Did you like the article?

Tuesday, October 20, 2026

 


जोतिबा फुले यांच्या चालू द्विजयंती शताब्दी वर्षात या महान पुरुषाला स्त्रीशिक्षण कार्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरारबाईंच्या नगर येथील समाधीचा अखेर शोध लागावा, यासारखी दुसरी ब्रेकिंग न्युज कुठली असू शकेल?

नाशिकमध्ये काल सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्यावर मी एक छोटेसे व्याख्यान दिले, रात्री बसने पुण्याला परतलो.
आज सकाळी नगरचे साहसी म्हणजे प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संशोधन करणारे प्रशिक्षित इंजिनियर असलेले अभिजीत एकनाथ वाघ, पत्रकारितेतील एक सहकारी भैरवनाथ वाकळे आणि व्यवसायाने टेलर असलेले मास्टर आसिफ खान दुले खान यांचा फोन आला आणि तडक नगरच्या प्रवासाला निघालो.
फरारबाईंच्या समाधीचा शोध लागलाय असे कळल्यानंतर मला घरी स्वस्थ बसेना.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला १९ ऑक्टोबर १८८२ रोजी पुण्यात दिलेल्या आपल्या दीर्घ इंग्रजी निवेदनाच्या पहिल्याच वाक्यात जोतिबा लिहितात :
'' माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती.
म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला झाली व मी आणि माझी पत्नी ( सावित्रीबाई) अशा उभयतांनी कित्येक वर्षापर्यंत त्या शाळेत काम केले. ''
याच परिच्छेदात जोतिबा पुढे लिहितात कि त्यांनी ख्रिस्ती मिशनरींच्या वसतिगृह शाळेत शिक्षकाचे काम केले आहे.
धनंजय कीर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रात जोतिबांनी आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर नगरला सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिली या घटनेवर सविस्तर लिहिले आहे.
हा मजकूर मुळातून वाचण्यासारखा आहे.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र आणि कार्याचे एक महत्त्वाचे संशोधक असलेल्या हरी नरके यांनी सावित्रीबाई फुले यांनी नगरला सिंथिया फरारबाईंकडे आणि पुण्यात मिचेलबाईंकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले होते, याबाबत महात्मा फुले समग्र वाडमय आणि इतर अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे.
फरार मॅडम यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिल्यानंतर, फरारबाईंशी बोलणे झाल्यानंतर जोतिबा खूप प्रभावित झाले असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
नगरहून पुण्याला आल्यानंतर आपण लगेचच मुलींची शाळा सुरु केली असे जोतिबांनी लिहिले आहे. (संदर्भ धनंजय कीरकृत चरित्र )
मिस सिंथिया फरार यांचे अमेरिकेतून मुंबई बंदरात २९ डिसेंबर १८२७ रोजी आगमन झाले. अमेरिकन मराठी मिशनच्या त्या पहिल्या अविवाहित महिला मिशनरी.
मुंबईत मिशनच्या मुलींच्या शाळेत कार्य केल्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे १८३७ साली त्या मायदेशी परतल्या.
मात्र दोनच वर्षांनी १८३९ साली त्या भारतात पुन्हा आल्या त्या कायमच्याच. येथेच देह ठेवण्यासाठी.
नगर येथील अमेरिकन मिशनच्या शिक्षणंकामात रुजू झाल्या त्या त्यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी झालेल्या निधनापर्यंत.
नेमके सांगायचे झाल्यास २५ जानेवारी १८६२ पर्यंत.
नगर येथे अमेरिकन मिशनने १८३८ साली सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत काम केले.
फरारबाईंची मुलींची ही शाळा म्हणजे नगर येथील माळीवाडा बस स्टॅन्डजवळ असलेली आजही चालू असलेली क्लारा ब्रूस गर्ल्स स्कूल.
वर दिलेल्या तारखा, महिने आणि वर्ष अमेरिकन मराठी मिशनच्या वेळोवेळी लिहिलेल्या अहवालांत आणि इतर दस्तऐवजांत नमूद करण्यात आलेल्या आहेत.
' सत्यशोधक ' या हिंदी चित्रपटात जोतिबा आणि सावित्रीबाई फुले घोडाबग्गीतून पुण्याहून फरारबाईंना भेटण्यासाठी येतात, सावित्रीबाई तेथे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतात हा प्रसंग विस्तृतपणे रंगवला आहे.
फरारबाईंचे पात्र या चित्रपटात छान रंगवले आहे.
अध्यापनाचे रीतसर प्रशिक्षण घेणाऱ्या सावित्रीबाई फुले त्यामुळे पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका ठरतात.
फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे हृदयद्रावक वर्णन अमेरिकन मिशनच्या १८६२ च्या वार्षिक अहवालात दिले आहे.
आज शोधण्यात आलेल्या फरारबाईंच्या समाधीवरील स्मृतीवचने त्याच धर्तीची आहेत.
याच वार्षिक अहवालात अमेरीकन मराठी मिशनच्या वतीने मिस सिंथिया फरारबाई यांच्यावर १८६२ साली लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे:
` मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरु करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले.
अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरु केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनीं मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली. ‘’
फरारबाईंच्या कबरीवर आम्ही फुले वाहिली, मेणबत्त्या लावल्या, मी स्वतः छाती आणि खांद्यावर कृसाची खूण करुन क्षणभर नतमस्तक झालो.
या समाधीच्या चिरा आजही शाबूत आहे पण तिथे कधी कुणी पणती लावली असेल याची शक्यता खूप कमी.
गेल्या दीडशे वर्षांत या अमेरिकन मिशनरीच्या चिरविश्रांतीच्या ठिकाणी कुणी आदरांजली किंवा फुले वाहिली असतील असे मला वाटत नाही..
फरारबाईंच्या चरित्राची आणि कार्याची माहिती देणारे त्यांचे पहिलेवहिले चरित्र दोन वर्षांपूर्वी मी लिहिले.
त्यांच्या छायाचित्राचा शोध मात्र मला लागलेला नाही.
आता फरारबाईंच्या समाधीचा शोध लागल्यानंतर त्यांच्या छायाचित्राचा शोध लागणे फार मुश्किल असेल असे मला आता वाटत नाही.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८१३ च्या स्थापनेपासून त्यांचे अनेक अहवाल आज उपलब्ध आहेत.
फरार स्कुल्सच्या मुलींचा एक फोटो मला सापडला तसाच फरारबाईंचा फोटो कुठेतरी नक्की सापडेल अशी ठाम आशा आता निर्माण झाली आहे.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना घडवण्यात फार मोठा हातभार असलेल्या या दुर्लक्षित महिलेला तिचे आदराचे स्थान मिळायलाच हवे.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रात महत्वाची भुमिका असणाऱ्या व्यक्ती, स्थळे आणि वास्तू यांना उजेडात आणायाला हवे.
त्यामुळे भारताचा सामाजिक इतिहास पुर्णतः बदलणाऱ्या फुले दाम्पत्याच्या चरित्रावर अधिक आणि नव्याने प्रकाशझोत टाकण्यात मदत होईल, जोतिबा आणि सावित्रीबाईंची चरित्रे अधिक परिपूर्ण होतील.

