Did you like the article?

Showing posts with label Jotiba Phule. Show all posts
Showing posts with label Jotiba Phule. Show all posts

Sunday, April 12, 2026

 


सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांची शोधमोहीम
महात्मा जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वश्रुत आहे. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण मिशनच्या शाळेत शिक्षकाचे काम केले होते असे म्हटले आहे.
जोतिबांकडून अबकडई गिरवणे शिकल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल आणि नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सावित्रीबाई अशाप्रकारे देशातील पहिल्यावहिल्या एतद्देशीय प्रशिक्षित शिक्षिका बनल्या.
`सत्यशोधक' या मराठी चित्रपटात `जेम्स (मिचेल) साहेब' या स्कॉटिश मिशनरीचे पात्र आहे.
लहानग्या जोतिबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्कॉटिश मिशनच्या शाळेत जेम्स मिचेल अगदी प्रेमाने शिकवतात, त्यांच्याशी मायेने वागतात असे या चित्रपटात दाखवले आहे.
`फुले' या हिंदी चित्रपटात सावित्रीबाईंना अध्यापन प्रशिक्षणासाठी घोडाबग्गीत घेऊन जोतिबा फुले नगरच्या अमेरिकन मिशनरी मिस सिंथिया फरार यांच्याकडे जातात असे दाखवले आहे.
जोतिबा यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या नेमक्या कुठल्या शाळेत शिक्षण पूर्ण केले, सावित्रीबाई यांनी मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्या पुणे कॅम्पातील नेमक्या कोणत्या शाळेत आपला अध्यापनाचा अभ्यासक्रम पुरा केला याबाबत खात्रीलायक माहिती मिळत नाही.
स्कॉटिश मिशनच्या पुण्यात मुख्य पेठांमध्ये आणि पुणे कॅम्पात म्हणजे सदर बझारमध्ये अनेक शाळा आणि संस्था होत्या. यापैकी नेमक्या कुठल्या जागी मिचेल दाम्पत्य राहत होते?
नेमक्या कुठल्या स्कॉटिश शाळेत आधी जोतिबा आणि नंतर मिसेस मिचेलच्या शाळेत सावित्रीबाई शिकल्या?
नेमक्या कुठल्या स्कॉटिश मिशनरी शाळेत जोतिबांनी १८५० नंतर शिक्षक म्हणून नोकरी केली ?
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या फुले दाम्पत्यांच्या कुठल्याही मराठी चरित्रांत ही माहिती मिळत नाही.
बहुतेक मराठी चरित्रे फुले दांपत्याच्या शिक्षकांच्या नावांबाबत आणि त्यांच्या शाळांबाबत सोयिस्कर मौन राखतात.
या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती काही महिन्यांपूर्वीच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे हे फुले दाम्पत्त्याच्या पुण्यातल्या या शाळा निश्चित करण्याबाबत पाठपुरावा करत होते.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे स्कॉटिश मिशनने पुणे कॅम्पात १८२७ साली सुरु केलेल्या आणि आजही चालू असलेल्या सेंट मार्गारेट मराठी प्रायमरी स्कुलचा मला शोध लागला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' या मुखपत्राचे सांगलीस्थित संपादक राहुल थोरात यांचा एके दिवशी मला `अमुकअमुक तुमच्याशी बोलू इच्छितात' असा निरोप आला .
त्यानंतर एका अपरिचित क्रमांकाच्या मोबाईलवरून मला फोन आला. तो अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे एक ट्रस्टी दीपक गिरमे यांचा होता.
मी `सकाळ' वृत्तपत्राच्या `ईसकाळ साठी लिहितो असे राहुल थोरात यांच्याकडून त्यांना कळाले होते, त्यामुळे त्यांनी सकाळ माध्यम समूहातील मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ यांच्याशी थेट संपर्क साधून माझा फोननंबर मिळवला होता.
त्यानंतर गिरमे यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो आणि इथून पुढे एक मोठी शोधमोहीम सुरु झाली.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातील शाळांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी दीपक गिरमे, प्रवीण देशमुख आणि इतर काही कार्यकर्ते यांनी क्वार्टर गेटपाशी असलेल्या ख्राईस्ट चर्चला भेट दिली होती,
त्या भेटीचा एक व्हिडीओसुद्धा तयार करण्यात आला होता. मात्र त्या टीमला काहीच माहिती मिळाली नव्हती.
.
महात्मा जोतिबा फुले स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, सावित्रीबाई फुले यांनी नगरच्या सिंथिया फरार यांच्याकडून आणि पुण्यातील स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल यांच्याकडून अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे असे मी गिरमे यांना सांगितले.
सिंथिया फरार यांची नगरची शाळा म्हणजेच आजची क्लेरा ब्रूस स्कुल, मात्र पुण्यातील स्कॉटिश मिशनची शाळा कुठे होती हे आजही कुणालाच माहिती नाही असे मी त्यांना सांगितले.
`अंनिस' चे ट्रस्टी दीपक गिरमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे फुले दाम्पत्याच्या शाळांचा शोध लावायलाच हवा असे मलाही वाटू लागले.
अशाच शोधमोहिमेत असताना पुण्यातील पुलगेट बसस्टँडपाशी असलेल्या कार्यालय असलेल्या समाजकार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांची मी भेट घेतली.
असुंता पारधे यांच्या एक शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची शाळा असलेल्या नगरच्या क्लेरा ब्रुस शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यावरून पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या शाळा कुठे होत्या असा प्रश्न मी त्यांना केला.
असुंता पारधे यांना या स्कॉटिश मिशनबाबत याबाबत काही कल्पना नव्हती, मात्र त्यांच्या कार्यालयाशेजारीच एक जुनी शाळा आहे असे त्यांनी मला सांगितले.
सहज म्हणून त्या शाळेला भेट देण्यासाठी मी त्यांच्याबरोबर निघालो.
दुपारचे साडेचार वाजले होते आणि तोपर्यंत शाळा बंद झाली होती. आता एक छोटीशी बैठी कौलारी वास्तू होती. तीच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा होती.
शाळेच्या कुंपणाबाहेरच्या त्या नामफलकाकडे माझे लक्ष गेले आणि आश्चर्याने माझे पाय त्याच ठिकाणी खिळले गेले.
यावेळच्या माझी मानसिक स्थितीचे आता वर्णनसुद्धा करता येणार नाही असा मला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला होतो.
``अहो मॅडम, हिच ती स्कॉटिश मिशनची शाळा!" शाळेच्या नामफलकडे बोट दाखवत मी जवळजवळ ओरडलोच.
असुंता पारधे मॅडम यांना मात्र काहीच अर्थबोध झाला नव्हता.
त्या नामफलकावर लिहिले होते.
``जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा - स्थापना १८२७''



