Did you like the article?

Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025

Wednesday, May 8, 2024

 

पंडित भीमसेन जोशी

पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसला मी रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. साल होते १९९०.
गोव्यात पणजीला हायर सेकंडरी, पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिथेच `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात पत्रकारीतेला सुरुवात केली होती. या दीर्घ कालावधीत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक घडामोडींशी फारसा संबंध राहिला नव्हता.
पुण्यात तर कधी राहिलोही नव्हतो. या शहरात बातमीदारी करताना हळूहळू येथील लोकजीवनाची आणि विविध क्षेत्रांतली प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख होत होती.
गोव्याच्या तुलनेत विविध क्षेत्रांत आपापला दबदबा राखून असलेली अशी दिग्गज मंडळी येथे खूप मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे नरुभाऊ लिमये, पु ल देशपांडे, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरूप, शकुंतला परांजपे, विद्या बाळ ही त्यापैकी काही ठळक नावे.
त्या एका रविवारच्या संद्याकाळी आम्हा बातमीदाराच्या दैनंदिन डायरीत माझ्या नावावर एक कार्यक्रम लिहिला होता.
पुण्यातल्या आमच्या `इंडियन एक्सप्रेस'मध्ये त्यावेळी मुख्य वार्ताहर नव्हता. आताचे आम्ही सर्व बातमीदार लोक विशीतले होतो, नरेंद्र करुणाकरन, शुभा गडकरी, संगीता जहागिरदार-जैन, अवर्तिन्हो मिरांडा, विश्वनाथ हिरेमठ, माधव गोखले आणि मी स्वतः.
प्रकाश कर्दळे `मास्तर' हे निवासी संपादक होते आणि बातमीदारांची कामकाजाची दैनंदिन डायरी आम्हापैकी एक बातमीदार लिहित असे.
तर शहरातील कन्नड संघ या संस्थेने भरत नाट्य मंडळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भीमसेन जोशी होते.
बातमीच्या दृष्टीने भाकड असलेल्या रविवारी शहर आवृत्ती असलेल्या दैनिकांची स्थानिक पाने भरण्यासाठी बातम्या आणि फोटो कमी पडतात, त्यामुळे एक बऱ्यापैकी लांबीची बातमी मिळेल अशा हेतूने मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
त्या मोठ्या हॉलमध्ये गर्दी तशी कमीच होती. मला वाटते हॉल निम्मासुद्धा भरला नव्हता, कारण कन्नड संघ या सांस्कृतिक संस्थेची ती सभा होती.
व्यासपीठावर अगदी मोजकीच म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासह पाचसहा माणसे होती. कन्नड संघाच्या अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती दिली, अहवाल वाचले.
कुठल्याही कार्यक्रमाची बातमी घेण्याऱ्या बातमीदाराच्या नशिबी हा रटाळपणा त्याच्या नेहेमीच्या कामकाजाचा भाग असतो, मुख्य वक्ता आपले भाषण सुरू करीपर्यंत बातमीदाराला अशी भाषणे ऐकून घेण्यावाचून इतर काही पर्याय नसतो.
बातमीच्या अनुषंगाने मी मोजकीच टिपणे घेत होतो. रविवार संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला बातमीदार असा मी एकटाच होतो. पण अनेक कार्यक्रमांना पुष्कळशी बातमीदार मंडळी फिरकतसुद्धा नसतात असा अनुभव असल्याने त्याबद्दल मला विशेष असे काही वाटले नाही.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी भाषणासाठी उभे राहिले.
आधी आलेली मरगळ झटकून मी पेन सरसावून मी त्यांच्या संपूर्ण भाषणाचे टिपण काढण्यासाठी सज्ज झालो
खांद्यावर असलेली शाल ठिकठाक करत पंडितजींनी उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने मी सर्द झालो.
संगीतातले मला काहीएक कळत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमात पंडितजी संगीताविषयी बोलतील किंवा श्रोत्यांच्या आवडीचा असलेला एखादा राग किंवा गीत गातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती.
त्याआधी पंडितजींची कितीतरी मराठी गीते मी ऐकली होती, त्यापैकी अभंगवाणीसारखी `इंद्रायणीकाठी', `कानडा हो विठ्ठलु', अशी काही लोकप्रिय गायने मला बऱ्यापैकी तोंङपाठसुद्धा होती.
ण तरीसुद्धा पंडितजींनी यावेळी जो राग आळवायला सुरुवात केली होती तो राग खूपच अनपेक्षित होता, एकदम अनोळखी होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
पंडितजींनी सुरु केलेल्या त्या रागाने मी वगळता इतर सर्व श्रोते एकदम खुश झाले होते, कान देऊन ते पंडितजींना ऐकत होते.
मोठ्या उत्सुकतेने बातमीसाठी टिपणी घेण्यासाठी पेन सरसावून बसलेलो मी मात्र एकदम दिग्मूढ झालो होतो.
पुढील पाचदहा मिनिटे पंडितजींचा आवाज कानावर पडत होता, काहीच अर्थबोध होत नसल्याने मी चुपचाप होतो.
अर्थात जे काही घडत होते त्यात वावगे असे काहीच नव्हते.
तो कार्यक्रम पुण्यातल्या कन्नड संघाचा होता, पंडितजींसह तिथे हजर असलेली सर्व मंडळी पुणेकर असली तरी मुळची कन्नडभाषिकच होती. त्यामुळेच तर भीमसेनजींनी कन्नड भाषेत बोलणे अगदी सुसंगत होते.
आधीचे सर्व वक्ते स्थानिक मराठी भाषेत बोलले होते तरी पंडितजींना आपल्या मातृभाषेत या कानडी लोकांशी संवाद साधणे उचित वाटले होते.
पुण्यात अनेक वर्षे राहून पुणेकर बनलेल्या कन्नड संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यातल्या या कार्यक्रमात मराठीतच बोलणे जितके संयुक्तिक वाटले तितकेच कन्नड भाषेत बोलून या लोकांशी असलेली आपली नाळ दाखवणे पंडितजींना संयुक्तिक वाटले असणार.
पंडित भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले आणि कन्नडभाषिक आहेत हे मला तोपर्यंत माहित नव्हते आणि गडबड इथेच झाली होती.
पंडितजींचे कन्नड भाषेतले ते भाषण संपताच मी तेथून बाहेर पडलो, रात्रीचे आठ वाजले होते आणि मला पुणे कॅम्पात ऑफिसला जायचे होते.
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात परतल्यावर जेमतेम तीनचार परिच्छेदांची एक कॉलमी बातमी मी टाईप केली.
कार्यक्रमाला गेलोच होतो तर निदान तेव्हढी तरी बातमी देणे गरजेचे होते. त्या बातमीत `प्रमुख पाहुणे आणि वक्ते पंडित भीमसेन जोशी होते' असे एक वाक्य होते.
दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या बातमीदार सहकाऱ्यांना हा किस्सा सांगितला, माझी कशी फटफजिती झाली हे सांगितले तेव्हा तिथे पिकलेला हंशा आजही माझ्या आठवणीत आहे.

