Did you like the article?

Showing posts with label Siesta. Show all posts
Showing posts with label Siesta. Show all posts

Thursday, September 8, 2022

 मर्सिडीझ कार आणि बिझिनेस  कॉरस्पॉन्डन्ट 


 

पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीच्या सरत्या टप्प्यात `सकाळ टाइम्स'मध्ये असताना मला आयुष्यातली पहिली आणि एकमेव बढती मिळाली आणि मी या इंग्रजी दैनिकात एकदम खालच्या पदावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर सहाय्य्क संपादक या पदावर येऊन पोहोचलो. बातमीदारांमध्ये दररोजची कामं वाटून देण्याचं काम आता माझ्याकडं आलं होतं आणि याचा मी माझ्यासाठी तरी पुरेपूर फायदा करुन घेतला. 
 
आमचा बिझिनेस कॉरस्पॉन्डन्ट साकिब मालिक काश्मिरला परतला होता तेव्हा त्याची बिझिनेस ही बिट मी स्वतःकडे ओढून घेतली. 
 
मासिक पगार असलेल्या नोकरीची आपली किती वर्षे आता राहिली आहेत याची मला जाणिव होती. या उरलेल्या काळात काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करुन घ्याव्यात अशी साहजिकच इच्छा होती. 
 
गोव्यात पणजीला द नवहिंद टाइम्स या दैनिकापासून कामाला लागल्यावर एज्युकेशन कॅम्पस, क्राईम अँड हाय कोर्ट, डिफेन्स, अशा अनेक बिट्स मी केल्या. नंतर गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेच्या कामकाजाचे वृत्तांकन केले. स्थानिक स्वराज संस्था, क्रीडा अशा काही तुरळक बिट्स वगळता सगळीकडे फिरुन झाले होते. 
 
मी या क्षेत्रात आलो तेव्हा बातमीदारीत राजकारण म्हणजे विधानसभा आणि संसद बातम्या देणे सर्वात प्रतिष्ठेचे समजले जायचे. कारण स्वाभाविक होते. दररोज मुख्यमंत्री, मंत्री वगैरेंमध्ये उठबस व्हायची, ही सर्वोच्च पदावरची राजकारणी मंडळी या पत्रकारांना नावानं ओळखायची. 
 
पुण्यातल्या दैनिक `केसरी'चे मुख्य वार्ताहर एकदा आजारी पडले तेव्हा यशवंतराव चव्हाण त्यांना भेटायला आले अशी आठवण काही जुनीजाणती मंडळी सद्गतीत होऊन आजही सांगतात. मी स्वतः आजीमाजी पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर यांच्याशी हस्तांदोलन केले आहे. 
 
त्याकाळात नियमाने मंत्र्यांच्या आणि इतर राजकारण्यांच्या पत्रकार परिषदा व्हायची आणि काही पत्रकार सत्ताधाऱ्यांना अक्षरशः झोडपून काढायचे. 
 
पण आता काळ बदलला होता. राजकारण आणि राजकारणी दैनिकांच्या दृष्टीने आता गौण बनले होते आणि बिझिनेस, क्रीडा, शिक्षण यासारख्या बातम्यासुद्धा पान एकवर झळकू लागल्या आणि बिझिनेस ही बिट राजकारणापेक्षा अधिक आकर्षक, मोह पडणारी बनली होती. या पत्रकार परिषदांमध्ये मिळणाऱ्या गिफ्ट्स खूपच छान आणि अत्यंत महागड्या असायच्या 
 
बिझिनेस बिट घेतल्यानंतर एकापाठोपाठ पुण्याभोवतालच्या नामवंत उद्योगकंपन्यांना भेटी दिल्या. टाटा मोटार्सच्या समोर मी राहतो पण ही बिट घेतल्यानंतर पहिल्यांदा या मोटार कंपनीच्या भल्यामोठ्या आवारात फिरुन आलो, अर्थात गाडीने ! 
 
याच बिझिनेस बिट्मुळे मला तीन दिवसांची कोलकाता सफर मिळाली. नंतर `सकाळ टाइम्स'तर्फे थायलंडचा तिथल्या सरकारचा पाहुणा म्हणून बारा दिवसांचा दौराही झाला ! 
 
