Did you like the article?

Showing posts with label Goa. Show all posts
Showing posts with label Goa. Show all posts

Tuesday, July 14, 2026

 

बातम्यांचा पाठलाग करणाऱ्या पत्रकारांवर पाळत, सत्ताधारी पक्षाचे कान आणि डोळे असणाऱ्या गृहखात्याचे महत्त्व आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांनी नेहेमी स्वतःकडे राखण्याचे कारण .......

गोव्यात पणजी येथें नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना माझ्याकडे गुन्हा आणि कोर्ट म्हणजे क्राईम आणि कोर्ट अशी एकमेकांशी निगडित असलेल्या दोन बिट्स होत्या. साधारणतः नव्याने कुणी बातमीदार म्हणून रुजू झाला कि सिंदबादच्या कथेप्रमाणे त्याच्या गळ्यात ही दोन्ही बिट्स अडकवून त्यापासून थोड्या सिनियर बातमीदारांनी मोकळे व्हायचे अशी त्याकाळात अनेक दैनिकांत पद्धत होती.
नवहिंद टाइम्समध्ये १९८०च्या दशकात मी नऊ वर्षे या दोन्ही बिट्स हाताळल्या, याचे एक कारण म्हणजे त्याकाळात मला ज्युनियर असलेला शिकाऊ बातमीदार आमच्या दैनिकात रुजू झालाच नाही. राहत्या घरी साधा लँडलाईन टेलिफोन नसताना आणि रात्री आठ ही आतल्या पानांसाठी बातमी स्विकारण्याची डेडलाईन असताना कुठल्याही गुन्ह्यांची आणि अपघातांची बातमी चुकू न देता क्राईम बिट सांभाळणे खरेच खूप अवघड आणि जोखमीचे काम होते.
मला आठवते त्यावेळी मूळचे गोव्याचेच असलेले एक पोलीस अधिकारी त्यावेळी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस होते तर शर्मा नावाचे एक आयजीपी होते.
त्यावेळी मांडवीच्या तीरावर असलेल्या मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा, दमण आणि दीवच्या दुमजली सचिवालयात खाली एका कोपऱ्यात प्रेस रुम होती. त्या प्रेसरुममध्ये येऊन वेगवेगळ्या संघटनांचे, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आम्हा बातमीदारांना प्रेस नोट्स किंवा मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली निवेदने देत असत.
अनेकदा यात पुढील आंदोलनांची माहिती किंवा धमकी दिलेली असायची. काही वेळेस खास बोलावलेल्या पत्रकार परिषदांत ही माहिती लेखी स्वरुपात दिली जायची, अनेकदा काही बाबी कागदावर न मांडता तोंडी स्वरुपात सांगितल्या जायच्या, आणि त्याच्यातच खूपदा खरी आणि मोठी बातमी असायची.
प्रेसरुममध्ये मी बसायला सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट आहे. सचिवालयाच्या वरच्या मजल्यावर पर्यटनमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा किंवा शिक्षणमंत्री हरिष झांटये यांची मुलाखत घेऊन आम्ही पत्रकार मंडळी लाल गालीचा असलेल्या लाकडी जिन्यावरून उतरुन प्रेस रुमकडे वळण्याआधीच एकदोन व्यक्ती काही सिनियर पत्रकारांना भेटत असत.
त्यांच्या देहबोलीवरुन आणि ते ज्या पद्धतीने पत्रकारांना बाजूला घेऊन संभाषण करत असत त्यावरुन मला ते कोण असावेत याविषयी विलक्षण कुतूहल वाटायला लागले. एकदोनदा पत्रकार परिषदांना सिनियर पत्रकार नव्हते अन त्यामुळे त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मग मला सर्व उलगडा झाला.
आम्हा पत्रकारांकडून विशिष्ट पत्रके मागवून त्यातील मजकूर आपल्याकडील नोंदवहीत लिहून घेणारी, पत्रकार परिषदांत तोंडी सांगितली जाणारी माहिती विचारणारी सध्या वेषातील ते लोक एसआयबी म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो या केंद्रिय गुप्तचर खात्याची तसेच स्पेशल ब्रांच म्हणजे सीआयडी (क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट)ची लोक आहेत हे मला समजले तेव्हा पत्रकारितेत नविन असलेल्या मला धक्काच बसला होता.
नंतर कळाले कि पणजी शहरात आणि केंद्रशासित प्रदेशात विविध राजकिय पक्ष, विरोधी पक्ष, विविध सामाजिक आणि कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, सत्ताधारी पक्षातील असंतृष्ट मंत्री वा आमदार काय करत आहेत, त्यांचे मोर्चा-आंदोलने, बंद दारातील बैठका किंवा खुल्या परिषदा वगैरे कधी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती केंद्र आणि राज्य सरकारकडची पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतत गोळा करत असते.
वृत्तपत्रांत बातम्या छापून येण्याआधीच किंवा ज्या गोष्टी वृत्तपत्रांत कधी छापूनही येणार नाही अशा सर्व हालचाली, घटना आणि वक्तव्ये यांची सत्ताधारी नेत्यांना माहिती असायला हवी, या यासाठी हा सर्व खटाटोप गुप्तचर यंत्रणा करत असतात.
गंमतीची गोष्ट म्हणजे या स्पेशल ब्रांच किंवा आयबीच्या कर्मचाऱ्यांकडे काही जण अगदी संशयाच्या नजरेने पाहत असायचे तरी सामाजिक, कामगार आणि इतर काही संघटनांमधली नेतेमंडळी मात्र त्यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून असायची.
मला आठवते गोव्यात विद्यार्थी संघटनांचे खासगी इंजिनियरिंग कॉलेजविरुद्ध आंदोलन चालू होते त्यावेळी ऑल गोवा स्टुडंट्स युनियनचे नेते असलेले सतीश सोनक वगैरे मंडळी या गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना स्वतः आपली प्रेसनोट्स देत असत. पत्रकार परिषद संपल्यानंतर सीपीआयचे कामगार नेते जॉर्ज वाझ यांनाही असेच प्रेसनोट्स देताना मी पाहिले आहे.
त्याकाळात राम्पणकारांचे नेते असलेले मथानी साल्डाना आणि ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या मागावर कायम सरकारी गुप्तकर यंत्रणा असायची. आम्हा पत्रकारांशी हे नेते बोलताना स्पेशल ब्रांचचे हे लोक आसपास घुटमळत असायचे, नंतर आम्हाला गाठून बोलण्याचा तपशील मागायचे.
आंदोलन, मोठ्या राजकिय व्यक्तीचा राजिनामा किंवा बंद दारांमागील गुप्त खलबते अशासारखी अत्यंत स्फोटक माहिती असल्यास पत्रकार आपल्या ऑफिसांत जाण्याआधीच संबंधित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मग ती मुख्यमंत्री वगैरे सत्ताधारी नेत्यांकडे पोहोचली जायची.
असेही व्हायचे कि अनेकदा सरकारी जासूसगिरी करणाऱ्या अनुभवी आणि कुशल कर्मचाऱ्यांकडे आम्हा पत्रकारांपेक्षा विस्तृत आणि अधिक विश्वासार्ह माहिती असायची !
गोव्यात मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या प्रतापसिंह राणे यांनी १९८०च्या दशकात आपल्या आसनावरची मांड भक्कम ठेवली होती, त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर कायम डोळा असणारे डॉ. विली डिसोझा यासारखे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी राणे यांच्या आसनाला सतत सुरुंग लावत बसायचे,
