Did you like the article?

Monday, June 23, 2025



नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा'ला प्रस्तावना होती विजय तेंडुलकर यांची.

ही प्रस्तावना लिहित असताना तेंडुलकरांनी कामाठीपुरातल्या बऱ्याच वस्त्या पायाखाली घातल्या होत्या.
`गोलपिठा' तली आगळीवेगळी भाषा आणि व्यक्त झालेली जीवनशैली उच्चभ्रू लोकांना माहित नव्हती. हे सगळे समजून घेण्यासाठी झोपडपट्टीत, वेश्यावस्तीत अशी पायपीट करणे गरजेचे होते.
नामदेव ढसाळ त्याकाळात कामाठीपुरात म्हणजे वेश्यावस्तीत ढोरआळीत राहायचे. त्यांचे वडील क्रॉफर्ड मार्केटच्या खाटिकखान्यात सोडलेली ढोरे वाहणायचे काम करत असत.
नामदेव त्यांचा एकुलता मुलगा होता.
``नामदेवच्या सोबत घरी गेले तर त्याची आई साळुबाई जेऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायची नाही, तिने वाढलेल्या पितळी थाळीतल्या ताळीतल्या डल्ल्या, रसरशीत रस्सा आणि भाकरी आजही आठवते. विजय तेंडुलकरांनीही त्याचा आस्वाद घेतला होता,'' असे अर्जुन डांगळे यांनी `दलित पँथर अधोरेखीत सत्य' या पुस्तकात लिहिले आहे.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा’ हा काव्यसंग्रह सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला प्रकाशित झाला.
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण आठवले यांनी हा काव्यसंग्रह स्वखर्चाने छापला होता, त्यासाठी त्यांनी कविला म्हणजे ढसाळ यांना रॉयल्टीसुद्धा दिली होती.
त्या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांनी प्रस्तावना लिहिली. यावेळी नामदेव ढसाळ ही व्यक्ती मराठी साहित्यविश्वाला परिचित नव्हती.
ढसाळ यांचे वय त्यावेळी २२ वर्षे होते आणि विजय तेंडुलकर ढसाळांच्या दुप्पट वयाचे म्हणजे ४४ वर्षांचे होते.
तोपर्यंत `घाशीराम कोतवाल' हे ऐतिहासिक नाटक आणि `सामना' हा तितकाच ऐतिहासिक चित्रपट आणि दलित पँथर ही लढाऊ संघटना अजून जन्माला आलेले नव्हते,
तरीही तेंडुलकर ही व्यक्ती साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होती. तर ढसाळ यांच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्यास तेंडुलकरांनी तयारी दाखवली मात्र ही प्रस्तावना लिहिण्यास त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.
त्याविषयी खुद्द तेंडुलकरांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे.
याचे कारण ढसाळ यांनी कवितेत लिहिलेले कैक शब्द, वाक्यरचना, प्रतिमा, ढसाळांचे जग आणि त्यात वावरणाऱ्या अनेक व्यक्ती याविषयी विजय तेंडुलकरांना काहीच माहिती नव्हती. प्रस्तावना लिहिण्यासाठी ही माहिती जाणून घेणे गरजेचे होते.
आपल्या प्रस्तावनेत तेंडुलकरांनी लिहिले आहे”
``ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काही वेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या, तरीही त्यामागचे मन जाणवले होते.
नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, हे तेव्हा कळले. इतके प्रश्न एकदम मनात गोळा झाले की काही विचारणेच जमले नाही.
असाच तो आला आणि हसत म्हणाला, ‘माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.’ त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला.
आता आठवते की, माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी त्याला आग्रहाने सांगितले, पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते.
तो म्हणाला, ‘तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही.’ कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार?
``मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहिती करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला ‘सर’ म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले.
एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषा न् रेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच.''
तेंडुलकरांनी लिहिले आहे: ``मी ढसाळला म्हणालो, ‘मला तुझे जग पाहायचे आहे.’
हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो.
त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या गारठून टाकणाऱ्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच.
एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार?
फार फार वर वर मी थोडेबहुत पाहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवत होते, ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजावून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती.’’
``गुपची शिगा, डेडाळे, डल्ली, सल्ली, बोटी, गुडसे, डीलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात. एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपणे आणि अधिकाराने समजावले.
समजावताना एकीकडे तो संकोचत होता (विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेहऱ्यावर दिसत होता. परंतु अर्थ विचारताना आणखीच घोटाळा होऊ लागला.
नामदेव ढसाळ यांचे हे जग तेंडुलकरांना पूर्णतः अपरिचित होते. त्याविषयी तेंडुलकर लिहितात:
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’ निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते.
हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे,
उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्यदेहांचे, असोशी वाहणाऱ्या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाऱ्या तरुण रोगी देहांचे,
बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापासूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणाऱ्या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे’’.
नामदेव ढसाळ हा कवी एका शतकोनुशतके पिडलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्याच समाजातील एका महान व्यक्तीने या समाजाला माणूसपणाचे चिन्ह दिले, मात्र या समाजाचा छळ आणि विटंबना आजही संपलेली नाही, जुनी जखम आजही भळभळते आहे असे तेंडुलकरांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
`` या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणाऱ्या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते.
नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज कदाचित् तसाच जगला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीन-दीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्त्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले. परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक, विटंबना संपली नाही. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते.''
विजय तेंडुलकरांनी ढसाळ यांच्या कवितेची तुलना थेट संत तुकारामांच्या अभंगांशी केली आहे !
कुठल्याही मराठी साहित्यिकाच्या साहित्याची संत तुकारामांच्या लिखाणाची अशा प्रकारे तुलना झाल्याचे माझ्या तरी वाचण्यात नाही.
``त्याच्या कवितेने अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगांची आठवण मला दिली'' आणि ``तुकारामाचा आध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसकट ढसाळची कविता वागवताना मला भासते,''असे तेंडुलकर म्हणतात.
नामदेव ढसाळ यांचा मराठी साहित्यविश्वात क्रांती करणारा `गोलपिठा' हा कवितासंग्रह.
साहित्य अकादमीने बहुधा पश्चात्यबुद्धी म्हणून खूप, खूप उशिरा म्हणजे आपल्या स्वर्णजयंतीनिमित्त २००५ साली ढसाळ यांना जीवनगौरव पुरस्कार दिला.
अलीकडेच 'ढसाळ? कोण ढसाळ?'' असा प्रश्न विचारला गेला होता.
असे असले तरी विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून मराठी साहित्याचा सोडा, अगदी भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही याबद्दल शंका नसावी.

Camil Parkhe

Tuesday, June 10, 2025

 



छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

सत्तरच्या दशकापासून आधी मुंबईच्या अन नंतर पूर्ण महाराष्ट्रात गेली पन्नासाहून अधिक वर्षे राजकारणात चमकत राहिलेल्या भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेत आपली ताकद दाखवून दिली आहे.
सत्तरच्या दशकात मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हेच शिवसेनेचे दोन चेहेरे पूर्ण महाराष्ट्राला परिचित होते.
मुंबईचे नगरसेवक, महापौर, आमदार अशा शर्यतीत जोशी आणि भुजबळ असे दोघेही होते आणि शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नेत्यांना गोंजारत असत.
भुजबळ यांनी नंतर शिवसेनाच सोडली आणि काँग्रेसचा पंजा हाती धरला.
त्यावेळी संतापलेल्या शिवसैनिकांच्या रोषामुळे भुजबळांना अनेक दिवस अज्ञातवासात राहावे लागले होते.
शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांनी माझगाव मतरदारसंघात त्यांचा पराभव केला तेव्हा भुजबळ आता संपले असेच चित्र निर्माण झाले होते.
मात्र तसे झाले नाही .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत भुजबळ कायम सत्तेत होते आणि महत्त्वाची मंत्रीपदे बाळगून होते.
काही काळ तर ते उपमुख्यमंत्रीसुद्धा होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार आले तेव्हा भुजबळ यांनी त्याच्या आयुष्यातील अत्यंत खडतर काळ अनुभवला.
जवळजवळ अडीच वर्षे त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात ठेवण्यात आले होते.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाली तेव्हा भुजबळसुद्धा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते.
महायुती सरकार बहुमताने सत्तेवर आल्यानंतर मात्र गेली काही महिने ते सत्तेबाहेर ताटकळत उभे होते.
सत्त्यात्तर वर्षे वयाच्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यातील विविध स्तरांवरच्या सत्तेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम करणाऱ्या मोजक्या राजकारणी व्यक्तींमध्ये भुजबळ यांचा समावेश आहे.
Camil Parkhe May 20, 2025



Monday, May 26, 2025

 

अरविंद निर्मळ हे भारतातील दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीचे एक प्रमुख प्रणेते.