इन्फोसिस, टिसीएस, आणि इतर कितीतरी कंपन्या.. प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर ड्रिंक्स आणि जेवण झाल्यावर स्वतंत्र गाडीने मी कार्यालयात परतायचो ते मागच्या सीटवर बसूनच. मागे बसल्याबसल्या सिट बेल्टने स्वतःला बांधून घ्यायचे. 
 
त्यावेळी ड्रायव्हर हमखास म्हणायचा, ''मागच्या सीटवर बेल्टची गरज नाही,'' त्याकडे मी दुर्लक्ष करायचो आणि मग नंतरच्या पाऊणएक तासाच्या प्रवासात मस्तपैकी ताणून द्यायचो. माझी आवडीची सिएस्ता! 
 
गोव्यात मला अनेक चांगल्याबुऱ्या सवयी लागल्या त्यापैकी सिएस्ता किंवा दुपारची जेवणानंतरची वामकुक्षी एक !
 
यात सर्वांत महत्त्वाची असाईनमेन्ट असायची मर्सिडीझ कंपनीचा प्रेस दौरा. दोनतीनदा चाकणला जाऊन आल्यानंतर मग मर्सिडीझ कंपनीतर्फे माझे दिल्ली दौरे सुरु झाले. 
 
पहाटे मला नेण्यासाठी घरी एक कार यायची, दिल्लीला विमानाने जायचे, तिथे भारतातल्या विविध शहरांतले मोठ्या दैनिकांचे बिझिनेस कॉरस्पॉन्डन्ट्स आलेले असायचे. मर्सिडीझ कंपनीच्या नव्या गाडीचे यावेळी अनावरण व्हायचे आणि संध्याकाळच्या विमानाने मी पुण्याला परतायचो. 
 
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी रशिया आणि बल्गेरियाला जाण्यासाठी गोव्याहून दिल्लीला १९८६ ला आलो होतो, त्यानंतर तब्ब्ल तीस वर्षानंतर या बीटमुळे माझा दिल्ली दौरा झाला होता हे ध्यानात आलं आणि या बिट्बद्दल माझा आदर अधिक वाढला 
 
या प्रत्येक वेळी अनावरण होणाऱ्या मर्सिडीझ कार खास डिझाईनड म्हणजे ऑर्डर घेऊन केलेल्या असायच्या, काहींच्या किमती काही कोटी रुपयांच्या आसपास. 
 
देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान वगैरे व्हीव्हीआयपींसाठी बनवलेल्या. कुठल्याही प्रकारचा गोळीबार, बॉम्बस्फोट, भूकंप, आग, समोरासमोर टक्कर, यासारख्या प्राणघातक घटनांतसुद्धा कारमधील प्रवाशांचे पूर्ण संरक्षण करणाऱ्या या कार असत. 
 
अनावरण झाल्यानंतर या महागड्या गाडीत ड्रायव्हरच्या सिटवर बसून फोटोसेशन करण्याची आम्हाला संधी मिळायची. 
 
दिल्लीला मर्सिडीझ कारच्या अनावरणाच्या कितीतरी घटना मी कव्हर केल्या. नंतर मलाच कंटाळा आला आणि मी इतर ज्युनियर बातमीदारांना या जँकेट कव्हरेजसाठी पाठवू लागलो. 
 
मला स्वतःला माझ्या कारमध्ये बसल्याबसल्या गाडी सुरु करण्यासाठी सिट बेल्ट लावून घेण्याची सवय आहे. कुठल्याही प्रवासात कारमध्ये मागे बसलो तरी सीट बेल्ट मी लावणारच. याबद्दल कारचे ड्रायव्हर आणि घरचेही लोक खूप हसतात, थट्टा करतात, पण मी चिडत नाही वा सिट बेल्ट काढत नाही. यासंदर्भात माझ्या युरोपच्या दौऱ्यातील एक घटना नेहेमी आठवते. 
 