याकाळात दोतोर विली आणि इतर असंतृष्ट मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या होणाऱ्या गुप्त बैठकांवर, त्यांच्या सततच्या दिल्लीवारींवर तसेच काँग्रेस श्रेष्ठींनी पाठवलेल्या आर. एल. भाटिया, जी के मूपनार आणि रवी वायलर या पक्ष निरीक्षकांच्या भेटीगाठींवर लक्ष ठेवायचे काम पत्रकार करायचे आणि गुप्तचर यंत्रणाही.
या भेटींत कुणी काय सांगितले, काय शिजले, पक्षनिरीक्षकांनी कुणाला काय कानपिचक्या दिल्या, कुणाची नेतेपदी निवड होणार वगैरे माहिती गोळा करणे एकाहाती शक्य नसायचे.
अनेकदा मग समोरासमोर आल्यावर पत्रकार आणि गुप्तचर कर्मचाऱ्यांमध्ये गुफतगू व्हायचे, भरपूर हातचे राखून नोट्सची देवाणघेवाण व्हायची आणि अशाप्रकारे दोघेही एकमेकांच्या मदतीस यायचे.
याकाळात बर्डे नावाचे डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस (डीवाय एसपी) हुद्द्याचे गोवा पोलिसांचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (पीआरओ) होते. पणजीतल्या आझाद मैदानासमोरच्या भव्य पोलीस मुख्यालयात पहिल्या मजल्यावर बसणारे बर्डे हे क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांच म्हणजेच सीआयडी खात्याचा कारभार पाहायचे.
दररोज त्यांच्याकडे गोव्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा अहवाल यायचा आणि त्याआधारे ते आम्हा क्राईम बिट्सच्या पत्रकारांसाठी एक दोन पानांची सायक्लोस्टाईल (फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्सचा हा आधीचा अवतार) केलेली प्रेस नोट तयार करायचे.
साधारणतः संध्याकाळी पाचच्या नंतर मी बर्डेच्या केबिनमध्ये पोहोचायचो, तेव्हा त्यांची प्रेस नोट तयार होत असायची. त्यानंतर बर्डे मला पंधरावीस मिनिटे बसवून घ्यायचे आणि शहरात, गोव्यात काय चालले आहे, माझ्या संपर्कातील म्हणजे माझ्या बिट्समधील विविध कामगार, विद्यार्थी संघटनांत काय घडामोडी चालल्या आहेत याची ते विचारपूस करायचे.
सुरुवातीला मीही निरागसपणे त्यांना ही माहिती द्यायचो, माझी अपेक्षा अशी कि संभाषणादरम्यान त्यांच्याकडूनही मला काही बातम्या मिळाव्यात, काही स्कुप होतील अशा बातम्यांचे लीड मिळावे.
नंतर माझ्या लक्षात आले कि आमच्या संभाषणाची दिशा एकतर्फी असायची, त्यांच्याकडून मला त्या पंधरावीस मिनिटांत चहाबिस्किटे आणि ती प्रेसनोट याशिवाय काहीच मिळत नसायचे.
हेच बर्डे आठवडयात कधीतरी सकाळी किंवा कार्यालयीन कामानंतर आमच्या `नवहिंद टाइम्स’ दैनिकात वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना भेटायला यायचे. पन्नाशीच्या जवळपास आलेल्या या दोघांच्या अर्धा-एक तास विविध विषयांवर गप्पा व्हायच्या.
त्यावेळी मुदलियार यांच्याकडून मला कळाले कि गोव्यात चाललेल्या राजकीय आणि इतर घटनांचे हालहवाल जाणून घेण्यासाठी सीआयडीचे डिवाय- एसपी असलेल्या बर्डे यांच्या कामाचाच हा एक भाग होता.
याचकाळात मला गोवा क्राईम आणि सीआयडीचे अधिकारी असलेल्या बर्डे यांच्या एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाचा भाग माझ्या लक्षात आला.
गोव्यातील दैनिकांसाठी क्राईमसंदर्भातील दैनंदिन प्रेसनोट तयार करण्याबरोबरच बर्डे दररोज त्यांच्या वरच्या दोन अधिकाऱ्यांसाठी म्हणजे क्राईम सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस आणि आयजीपी यांच्यासाठी एक वेगळे, हायली क्लासिफाईड म्हणजे गुप्त स्वरुपाचे टिपण तयार करायचे.
त्यादिवशी चोवीस तासांत झालेल्या राजकीय आणि इतर विविध क्षेत्रांतील झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींची अगदी संक्षिप्त स्वरुपात त्या टिपणात माहिती दिली जायची.
दरदिवशी रात्री ते क्लासिफाईड टिपण राज्याच्या गृहमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे पोहोचले जायचे. अगदी याच कारणांसाठी गृहमंत्री हे खास करून मुख्यमंत्री स्वतःकडेच राखून ठेवत असतो. त्याकाळात गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे गृहमंत्रीही होते.
अशा प्रकारे गोव्यासारख्या चिमुकल्या राज्यात त्या दिवशी काय घडले, कुठल्या मंत्र्यांनी पत्रकारांशी बातचीत केली, कुठला असंतृष्ट मंत्री वा आमदार कुणाला भेटला, कुणी दिल्लीकड़े कुच केले ही सर्व माहिती त्या कॅप्सूल स्वरुपात टिपणात असायची. भले, या टिपणाचा उपयोग होवो ना होवो, मात्र पुढेमागे त्या टिपणातील माहितीचा संदर्भ उपयोगी पडायचा .
रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीत पेशवेकालीन हेरगिरीचा एक प्रसंग आहे. तुरुंगात असलेल्या राघोबादादा यांच्याशी बुद्धिबळ खेळत असताना ‘तुमचा राजा दोन घरे मागे घ्यावा’ असे बोलले जाते आणि त्याचे टिपण माधवराव पेशवे यांच्याकडे दिले जाते.
त्यानंतर पेशव्यांच्या मदतीला निघालेले नागपूरकरांचे सैन्य माघारी परतते. त्या वेळी त्या वाक्याचा अर्थ समजून माधवराव पेशवे संबंधितांवर योग्य ती कारवाई करतात.
आधुनिक काळातही अशा प्रकारे स्वपक्षीय मंत्र्यांवर, आमदारांवर, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवून अशाच प्रकारे टिपणे तयार केली जातात आणि ती सत्ताधाऱ्यांकडे, राज्यकर्त्यांकडे पोहोचवली जातात. योग्य वेळी आवश्यक ती कारवाईही केली जाते.
थोडक्यात सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करून आपल्या पक्षातील नेत्यांवर, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही टेहळणी केली जाते. स्वतःची सत्ता आणि स्थान जपण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचा वापर केला जातो. आणि हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ठाऊक असते.
विरोधी पक्षांचे लोक सत्तेवर आल्यावर तसेच करतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन वागणे आणि बोलणे, हे पथ्य सर्वच राजकारणी आणि गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर असलेले इतर लोक पाळत असतात.
सन १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीने गृहखाते आणि इतर महत्त्वाची खाते स्वतःकडे ठेवली होती,
आताही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मात्र गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे गेली तीन-चार दिवस आपल्या राज्यात आणि राजधानीत काय घडत होते याचा राजाला पत्ताही नव्हता..