`हे जॉन विल्सन म्हणजेच स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन, मुंबईतल्या विल्सन कॉलेजचे आणि सेंट कोलंबा गर्ल्स स्कुलचे संस्थापक. मुंबईतले डॉ. जॉन विल्सन आणि पुण्यातले जेम्स मिचेल हे दोघेही स्कॉटिश मिशनरी.''
हे बोलणे होत असतानाच मी पटापट त्या शाळेच्या नामफलकाचे आणि बंद कुंपणाच्या आतील शाळेच्या आवाराचे पटापट अनेक फोटोसुद्धा मी काढले.
नंतर असुंता पारधे यांच्या कार्यालयात परत गेल्यानंतर आमची जी चर्चा झाली, त्यातून खूप मौल्यवान माहिती मिळाली होती.
असुंता पारधे या पुण्यातल्या लाल देवळापाशी असलेल्या पेट्रोल पम्पाच्या बाजूला असलेल्या सेंट अँड्र्यूज गर्ल्स स्कुलच्या माजी विद्यार्थिनी. ही सेंट अँड्र्यू गर्ल्स स्कुलसुद्धा जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची शाळा.
या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यात आजही एकूण चार शाळा आहेत,
सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा, सेंट अँड्र्यू गर्ल्स स्कुल, पुणे कॅम्पातल्या मार्केटपाशी असलेली सेंट जॉन बॉईज सेकंडरी स्कुल आणि रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन प्रायमरी स्कुल आणि अध्यापन विद्यालय.
असुंता पारधे यांच्याकडून ही माहिती ऐकली आणि सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांच्या शोधमोहिमेला एक निर्णयक वळण लागले आहे याची मला खात्री झाली होती.
या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चार शाळांच्या माजी विद्यार्थ्यांच्या/ विद्यार्थिनींच्या संघटना आहेत आणि या चारही संघटनांचे एकमेकांशी चांगला समन्वय आहे.
माजी विद्यार्थिनींच्या संघटनेच्या एक कार्यकर्त्या या नात्याने असुंता पारधे यांचे त्यामुळे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाळांच्या प्राचार्यांशी सतत संपर्क असतो, असे त्यांनी सांगितले.
तर अशा प्रकारे पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या म्हणजेच जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाळांची मला ओळख पटली आणि त्यांच्या प्राचार्यांची गाठभेट घेणे सहजसुलभ झाले.
ऍडव्होकेट असुंता पारधे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मला लागलेल्या या शोधाची मी दीपक गिरमे सरांना लगेचच कल्पना दिली.
मुंबई बंदरात १८१३ साली आलेल्या अमेरीकन मिशनरी लोकांनी मुंबईत १८१४ च्या सुमारास सर्वांसाठी असलेल्या आधुनिक शाळा सुरु करुन सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मुलींची पहिली शाळा १८२४ साली सुरु केली.
स्कॉटिश मिशनरींनी पुण्यात १८२७ साली शाळा सुरु केल्या. त्यापैकी आजही चालू असलेली पुणे कॅम्पात एक शाळा आहे. सेंट मार्गारेट बालवाडी व प्राथमिक शाळा. स्थापना सहा जानेवारी १८२७.
भारतातल्या सर्वांत जुन्या असलेल्या या सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेचे द्विशताब्दी स्थापनवर्षसुद्धा आता सुरु झाले आहे
जोतिबा फुले यांचाही जन्म १८२७ सालचा आहे. आज ११ एप्रिल रोजी त्यांची जयंती, आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंतीवर्षाची सुरुवात होत आहे.
रेव्ह. जेम्स मिचेल आणि मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुण्यात मुलांमुलींसाठी अनेक शाळा चालवल्या आणि मिशनकार्य केले. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले हे त्यांच्या शाळांत शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती.
भारतातील एका सर्वांत जुन्या आणि आजही चालू असलेल्या पुणे कॅम्पातील सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेला अकरा नोव्हेंबर २०२५ला भेट दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी दीपक गिरमे, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, नंदिनी जाधव वगैरे कार्यकर्ते सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पाऊलखुणांचा शोध घेण्याच्या या भेटीत सहभागी झाले होते.
या भेटीचे कारण म्हणजे देशातील सर्वांत जुन्या असलेल्या या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या या शाळेतच महात्मा जोतिबा फुले शिकले असावेत याबद्दल आता माझी खात्री झाली आहे.
शाळेच्या प्रभारी मुख्याधिपिका अनुपमा कलकोटी यांनी भेट देणाऱ्या `अंनिस’च्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि शाळेची माहिती दिली.
स्कॉटिश मिशनच्या म्हणजे आताच्या मुंबई मुख्यालय असलेल्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे कॅम्पातल्या मार्केटशेजारी असलेल्या शिवाजी सेंट जॉन सेकंडरी स्कुलचे मुख्याध्यापक प्रणित कसोटे, लाल देवळामागे असलेल्या सेंट अँड्र्यूज स्कुल फॉर गर्ल्स शाळेच्या मुख्याधिपिका अर्चना साठे आणि एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालय प्रिन्सिपल शिल्पा पंडित यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ही सर्व मुलेमुली गरीब कुटुंबांतील आहेत. शेजारच्या बिशप्स हायस्कुलच्या आवारातील परिस्थिती आणि या शाळेतील परिस्थिती यात अर्थातच जमीनअस्मानाचा फरक आहे.
कालांतराने सावित्रीबाई आणि जोतिबांच्या इथल्या पाऊलखुणा पूर्णतः मिटल्या जाणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे.
त्याआधीच या जागेची ओळख झाली, तिथले फोटो घेता आले याचा आनंद आहेच.
जोतिबा आणि सावित्रीबाईंच्या पाऊलखुणा असलेल्या सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेच्या आवारात वावरत असताना आपण सहज मागे त्याकाळात जातो.
दोन शतकांपूर्वी सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या काळात येथे जसे वातावरण असेल तसेच काही प्रमाणात या सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेत आजही आहे.
या शाळेत बालवाडी आणि चौथीपर्यंत वर्ग आहेत, मात्र शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या पन्नासदेखील नाही.
आजही मुलेमुली जमिनीवर बसून धडे गिरवतात, मात्र शेणाने सारवलेल्या जमिनीऐवजी आता वर्गात फरशी आहे, त्यावर चटई टाकून विद्यार्थी- विद्यार्थीनी बसतात.
शिक्षिकांची आणि इतर स्टाफची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे आणि त्यामुळे एकाच वर्गात दोन इयत्तांमधील मुलेमुली एकत्र बसून एकाच शिक्षिकेकडून धडे शिकत असतात.
सुदैवाची बाब म्हणजे सेंट मेरी स्कुलने या शाळेला आपली जुनी शंभरेक बेंचेस दिली आहेत, एकदोन वर्गांत त्यामुळे मुलांमुलींना जमिनीवर बसावे लागत नाही.
या मुलांमुलींच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीबाबत वेगळे सांगायला नको, त्यापैकी बरेचसे चारपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकडी परिसरातील आहेत.
शेजारच्या बिशप्स स्कुलने या मुलांमुलींसाठी आपली बस सर्व्हिस मोफत पुरवली आहे.
या दरम्यान मी लिहिलेल्या `सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी' या पुस्तकाचे प्रकाशन `अंनिस' च्या माध्यमाने ज्येष्ठ्य नेते शरद पवार यांच्या ३ जुलै २०२५ रोजी हस्ते झाले.
`अंनिस'चे ट्रस्टी दीपक गिरमे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी अंनिस विश्वस्त समितीचे अध्यक्ष गणेश चिंचोले, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आणि माजी आमदार जयदेव गायकवाड उपस्थित होते. अंनिस राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी प्रास्तविक केले तर राहुल माने यांनी आभार मानले.
सत्तरच्या दशकात विजया श्यामराव पुणेकर सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या मुख्याधिपिका होत्या.
नंतरच्या काळात त्या मुंबईतील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कुलच्या आणि पुण्यातीलच एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य होत्या.
जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच पूर्वीचे स्कॉटिश मिशन. विजया पुणेकर यांनी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेचा अगदी जुना तसेच गेल्या काही दशकांचा इतिहास संक्षिप्तपणे लिहिला आहे.
अर्थात या लेखात सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचा नामोल्लेखदेखील नाही.
स्कॉटिश मिशनच्या म्हणजेच मुंबईत मुख्यालय असलेल्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चारही शाळा सावित्रीबाई आणि जोतीबांचा या शाळेशी असलेल्या निकट संबंधांबद्दल आजही पूर्णतः अनभिज्ञ आहेत.
सन १९८२च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या विजया पुणेकर यांच्या लेखातील काही मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
स्कॉटिश मिशनची पुण्यातील पहिली शाळा-सेंट मार्गारेट स्कूल अँड चिल्ड्रेन्स होम
भारतातील शैक्षणिक संस्थांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास स्कॉटिश मिशनरींनी सुरू केलेल्या संस्था दीर्घकाळपर्यंत भव्याहतपणे चालू राहिलेल्या आहेत असे आदळते.
तसेच या संस्थांनी सुरुवातीच्या काळात प्राप्त केलेला उच्च शैक्षणिक दर्जा आजतागायत राखलेला आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
१८२३ साली स्कॉटिश मिशनरी सोसायटीतर्फे पाठविलेले पहिले मिशनरी रेव्ह. डॉनाल्ड मिचेल पश्चिम भारतात आले. केवळ दहा महिन्यांच्या अवधीत त्यांनी कोकणात दहा शाळा सुरू केल्या.
त्यांच्यानंतर आलेल्या मिशनरींनी १८२७ सालाअखेर ८० शाळा सुरू केल्या होत्या. त्यांपैकीच एक शाळा पुढे सेन्ट मार्गारेट शाळा म्हणून ओळखली गेली.
डॉ. जॉन विल्सन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले स्कॉटिश मिशनरी १८२९ साली आपल्या पत्नी मार्गारेट यांच्यासमवेत पश्चिम भारतात कार्य करण्यासाठी आले. अगदी थोड्या अवधीत त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या.
स्त्री-शिक्षणाची आवश्यकता विल्सन दांपत्याला पुरेपूर पटलेली होती. त्यांनी प्रथम कोकणात, नंतर मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.
त्याच सुमारास पुणे या ठिकाणी रेव्ह. जेम्स मिचेल भाणि त्यांच्या पत्नीची मिशनरी म्हणून नेमणूक झाली होती. १८४० साली पुण्यामध्ये मुलींच्या एकूण पाच शाळा मिचेल दांपत्य चालवित होते.
त्यानंतर १८४१ साली मिसेस् मिचेल यांनी मार्गारेट विल्सन यांनी सुरू केलेल्या बोर्डिंग स्कुलच्या धर्तीवर स्टेनली रोड या ठिकाणी आपल्या राहत्या बंगल्यात एक बोर्डिंग सुरू केली.
तिला सेन्ट मार्गारेट स्कुल असे नाव देण्यात आले.
मिसेस जेम्स मिचेल स्कॉटलंडदेशी १८६६ साली गेल्यानंतर काही काळ मिसेस (जॉन) मरे मिचेल आणि नंतर मिसेस अँगस आणि मिसेस गार्डनर यांनी शाळा व वसतिगृह यांचे कामकाज पाहिले.
१८६६ साली मिसेस गार्डनरच्या काळात सध्याची शाळेची इमारत बांधली गेली. स्कॉटलंडमध्ये वार्षिक सेल भरवून स्त्रियांनी ही इमारत बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळविले होते.’’
जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चार शाळांच्या एक्स स्टुडण्ट्स असोशिएन्सच्या समन्वय समितीने सेंट मार्गारेट शाळेची द्विशताब्दी साजरी करण्याचे ठरवले आहे.
महात्मा जोतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्षसुद्धा याच काळात साजरे होणार आहे.
सेंट मार्गारेट शाळेची द्विशताब्दी स्थापना वर्ष आणि त्याच शाळेच्या एका नामवंत विद्यार्थ्यांची द्विशताब्दी जयंती असा योग यावर्षी जुळून आला आहे.

(अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राच्या एप्रिल महिन्याच्या महात्मा फुले विशेषांकात प्रकाशित झालेला लेख)

Camil Parkhe

Thursday, February 26, 2026

 

                            विश्रामबागवाडा

पुण्यात विश्रामबागवाडा येथे १८२१ साली संस्कृत (हिंदु) कॉलेज स्थापन झाले तेव्हा पुढील अनेक वर्षे ते केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते.
या कॉलेजातील शिक्षक आणि विद्यार्थीदेखील फक्त ब्राह्मणच असतील असा एक नियमच होता.
याचे कारण म्हणजे पुण्यातील पेशवाई नुकतीच - तीन वर्षांपूर्वीच - संपली होती आणि उच्च शिक्षण समाजातील सर्व घटकांना खुले करुन शहरात बहुसंख्य असलेल्या ब्राह्मण समाजाचा राग ओढवून घेण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारची मुळीच इच्छा नव्हती.
त्यावेळी भारतातील विविध प्रांतांत ईस्ट इंडिया कंपनीचा सत्तेचा अंमल हळूहळू वाढत होता. असे असले तरी इथल्या समाजातील सामाजिक चालीरीतींमध्ये ढवळाढवळ करण्याचे कंपनी सरकारने हेतुपुरस्पर टाळले होते.
या देशात आधुनिक शिक्षण पद्धत आणण्यामागे कंपनी सरकारचे विशिष्ट हेतू आणि धोरण होते.
जोतिबा फुले यांच्या काळात स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल हे मुंबई-पुण्यात कार्यरत होते. मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' हे त्यांचे आत्मचरित्र १८९८ साली स्कॉटलंडहून प्रकाशित केले.
या आत्मचरित्रात एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाजजीवनाचे, विविध घटनांचे चित्रण केले आहे.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने ब्रिटिश भारतात आलेल्या या मिशनरीने मायदेशी स्कॉटलंडला परतल्यानंतर हे पुस्तक लिहून पाश्चात्य जगताला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची ओळख करून दिली, त्याशिवाय देहू, आळंदी, पंढरपूर आणि जेजुरी या तीर्थक्षेत्रांविषयी लिहिले.
संत तुकारामांविषयी तर रेव्हरंड मरे मिचेल यांनी खूपच कौतुकास्पद लिहिले आहे.
``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत,'' असे त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले आहे.
हे जॉन मरे मिचेल तर जोतिबा फुले यांचे वैचारीक मार्गदर्शकसुद्धा होते. जोतिबांविषयी आणि पुण्यातील अनेक नामवंतांविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
विशेष म्हणजे संस्कृत कॉलेजचे प्रमुख मेजर थॉमस कँडी रजा घेऊन युरोपला परतले होते तेव्हा अल्पकाळासाठी जॉन मरे मिचेल संस्कृत कॉलेजचे प्राचार्य (व्हिझिटर) आणि मराठी-संस्कृत विभागाचे प्रमुख होते.
मरे मिचेल यांच्या शाळेत शिकण्यासाठी जोतिबांनी एका महार मुलाला पाठवले होते, त्याची हृदयद्रावक शोकांतिका `चटईचा विटाळ' मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. धनंजय किर यांनी महात्मा फुले चरित्रात ही घटना सांगितली आहे.
जॉन मरे मिचेल यांनी पुण्यातील संस्कृत कॉलेजच्या ( आजचे डेक्कन कॉलेज ) जन्माची कहाणी पुढील शब्दांत सांगितली आहे:
``भारतात दिवाणी आणि फौजदारी न्यायालये चालवण्यासाठी भारतातील हिंदु आणि मुस्लीम कायदे माहिती असणे आवश्यक असल्याने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने कोलकात्यात १७८२ला मुस्लीम कॉलेज आणि वाराणशी येथे १७९१ला संस्कृत कॉलेज सुरु केले.
पुण्यात विश्रामबागवाड्यात १८२१ साली संस्कृत कॉलेज सुरु झाले तेव्हा वाराणशी कॉलेजप्रमाणे हेसुद्धा केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते. ’’
काही काळानंतर मात्र ही परिस्थिती बदलली.
संस्कृत आणि मराठी भाषा तज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांची १८३७ साली संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली आणि वर्षभरातच या कॉलेजात समाजाच्या सर्व जातीधर्माच्या लोकांना शिक्षण खुले करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयाने अपेक्षेप्रमाणे हाहाकार उडाला. या निर्णयाचा सर्वांत मोठा फ़टका आणि रोष प्राचार्य थॉमस कँडी यांनाच सोसावा लागला.