फ्रान्स आणि इटलीच्या तीन आठवड्यांच्या सहलीसाठी कुटुंबासह गेलो होतो तेव्हाचा हा प्रसंग. बहुधा पॅरीसमधली घटना असावी. तिकडे बहुतेक टॅक्सीज मर्सिडीझ कंपनीच्या होत्या. कुठल्याशा संभाषणात कार सिट बेल्टचा विषय निघाला आणि मूळचा तुर्की असलेल्या आमच्या ड्रायव्हरने सहज सांगितले कि कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाश्यांनी सिट बेल्ट्स लावले नाही तर खूप मोठा दंड भरावा लागतो. 
 
मी चपापलो आणि त्याला विचारलं कि ``हे आधीच का सांगितलं नाही?''
 
``ते सांगण्याची मला गरज भासली नाही. इथं फ्रान्समध्ये पोलीस हा दंड कार ड्रायव्हरकडून नाही तर त्यात्या प्रवाश्यांकडून वसूल करतात!'' 
 
त्या ड्रायव्हरचे त्यावर हे उत्तर होते ! 


Saturday, May 1, 2021

 

‘सिएस्ता’ला ‘होली अवर’ असे का म्हणायचे, हेही आता समजते आहे…
संकीर्ण - ललित
कामिल पारखे


  • ‘अक्षरनामा’
  • पेंटिंग ‘विकीपीडिया’वरून साभार
  • Tue , 20 April 2021
    • संकीर्णललितसिएस्ताSiestaवामकुक्षीहोली अवरHoly Hour


वयाच्या १७व्या वर्षी गोव्यात मिरामारच्या जेसुईटांच्या पूर्व-सेमिनरी (प्री-नॉव्हिशिएट)मध्ये दाखल झालो. जेसुईटांच्या किंवा इतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संस्थेत सगळा जीवनक्रम शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेपाच वाजता पितळेची घंटी वाजवून सर्व मुलांना झोपेतून उठवून दिवसाची सुरुवात होई. तयारी करून मनन-चिंतन आणि सकाळचा मिस्साविधी होई आणि रात्री साडेदहा वाजता पुन्हा घंटी वाजून आपापले दिवे मालवून सर्व प्री-नॉव्हिसांना आपल्या मच्छरदाणीच्या बेडमध्ये शिरावे लागे. दिवसाच्या मध्यंतरात म्हणजे हाऊसमधल्या सर्वांनी एकत्रित जेवून आपापली ताटे धुऊन पुढचा अर्धा तास रिक्रिएशन पिरिअड म्हणजे विरंगुळा काळ हा पत्ते, बुद्धिबळ खेळण्यात, गिटार वाजवण्यात, कादंबऱ्या वाचत घालवायचा. बरोबर दीडच्या ठोक्याला बिडलने म्हणजे मॉनिटरने घंटी वाजवल्यावर पुन्हा एकदा आपल्या बेडवर दुपारच्या झोपेसाठी निद्रित व्हायचे!

या सक्तीच्या झोपेच्या वेळेत कुणालाही कसलाही आवाज करण्याची मुभा नसायची. दुपारची ही झोप म्हणजे ‘सिएस्ता’. एक तासानंतर अडीचला घंटी वाजल्यावर उठून कॉलेजच्या अभ्यासाला लागायचे. आम्ही सर्व प्री-नॉव्हिस मुले मिरामारला धेम्पे आर्टस्-सायन्स कॉलेजात किंवा पणजीतल्या डेम्पो कॉमर्स कॉलेजात शिकत होतो. या काळात दुपारच्या जेवणानंतर गाढ ‘सिएस्ता’ घेण्याची सवय लागली, ती आजपर्यंत सुटलेली नाही.

गोव्यात हा एक अगदी संवेदनशील, जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या वेळी कुणालाही भेट देणे, फोन करणे शिष्टाचारविरोधी समजले जाते. दुपारी चारनंतर दैनंदिन व्यापार पुन्हा सुरू होतात. पत्रकारितेच्या व्यवसायात हा शिष्टाचार मी नेहमीच पाळत आलो आहे. रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी कुणाही व्यक्तीला दुपारी फोन करणे शक्यतो या कारणासाठीच टाळत आलो आहे.

भारतात सगळीकडे ख्रिस्ती मिशनरींच्या जीवनात ‘सिएस्ता’ एक महत्त्वाची बाब असायची. बहुतेक ख्रिस्ती धर्मगुरूंच्या दिनचर्येत हे अनुकरण आजही होतेच. त्या एक तासाला ‘होली अवर’ असे म्हटले जाते.  

श्रीरामपूरला लहानपणी सूर्य उगवण्याआधीच उठून बसायची सवय होती. माझ्याआधीच दादा उठून ‘पवित्र क्रुसाच्या खुणेने’ असे म्हणत कपाळावर, छातीवर आणि खांद्यांवर क्रुसाची खूण करत अर्धा तास सकाळची प्रार्थना करायचे. पण जागा होऊन चुळबूळ करत असलेल्या मला पाहून ‘सकाळीच असे भुतासारखे उठून काय बसायचे?’ असे बाई चिडून म्हणायची, पण जाग आल्यावर बिछान्यावर पडून राहणे, लोळणे कधी जमलेच नाही. घरी दुपारी झोप येणे तर अशक्यच.

पदवीधर झाल्यानंतर फादर होण्याचा निर्णय मी बदलला अन अगदी अपघाताने पत्रकार झालो. १९८०च्या दशकात आम्ही सर्व बातमीदार मंडळी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या तीरावरील मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रूममध्ये जमायचो. (गोवा सचिवालय आता पर्वरीला गेले असले तरी तळमजल्यावरच्या अगदी कोपऱ्यातल्या प्रेसरूमचा तो बोर्ड अजूनही आहे.) सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स, मंत्र्यांच्या नि सचिवांच्या भेटीगाठी आटोपून बारापर्यंत आम्ही आपापल्या दैनिकांच्या ऑफिसांत पोहोचायचो. तेथे बातम्या टाईप करून दुपारी एकच्या आसपास घरी निघायचो. सिनिअर पत्रकारांची पर्वरीला पत्रकार कॉलनीत घरे होती. मी सान्त इनेजच्या टोकापाशी ताळगावला राहायचो. पंधरा मिनिटांत जो तो आपापल्या घरी फिश-करी-राईस खायला हजर. नंतर मस्तपैकी सिएस्ता आणि परत फ्रेश होऊन चारला प्रेसरूमला येऊन तेथे किंवा एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चहापानाला हजर.

दुपारच्या त्या झोपेने दिवसभर मरगळ जाणवायची नाही. विशेष म्हणजे पणजीतील आणि गोव्यातील म्हापसा, मडगाव अशा इतर काही शहरांतील अनेक दुकानदारसुद्धा या सिएस्तासाठी आपली दुकाने दुपारी एक-दोन तास बंद ठेवत असत.

गोव्यात ४५० वर्षे असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा सिएस्ता हा आणखी एक भलाबुरा सांस्कृतिक वारसा! पोर्तुगिजांनी गोव्यात तसे अनेक सांस्कृतिक वारसे मागे ठेवले आहेत. कामावरून संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी अंघोळ करून ताजेतवाने व्हायचे, ही गोव्यातील अनेक लोकांची सवय हा त्यापैकीच एक. आजही मी रात्री जेवणाआधी अंघोळ करतो. त्यामुळे ‘दुपारी एक ते चार दुकान बंद’ अशी चैन किंवा मक्तेदारी केवळ पुण्यातच चालते असे म्हणण्यात काही अर्थ नाही.

खरे पहिले तर सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी, पण तरीही या दोन्ही संज्ञा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. जसे पुण्यातली ‘वामकुक्षी’ आणि गोव्यातली ‘सिएस्ता’. भाषेनुसार वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत.

गोवा सोडले तरी पुण्यातील ‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीदारांच्या कामकाज पद्धतीने ‘सिएस्ता’ची सवय कायम राहिली. पत्रकार आणि वृत्तपत्र कामगार कायद्यानुसार पत्रकाराला दिवसा सहा तास आणि रात्री साडेपाच तास काम करावे लागे. त्यामुळे आम्ही सर्व बातमीदार दुपारी अडीच-तीनच्या सुमारास पुणे कॅम्पातील अरोरा टॉवर्समधील ऑफिसात यायचो, रात्री नऊच्या सुमारास काम संपत असायचे.  या काळात मी चिंचवडगावात राहायला आलो होतो, घरी दुपारी जेवून सिटी बसने पुण्याला शिवाजीनगरपर्यंत यायचो, तेव्हा बसमध्ये अर्धा तास मस्तपैकी पेंगून सिएस्ता पूर्ण व्हायची. अनेकदा बस कंडक्टर किंवा सहप्रवासी शेवटच्या स्टॉपवर मला जागे करायचे. दुपारच्या किंवा कुठल्याही वेळेचे अशा प्रकारचे झोपेचे सुख केवळ नेहमी बस किंवा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच माहीत असते. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’त जॉईन झालो, तेव्हा पुणे आवृत्तीचे ऑफिस शिवाजीनगरहून फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉटेल वैशालीपाशी स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत झाले होते. कामाचे तास दुपारी अडीच ते रात्री दहा. त्यामुळे चिंचवडगाव ते मॉडर्न महाविद्यालयाच्या बस स्टॉपपर्यंत माझा सिएस्ताचा सिलसिला कायम राहिला. तेथून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर ‘टाइम्स`चे ऑफिस आहे. अधूनमधून उशीर झाल्यास बसस्टॉपवरून रिक्षाने मी ऑफिसला जात असे. एकदा बालगंधर्व चौक ओलांडल्यावर पाठमोऱ्या आरश्यामधून माझ्याकडे पाहत रिक्षा ड्रायव्हर म्हणाला, ‘तुम्ही ‘घेतली’ आहे, हे मला माहीत आहे.’ थक्क होऊन मी त्याला यामागचे कारण विचारले, तर तो म्हणाला, ‘तुमचे लालबुंद डोळेच सर्व काही सांगतायत.’ मी रिक्षाच्या आरशात पाहिले तर माझे डोळे खरेच तसे होते. बसमधल्या त्या अर्ध्या तासाच्या गाढ झोपेचा तो परिणाम, पण त्या रिक्षा ड्रायव्हरला काय सांगणार?

‘महाराष्ट्र हेराल्ड’ व ‘सकाळ टाइम्स’ या ‘सकाळ’ माध्यमसमूहाच्या इंग्रजी दैनिकांसाठी १६ वर्षे न्यूज डेस्कवर आणि नंतर न्युज ब्युरोत बातमीदार म्हणून काम केले. तेव्हासुद्धा बहुतांश काळ कुणालाही हेवा वाटेल, अशी या सिएस्ताची चैन उपभोगली.

आजवर ही चैन उपभोगू शकलो, यामागे एक कारण आहे. ते म्हणजे पुण्यात आल्यापासून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर न करता नेहमीच सिटी बसने प्रवास केला. त्यामुळेच घरच्यांचा रोष पत्करून आणि सहकारी पत्रकारांच्या अवहेलनात्मक, कुत्सित प्रतिक्रियांना न जुमानता माझा हा चिंचवडगाव-शिवाजीनगर निद्रिस्त बसप्रवास तब्बल तीन दशकांपासून चालू आहे. 

हा प्रवास तसा फार सुखाचा नव्हता. १९९०च्या दशकात माझ्या घरासमोरून जाणाऱ्या १२२ क्रमाकांच्या चिंचवडगाव–पुणे मनपा बस २० किंवा ३० मिनिटांच्या अंतराने यायची. आज ३० वर्षानंतरही तीच परिस्थिती आहे. अनेकदा बस गच्च भरलेली असल्यास पुढे सीट न मिळणार नाही आणि सिएस्ताचा लाभ घेता येणार नाही, या जाणिवेने ती सोडून द्यावी लागे. आणि पुढच्या बसची आणखी अर्धा तास वाट पहावी लागे. निद्रादेवीच्या या आराधनेसाठी अनेकदा चिंचवडगावात मागे जाऊन जागा पटकावण्याचा द्राविडी प्राणायाम केला आहे.

मुंबईत लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी यात विशेष असे काही नसणार. ऑफिसला ठराविक वेळेवर पंचिंग करण्याची गरज नसल्याने तसे टेन्शन नसायचे. मात्र उशीर होऊ नये म्हणून प्रवासासाठी वाढीव वेळ मी नेहमीच गृहीत धरत असे. एकदा नेहमीची आरामदायक सीट पकडली की, बॅग छातीपाशी ठेवून डोळे मिटले की, काही क्षणांत ब्रह्मानंदी टाळी लागत असे. यापेक्षा दुसरे स्वर्गसुख कुठले!     

मात्र कधीतरी भरलेल्या बसमध्ये शिरावे लागे. अशा वेळी व्हीआयपी व्यक्तीच्या मागे बॉडीगार्ड ज्या नजरेने सगळीकडे टेहळणी करत असतो, त्याप्रमाणे कुठली सीट लवकरच रिकामी होणार आहे, याकडे लक्ष देऊन चपळाईने ती जागा बळकावी लागते. अनुभवाने यात सराईतपणा येतो. अर्ध्या प्रवासानंतर अशी सीट मिळाली तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. अशा वेळी पाच-दहा मिनिटांची डुलकीही फ्रेश होण्यासाठी पुरेशी असते. यदाकदाचित संपूर्ण प्रवासात क्षणभराच्या डुलकीसाठी सीट मिळाली नाही तर चिडचिडपणा व्हायचा,  डोके भणभणायला लागायचे. ऑफिसात शिरल्यावर काम सुरू करायला उत्साह नसायचा. 

मी सिटी बसने प्रवास करतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. बस स्टॉपवर पाहून अनेकदा ओळखीचे लोक लिफ्ट देऊ पाहतात. घरी दुचाकी, चारचाकी आहे, तरी मला सिटीबसनेच प्रवास करायला आवडते, आणि तेसुद्धा दुपारच्या झोपेच्या सुखासाठी… निद्रादेवीच्या आराधनेच्या माझ्या या हव्यासापायी अनेकदा काही गंमतीजमतीही व्हायच्या. घरासमोरच्या बसस्टॉपवर बसची वाट पाहत असताना शेजाऱ्याची चारचाकी माझ्यासमोर येऊन थांबली. तो म्हणाला, ‘शिवाजीनगरला चाललोय, चला माझ्याबरोबर.’ मी चक्क नाही म्हणालो. मला पीएमटी बसनेच जायचे आहे, असे मी त्याला सांगितले. त्याच्यासोबत गेलो असतो तर लवकर पोहोचलो असतो, पण दुपारच्या झोपेचे खोबरे झाले असते!

माझ्या या हट्टाहासाची कल्पना असलेल्या दुसऱ्या एका स्नेहाने कारमध्येच झोपण्याचा सल्ला दिला, तो अव्यवहार्य म्हणून मी नाकारला होता. स्नेही कार चालवत असताना त्याच्या शेजारच्या किंवा मागच्या सीटवर स्वस्थ झोप येणे शक्य झाले नसते! आणि समजा डोळा लागला तरी काही मिनिटांतच आम्ही पुण्याला पोहोचलो असतो.  

हा, मात्र कारमध्ये असतानासुद्धा बससारखेच आरामात सिएस्ताचा लाभ घेण्याचे अनुभवाने मी शिकलो. अलिकडच्या काळात ‘बिझिनेस’ ही अत्यंत आकर्षक आणि मोहदायी बीट माझ्या वाट्याला आली. या बिटच्या कार्यभागानुसार चाकण औद्योगिक क्षेत्रात व इतरत्र उद्योगकंपन्यांना भेटी द्याव्या लागायच्या, दुपारच्या पेयपान आणि जेवणानंतर तेथून दुपारी पुण्याला परतावे लागे. विशेष म्हणजे बहुतांश वेळेस मला एकट्याला प्रवासाला स्वतंत्र टॅक्सी असायची. अशा वेळी मागच्या सीटवर अगदी कमरेला सीट बेल्ट लावून त्या वातानुकूलित कारमध्ये मस्तपैकी सिएस्ता व्हायची. शिवाजीनगरला न.ता. वाडीला पोहोचल्यावर ड्रायव्हरने आवाज दिल्यावरच निद्राभंग व्हायचा. पण तोवर मस्तपैकी झोप होऊन अगदी फ्रेश वाटायचे. 