Thursday, November 27, 2025

 


आज तारीख २५ नोव्हेंबर. आजपासून बरोबर एक महिन्याने ख्रिसमस अर्थात नाताळ.
ख्रिस्तजन्माच्या या सणाला मराठीत नाताळ हा शब्द रुढ झाला तो शेजारच्या गोव्यात तब्बल साडेचारशे वर्षे ठाण मांडून बसलेल्या फिरंगी पोर्तुगिजांमुळे.
अनेक युरोपियन भाषांत वापरल्या जाणाऱ्या नाताळ या शब्दाचे मूळ `Natalis' मात्र लॅटिन आहे.
लॅटिन, पोर्तुगीज आणि इतर युरोपियन भाषांत आपल्या मराठीत आणि दक्षिण भारतीय भाषांत आढळणाऱ्या `ळ' या उच्चाराचे अक्षर आहे कि नाही हे मला माहित नाही.
मात्र पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत अवतार घेताना Natal या शब्दाने `नाताल' न होता मराठमोळे `नाताळ' रूप घेतले हे गमतीदार आहे.
मात्र मला `नाताळ' या शब्दाच्या व्युत्पत्तीशास्त्रात शिरायचे नाही.
नाताळाला एक महिना असताना आता ख्रिसमस विशेषांकांची लगबग सुरु झाली आहे.
यावेळी सातआठ दिवाळी अंकांत माझे लेख होते.
त्यापैकी तीनचार जणांनी बऱ्यापैकी मानधन दिले, एकाने फक्त दिवाळी अंक घरपोच आणून दिला तर इतर दोन जणांनी दिवाळी अंक पोस्टाने पाठविण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही.
त्या अंकात माझा लेख छापून आला हे एका तिऱ्हाईताने फोन केल्याने कळाले.
नाताळ विशेषांक पुण्यातून नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या दयानंद ठोंबरे यांनी आपल्या `अलौकिक परीवार' या विशेषांकाच्या प्रकाशन सोहोळ्याला ९ डिसेंबरचा मुहूर्त शोधला आहे.
मात्र त्याआधीच सव्वाशे वर्षे जुन्या (स्थापना एप्रिल १९०३) असलेल्या `निरोप्या' मासिकाचा नाताळ विशेषांक वर्गणीदारांना दोन-तीन डिसेंबरच्या दरम्यान घरपोच मिळणार आहे.
त्याशिवाय पिंपरी चिंचवडचे फ्रान्सिस गजभिव हे `शब्द' नाताळ विशेषांक काढत असतात.
गेली काही वर्षे वसईतून ख्रिस्तोफर रिबेलो 'ख्रिस्तायन' हा ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन प्रकाशित करत आहेत. त्याशिवाय इतरही अनेक जण ख्रिसमस विशेषांक प्रकाशित करत असतात.
ख्रिसमस अंक प्रकाशित करणाऱ्यांमध्ये हौशे, नवसे आणि गवसेही असतात.
प्रत्येक छापील दिवाळी अंकाची आर्थिक उलाढाल तीन ते पाच लाख रुपयांच्या आसपास असते असे म्हणतात. बहुतांश ख्रिसमस विशेषांकांच्या बाबतीतसुद्धा असेच आहे.
माझ्या माहितीनुसार `निरोप्या' मासिकाचे पहिले भारतीय संपादक फादर प्रभुधर यांनी १९७५ साली नाताळ विशेषांकांची परंपरा सुरु केली.
त्यावेळी श्रीरामपुरात दहावीत शिकत असलेल्या माझा एक अर्धा पानभर लेख या अंकात आहे.
`निरोप्या'च्या त्या नाताळ विशेषांकाचे खाली दिलेले खास भारतीय शैलीतले मारियाबाई आणि बाळ येशुचे चित्र असलेले हे कव्हर होते.
चित्रकार कोण असेल बरे? बहुधा अँजेला त्रिन्दाद....


