वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.
ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.  
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.  
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या  साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची  छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.     
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात  अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.  
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत  अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.   
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे  आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके  कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.    
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही  मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे'   पंडिता  रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य  कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म  गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया  रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब  म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे  पहिले धाडस  ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७  साली नाशिकात पहिले मराठी  ख्रिस्ती साहित्य संमेलन  भरवून केले होते.  
आणि त्यावरही  कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.    
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून  विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच  नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.  
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या  ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. 
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण  छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे. 
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी  ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या. 
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.  मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला  झालेल्या  मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी  ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी  दलित  ख्रिस्ती  संमेलनाच्या अशा दोन्ही  मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
 मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर  एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे  हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले  अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.  
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे.  त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश   (इ. स. १८00 ते इ. स. २000'  तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान  असतात.  कारण याच  ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०)  हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ. 
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे  `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे  `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा'  (२०२०)  आणि फादर टोनी जॉर्ज  (येशूसंघ)  यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची'  ग्रंथ (२०२१)   याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे. 
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर  अधिक सविस्तर लिहीन.     
Camil Parkhe July 29, 2025