Tuesday, February 20, 2024

 

जॉन मरे मिचेल

``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.'' इति जॉन मरे मिचेल

संत तुकाराम यांचे अभंग इंग्रजीत भाषांतर करणारे, संत ज्ञानेश्वर यांची आणि तुकोबांची एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य जगाला ओळख करून देणारे जॉन मरे मिचेल बहुधा पहिलीच युरोपियन व्यक्ती.
महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा इतिहास जॉन मरे मिचेल यांना डावलून पूर्ण होणार नाही इतके या स्कॉटिश मिशनरीने सुरुवातीला मुंबई-पुण्यात आणि नंतर काही वर्षे कोलकात्यात विविध क्षेत्रांत कार्य केले आणि विपुल प्रमाणात विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.
असे असले तरी जॉन मरे मिचेल हे नाव तसे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचे अभ्यासक आणि संशोधक असलेल्या तज्ज्ञांनासुद्धा फारसे परिचित नाही.
खरे सांगायचे झाल्यास मीसुद्धा हे नाव एक वर्षांपूर्वी ऐकलेसुद्धा नव्हते.
जॉन मरे मिचेल यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकले तेव्हा काही काळ मरे मिचेल या शाळेत शिक्षक होते.
अर्थार्जनासाठी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत जोतिबा १८५२ नंतर काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करत असत.
पुण्यात मरे मिचेल यांनी १८६२च्या सुमारास केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालवली.
जॉन मरे मिचेल यांना टाळून महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याचे जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही
एक संदर्भ म्हणून जॉन मरे मिचेल यांनी आपल्या विविध पुस्तकांत लिहिलेल्या या नोंदींना अतोनात महत्त्व आहे.
ही सर्व इंग्रजी पुस्तके अर्थातच स्कॉटलंडमध्ये प्रकाशित झाली होती. त्यामुळेच बहुधा स्थानिक अभ्यासकांचे या मौल्यवान ग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असावे. .
जॉन मरे मिचेल (१८१५ ते १९०४) असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते.
जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे :
``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’
पुण्यात १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे मरे मिचेल हे या संस्कृत कॉलेजचे (नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे ) काही काळ प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे १८३८ च्या नोव्हेंबर भारतात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी कृष्णशास्त्री यांच्या हाताखाली मराठीचा अभ्यास केला. रेव्ह. जॉन स्टिव्हन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास केला.
प्राचीन मराठी वाड्यमयाचा अभ्यास करून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. बायबलचे मराठी भाषांतर सुधारण्यात त्यानीं मोठे योगदान दिले.
स्कॉटिश मिशनरी अलेक्झांडर डफ १८३५ ला विश्रांतीसाठी मायदेशी परतले त्यावेळी एडिनबर्ग कॉलेजात शिकत असलेल्या जॉन मरे मिचेल त्यांना भेटले.
या तरुणाला मिशनकार्याची आवड आहे हे पाहून `आता लगेच माझ्याबरोबर भारतात ये' असे रेव्ह. डफ मरे मिचेल यांना म्हणाले. मात्र मरे मिचेल यांनीं एडिनबर्ग येथील आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर तीन वर्षांनी मरे मिचेल यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्कॉटलंडच्या मिशन अधिकाऱयांनी मरे मिचेल यांना कोलकात्याऐवजी मुंबईत मिशनकार्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात रेव्हरंड अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर काम करण्याची आपली इच्छा पूर्ण होणार नाही हे कळून मरे मिचेल काहीसे नाराज झाले होते.
मात्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कधी कुणाला कल्पना असते?
स्कॉटलंडमध्ये कॉलेजात शिकत असताना आलेल्या एका अनुभवाचे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``माझ्या या ईशज्ञानाच्या चौथ्या किंवा अखेरच्या वर्षाला मी ग्रामर स्कुलच्या एका वर्गाला शिकवले. शाळेतल्या एका शिक्षकाने अचानक काम सोडले होते आणि दुसऱ्या शिक्षकाची लगेच नेमणूक करणे नव्हते. रेक्टर डॉ. मेल्विन यांनी मला एक वर्षासाठी त्या एका वर्गात शिकवण्याची मला विनंती केली.. मला ते काम खूपच आवडले आणि त्या वर्गात मला कधीही कुणाही व्रात्य विद्यार्थ्याला बडवण्याची वेळ आली नाही याचा मला विशेष अभिमान वाटला. वर्गातल्या त्या छोट्या मुलांना हाताळणे मला सहज शक्य झाले.''
स्कॉटलंडमधील हा अनुभव मरे मिचेल यांना पुण्यात आणि शेजारच्या परिसरांत ख्रिस्ती धर्माची लोकांना शिकवण देण्याच्या कामात फायदेशीर ठरला असावा.