त्याआधी हे थॉमस कॅंडी हे कोण हे जाणून घेऊ या.
इंग्लंडमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी जन्म झालेल्या थॉमस कँडी यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात नेमणूक झाली आणि त्यानंतर भारतात त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्य केले.
मराठी भाषातज्ज्ञ म्हणून नाव कमावलेल्या थॉमस कँडी तयार केलेला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे नियम यामुळे त्यांचे योगदान विशेष मोलाचे ठरते.
मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेय कँडी यांना दिले जाते
थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची परिभाषा' हे मराठी भाषेतील हे शुद्धलेखनावरील १६ पानांचे पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून थॉमस कँडी यांचे १५० वे स्मृतीवर्ष सुरु होत आहे
विश्रामबागवाडा येथील संस्कृत कॉलेजात प्राचार्य थॉमस कँडी आणि कॉलेजातील ब्राह्मण शिक्षकवर्ग यांच्यात सोवळ्याओवळ्याच्या प्रश्नावर अनेक चकमकी उडाल्या.
नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात याबाबत विस्तृत माहिती दिली आहे :
आपल्या या छोटेखानी पुस्तकात नारायण विष्णू जोशी लिहितात:
``मेहरबान मिस्तर चापलेन साहेब चीफ कमिशनर (मुख्य कारभारी ) यांस असे वाटले की काही तरी पुण्यातील लोकांस विद्याधन द्यावे म्हणून त्यांनी सरकारांत असे लिहिले की "हिंदूच्या विद्येचे जे उपयोगी भाग आहेत चांगले वृद्धिंगत करण्याकरिता एक विद्यालय घालावे. त्यास पैसे दक्षिणेसाठी जे ५००,००० रुपये आहेत. त्यांपैकी वीस हजार रुपये निराळे काढून विद्या खात्याकडे द्यावे. "
हे मंजूर होऊन आल्यावर सन १८२१ म्हणजे शा. शके १७४३ येथे पाठशाळा स्थापिली. त्यात न्यायशास्त्र, वेद ऋग्वेद व यजुर्वेद, धर्म शास्त्र व्याकरण, वैद्य, अलंकार इत्यादि विषय शिकविण्याकरितां गुरु व उपगुरु नेमले.
शंभर विद्यार्थी जमवून शाळा वाडा विश्रामबाग येथे स्थापित केली. त्यावर मुक्तसर न्यायशास्त्राचे शाळेचे गुरु रा. राघवाचार्य यांस नेमले. व त्यांनी गुरुचे काम चालवून खेरीज सर्वांवर अधिकाराचें (मुक्तसरीचे) काम त्यांनीच करावे असे ठरविले.
पाठशाळेची देखरेख कमिशनर साहेबच काहीं दिवस पहात होते. पुढे काम कलेक्टर साहेबाकडे आले.तरी काम बरोबर चालेना म्हणून त्यावर एका निराळ्याच मनुष्याची योजना करावी, असे ठरवून सन १८३७ चे फेब्रुवारी महिन्यात मेजर कँडी साहेबाची योजना केली.
यावेळेपासून काम फार सुरळीत रीतीने चालले.
ह्या शाळेत गणपतीच्या उत्साहासही फार खर्च होत असे. कथा, चक्री (ब्राह्मणांचे म्हणणे), खेरीज रोषणाई सर्व मिळून दोनशे रुपये खर्च होता असे सांगतात. दिपवाळीत सर्व विद्यार्थ्यांस तेथे अभ्यंगस्नान, खेरीज फराळास करंज्या, लाडू, अनारसे, कोडबुळी इत्यादि मिळत असे.
असा पेशवाईथाट त्यावेळेस या पाठशाळेत चालला होता. काही विद्यार्थ्यास दरमाहा पगार मिळत असे.
या पाठशाळेवर ज्या (कॅंडी ) साहेबाची नेमणूक झाली होती त्यास वाड्यात येण्याची परवानगी नसे.
दरवाजाच्या बाहेरून एक रस्ता पुढले दिवाणखान्यात जातो त्या वाटेने त्याने येऊन त्या दरवाज्यावरील दिवाणखान्यात बसावे. कोणास साहेबाचा विटाळ झाला असता त्याने घरी जाऊन सचैल स्नान करून यावे.
असे सांगतात की एक वेळ साहेब वाड्यात गेला म्हणून उदकशांति केली.
याप्रमाणे पूर्वी या शाळेत सोवळ्याचे माहात्म्य होते.
पुढे साहेबास शिवल्याशिवाय अथवा वाड्यात येऊ दिल्याशिवाय गत्यंतर नाहीं असे पाहून वस्त्रांतर करू लागले. पुढे राजास विटाळ मुळीच नाही, साहेबाने वाड्यात यावे पण बैठकीवर मात्र येऊ नये असे शास्त्रार्थ काढले.
या वर सांगितलेल्या गोष्टी म्हणजे गणपतीचा उत्साह (उत्सव), दिपवाळीचा थाट, सोवळ्या ओवळ्याचा बेत इत्यादि गोष्टींवरून आताच्या सर्व लोकांस आश्चर्य वाटेल.
त्या वेळेस हे जे सरकाराने केले ते मोठे शहाणपणाचे काम होते. जर या वेळेस इंग्रज लोक शास्त्री पंडित यांच्या मताप्रमाणे न वागते तर त्यांस सुधारायास फार दुःखे सोसावी लागती. त्याअर्थी त्यांनी या गोष्टी या वेळेस सहन केल्या म्हणून आता आपण आनंदाचीं फळे खाऊन सुख भोगीत आहो.
या वेळेस दयाळू कॅंडी साहेबांस किती बरे दुःखे सोसावी लागली असतील व किती सहनशिलता धरावी लागली असेल.
शास्त्र्यांनी सांगितले की आपण बूट घालून आमचे जाजमावर येऊ नये, वाड्यात नाष्टा करू नये, तर त्यानी त्यांचे ऐकावे.
आता जे विद्येचे सुख पुण्यातील लोक भोगितात त्यांचे मूळ हे साहेबच आहेत. त्यांनीच लोकांस गुलवून गुलवून त्यांची वेडीं मते इतकी फिरविली की, जे शास्त्री कॅंडी साहेबास शिवले असता स्नान करीत, त्यांचेच वंशजांस त्यांच्या डोक्यांतील वेडी मते काढून महारास शास्त्रे शिकविण्यास लाविले.
