Did you like the article?

Showing posts with label Dnyanodaya. Show all posts
Showing posts with label Dnyanodaya. Show all posts

Saturday, February 24, 2024

सावित्रीबाई अन् जोतिबा कुठल्या शाळेत शिकले ?

सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Blog
Blog esakal

कामिल पारखे...

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई, त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, मार्गारेट आणि डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.

सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८२९ साली पुण्याचा दौरा केला आणि प्रवचने दिली. तेथे त्यांचे चांगले स्वागत झाल्याने स्टीव्हन्सन यांनी १८३० साली पुण्यातच पुण्यात स्कॉटिश मिशनचे शैक्षणिक आणि धार्मिक काम सुरु केले. संस्कृत आणि मराठीवर जॉन स्टिव्हन्सन यांचे कमालीचे प्रभुत्व होते, प्राच्यविद्यापंडित म्हणूनही त्यांची एक वेगळीच ओळख आहे.

पुण्याला स्थायिक झाल्यानंतर जॉन स्टिव्हन्सन यांनी या शहरात एक इंग्रजी शाळा सुरु केली होती. पुण्यातल्या सर्व जातींच्या आणि समाजघटकांनी या शाळेचे कौतुक केले. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला मुंबईप्रमाणेच पुण्यातही इंग्रजी शाळा सुरु करायच्या होता. त्यामुळे स्टिव्हन्सन यांनीं आपली शाळा 1833 साली कंपनी सरकारकडे सुपूर्द केली.

विशेष म्हणजे रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांनी सुरु केलेल्या आणि नंतर ईस्ट इंडिया सरकारकडे सुपूर्द केलेल्या या शाळेतच जोतिबा फुले आणि त्यांचे सहकारी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर वगैरेंनी आपले शिक्षण घेतले होते. आपल्या विद्यार्थिदशेतच जोतीने सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी अभंग अशी मैत्री जोडली.

जोतीच्या ह्या गोवंडे मित्राचा जन्म १८२४ मध्ये पुण्यात झाला. तो ब्राह्मण कुटुंबातील होता. त्याने दृढनिश्चय आणि अखंड उद्योगशीलता या गुणवत्तेवर आपल्या पुढील आयुष्यात मोठीच प्रगती केली. तो स्कॉटिश मिशन शाळेत असताना जोतीचा स्नेही झाला. आणि पुढे बुधवारवाड्यातील सरकारी शाळेत ते दोघे शिकत असताना त्यांचा स्नेह दृढ होत गेला. ही शाळा स्टिव्हन्सन नावाच्या गृहस्थाने सप्टेंबर १८३२ मध्ये काढली होती. ती पुढे त्याने सरकारच्या स्वाधीन केली’’ असे जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.

'' शाळेत येणान्या उच्चवर्णीय मुलांशी लवकरच त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांपैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र बनले आणि त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली. वाळवेकर हे तर अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते. 'सदसद्विवेकी सुबोधाचा दाता। गृहिणीचा पिता जोती मित्र अशा शब्दात त्यांनी या आपल्या मित्राचे गुणवर्णन केले आहे.’’ असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे.

``जोती आपले शिक्षण पूर्ण करीपर्यंत मिशन शाळेत जात होता. त्या काळी इंग्रजी शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाविद्यालय नव्हते. इंग्रजी शिक्षण देणारी तशी मोठी एखादी संस्थाही नव्हती. याच दिवसांत सदाशिव गोवंड्यांनी मोरो विठ्ठल वाळवेकर या ब्राह्मण मित्राशी आणि वाळवेकरांचा ब्राह्मणमित्र सखाराम यशवंत परांजपे यांच्याशी मैत्री जोडली.

मोरो वाळवेकर हा गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचेही शिक्षण एका मिशनशाळेत झाले होते. वाळवेकर आणि परांजपे हे जोतीचे परम स्नेही झाले. पुढे ते दोघे जोतीच्या कार्यातील मोठे सहकारी म्हणून गाजले''. असेही कीर यांनी लिहिले आहे.

जोतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळा चालवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा उल्लेख करता येईल. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत जोतिबांनी १८४१ ते १८४७ या काळात आपले माध्यमिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.

सावित्रीबाईनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले असा उल्लेख हरी नरके आणि इतर संशोधक करतात त्या मिसेस मिचेल म्हणजे रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल.

जोतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या शाळा वेतन न घेता चालू ठेवल्या. त्याकाळात अर्थार्जनासाठी जोतिबा फुले स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळांत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य करत होते. मेजर थॉमस कँडी काही काळासाठी मायदेशी गेल्यावर रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे पुण्यातल्या १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे - नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे - प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.

``आम्ही पाहिलेले फुले'' या हरी नरके संपादित आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सत्यशोधक कार्यकर्ते शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेले जोतिबांचे अल्पचरित्र समाविष्ट केले आहे. त्यात सावित्रीवाई फुले यांनीं मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असे म्हटले आहे.

``जोतीरावांचे शिक्षण बुडाल्याने सगुणाबाईचा जीव तिळतिळ तूटत होता. तिने लिजिटसाहेबामार्फत गफार बेग मुनशीचे वजन गोविंदरावांवर पाडून त्यांचे मन वळविले. त्यामुळे जोतीराव १-१-१८४३ पासून बुधवारवाड्यातील शाळेत पुन्हा जाऊ लागला.

त्याच वेळेपासून सगुणाबाईच्या आग्रहामुळे ते सगुणाबाईस व सावित्रीबाईस शिकवू लागले. सगुणाबाई पूर्वी जोतीरावांकडून थोडेफार शिकली होती पण ती विसरून गेली होती. दोघीहि एकमेकांच्या सहवासात चढाओढीने शिकत होत्या. जोतीराव अभ्यासू व हुशार मुलगा होता. त्याने प्रत्येक वार्षिक परीक्षेत निरनिराळी पुस्तके बक्षिसे मिळविली होती.

पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षणिकीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले. हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला.

त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६-१८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम ट्रेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या. १८४७ साली महात्मा जोतीराव इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा उत्तम तन्हेने पास झाले

सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधामुळे ही शाळा जोतीबांना बंद करावी लागली.

``जोतीरावांच्या वडिलांनी तर त्यांना केव्हाच घरातून घालवून दिले होते. ना पित्याचा आश्रय, ना स्वतःचा धंदा. त्यामुळे त्यांची संसारात फारच आर्थिक कुचंबणा झाली. अशा परिस्थितीत त्यांना पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करणे भाग पडले. ही शाळा ख्रिस्ती- मिशनऱ्यांनी १८५४ जुलै महिन्यात मिशनच्या आवारात सुरू केली होती. मुलींचे वसतिगृहही तेथेच होते. त्या संस्थेमध्ये टाकलेली मुले, अनाथ मुले आणि ख्रिस्तीधर्म स्वीकारलेल्या गरीब लोकांची मुले आणि ज्यांच्यावर मिशनचा पूर्ण ताबा होता अशी मुले त्या संस्थेत शिकत होती. जेवणाखाण्याची तेथेच व्यवस्था असे’’ असे कीर यांनी आपल्या ,`महात्मा जोतीराव फुले' या पुस्तकात लिहिले आहे.