Camil Parkhe


Tuesday, September 3, 2024


मला आठवते सत्तरच्या दशकात म्हापशाहून पणजीला प्रवेश करताना मांडवीवरच्या त्याकाळच्या एकमेव नेहरू पुलावरून एका बाजूला दिसायचे ते रायबंदर- ओल्ड गोवाकडे जाणारा रस्ता

आणि दुसऱ्या बाजूला गोव्याच्या चिमुकल्या राजधानीचे रूप आणि मिरामार येथे अरबी समुद्रात विलीन होण्यासाठी न खळाळता संथपणे पुढे जाणारा मांडवीचा खोल प्रवाह.
पुलाच्या दोन्ही बाजूला मॉर्मुगोवा बंदराच्या दिशेने लोहखनिज घेऊन जाणाऱ्या किंवा तेथून परतणाऱ्या मोठमोठ्या आकाराच्या बार्जेसची रांग असायची.
मांडवीच्या तीरावर असलेल्या काही मोठ्या वास्तू ठळकपणे दिसायच्या.
त्याकाळात गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे असलेले सेक्रेटरीएट म्हणजेच मध्ययुगीन आदिलशाह पॅलेस, हिरव्या रंगाचे ठोकळेवजा आकाराचे पाचसहा मजली डेम्पो हाऊस आणि अल्तिन्होवरची कौलारीं टुमदार घरे.
मांडवीवरचा तो १९७२ साली बांधलेला तो नेहरू पूल १९८६ साली कोसळला. आता या नदीवर तीन पूल आहेत, त्यापैकी महत्त्वाचा अटल सेतू.
आता मांडवीच्या पुलावर पणजीच्या बाजूला दिसतात ती रांगेने उभी राहिलेली भल्यामोठ्या आकारांची कॅसिनोज.
गोव्यातील ही कॅसिनो संस्कृती तशी खूप अलीकडची.
मी मिरामारला कॉलेजात असताना पावसाळा संपल्यावर दररोज सकाळी मुंबईहून पणजी धक्क्याकडे भोंगा वाजवत स्टिमर (आगबोट) यायचे.
त्या दोनतीन मजली स्टिमरच्या तुलनेत आताचे कॅसिनोज मलातरी फार बटबटीत वाटले. राजधानीत झालेल्या अनेक पुलांमुळे ते जुने सेक्रेटरिएट/ आदिलशाह पॅलेस आणि ते डेम्पो हाऊस दिसेनासे झाले आहे.
दूरवरून आता नजरेआड झालेल्या मध्ययुगीन काळात बांधलेला आदिलशाह पॅलेस किंवा जुने सेक्रेटरीएट आणि डेम्पो हाऊसबद्दल मला खंत वाटते.
याचे कारण या दोन्ही वास्तूंशी मी अनेक वर्षे संबंधित होतो .
पणजी मार्केटपाशी नदीकिनारी असलेले `डेम्पो हाऊस' आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाच्या मालकांचे मुख्यालय होते (आजही आहे) तर बातमीदार म्हणून सेक्रेटरीएटमध्ये अँबे फरियाच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी असलेल्या प्रेस रूममध्ये मी अनेक वर्षे बसत होतो.
आणि दुसरे एक महत्त्वाचे कारण. माझे हायर सेकंडरी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे झाले.
हे धेम्पे कॉलेज आणि पणजीतले डेम्पो कॉमर्स कॉलेज डेम्पो उद्योगसमूहाच्या मालकीचे.
धेम्पे आडनावाचे `डेम्पो' हे पोर्तुगीज धाटणीचे नाव.
ऐंशीच्या दशकात मी डेम्पो उद्योगसमूहाच्या `द नवहिंद टाइम्स' आणि मराठी जुळे भावंड `नवप्रभा' दैनिकाच्या कामगार संघटनेचा आणि गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट (गुज) चा सरचिटणीस होतो.
त्याकाळात एका नाविन्यपूर्ण कामगार खटल्याविषयी मी ऐकले.
`नवप्रभा' दैनिकात प्रुफरीडर असलेल्या आणि फार पूर्वी नोकरीतून काढून टाकलेल्या एका व्यक्तीची कामगार न्यायालयाने, औद्योगिक लवादाने आणि न्यायालयाने पुन्हा नेमणूक केली होती. कामगार संघटना आणि न्यायालयीन प्रकरणात हे एक अतिशय अनोखे प्रकरण होते.
त्या मुद्रितशोधकाचे नाव होते विश्वासराव उर्फ भैय्या देसाई.
मध्यम उंची आणि सडपातळ शरीरकाठी असलेले भैय्या देसाई सेवेत पुन्हा रुजू झाले तेव्हा त्यांच्या निवृत्तीसाठी केवळ दोनतीन वर्षे बाकी होती.
एक कामगार नेता या नात्याने मला त्यांच्या जीवनातील या घटनेने खूप आश्चर्यचकित केले. कामगार संघटनेतील त्या काळात मी अनुभवले की त्या दिवसांत कायदेकानु आणि त्यामुळे न्यायसंस्थासुध्दा नेहेमीच कामगारांच्या बाजूने असत.
ते वर्ष असावे १९८६ च्या दरम्यानचे. आणि देसाई यांच्या जीवनातील हा प्रसंग होता वीसबावीस वर्षांपूर्वीचा.
नेमके बोलायचे झाल्यास १९६३ सालचा.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दोन वर्षापूर्वीच भारतीय लष्कराकरवी गोवा आणि गुजरातपाशी असलेले दमण आणि दीव हे प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त केले होते. यथावकाश भारतीय संघराज्यातल्या या केंद्रशासित प्रदेशाच्या पहिल्यावहिल्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उड्या घेतल्या.
समाजवादी विचारसरणीचे देसाई हेसुद्धा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे ठाकले, यात वावगे असे काहीही नव्हते.
भैय्या देसाई हे तुये गावचे. .
नवप्रभा' आणि `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिक ही वृत्तपत्रे डेम्पो औद्योधिक समूहाच्या मालकीची होती.
या वृत्तपत्राचे एक मालक असलेले वैकुंठराव डेम्पो काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्याच मतदारसंघात उतरले होते. वैकुंठराव यांचे थोरले बंधू वसंतराव धेम्पे हे डेम्पो औद्योधिक समूहाचे चेअरमन होते.
गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाची ही पहिलीच निवडणूक. स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील काँग्रेस पक्ष हिरीरीने निवडणुकीत उतरला होता. पुरुषोत्तम काकोडकर हे शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे वडील.
पंडित नेहरू आणि काकोडकर यांच्या काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत अक्षरशः धूळधाण उडाली. गोव्यात या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. म्हणून `गोवा के लोक अजीब हैं' हे नेहरूंचे ते प्रसिध्द वाक्य.
त्याऐवजी गोंयकारांनी दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला `मगो'ला एकूण तीस जागांपैकी सर्वाधिक जागा दिल्या, डॉ जॅक सिकवेरा यांच्या युनायटेड गोवन्स पार्टीला `युगो'ला त्याखालोखाल जागा मिळाल्या.
अपक्षाचा पाठिंबा मिळवून भाऊसाहेब बांदोडकर गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री बनले.
त्यावेळी अनेक उद्योगपती, खाणमालक आणि भाटकार म्हणजे जमीनदार लोकांनी निवडणूक लढ्वल्या होत्या. काँग्रेस पक्षाचे गोव्यातले सगळे उमेदवार पराभूत झाले, त्यामध्ये वैकुंठराव डेम्पो यांचाही समावेश होता.
वैकुंठराव डेम्पो यांच्या विरोधात या मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या भैय्या देसाई यांचाही पराभव झाला होता.
त्यानंतर नवप्रभा हे मराठी दैनिक १९७० साली सुरू झाले आणि या दैनिकात भैय्या देसाई नोकरीस लागले.
आणिबाणी पर्वानंतर १९७७ ला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. राजापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे मधू दंडवते नव्या जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उभे होते.
गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात पूर्वी मंत्री असलेले प्रा. गोपाळराव मयेकर हे त्यांचे काँग्रेस पक्षातर्फे उभे राहिलेले प्रतिस्पर्धी होते.
साथी मधू दंडवतेँच्या निवडणूक प्रचारासाठी गोव्यातून भैय्या देसाई राजापूर मतदारसंघात गेले आणि तिथल्या एका सभेत त्यांनी भाषण केले.
या सभेचा वृत्तांत आणि देसाई यांच्या फोटोसह राजापूरच्या बातमीदार प्रतिनिधीने गोव्यातलय दैनिकात पाठवला. गोव्यातल्या मराठी वृत्तपत्रांतली ही बातमी आणि फोटो नवहिंद पब्लिकेशनच्या व्यवस्थापनाच्या पाहण्यात आली.
भैय्या देसाई याचा निवडणूक प्रचारसभेतील हा सहभाग नवप्रभा व्यवस्थापनाला रुचला नाही आणि विनापरवाना गैरहजर राहिल्याबद्दल देसाई यांना कारणे दाखवा नोटीस देऊन नंतर कामावरुन काढण्यात आले. \
त्या बडतर्फी विरुद्ध देसाई यांनी प्रथम कामगार आयुक्त आणि नंतर औद्योगीक लवादाकडे, न्यायालयाकडे धाव घेतली. आता भारतीय संघराज्यातले अनेक कायदेकानू गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात लागू झाले होते.
अपवाद पोर्तुगीज राजवटीतला समान नागरी कायदा.
देसाई विरुद्ध डेम्पोच्या मालकीचे हे दैनिक असा हा खटला कैक वर्षे चालला. वरच्या पातळीवर अपिल होत खटल्याचा निकाल लागला तो देसाई यांच्या बाजूने.
देसाई यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे आणि मागील आठदहा वर्षांचा त्यांचा पगार व्याजाच्या रकमेसह त्यांना देण्यात यावा असा तो निकाल होता !
खटल्याच्या काळात देसाई यांनी इतरत्र कुठेही नोकरी केली नव्हती, ही बाब निकालात महत्त्वाची ठरली होती.
दरम्यानच्या काळात देसाई यांना नोकरीअभावी खूप आर्थिक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. मात्र त्यांनी चिकाटी सोडली नव्हती.
एक गोष्ट खरी होती कि औद्योगिक लवादाच्या आणि न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मुंबई हायकोर्टात अपिल न करता व्यवस्थापनाने नमते घेतले होते आणि देसाई यांना पुन्हा नोकरीवर घेत त्यांचा सर्व पगार आणि इतर रक्कम दिली होती.
मुद्रितशोधक देसाई अन त्यांची दीर्घकाळ चाललेली कायदेशीर लढाई मी जवळजवळ विसरलो होतो.
काही महिन्यांपूर्वी भैय्या देसाई यांचा चेहरा, मुद्रितशोधकांच्या टेबलापाशी त्यांच्याशी माझे होणारे संभाषण स्मृतीपटलातून तब्बल चाळीस वर्षानंतर पुन्हा वर आले.
निमित्त होते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपने दक्षिण गोव्यात दिलेले उमेदवार.
भाजपने उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांच्या पत्नी पल्लवी डेम्पो यांना दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
चाळीस वर्षांनंतर भैय्या देसाई यांचे नाव मी पूर्णतः विसरलो होतो. गोव्यातील मित्र शशिकांत पुनाजी यांच्यामुळे देसाई यांचे नाव आणि गाव यावर शिक्कामोर्तब झाले.
वृद्धापकाळामुळे भैय्या देसाई यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
Camil Parkhe, August 27, 2024

