पुणे मराठी ख्रिस्ती संघाचे कामकाज करोना काळात आणि काही वैयक्तिक कारणांमुळे गेली काही वर्षे ठप्प पडले होते. गेली शतकभर (१९२७पासून) होत असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकमध्ये जानेवारीत सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
'शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या शीर्षकाचे एक जाडजूड पुस्तक मी अलीकडेच लिहून हातावेगळे केले आहे.
या पार्श्वभूमीत शहरातील पुणे मराठी ख्रिस्ती संघाचे अस्तित्व संपल्यासारखे आहे ही बाब मला अस्वस्थ करत होती.
हा विषय मी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष नगर-स्थित पौलस वाघमारे यांच्याबरोबर फोनवर बोलताना काढला आणि ते म्हणाले '' तुम्ही या विषयात पुढाकार घेत असाल तर बोलावू या आपण एक मिटिंग.''
तर ही मिटिंग पुण्यात झाली आणि संघाची जुनी बरीच मंडळी (वय अवघे पन्नास ते नव्वद) जमली, त्यात विद्यमान अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी होते. सचिवाची जागा खाली होती.
सचिव म्हणजे संघाचा कार्यकारी प्रमुख, ते पद कोण घेणार?
मी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अगदी सीमावर्ती भागातला. भामाठाण आणि मुठे वाडगाव या दोन गावांच्या मध्ये वाहणारी गंगा किंवा गोदावरी नदी या दोन प्रदेशांमध्ये विभाजक म्हणुन काम करते.
गंगेच्या एका बाजूला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव इथे आम्ही पारखे मंडळी `गाववाले'.
मात्र माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथे.
तर आमच्याकडच्या ग्रामीण भाषेत एक जुनी म्हण आहे.. ``पाटील बुवा, आता तरी लग्न करा की..
यावर पाटलांचे उत्तर..`` व्हा तुमीच बायको''...
तर अशीच आफत माझ्यावर यावेळी गुदरली.
कुणीच ते सचिव पद स्वीकारायला तयार नव्हते आणि सभेची सूत्र माझ्या हातात असल्याने मीच ते पद घ्यावे असा आग्रह झाला
आणि पन्नास वर्षांचा इतिहास असलेल्या या पुणे मराठी ख्रिस्ती संघाचा मी सचिव बनलो.
कुठलेही पद, सत्कार किंवा गौरव स्वीकारायचे नाही असे मी ठरवले आहे. या माझ्या निर्णयाला येथे मला मुरड घालावी लागली
या शहरात मी राहत असलो तरी आतापर्यंत पुणे मराठी ख्रिस्ती संघाशी माझा कसलाही संबंध आलेला नाही. तरीसुद्धा मी हा पुढाकार घेतला हे त्यामागचे कारण
पुणे मराठी ख्रिस्ती संघाचा चांगला इतिहास आणि काम आहे. दर महिन्याला या संघाची बैठक होत असे, `शब्दसेवा' हे अनियतकालिक नियमितपणे प्रकाशित केले जात होते.
सन १९७२ साली स्थापन झालेल्या या संघाने ख्रिस्ती साहित्य संमेलनांना आतापर्यंत एकूण सहा अध्यक्ष दिली आहेत.
भास्करराव जाधव (बारामती १९७५), जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), विजया पुणेकर (मुंबई १९९०) , अशोक आंग्रे (अहमदनगर २०१२), अनुपमा डोंगरे जोशी (श्रीरामपूर २०१२) आणि पौलस वाघमारे (बीड २०२२) ही ती नावे.
त्याशिवाय पुणे मराठी ख्रिस्ती संघाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पंधरावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १९९२ साली भरवले होते.
तर अशा या साहित्य संघाची स्नेहसदनमध्ये काल दुसरी बैठक झाली, त्या बैठकीनंतरचा हा ग्रुप फोटो.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment