मर्सिडीझ कार आणि बिझिनेस कॉरस्पॉन्डन्ट
पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीच्या सरत्या टप्प्यात `सकाळ टाइम्स'मध्ये असताना मला आयुष्यातली पहिली आणि एकमेव बढती मिळाली आणि मी या इंग्रजी दैनिकात एकदम खालच्या पदावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर सहाय्य्क संपादक या पदावर येऊन पोहोचलो. बातमीदारांमध्ये दररोजची कामं वाटून देण्याचं काम आता माझ्याकडं आलं होतं आणि याचा मी माझ्यासाठी तरी पुरेपूर फायदा करुन घेतला.
आमचा बिझिनेस कॉरस्पॉन्डन्ट साकिब मालिक काश्मिरला परतला होता तेव्हा त्याची बिझिनेस ही बिट मी स्वतःकडे ओढून घेतली.
मासिक पगार असलेल्या नोकरीची आपली किती वर्षे आता राहिली आहेत याची मला जाणिव होती. या उरलेल्या काळात काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करुन घ्याव्यात अशी साहजिकच इच्छा होती.
गोव्यात पणजीला द नवहिंद टाइम्स या दैनिकापासून कामाला लागल्यावर एज्युकेशन कॅम्पस, क्राईम अँड हाय कोर्ट, डिफेन्स, अशा अनेक बिट्स मी केल्या. नंतर गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेच्या कामकाजाचे वृत्तांकन केले. स्थानिक स्वराज संस्था, क्रीडा अशा काही तुरळक बिट्स वगळता सगळीकडे फिरुन झाले होते.
मी या क्षेत्रात आलो तेव्हा बातमीदारीत राजकारण म्हणजे विधानसभा आणि संसद बातम्या देणे सर्वात प्रतिष्ठेचे समजले जायचे. कारण स्वाभाविक होते. दररोज मुख्यमंत्री, मंत्री वगैरेंमध्ये उठबस व्हायची, ही सर्वोच्च पदावरची राजकारणी मंडळी या पत्रकारांना नावानं ओळखायची.
पुण्यातल्या दैनिक `केसरी'चे मुख्य वार्ताहर एकदा आजारी पडले तेव्हा यशवंतराव चव्हाण त्यांना भेटायला आले अशी आठवण काही जुनीजाणती मंडळी सद्गतीत होऊन आजही सांगतात. मी स्वतः आजीमाजी पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर यांच्याशी हस्तांदोलन केले आहे.
त्याकाळात नियमाने मंत्र्यांच्या आणि इतर राजकारण्यांच्या पत्रकार परिषदा व्हायची आणि काही पत्रकार सत्ताधाऱ्यांना अक्षरशः झोडपून काढायचे.
पण आता काळ बदलला होता. राजकारण आणि राजकारणी दैनिकांच्या दृष्टीने आता गौण बनले होते आणि बिझिनेस, क्रीडा, शिक्षण यासारख्या बातम्यासुद्धा पान एकवर झळकू लागल्या आणि बिझिनेस ही बिट राजकारणापेक्षा अधिक आकर्षक, मोह पडणारी बनली होती. या पत्रकार परिषदांमध्ये मिळणाऱ्या गिफ्ट्स खूपच छान आणि अत्यंत महागड्या असायच्या
बिझिनेस बिट घेतल्यानंतर एकापाठोपाठ पुण्याभोवतालच्या नामवंत उद्योगकंपन्यांना भेटी दिल्या. टाटा मोटार्सच्या समोर मी राहतो पण ही बिट घेतल्यानंतर पहिल्यांदा या मोटार कंपनीच्या भल्यामोठ्या आवारात फिरुन आलो, अर्थात गाडीने !
याच बिझिनेस बिट्मुळे मला तीन दिवसांची कोलकाता सफर मिळाली. नंतर `सकाळ टाइम्स'तर्फे थायलंडचा तिथल्या सरकारचा पाहुणा म्हणून बारा दिवसांचा दौराही झाला !
इन्फोसिस, टिसीएस, आणि इतर कितीतरी कंपन्या.. प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर ड्रिंक्स आणि जेवण झाल्यावर स्वतंत्र गाडीने मी कार्यालयात परतायचो ते मागच्या सीटवर बसूनच. मागे बसल्याबसल्या सिट बेल्टने स्वतःला बांधून घ्यायचे.