एतदर्थ ब्राह्मणांनी व विशेषेकरून अन्य जातीच्या लोकांनी ह्या दयाळू प्रामाणिक साहेबाचे उपकार कधीही विसरू नयेत.
येवढंच नव्हे, तर त्यांची स्मारक मूर्त्ति करून पुण्यात प्रसिद्ध स्थली उभी करावी.‘’
संस्कृत कॉलेजात यावेळी निर्माण झालेल्या वादळाविषयी धनंजय कीर यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या चरित्रात पुढील शब्दांत लिहिले आहे :
`` चॅप्लिन नावाच्या इंग्रज आयुक्ताने स्थापन केलेल्या पुणे संस्कृत पाठशाळेत फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश मिळे. इतर जातींच्या हिंदूंना तीत प्रवेश नसे. ती पाठशाळा निरुपयोगी आहे असे १८३८ साली ठरले.
बराच विचारविनिमय करून आणि ब्राह्मणांची संमती घेऊन, पुढे १८५१ साली तिचे रूपांतर पुणे महाविद्यालयात करून, ते महाविद्यालय सर्व हिंदूंना खुले करण्यात आले. त्यामुळे पुणे शहरातील ब्राह्मणांचा संताप अनावर झाला.
त्याविषयी लिहिताना ``ज्ञानोदयाने असे म्हटले आहे की, ``ब्राह्मण भूदेव हे शिक्षणाचे दरवाजे सर्वांना सारखे उघडे झाले आहेत असे पाहून अत्यंत नाखूष झाले आहेत’’.
पुण्यातील ब्राह्मण पंडित भीतीने आणि रागाने थरथरत होते. त्यांनी सरकारच्या या धोरणाला कसून विरोध करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला.
ब्राह्मण शिक्षकांनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकविण्यास नकार दिला; कारण त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता. ती पडली देवभाषा, पवित्र वेदाची. ती अब्राह्मणांच्या जिव्हांनी विटाळविण्यास त्यांचा विरोध होता.
सनातनी हिंदूंनी पुणे महाविद्यालयाच्या चालकांस धमकी दिल्यावर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांनी त्या प्रकरणासंबंधी विचार करण्यासाठी ब्राह्मण पंडितांना काही दिवस सवड दिली. त्यामुळे सोनार, प्रभू, आणि इतर ब्राह्मणेतर जातींतील विद्यार्थी ह्यांना ते स्वतःच संस्कृत शिकवू लागले.
ब्राह्मण पंडित मात्र ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिकवीत असत. बहुतेक ब्राह्मण पंडितांनी ``;ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत ही पवित्र भाषा शिकविण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ,’’ अशी सरकारला धमकी दिली.
त्यावर ``ज्ञानोदया’ने असे लिहिले की, या प्रश्नाचा निर्णय भारतातील भागांत केव्हाच होऊन गेला आहे. कलकत्ता महाविद्यालयात सर्व जातींच्या मुलांना प्रवेश मिळतो, असे सांगून ज्ञानोदयाने पुढे म्हटले की, ब्राह्मणांनी अशा विचित्र कल्पनेत रममाण होण्याचे दिवस आता गेले आहेत. सार्वजनिक पैशातून आपली स्वतंत्र शिक्षणव्यवस्था व्हावी, आपणच देवाचे मोठे लाडके आहोत, नव्हे भूदेव आहोत असे म्हणणे, अशा कल्पनेत त्यांनी दंग होण्याचे दिवस आता राहिले नाहीत.
जर त्यांनी स्वत:च्या खर्चाने अशा शाळा चालविल्या तर आपल्या इच्छेप्रमाणे आणि भावनेप्रमाणे वागण्यास अर्थातच ते मोकळे आहेत. परंतु सरकारने या पोकळ मानापमानाच्या कल्पनेचे लाड करण्यासाठी आपल्या उत्पन्नातून पैसे खर्च करावे हे अयोग्य आहे. सार्वजनिक संस्था या सर्व वर्गाना खुल्या असल्याच पाहिजेत. ’’
धनंजय कीर पुढे लिहितात: ``ब्राह्मणांच्या ह्या स्वार्थपरायण अन् असहिष्णू वृत्तीचा धिक्कार करून, मुंबईतील 'प्रभाकर' साप्ताहिकाने असे म्हटले की, 'पुण्यातील ब्राह्मण पंडितांचे हे वर्तन अयोग्य आणि मूर्खपणाचे आहे. मुंबईत शेकडो ब्राह्मण पंडित प्रभूच्या, सोनारांच्या आणि तसेच युरोपियनांच्या घरी संस्कृत शिकवितात व वेदपठणही करतात,
पुण्यातील ब्राह्मण पंडितांनी ऋग्वेदाची प्रत सुधारून देऊन ती इंग्लंडमध्ये छापण्याकरिता सरकारकडे पाठविली याची आठवण 'प्रभाकर' साप्ताहिकाने ब्राह्मणांना करून दिली.
शेवटी 'प्रभाकर'ने पुण्यातील ब्राह्मण पंडितांना असा इशारा दिला की, 'त्यांच्या जागा दुसऱ्या विद्वान पंडितांकडून भरल्या जातील आणि ते कमी पगारावर काम करण्यास तयार आहेत.''
या घडामोडींबाबत धनंजय कीर यांनी यावर शेवटी पुढील शब्दांत टिपण्णी केली आहे:
``गंमत कशी आहे पाहा. याच सनातनी ब्राह्मण पंडितांनी गोमांस खाणाऱ्या मेजर थॉमस कँडींच्या हाताखाली संस्कृत शिकविण्यासाठी नोकरी धरली.
परंतु आपल्या धर्मबंधूंना संस्कृत शिकविले, तर धर्मच बुडेल अशी त्यांची समजूत होती.
त्यांच्या अडाणी समजुतीमुळे मेजर कँडींदेखील जेरीस आले. मेजर कँडीं हे परम दयाळू आणि अत्यंत शांत वृत्तीचे अधिकारी होते. परंतु त्याचा अर्थ ते मूर्ख किंवा अर्धवट आहेत, असा हे शहाणे करीत असत.’’
Camil Parkhe