जालना येथे जन्म झालेल्या निर्मळ यांनी मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि नंतर बेंगलोर येथे युनायटेड थिऑलॉजिकल कॉलेजात (UTC) अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राद्यापक म्हणून कार्य केले.
तिथेच त्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला आणि ख्रिस्ती थिऑलॉजीची त्या दृष्टिकोनातून मांडणी केली.
सुताराचा मुलगा असलेला, कुष्ठरोगी, वेश्या यासारख्या समाजातील उपेक्षित घटकांबद्दल आपुलकी बाळगणारा येशू ख्रिस्त हा दलितच होता अशी त्यांची मांडणी होती.
ख्रिस्ती समाजातील ब्राह्मण्यवादाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.
ख्रिस्ती ईशज्ञानापेक्षा पूर्णतः वेगळे असलेले त्यांचे हे विचार प्रस्थापित धर्माचार्यांच्या दृष्टीने खूप धक्कादायक होते आणि त्यामुळे निर्मळ यांना खूप त्रास सहन करावा लागला.
आजही अरविंद पौलस निर्मळ ( १९३६-१९९५) यांचे दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीविषयक विचार जवळजवळ बहिष्कृत करण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे तर प्रस्थापित ख्रिस्ती - कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट - वर्तुळांत `दलित' हा शब्द किंवा त्यास असलेला कुठलाही पर्यायी शब्द आजही लांच्छनीय किंवा घृणास्पद मानला जातो.
अरविंद निर्मळ यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे बेंगलोरहून महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांनी येथे दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीचा प्रसार करण्याचे प्रयत्न केले.
यासाठी त्यांनी १९२७ सालापासून सुरु असलेल्या आणि प्रस्थापित झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून एक वेगळी चूल मांडली.
नगर येथे १९९२ साली त्यांनी पहिले मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवले.
या संमेलनास किती प्रखर विरोध झाला ते त्यावेळच्या बातम्यांमधून दिसते.
आपल्या या चळवळीत अरविंद निर्मळ यांनी सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ आणि उषा वाघ, `आपण' साप्ताहिकाचे संपादक सत्यवान नामदेव सूर्यवंशी, वामन निंबाळकर, प्रा. अविनाश डोळस आदींना आपल्याबरोबर घेतले.
स. ना. सूर्यवंशी आणि देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने आयोजित केली. त्यानंतर निर्मळ यांचे निधन झाले.
मात्र ही पोस्ट मुख्यतो अरविंद निर्मळ यांच्यावर नाही,
निर्मळ यांच्यानंतर महाराष्ट्रात दलित ख्रिस्ती चळवळ आणि संमेलने एकाहाती चालू ठेवणारे सुभाष चांदोरीकर यांच्यावर आहे.
निर्मळ यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरांत दलित ख्रिस्ती संमेलने भरवण्याचे कार्य आणि त्याद्वारे ही चळवळ चालू ठेवण्याचे एक खूप अवघड काम चांदोरीकर यांनी चालू ठेवले आहे.
बिशप प्रदीप कांबळे, डॉ गिल्बर्ट लोंढे,, वसंत म्हस्के, अनुपमा डोंगरे जोशी, जेसुईट फादर ज्यो गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पुणे, नागपूर, उदगीर, श्रीरामपूर आणि संगमनेर येथे ही संमेलने भरवली.
आतापर्यंत एकूण अकरा दलित ख्रिस्ती संमेलने भरली आहेत. त्यापैकी नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथे मी हजेरी लावलेली आहे.
यापैकी काही संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील आढाव यांच्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा' शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा' या ग्रंथात (दिलीपराज प्रकाशन 2003 ) समाविष्ट आहेत.
दलित या शब्दाची अनेकांना अँलर्जी अन वावडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द वापरु नये असा आदेश काढला आहे.
मात्र त्यासाठी चपखल किंवा पर्यायी असा शब्द अजून तरी शोधण्यात आलेला नाही.
शाहू पाटोळे यांचे `दलित किचन्स इन मराठवाडा' हे इंग्रजी पुस्तक हल्ली गाजते आहे.
आपल्या `भारत यात्रेत' राहुल गांधी यांनीसुद्धा त्यांची या संदर्भात भेट घेतली होती.
`दलित किचन्स' ऐवजी कुठला इतर चपखल बसणारा पर्यायी शब्द वापरता आला असता?
सुगावा प्रकाशनाने २०१८ साली प्रकाशित केलेल्या माझ्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद' या पुस्तकात ' निग्रो ते आफ्रिकन-अमेरिकन, अस्पृश्य ते दलित' या नावाचे एक प्रकरण आहे.
त्यात दलितांच्या आणि कृष्णवर्णीयांच्या संबोधनात होत गेलेल्या बदलाविषयी डॉ. जनार्दन वाघमारे यांचे एक विधान मी उदगृत केले आहे.
'नावात किती आशय असतो हे यावरून लक्षात येईल. कुणास ठाऊक, हे नावही उद्या बदलेल. 'दलित' हे नावदेखील पुढे कायम राहील ते छातीठोकपणे सांगता येणार नाही.''.
त्यावेळी मलासुद्धा असे वाटले नव्हते.
सुभाष चांदोरीकर हे प्रोटेस्टंटपंथीय मेथॉडिस्ट चर्चचे एक पाळक आणि अधिकारी राहिले आहेत.
आता निवृत्त झाले आहे. दलित चळवळीवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी काही सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.
काल चांदोरीकर यांची त्यांच्या पुण्यातील नळ स्टॉपजवळील घरी भेट घेतली.
त्यांच्याबरोबर काही फोटोही घेतले.
त्यानिमित्त त्यांची समाजमाध्यमावर ही ओळख.
Camil Parkhe, May 14, 2025

Saturday, May 17, 2025


 व्हॅटिकन सिटीतल्या सिस्टाईन चॅपेलवरील चिमणीतून  बाहेर पडणारा आणि नव्या पोप निवडीचा संदेश देणारा पांढरा धूर नेहेमीच अनपेक्षित बातमी सांगत असतो. अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची म्हणून पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाल्याने धक्कादायक वृत्त सांगण्याची ही परंपरा आताही कायम राहिली आहे. 

इतिहासात दीर्घकाळ केवळ इटालियन कार्डिनलची पोपपदावर निवड व्हायची.  त्याकाळात इटालियन कार्डिनल्स बहुसंख्य असायचे हे त्यामागचे प्रमुख कारण.  गेल्या शतकात पोलंडचे कार्डिनल कॅरोल वोज्त्याला  यांची पोप जॉन पॉल दुसरे यांची निवड झाल्यापासून ही परंपरा आतापर्यंत खंडित झाली आहे. 

मात्र अमेरिकेतील कार्डिनल या पदावर निवडून येतील कि नाही याबाबत उघड शंका व्यक्त केली जात होती. कॉलेज ऑफ कार्डिनलन्सने याबाबत धक्कादायक निर्णय घेतला हे नक्की. 

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी मार्च सात रोजी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरु झाले तेव्हा जगभरातील सर्व  कार्डीलन्स  संपूर्ण जगाला नैतिकच्या आधारे संदेश देऊ शकेल असे नवे नेतृत्व निवडण्यासाठी  स्वतःला एकत्र कोंडून घेत होते. 

या १३३ कार्डिनलांमध्ये भारतातील चार आणि आणि पाकिस्तानातील एक कार्डिनल्सचा  समावेश होता. . 

दुसऱ्या दिवशी गुरुवारी व्हॅटिकन सिटीतील सेंट पिटर्स बॅसिलिकेतील चिमणीतून दुसऱ्यांदा काळा धूर बाहेर आला.

याचा अर्थ दोनदा निवडणूक पार पडल्यानंतर नूतन पोपबाबत   दोन तृतियांश मतदान कुणाही उमेदवाराला मिळालेले नाही. 

जोपर्यंत दोन तृतियांश मतदान कुणाही कार्डिनलला मिळत नाही, तोपर्यंत  मतदान होत राहते.  

ही निवडणूक प्रक्रिया किती काळ चालेल याविषयी  काहीही  अटकळ बांधता येत नाही. 

त्यामुळे गेले काही दिवस सेंट पिटर्स चौकात मोठ्या औत्सुक्याने जमलेल्या भाविकांना किंवा जगभरातील इतर लोकांना  चिमणीतून पंधरा धूर कधी येईल आणि नवे पोप कोण असतील, युरोप कीं इतर कुठल्या खंडातील आणि कुठल्या देशातील असतील याबाबत जाम औत्सुक्य होते . 

बुधवारी   'Extra omnes', लॅटिन भाषेतील हे परवलीचे वाक्य उच्चारत  'everyone out'  ज्यांनी वयाची ऐशी पार केली आहे अशा सर्व कार्डीलन्सनी आणि इतर संबंधित नसलेल्या लोकांनी आपली रजा घ्यावी असे सांगण्यात आले.   

 त्यानंतर पोपपदाच्या निवडणुकीत आणि या पदासाठी पात्र असलेल्या  जगातील १३३ रेड हॅटधारी कार्डिनल्स हेच फक्त सेंट सिस्टाईन चॅपलमध्ये राहिले.

या प्रकियेचे सूत्रधार असलेल्या कार्डिनलसने चॅपेलच्या प्रवेशद्वार आतून बंद केले. बाहेरच्या लोकांनीसुद्धा ते दार बाहेरुन कुलूपबंद केले. 

आतल्या लोकांचा आणि बाहेरच्या लोकांचा एकमेकांशी संपर्क साधण्याचा कुठलाही मार्ग ठेवलेला नाही. 

पहिल्याच दिवशी या कार्डिनल्सनी मतदान केले आणि हे बाहेर सगळ्या जगाला कळले. 

चिमणीतून बाहेर आलेल्या काळ्या  धुरामुळे. 

पोप निवडण्यासाठी आवश्यक मताधिक्य मिळाले नाही हे सांगण्यासाठी ही पारंपरिक प्रथा आजही पाळली जाते. 

ज्यावेळी नवीन पोप निवडले जातील तेव्हा काही क्षणातच सिस्टाईन चॅपेलच्या  चिमणीतून पांढरा धूर सोडला जातो . 

आपला लाल झगा आणि लाल हॅटऐवजी  शुभ्र झगा घालून नवे पोप बॅसिलिलातील चौकात जमलेल्या लोकांना सामोरे जातात  आणि आपली नवी ओळख - पोप म्हणून आपले नाव - जगाला सांगतात . 

नूतन पोप जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. दीर्घकाळानंतर कॅथोलिक चर्चला तळगाळात काम करायचा अनुभव असलेला एक मिशनरी पोप लाभला आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरु या  देशात रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांनी आधी एक धर्मगुरु म्हणून आणि नंतर बिशप म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. 

पेरु इथे कार्यरत असताना या देशाचे ते नॅचरलाईज्ड सिटीझन बनले. त्यामुळे पोपपदी निवड होण्याआधी ते अमेरिकेचे आणि त्याचत्याबरोबर ते पेरु या लॅटिन अमेरिकेतील देशाचेही नागरिक  होते.  पोप लिओ चौदावे बनल्यानंतर त्यांचे या दोन्ही देशांचे नागरीकत्व पूर्णतः अर्थहीन बनले आहे. याचे कारण तहहयात पोप या नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे ते आता केवळ नागरिक नाही तर राष्ट्रप्रमुख बनले आहेत. 

कॅथोलिक  चर्चमध्ये रिलिजियस आणि सेक्युलर किंवा डायोसिसन म्हणजेच धर्मप्रांतीय असे दोन प्रकारचे धर्मगुरु असतात. सेक्युलर किंवा डायोसिसन (धर्मप्रांतीय) धर्मगुरु स्थानिक धर्मप्रांताचे मुख्य असलेल्या बिशपांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात.  

एखादी व्यक्ती आपल्या देशातील अथवा जगातील कुठलाही धर्मप्रांत आपल्या कार्यासाठी निवडू शकते. उदाहरणार्थ, फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई धर्मप्रांताचे म्हणजे धर्मप्रांतीय धर्मगुरु होते तर नाशिक धर्मप्रांताचे पहिले बिशप बनलेले फादर थॉमस भालेराव हे जेसुईट धर्मगुरु किंवा सोसायटी ऑफ जिझस (येशूसंघ) या संघटनेचे सदस्य होते. 

याउलट  `रिलिजियस' धर्मगुरु आणि नन्स असतात. कॅथोलिक चर्चमध्ये धर्मगुरुंच्या आणि नन्सच्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ, डॉन बॉस्को किंवा सालेशियन्स, जेसुईट्स,  फ्रान्सलियन्स,  मदर तेरेसा किंवा मिशनरीज ऑफ चॅरीटी सिस्टर्स, फातिमा सिस्टर्स, वगैरे. या संघटनेच्या धर्मगुरुंना आणि धर्मभगिनींना म्हणजे नन्स यांना कॅथॉलिक चर्चमध्ये रिलिजियस असे संबोधले जाते.  संपूर्ण जग म्ह्नणजे जिथेजिथे त्यांच्या संस्थेचे कार्य आहे, तिथपर्यंत त्यांच्या कार्याची सीमा असते. 

चर्चमधील धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या सर्व संघटना  पोप यांच्या संमतीनेच स्थापन होऊ शकतात.  कॅथोलिक परमाचार्य म्हणून  २०१३ साली निवड झालेले  पोप फ्रान्सिस हे येशूसंघ किंवा जेसुईट या धर्मगुरुंच्या संस्थेचे पहिले पोप होते. त्याचप्रमाणे पोप लिओ चौदावे हे कॅथोलिक धर्मगुरुंच्या ऑर्डर ऑफ सेन्ट ऑगस्टीन (ओएसए) या  संस्थेचे आता पहिले पोप बनले आहेत.  

पोप लिओ चौदावे यांना भारत मुळीच अपरिचित नाही.  देशातील अनेक कॅथोलिक धर्मगुरुंना आणि बिशपांना नूतन पोप चांगले परिचित आहे. याचे कारण बिशप असताना रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी भारताला दोनदा भेट दिलेली आहे. 

ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन  (ओएसए ) या आपल्या धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रमुख या नात्याने भारतातील या संघटनेच्या केरळ आणि तामिळनाडू येथील विविध संस्थांना २००४ आणि २००६ साली त्यांनी भेटी दिल्या होत्या. 

या दौऱ्यांच्या वेळी त्यांचे यजमान असणाऱ्या धर्मगुरुंनी प्रीहोस्ट यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.  पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या भारतभेटीतील अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर  झळकली आहेत. उदाहरणार्थ, नाशिकचे त्यावेळचे बिशप लुर्डस डॅनियल यांच्यासमवेत बिशप प्रीहोस्ट यांनी मिस्साविधी साजरा केला होता. 

जगभरातील कॅथोलिक समुदायाचे पोप हे प्रमुख आहेत. ऐतिहासिक कारणांमुळे पोपपदाला भारतासह विविध राष्ट्रांनी  व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख  म्हणूनही मान्यता दिलेली आहे.  त्यामुळेच पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधीला जगभरातील दिडशेहून अधिक राष्ट्रांचे नेते उपस्थित होते, या नेत्यांमध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा समावेश होता.  

कार्डिनलांच्या कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपबाबत निर्णायक मतैक्य झाल्यानंतर सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीमधून काळ्या धुराऐवजी पांढरा धूर सोडला जातो आणि काही क्षणातच सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या मुख्य गॅलरीत निर्वाचित पोपना आणले जाते.  लॅटिनमध्ये `"हॅबेमस पापम"  (वूइ हॅव्ह अ पोप)  असे  संपूर्ण जगाला सांगून नवीन पोपची ओळख करुन देण्यात येते. त्याचवेळी नवीन पोप आपल्या जुन्या नावाचा त्याग करुन आपली नवी ओळख सांगतात. 

परंपरेनुसार आपले मूळ नाव म्हणजे बारशाच्या  किंवा बाप्तिस्मावेळी मिळालेले नाव वगळून दुसरे इतर कुठलेही नाव नूतन पोपना घ्यावे लागते.  येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि पहिले पोप असलेल्या पहिला पोप असलेल्या सेंट पिटरचे मूळचे नाव सायमन (शिमोन) असे होते. हिच प्रथा आजही पाळली जाते.  

तेरा वर्षांपूर्वी अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लीओ यांची पोप म्हणून निवड झाली तेव्हा त्यांनी फ्रान्सिस हे नाव धारण केले. फ्रान्सिस या नावाचे ते पहिलेच पोप.

सेंट पिटर यांचा २६७वे  वारसदार म्हणून निवड झाल्यानंतर कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी पोप लिओ चौदावे असे नाव धारण केले.  पोप लिओ तेरावे यांचा कार्यकाळ फेब्रुवारी १८७८ ते जुलै १९०३ असा पंचवीस वर्षांचा होता.  तात्कालीन औद्योगिक क्रांती आणि कामगारांची स्थिती  याबाबत पोप लिओ तेरावे यांनी महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता. 

सद्याची औद्योगिक परिस्थिती  आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण केलेली आव्हाने यामुळे आजची स्थिती तेव्हापेक्षा फारशी वेगळी नाही, त्यामुळे आपण लिओ हे नाव धारण करत आहोत असे नूतन पोप यांनी त्यांना निवडणाऱ्या सहकारी कार्डिनल्सना सांगितले आहे.  

विशेष म्हणजे पोपपदावर येण्याआधीच समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पोप लिओ चौदावे पहिलेच आहेत. आधी ट्विटर  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स समाजमाध्यमावर कार्डिनल प्रीहोस्ट यांचे स्वतःचे अकाऊंट  होते. अलीकडेच सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीतून बाहेर पडणारा पांढरा धूर आणि त्यानंतर नव्या पोपची जगाला करुन दिलेली ओळख असे ऐतिहासिक क्षण माझ्यासह जगभरातील असंख्य  लोकांनी समाजमाध्यमांवर पहिल्यांदाच अनुभवले असतील. या प्रभावशील समाजमाध्यमांचा नवीन पोप पुरेपूर उपयोग करतील असे दिसते.

रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५५ रोजी शिकागो, इलिनॉय येथे झाला होता. मिश्र वांशिक वारसा त्यांना लाभलेला आहे.  फ्रेंच आणि इटालियन वंशाचे लुई मारियस प्रीव्होस्ट आणि स्पॅनिश वंशाच्या मिल्ड्रेड मार्टिनेझ हे त्यांचे आईवडील.  रोम येथेच १९८२ साली त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा मिळाली. पोप फ्रान्सिस यांनी प्रीव्होस्ट यांची बिशपपदावर २०१५ साली नियुक्ती केली आणि केवळ दोन वर्षाआधीच २०२३ ला पोप फ्रान्सिस यांनी  त्यांना कार्डिनलपदाची `रेड हॅट'  दिली होती.

त्यामुळे पोपपदासाठी यावेळी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये प्रीहोस्ट तसे खूप ज्युनियर होते. तरीसुद्धा त्यांची पोपपदी निवड झाली याचा अर्थ केवळ ज्येष्ठतेपेक्षा इतर अनेक महत्त्वाचे निकष त्यांच्या निवडीसाठी वापरले गेले होते.  कॅथोलिक धर्मपिठाने युरोपकेंद्रित न राहता इतर जगाकडेही  लक्ष द्यावे असा स्पष्ट संदेश चर्चच्या कॉलेज ऑफ कर्डिनल्सने सलग दुसयांदा दिलेला आहे.  