मरे मिचेल आणि इतर ख्रिस्ती मिशनरी प्रवचनासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांची टिंगलटवाळी होत असे.
भारतात आल्यानंतर आपण खिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कायकाय प्रयोग केले याचे वर्णन जॉन मरे मिचेल यांनी केले आहे :
``आपल्या स्वतःच्या घराच्या आवारात इतरांना आपला धर्म शिकवताना आपण आपले स्वतःचे नियम आणि अटी लागू करू शकता. अशावेळी तुम्हाला कुणी व्यक्ती त्रास देण्याची शक्यता नसते. मात्र आपल्या घरापासून दूर, परक्या स्थळी आणि रस्त्यांवर ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्यासाठी इतरांना न दुखावण्याचे खास कसब, अमर्याद सहनशीलता आणि खूप संयम असणे अत्यावश्यक असते.
यासाठी मी एक मार्ग निवडला होता. समुद्रकिनाऱ्यावर सकाळी लोक जमलेले असताना घोड्यावर बसून मी तेथे जात असे आणि त्या लोकांना प्रवचन देत असे. जोपर्यंत तो जमाव शांतपणे माझे बोलणे ऐकत असे तोपर्यंत माझे प्रवचन चालू असायचे. त्या लोकांनी गोंधळ करायला सुरु केले तर मी लगेच माझा घोडा दुसरीकडे नेऊन तेथे पुन्हा नव्याने प्रवचन सुरु करत असे.
प्रवचनाच्या दरम्यान अधेमध्ये एखाददुसरा प्रश्न आला तरी काही बिघडत नसे. मात्र हे लोकसुद्धा गडबडगोंधळ करू लागले कि मी माझा घोडा पुन्हा एकदा नव्या दिशेने नेत असे. ‘’
भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणाबाबत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लीम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत जॉन मरे मिचेल लिहितात :
``मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.
सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता. या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती.
त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती, ‘’ असे जॉन मरे मिचेल यांनी म्हटले आहे.
मात्र केवळ मुस्लीम मुलींसाठी पुण्यात चालवली जाणारी ही तशी अगदी पहिलीवहिली शाळा नव्हती. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३०ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. त्यानंतर स्कॉटिश मिशनच्या सुरुवातीच्या काळात पुण्यात रेव्हरंड वजिर बेग यांनी मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती.
पुना कॉलेजचे प्राचार्य असलेले मेजर थॉमस कँडी काही काळासाठी आपल्या मायदेशी जाणार होते, कँडी यांच्या गैरहजेरीत यांनी या कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्यांना विनंती केली.
आपल्या आत्मचरित्रात जॉन मरे मिचेल लिहितात:
``हो-ना असे करत अखेरीस करत मी ते पद स्वीकारण्याचे ठरवले. कॉलेजच्या इंग्रजी विभागात मी आठवड्यातून दोनदा नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असे. माझ्या या वर्गांत हजेरी ऐच्छिक होती. असे असले तरी प्रगतशील असलेले तीस लोक या व्याख्यानाला नियमितपणे उपस्थित राहत असत आणि ते सर्वच जण खूपच .चांगले वागत असत.
मी असे ऐकले होते कि पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा या संस्कृत कॉलेजचे प्रिंसिपल म्हणून एक युरोपियन (मेजर थॉमस कँडी) व्यक्तीची नेमणूक करण्यात आली तेव्हा त्यांच्या आगमनाच्यावेळी प्रवेशद्वारात अडथळे उभारण्यात आले होते. आणि आता माझी म्हणजे एका मिशनरीची अधिकृत व्हिझिटर म्हणून नेमणूक झाली असताना या लोकांचा प्रतिसाद वेगळा असा काय असणार होता?
मात्र या संस्कृत कॉलेजातील पंडित माझ्याशी खूपच अगत्याने वागले आणि या अगत्याचा प्रतिसाद अगत्यानेच द्यायचा असेच माझे धोरण होते. ‘’ .
महात्मा जोतिबा फुले यांनी रेव्ह. जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत एक महार मुलगा पाठवला होत्या, त्या अस्पृश्य मुलाची हृदयदावक कहाणी मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.
जोतिबा आणि जॉन मरे मिचेल यांच्या संदर्भातील ``चटईचाही विटाळ’ ही घटना धनंजय कीर यांनी महात्मा फुले चरित्रात पुढील शब्दांत सांगितली आहे:
``माझे स्नेही जोतीराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हित व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हीन जातीचे.
जोतीरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठविला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्याइतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता.
त्याला शाळेत प्रवेश देताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्या मुलांचे काळेभोर डोळे चकाकत होते आणि त्यांचे हावभाव मनातील हेतू प्रदर्शित करीत होते.
ते म्हणाले, "तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत.'
मी म्हणालो, "अरे, मला वाटते एकच मुलगा आहे."
"होय. एक काय आणि दहा काय, सारखेच."
"मग काय त्या मुलाला हाकलून देऊ?"
"ते आम्हाला काय सांगता? आमचे म्हणणे एवढेच की, तो राहिला तर आम्ही जाणार!"