Camil Parkhe October 16 2026


Tuesday, October 6, 2026

 

``कुठे आहात?'' मोबाईलवर अनपेक्षितपणे एक कॉल आणि नंतर अचानक असा प्रश्न आला.

``कुठे चाललात? मीही तिकडेच चाललोय, या चला, बरोबरच जाऊ या.." असे संभाषण झाले
अन विसेक मिनिटांत एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित नॉन-स्टॉप `शिवाई' बसऐवजी माझा कारचा तिनेक तासांचा प्रवास घडला.
दुपारी आणि तेही रविवारच्या जेवणानंतर वातानुकूलित कारचा प्रवास झाल्यास कि पुणेरी भाषेत म्हटलं तर एक छानशी वामकुक्षी आणि गोव्यातील पोर्तुगाळलेल्या सुशेगाद भाषेत सिएस्ता (Siesta) हवीच.
जेसुईट फादर होण्यासाठी प्रशिक्षणासाठी मी गोव्यात असताना दुपारच्या जेवणानंतरच्या सक्तीच्या सिएस्ताच्या त्या एक तासाला आम्ही 'होली अवर' असे म्हणत असू.
तेव्हापासूनच मी या सिएस्ताच्या कायमच्या प्रेमात पडलो आहे.
अशावेळी कारमध्ये मागच्या सिटवर बसलो तरी शिरस्त्याप्रमाणे मी आधी सिटबेल्ट लावतो आणि मग मस्तपैकी ताणून देत असतो.
कारमध्ये बरोबर इतर कुणीही असले तरी.
मात्र यावेळी आम्हा दोघांना या चैनीवर पाणी सोडावे लागले.
मी तरी याबाबत नाखूष नव्हतो.
खरे पाहिले तर बरोबर एक आठवड्यापूर्वीच महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात रविवारी डॉ बाबासाहेब आंबडेकर सांस्कृतिक भवनात आम्ही दोघे तब्बल पाच तास एकत्र होतो.
आमचे समान मित्र दिल्लीतील मयूर के. आणि नागपुरातले राम W. या दोघांनी आम्हाला एकाच मंचावर आणले होते.
त्यावेळी मंचावर एकमेकांपासून फक्त दिडेक फुटांच्या अंतरावर आम्ही दोघे बसलो होतो, मात्र दोघांत एक शब्दाचे संभाषण झाले नव्हते.
त्याची कसर काल भरून निघाली.
एकमेकाला आधी कधीही न भेटलेले दोन गाववाले आणि व्यवसायबंधू अचानक भेटतात आणि त्या दोघांमध्ये ज्या काही गप्पा झडतात, तसेच आमचे झाले.
`बीबीसी मराठी' चे संपाद्क अशा मोठ्या पदावर असलेल्या दिल्लीस्थित अभिजीत कांबळे त्यांची काल रविवारी अशी अचानक मुलाखत झाली.
तसा बीबीसी आणि माझा (तसेच माझ्या पिढीतल्या लोंकांचा) फार जुना संबंध.
यात विनोद अथवा अतिशयोक्ती बिलकुल नाही.
अमिन सयानी यांच्या बुधवारच्या `बिनाका गीत माला' वगैरे सारख्या कार्यक्रमांसाठी श्रीलंका रेडिओ सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत तुफान लोकप्रिय होते
तसे बीबीसी वृत्तवाहिनी विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी त्याकाळी जगभर प्रसिद्ध होते.
बेधुंद गोळीबारात पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मृत्यू झाल्याची बातमी बीबीसीने ३१ ऑकटोबर १९८४ रोजी सकाळी साडेनऊला दिली होती आणि ऑल इंडिया रेडिओने हीच बातमी संध्याकाळी उशिरा राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दिली होती.
`बीबीसी'च्या या वृत्ताच्या आधारेच गोव्यात पणजीत आम्ही `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाची आणि नवप्रभा या मराठी दैनिकाची मिळून त्यादिवशी दुपारी एक वाजता एकपानी बुलेटिन काढले होते.
