गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८ goo.gl/ixK7Tp कामिल पारखे
पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा मोठ्या संख्येने प्रवेश तसेच त्यांनी वरिष्ठ पदांपर्यंत केलेला प्रवास हे सगळे जवळून बघण्याची संधी मिळाल्यामुळे स्त्रियांच्या या वाटचालीचा घेतलेला आढावा.
मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात प्रवेश केला १९८१ साली. पणजी येथे मुंबई विद्यापीठाची बीएची परीक्षा दिल्यानंतर निकाल लागण्याआधीच बातमीदार म्हणून रुजू झालो. त्याकाळात आणि त्यानंतर पुढील चारपाच वर्षे तरी गोव्यात एकही महिला बातमीदार नव्हती. आमच्या नवहिंद टाइम्समध्ये संपादकांकडून डिक्टेक्शन घेण्यासाठी आणि इतर टाइपिंगची कामे करण्यासाठी दोन महिला सेक्रेटरी म्हणून होत्या. तळमजल्यावर असलेल्या लायनो टाईप ऑपरेटिंग सेक्शनमध्ये ऑपरेटर, फोरमन वगैरे सर्व पदांवर केवळ पुरुषमंडळीच होती.
आमच्याबरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या मराठी नवप्रभा दैनिकात तर सर्व पत्रकार, खिळ्यांची देवनागरी अक्षरे जुळवणारे आणि इतर सर्व कर्मचारी फक्त पुरुषच होते. त्याकाळात बातमीदार म्हणून क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस स्टेशनांत, दवाखान्यांत वेळीअवेळी जावे लगे, राजकारण बीटवर गोवा विधानसभेत हजेरी लावी लागे, डिफेन्स क्षेत्रात असले तर नौदलाच्या, हवाई दलाच्या सकाळी सातच्या कार्यक्रमासाठी भल्या पहाटेच उठून जीपने जावे लागे.
नवहिंद टाइम्स त्यावेळी गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते, या दैनिकात तसेच गोमंतक, नवप्रभा, राष्ट्रमत वगैरे मराठी दैनिकांत एकही महिला फिल्डवर बातमीदार म्हणून नव्हती. मराठी दैनिकांत एकदोन महिला मात्र डेस्कवर दिवसाच्या शिफ्टवर असायच्या.
त्यानंतर लवकरच पणजीतील 'ओ हेराल्डो' हे शंभराहून अधिक वर्षे जुने असलेल्या पोर्तुगीज नियतकालिक इंग्रजीतून दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. या इंग्रजी 'ओ हेराल्डो'चे संपादक राजन नायर यांनी पहिल्यांदाच अनेक तरुण मुलींना बातमीदार म्हणून संधी दिली आणि स्थानिक पत्रकारीतेच्या क्षेत्रात एका प्रकारे क्रांतीच केली.
माझ्याच वयाच्या असणाऱ्या या मुली पणजीतील मांडवीच्या तीरावरील सचिवालयातील प्रेसरूमवर यायला लागल्या तेव्हा पहिले काही दिवस तेथील अगदी मध्यमवयीन पुरुष बातमीदार मंडळींचीही झालेली अवघडल्यासारखी स्थिती अगदी पाहण्यासारखी होती.
इंग्रजी, मराठी आणि कोकणी दैनिकांतील या बातमीदार मुली पोलीस चौकीवर, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात तेथील अधिकारीवर्ग, तृतीय, चतुर्थ श्रेणीवरील कर्मचाऱ्यांना भेटू लागल्या तेव्हा तेथे त्यांना बातमी मिळवणे जमेल की नाही अशी इतरांना शंका वाटायची. मात्र लवकरच या मुली बातम्या पुरुष बातमीदारांप्रमाणे बातम्या आणू लागल्या, काही वेळेस जेथे पुरुष बातमीदारांना बातमी काढणे, एखाद्या स्रोताला बोलते करणे शक्य नव्हते तेथूनही या महिला बातमीदारांनी बातम्या आणल्या असेही अनुभव येऊ लागले.
पणजीतील प्रेसरूममध्ये आम्हा पुरुषांबरोबर महिला पत्रकार पत्रकार परिषदा आणि इतर कार्यक्रमास हजार राहू लागल्या, तसे महिलांचे या क्षेत्रातील असणे नाविन्यपूर्ण राहिले नाही. मात्र नवहिंद टाइम्समध्ये माझ्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत एकही महिला बातमीदार वा उपसंपादक म्हणून रुजू झाली नव्हती हे मात्र खरे.