धनंजय कीर यांनी लिहिले आहे कि ``पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेची माहिती देताना एका इतिवृत्तात चालकांनी असे म्हटले आहे की, सध्या आमच्याकडे वसतिगृहामध्ये राहणारी १३ मुले आहेत. दिवसा त्यांचे शिक्षण होत असताना दुसरी ४० मुले त्यांच्याबरोबर शिकतात.

पुण्यातील एक अत्यंत उत्साही आणि निपुण शिक्षक आमच्या शाळेत दररोज चार तास शिक्षणाच्या कार्यात साह्य करावयास लाभला आहे, याविषयी आम्हांला समाधान वाटते. ते म्हणजे परोपकारबुद्धीचे आणि कनिष्ठ जातींच्या मुलींच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे आणि ज्यांच्या कार्याची शिक्षामंडळीने आणि स्वतः सरकारने मनापासून प्रशंसा केली, ते जोतीराव फुले होत. त्यांनी आमच्या मोठ्यात मोठ्या शिक्षणविषयक आशा फलद्रूप केल्या. ''

महात्मा फुलें स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत शिक्षक होते याचा उल्लेख ज्ञानोदय या मासिकात जोतिबांच्या निधनानंतर १८ डिसेंबर १८९० रोजी लिहिलेल्या अग्रलेखातसुद्धा पुढीलप्रमाणे आढळतो.:``पुण्यातील मिशनरींनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलीच्या शिक्षणाच्या कामावर पगार देऊन नेमले. येथे कामावर असता त्यांनी मिशनरी लोकांच्या सुचनेवरुन ख्रिस्तीधर्माकडे विशेष लक्ष पुरविले-''

डॉ. विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्याला ख्रिस्ती मिशनरींनीं मुलींसाठी सुरु केलेल्या शाळांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, आपण आपल्या शाळा नंतर मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या, तसेच ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत आपण स्वतः शिक्षक होतो असे नमूद केले आहे.

जोतिबांनी या निवेदनाच्या पहिल्या परिच्छेदांत म्हटले आहे :

`` माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ (१८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले…… या संथांमध्ये मी सुमारे नऊदहा वर्षे कार्य करीत होतो; पण काही विशिष्ट परिस्थितीमुळे ते कार्य मी सोडले. सध्या समितीने मुलींच्या शाळांची व्यवस्था शिक्षणखात्याकडे सुपूर्द केली असून मिसेस मिचेलच्या देखरेखीखाली त्या शाळा अद्यापही चालू आहेत.’’

महारमांगादी कनिष्ठ वर्गीयांची शाळासुद्धा आजपर्यंत चालू असली तरी तिची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे. आता उल्लेखिलेल्या शाळांमध्ये मी जे कार्य केले, तोच शैक्षणिक क्षेत्रातला माझा महत्त्वाचा अनुभव म्हणता येईल.'' जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे.

``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’ जोतिबांचे हे अल्पचरित्र’ 'आम्ही पाहिलेले फुले' या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.

स्कॉटिश मिशनरी आणि विशेषतः जॉन मरे मिचेल आणि जोतिबा फुले यांच्या नातेसंदर्भात ज्येष्ठ संशोधक रा ना. चव्हाण यांनी पुढील शब्दांत लिहिले आहे:

``इंग्लंड आणि स्कॉटलंडमधून प्रोटेस्टंट मिशनऱ्यांच्या तुकड्या भारतात आल्या. मुंबईस डॉ. विल्सन, कलकत्यास डॉ. डफ. पुण्यास डॉ. मिचेल येऊन थडकले. हे सारे स्कॉच होते. हे लोक मराठी शिकले. कमीअधिक संस्कृत शिकले आणि धर्मप्रचार करू लागले. तरुणांच्या ओळखी करायच्या, त्यांना घरी बोलवायचे, शक्य झाल्यास त्यांच्या घरी जायचे, स्वतःच्या घरात लहानलहान चर्चा मंडळे काढायची, पाहुण्यांना ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून द्यायचा, अशी या मिशनऱ्यांची पद्धत होती. अजून आहे.

या पद्धतीस अनुसरून मिचेलसाहेबांनी तरूण फुल्यांची ओळख करून घेतली, दोघांचा खूपच परिचय वाढला. चर्चा झाल्या. मिचेलच्या चरित्रात फुल्यांचे उल्लेख येतात. गाठीभेटीत काय घडले हे समजण्यास मार्ग नाही. परंतु अंदाज करण्यास पुष्कळच आधार आहेत.’’

ख्रिस्ती मिशनरी आणि महात्मा फुले दाम्पत्य यांचे अशाप्रकारचे अतूट नाते आणि ऋणानुबंध होते. जोतिबा फुले अनेकदा हे ऋणानुबंध व्यक्त करतात.

या मिशनरींनीं सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची व्यक्तिमत्वे घडवण्यात आपल्या परीने योगदान केले. मात्र गेल्या दोनशे वर्षांच्या कालखंडानंतर आजही या व्यक्तींविषयी, महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासांत या मिशनरींच्या वैयक्तिक चरित्रांवर, कार्यांवर आणि योगदानांवर आजही पुरेसा प्रकाश पाडला गेलेला नाही.

कामिल पारखे...

Sunday, December 17, 2023

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक

दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात कॅरोल सिंगर्स दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत.

 मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरु झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांचं सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी अनेकांनी उत्साहानं दिवाळी अंक काढलीच.

आणि आता गडबड सुरु आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही.
`निरोप्या' हे १९०३ साली जर्मन धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी सुरु केलेले मासिक. पहिल्या महायुद्धाचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होते आहे, गेली काही वर्षे या मासिकाचा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो. `निरोप्या' मासिक पुण्यातल्या स्नेहसदनमधून जेसुईट संस्था प्रसिद्ध करते. फादर भाऊसाहेब संसारे निरोप्याचे संपादक आहेत.
माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी 'निरोप्या'तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना १९७४ साली.
`निरोप्या' च्या या नाताळ विशेषांकात महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले आहे. महात्मा फुले अभ्यासकांना हे चरित्र उपयुक्त ठरु शकेल.

`ज्ञानोदय' हे मराठीतील सर्वात दीर्घायुष्य लाभलेलं नियतकालिक. स्थापना १८४२.
मराठीतलं पहिलं नियतकालिक बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलं होतं. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी `ज्ञानोदया'ची संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक. कांतिश प्रभाकर तेलोरे अतिथी संपादक आहेत..

मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिके ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष.
अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.
यापैकी निदान `निरोप्या' तरी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे हे या अंकाच्या रंगीत आणि कृष्णधवल जाहिरातींतून दिसते.
वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या `सुवार्ता' मासिकाचा सुद्धा नाताळ विशेषांक असतो. फादर डॉ अनिल परेरा `सुवार्ता'चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे - जवळजवळ पंचवीस वर्षे - सुवार्ताचे संपादक होते.
इतर नाताळ विशेषांक आणि या नियकालिकांचे संपादक पुढीलप्रमाणे आहेत
*सुवार्ता* (मासिक) - फा. (डॉ.) अनिल परेरा संपादक आहेत
*कादोडी* (वार्षिक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*ख्रिस्तायन* (ऑनलाइन नाताळ अंक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*गीत* (वार्षिक नाताळ अंक) - लेस्ली डायस संपादक आहेत
*जनपरिवार* (साप्ताहिक) - अँड्र्यू कोलासो संपादक आहेत
*कॅथॉलिक* (त्रैमासिक) - स्टीफन आय परेरा संपादक आहेत
*निर्भय आंदोलन* (द्वैमासिक) - मनवेल तुस्कानो संपादक आहेत.
दयानंद ठोंबरे हे नव्वदच्या दशकापासून माझे सहकारी, मी पुण्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये १९८९ ला रुजू झालो आणि लवकरच ठोंबरेसुद्धा एक्सप्रेस ग्रुपच्या लोकसत्ता दैनिकात आले. माझ्या अनेक मराठी पुस्तकांचे ते पहिले वाचक, ही पुस्तकं त्यांच्या चिकित्सक नजरेखालून गेली आहेत. गेली अकरा वर्षे दयानंद ठोंबरे अलौकिक या नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. काही वर्षांपूर्वी एका विशेषांकासाठी मी लिहिलेही आहे.
पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव गेली सात वर्षे 'शब्द' नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. या विशेषांकात वैचारीक, ललित, कविता वगैरे विविध साहित्य प्रकार असतात.
नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात.
गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात वसई येथून ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादानाखाली होत आहे. या अंकांची जन्मकथा संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांच्याच या शब्दांत: .
``एका फेसबुक ग्रुपवर काही साहित्यप्रेमींची एकत्र येण्याविषयी चर्चा झाली, त्यानंतर “कुपारी कट्टा” या त्यांच्या स्थानिक समाजाच्या नावाने ते महिन्याला एकदा एकत्र भेटू लागले, जमणारे सर्व साहित्यप्रेमी हे एकाच, “कुपारी” समाजाचे आणि “कादोडी” (वसईच्या उत्तर पट्ट्यातील सामवेदी कुपारी समाजाची बोलीभाषा) ही एक भाषा बोलणारे असल्यामुळे ह्या भाषेच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातच ह्या भाषेच्या साहित्याला वाव देणारा अंक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली.
“कादोडी” या भाषेला व्याकरण नाही, या भाषेत उत्तम गोडवा आहे, खूप सुंदर अशा कथा आहेत, अनेक प्रकारची गीते आहेत, पण हे सगळे मौखिक स्वरुपात आहेत. नव्या पिढीला हे सगळे अज्ञात आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचविता यावे, तसेच मौखिक स्वरुपात स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादनाखाली होत आहे. ''
यावर्षी काही दिवाळी अंकात मी लिहिलं आहे, तसंच एका नाताळ अंकातही माझा एक लेख असणार आहे.
नेहेमीप्रमाणं इथं मी नंतर तो टाकणार आहेच. लेखाचा विषय अगदी वेगळाच आहे, इथं टाकल्यावर मी काय म्हणतो यावर तुमचंही कदाचित एकमत होईल.
दिवाळी अंकांतून जशा मोठ्या आर्थिक उलाढाली होतात तशाच या नाताळ अंकांतून सुद्धा होतातच.
अपवाद काही हौशी संपादकांचा जे निव्वळ निखळ आनंदासाठी आपलं काम, नोकरी सांभाळून यासाठी वेळ देत असतात. आणि नाताळाच्या सणानिमित्त वैचारिक फराळ पुरवत असतात.
पंचवीस डिसेंबर तोंडावर आला आहे. नाताळची तयारी घरोघरी होत आहेत. काही नाताळ विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहेत.
या दिवसांत आणि या क्षणाला यापैकी अनेक नाताळ विशेषांकांचे संपादक अक्षरशः लगीनघाईत असतील. त्यांच्याशी फोनवर संवाद साधताना हे लक्षात आले.
ख्रिसमसबरोबरच या नाताळ विशेषांकांचीही मी वाट पाहत आहे.


Camil Parkhe 

Saturday, May 13, 2023


 जगभर विविध भाषांतील दैनिके साप्ताहिके मासिके आणि इतर नियतकालिकांच्या वाचक संख्या झपाट्याने रोडावत आहे. काहींना घरघर लागली आहे आणि काही नामवंत नियतकालिकांनी कधीच मान टाकली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण १८३२ साली सुरु केले, मात्र ते फार काळ चालू राहिले नाही.

मराठीत सर्वात दीर्घायुषी ठरलेली काही नियतकालिके आहेत. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले केसरी हे त्यापैकी एक. आज किती खप आहे हे माहीत नाही.
अशी शतायुषी ठरलेली मराठीतील किती नियतकालिके असतील आणि त्यांची आज काय स्थिती असेल?
'ज्ञानोदय ' हे १८४२ सुरु झालेले मासिक हे मराठीतील सर्वाधिक जुने आणि आतापर्यंत चालू असलेले नियतकालिक. महात्मा फुले आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील घडामोडी याविषयी या मासिकाच्या जुन्या अंकांतून वाचायला मिळते. महाराष्ट्र शासनाने या मासिकाची सूची प्रसिद्ध केली आहे. ती वेबसाईट वर उपलब्ध आहे.
नियतकालिकांना उर्जित्तावस्थेत आणण्याचे प्रयत्न अपवादात्मक आहेत. साधना साप्ताहिकाने हा धाडसी प्रयत्न केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेले मार्मिक साप्ताहिक पुन्हा नव्या जोमाने चालवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुकेश माचकर यांच्याकडे सोपवण्यात आले.
निरोप्या हे मराठीतील एकशेविस वर्षे आयुष्य लाभलेले नियतकालिक आहे. चाळीस पाने आणि रंगीत पानांच्या जाहिराती असलेले.
एका ख्रिस्ती जेसुईट जर्मन फादरांनी हेन्री डोरिंग यांनी हे मासिक राहुरी जवळच्या वळण गावात १९०३ साली सुरु केले. हे फादर नंतर १९०७ साली पुण्याचे बिशप बनले. आताचे बिशप थॉमस डाबरे आणि पुढील महिन्यात शपथविधी होणारे नवनिर्वाचित बिशप जॉन रॉड्रिग्ज यांचे ते पुर्वसुरी.
निरोप्या मासिकात मी श्रीरामपूरला आठवीत असताना लिहायला सुरुवात केली. मागच्या महिन्यात सावित्रीबाई फुले यांच्या अहमदनगर इथल्या शिक्षिका असलेल्या अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारबाई यांच्यावर लेख लिहिला.
निरोप्या मासिकावर मी सातत्याने अनेक ठिकाणी, मी काम केलेल्या इंडीयन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे दैनिकांत लिहित आलो आहे. निरोप्याच्या शंभरहून अधिक वर्षांच्या कालखंडातील कितीतरी माहितीपूर्ण लेख माझ्या संग्रही आहेत. त्यातून माझ्या तीनचार इंग्रजी - मराठी पुस्तकांसाठी मजकूर मिळाला होता.
जर्मन फादर जोसेफ स्टार्क हे 'निरोप्या'चे बावीस वर्षे सर्वाधिक काळ संपादक होते. त्यानंतर फादर प्रभुधर (दुसरे भारतीय संपादक) यांनी संपादकपद बारा वर्षे सांभाळले. कराडला त्यांच्याकडे मी जेसुइट प्रिनॉव्हिस असताना ते म्हणायचे "कामिल, तू लवकर फादर हो म्हणजे मी संपादकपदातून लगेच मोकळा होईन."
फादर प्रभुधर आपल्या संपादकियाचा शेवट 'ख्रिस्तार्पणमस्तु ' या शब्दाने करत. ,"नका येऊ रागा, निरोप्या मी दीन, आले तिकडूनी तेचि बोले" या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या पंक्ती हे ,*निरोप्या"चे अनेक वर्षे ब्रीदवाक्य होते.
Happy 121 anniversary
1903-2023