                                                       मेजर थॉमस कँडी


पुण्यातील विश्रामबागवाड्यातल्या संस्कृत कॉलेजचे प्राचार्य आणि मराठी भाषातज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांचे जोतिबा फुले यांच्याशी अत्यंत जवळकीचे संबंध होते.

असे आपुलकीचे संबंध असणे साहजिकच होते.
याचे कारण म्हणजे मेजर कँडी हे मराठी भाषेसाठी महत्त्वाचे योगदान करणारी व्यक्ती तसेच पुण्यातील विश्रामबागवाडा येथील संस्कृत कॉलेजचे (आताचे डेक्कन कॉलेज) प्रमुख तर दलित आणि मुलींसाठी शाळा सुरु करणारे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे पहिलेच एतद्देशीय दाम्पत्य.
त्यामुळेच स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी असणाऱ्या या कर्तृत्ववान दाम्पत्याला कँडी साहेबांनी वेळोवेळी मदत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले होते.
त्याकाळच्या विविध मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांनी याबाबत लिहिले आहे.
थॉमस कँडी यांचा जन्म इंग्लंडमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी झाला. ईस्ट इंडिया कंपनीत दुभाषा पदावर त्यांची नेमणूक होऊन १८२२ साली ते भारतात आले आणि नंतर अनेक पदांवर त्यांनी काम केले.
सुरुवातीला प्रकृतीच्या कारणास्तव अल्पसा काळ ते मायदेशी परतले होते, त्यानंतर त्यांनी आयुष्यभर भारतातच कार्य केले आणि मराठी भाषेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले.
थॉमस कँडी यांनी तयार केलेला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे नियम यामुळे त्यांचे योगदान विशेष मोलाचे ठरते.
मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची परिभाषा' हे मराठी भाषेतील हे शुद्धलेखनावरील १६ पानांचे पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून कँडी यांचे १५० स्मृतीवर्ष सुरु होत आहे.
इतिहास संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांनी थॉमस कँडी यांच्याबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे :
``कँडींचा इंग्रजी-मराठी कोशही उपयुक्त आहेच; परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता व एकरूपता आणून दिली ही त्यांची मोठीच कामगिरी होय.
(दर्पण'कार बाळशास्त्री ) जांभेकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारख्यांच्याही मराठी लिखाणांतील चुका दाखवून त्यांना कँडीने एकेकाळीं सळो की पळो करून सोडले होते. स्वतः त्यांचे पंडित परशुरामतात्या गोडबोले यांच्या 'मृच्छकटिक' व 'कादंबरीसार' या ग्रंथांतील मराठीचे दोष त्यांनी काढले आहेत.’’
'बालबोध' मासिकाचे संपादक सुप्रसिद्ध मराठी लेखक विनायक कोंडदेव ओक हे 'विविध-ज्ञानविस्तारांत' लिहितात, "मी प्रांजलपणे आणि मोठ्या कृतज्ञभावाने कबूल करतो कि मला मराठी लिहिण्यास मेजर कँडीसाहेबांनी शिकविले, वास्तविक पाहिले असता, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधीच झाले नाही. परंतु त्यांचे जे अभिप्राय लेख पाहण्यास शाळाखात्याच्या अधिकाऱ्यांनी मजकडे पाठविले, त्यावरून पुष्कळ चांगल्या चांगल्या सूचना मला मिळाल्या, आणि माझ्या चुका कळल्या."
सरकारी आश्रय मिळविण्याकरिता कँडींची खुषामत म्हणून ओकांनी हा मजकूर लिहिला नसून कँडीच्या निधनानंतर कित्येक वर्षानी हा ऋणनिर्देश केला आहे, हे अवश्य लक्षात ठेविले पाहिजे,'' असे स्पष्ट करून प्रियोळकर पुढे लिहितात कि विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या चरित्रात त्यांचे बंधु लक्ष्मणराव यांनी कँडींचा एके ठिकाणीं "महाराष्ट्रभाषागुरु" असा निर्देश केला आहे.
``स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी म्हणून जोतीबांचे नाव आता सर्व महाराष्ट्रात गर्जू लागले. पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी, शिक्षा मंडळीचे अध्यक्ष सर थॉमस अर्स्कीन पेरी, आयुक्त रीव्हज आणि त्यांचे हैद्राबादचे स्नेही कर्नल मेडोज टेलर हे प्रतिष्ठित अधिकारी जोतीबांचे मोठे चाहते होते,'' असे महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.
जोतिबांनी शाळा सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांची हळूहळू संख्या वाढू लागली. फुले यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी थॉमस कँडी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके पुरवत असत असे कीर यांनी दिनांक २८ नोव्हेंबर १८५१च्या `द बॉंबे गार्डीयन'चा हवाला देऊन म्हटले आहे.
२९ मे १८५२ च्या अंकात 'पूना ऑब्झर्व्हर' वृत्तपत्र म्हणते, 'आपल्या देशाची प्रगती व्हावी असे ज्यांना वाटते त्यांना, एका दानशूर वृत्तीच्या मानी गृहस्थाने पदरमोड करून पुण्याच्या वेताळ पेठेत महारमांग आणि कुणबी यांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी शाळा घातली आहे हे ऐकून समाधान वाटेल. या शाळेत मुलांची संख्या बरीच आहे आणि शाळेत ज्या सोयी करण्यात आल्या आहेत, त्या पाहता आम्ही अशी आशा करतो की, या शाळेच्या संस्थापनेमुळे त्या जातींना बराच लाभ होईल. आम्हाला असे कळते की, या मुलींच्या शाळा चालविणाऱ्या कार्यकारी मंडळाने शिक्षा मंडळीकडे ह्या शाळा चालविण्यात मासिक साह्य मिळावे म्हणून अर्ज केला आहे. आम्हांला असा विश्वास वाटतो की, मेजर कँडी आणि दक्षिणा पारितोषिक समिती आपल्या निधीतून या शाळांच्या साह्यासाठी वार्षिक अनुदान देण्याचा विचार करीत आहेत."