औरगांबादला लोकमत टाइम्स या इंग्रजी दैनिकांत मी रुजू झालो तेव्हा मात्र तेथे डेस्कवर मुख्य उपसंपादकासारख्या वरच्या, जबाबदार पदांवर महिला होत्या. त्या शहरातील लोकमत, मराठवाडा वगैरे मराठी दैनिकांत मात्र केवळ एकदोन महिला डेस्कवर होत्या.
एका वर्षानंतर पुण्यात इंडियन एक्सप्रेसला बातमीदार म्हणून आलो तेव्हा तिथे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीच्या सर्व इंग्रजी दैनिकांत आणि वृत्तसंस्थांत अनेक महिला बातमीदार आणि डेस्कवर जबाबदार पदांवर होत्या. मराठी दैनिकांत नोकरीस असलेल्या महिला मात्र केवळ डेस्कवर होत्या आणि महिलाविषयक पुरवण्या, रविवार पुरवणी किंवा सांस्कृतिक अशा सॉफ्ट असाईनमेंट आणि दिवसाच्या शिफ्टमधील जबाबदाऱ्या सांभाळत होत्या.
इंग्रजी भाषेतील महिला पत्रकारांचा सर्व पातळीवरील सहभाग आणि वावर मात्र पुरुष पत्रकारांप्रमाणेच तेव्हाही होता. रात्रपाळीच्या ड्युटीवरील पुरुष बातमीदाराला रात्री नऊ पर्यंत तर महिला बातमीदाराला रात्री आठपर्यंत ऑफिसात थांबवावे लागे. मोबाईलचा जमाना आल्यानंतर तर रात्रपाळीची ड्युटीच बंद झाली याचे कारण म्हणजे काही महत्त्वाची घटना झाली तर त्या बीटवरचा बातमीदार घरूनच वा कुठूनही ती बातमी देऊ लागला.
डेस्कवर रात्रीच्या पाळीवर म्हणजे रात्री बारा-एक पर्यंत आणि त्यानंतरही काम करणाऱ्या महिला होत्या आणि त्यांना घरी सोडण्यासाठी कार्यालयातर्फे वाहनव्यवस्था होती. पुरुषांना मात्र अशी कार्यालयीन वाहनव्यवस्था नसायची अजूनही अशीच स्थिती आहे.
पुण्यात जवळजवळ पंचवीस वर्षे महाराष्ट्र हेराल्ड हे एकमेव इंग्रजी दैनिक होते. तिथे संपादकीय पानाच्या आणि रविवार पुरवणीच्या प्रमुख गौरी आगटे आठल्ये होत्या. इंडियन एक्सप्रेसची पुणे आवृत्ती सुरू झाल्यापासून म्हणजे १९८९ पासून तेथील फिचर्स विभागात पूर्ण महिला राजच होते आणि त्या विभागाच्या प्रमुख विनिता देशमुख या होत्या. त्यानंतर लवकरच निदान पुण्यांत तरी सर्वच इंग्रजी वृत्तपत्रांतील फिचर्स विभागात पूर्ण महिलाराजचीच प्रथा रुढ झाली. बातमीदारीत आणि डेस्कवर महिलांची संख्या बऱ्यापैकी असायची. त्यामुळे पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ सारखीच झाली. त्यामुळे काम करताना, महिलांशी बोलताना, चेष्टा-मस्करी करताना एखाद्या पुरुष सहकाऱ्यांची जीभ जरा घसरली तर अष्टावधानी आणि तीक्ष्ण कान असणाऱ्या त्याच विभागातील वा पार्टिशनच्या पलीकडील शेजारच्या विभागातील एखाद्या वरच्या पदावरील महिलेकडून जरबेच्या स्वरात लगेच 'माईंड युवर लँग्वेज' अशी ताकीद मिळायची आणि पुरुषांच्या स्वैर, बेताल बोलण्या-वागण्यास लगेच लगाम बसायचा.