बीबीसीचे दिल्ली प्रतिनिधी मार्क टुली यांच्याबद्दल खूप आदराने बोलले जायचे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण असू असे जाहीर केले होते.
त्यावेळी मतदानाच्या काळात `बीबीसी'चे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांचे पुण्यात आणि बारामतीत स्थानिक सहाय्यक आणि भाषांतरकार म्हणून तीन दिवस मी काम केले होते.
त्यावेळी पुणे कॅम्पातल्या अरोरा टॉवर्समध्ये सॅम मिलर वापरत असलेले एक खास उपकरण मी पहिल्यांदा पाहिले.
"This is called laptop,'' सॅमने मला त्यावेळी सांगितले होते.
जवळजवळ चौतीस वर्षांपूर्वो..
अभिजीत कांबळे आणि आणि मी, आम्ही दोघेही, पत्रकारितेत असल्याने एकमेकांचा व्यावसायिक प्रवास तसा एकमेकांना परिचित होताच.
विषयापरत्वे अनेकदा मोबाईलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संपर्क नेहेमी असतोच.
त्यामुळे अनेक अवांतर विषयांवरच खूप छान चर्चा आणि देवाणघेवाण झाली.
अनेक जुन्या घटनांना उजाळा मिळाला,
मज्जा आली.
Thank you, Abhijit Kamble Sir ..

Camil Parkhe, October 5, 2026

Thursday, August 27, 2026

 


पुण्यात बुधवारी नेहा बोरा हिचा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता.

त्यापैकी एका - कोथरुडच्या गांधी भवनमधील- कार्यक्रमाला मी हजेरी लावली.
गांधी भवनातील अनेक उपक्रमांना मी जात असतो.
तेथील श्रोते आणि वक्तेही नेहेमीच बुजुर्ग मंडळी असतात. साठी आणि सत्तरी ओलांडलेलेच जास्त.
सभागृह क्षमतेच्या निम्मेही कधी भरलेले नसते.
नेहा बोराच्या कालच्या कार्यक्रमात सभागृहात प्रवेश करताना मला गर्दीत अंग चोरुन जावे लागले, कसेबसे भिंतीला पाठ लावून उभे राहून भाषणे ऐकावी लागली इतकी तिथे गर्दी होती.
मोकळया जागेत अनेकांनी बसकण मारली होती.
सर्वांत विशेष म्हणजे श्रोत्यांमध्ये तरुणाईचा मोठा भरणा होता आणि श्रोत्यांपैकी बहुतांश लोक नेहाला ऐकण्यासाठीच आले होते.
नेहाचे भाषण संपले आणि इतर भाषणे ऐकण्यासाठी सभागृहात बसण्यासाठी लगेचच भरपूर खुर्च्या खाली झाल्या यावरुन ते दिसून आले.
नेहा बोरा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज संध्याकाळी तिचा नागपुरात कार्यक्रम आहे.
महाराष्ट्रात हल्ली मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर झेन झी कार्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत.
कुठलाही उत्स्फूर्त सार्वजनिक उठाव वा क्रांती नव्या नेत्यांना जन्म देते असे म्हटले जाते.
नव्या पिढीच्या विविध प्रश्नांच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत जंतरमंतरवर अवतरलेल्या पोरांपोरींच्या आंदोलनाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कॉक्रेच जनता पार्टीचे अभिजित दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका, कम्युनिस्ट पक्षप्रणित ऑल इंडिया स्टुडंट्स असोशिएशनची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा या मंडळीने सत्ताधारी किंवा सत्तेच्या बाजूने असणाऱ्या लोकांना अगदी जेरीस आणले आहे.