Sunday, March 12, 2023

 सिंथिया फरार हे नाव कधी कानांवर पडलं आहे का? कधी, कुठं हे नाव वाचण्यात आले आहे का? सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे आज १० मार्च रोजी स्मृतिदिन असलेल्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या सिंथिया फरार या शिक्षिका.

या मिस सिंथिया फरार थेट अमेरिकेतून २९ डिसेंबर १८२७ रोजी हिंदुस्थानात आल्या, सुरुवातीला काही वर्षे मुंबईत, अल्पकाळ महाबळेश्वर येथे आणि नंतर अहमदनगर येथे दीर्घकाळ मुलींच्या शिक्षण कार्यात स्वतःला वाहून घेत तेथेच त्यांनी देह ठेवला.
अर्थात मिशनरी रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या पत्नी मिसेस (मारिया हे मॅकेंझी उर्फ फ्लायटर) मिचेल यांनीही पुण्यातल्या आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाई फुलेंना शिकवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत शिकवणाऱ्या फातिमा शेख यासुद्धा फरार यांच्या अहमदनगर येथील मुलींच्या शाळेत शिकल्या.
महिलांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान केलेल्या सिंथिया फरार आणि मिसेस मिचेल यांची चरित्रे किंवा स्वतंत्र माहिती आतापर्यंत कुठेही लिहिली गेलेली नाही त्यामुळे या दोन समाजसुधारक महिलांची सहसा कुणालाच काही माहिती नसते. असे असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास, विशेषतः स्त्रीमुक्ती चळवळीचा आणि शैक्षणिक इतिहास, त्याशिवाय सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांची चरित्रे सिंथिया फरार यांच्या उल्लेखावाचून पूर्ण होऊच शकत नाही, असे त्यांचे भरीव योगदान आहे.
अहमदनगर येथे सिंथिया फरार मॅडम मुलींसाठी शाळा चालवत होत्या. महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या मिंत्रांसह या शाळेला भेट दिली आणि मुलींना शिक्षण देण्याच्या या कार्याबाबत ते प्रभावित झाले. आपली पत्नी सावित्रीबाई यांना त्यांनी अहमदनगर येथे फरार मॅडमच्या शाळेत शिक्षण अद्यापनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. फरार मॅडमच्या मुलींच्या शाळेपासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनीं आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनीं पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु केली होती असे खुद्द महात्मा फुले यांनी म्हटले आहे.
मात्र एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात हिंदुस्थानात आधुनिक शिक्षण देणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्याच व्यक्ती नाही. मिस सिंथिया फरार यांच्या कितीतरी वर्षे आधीच इतर परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीं देशांत आधुनिक शिक्षण देणाऱ्या मुलांमुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.
फरार हिंदुस्थानात येण्याआधी त्यांच्या अमेरिकेतील पुर्वायुष्याची काहीही माहिती उपलब्ध नाही. मुंबईत २९ डिसेंबर १८२७ रोजी आल्यानंतर सुरुवातीच्या त्यांच्या मुंबईतील कार्याविषयी आणि नंतर अहमदनगर येथील त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंतच्या दीर्घ कालावधीतील सेवेबाबत मात्र अनेक उल्लेख अमेरिकन मराठी मिशनच्या वार्षिक अहवालांत आणि इतर कागदपत्रांत आढळतात.
सिंथिया फरार यांचा भारतातील मिशनरी आणि शैक्षणिक क्षेत्रांतील कालखंड १८२७ ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८६२ इतका आहे. अमेरिकन मराठी मिशनच्या १८१३ ते १८८१ या कालखंडात हिंदुस्थानात कार्य केलेल्या सर्व मिशनरींच्या सेवेचा कालखंड देण्यात आला आहे. त्या यादीत `मिस सिंथिया फरार - आगमन २९ डिसेंबर १८२७ , निधन २५ जानेवारी १८६२’ अशी नोंद आहे.
यादरम्यान अमेरिकेतून मुंबईत आल्यावर सिंथिया फरार यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुलींच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. मिशनच्या १८२९ सालच्या अहवालात या शाळांची संख्या वाढत चालली आहे असे नमूद करून विद्यार्थिनींची संख्या चारशेहून अधिक झाली आहे आणि त्यापैकी १२२ मुली चांगल्यापैकी वाचू शकतात, सुंदर अक्षरात लिहू शकतात असे म्हटले आहे.
अमेरिकन मराठी मिशनचे मिशनरी अहमदनगर येथे पोहोचल्यानंतर लगेचच या मिशनरींच्या पत्नींनी तिथल्या स्थानिक मुलींना आपल्याकडे बोलावून शाळा सुरु केल्या. या शाळांत मुलींना लिहिणे, वाचणे शिकले जाई आणि बायबलमधील काही प्राथमिक तत्त्वे शिकवली जाई. मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात अत्यंत प्रतिकूल मत आणि कडवा विरोध असल्याने या शाळांत मुलींना बोलावण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागायची.
धर्मप्रसार करताना या कार्याचाच एक भाग म्हणून स्थानिक मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या मिशनरींना अनेक समस्यांना तोंड ध्यावे लागले होते. मुलींच्या शाळा सुरु करताना, या मुलींनी शिक्षण सोडू नये यासाठी प्रयत्न करताना अनेक प्रसंगी त्यांना अपयश येत असे.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८३४ सालच्या अहवालात मिशनच्या मुंबईच्या शाळांची माहिती दिलीआहे. त्यात तेथल्या कार्यरत व्यक्तींच्या यादीत मुलींच्या शाळांच्या सुपिरिटेंडंट मिस सी. फरार असा उल्लेख आढळतो. मुंबईत त्यावेळीं मुलांसाठी पाच तर मुलींसाठी तेरा शाळा होत्या, या शाळांत कुठल्याही प्रकारची फी नव्हती. त्याशिवाय इतर ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी बारा शाळा होत्या. अहमदनगरमध्ये १८३५ साली अमेरिकन मराठी मिशनच्या नऊ शाळा होत्या.
आपल्या मिशनरी वृत्तीच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने आधुनिक काळात भारतातील संपूर्ण समाजजीवन सकारात्मकतेने बदलून टाकणाऱ्या महान आणि द्रष्ट्या समाजसुधारक मिशनरींमध्ये अहमदनगरच्या सिंथिया फरार यांचा समावेश होतो.
अमेरिकन मराठी मिशनतर्फे पहिल्यांदा सुरु केलेल्या मुलांच्या बोर्डिंग स्कुल्स मिशनरी कुटुंबांत चालवल्या जात असत कारण बोर्डिंगमधल्या या मुलांमुलींची काळजी घेणे आणि त्यांना शिकवणे अधिक सोयिस्कर होते. सन १८३६ ला मात्र मुलींची पहिलीवहिली बोर्डिंग स्कुल मिस सिंथिया फरार यांनी चॅपलला लागून असलेल्या मिशन हाऊसमध्ये सुरु केली, या बोर्डिंग स्कुलमध्ये १३ मुली होत्या, त्यापैकी पाच जणी गुलामांच्या जहाजातून मुक्त केलेल्या निग्रो होत्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईच्या विविध परिसरांत त्यावेळी मुलींसाठी तब्बल १२ शाळा होत्या आणि या शाळांत दोनशे ते तिनशे विद्यार्थिनी होत्या. मात्र कालांतराने या शाळांची संख्या कमी करुन या शाळांचे एकत्रिकरण करून चॅपलसमोर असलेल्या भेंडी बझार केंद्रात आणि भायखळा मॅन्शन येथे या शाळा चालू ठेवण्यात आल्या. मिस सिंथिया फरार अनेक वर्षे या शाळांच्या सुपरिंटेंडेन्ट होत्या,