सत्तर देशांतील १३३ कर्डिनल्सनी हा निर्णय घेतला आहे, त्या कार्डिनल्समध्ये भारतातील  गोवा आणि दमणचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव (वय ७२), वंचित समाजातील पहिलेच असलेले हैदराबादचे कार्डिनल अँथनी पुला (६३), केरळमधील सिरो मलांकार कॅथोलिक चर्चचे कार्डिनल बॅसिलिओस क्लिमिस  (६४) आणि  कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्वाकड (५१) यांचा समावेश होता. यंदाच्या पेपल कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वाधिक तरुण कार्डिनल्समध्ये  नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या  जॉर्ज जेकब कुव्वाकड होते.  

नूतन पोप यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. जगभरात युद्धे, अतिरेकी कारवाया अशा कारणांमुळे होणारा हिंसाचार, स्थलांतरीतांचे प्रश्न, मानवी मूलभूत हक्क, आर्थिक विषमता, वंचित आणि उपेक्षित समाजघटक यासंदर्भात  पोप यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी नेहेमीच अपेक्षा असते.  त्याशिवाय चर्चअंतर्गत अनेक समस्यांना पोप लिओ यांना सामोरे जावे लागेल.

नवीन पोप उदारमतवादी, सनातनी कि मध्यममार्गी आहेत ?  गेल्या शतकाच्या मध्यंतरानंतर पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर झालेल्या बहुतेक सर्व पोपमहाशयांनी सुधारणावादी भूमिका घेतलेली दिसते. साठच्या दशकात पोप पॉल सहावे यांनी जगभ्रमंतीला सुरुवात केली ती जॉन पॉल दुसरे आणि अलीकडे पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली होती. 

एकोणसाठ वयाचे पोप लिओ तसे तुलनेने वयाने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारताबरोबरच विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथोलिक चर्चला  भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना  पुरती जाणीव असेल.  

कॅथोलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज कालबाह्य झालेल्या आहेत.  याबाबत नवीन पोप काय करतात याकडे चर्चमधील आणि चर्चबाबत अपेक्षा बाळगणाऱ्या बाहेरच्या लोकांचेही लक्ष असेल. चर्चच्या दैनंदिन आणि इतर कारभारांत स्त्रियांचा सहभाग, स्त्रियांना पौरोहित्याचे अधिकार याबाबत प्रागतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या  जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिकट आणि पोप फ्रान्सिस या सर्वांची भूमिका मात्र  'जैसे थे' वादी होती,   पोप लिओ यांनी याबाबत उदारमत स्वीकारावे अशा चर्चमधील आणि बाहेरील अनेक लोकांचा सूर आहे. नूतन पोप याबाबत काय भूमिका घेतात याबाबत जगभर औत्सुक्य असेल.

 Camil Parkhe 

^^^^

Monday, May 12, 2025


 फुले' चित्रपट पाहिला.

चित्रपट तसा मी सिनेमागृहात किंवा घरीही कधी पाहत नाही.
गेली तिनेक वर्षे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या क्रांतिकारक दाम्पत्याला शिकवणाऱ्या आणि घडवणाऱ्या नगरच्या सिंथिया फरार, पुण्यातले स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्याविषयी मी वाचत आणि लिहित असल्याने या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता होती.
`फुले' चित्रपटाने निराश केले नाही.
ऐतिहासिक व्यक्तींच्या फोटोअभावी प्रत्यक्षात त्या कशा दिसत असतील, त्यांचा कसला पेहेराव असेल याविषयी आपल्या मनात काहीच आखाडे नसतात.
ही पात्रे पडद्यावर जिवंत होऊन वावरतात तेव्हा त्यांच्याविषयी मनात वेगळीच प्रतिमा निर्माण होते.
मराठी चित्रपट `सत्यशोधक' ची सुरुवातच होते ते जोतीबा आणि त्याचे सवंगडी स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकतात अशा प्रसंगाने.
हिंदी `फुले' चित्रपटात सावित्रीबाई ज्यांच्याकडे अध्यापनाचे धडे शिकतात त्या नगरच्या अमेरिकन मिशनरी मिस सिंथिया फरार यांच्यावर अनेक दृश्ये चित्रित केली आहेत.
या सिंथिया फरारबाईंचे पहिलेवहिले चरित्र मी मराठी आणि इंग्रजीत लिहिले असल्याने ही दृश्ये पाहताना विशेष आनंद वाटला.
जोतिबा आणि सावित्रीबाईंच्या शाळेतील निबंध लिहिणारी विद्यार्थीनी मुक्ता हिच्यावरसुद्धा या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
हा निबंध जोतिबांकडून मिळवून नगरच्या `ज्ञानोदय' मासिकाने १८५५ सालीच छापला होता आणि त्यामुळे या पहिल्यावहिल्या दलित लेखिकेची कलाकृती जतन झाली.
यशवंत जोतिबा फुले यांचाही चित्रपटात वावर आहे.
हा चित्रपट हिंदीत आहे याबद्दल विशेष आनंद, जोतिबांचे कर्तृत्व राष्ट्रीय पातळीवर नेण्यास त्यामुळे निश्चितच मदत होईल .
चित्रपटगृहात बऱ्यापैकी गर्दी होती. चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.
Camil Parkhe May 4, 2025

Sunday, May 11, 2025

 माझा एक खूप जुना छंद आहे. माझी बाग फुलवण्याच्या, झाडे लावण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या आवडीशी संबंधित हा छंद आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर दोनतीन मोठे पाऊस होऊन गेले की फिरायला गेल्यावर किंवा रस्त्याने कुठेही चालत असलो की माझी नजर रस्त्याच्या कडेला आजूबाजूला भिरभिरत असते.

