळी पुणेकर असली तरी मुळची कन्नडभाषिकच होती. त्यामुळेच तर भीमसेनजींनी  कन्नड भाषेत बोलणे अगदी सुसंगत होते. 
आधीचे सर्व वक्ते  स्थानिक मराठी भाषेत बोलले होते तरी पंडितजींना आपल्या मातृभाषेत या कानडी लोकांशी संवाद साधणे उचित वाटले होते.
पुण्यात अनेक वर्षे राहून पुणेकर बनलेल्या कन्नड संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यातल्या या कार्यक्रमात मराठीतच बोलणे जितके संयुक्तिक वाटले तितकेच  कन्नड भाषेत बोलून  या लोकांशी असलेली आपली नाळ दाखवणे पंडितजींना संयुक्तिक वाटले असणार. 
पंडित भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले आणि कन्नडभाषिक आहेत हे मला तोपर्यंत माहित नव्हते आणि गडबड इथेच झाली होती.    
पंडितजींचे कन्नड भाषेतले ते भाषण संपताच मी तेथून बाहेर पडलो, रात्रीचे आठ वाजले होते आणि मला पुणे कॅम्पात ऑफिसला जायचे होते.  
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात परतल्यावर जेमतेम  तीनचार परिच्छेदांची एक कॉलमी बातमी मी टाईप केली. 
कार्यक्रमाला गेलोच होतो तर निदान तेव्हढी तरी बातमी देणे गरजेचे होते. त्या बातमीत `प्रमुख पाहुणे आणि वक्ते पंडित भीमसेन  जोशी होते' असे एक वाक्य होते.   
दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या बातमीदार सहकाऱ्यांना हा किस्सा सांगितला, माझी कशी फटफजिती झाली हे सांगितले तेव्हा तिथे पिकलेला हंशा आजही माझ्या आठवणीत आहे. 