पुरुष आणि महिलांचे एकमेकांशी बोलणे आणि इतर कामासंबंधीचे बोलणे देवाणघेवाण असली तरी कॅंटिनमध्ये जेवताना, बाहेर चहाला जाण्यासाठी महिलांचे आपोआप वेगळे गट व्हायचे. त्याचे कारण कदाचित त्यांना तेथे अधिक मोकळे,सहज व्यक्त होता येत असावे. बहुधा हे नैसर्गिक असावे, कारण आजही तसे होतेच
वृत्तपत्रांतील पुरुषप्रधान संस्कृतीस हादरा बसला तो जेव्हा महिलांनी वेगवेगळ्या विभागातील प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्या हाताखाली अनेक पुरुष आणि महिला काम करू लागली तेव्हा. तोपर्यंत अनेक पुरुषांनी बॉस महिलाच्या हाताखाली काम केलेले नसायचे. त्यामुळे अनेक पुरुषांना महिलांच्या हाताखाली काम करणे, एक महिला आपली बॉस असणे अशी कल्पनाच भयानक वाटत असे.
मी स्वतः विविध वृत्तपत्रांत वयाने ज्येष्ठ असलेल्या वा समवयस्क असलेल्या महिला बॉसच्या हाताखाली अनेकदा काम केले आहे. पुण्यात महाराष्ट्र इंडियन एक्सप्रेसला विनिता देशमुख, टाइम्स ऑफ इंडियाच्या 'पुणे प्लस' पुरवणीला प्रथम नीता थॉमस आणि नंतर फरीदा मास्टर प्रमुख होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत मी १९९९ ला दाखल झालो तेव्हा तिथे शेरना गांधी या निवासी संपादक होत्या. 'सकाळ टाइम्स'मध्ये ब्युरो चिफ मीरा जोशी यांच्या नेतृत्वाखालीही मी काम केले.
एक घटना आठवते. मी एका इंग्रजी दैनिकात ब्युरो चीफ म्हणून काम करत असताना बातमीदाराच्या पदासाठी मी आणि मुख्य संपादक मुलाखती घेत होतो. त्यावेळी एका उमेदवाराची निवड निश्चित झाली होती. गुणवत्तेच्या आधारावर इतरांच्या तुलनेत तो उमेदवार नक्कीच उजवा होता. मुख्य संपादकाच्या मते त्याची बाजू त्याशिवाय आणखी एका दृष्टीने सरस होती. तो उमेदवार मुसलमान होता. 'कामिल, यू आर दे फेस द ख्रिश्चन कम्युनिटी इन अवर न्यूजपेपर. आय वॉन्ट हिम अॅज द फेस ऑफ द मुस्लीम कम्युनिटी!'
संपादकांचे ते वाक्य ऐकून मी भारावून गेलो होतो. यात अर्थात व्यावसायिकतेचा भाग होताच. प्रत्येक वृत्तपत्र आपले वाचक नजरेसमोर ठेवून त्यानुसार आपल्या बातम्या, लेख आणि धोरणे ठरवत असते.
उदाहरणार्थ, पुण्यातील महाराष्ट्र हेराल्ड (पूर्वाश्रमीचा पुना हेराल्ड) हा एकेकाळी पुणे कॅम्पातील गोवन कॅथोलिक, सिंधी, इराणी लोकांमध्ये वाचला जायचा आणि त्यानुसार त्या वृत्तपत्रातील पत्रकारमंडळी आणि मजकूरही असायचा. (पुना हेराल्ड आणि नंतरच्या महाराष्ट्र हेराल्डमध्ये अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या वाय. व्ही. कृष्णमूर्ती, ताहेर शेख आणि हॅरी डेव्हिड या पत्रकारांची त्रयी अमर, अकबर आणि अँथनी म्हणून ओळखली जायची!)
मग याच दृष्टिकोनातून प्रत्येक वृत्तपत्राच्या वाचकांमध्ये ५० टक्के महिला असताना वृत्तपत्रांत पुरेशा संख्येने महिला बातमीदार, वृत्तसंपादक आणि मुख्य संपादक का नसावेत याचे आश्चर्य वाटते.
मी सहाय्यक संपादक/ ब्युरो चीफ असताना आमच्या टीममध्ये निम्म्याहन अधिक बातमीदार महिला होत्या. नवीन बातमीदाराची, उपसंपादकाची नेमणूक करताना जवळजवळ सर्वच पुरुष संपादक पुरुष आणि महिलांना समान तागडीत तोलत असत, कुणाला पुरुष व महिला म्हणून झुकते माप नसायचे असा माझा अनुभव आहे. ब्युरो चीफ म्हणून या पुरुष आणि महिला बातमीदारांनां कामे नेमून देताना आणि त्यांच्याकडून त्यांच्या बीटची कामे करवून घेताना केवळ लिंगभेदामुळे या बातमीदारांच्या कामाच्या बाबतीत फरक पडला वा तडजोड झाली असे मात्र मला कधीही जाणवले नाही.