"तुमची इच्छा नसेल तर त्याला तुम्ही शिवू नका. तुम्ही वर्गातील हुशार मुले आहात, तुमचा क्रमांक नेहमी वरच असणार, तो वेगळ्या बाकावर बसतो.'
"ते खरे, परंतु चटई जमिनीवर असते ना? तिचा विटाळ आम्हांस होतो. आता सर्वांना विटाळ झाला आहे. आता घरी जेवणापूर्वी स्नान करून हा विटाळ घालविला पाहिजे."
"मी ती चटई काढून टाकावी अशी तुमची इच्छा आहे का ?"
"आम्ही वर्गातच नसतो तर बरे झाले असते."
"ठीक तर. काही झाले तरी मी त्या मुलाला वर्गाबाहेर हाकलून देऊ शकत नाही."
मी अगदी गोंधळून गेलो. एक तर ब्राह्मण मुलांना हाकलून देण्याची माझी इच्छा नव्हती आणि माझ्या सदसदविवेकबुद्धीप्रमाणे मी त्या महार मुलालाही शाळेतून बाहेर काढू शकत नव्हतो.
मी म्हणालो, "उद्यापर्यंत थांबा. वर्गांची उद्या फेररचना करू आणि तशातही तुम्ही आता वरच्या वर्गात उत्तीर्ण होऊन जाणार."
हा ना करता ब्राह्मण मुले दुर्मुखलेल्या चेहेऱ्यांनी निघून गेली.
तो महार मुलगा शाळेत फिरून आलाच नाही.
पाण्याच्या बाहेर माशाची जशी स्थिती होते तशीच त्याची हया शाळेत झाली. इतर उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय मुलगे या बाबतीत अचल राहिले. ’’
जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रातली दुसरी एक घटना धनंजय कीर यांनी आपल्या जोतिबा फुले यांच्या चरित्रात सांगितली आहे. कीर यांनी लिहिले आहे :
``कनिष्ठ वर्गाच्या उद्धाराविषयी उदासीनवृत्ती दिसून येत होती, तरी त्या वर्गातील काही मुलांनी त्या काळी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला.. रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली.
त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत.
आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
मरे मिचेल १८६३ साली कोलकात्याला अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर मिशनकार्य करण्यासाठी गेले होते. आता खूप वर्षानंतर मरे मिचेल यांना आपली मनिषा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती.
भारतातील म्हणजे मुंबई, पुणे आणि नंतर कोलकाता येथील आपल्या मिशनकार्यांची समाप्ती करुन जॉन मरे मिचेल आपल्या पत्नीसह मायदेशी स्कॉटलंडला परतले. त्यानंतरसुद्धा भारतातील अनेक व्यक्तींशी आणि जोतिबा फुले यांच्याशी त्यांनी संपर्क ठेवला होता.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस जोतिबा अर्धांगवायुने बिछान्याला खिळले तेव्हाही मरे मिचेल यांनी त्यांना स्कॉटलंडहून पत्र लिहिले होते.
जोतिबा, जेम्स मिचेल आणि मरे मिचेल या तिघांचेही स्नेही असलेल्या बाबा पद्मनजी यांनी जोतिबांवर लिहिलेल्या मृत्युलेखात जोतीरावांचे जेम्स मिचेल आणि मरे मिचेल यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``त्यास (जोतिबा फुले यांना) ख्रिस्ती धर्माविषयी पुष्कळ ज्ञान होते, ते त्यास त्यांचे जुने मित्र रे. जेम्स मिचेल व डॉ.मरे मिचेल व त्यांची पत्नी हयांपासून प्राप्त झाले होते. डॉ.मिचेलसाहेब हयांनी तर थोडया महिन्यामागे स्कॉटलंडांतून त्यांस पत्र पाठवून त्यात त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाची कळकळ दर्शविली होती. ‘’
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांना ८९ वर्षे इतके दीर्घायुष्य लाभले. मायदेशी परतल्यावरही त्यांनी भारताविषयी पुस्तके लिहिणे चालू ठेवले.
एका पुस्तकाच्या अखेरीस ताजा कलम म्हणून काही शब्द..
``ताजा कलम''
या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकांपैकी हारमदजी पेस्तनजी आणि डॉ नारायण शेषाद्री यांचे त्यांच्या श्रद्धापूर्वक परिश्रमानंतर निधन झाले आहे. सन १८३९ साली ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता ते धनजीभाई नौरोजी ते आजही हयात असून ज्येष्ठ मिशनरींमध्ये त्यांच्या समावेश होतो, सगळीकडे त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जात असते.
बाबा पद्मनजी आज खूप वयोवृद्ध झालेले असले तरी त्यांची लेखणी आजही थकलेली नाही. मराठी बायबलच्या सुधारित आवृती आणण्यासाठी ते कार्य करत आहेत.
आमच्या शाळेचे दुसरे एक विद्यार्थी गणपतराव आर नवलकर यांनी भरपूर आणि उत्तम साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले मराठीचे व्याकरण खूप विस्तृत स्वरूपाचे आणि चांगल्या दर्जाचे आहे.
माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींचे निधन होऊन मी मात्र अजूनही हयात आहे याबद्दल कधीकधी मला आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, गार्डनर, स्टोथर्ट आणि स्मॉल हे खूपच आदरणीय मिशनरी होते.
पुण्यात मी दुसऱ्यांदा राहायला आलो तेव्हा श्रीयुत गार्डनर हे खूप जवळच्या नात्याचे माझे सहकारी होते.''
एडिनबर्ग, स्कॉटलंड १८९९
^^^^
Camil Parkhe,