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मायदेशी अमेरिकेत परतावे लागले. अमेरिकेतून . 1839 ला पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांचे कार्य महाबळेश्वर येथे आणि त्यांच्या १८६२ सालच्या मृत्यूपर्यंत अहमदनगर येथे चालू राहिले. सिंथिया फरार अमेरिकेत परतल्या होत्या तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत मुलींची ही बोर्डिंग मिसेस ऍलन यांनी चालू ठेवली. ह्युमस दाम्पत्याचे १८३९ साली मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी ही बोर्डिंग चालू ठेवली.
भारतात फरार परत आल्यानंतर अहमदनगर येथेसुद्धा फरार यांनी मुलींच्या शाळांवर आपले लक्ष केंद्रित केले. अमेरिकन मराठी मिशनच्या १८४५ आणि १८४६ सालच्या अहवालात म्हटले होते कि '' मिस फरार यांच्या सुपरिंटेंडंटपदाच्या देखरेखीखाली मुलींच्या चार शाळा सुरु आहेत आणि या शाळांत १०० विधार्थिनी आहेत.''
या शाळांच्या अधिक्षक या नात्याने फरार यांनी केलेल्या परिश्रमामुळे या क्षेत्रात आधी इतरांना अपयश आले होते तसे त्यांच्या बाबतीत झाले नाही. त्यांना ज्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते ते पाहता इतर कुणी असे कष्ट करण्याचे धाडसच केले नसते. मुलींना शिक्षण देण्याबाबत समाजात विरोध असल्याने या शाळांतील मुलींनी शिक्षणात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांच्या पालकांना अजिबात कौतुक नसायचे. त्यामुळे आपल्या मुली नियमितपणे शाळांत जाण्याची गरज आहे असे त्यांना बिलकुल वाटत नसे. या कारणांमुळे या शाळांतील मुलींना कुठल्याही निमित्ताने किंवा कारणाखाली शाळेत पाठवणे अचानक बंद केले जाई किंवा या मुलींना कुठल्याही करण्यासाठी परगावी महिनाभर किंवा थेट काही महिन्यांसाठी पाठवले जाई.
मुलींचे लहानपणीच लग्न लावून देण्याची पद्धत तर त्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा अडसर होता. या मुलींना त्यांच्या सासूच्या हाताखाली आणि सतत चालणाऱ्या जिभेच्या प्रभावात प्रशिक्षण घेणे शाळेतील शिक्षणापेक्षा महत्त्वाचे समजले जायचे. सिंथिया फरार यांनी त्यांच्या शाळांत शिकणाऱ्या मुलींचे प्रेम संपादन केले, त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली आणि अशाप्रकारे शिक्षणात किमान थोडीफार प्रगती होईल इतका काळ या मुलींना शाळांत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात त्या यशस्वी ठरल्या.
तरीसुद्धा आपल्या शाळांतील अनेक मुलींना लवकरच शाळेतून काढले गेले आणि त्यामुळे आंपल्या आयुष्यभरातल्या शैक्षणिक कामात फार थोडे यश मिळाले अशी खंत फरार मॅडम अनेकदा व्यक्त करत असत.
सिंथिया फरार आणि त्यांच्याप्रमाणेच इतर मिशनरी महिलांनी भारतात मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कामामुळे हळूहळू मुलींच्या शिक्षणाबाबत त्यांच्या पालकांचा आणि एकूणच संपूर्ण समाजाचा असलेला विरोध मावळत गेला आणि मग मुली अधिक संख्येने शाळांत येऊ लागल्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या वर्धापनानिमित्त मिसेस एल एस गेट्स मिसेस लेखात लिहितात:
"सन १८२७ ला महिलांसाठी कार्य करण्यासाठी मिस सिंथिया फरार हिंदुस्थानात आल्या. मुंबईत त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरु केल्या. दयाळू वृत्तीच्या मित्र असलेल्या ब्रिटिशांसह उच्च पदांवरील अनेक भारतीय सद्गृहस्थांनी मुलींच्या या शाळांना पाठबळ पुरवले. याचे कारण म्हणजे या शाळांतील मुलींनीं केलेली प्रगती त्यांनी पाहिली होती. ब्रिटिश लोकांच्या मदतीवर चाललेल्या काही शाळांच्या सुपरिंटेंडंट म्हणून त्यांनी काम पाहिले. आपल्या कामावर त्यांनीं अलोट प्रेम केले. भौतिक साधने मिळवण्याची त्यांना संधी असतानाही त्यांनी या भौतिक सुखाकडे पाठ फिरवली आणि पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन त्त्यांनी नम्र वृत्तीने आपले कार्य सुरु ठेवले. आपल्या प्रभूसाठी कार्य करण्यासाठी त्या सदैव उत्सुक असायच्या. आपल्या स्वतःबद्दल त्यांनीं म्हटले आहे: ''मी माझे निरुपयोगी आणि अगदी हलके असलेले श्रम (आपल्या श्रमाबद्दल त्यांची अशी धारणा होती) माझ्या तारणहार प्रभूच्या चरणापाशी प्रत्य्येक रात्री ठेवत होते, माझ्या या अपर्णाचा त्याने स्वीकार करावा अशी मी प्रार्थना करत असे.'' अशा भावनेने फरार यांनीं काम केले. आपल्या कामाबाबत त्या सतत उत्साहाने असायच्या. त्यांच्या विद्यार्थिनी त्यांची अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतापूर्वक आठवण करत असत.
सन १८५२ ला मिस फरार यांना अहमदनगर शहरातल्या आणि नजिकच्या परिसरातील काही सद्गृहस्थांचे बोलावणे आले. आपल्या कुटुंबियांना आणि महिलांना शिक्षण कसे द्यायचे याबाबत फरार यांनी मार्गदर्शन करावे अशी त्यांनी विनंती केली. अहमदनगर येथील दोन शाळांना ब्राह्मणांचे पाठबळ होते, आणि यापैकी एका शाळेतील एक ब्राह्मण शिक्षक ख्रिस्ती झाल्यानंतर या शाळांतील मुलांना पालकांनी काढून घेतेले आणि त्यामुळे या शाळा बंद पडल्या.
मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये खूप आदराची भावना होती. त्यांच्याकडे हे लोक एक दैवत म्हणूनच पाहायचे. इथला समाज महिलांकडे एक दुय्यम, हलकी व्यक्ती अशा नजरेने पाहत असायचा, त्या लोकांसाठी फरार यांची निष्ठा, जीवनातील पावित्र्य, मनातील चांगुलपणा आणि स्त्रियांसाठी त्यांनीं घेतलेले परिश्रम खूप नवलाईची बाब होती.
अहमदनगर येथील मुलींच्या शाळेबद्दलची माहिती ऐकून महात्मा जोतिबा फुले यांनी या शाळेला भेट दिली आणि त्यानंतर आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना या शाळेत दाखल केले.
सिंथिया फरार यांच्या स्त्रीशिक्षणविषयक कार्याचा महात्मा फुले यांच्यावर गाढ प्रभाव पडला होता असे त्यांनीं स्वतः लिहिले आहे. अहमदनगर येथे नोकरीला लागलेले त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यामुळे ते फरार मॅडमच्या शाळेत गेले होते. याबाबत धनंजय कीर यांच्या `महात्मा जोतीराव फुले’ या पुस्तकात खालील उल्लेख आहे.
''नोकरीवर रुजू होण्यासाठी सदाशिवराव गोवंडे अहमदनगरला गेले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर जोतिबांना नेले. त्याकाळी अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या शिक्षणकार्याचे एक मोठे केंद्र बनले होते. तेथे गेल्यावर एके दिवशी सदाशिवराव गोवंडे व जोतिबा ह्यांनीं अमेरिकन मिशनमधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली.
मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या ह्याविषयी जोतिबा म्हणतात: माझ्या देशबांधवांपैकी महारमांगचांभार ह्या कनिष्ठ जातींतील बंधू हे दुःख आणि अज्ञान यांत साफ बुडालेले आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दयाळू देवाने मला प्रेरणा दिली. स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले. पूर्ण विचारांती माझे असे मत झाले कि, पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक गरज आवश्यकता आहे. स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीजे असतात. अशा विचारात मी असताना अहमदनगर येथील अमेरीकन मिशनमधील मिस फरार या बाईने चालविलेल्या शाळा मी एका मित्रांसमवेत पाहिल्या. ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो.
