पंडित भीमसेन जोशी
पंडित भीमसेन जोशी
लालुजींची भेट झाली नव्हती, मुलाखत घेतली गेली नव्हतीच.
हे कामिल, नाईस टू सी यु हिअर.... पंधरा सोळा वर्षांनी भेटतो आहोत आपण.... आय हॅव्ह रोमड अल्मोस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड डुरिंग दिस पिरियड... हो, जगभ्रमंती झाली या गेल्या काही वर्षांत.... तू कुठेकूठे हिंडलास, कुठल्याकुठल्या न्यूजपेपर्समध्ये काम केलेस या काळात....? "
त्य प्रश्नांच्या सरबत्तीने मी क्षणभर गप्पगार राहिलो. काय उत्तर देणार होतो मी त्या माझ्या जुन्या पत्रकार सहकाऱ्याला?
एका इंग्रजी दैनिकात मी काम करत होतो तेव्हाची म्हणजे चारपाच वर्षांपूर्वीची ही घटना. सिनियर सब-एडीटर किंवा ज्येष्ठ उपसंपादक या ज्युनियर पदावर मी काम करत होतो. उपसंपादक आणि बातमीदार हे पत्रकारितेतली सर्वांत कनिष्ठ पदे आणि मला वरील प्रश्न विचारणारे हे महाशय आमच्या वृत्तपत्र समूहाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर म्हणजे एमडी साहेबांच्या केबिनशेजारी बसत होते, एका प्रकल्पाचे `एडीटर’ या पदावर त्यांची नेमणूक झाल्याचे मला कळाले होते.
आम्ही काही वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते तरी या मोठया पदावर त्याची नेमणूक झाल्यानंतर आमची जुनी ओळख आणि सलगी दाखवण्याचा प्रयत्न मी केला नव्हता.स्वतःची इज्जत राखायची असल्यास असे करणे शहाणपणाचे नसते हे एकदोन अनुभवावरुन मी शिकलो असतो. आपले जुने मित्र आणि सहकारी वरव्या पदावर पोहोचल्यावर आपल्याशी सुदाम्याबरोबर वागणाऱ्या कृष्णासारखे नाही तर द्रोणाशी वागणाऱ्या द्रुपदासारखे वागत असतात. प्रत्येकाला आपली इज्जत आणि सन्मान प्यारी असते हे ओळखले तर मग आपल्या पायरीची जाणीव ठेवून तशी वागणूक केली कि असे मन:स्पादाचे प्रसंग टाळता येतात.
तर वरचा तो प्रश्न ऐकल्यावर मी काही क्षण गप्प राहिलो त्या काही क्षणाच्याच काळात गेल्या एक तपातील त्या काही घटना माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या होत्या.
तथाकथित फ्री-लान्सिंग किंवा मुक्त पत्रकारिताचा कटु आणि आर्थिकदृष्ट्या भयानक अनुभव असल्याने वृत्तपत्र उद्योगक्षेत्रातील कामगार संघटना किंवा ट्रेंड युनियनगिरी आता माझ्या दृष्टीने भूतकाळ होता. आता हातातली नोकरी टिकवून अर्थार्जन करत राहणे हे माझे एकमेव उद्दिष्ट राहिले होते आणि या उद्दिष्ट्याशी मी खरेच प्रामाणिक राहिलो हे आता मागे वळून लक्षात येते.
तर आता माझा कामगार नेत्याच्या भूमिकेचा भूतकाळ अशाप्रकारे गाडून गेली अनेक वर्षे नोकरी करत असताना माझ्यासमोर हे सद्गृहस्थ मला मी गेल्या पंधरा-सोळा वर्षांत कुठेकुठे म्हणजे जगाच्या कुठल्या भागांत आणि कुठल्या वृत्तपत्रसमुहांत मी काम केले आहे असे विचार होते
आता या समोर ठाकलेल्या व्यक्तीविषयी सांगायलाच हवे.
एका राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकाची पुणे आवृत्ती सुरु झाल्यावर तेथे अनेक पत्रकारांची तेथे भरती झाली होती. हे दैनिक कितीही मोठ्या वृत्तपत्रसमूहाचे असले तरी इंग्रजी पत्रकारितेतील रितीमुळे अनेक जण त्याहीपेक्षा अधिक हिरव्या कुरणांकडे -मी अधिक पगार देणाऱ्या - दैनिकांकडे आकर्षित होत होते. नवे तरुण येत होते, त्यापैकीच एक असलेला हा तरुण. त्याकाळात या दैनिकाच्या दोन प्रकारच्या आवृत्तींत काम करणारे पत्रकार होते. मी स्वतः 'बातम्या' देणाऱ्या' मुख्य आवृत्तीत काम करत होतो तर हा पत्रकार सॉफ्ट बातम्या देणाऱ्या शहर पुरवणीत काम करायचा. आजच्याप्रमाणेच तेव्हाही या पुरवणीतला मजकूर `बातम्या' रुपातल्या जाहिराती असायच्या.