Saturday, February 24, 2024

मनोहर पर्रीकर 

दिल्लीत ताजे मासे मिळत नाहीत म्हणून मंत्रीपद सोडून गोव्यात परतणारे पर्रीकर...

जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.
Manohar Parrikar
Manohar Parrikar

आज खूप दिवसांनी खरे तर काही महिन्यांनी सुकटाची चटणी नाश्त्याला खाल्ली. ही चटणी तशी घरी काल रात्रीच तयार झाली होती पण तेव्हाच ठरवलं होतं नाश्त्याला खायची म्हणून. सकाळी श्रीधरनगर बागेत फिरायला गेलो तेव्हा छानपैकी कोवळे ऊन पडले होते आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी एक ताज्या दमाचा पार्टनर गडीसुद्धा मिळाला. छान घामाघूम झालो होतो पण तेव्हाही मनात घरी असलेल्या सुकटाच्या चटणीची आठवण होतीच. मला स्वतःलाच त्याबद्दल हसूही आले होते.

लहानपणापासून माझ्या एक अत्यंत आवडीचा असलेला हा पदार्थ आजही खास आवडीचा आहे. सुकट आणि बोंबलाची चटणी हे दोन्ही पदार्थ बरोबरीने येतात, ज्याला सुकट आवडते त्याला बोंबीलसुद्धा आवडणार असे मला वाटते. इथे मी सुके बोंबीलबद्दल बोलतो आहे, ओले बोंबील हा वेगळा खाद्यपदार्थ आणि वेगळा विषय आहे. आठवड्यातून किमान एकदोनदा आमच्याकडे रात्रीला तळलेले ओले बोंबिल असतातच. त्याबद्दल नंतर कधीतरी स्वतंत्रपणे लिहिता येईल.

चिकनच्या दुकानांच्या मानाने मासळीची दुकाने तुरळक असतात. मात्र आमच्या कॉलनीच्या तोंडालाच मासळीचे मोठे दुकान आहे. तिथे शनिवारी आणि रविवारी लोकांची झुंबड तुम्ही एकदा पाहायला हवी.

तर श्रीरामपुरला शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आठवडी बाजारात बाईचे बोट धरून मी जायचो तेव्हा सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात शेवटी सुकट आणि सुक्या बोंबलाची खरेदी व्हायची. शुक्रवारी आमच्या घरी कधीही मटण शिजत नसायचे वा खाल्ले जात नसे. त्याला कारण म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारचा संबंध. गंमत म्हणजे मात्र मासे किंवा अंडे या पदार्थांना वशटचा दर्जा नसायचा, त्यामुळे हे पदार्थ शुक्रवारी वर्ज्य नसायचे.

घरी आल्यावर सगळा बाजार पिशवीतून बाहेर काढल्यावर बाई सुके बोंबील साफ करायची, काटेरी डोके आणि शेपूट काढून निम्मे बोंबिल वेगळे काढून ठेवायची आणि बाकीच्या बोंबलाचे त्याच रात्री काळा मसाला घालून कालवण करायची. दर शुक्रवारी आणि शनिवारी बाई आणि दादांचा उपास असायचा, या दिवसभराच्या उपवासाला फक्त पाणी आणि चहा चालायचा. तो उपास बोंबलाच्या या चमचमीत कालवणाने सुटायचा.

मग आठवड्यातून एकदा सुक्या बोंबलाची तर दोनदा सुकटाची चटणी नाश्त्याला असायची. या दोन्ही चटण्या करायची ती पध्दत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. सुके बोंबील आधी पाट्यावर वरवंट्याने टेचून घ्यायचे, ते बारीक चपटे झाल्यावर हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूण घालून पाट्यावर वरवंटा फिरवून एकजिनसी बनवायचे आणि मग तव्यावर तेलाने मस्तपैकी परतून घ्यायचे.

सुकट चटणी करायची पध्दत जवळपास अशीच. बाजरीच्या भाकरीबरोबर मग ही बोंबलाची चटणी किंवा सुकटाची मस्त लागायची.

मी तसा काही `फुडी' वा खवय्या या सदरात मोडणारी व्यक्ती नाही. अशा फूडी लोकांना खाद्यपदार्थांची खास चव असते, खास आवडीनिवडी असतात, त्यांच्या जिभेला विशिष्ट पदार्थांची चव लगेच कळते. माझे तसे नाही. तरीसुद्धा सुकटाची चटणी हा माझा एक खास आवडीचा पदार्थ आहे.