Saturday, May 13, 2023


 जगभर विविध भाषांतील दैनिके साप्ताहिके मासिके आणि इतर नियतकालिकांच्या वाचक संख्या झपाट्याने रोडावत आहे. काहींना घरघर लागली आहे आणि काही नामवंत नियतकालिकांनी कधीच मान टाकली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण १८३२ साली सुरु केले, मात्र ते फार काळ चालू राहिले नाही.

मराठीत सर्वात दीर्घायुषी ठरलेली काही नियतकालिके आहेत. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले केसरी हे त्यापैकी एक. आज किती खप आहे हे माहीत नाही.
अशी शतायुषी ठरलेली मराठीतील किती नियतकालिके असतील आणि त्यांची आज काय स्थिती असेल?
'ज्ञानोदय ' हे १८४२ सुरु झालेले मासिक हे मराठीतील सर्वाधिक जुने आणि आतापर्यंत चालू असलेले नियतकालिक. महात्मा फुले आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील घडामोडी याविषयी या मासिकाच्या जुन्या अंकांतून वाचायला मिळते. महाराष्ट्र शासनाने या मासिकाची सूची प्रसिद्ध केली आहे. ती वेबसाईट वर उपलब्ध आहे.
नियतकालिकांना उर्जित्तावस्थेत आणण्याचे प्रयत्न अपवादात्मक आहेत. साधना साप्ताहिकाने हा धाडसी प्रयत्न केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेले मार्मिक साप्ताहिक पुन्हा नव्या जोमाने चालवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुकेश माचकर यांच्याकडे सोपवण्यात आले.
निरोप्या हे मराठीतील एकशेविस वर्षे आयुष्य लाभलेले नियतकालिक आहे. चाळीस पाने आणि रंगीत पानांच्या जाहिराती असलेले.
एका ख्रिस्ती जेसुईट जर्मन फादरांनी हेन्री डोरिंग यांनी हे मासिक राहुरी जवळच्या वळण गावात १९०३ साली सुरु केले. हे फादर नंतर १९०७ साली पुण्याचे बिशप बनले. आताचे बिशप थॉमस डाबरे आणि पुढील महिन्यात शपथविधी होणारे नवनिर्वाचित बिशप जॉन रॉड्रिग्ज यांचे ते पुर्वसुरी.
निरोप्या मासिकात मी श्रीरामपूरला आठवीत असताना लिहायला सुरुवात केली. मागच्या महिन्यात सावित्रीबाई फुले यांच्या अहमदनगर इथल्या शिक्षिका असलेल्या अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारबाई यांच्यावर लेख लिहिला.
निरोप्या मासिकावर मी सातत्याने अनेक ठिकाणी, मी काम केलेल्या इंडीयन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे दैनिकांत लिहित आलो आहे. निरोप्याच्या शंभरहून अधिक वर्षांच्या कालखंडातील कितीतरी माहितीपूर्ण लेख माझ्या संग्रही आहेत. त्यातून माझ्या तीनचार इंग्रजी - मराठी पुस्तकांसाठी मजकूर मिळाला होता.
जर्मन फादर जोसेफ स्टार्क हे 'निरोप्या'चे बावीस वर्षे सर्वाधिक काळ संपादक होते. त्यानंतर फादर प्रभुधर (दुसरे भारतीय संपादक) यांनी संपादकपद बारा वर्षे सांभाळले. कराडला त्यांच्याकडे मी जेसुइट प्रिनॉव्हिस असताना ते म्हणायचे "कामिल, तू लवकर फादर हो म्हणजे मी संपादकपदातून लगेच मोकळा होईन."
फादर प्रभुधर आपल्या संपादकियाचा शेवट 'ख्रिस्तार्पणमस्तु ' या शब्दाने करत. ,"नका येऊ रागा, निरोप्या मी दीन, आले तिकडूनी तेचि बोले" या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या पंक्ती हे ,*निरोप्या"चे अनेक वर्षे ब्रीदवाक्य होते.
Happy 121 anniversary
1903-2023