त्यावेळी ड्रायव्हर हमखास म्हणायचा, ''मागच्या सीटवर बेल्टची गरज नाही,'' त्याकडे मी दुर्लक्ष करायचो आणि मग नंतरच्या पाऊणएक तासाच्या प्रवासात मस्तपैकी ताणून द्यायचो. माझी आवडीची सिएस्ता!
गोव्यात मला अनेक चांगल्याबुऱ्या सवयी लागल्या त्यापैकी सिएस्ता किंवा दुपारची जेवणानंतरची वामकुक्षी एक !
यात सर्वांत महत्त्वाची असाईनमेन्ट असायची मर्सिडीझ कंपनीचा प्रेस दौरा. दोनतीनदा चाकणला जाऊन आल्यानंतर मग मर्सिडीझ कंपनीतर्फे माझे दिल्ली दौरे सुरु झाले.
पहाटे मला नेण्यासाठी घरी एक कार यायची, दिल्लीला विमानाने जायचे, तिथे भारतातल्या विविध शहरांतले मोठ्या दैनिकांचे बिझिनेस कॉरस्पॉन्डन्ट्स आलेले असायचे. मर्सिडीझ कंपनीच्या नव्या गाडीचे यावेळी अनावरण व्हायचे आणि संध्याकाळच्या विमानाने मी पुण्याला परतायचो.
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी रशिया आणि बल्गेरियाला जाण्यासाठी गोव्याहून दिल्लीला १९८६ ला आलो होतो, त्यानंतर तब्ब्ल तीस वर्षानंतर या बीटमुळे माझा दिल्ली दौरा झाला होता हे ध्यानात आलं आणि या बिट्बद्दल माझा आदर अधिक वाढला
या प्रत्येक वेळी अनावरण होणाऱ्या मर्सिडीझ कार खास डिझाईनड म्हणजे ऑर्डर घेऊन केलेल्या असायच्या, काहींच्या किमती काही कोटी रुपयांच्या आसपास.
देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान वगैरे व्हीव्हीआयपींसाठी बनवलेल्या. कुठल्याही प्रकारचा गोळीबार, बॉम्बस्फोट, भूकंप, आग, समोरासमोर टक्कर, यासारख्या प्राणघातक घटनांतसुद्धा कारमधील प्रवाशांचे पूर्ण संरक्षण करणाऱ्या या कार असत.
अनावरण झाल्यानंतर या महागड्या गाडीत ड्रायव्हरच्या सिटवर बसून फोटोसेशन करण्याची आम्हाला संधी मिळायची.
दिल्लीला मर्सिडीझ कारच्या अनावरणाच्या कितीतरी घटना मी कव्हर केल्या. नंतर मलाच कंटाळा आला आणि मी इतर ज्युनियर बातमीदारांना या जँकेट कव्हरेजसाठी पाठवू लागलो.
मला स्वतःला माझ्या कारमध्ये बसल्याबसल्या गाडी सुरु करण्यासाठी सिट बेल्ट लावून घेण्याची सवय आहे. कुठल्याही प्रवासात कारमध्ये मागे बसलो तरी सीट बेल्ट मी लावणारच. याबद्दल कारचे ड्रायव्हर आणि घरचेही लोक खूप हसतात, थट्टा करतात, पण मी चिडत नाही वा सिट बेल्ट काढत नाही. यासंदर्भात माझ्या युरोपच्या दौऱ्यातील एक घटना नेहेमी आठवते.
फ्रान्स आणि इटलीच्या तीन आठवड्यांच्या सहलीसाठी कुटुंबासह गेलो होतो तेव्हाचा हा प्रसंग. बहुधा पॅरीसमधली घटना असावी. तिकडे बहुतेक टॅक्सीज मर्सिडीझ कंपनीच्या होत्या. कुठल्याशा संभाषणात कार सिट बेल्टचा विषय निघाला आणि मूळचा तुर्की असलेल्या आमच्या ड्रायव्हरने सहज सांगितले कि कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाश्यांनी सिट बेल्ट्स लावले नाही तर खूप मोठा दंड भरावा लागतो.
मी चपापलो आणि त्याला विचारलं कि ``हे आधीच का सांगितलं नाही?''
``ते सांगण्याची मला गरज भासली नाही. इथं फ्रान्समध्ये पोलीस हा दंड कार ड्रायव्हरकडून नाही तर त्यात्या प्रवाश्यांकडून वसूल करतात!''
त्या ड्रायव्हरचे त्यावर हे उत्तर होते !