हिंदुस्थानात स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल जोतिबा आणि गोवंडे यांच्याजवळ मिस फरारने अत्यंत दुःख व्यक्त केले. आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी [परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करीत होते ते पाहून जोतिबा आणि गोवंडे यांचा मनावर फारच चांगला परिणाम झाला. आपल्या देशबांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली. यास्तव प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण देऊन शिक्षणप्रसाराच्या कार्यात तिचे साहाय्य घ्यावे, असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे जोतीराव पुण्यास परत आल्यावर त्यांची पत्नी सावित्रीबाई ह्यांचे शिक्षण सुरु करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी . एक शाळा उघडली. जोतिबा म्हणतात : ''मी पुण्यास येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरु केली. मात्र त्या शाळेत ज्या मुलांना शिक्षण घेण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला. या शाळेत मी वाचन, अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय शिकवीत असे''.
ख्रिस्ती मिशनरींतर्फे चालवल्या जाणाऱ्या `ज्ञानोदय मासिकात जोतिबांचे हे मनोगत १८५३ साली प्रसिद्ध झाले होते. जोतिबा लिहितात :
`` अतिशूद्रादिकांस विद्या शिकविण्याविषयांची मंडळी
या मंडळीचे पुढारी जोतिराव गोविंद फुले आहेत आणि अलीकडे जेव्हा या शाळेची परीक्षा झाली तेव्हा त्यांनी बोलणे लावले की महार, मांग, चांभार हे या देशात फार असून ते अगदी नीचावस्थेत आहेत. हे पाहून ईश्वराच्या प्रेरणेने माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली असल्यास सुशिक्षित करण्याविषयी काहीतरी उपाय योजावा. प्रथम मनात आले की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली आहे म्हणून त्या लोकांच्या मुलींचीच शाळा प्रथम घालावी आणि असा विचार करता करता मी एका मित्रालासुद्धा अहमदनगरात जाऊन तेथे अमेरिकन मिशन खात्यातील फारा मडमीच्या कन्याशाळा पाहिल्या आणि पाहून मला मोठा आनंद झाला कारण की त्या चांगल्या रीतीने चालल्या होत्या. मग मी पुण्यास परत येऊन लागलीच एक मुलींची शाळा घातली व तिथे वाचणे लिहिणे, गणित, व्याकरण असा अभ्यास चालविला.’’.
महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुल चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे प्रकाशित केलेल्या ``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या पुस्तकाच्या संपादकियात हरि नरके यांनी लिहिले आहे: ``२२ नोव्हेंबर १८५१ च्या `बॉंबे गार्डियन’ने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ``१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनीं जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी हे दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यात गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली. पण पुढे सहाच महिन्यांत दुदैव ओढवले. लोकांच्या मूर्ख पूर्वग्रहाचा प्रभाव पडून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले व शाळा बंद पडली. गोवंडे पुण्यात आले व त्यांनी सावित्रीबाईंना नगरास नेले. पावसाळ्याच्या प्रारंभी त्या परत आल्या. मग केशव शिवराम भवाळकर यांनी त्यांना शिक्षण द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. शाळातून शिकविण्यात उपयोगी होतील अशा तरुण स्त्री शिक्षकांचा वर्गही घेण्याचे ठरले. भवाळकरांनीं खटपट करून पुण्यात स्त्रिया जमवून त्यांना शिक्षण दिले.’’
याच प्रस्तावनेत नरके यांनी म्हटले आहे कि ‘’ ``सावित्रीबाईनी अहमदनगर येथे फरार बाईच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले होते.’’
अमेरीकन मराठी मिशनच्या वतीने मिस सिंथिया फरार यांच्यावर १८६२ साली लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे :
` मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरु करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले. अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरु केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनीं मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली. ‘’
अमेरिकन मराठी मिशनच्या सिथिया फरार यांच्याबाबत अमेरिकन मराठी मिशनच्या १९२०च्या अहवालात खालील माहिती आढळते :
``या मिशनच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सिंथिया फरार या पहिल्या अविवाहित अमेरिकन महिला होत्या. शंभर वर्षांपूर्वी, २९ डिसेंबर १८२७ रोजी, त्याचे येथे आगमन झाले. अहमदनगर येथे पहिल्यांदाच त्यांनी मुलींच्या शाळा सुरु केल्या. त्यांनी ही सेवा सुरु केली तेव्हा काही हिंदू लोकांनी तिरस्कारयुक्त शब्दांत त्यांना सुनावले. '' आधी गाढवांना वाचण्याचे धडे ध्या आणि मग आमच्या मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करा !'' मिस फरार यांच्यासाठी हा नक्कीच खूप कष्टाचा मार्ग होता. मात्र हिंदुस्थानातल्या महिला आणि मुलींसाठी त्यांनी आपले कार्य त्यांना २५ जानेवारी १८६२ रोजी बढती मिळेपर्यंत ( निधनापर्यंत) सतत चालूच ठेवले. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, या मिशनने अहमदनगर येथील मुलींच्या तीन डे -स्कुल्सचे नाव - द फरार स्कुल्स' असेच ठेवले आहे.
या तीन फरार शाळांच्या आता सुपिरिटेंडंट असलेल्या मिसेस एच फेयरबॅक यांनी लिहिले आहे ``मागील वर्षाकडे वळून पाहताना आणि सर्व बाबी विचारात घेता, फरार स्कुल्समध्ये चालू असलेल्या चांगल्या कार्याबाबत आनंद आहे. शाळांचे शिक्षक प्रामाणिक आहेत आणि शाळेतल्या छोट्या मुलींशी प्रेमाचे नाते आहे. गेल्या वर्षी या तिन्ही शाळांना याआधी कधीही मिळाले नव्हते अशा मोठ्या रकमेचे सरकारी अनुदान मिळाले आहे.''
याच अहवालात अहमदनगर येथील फरार स्कुलच्या मुलींचा एक फोटो छापण्यात आला होता. विशेष म्हणजे अमेरीकन मराठी मिशनच्या वेळोवेळीच्या अहवालांत आणि इतर दस्तऐवजांत विविध मिशनरींचे, इतर व्यक्तीचे स्वतंत्र किंवा समूह फोटो प्रकाशित केलेले आहेत, मिस सिंथिया फरार यांचा मात्र त्यांच्या नावानिशी एकही स्वतंत्र फोटो दिसत नाही. कदाचित काही समूह फोटोंमध्ये फरार मॅडम असण्याची शक्यता आहे.
अमेरीकन मराठी मिशनच्या दस्तऐवजांत मिस सिंथिया फरार यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी आणि कार्याविषयी पुढील टिपण्णी आढळते :
‘’ फरार यांच्या पूर्वायुष्याबद्दल सांगण्यासाठी आवश्य