Thursday, September 22, 2022

 फादर थॉमस स्टीफन्स ‘क्रिस्तपुराण’

जैसी हरळांमाजी रत्नकिळा की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । की पदिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी । मराठिया ॥
पखिया माजी मयोरू । वृखिआंमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानु थोरू । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमाजी रवी शशी ।
या दीपीचेआ भाषांमध्ये तैसी । बोली मराठिया ॥
 
मराठी भाषेची अशा प्रकारे स्तुती करून सतराव्या शतकाच्या सुरुवातीस फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ‘क्रिस्तपुराण’ या ग्रंथाची निर्मिती केली. ‘ओं नमो विश्वभरिता’ या नमनापासून सुरू होणारे हे पुराण पुढील दहा हजार ओव्यांमध्ये आपला हा एतद्देशीय थाट कायम राखते.
 
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या तिशीनंतर गोमंतकात आलेल्या फादर स्टीफन्स यांना पूर्णतः देशी अवतारातील क्रिस्तपुराणाची निर्मिती शक्य झाली हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. 
 
क्रिस्तपुराण वाचताना या ग्रंथाची भाषाशैली, म्हणी आणि वाक्‌प्रचार, हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अनेक संदर्भांचा मुबलक वापर यामुळे परदेशातून आलेल्या धर्माचा ग्रंथ आहे असे जाणवतदेखील नाही. 
 
अकराव्या शतकात महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रापासून सुरू झालेल्या ग्रांथिक मराठी भाषेच्या इतिहासातील क्रिस्तपुराण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
.
बायबलमधील अनेक संकल्पना, ग्रीक पारिभाषिक शब्द, बायबलच्या जुन्या आणि नव्या करारामधील अनेक घटना मध्ययुगीन काळातील गोमंतकीय सामान्य जनतेला समजतील अशा शब्दांत सांगण्याचा यशस्वी प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये वाढलेल्या नवख्रिस्ती लोकांची धर्मग्रंथाची गरज लक्षात घेऊन फादर स्टीफन्स यांनी क्रिस्तपुराणाची रचना केली.
.
फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इंग्लंडमधील विल्टशायर परगण्यात बुशटन गावी 1549 साली झाला. थॉमस स्टीफन्सने 20 ऑक्टोबर 1575 रोजी रोम येथे संत इग्नाती लोयोलाकर यांनी स्थापन केलेल्या येशूसंघात प्रवेश केला. फादर थॉमस स्टिफन्स हे गोव्यात येणारे पहिले ब्रिटिश जेसुईट फादर. 24 ऑक्टोबर 1579 रोजी थॉमस स्टीफन्सने आपले मिशनकार्य सुरू केले.
 
फादर स्टीफन्स यांचे गोव्यातील सासष्टी भागात धर्मगुरुपदाचे कार्य सुरू झाले. गोव्यातील रायतूर येथील येशूसंघाच्या कॉलेजचे रेक्टर म्हणून 1590 ते 1594 या काळात त्यांनी काम पाहिले. वसईतील 1611-12 या काळातील मराठी अध्यापनाचा काळ वगळता स्टीफन्स यांनी भारतातील आपली सर्व हयात गोव्यातच घालविली. 35 वर्षे त्यांनी मडगाव, बेनावली आणि नावेली या भागात धर्मगुरू म्हणून काम केले.
 