रस्त्याच्या कडेला इमारतींच्या कुंपणांच्या भितीला लागून असलेल्या मातीत भरपूर गवत असते, त्याचबरोबर तेथे उगवलेली अनेक छोटीछोटी रोपटी वाऱ्याच्या झुळुकीने डोलावत असतात.
यापैकी काही रोपे मला आकर्षित करत असतात.
त्यात हमखास काही झेंडूच्या, अबोलीच्या किंवा गुलबकावलीच्या फुलांची रोपे असतात, काही टमाट्याची तर काही मिरच्यांची रोपे असतात.
सणावाराला वापरलेली झेंडूची फुले सुकल्यानंतर अशीच कुठेतरी पडतात आणि त्यातील काही बिया पावसानंतर मग अशा रोपांच्या अवतारात प्रकटतात. मिरच्या आणि टमाट्याच्या बियांचेही असेच होत असते.
पिंपळ, वड, उंबर आणि कडुनिंबांच्या अतिशय चिवट असणाऱ्या रोपांबद्दल तर बोलायलाच नको. जिथेतिथे मातीचा आसरा मिळेल तिथे या झाडांची रोपे आपली मुळे घट्ट रोवत असतात.
यापैकी झेंडू, टमाटे आणि मिरच्यांची रोपे अलगद मातीसह उपटून मी घरी आणतो आणि छोट्यामोठ्या कुंड्यांत ती लावतो. यानंतर काही दिवसांत या नव्या जागेत ही रोपे तरारतात आणि गणपती उत्सवात आणि त्यानंतरच्या नवरात्र- दसरा सणांत इमारतींमधल्या अनेक शेजाऱ्यांना वेगवेगळ्या रंगांतल्या ही झेंडूची टपोरी फुले खुणावत असतात. फुले वाढवण्याची माझीही तपस्या सार्थकी झालेली असते. त्यामुळे एखाददुसरे फुल कोणी माझ्या नकळत कुणी नेले तरी अशावेळी फार त्रागा करायचा नसतो हे मी शिकलो आहे.
पण आता मी सांगत असलेला माझा हा छंद लवकरच भुतकाळ होईल कि काय अशी भीती मला गेली काही दिवस वाटते आहे.
याचे कारण आमचे शहर हे महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटींपैकी एक आहे आणि देशांतल्या स्मार्ट सिटींच्या स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी येथे नवनवीन विकासाचे प्रयोग हाती घेतले जात आहेत.
एक मात्र मान्य करायलाच हवे कि या स्मार्ट सिटी कार्यक्रमामुळे शहरात खूप बऱ्यापैकी स्वच्छता दिसायला लागली आहे. मात्र याच अभियानातर्गत शहरात ठिकठिकाणी काँक्रिटचे रस्ते बांधण्यात येत आहेत, या रस्त्यांलागूनच सगळीकडे पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यांवरची धूळ आता कमी झाली आहे.
याचीच एक उणी बाजू म्हणजे जोरदार फटका असा कि या रस्त्यांच्या आजूबाजूच्या परीसरात जमीन आणि माती आता अजिबात दिसेनाशी झाली आहे. या रस्त्यांवर जी काही झाडी आधीच होती त्यांच्या आळ्याभोवती नरडे दाबावे अशा पद्धतीने झाडाच्या मुळाभोवती काँक्रीट लावले आहे कि एक थेंब पाणीही जमिनीत झिरपू नये.
सुरुवातीला हे काँक्रिट रस्ते काही ठराविक भागांतच असतील असे वाटले होते पण महापालिकेने ही मोहीम सर्व शहरभर राबवण्याचा धडाका लावला आहे आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकेल असे वाटते आहे.
आता पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होणार आहे. त्याऐवजी पावसाचे पाणी काँक्रिटच्या रस्त्यांवरुन आणि पेव्हर ब्लॉकवरुन वाहून थेट नाल्यात आणि जवळच्या नदींत मिळणार आहे.
याचाच अर्थ शहरातील जमिनीखालील पाण्याची पातळीही कमी होणार आहे आणि शहराच्या अनेक भागांत बाराही महिने बऱ्यापैकी पाणी असणाऱ्या बोअर वेल्स आता कोरड्या राहणार आहेत.
शहरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोकळी जागा असेल तिथे कितीतरी प्रकारची रोपे आणि झाडे उगवतात, काही छानपैकी तग धरून राहतात आणि मग चांगली मोठी होतात. अशाप्रकारची नैसर्गिक वृक्षारोपणाची प्रक्रिया आता मोकळी जमीन आणि मातीच शिल्लक नसल्याने ठप्प होणार आहे आणि त्यामुळे पर्यायाने हिरवे आच्छादन कमीकमी होत जाणार आहे.
एक झाड किती पक्षांना, प्राण्यांना आसरा देते, अन्न देते हे सांगायलाच नको. मी शहरात राहत असलो तरी तीसपस्तीस वर्षे जुन्या असलेल्या आमच्या कॉलनीत आजही गर्द झाडी आहेत. त्या झाडांवर दिवसरात्र अनेक पक्षी - कोकिळ, पोपट, बुलबुल, खंड्या आणि हॉर्नबिल वगैरे - कायम संचार करत असतात.
माझ्या कॉलनीसमोरच असलेल्या टाटा मोटार्स या वाहननिर्मितीच्या कारखान्यात असलेल्या झाडांमध्ये वटवाघळांची मोठी वसाहत आहे, सुर्यास्तानंतर हे निशाचर पक्षी आपली वसाहत सोडून अन्नाच्या,भक्ष्याच्या शोधात मोठ्या संख्येने बाहेर पडताना रोज दिसतात. दिवसभर पाचसहा खारुताई जमिनीवरुन, इमारतींच्या बाल्कनीच्या सज्ज्यांवरुन या झाडांवरून त्या झाडांवर सारख्या फिरत असतात,