ज्यांनी अजून वयाची तिशीही ओलांडली नाही अशी मुलंमुली अचानक ऑनलाईन बातम्या, रील्स, छोट्या मुलाखती, मिम्स वगैरे माध्यमांतून गेली अनेक दिवस झळकतायेत आणि त्यांना प्रत्युत्तर देताना देशातील राज्यकर्त्या लोकांची दमछाक उडाली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तरुणाईच्या मागे धावावे लागत आहे, त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे लागत आहे.
झेन झी आंदोलनाने काँग्रेस पक्षाला आणि राहुल पक्षाला संजीवनी मिळवून दिली आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी न करता, परस्परांकडे स्पर्धक म्हणून न पाहता पूरक म्हणून काम करत आहेत.
इतर नेत्यांप्रमाणे राहुल गांधी केस रंगवून आपले वय लपवत नाही तरी तरुणतरुणींमध्ये त्यांच्याबद्दल जाम क्रेझ आहे.
राहुल गांधी यांना मुली सहजगत्या स्पर्श करतात, त्यांना आलिंगन देतात. एक मुलगी तर चक्क गालावर किस करते.
सत्तेची पाठराखण करत तरुणाईला साद घालणाऱ्या नेत्यांसमोर असा काही बाका प्रसंग आला तर त्यापैकी काही जण स्कॅण्डलाईज्ड होऊन सार्वजनिक आयुष्यातून निवृत्तीच पत्करतील.
मुख्य प्रसारमाध्यमे अजून तरी तरुणांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असली तरी नव्या पिढीने या माध्यमांना कधीच अडगळीत टाकले आहे.

Camil Parkhe August 27, 2026
See less

Monday, July 27, 2026

 


काल दुपारी पावसाची रिपरिप चालू असताना डोक्यात पावसाळी कॅप, हातात छत्री अशा संरक्षणात नारायण पेठेतल्या मुंजाबाचा बोळमध्ये चालत असताना नजर सहज जवळच्या इमारतीकडे गेली.