``मेजर कँडी यांनी जोतीबांच्या संस्थेला सरकारने अनुदान द्यावे अशी शिफारस केली. सरकारने दक्षिणा पारितोषिक समितीकडून त्या संस्थेला दर महिना ७५ रुपयांचे अनुदान संमत केले. मेजर कँडी यांना त्या संस्थेच्या हिशेबावर लक्ष ठेवण्याचा अधिकार दिला आणि ठरावीक वेळी दक्षिणा पारितोषिक समितीला त्या शाळांच्या कार्याविषयी वृत्तांत पाठविण्यास आज्ञा केली.''
तर हे दक्षिणा पारितोषक प्रकरण काय असावे?
`दक्षिणा निधी' ही पेशवाईच्या काळापासून आलेली एक प्रथा होती. धनंजय कीर यांनी `महात्मा जोतीराव फुले' या चरित्रात लिहिले आहे:
``दक्षिणा म्हणजे ब्राह्मणांना पारितोषिक किंवा दान देणे होय. दक्षिणा वाटली म्हणजे पुण्य मिळते अशी समजूत होती. धार्मिक कार्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानण्यात येई. पेशव्यांची सत्ता संपुष्टात आल्यावर, दक्षिणा देण्याची ही पद्धत, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रजेपैकी वजनदार अशा ब्राह्मणवर्गाला अंशतः खूष करण्यासाठी आणि अंशतः विद्वान ब्राह्मणांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने चालू ठेवली होती. रावबाजी (रघुनाथराव पेशवे) प्रतिवर्षी लाखो रुपये ब्राह्मणांच्या दक्षिणेवर खर्च करीत होता तरी एल्फिन्स्टनने ती रकम पन्नास हजार रुपयांपर्यंत खाली आणली होती.’’
मुंबई आणि पुण्यात कार्यरत असलेल्या स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे :
``पेशवाईच्या काळात दरवर्षी पाच लाख रुपये ब्राह्मण जातीच्या लोकांना दक्षिणा म्हणून वाटले जायचे. ब्रिटिश सरकारने ब्राह्मणांसाठी दक्षिणा चालू ठेवली तरी ही रक्कम कमी केली आणि या रकमेतील एक चतुर्शाश भाग संस्कृत कॉलेजसाठी राखून ठेवला. त्यावेळी १२० ब्राह्मण विद्वानांना ही रक्कम वाटली जाई, प्रत्येक ब्राह्मणास दरमहा पाच रुपये दक्षिणा मिळे. ही प्रथा १८३६पर्यंत चालू होती. ‘’
ब्राह्मण समाजाला देण्यात येणाऱ्या या दक्षिणा प्रथेचे मूळ आणि उत्तर पेशवाईत पुण्यात कशा प्रकारे दक्षिणा दिली जात असे याचे विस्तृत रंजक वर्णन इतिहास संशोधक आणि पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या ``पुण्याचे पेशवे' (राजहंस प्रकाशन ) या पुस्तकात केले आहे.
कुलकर्णी यांनी दक्षिण फंडाबाबत पुढील शब्दांत लिहिले आहे :
``पुण्यातील ब्राह्मणांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे दक्षणा, श्रावण मासातील दक्षणा हे पुण्याचे मुख्य आकर्षण असल्याने भारताच्या उत्तर-दक्षिण भागांतून, काशीपासून रामेश्वरापर्यंत पुराणिक, वैद्विक, शास्त्री पंडित, भट-भिक्षुक इत्यादीची प्रचंड गर्दी या महिन्यात पुण्यात उडत असे.
ब्राह्मणांना त्यांच्या ज्ञानाच्या तयारीची परीक्षा घेऊन वर्षासन, बक्षीस देण्याची पद्धत शिवकालातही प्रचलित होती. परंतु मध्यंतरीच्या काळात ही बंद पडली असावी. पहिल्या बाजीरावाने या प्रथेचे १७३१ च्या सुमारास पुनरुज्जीवन केले. प्रथम दक्षणा वाटप शनवारवाड्यात होत असे. नंतर बाजीरावाने बांधलेल्या कबुतरखान्यात हे काम चाले. पण पुढे ब्राह्मणांची संख्या वाढल्याने कबुतरखान्याची जागादेखील अपुरी पडू लागली. नंतर हुजुरपागा, रमणबाग या निरनिराळ्या ठिकाणी हे काम सुरू झाले. पण त्या जागाही अपुऱ्या पडल्याने नानासाहेबाने पर्वतीच्या पायथ्याजवळच्या मोकळ्या जागेत दक्षिणावाटप सुरू केले. थोरल्या माधवरावाने १७६५ च्या सुमारास दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक चौबंद पाच फूट उंचीची दगडी तटबंदी चार दरवाजे असलेली एक भक्कम वास्तू उभी केली. त्याचे नाव पर्वतीचा रमणा असे पडले.
बाजीरावाने सुरू केलेल्या आणि नानासाहेब पेशव्याने आकार दिलेल्या 'दक्षणावाटपाला' सवाई माधवराव आणि विशेषतः रावबाजीच्या काळात उधाण आले होते. दक्षणावाटपाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. खुद्द पेशवे यात सहभागी होत असल्याने कारभारी, सरदार, शास्त्रीपंडित यांना भाग घ्यावा लागे. १७७५ साली दक्षिणेसाठी सव्वा लाख रुपये वाटावयाचे ठरले होते. ''
लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी १८४९ च्या जून महिन्यात ही दक्षिणा देण्याची पद्धत बंद करावी, अशी ईस्ट इंडिया कंपनी सरकारला सूचना केली.
``ज्याचा अर्थ कळत नाही ते वाड्मय ब्राह्मणांनी घोकण्यात काही अर्थ नाही,’’ असे लोकहितवादींचे मत होते असे धनंजय कीर यांनी `महात्मा फुले: शैक्षणिक तत्वज्ञान आणि कार्य' या लेखात लिहिले आहे.
कंपनी सरकारने शेवटी निर्णय घेतला कि जे कोणी मराठी भाषेमध्ये उत्तम निबंध लिहितील किंवा इंग्रजी भाषेतील, संस्कृत भाषेतील अथवा दुसऱ्या कोणत्याही परकीय भाषेतील उपयुक्त पुस्तकांचे मराठीत भाषांतर करतील त्यांना दक्षिणा वाटण्यात येईल.
``मराठी भाषेचे कैवारी व संस्कृत भाषेचे अभिमानी यांच्यामधील लढ्याचा असा हा कल्याणकारक शेवट झाला’’ अशा शब्दांत कीर यांनी या वादाच्या समाप्तीचे वर्णन केले आहे.
नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात `दक्षिणा प्राईझ कमिटी'बाबत खालील माहिती दिली आहे :
``पूर्वी पुण्यात पेशवे सरकार दरवर्षी सर्व ब्राह्मणांस दक्षिणा वाटीत असे. ती इंग्रज सरकाराने बंद करून माधवराव पेशव्यांच्या चालीप्रमाणे केवळ विद्वान ब्राह्मणास मात्र द्रव्य देण्याचा शिरस्ता ठेविला.
नंतर विद्येची वृद्धि व्हावी म्हणून त्या द्रव्यांतून रुपये शिलक पाडून पुण्यातील संस्कृत पाठशाळा चालू केली आणि बाकीच्या रुपायांत दक्षिणा चालविली. पुढे कित्येक सुधारलेल्या विद्वान व वजनदार एतद्देशीय गृहस्थांच्या उद्योगावरून व सूचनेवरून सरकाराने असा ठराव केला की पूर्वी घेत आलेले विद्वान ब्राह्मणांशिवाय नव्या विद्वानांस दक्षिणा द्यायाची नाही, तर जुने मेल्यावर त्यांच्या द्रव्याची जी शिलक राहील ती ग्रंथ करण्याच्या कामाकडे लावावी.
असा ठराव होण्यास कारण (लोकहितवादी) राव बहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची खटपट मुख्य होती. त्यांनी त्यावेळी मराठी व इंग्लिश वर्तमानपत्रांतून याविषयीं वारंवार लिहून लोकांचे व सरकारचे डोळे उघडले; व कित्येक सुधरलेल्या गृहस्थांच्या सह्या घेऊन सरकारास एक अर्जीही दिली.
यामुळे पुण्यातील ब्राह्मणांनी त्यावर ग्रामण्य केले, तथापि त्या गृहस्थानी ह्या कामाचा पिच्छा सोडला नाही.
शेवटी सरकारतर्फे त्यांच्या व सर्व विचारी लोकांच्या मनाप्रमाणे ठराव झाला.
ह्या ठरावाबरहुकूम सन १८५१ साली दक्षिणा प्राईझ कमिटीची स्थापना झाली. तिने आजपर्यंत काही पुस्तके त्यांच्या कर्त्यांस बक्षीसे देऊन स्वतः छापविली काहीकास नुसते बक्षीस देऊन छापण्याचे उत्तेजन दिले. ''
कंपनी सरकारने जोतिबांच्या शाळेला दक्षिणा प्राईझ समितीतफे दिलेल्या निधीबाबत आणि त्यांच्या कार्याबाबत केलेल्या सत्काराविषयी धनंजय कीर यांनी विविध नियतकालिकांत आलेले वृत्तांत `महात्मा जोतिबा फुले' चरित्रात दिले आहेत.
'पूना ऑब्झर्व्हर' या इंग्रजी पत्राने २१ ऑगस्ट १८५२ च्या अंकात असे म्हटले की, 'जोती गोविंद फुले यांनी वेताळ पेठेत दोन शाळा काढल्या आहेत. महारमांगधेडचांभार यांच्या मुलींसाठी एक व दुसरी त्याच जातींच्या मुलांसाठी. या दोन्ही शाळांत जोती स्वतःच शिकवितात आणि त्या शाळांची व्यवस्था करतात. ब्राह्मण शिक्षक त्यांना साह्य करीत आहेत. या शाळांचा खर्च जोती स्वतः पदरमोड करून करतात. शिवाय युरोपियन व सुसंस्कृत देशी लोक वर्गणी पाठवितात. या शाळांना महिन्याला २५ रुपयांचे साह्य दक्षिणा पारितोषिक समितीकडून देण्यात येते.'
ह्या अनुदानासंबंधी लिहिताना 'ज्ञानप्रकाश'ने असे म्हटले की, 'शाळेला दक्षिणा पारितोषिक समितीकडून मिळालेली मासिक देणगी पाहून काही लोक कुजबुजू लागले आहेत, तर बहुसंख्य लोकांना ह्या व्यवस्थेमुळे अत्यंत आनंद झाला आहे.
'ज्ञानोदया'ने म्हटले की, 'तथापि ह्या निधीच्या मूळ उद्देशाला लक्षात घेता त्याचा विनियोग ह्याहून अधिक चांगल्या रितीने करता आला नसता. ब्राह्मणांसाठी ठेवलेला पैसा मुलींच्या शिक्षणाकरिता खर्च करावा अशी दुःखकारक परिस्थिती निर्माण व्हावी याविषयी काही सनातनी वृत्तीच्या हिंदूंना दुःख झाले!'
सरकारी शिक्षा मंडळीने जोतीबांच्या कार्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते आणि त्यांनीच. जोतीबांचा असा बहुमान करावा असे सरकारला सुचविले होते. सरकारने ती सूचना आनंदाने मान्य केली. त्याप्रमाणे सरकारने १९३ रुपयांच्या वेग शाली' विकत घेतल्या, आणि आपला प्रतिनिधी म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांना, ती महावस्त्रे समारंभपूर्वक अर्पण करण्याची आज्ञा केली.
जोतीबांच्या गौरवार्थ विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ रोजी सरकारने देशी सरदार आणि प्रमुख लोक यांची एक सभा बोलाविली होती.
समारंभाच्या प्रारंभी मेजर कँडी यांनी सरकारी शिक्षा मंडळीचे निवेदन सभेपुढे वाचून दाखविले आणि नंतर सभेचा उद्देश मराठीत कथन केला.
भाषणाच्या शेवटी त्यांनी सरकारच्या वतीने जोतीबांना एक शालजोडी सन्मानपूर्वक अर्पण केली. असा हा सत्कार्याचा त्या सुदिनी सत्कार झाला. ''
'बॉम्बे गार्डियन' ने आपल्या वृत्तांताच्या शेवटी असे म्हटले आहे की, "जुन्या पिढीतील काही ब्राह्मणांनी जोतीबांसारख्या शूद्राला सरकारने शालजोडी अर्पण केली याविषयी नापसंती दर्शविली. कारण जोतीबा पडले जातीने माळी. व्यवसायाने मात्र ते त्यावेळी माळी नव्हते.
ब्राह्मणांच्या मते त्यांना सरकारने महावस्त्र देऊन सन्मान करण्यापेक्षा त्यांना पैशाच्या रूपाने पारितोषिक देऊन त्यांची बोळवण करावयास हवी होती.
'ज्ञानप्रकाश' आपल्या २२ नोव्हेंबर १८५२ च्या अंकात म्हणतो, "तारीख १६ माहे मजकुरी पाठशाळेत मोठा समारंभ होऊन मेजर कँडी यांनी सरकार बोर्ड ऑफ एज्युकेशन यांच्या मार्फतीने राजश्री जोती गोविंद फुले माळी यांस एक शालजोडी बक्षीस दिली. पुण्यात ज्या हल्ली मुलींच्या शाळा आहेत त्यांची आरंभी स्थापना जोतीबा यांनी केली. याकरिता सरकारने या स्तुत्य कामाकरिता त्यांस हे बक्षीस दिले.''
Camil Parkhe