मला आवडते म्हणून एकदा मी श्रीरामपूरहून गोव्याला परत जाण्यासाठी निघालो तेव्हा बाईने सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर बरोबर दिली होती. त्यावेळी त्याकाळच्या नॅरो-गेज रेल्वेने प्रवास करताना मिरज- लोंढा स्टेशनच्या दरम्यान रात्री नऊच्या आसपास वर बर्थवर बसलेलो असताना जेवणाचा डबा उघडल्यानंतर माझ्यावर काय प्रसंग गुदरला होता तो किस्सा मागे मी इथे सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती टाळतो.

गोव्यात पावसाळा सुरू झाला की ताजी मासळी फारशी मिळत नाही तेव्हा मग घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी जेवणात चव आणते. गोंयकरांच्या दररोजच्या जेवणात मासळी असायलाच हवी. मग ही सुकी मासळी - कधी तळलेली कधी नुसतीच भाजलेली - ताटात येते. हे सुके बोंबिल, तार्ली, बांगडा, सुरमई जेवणात आणि जीवनातसुद्धा चव आणतात.

गोव्यात बहुसंख्य सर्व लोकांना - यात सारस्वत मंडळींसुद्धा आलीच - मासे अत्यंत प्रिय असतात. गोव्यातल्या सारस्वत लोकांत सारस्वत ब्राह्मण तसेच सारस्वत ख्रिश्चनांचाही समावेश होतो. पणजी आणि मडगावसारख्या मतदारसंघांत या दोन्ही सारस्वतांची संख्या लक्षणीय आहे. वर्षातून काही ठराविक दिवशी जेवणात ताजे किंवा सुके मासे नसले तर खाणारे कसे कडू तोंड करतात हे गोव्यात शिकत असताना मी अनुभवले आहे.

गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी बोलावून घेतले. केन्द्रात फक्त संरक्षणमंत्रीपदासाठी राज्यातील मुख्यमंत्री बोलावून घेण्याची प्रथा तशी यशवंतराव चव्हाण, शरद पवार आदींपासून आहे.

तर संरक्षणमंत्री पर्रीकरांचे मन राजधानीत कधी रमलेच नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्लीत ताजे मासे मुळी मिळतच नाही असे खुद्द पर्रीकरांनी सांगितले आहे.

त्यामुळे पहिली संधी मिळताच म्हणजे त्यांच्या अपरोक्ष गोव्यातल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे पानिपत झाल्यानंतर सत्तेचे नवी समीकरणे जुळवण्यासाठी पर्रीकर मायभूमीत परतले होते.

गोव्यातले माझे एक मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी आपल्या `मनोहर पर्रीकर, ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकात दिल्लीत माशाविना कासावीस झालेल्या पर्रीकरांचा एक किस्सा लिहिला आहे.

"दिल्लीत त्यांना ताजे मासे मिळणे मुश्किल झाले होते. 'जलबिन मछली' अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती.'' गोव्यातून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीचे येणाऱ्या कोणाही जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' (रवा लावून तव्यावर तळलेली सुरमई ) आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.

पर्रीकरांप्रमाणेच कालपरवा एका जवळच्या व्यक्तीने सुकट आणि बोंबलाची चटणी करून देण्याचा आग्रह केला म्हणून बाजारातून सुकट आणि सुके बोंबील आणले.

आमचे घर अगदी वरच्या मजल्यावर असल्याने या खाद्यपदार्थांचा घमघमाट संपूर्ण इमारतीत पसरत नाही. ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्या मात्र तोंडाला पाणी सुटत असते.

Thursday, February 22, 2024

नोकरीतील `दि एन्ड

वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.

एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी गेलो. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी माझी जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो.
नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत मी क्राईम- कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्समध्ये सोळा वर्षे अशी इंग्रजी भाषेतील पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा
विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती.
आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे.
‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’
त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद घ्यावा लागे.
कालांतराने एससीसी बोर्ड परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत सर्वच दैनिकांनी बंद केली. आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत
आहे.
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. एखादी खूप मोठी महत्त्वाची बातमी असेल तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. एके दिवशी सकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला. केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती.
तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते :
Prime Minister Indira Gandhi shot at ....
टेलिप्रिंटरच्या मशिनमधून सतत बाहेर पडणाऱ्या कागदांवरच्या बातम्या वाचायची माझी सवय खूप काळ टिकली.
नंतर बातम्या टाईप करताना ऑफिसांतल्या टेलिव्हिजनवरील बातम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो.
प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या `;पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा होतो.
बातम्या पाठविण्यासाठी `पुढारी' ने मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
गोव्यातून पुण्याला आल्यावर इंडियन एक्सप्रेसने सुद्धा मला टेलिग्राम कार्ड दिले होते. `कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस (पुणे) , टेलिग्राम कार्ड एक वर्षासाठी (१९८९) '' असे लिहिलेले ते कार्ड मी अजून जपून ठेवले आहे.
१९८०च्या दशकापर्यंत केवळ अतिश्रीमंत लोकांकडे आणि वरच्या हुद्द्याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे लँडलाईन टेलिफोन असायचे. पत्रकार वगैरेंना खास बाब म्हणून टेलिफोन दिले जायचे. गोव्यात आमच्या नवहिंद टाइम्समध्ये केवळ म्हापसा, मडगाव आणि वॉस्को शहरांत स्ट्रिंगर बातमीदार होते, त्यांच्याशी
आणि पणजीबाहेरील पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलण्याची गरज असे.
त्याकाळात एसटीडी (म्हणजे सबस्क्रायबर ट्रँक डायलिन्ग) सुविधा नसल्यास बीएसएनलच्या ऑपरेटरशी बोलून ऑर्डीनरी, अर्जंट किंवा लायटनिंग कॉल बुक करावा लागे. ऑर्डिनरी कॉल कधी लागेल याची खात्री नसायची, लायटनिंग कॉल खूप महाग असायचा, मात्र नोंद होताक्षणी बोलणे शक्य असायचे.
पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हाची गोष्ट. त्याकाळात म्हणजे १९८९ साली नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस’ आणि `लोकसत्ता’च्या पुणे आवृतींचे बातमीदार पुण्यात तर डेस्कचा स्टाफ मुंबईत असायचा. आमच्या इंग्रजीतल्या बातम्या टेलिप्रिंटरमार्फत मुंबईला पाठवल्या जायच्या.
मात्र मुंबईतल्या डेस्कवरच्या आणि इतर लोकांशी संभाषण करण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा होती, ती म्हणजे हॉटलाईन. लॅण्डलाइनसारखेच असणारे ते उपकरण उचलले कि तिकडे मुंबईत घंटी वाजायची आणि कुणीतरी तिकडे ते उपकरण उचलले तर लगेच संभाषण व्हायचे.
गोव्यात टेलिव्हिजनचे युग यायला तसा उशीरच लागला. मुंबईतल्या टेलिव्हिजन टॉवर आल्यानंतर काही काळानंतर पणजीत अल्तिन्हो येथे टेलिव्हिजन टॉवर उभारला गेला आणि आम्ही पहिल्यांदाच ब्लँक अँड व्हाईट का होईना पण टेलीव्हिजनच्या पडद्यावर वर धावती चित्रे पाहू लागलो.
त्याकाळात नवहिंद टाइम्सचे फोटोजर्नालिस्ट असलेले सुनील नाईक हे मुंबई दूरदर्शनसाठी व्हिडीओजर्नालिस्ट (आधुनिक तंत्रज्ञान, त्यानुसार नवे पद !) म्हणूनही काम करत असत. खांद्यावर एक छोटासा कॅमेरा खांद्यावर घेऊन नाईक एखाद्या कार्यक्रमाची शूटींग करत असत, त्यावेळी त्या कॅमेरातून घर्रघर्र असा आवाज येत असे. शूटींग काही सेकंदांचेच असायचे.
अनेकदा नाईक प्रेसकक्षात बसलेल्या आम्हा लोकांवरूनसुद्धा कॅमेरा फिरवत असत. दुसऱ्या दिवशी त्या शुटिंगचे रील्स विमानाने मुंबई दूरदर्शनच्या कार्यालयात पाठविले जाई आणि संध्याकाळच्या सात वाजताच्या प्रादेशिक बातम्यांत त्या कार्यक्रमाची झलक दिसायची, क्वचित त्यात आमचीही छबी झळकायची.
विशेष म्हणजे त्याकाळात खासगी टेलिव्हिजन चॅनेल्स किंवा न्यूज चॅनेल्सही नव्हते आणि राष्ट्रीय व प्रादेशिक बातम्या दिवसातून एकदोनदाच दाखविल्या जायच्या !
१९८६ साली मला पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रशिया,-बल्गेरिया येथे जाण्याची संधी मिळाली होती. परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक नाजुकसा आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा.
त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो !
याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.
१९८०च्या दशकाअखेरीस दैनिकांनी आपला कृष्णधवल रंग बदलून रविवारच्या पुरवण्यांसाठी रंगीत पाने देण्यास सुरुवात केली. मी १९८८ ला औरंगाबादला `लोकमत टाइम्स’ला रुजू झालो तेव्हा `लोकमत’च्या रविवार पुरवण्यांची सर्व रंगीत पाने मुंबईत तयार होऊन छपाईसाठी दोनतीन दिवस आधी औरंगाबादला
येत असत. या वृत्तपत्र समूहात औरंगाबादला रंगीत पानांसाठी मोठे महागडे स्कॅनर मशिन आणले गेले, तेव्हाचा जल्लोष आणि कौतुकाचे वातावरण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.
एखाद्या पत्रकार परिषदेतून, राजकिय किंवा इतर कार्यक्रमांनंतर दैनिकाच्या कार्यालयाकडे परतताना त्या बातमीची लीड किंवा इंट्रॉ काय करावा असा विचार मनात घोळत असे. हल्ली मोठी किंवा लहान बातमी हाती पडली कि लगेच मोबाईलवर ऑनलाईन आवृत्तीसाठी एकदोन वाक्यांची बातमी पाठवली जाते,
बातमीदार ऑफिसांत पोहोचेपर्यंत त्या बातम्या कधीच वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालेल्या असतात.
टेलिव्हिजनच्या आउट ब्रॉडकास्टिंग व्हॅन्समुळे (ओबीव्ही ) घटना किंवा कार्यक्रम होत असताना थेट लाईव्ह प्रक्षेपण आता केले जाते याचे आता आपलयाला नाविण्य वाटत नाही.
दहा वर्षांपूर्वी जॅकलिन आणि आमची मुलगी आदिती यांच्यासह युरोपमध्ये सहलीवर असताना तेथे प्रवासवर्णन लिहिण्याची उबळ मला स्वस्थ बसू देईना. आम्ही राहत होतो त्या हॉटेलांत लॉबीमध्ये पाहुण्यांना मोफत इंटरनेट सुविधा असायचे किंवा तासाला एक युरो फी असायची.
तीन आठवड्यांच्या त्या सुट्टीत मी तीनचार लेख लिहिले आणि ईमेलने पुण्याला `सकाळ टाइम्स’ला पाठवून दिले. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे लेख प्रसिद्ध व्हायचे, ते आमच्या दैनिकाच्या वेबसाईटवर, ईपेपरवर मला युरोपमध्ये पॅरीस, रोम आणि व्हेनिस या शहरांत दिसायचे, ते पाहून खूप आनंद व्हायचा, वेगाने प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी कौतुक वाटायचे. `
फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि `सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.
`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया'' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी आजही जपून ठेवले आहे.
पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्याएकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो.
कोरोना साथीने थैमान मांडले तेव्हा एप्रिल २०२० ला सकाळ टाइम्स बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
त्या दिवशी पिंपर चिंचवडच्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले.
पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.
पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, खूप खूप अनुभवले होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते..
Camil Parkhe