मानवी वसाहत वाढत गेल्याने काही वर्षांपासून तळमजल्यांवरच्या फ्लॅट्समध्ये नाग-साप सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. शहरातले हरीत आच्छादन असे कमी होत गेल्याने अशा कितीतरी पक्ष्यांना आणि प्राण्यांचे अस्तित्वच नाहिसे होत जाणार आहे.
वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, गवा वगैरे प्राणी त्यांच्या राहण्याच्या नैसर्गिक जागा कमी होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शहरांत आणि गावांत मानवी वसाहतीचा अविभाज्य भाग असलेले गायबैल, म्हशी, घोडे, कोंबड्या, गाढव असे पाळीव प्राणीही संख्येने कमी होत चालले आहेत.
खूप वर्षांपूर्वी मी या शहरात राहायला आलो तेव्हा कॉलनीतल्या इतर इमारतींच्या बांधकामासाठी माती, मुरुम वगैरे सामानाच्या वाहतुकीसाठी गाढवांचा सर्रासपणे वापर होत असे. ती वाहतूक पाहताना ' गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरु मेले हेलपाट्याने' ही म्हण हमखास आठवायची.
महाबळेश्वरसारख्या परिसरांत वर्षभर डांबरी रस्त्यावर धावत्या वाहनांच्या चाकांखाली चिरडले गेलेले अनेक साप, आणि इतर सरपटणारे प्राणी दिसतात. काही वेळेस हरणासारखे प्राणी वाहनांच्या धडकेने जखमी होऊन रस्त्यावर निपचितपणे पडलेले दिसतात.
परवा आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पूर्ण वाढ झालेला एक बेडूक सलग दुसऱ्या दिवशी दिसला तेव्हा कितीतरी वेळ मी त्या टुणकन उड्या मारणाऱ्या प्राण्याकडे कौतुकाने पाहत राहिलो.
मनात म्हटल पावसाच्या आगमनाची वर्दी द्यायला महाशय आपला सुप्तावस्थेचा काळ संपवून जमिनीवर आलेले दिसतात.
आजकाल आपल्या कांतीचा रंग बदलणारे सरडे, घोरपडीसारखे सरपटणारे प्राणी, ऊन आणि पावसाच्या लपंडावाच्या खेळात उडणारी फुलपाखरे , मुंगूस अशा सजिवांचे दर्शन किती दुर्लभ झाले आहे.
आज शहरात घोड्यांप्रमाणे गाढव हा प्राणी नाहीसा झाला आहे. गुजरातच्या सीमेवर असलेल्या दादरा, नगर हवेली या प्रदेशात मी राहायला गेलो कि तिथे रस्त्यांवर आणि सगळीकडे `चिवचिव' करत उडणाऱ्या चिमण्या मी पाहतच राहतो.
आमच्या शहरात चिमणी कितीतरी वर्षांपासून हद्दपार झाली आहे.
आणि हे सर्व होत आहे ते मानवजातीच्या विकासाच्या आणि सुखसोयींच्या नावाखाली. यात पृथ्वीतलावरच्या इतर छोट्यामोठ्या प्राणिमात्रांना, वृक्षवल्लींना अजिबात स्थान नाही. मध्ययुगीन काळात हे संपूर्ण विश्व पृथ्वीकेंद्रित आणि मानवकेंद्रित आहे असा समज होता.
या विश्वात कितीतरी सुर्यमालिका आणि आकाशगंगा आहेत या सिद्ध झाल्याने आज हा समज गैरलागू ठरतो. मात्र मानवजात आपल्या सुखसोयी आणि विकास यांचा पाठलाग करताना आजही हे विश्व मानवकेंद्रित आहेत असेच गृहित धरले जाते हे खूप वाईट आहे.
बायबलमध्ये महाप्रलयाची किंवा जगबुडीची एक कथा आहे. देवाच्या संकेतानुसार आधीच एक महाकाय नौका बांधलेला नोहा आणि त्याने आपल्याबरोबर घेतलेल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या या जगबुडीतून वाचतात.
पाऊस आणि प्रलय ओसरल्यानंतर बाहेर काय स्थिती आहे हे जाणण्यासाठी नोहा एका कबुतराला नौकेबाहेर सोडतो.
हे कबुतर काही काळाने आपल्या चोचीत ऑलिव्ह वृक्षाची काही पाने घेऊन परतते.
जगभर आजही ऑलिव्ह वृक्षाची फांदी चोचीत असलेले कबुतर सुख-शांतीचे प्रतिक समजले जाते ते या कथेमुळेच.
आपल्या स्वतःच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि इतर प्राणिजनांचा समूळ नाश करत मानवजात आपल्या विनाशाच्या दिशेने जात आहोत याबाबतची धोक्याची घंटा पर्यावरणवादी आणि इतरजण वाजवत असतात.
अशावेळी या विश्वाच्या एखाद्या कोपऱ्यात, दूरच्या कुठल्यातरी परग्रहावर आश्रयासाठी आणि जिवंत राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे का याची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न खरे तर कधीच सुरु झाले आहेत.
नोहाकडे ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेऊन परतलेल्या कबुतराने नौकेबाहेर आता सगळे काही अलबेल आहे अशी शुभवार्ता आणली होती. पर्यावरणाचा नाश करण्याच्या मोहिमेला मानवाने वेळीच थांबवले नाही तर अगदी हताश होऊन अशाच प्रकारच्या दूरवरच्या एखाद्या परग्रहावरून येणाऱ्या संकेतांची, शुभवार्तेची पुढच्या पिढयांना वाट पाहावी लागणार आहे.
त्या वार्तेची अगदी आतुरतेने प्रतिक्षा करण्याची वेळ लवकर न येवो ! मात्र त्यासाठी मानवाने आपला विनाश जवळ आणण्यासाठी सद्या चालू ठेवलेल्या प्रयत्नांस तातडीने आवर घालायला हवा.
---