इंग्रजीत अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत महिला मुख्य वार्ताहर, वृत्तसंपादक, मुख्य संपादक वगैरे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. इंग्रजी भाषेतील महिला पत्रकारांची संख्या जवळजवळ पुरुषांच्या संख्येइतकी असते. ही परंपरा अनेक वर्षांपूर्वीपासून आहे.
सन १९९३च्या आसपास पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत मी अध्यक्षपदापासून इतर सर्व पदांसाठी एका पॅनल उभे केले होते आणि ते निवडूनही आले होते. त्यावेळी इंग्रजी पत्रकारीतेतील गौरी आगटे आठल्ये या पत्रकार संघाच्या पहिल्या महिला सरचिटणीस झाल्या. तेव्हापासून गेल्या पंचवीस वर्षांत एकही महिला पत्रकार या संघटनेची सरचिटणीस वा अध्यक्ष झालेली नाही.
नागपुरातील नागपूर युनियन ऑफ जर्नालिस्टस आणि मुंबईतील बोंबे युनियन ऑफ जर्नालिस्टस या दोन ट्रेड युनियन्समध्ये आणि बहुचर्चित मुंबई प्रेस क्लबमध्येही किती महिला पत्रकारांनी आतापर्यंत अध्यक्ष आणि इतर महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे याची मला कल्पना नाही.
इंग्रजी पत्रकारीतेत महिला अनेक आघाडीवर महत्त्वाच्या पदांवर असल्यातरी याच्या अगदी विरुद्ध स्थिती मराठी पत्रकारीतेत आढळते. मुख्य संपादक, ब्युरो चिफ, निवासी संपादक या महत्त्वाच्या पदांवर त्या सहसा नसतात. मराठी पत्रकारीतेत महिला आजही सॉफ्ट असाईनमेंट करताना आढळतात. क्राईम, महापालिका, राजकारण, डिफेन्स, उद्योग, क्रीडा वगैरे बिट्स मराठी महिला पत्रकारांच्या वाटेला येत नाही किंवा त्या स्वतः त्या वाटेला जात नाहीत.
देवयानी चौबळ, शोभा (राजाध्यक्ष) डे या मराठी महिलांनीं पत्रकारीतेत देशपातळीवर नाव कमावले ते मात्र इंग्रजी नियतकालिकांच्याच माध्यमातून. बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलेल्या दर्पण या वृत्तपत्रापासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारीतेत अशा प्रकारे नाव कमावलेल्या महिलेचे नाव मात्र चटकन आठवत नाही.
बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलेल्या दर्पण या वृत्तपत्रापासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारीतेत अशा प्रकारे नाव कमावलेल्या महिलेचे नाव मात्र चटकन आठवत नाही. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत वा पुढारी यासारख्या कितीतरी दशकांच्या परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या दैनिकांत आजपर्यंत निवासी संपादक वा मुख्य संपादक पदांवर आणि अगदी मुख्य वार्ताहर या पदांवरही एकाही महिलेची नेमणूक झालेली नाही ! या प्रतिष्ठित दैनिकांच्या फक्त साप्ताहिकसारख्या नियतकालिकांच्या संपादनाची जबाबदारी महिलांकडे नेण्याची लक्ष्मणरेखा आखण्यात आली आहे.
याला एकमेव अपवाद म्हणजे राही भिडे. पुण्यनगरी या आघाडीच्या दैनिकाच्य्या संपादक राहिल्या आहेत त्याआधी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. राजकारण वगैरे विविध बिट्स त्यांनी हाताळल्या आहेत.
मोदी सरकारमधील मंत्री एम. जे अकबर यांना ते दोन दशकांपूर्वी संपादक असताना महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गेली काही दिवस सोशल मीडियावर पत्रकारीतेच्या क्षेत्रातील 'मी टू' चळवळीवर विचारमंथन चालू आहे. काही ज्येष्ठ महिला पत्रकारांनी हा विषय उचलून धरला आहे तर काही महिला पत्रकारांनी या चळवळीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. या वादविवादाच्या निमित्ताने चार दशकांपूर्वी वृत्तपत्र उद्योगात माझ्या नजरेसमोर झालेले महिलांचे आगमन, त्यानंतरच्या काळात महिलांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्यांची आजची स्थिती या गोष्टींना मनातल्या मनात उजळणी मिळाली.
No comments:
Post a Comment