`दौत्रिना क्रिस्ता’ किंवा `क्रिस्तीधर्मतत्त्वसार, आर्त द लिंग्वा कानारी हे कोकणी भाषेचे व्याकरण आणि क्रिस्तपुराण यांचा फादर स्टीफन्स यांच्या साहित्यसंपदेत समावेश होतो.
या साहित्यकृतीपैकी दौत्रिना क्रिस्ता हे पुस्तक कॅथेकिझम स्वरूपाचे म्हणजे कॅथोलिक धर्माची मूळ तत्त्वे समजावून सांगणारे आहे. मात्र गोमंतकीय कोकणीचे हे पहिलेच ज्ञानपुस्तक असल्याने भाषिक इतिहासाच्या संदर्भात हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. दौत्रिना क्रिस्ता लिंग्वा ब्रामण कानारी या शीर्षकाखाली हे पुस्तक सर्व प्रथम 1622 साली छापण्यात आले. 
 
या आवृत्तीची एक प्रत सध्या पोर्तुगालमधील लिस्बन सरकारी ग्रंथालयात असून दुसरी प्रत रोमच्या व्हॅटिकन ग्रंथालयात आहे.
 
कोकणी भाषेतील पहिले व्याकरण लिहिण्याचे श्रेय फादर स्टीफन्स यांना दिले जाते. ‘आर्त द लिंग्वा कानारी’ या नावाने हे व्याकरण प्रसिद्ध आहे. ‘कानारी’ म्हणजे कन्नड भाषा नव्हे. त्याकाळात कोकणी भाषा कानारी म्हणून ओळखली जात असे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची भाषा म्हणजे कानारी भाषा असे स्पष्टीकरण इतिहाससंशोधक अ.का. प्रियोळकर यांनी दिले आहे. अतिपूर्वेकडील भाषेचे एका युरोपियन व्यक्तीने रचलेले हे पहिलेच व्याकरण. 
 
‘क्रिस्तपुराण’ ही फादर थॉमस स्टीफन्स यांची सर्वात महत्त्वाची साहित्यकृती. पूर्णतः भारतीय पारंपरिक शैलीत लिहिलेल्या या क्रिस्तपुराणामुळे फादर स्टीफन्स यांचे नाव मराठी भाषेच्या इतिहासात चिरंतन राहणार आहे. या पुराणाचे लेखन फादर स्टीफन्स यांनी 1614 साली पूर्ण केले आणि या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1616 साली छापण्यात आली.
त्याकाळात देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित न झाल्याने हा ग्रंथ त्यांना रोमन लिपीत छापावा लागला. 
 
क्रिस्तपुराण ज्यांच्यासाठी लिहिले गेले त्यांना मूळचा आशियाई असणाऱ्या परंतु पाश्चात्यांमार्फत भारतात पोहोचलेल्या ख्रिस्ती धर्माचा परिचय व्हावा यासाठी फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाला पूर्ण भारतीय पेहराव दिला. या पेहरावामुळे ख्रिस्ती धर्माची ओळख करून घेण्यास स्थानिक लोकांना अडचण आली नाही. 
 
उदा. स्वर्ग, सैतान, नरक या संकल्पना स्थानिक जनतेला समजणे शक्यच नव्हते. फादर स्टीफन्स यांनी त्यासाठी वैकुंठ, देवचर, यमपुरी अशा सर्वांनाच सुपरिचित असलेल्या संकल्पनांचा वापर करून वाचकांशी अधिक जवळीक साधली. 
 
येशूच्या नावाचे देशीकरण करण्यासाठी या ग्रंथकर्त्याने स्वामी, तारक, आनंदनिधी, परमेश्वर, जगद्गुरू, मोक्षराज, गोसावी अशा अनेक उपाधींचा आधार घेतला.
फादर स्टीफन्स यांनी आपल्या पुराणाची सुरुवात पुढील ओवींनी केली आहे.
 
ओ नमो विश्वभरिता । देवा बापा सर्वसमर्था ।
परमेश्वरा सत्यवंता । स्वर्ग पृथ्वीचा रचणारा ॥1॥
तूं ॠद्धिसिद्धिचा दातारू । कृपानिधी करूणा करू
तूं सर्व सुखाचा सागरू । आदि अंतु नातुडे ॥2॥
तूं परमानंदु सर्वस्वरूपु । विश्वव्यापकु ज्ञानदिपु ॥
तूं सर्वगुणी निर्लेपु । निर्मळू निर्विकारू स्वामिया ॥3॥
तूं अदृष्टु तूं अव्यक्तू ।समदयाळू सर्वप्राप्तु ।
सर्वज्ञानु सर्वनितीवंतू । एकूची देवो तूं ॥4॥
तू साक्षात परमेश्वरू । अनादसिद्धू अपरांपरू ।
आदि अनादि अविनाशु अमरू । तुजें स्तवन त्रिलोंकी ॥5॥
 
शांताराम बंडेलू संपादित क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 962 ओव्या आहेत, तर लंडन येथील स्कूल ऑफ ओेरिएंटल ॲन्ड आफ्रिकन स्टडीज येथील विल्यम मर्सडन यांच्या संग्रहातील क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 641 ओव्या आहेत.
 