`हिंदी राष्ट्रभाषा भवन' हे नाव वाचून मी चमकलो. एकदम अण्णा आठवले.
कुठली वस्तू, वास्तू आणि व्यक्ती आपल्यासमोर अचानक येईल हे सांगता येत नाही. तरी दिल्लीत आणि देशभर चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कालचा हा योगायोग पाहून गंमत वाटली.
`सुगावा प्रकाशना'चे कार्यालय अलीकडेच `बेडेकर मिसळ' समोर स्थलांतरीत झाले आहे, तिकडे जाताना हे घडले.
साडेतीन दशकांपूर्वी हिंदी राष्ट्रभाषा भवन या वास्तूला मी नियमितपणे आणि भक्तिभावाने भेट देत असे.
सन १९८९ च्या अखेरीस `इंडियन एक्सप्रेस'च्या नव्याने सुरु झालेल्या पुणे आवृत्तीत बातमीदार म्हणून रुजू झालो होतो.
त्यावेळी एका बातमीच्या संदर्भात अण्णा हजारे यांच्याशी एकदा गाठभेट झाली होती आणि आमच्या दोघांचा स्नेहसंबंध हळूहळू वाढत गेला होता.
पारनेर तालुक्यातून राळेगण सिद्धी या आपल्या गावातून पुण्यात आल्यावर अण्णांचा या `हिंदी राष्ट्रभाषा भवन'मध्ये मुक्काम असायचा.
त्याकाळात पुण्यातले अण्णा म्हणजे `वनराई' या पर्यावरण चळवळीचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया या राष्ट्रभाषा भवनचे काम पाहत असत.
नव्वदच्या दशकात घरोघरी लँडलाईन फोन नसायचे, मोबाईलचा जमाना येण्यास फार वेळ होता. रानडे इन्स्टिट्यूटसमोर असलेल्या हॉटेल हिल व्ह्यूच्या प्रिया लॉज येथे मी मंथली कॉटबेसिस राहायचो.
आता नक्की आठवत नाही, मात्र अण्णा पुण्यात कधी येणार आहेत, `राष्ट्रभाषा भवन' मध्ये किती दिवस राहणार आहेत हे मला आधीच कळायचे.
तेथे जाऊन मी त्यांना भेटायचो, गप्पा मारायचो, त्यांची बातमीसाठीचे प्रसिद्धीपत्रके अण्णा मला यावेळी द्यायचे.
`इनलँड लेटर'वर टाईप केलेली प्रसिद्धी पत्रके अण्णा मला पोस्टाने पाठवत असत, त्याखाली किसन बाबुराव अण्णा हजारे अशी सही असायची.
त्याकाळात नगर जिल्ह्यातले स्थानिक पत्रकार अण्णांच्या जवळसुद्धा फिरकत नसत, त्यांना प्रसिद्धी देण्याचे तर फारच दूर.
अण्णांना राज्यपातळी आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर आणण्याची घोडचूक म्हणा कि पाप म्हणा इंग्रजी पत्रकारितेतील आम्ही काही मोजक्या लोकांनी केले.
त्यावेळी इंडियन एक्सप्रेससाठी मी आणि माझा सहकारी नरेन करुणाकर पुण्यातून बातम्या द्यायचो, टाइम्स ऑफ इंडियाची पुणे आवृत्ती नव्हती तरी अभय वैद्य हे या दैनिकासाटीं पुण्याच्या बातम्या द्यायचे.
नरेन करुणाकर आणि अभय वैद्य यांना घेऊन मी राळेगण सिद्धीला गेलो होतो,
तेथे अण्णांसोबत फोटोसेशन झाले होते. ती कृष्णधवल आणि रंगीत फोटो आजही माझ्याकडे आहेत.
अण्णा त्यावेळी साठीत होते तर मी तिशीच्या उंबरठ्यावर. पत्रकारितेत येऊन मी दशक पार केले होते आणि अण्णा किती मिडिया सॅव्ही आहेत याचे अनुभव मला अनेकदा येत होते.
एकदा तर अण्णांच्या विविध क्षेत्रांतील कामांची नीट ओळख करून घेण्यासाठी मी राळेगणला दोन दिवस मुक्कामच ठोकला होता.
मला आठवते तेव्हा अण्णांच्या सचिवाने मला अण्णांवरील पुस्तक देण्यासाठी त्या पुस्तकाची किंमत सांगितली. ते पुस्तक आम्हाला फुकटात देण्याची त्याची तयारी नव्हती.
शेजारीच उभ्या असलेल्या अण्णांनी मात्र काही न बोलता ते पुस्तक माझ्या खांद्यावरच्या शबनम बॅगेत अगदी अलगदपणे टाकले होते.
अण्णा पक्के मिडिआ सॅव्ही आहेत याची त्याचवेळेत पहिल्यांदा मला जाणीव झाली !
बातम्या देणे हे आम्हा पत्रकारांचे दैनंदिन काम. आमच्या या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांत अण्णा झळकू लागले आणि त्यांच्याभोवतीचे प्रसिद्दी वलय
वाढू लागले.
संजय सोनवणी यांनी १९९३ साली प्रकाशित केलेल्या `उत्तुंग' या माझ्या व्यक्तिचित्रण संग्रहात डॉ. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर, सय्यदभाई, शिरूभाऊ लिमये, डॉ जयंत नारळीकर, फादर डॉ. मॅथ्यू लेदर्ले आणि शकुंतला परांजपे, यांच्यावर प्रकरणे आहेत.
त्याच पुस्तकात अण्णा हजारे यांच्यावरसुद्धा एक प्रकरण आहेच.
अण्णांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नंतर त्यावेळचे भलेभले लोक सामिल झाले. एके काळचे तरुण तुर्क असलेल्या मोहन धारिया यांनी हजारे यांना आधीच पाठबळ दिले होते.
समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव आणि हरीत वसई बचाव चळवळीचे नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो अशी काही मंडळीसुद्धा अण्णांच्या आंदोलनात सक्रियरित्या सामिल झाली होती.
मात्र अण्णांनी या मंडळींचा अवसानघात केला आणि हे लोक त्यांच्यापासून दूर गेले ते परत कधी न येण्यासाठी.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, उपोषण स्थगिती याबाबत अण्णा आपल्या या सवंगडी लोकांना पूर्ण अंधारात ठेवत असत, मनमानी निर्णय घेत असत हे त्यामागचे एक कारण होते.
हिंदी राष्ट्रभाषा भवनाजवळ काल आलो आणि अचानक हे सर्व आठवले.

Camil Parkhe July 24, 2026



Tuesday, July 14, 2026

 

बातम्यांचा पाठलाग करणाऱ्या पत्रकारांवर पाळत, सत्ताधारी पक्षाचे कान आणि डोळे असणाऱ्या गृहखात्याचे महत्त्व आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांनी नेहेमी स्वतःकडे राखण्याचे कारण .......

गोव्यात पणजी येथें नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना माझ्याकडे गुन्हा आणि कोर्ट म्हणजे क्राईम आणि कोर्ट अशी एकमेकांशी निगडित असलेल्या दोन बिट्स होत्या. साधारणतः नव्याने कुणी बातमीदार म्हणून रुजू झाला कि सिंदबादच्या कथेप्रमाणे त्याच्या गळ्यात ही दोन्ही बिट्स अडकवून त्यापासून थोड्या सिनियर बातमीदारांनी मोकळे व्हायचे अशी त्याकाळात अनेक दैनिकांत पद्धत होती.
नवहिंद टाइम्समध्ये १९८०च्या दशकात मी नऊ वर्षे या दोन्ही बिट्स हाताळल्या, याचे एक कारण म्हणजे त्याकाळात मला ज्युनियर असलेला शिकाऊ बातमीदार आमच्या दैनिकात रुजू झालाच नाही. राहत्या घरी साधा लँडलाईन टेलिफोन नसताना आणि रात्री आठ ही आतल्या पानांसाठी बातमी स्विकारण्याची डेडलाईन असताना कुठल्याही गुन्ह्यांची आणि अपघातांची बातमी चुकू न देता क्राईम बिट सांभाळणे खरेच खूप अवघड आणि जोखमीचे काम होते.
मला आठवते त्यावेळी मूळचे गोव्याचेच असलेले एक पोलीस अधिकारी त्यावेळी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस होते तर शर्मा नावाचे एक आयजीपी होते.
त्यावेळी मांडवीच्या तीरावर असलेल्या मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा, दमण आणि दीवच्या दुमजली सचिवालयात खाली एका कोपऱ्यात प्रेस रुम होती. त्या प्रेसरुममध्ये येऊन वेगवेगळ्या संघटनांचे, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आम्हा बातमीदारांना प्रेस नोट्स किंवा मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली निवेदने देत असत.
अनेकदा यात पुढील आंदोलनांची माहिती किंवा धमकी दिलेली असायची. काही वेळेस खास बोलावलेल्या पत्रकार परिषदांत ही माहिती लेखी स्वरुपात दिली जायची, अनेकदा काही बाबी कागदावर न मांडता तोंडी स्वरुपात सांगितल्या जायच्या, आणि त्याच्यातच खूपदा खरी आणि मोठी बातमी असायची.
प्रेसरुममध्ये मी बसायला सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट आहे. सचिवालयाच्या वरच्या मजल्यावर पर्यटनमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा किंवा शिक्षणमंत्री हरिष झांटये यांची मुलाखत घेऊन आम्ही पत्रकार मंडळी लाल गालीचा असलेल्या लाकडी जिन्यावरून उतरुन प्रेस रुमकडे वळण्याआधीच एकदोन व्यक्ती काही सिनियर पत्रकारांना भेटत असत.
त्यांच्या देहबोलीवरुन आणि ते ज्या पद्धतीने पत्रकारांना बाजूला घेऊन संभाषण करत असत त्यावरुन मला ते कोण असावेत याविषयी विलक्षण कुतूहल वाटायला लागले. एकदोनदा पत्रकार परिषदांना सिनियर पत्रकार नव्हते अन त्यामुळे त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मग मला सर्व उलगडा झाला.
आम्हा पत्रकारांकडून विशिष्ट पत्रके मागवून त्यातील मजकूर आपल्याकडील नोंदवहीत लिहून घेणारी, पत्रकार परिषदांत तोंडी सांगितली जाणारी माहिती विचारणारी सध्या वेषातील ते लोक एसआयबी म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो या केंद्रिय गुप्तचर खात्याची तसेच स्पेशल ब्रांच म्हणजे सीआयडी (क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट)ची लोक आहेत हे मला समजले तेव्हा पत्रकारितेत नविन असलेल्या मला धक्काच बसला होता.
नंतर कळाले कि पणजी शहरात आणि केंद्रशासित प्रदेशात विविध राजकिय पक्ष, विरोधी पक्ष, विविध सामाजिक आणि कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, सत्ताधारी पक्षातील असंतृष्ट मंत्री वा आमदार काय करत आहेत, त्यांचे मोर्चा-आंदोलने, बंद दारातील बैठका किंवा खुल्या परिषदा वगैरे कधी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती केंद्र आणि राज्य सरकारकडची पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतत गोळा करत असते.
वृत्तपत्रांत बातम्या छापून येण्याआधीच किंवा ज्या गोष्टी वृत्तपत्रांत कधी छापूनही येणार नाही अशा सर्व हालचाली, घटना आणि वक्तव्ये यांची सत्ताधारी नेत्यांना माहिती असायला हवी, या यासाठी हा सर्व खटाटोप गुप्तचर यंत्रणा करत असतात.
गंमतीची गोष्ट म्हणजे या स्पेशल ब्रांच किंवा आयबीच्या कर्मचाऱ्यांकडे काही जण अगदी संशयाच्या नजरेने पाहत असायचे तरी सामाजिक, कामगार आणि इतर काही संघटनांमधली नेतेमंडळी मात्र त्यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून असायची.
मला आठवते गोव्यात विद्यार्थी संघटनांचे खासगी इंजिनियरिंग कॉलेजविरुद्ध आंदोलन चालू होते त्यावेळी ऑल गोवा स्टुडंट्स युनियनचे नेते असलेले सतीश सोनक वगैरे मंडळी या गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना स्वतः आपली प्रेसनोट्स देत असत. पत्रकार परिषद संपल्यानंतर सीपीआयचे कामगार नेते जॉर्ज वाझ यांनाही असेच प्रेसनोट्स देताना मी पाहिले आहे.
त्याकाळात राम्पणकारांचे नेते असलेले मथानी साल्डाना आणि ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या मागावर कायम सरकारी गुप्तकर यंत्रणा असायची. आम्हा पत्रकारांशी हे नेते बोलताना स्पेशल ब्रांचचे हे लोक आसपास घुटमळत असायचे, नंतर आम्हाला गाठून बोलण्याचा तपशील मागायचे.
आंदोलन, मोठ्या राजकिय व्यक्तीचा राजिनामा किंवा बंद दारांमागील गुप्त खलबते अशासारखी अत्यंत स्फोटक माहिती असल्यास पत्रकार आपल्या ऑफिसांत जाण्याआधीच संबंधित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मग ती मुख्यमंत्री वगैरे सत्ताधारी नेत्यांकडे पोहोचली जायची.
असेही व्हायचे कि अनेकदा सरकारी जासूसगिरी करणाऱ्या अनुभवी आणि कुशल कर्मचाऱ्यांकडे आम्हा पत्रकारांपेक्षा विस्तृत आणि अधिक विश्वासार्ह माहिती असायची !
गोव्यात मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या प्रतापसिंह राणे यांनी १९८०च्या दशकात आपल्या आसनावरची मांड भक्कम ठेवली होती, त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर कायम डोळा असणारे डॉ. विली डिसोझा यासारखे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी राणे यांच्या आसनाला सतत सुरुंग लावत बसायचे,
याकाळात दोतोर विली आणि इतर असंतृष्ट मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या होणाऱ्या गुप्त बैठकांवर, त्यांच्या सततच्या दिल्लीवारींवर तसेच काँग्रेस श्रेष्ठींनी पाठवलेल्या आर. एल. भाटिया, जी के मूपनार आणि रवी वायलर या पक्ष निरीक्षकांच्या भेटीगाठींवर लक्ष ठेवायचे काम पत्रकार करायचे आणि गुप्तचर यंत्रणाही.
या भेटींत कुणी काय सांगितले, काय शिजले, पक्षनिरीक्षकांनी कुणाला काय कानपिचक्या दिल्या, कुणाची नेतेपदी निवड होणार वगैरे माहिती गोळा करणे एकाहाती शक्य नसायचे.
अनेकदा मग समोरासमोर आल्यावर पत्रकार आणि गुप्तचर कर्मचाऱ्यांमध्ये गुफतगू व्हायचे, भरपूर हातचे राखून नोट्सची देवाणघेवाण व्हायची आणि अशाप्रकारे दोघेही एकमेकांच्या मदतीस यायचे.
याकाळात बर्डे नावाचे डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस (डीवाय एसपी) हुद्द्याचे गोवा पोलिसांचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (पीआरओ) होते. पणजीतल्या आझाद मैदानासमोरच्या भव्य पोलीस मुख्यालयात पहिल्या मजल्यावर बसणारे बर्डे हे क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांच म्हणजेच सीआयडी खात्याचा कारभार पाहायचे.
दररोज त्यांच्याकडे गोव्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा अहवाल यायचा आणि त्याआधारे ते आम्हा क्राईम बिट्सच्या पत्रकारांसाठी एक दोन पानांची सायक्लोस्टाईल (फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्सचा हा आधीचा अवतार) केलेली प्रेस नोट तयार करायचे.
साधारणतः संध्याकाळी पाचच्या नंतर मी बर्डेच्या केबिनमध्ये पोहोचायचो, तेव्हा त्यांची प्रेस नोट तयार होत असायची. त्यानंतर बर्डे मला पंधरावीस मिनिटे बसवून घ्यायचे आणि शहरात, गोव्यात काय चालले आहे, माझ्या संपर्कातील म्हणजे माझ्या बिट्समधील विविध कामगार, विद्यार्थी संघटनांत काय घडामोडी चालल्या आहेत याची ते विचारपूस करायचे.
सुरुवातीला मीही निरागसपणे त्यांना ही माहिती द्यायचो, माझी अपेक्षा अशी कि संभाषणादरम्यान त्यांच्याकडूनही मला काही बातम्या मिळाव्यात, काही स्कुप होतील अशा बातम्यांचे लीड मिळावे.
नंतर माझ्या लक्षात आले कि आमच्या संभाषणाची दिशा एकतर्फी असायची, त्यांच्याकडून मला त्या पंधरावीस मिनिटांत चहाबिस्किटे आणि ती प्रेसनोट याशिवाय काहीच मिळत नसायचे.
हेच बर्डे आठवडयात कधीतरी सकाळी किंवा कार्यालयीन कामानंतर आमच्या `नवहिंद टाइम्स’ दैनिकात वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना भेटायला यायचे. पन्नाशीच्या जवळपास आलेल्या या दोघांच्या अर्धा-एक तास विविध विषयांवर गप्पा व्हायच्या.
त्यावेळी मुदलियार यांच्याकडून मला कळाले कि गोव्यात चाललेल्या राजकीय आणि इतर घटनांचे हालहवाल जाणून घेण्यासाठी सीआयडीचे डिवाय- एसपी असलेल्या बर्डे यांच्या कामाचाच हा एक भाग होता.
याचकाळात मला गोवा क्राईम आणि सीआयडीचे अधिकारी असलेल्या बर्डे यांच्या एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाचा भाग माझ्या लक्षात आला.
गोव्यातील दैनिकांसाठी क्राईमसंदर्भातील दैनंदिन प्रेसनोट तयार करण्याबरोबरच बर्डे दररोज त्यांच्या वरच्या दोन अधिकाऱ्यांसाठी म्हणजे क्राईम सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस आणि आयजीपी यांच्यासाठी एक वेगळे, हायली क्लासिफाईड म्हणजे गुप्त स्वरुपाचे टिपण तयार करायचे.
त्यादिवशी चोवीस तासांत झालेल्या राजकीय आणि इतर विविध क्षेत्रांतील झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींची अगदी संक्षिप्त स्वरुपात त्या टिपणात माहिती दिली जायची.
दरदिवशी रात्री ते क्लासिफाईड टिपण राज्याच्या गृहमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे पोहोचले जायचे. अगदी याच कारणांसाठी गृहमंत्री हे खास करून मुख्यमंत्री स्वतःकडेच राखून ठेवत असतो. त्याकाळात गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे गृहमंत्रीही होते.
अशा प्रकारे गोव्यासारख्या चिमुकल्या राज्यात त्या दिवशी काय घडले, कुठल्या मंत्र्यांनी पत्रकारांशी बातचीत केली, कुठला असंतृष्ट मंत्री वा आमदार कुणाला भेटला, कुणी दिल्लीकड़े कुच केले ही सर्व माहिती त्या कॅप्सूल स्वरुपात टिपणात असायची. भले, या टिपणाचा उपयोग होवो ना होवो, मात्र पुढेमागे त्या टिपणातील माहितीचा संदर्भ उपयोगी पडायचा .
रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीत पेशवेकालीन हेरगिरीचा एक प्रसंग आहे. तुरुंगात असलेल्या राघोबादादा यांच्याशी बुद्धिबळ खेळत असताना ‘तुमचा राजा दोन घरे मागे घ्यावा’ असे बोलले जाते आणि त्याचे टिपण माधवराव पेशवे यांच्याकडे दिले जाते.
त्यानंतर पेशव्यांच्या मदतीला निघालेले नागपूरकरांचे सैन्य माघारी परतते. त्या वेळी त्या वाक्याचा अर्थ समजून माधवराव पेशवे संबंधितांवर योग्य ती कारवाई करतात.
आधुनिक काळातही अशा प्रकारे स्वपक्षीय मंत्र्यांवर, आमदारांवर, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवून अशाच प्रकारे टिपणे तयार केली जातात आणि ती सत्ताधाऱ्यांकडे, राज्यकर्त्यांकडे पोहोचवली जातात. योग्य वेळी आवश्यक ती कारवाईही केली जाते.
थोडक्यात सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करून आपल्या पक्षातील नेत्यांवर, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही टेहळणी केली जाते. स्वतःची सत्ता आणि स्थान जपण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचा वापर केला जातो. आणि हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ठाऊक असते.
विरोधी पक्षांचे लोक सत्तेवर आल्यावर तसेच करतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन वागणे आणि बोलणे, हे पथ्य सर्वच राजकारणी आणि गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर असलेले इतर लोक पाळत असतात.
सन १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीने गृहखाते आणि इतर महत्त्वाची खाते स्वतःकडे ठेवली होती,
आताही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मात्र गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे गेली तीन-चार दिवस आपल्या राज्यात आणि राजधानीत काय घडत होते याचा राजाला पत्ताही नव्हता..