क ती माहिती आमच्याकडे नाही. रेव्हरंड सायरस स्टोन या आपल्या चुलतभावासह त्या हिंदुस्थानात १८२७ साली आल्या होत्या इतकेच आम्हाला माहित आहे. त्यावर्षी मुंबईत डिसेंबर अखेरीस पोहोचल्यानंतर लगेचच त्यांनी त्या शहरातील हिंदू मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनीं मुलींच्या अनेक शाळा स्थापन केल्या आणि या शाळांत सर्वांत उच्च जातींच्या मुलीसुद्धा होत्या. या शाळांच्या त्या सुपरिंटेंडेंट म्हणून अनेक वर्षे कार्य करत असतानाच त्या शाळांत शिकवतसुद्धा असत. त्यांच्या या कार्यात मुंबईतील उच्चपदांवरील महिलांचे आणि सद्गृहस्थांचे त्यांना प्रोत्साहन आणि मदत मिळत असे. आर्चडिकन (नंतरचे बिशप ) कार, सर रॉबर्ट ग्रांट यांच्या निधनानंतर मुंबईचे गव्हर्नर बनलेले जेम्स फारीश आणि त्याशिवाय इतर कितीतरी व्यक्तींनीं फरार यांना विविध प्रकारे मदत केली, त्यांना कौतुकाच्या शब्दांसह आपल्या कृतीनेही खूप प्रोत्साहन दिले. आदरणीय आर्चडिकन कार यांच्यामार्फत एका इंग्लिश सोसायटीने अर्थसहाय्य पुरवलेल्या अनेक शाळांच्या फरार सुपरिंटेंडंट होत्या.
फरार यांना आपल्या कामाची आवड होती आणि कुठलीही भौतिक सुखासाठी त्यांनी आपले हे कार्य सोडले नसते. कठीण परिश्रमांमुळे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे .१८३७ साली त्यांना आपल्या मायदेशी, अमेरिकेत, परतावे लागले होते, मात्र रेव्हरंड बर्जेस यांच्या कुटुंबासह त्या १८३९ साली हिंदुस्थानात परतल्या. या देशातल्या आगमनानंतर लगेचच त्या बर्जेस दाम्पत्यासह अहमदनगर येथे आल्या. काही महिन्यांचा अपवाद वगळता या शहरातच त्यांचे कायम वास्तव्य होते आणि इथेच प्रामाणिकपणे आपले कार्य करत असताना त्यांचे निधन झाले.
आपल्या तारणारा प्रभूसाठी सतत काही तरी करत राहण्याची त्यांची धडपड असायची. मृत्युशय्येवर असताना त्यांनीं म्हटले कि आपले दररोजचे परिश्रम (त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने अगदी सामान्य आणि हलक्या दर्जाचे ) दररोज रात्री आपल्या प्रभूच्या चरणी ठेवत त्यांचा स्वीकार व्हावा अशी प्रार्थना करत असत .
याच भावनेने त्यांनी आयुष्यभर खूप परिश्रम केले. फरार यांच्या शाळांतले अनेक माजी विद्यार्थिनी पत्नी आणि माता बनल्यानंतर आपल्या या शिक्षिकेची आठवण करत असत. फरार यांच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी आणि त्यांनीं दिलेल्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी या विद्यार्थिनींची पत्रे फरार यांना वेळोवेळी यायची.
मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये खूप आदर होता. या लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या स्त्रियांबाबत असलेल्या दृष्टिकोनामुळे फरार यांना हे लोक एखादी दैवी व्यक्तीच मानत असत. फरार यांच्या जीवनातली शुद्धता आणि पावित्र्य, त्यांच्या हृदयाचा चांगुलपणा आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी त्या करत असलेले परिश्रम या लोकांसाठी एक अत्यंत नवलाची बाब होती.
सन १८६० च्यानंतर सिंथिया फरार यांची प्रकृती ढासळत गेली. लष्कर लाईन्समधल्या मुलींची शाळा आणि कॅथेखिस्ट शाळेशी संबंधित असलेल्या मुलांची शाळा मिस फरार यांच्या देखरेखीखाली चालू राहिल्या. त्यांची प्रकृती बिघडल्यामुले या शाळांचे काम त्यांना थांबवणे भाग पडले. ते काम पुन्हा सुरु करणे त्यांना शक्यच झाले नाही. ‘’
सिथिया फरार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवरी १८६२ रोजी अहमदनगर येथे निधन झाले
फरार यांच्या निधनामुळे स्थानिक महिलांना धक्का बसला. यापैकी शेकडो महिला त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या होत्या, त्याआधी या महिलांनीं कधीही कुठल्याही ख्रिस्ती विधीला हजेरी लावली नव्हती. त्यांच्या नेहेमीच्या परिचयाच्या चेहेऱ्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी या महिला शवपेटीजवळ आल्या तेव्हा एखाद्या दैवताचे दर्शन घ्यावे अशा पद्धतीने त्यांनी मान लववून वंदन केले. या लोकांना नेहेमी जात येईल अशा ठिकाणी जर फरार यांना दफन केले असते तर कदाचित यापैकी अनेक महिलांनीं एखाद्या पवित्र तिर्थक्षेत्राप्रमाणे त्या ठिकाणी भेट देऊन त्या कबरीवर फुले वाहिली असती.
विशेष म्हणजे मिस फरार यांच्या निधनाच्या वेळी वीस वर्षे आधी अहमदनगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या कुठल्याही मिशनरीचे किंवा सहाय्यक मिशनरींचे कार्य करत असताना निधन झाले नव्हते. अहमदनगर येथील कबरस्थानात त्यावेळी आधीच्या केवळ तीन मिशनरींच्या कबरी होत्या. त्यापैकी एक रेव्हरंड हर्व्हे यांची होती, अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनचे केन्द्र स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांतच १८३२ला त्यांचे निधन झाले होते. दुसरी कंबर १८४२ साली निधन झालेल्या मिसेस बर्जेस यांची होती आणि तिसरी कबर आता १८६२ साली निधन झालेल्या मिस फरार यांची होती.