या पुराणग्रंथात ग्रंथकर्त्याने ओवी छंदाचा वापर केला आहे. ओवी छंदात चार पंक्ती असून पहिल्या तीन पंक्तीत यमक साधलेले असते.
 
गोव्यातील वादग्रस्त ठरलेल्या इन्क्विझिशनच्या काळात प्रत्येक साहित्याचा मजकूर काळजीपूर्वक तपासला जात असे, आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब नष्ट केला जाई. इन्क्विझिशन मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलाही मजकूर प्रसिद्ध करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इन्क्विझिशन मंडळाची परवानगी मिळाल्यानंतरच क्रिस्तपुराण छापण्यात आले. 
 
इंग्रजी भाषेतील अनेक म्हणी आणि वाक्‌प्रचारांचे क्रिस्तपुराणातील मराठी भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. उदा. ‘Rome was not built in a day' े’ या सुपरिचित म्हणीचे क्रिस्तपुराणात ‘एके दिवशी रोमनगरी । उभविली नाही’ असे भाषांतर करण्यात आले आहे. ‘वार्म लव्ह’ या वाक्‌प्रचारास ‘उन्हु मोहो’ असे संबोधण्यात आले आहे.
 
फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाच्या तीन आवृत्त्या 1616,1649 आणि 1654 साली प्रसिद्ध केल्या. आज यापैकी कुठल्याही आवृत्तीची एकही प्रत कुठेही उपलब्ध नाही. 
 
गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सिस द लाव्होर याने 1648 साली कायदा करून तीन वर्षांच्या आत गोव्यातील सर्व स्थानिक भाषांची हकालपट्टी करून सर्व व्यवहार पोर्तुगीज भाषेतच करण्याचा निर्णय घेतला. या धोरणानुसार मराठी भाषेतील सर्व पुस्तके जप्त करण्यात आल्यामुळे फादर स्टीफन्स यांचे क्रिस्तपुराणही लोकांच्या नजरेआड झाले. पोर्तुगीजांच्या या धोरणामुळे क्रिस्तपुराणाच्या वापरावर बंदी आली. 
 
व्हॉईसरॉयच्या या आदेशामुळे गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेची आणि त्याचबरोबर तेथील मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचीही वाढ खुंटली. 
 
क्रिस्तपुराणाच्या आणि मराठी भाषेच्या सुदैवाने गोव्याबाहेर मेंगलोर वगैरे भागातील ख्रिस्ती समाजात क्रिस्तपुराणाचे वाचन आणि निरूपण कायम राहिले आणि या साहित्यिक ऐवजाचे अशाप्रकारे जतन झाले. या क्रिस्तपुराणाची अनेक हस्तलिखिते तयार झाली. अशी अनेक हस्तलिखिते जमवून त्यांच्या साहाय्याने 1907 साली मेंगलोर येथे जोसेफ साल्ढाणा यांनी क्रिस्तपुराणाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली.
 
क्रिस्तपुराणाच्या वरील चारही आवृत्त्या रोमन लिपीत छापलेल्या होत्या. त्यामुळे मराठीतील या श्रेष्ठ साहित्यकृतीकडे मराठी सारस्वतांचे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे क्रिस्तपुराण मराठी साहित्यक्षेत्रात पूर्णतः दुर्लक्षित राहिले. 
 
दरम्यान पुणे धर्मप्रांताचे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांनी क्रिस्तपुराणातील येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील काही भाग देवनागरी लिपीत आणला. आर्चबिशप डोरिंग हे मूळचे जर्मनीचे. आर्चबिशप डोरिंग यांनी क्रिस्तपुराणाच्या देवनागरीत आणलेल्या काही भागांच्या तीन पुस्तिका छापल्या होत्या. 
 
संपूर्ण क्रिस्तपुराण मराठीच्या देवनागरी लिपीत प्रकाशन होण्यासाठी मात्र 1956 साल उजाडावे लागले. त्यावेळी शांताराम बंडेलू यांनी संपादित केलेली ही देवनागरी आवृत्ती य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनने प्रसिद्ध केली.
 
फादर स्टीफन्स यांचे वयाच्या 70 व्या वर्षी ओल्ड गोव्यातील बॉम जेजू या चर्चच्या आवारातील धर्मगुरू निवासात निधन झाले. संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष असलेल्या या चर्चशेजारील हे धर्मगुरू निवास अजूनही आपल्याला पाहायला मिळते. 
 
फादर स्टीफन्स यांच्या स्मारकाची मात्र नक्कीच गरज नाही. ‘क्रिस्तपुराण’ या आपल्या वाङ्मयकृतीमुळे मराठी साहित्यात त्यांना चिरंतन स्थान लाभले आहे.

^^^

शांताराम बंडेलूकृत 'क्रिस्तपुराण' ग्रंथाचे कव्हर - मूळ चित्र " द मास्टर - अँजेलो डी फोन्सेका 
 
---
`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २००३) या पुस्तकातील एक प्रकरण
 
Camil Parkhe