हा पत्रकार माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप ज्युनियर असला तरी त्याचा पगार माझ्यापेक्षा कितीतरी अधिक असणार हे सांगण्याची गरज नव्हती. तो ऑक्सफर्ड कि केम्ब्रिज विद्यापीठातून शिकून आला होता, हे त्यामागचे एक कारण होते.
त्याच्या अगदी उलट माझी पार्श्वभुमी. श्रीरामपुरसारख्या अडवळणी भागात मी मराठी शाळेत गेलेलो आणि गोव्यात आल्यानंतर बारावीनंतर इंग्रजी माध्यमात आलेलो आणि चार वर्षांतच नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकात बातमीदार झालेलो. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस असताना अखिल भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाने लखनौ येथे आणि नंतर युरोपात बल्गेरिया आणि रशिया येथे दौरा आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी माझी निवड केली तेव्हा या दैनिकाने मला आठ महिन्यांची पगारी सुट्टी दिली होती!
मात्र युरोपातल्या माझ्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा मी माझ्या बायोडेटात समावेश करणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार झाला असता. कारण त्यामुळे वृत्तपत्र उद्योगातील कामगार चळवळीतला नेता म्हणून माझी ओळख झाली असती आणि दुसऱ्या कुणी दैनिकात मला घेण्याचे धाडस व मूर्खपणा कुणी केला नसता !
तर हे `फॉरेन एज्युकेटेड' बातमीदार एके दिवशी ऑफिसात आले तेच मुळी हाफ पॅन्ट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शुजमध्ये ! भारतात काही इंग्रजी नियतकालिकांत असा ड्रेस-कोड चालायचा असे मी ऐकले आहे. मात्र आल्याआल्या दारापाशीच आमच्या निवासी संपादक मॅडमने त्यांना या अवतारात पहिले आणि त्या खवळल्या. ``गो बॅक अँड कम इन अ डिसेन्ट ड्रेस. धिस इज अन ऑफिस, नॉट या जिम !'' असं त्या म्हणाल्या आणि हे महाशय आल्या पावली घरी परतले.
तर समोरचा हा इसम या राष्ट्रीय पातळीच्या या दैनिकातून एके दिवशी अचानक गायब झाला त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मला पुन्हा दिसला होता, पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त स्वरुपात, मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर आणि आमच्या वृत्तपत्रसमुहाच्या कॉर्पोरेट जगताच्या आतल्या वर्तुळात तो आता होता.
तर हा इसम त्या इंग्रजी दैनिकातून एके दिवशी अचानक गायब झाला त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मला पुन्हा दिसला होता, पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त स्वरुपात, मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर आणि आमच्या वृत्तपत्रसमुहाच्या कॉर्पोरेट जगताच्या आतल्या वर्तुळात तो आता होता.
या पत्रकारास मी चांगला ओळखून आहे हे मात्र मी आमच्या दैनिकातील कुणाही सहकाऱ्यास जाहीररीत्या किंवा खाजगीत कधी सांगितले नव्हते. दैनिकाच्या कार्यालयातून तो अचानक गायब कशामुळे झाला तेही मी गुलदस्त्यात ठेवले होते., आता पहिल्यांदाच ते मी सांगत आहे.
तर एका दिवशी या आमच्या पत्रकार सहकाऱ्याने लिहिलेली मुलाखत अँकर म्हणून प्रकाशित झाली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव त्यावेळी पुण्यात दौऱ्यावर असताना कुठल्यातरी हॉटेलात येणार होते, त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्याचे असाईनमेंट या पत्रकाराला दिली गेली होती.
ज्या दिवशी लालू प्रसाद यादव यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाली त्या दिवशी मी कार्यालयात आलो तेव्हा तिथे एकदम सन्नाटा होता.
कारण लालू प्रसाद यादव यांनी आपला नियोजित पुणे दौरा लवकर उरकावला होता आणि त्यामुळे ते त्या हॉटेलांत आलेच नव्हते.
याचा अर्थ त्या बातमीदाराची आणि लालुजींची भेट झाली नव्हती, त्यामुळे मुलाखत घेतली गेली नव्हतीच.
लालूजींनी पुण्यातला आपला दौरा अचानक आवरता घेतला हे या पत्रकाराला माहितच नव्हते. नाहीतर त्या मुलाखतीची `टेबल न्यूज' त्याने दिलीच नसती.
दैनिकाच्या कार्यालयातून त्या दिवसापासून तो कायमचा गायब होण्यामागचे वा संपादकांनी त्याला कायमचे गायब होण्यास सांगण्यामागे ते कारण होते.
आणि आज हे पत्रकार महाशय मला सांगत होते कि गेल्या काही वर्षांत ते जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन आले आहेत आणि मला विचारत आहेत कि या काळात मी कुठेकुठे जाऊन आलो आहे ते !
``मी या दैनिकात माझ्या या जागी दहाबारा वर्षे स्थिर आहे'' असे मी सांगितले आणि आमची ही `मुलाखत' संपली.
त्यानंतर एके दिवशी हे महाशय जसे आले होते तसेच पुन्हा अचानक गायब झाले.
Camil Parkhe