मिस फरार यांच्या निधनानंतर त्यांनीं अनेक वर्षे चालवलेल्या लष्कर लाईनमधल्या मुलींची शाळा बंद करणे भाग पडले. याचे कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वी या परिसरातला आर्टिलरी आणि इंस्ट्रक्शन डेपो दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला आणि त्यामुळे तेथील अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आणि फरार त्यांच्या या शाळेतील मुलींची संख्या एकदम घटली. फरार यांच्या निधनाआधीच या शाळेत नियमितपणे येणाऱ्या फक्त तेरा-चौदा मुली होत्या.
फरार यांच्या मुलींच्या शाळेपाशी एक मुलांची शाळा होती. मुलांच्या या शाळेच्या सुपरिंटेंडंट म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली होती. फरार त्यांच्या निधनानंतर त्यांच्यामागे राहिलेली रक्कम लष्कर लाईन्स मधल्या मुलींच्या आणि मुलांच्या शाळांसाठी वापरली जात होती. सिंथिया फरार यांची मुलींची ही शाळा बंद करण्याचा दुःखद निर्णय अमेरिकन मराठी मिशनला घ्यावा लागला, मात्र दुसरा काही पर्याय नव्हता. मुलांच्या शाळेने मात्र नंतर खूप प्रगती केली.
फरार यांच्या मागे राहिलेल्या रकमेचा विनियोग शाळांतीळ मुलांसाठी करण्याचा निर्णय मिशनने घेतला.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८६३ च्या अहवालानुसार, ``अहमदनगर येथील मिसेस बॅलेन्टाईन यांच्या देखरेखीखाली असलेल्या शाळेची प्रगती होत आहे., या शाळेतील पाच मुलींना त्यावर्षी ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. त्याशिवाय वयाने मोठ्या असलेल्या तीन विद्यार्थिनींची स्थानिक ख्रिश्चनांशी विवाह झाले आहेत. उच्च जातींतील मुलांसाठी आम्ही दोन शाळा चालवत आहोत. यापैकी एक शाळा अहमदनगर येथे आहे आणि दिवंगत मिस फरार यांच्या मागे राहिलेल्या निधीतून लष्कर लाईन्समध्ये आहे. या दोन्ही शाळांची भरभराट होत आहे.’’
मिस सिंथिया फरार यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी त्रोटक माहिती अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहासात आणि गॅझेट्स मध्ये शोधावी लागते.
सिंथिया फरार यांच्या विद्यार्थी असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव आता पुणे विद्यापिठाला देण्यात आले आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाबाबत त्यांनी केलेल्या महान योगदानाबद्दल तो त्यांचा उचित सन्मानच आहे. मात्र सिंथिया फरार यांचे नाव किंवा त्यांचे स्त्रीशिक्षणाबाबत योगदान याबद्दल आजही लोकांना काहीच माहिती नसते.
महात्मा फुले यांना प्रेरणा देणाऱ्या सिंथिया फरार यांच्याविषयीचे फुले यांच्या वेगवेगळ्या चरित्रांत ओझरते उल्लेख वाचून फरार मॅडमच्या चरित्राबाबत उत्सुकता माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मात्र भारतीय स्त्रीशिक्षणात अत्यंत मोलाचे योगदान असणाऱ्या फरार मॅडमबाबत इतर कुठेही काही माहिती उपलब्ध नाही असे आढळले. मिस सिंथिया फरार यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी त्रोटक माहिती अमेरिकन मराठी मिशनच्या इतिहासात आणि गॅझेट्स मध्ये शोधावी लागते.
अमेरिकन मराठी मिशनच्या गेल्या दोनशे वर्षांची कागदपत्रे, पुस्तके आणि अहवाल मी नजरेखालून घातले तेव्हा या दस्तऐवजांत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली फरारबाईंची ही माहिती सापडली, त्यातून मिस सिंथिया फरार यांचे हे पहिलेच छोटेखानी चरित्र उभे राहिले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या शिक्षिकेचे आणि महात्मा फुले यांना प्रेरित करणाऱ्या सिंथिया फरारबाईंचे हे पहिलेवहिले चरित्र वाचकांसमोर ठेवताना मला खूप आनंद होतो आहे. फरार मॅडमचा खराखुरा फोटो मात्र अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही.
मुंबईत निधन झालेल्या आणि तेथेच स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहाचे दहन झालेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची कबर अहमदनगर येथेच आहे. सिंथिया फरार यांची अहमदनगर येथे असलेल्या कबरीचा कधीकाळी शोध लागेल अशी शक्यता आता राहिलेली नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरवातीस कोलकाता येथे मेरी अँन कुक, मुंबईत मार्गारेट विल्सन, महाबळेश्वर येथे मिसेस मेरी ग्रेव्ह्ज, आणि मुंबई व अहमदनगर येथे मिस सिंथिया फरार या महिलांनी स्त्रीशिक्षणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी मोठे योगदान दिले. या महिलांच्या या कार्यांची नोंद घेणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे योग्य ठरेल.
(लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग)