Did you like the article?

Showing posts with label pcamil. Show all posts
Showing posts with label pcamil. Show all posts

Thursday, February 22, 2024

नोकरीतील `दि एन्ड

वयाच्या सोळाव्या वर्षी सन्यस्त ख्रिस्ती धर्मगुरु होण्याच्या हेतूने मी माझे श्रीरामपूर येथील घरदार सोडले आणि नंतर गोव्यात जेसुईट धर्मगुरुंच्या पूर्वसेमिनिरीत दाखल झालो . पणजीतल्या धेम्पे कॉलेजात हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मात्र माझे जीवनध्येय बदलले आणि मी पत्रकार बनलो.

एकदा पणजी मार्केट पाशी असलेल्या दैनिकाच्या कार्यालयात नोकरी शोधण्यासाठी गेलो. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे वृत्तसंपादक असलेल्या एम. एम. मुदलियार यांनी माझी जुजबी चौकशी केली आणि नोकरी मिळणे शक्य आहे असे सांगितले. गोमंतकात पाऊल ठेवण्याआधी इंग्रजी भाषेचा गंधही नसताना चार वर्षांतच ही भाषा शिकून मी इंग्रजी दैनिकातील बातमीदार बनलो होतो.
नवहिंद टाइम्समध्ये नऊ वर्षांच्या नोकरीत मी क्राईम- कोर्ट, लष्कर, शिक्षण, जनरल, गोवा मेडीकल कॉलेज अशा अनेक बीट्स सांभाळल्या. त्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तींत आणि सकाळ माध्यमाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्समध्ये सोळा वर्षे अशी इंग्रजी भाषेतील पत्रकारितेची चाळीस वर्षांची कारकीर्द केली.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा
विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती.
आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे.
‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’
त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद घ्यावा लागे.
कालांतराने एससीसी बोर्ड परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत सर्वच दैनिकांनी बंद केली. आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत
आहे.
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. एखादी खूप मोठी महत्त्वाची बातमी असेल तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. एके दिवशी सकाळी मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला. केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती.
तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते :
Prime Minister Indira Gandhi shot at ....
टेलिप्रिंटरच्या मशिनमधून सतत बाहेर पडणाऱ्या कागदांवरच्या बातम्या वाचायची माझी सवय खूप काळ टिकली.
नंतर बातम्या टाईप करताना ऑफिसांतल्या टेलिव्हिजनवरील बातम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो.
प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या `;पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा होतो.
बातम्या पाठविण्यासाठी `पुढारी' ने मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
गोव्यातून पुण्याला आल्यावर इंडियन एक्सप्रेसने सुद्धा मला टेलिग्राम कार्ड दिले होते. `कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस (पुणे) , टेलिग्राम कार्ड एक वर्षासाठी (१९८९) '' असे लिहिलेले ते कार्ड मी अजून जपून ठेवले आहे.
१९८०च्या दशकापर्यंत केवळ अतिश्रीमंत लोकांकडे आणि वरच्या हुद्द्याच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे लँडलाईन टेलिफोन असायचे. पत्रकार वगैरेंना खास बाब म्हणून टेलिफोन दिले जायचे. गोव्यात आमच्या नवहिंद टाइम्समध्ये केवळ म्हापसा, मडगाव आणि वॉस्को शहरांत स्ट्रिंगर बातमीदार होते, त्यांच्याशी
आणि पणजीबाहेरील पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलण्याची गरज असे.
त्याकाळात एसटीडी (म्हणजे सबस्क्रायबर ट्रँक डायलिन्ग) सुविधा नसल्यास बीएसएनलच्या ऑपरेटरशी बोलून ऑर्डीनरी, अर्जंट किंवा लायटनिंग कॉल बुक करावा लागे. ऑर्डिनरी कॉल कधी लागेल याची खात्री नसायची, लायटनिंग कॉल खूप महाग असायचा, मात्र नोंद होताक्षणी बोलणे शक्य असायचे.
पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हाची गोष्ट. त्याकाळात म्हणजे १९८९ साली नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस’ आणि `लोकसत्ता’च्या पुणे आवृतींचे बातमीदार पुण्यात तर डेस्कचा स्टाफ मुंबईत असायचा. आमच्या इंग्रजीतल्या बातम्या टेलिप्रिंटरमार्फत मुंबईला पाठवल्या जायच्या.
मात्र मुंबईतल्या डेस्कवरच्या आणि इतर लोकांशी संभाषण करण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा होती, ती म्हणजे हॉटलाईन. लॅण्डलाइनसारखेच असणारे ते उपकरण उचलले कि तिकडे मुंबईत घंटी वाजायची आणि कुणीतरी तिकडे ते उपकरण उचलले तर लगेच संभाषण व्हायचे.
गोव्यात टेलिव्हिजनचे युग यायला तसा उशीरच लागला. मुंबईतल्या टेलिव्हिजन टॉवर आल्यानंतर काही काळानंतर पणजीत अल्तिन्हो येथे टेलिव्हिजन टॉवर उभारला गेला आणि आम्ही पहिल्यांदाच ब्लँक अँड व्हाईट का होईना पण टेलीव्हिजनच्या पडद्यावर वर धावती चित्रे पाहू लागलो.
त्याकाळात नवहिंद टाइम्सचे फोटोजर्नालिस्ट असलेले सुनील नाईक हे मुंबई दूरदर्शनसाठी व्हिडीओजर्नालिस्ट (आधुनिक तंत्रज्ञान, त्यानुसार नवे पद !) म्हणूनही काम करत असत. खांद्यावर एक छोटासा कॅमेरा खांद्यावर घेऊन नाईक एखाद्या कार्यक्रमाची शूटींग करत असत, त्यावेळी त्या कॅमेरातून घर्रघर्र असा आवाज येत असे. शूटींग काही सेकंदांचेच असायचे.
अनेकदा नाईक प्रेसकक्षात बसलेल्या आम्हा लोकांवरूनसुद्धा कॅमेरा फिरवत असत. दुसऱ्या दिवशी त्या शुटिंगचे रील्स विमानाने मुंबई दूरदर्शनच्या कार्यालयात पाठविले जाई आणि संध्याकाळच्या सात वाजताच्या प्रादेशिक बातम्यांत त्या कार्यक्रमाची झलक दिसायची, क्वचित त्यात आमचीही छबी झळकायची.
विशेष म्हणजे त्याकाळात खासगी टेलिव्हिजन चॅनेल्स किंवा न्यूज चॅनेल्सही नव्हते आणि राष्ट्रीय व प्रादेशिक बातम्या दिवसातून एकदोनदाच दाखविल्या जायच्या !
१९८६ साली मला पत्रकारितेच्या सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रशिया,-बल्गेरिया येथे जाण्याची संधी मिळाली होती. परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक नाजुकसा आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा.
त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो !
याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.
१९८०च्या दशकाअखेरीस दैनिकांनी आपला कृष्णधवल रंग बदलून रविवारच्या पुरवण्यांसाठी रंगीत पाने देण्यास सुरुवात केली. मी १९८८ ला औरंगाबादला `लोकमत टाइम्स’ला रुजू झालो तेव्हा `लोकमत’च्या रविवार पुरवण्यांची सर्व रंगीत पाने मुंबईत तयार होऊन छपाईसाठी दोनतीन दिवस आधी औरंगाबादला
येत असत. या वृत्तपत्र समूहात औरंगाबादला रंगीत पानांसाठी मोठे महागडे स्कॅनर मशिन आणले गेले, तेव्हाचा जल्लोष आणि कौतुकाचे वातावरण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.
एखाद्या पत्रकार परिषदेतून, राजकिय किंवा इतर कार्यक्रमांनंतर दैनिकाच्या कार्यालयाकडे परतताना त्या बातमीची लीड किंवा इंट्रॉ काय करावा असा विचार मनात घोळत असे. हल्ली मोठी किंवा लहान बातमी हाती पडली कि लगेच मोबाईलवर ऑनलाईन आवृत्तीसाठी एकदोन वाक्यांची बातमी पाठवली जाते,
बातमीदार ऑफिसांत पोहोचेपर्यंत त्या बातम्या कधीच वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालेल्या असतात.
टेलिव्हिजनच्या आउट ब्रॉडकास्टिंग व्हॅन्समुळे (ओबीव्ही ) घटना किंवा कार्यक्रम होत असताना थेट लाईव्ह प्रक्षेपण आता केले जाते याचे आता आपलयाला नाविण्य वाटत नाही.
दहा वर्षांपूर्वी जॅकलिन आणि आमची मुलगी आदिती यांच्यासह युरोपमध्ये सहलीवर असताना तेथे प्रवासवर्णन लिहिण्याची उबळ मला स्वस्थ बसू देईना. आम्ही राहत होतो त्या हॉटेलांत लॉबीमध्ये पाहुण्यांना मोफत इंटरनेट सुविधा असायचे किंवा तासाला एक युरो फी असायची.
तीन आठवड्यांच्या त्या सुट्टीत मी तीनचार लेख लिहिले आणि ईमेलने पुण्याला `सकाळ टाइम्स’ला पाठवून दिले. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे लेख प्रसिद्ध व्हायचे, ते आमच्या दैनिकाच्या वेबसाईटवर, ईपेपरवर मला युरोपमध्ये पॅरीस, रोम आणि व्हेनिस या शहरांत दिसायचे, ते पाहून खूप आनंद व्हायचा, वेगाने प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी कौतुक वाटायचे. `
फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि `सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.
`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया'' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी आजही जपून ठेवले आहे.
पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्याएकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो.
कोरोना साथीने थैमान मांडले तेव्हा एप्रिल २०२० ला सकाळ टाइम्स बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
त्या दिवशी पिंपर चिंचवडच्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले.
पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.
पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, खूप खूप अनुभवले होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते..
Camil Parkhe