प्रवास करताना निद्रासुख घेण्याचे प्रसंग पुण्यातून चिंचवडला रात्री उशिरा परतताना अनेकदा आले. असेच एकदा रात्री निगडी बस स्टॉपवर उतरून मी चालत होतो, तो मागच्या एका कारमधून हॉर्न ऐकू आला, चिडून मी रस्त्याच्या आणखी कडेने चालू लागलो, तरी हॉर्नचा आवाज वाढतच होता. शेवटी ती कार अगदी मला खेटून उभी राहिली. आणि सुहासने, माझ्या शेजाऱ्याने गाडीत बसायला सांगितले.

त्या रात्रीच्या वेळी घरापासून लांब असलेल्या रस्त्यावरून चालताना माझ्या गोंधळलेल्या स्थितीवरून बहुधा सुहासला आणि त्याच्या बायकोला काहीतरी अंदाज आला असावा. गाडीत बसल्यावर शेवटी त्यांना सांगावेच लागले की, बसमध्ये डुलकी लागल्यामुळे चिंचवड कधी मागे पडले ते कळलेच नाही आणि कंडक्टरने निगडीला शेवटच्या बस स्टॉपवर जागे! त्या स्पष्टीकरणावर गाडीत मोठा हास्यकल्लोळ झाला! सुहासच्या मुलाला – आरुषला - मात्र मी बसमध्ये असा झोपलोच कसा हा प्रश्न पडला!  

या घटनेपासून पुणे मनपा बस स्टॅन्डवरून रात्री उशिरा घरी येताना चिंचवडमार्गे देहूरोड मुक्कामी बसने कधीही यायचे नाही, असा कानाला खडा लावला. नाहीतर या तीर्थक्षेत्री रात्री मुक्काम करावा लागला असता !

असेच एकदा रात्री साडेनऊला शिवाजीनगरहून चिंचवडमार्गे जाणारी लोणावळा लोकल पकडली. गर्दी नव्हतीच. लोकलने वेग घेतला अन रात्रीच्या थंड वाऱ्यात कधी डोळा लागला ते समजलेच नाही. पिंपरी रेल्वेस्टेशनवर लोकांची गडबड ऐकली अन खाड्कन जागा झालो. नाही तर रात्री अकराच्या आसपास लोणावळा गाठले असते. त्यानंतर लोणावळा लोकलने कधी प्रवास केला नाही.

करोनामुळे ऑफिस सुटून ‘वर्क फ्रॉम होम’ करताना तर सिएस्ता अत्यंत गरजेची झाली आहे आणि त्यासाठी थोडा वेळ अधिक खर्चिला जात आहे. त्या दिवशी कुणी एकाने झूम मिटिंगसाठी दुपारची तीन ही वेळ निवडली, तेव्हा तिडीक आली होती. मात्र झूम मिटिंगसाठी परदेशांतील लोकही असणार म्हणून बहुतांश लोकांना सोयीस्कर अशी ही वेळ, असे कळल्यावर मी शांत झालो.   

पत्रकारितेच्या व्यवसायात ज्या काही थोड्याबहुत चांगल्या गोष्टी उपभोगता आल्या, त्यापैकी या सिएस्ताला मी अगदी वरच्या क्रमांकाची जागा देईल. इंग्रजी पत्रकारितेतील एक पत्रकार म्हणून बऱ्यापैकी मासिक वेतन आणि इतरांना न मिळणाऱ्या कैक सुविधा मिळत असतानाच सिएस्तासारख्या स्वर्गसुखाचा आनंद दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात भोगता आला असता, असे वाटत नाही. सिएस्ताला ‘होली अवर’ असे का म्हणायचे, हेही आता समजते आहे.