Did you like the article?

Tuesday, July 30, 2024

सेंट ॲन्स चर्च

 विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आणि प्रतिके सामान्य माणसांनासुद्धा ओळखता येतात.

पुणे कॅम्पात पुलगेट बस स्टँडच्याजवळ सोलापूर बझार येथले हे प्रार्थनास्थळ मात्र त्याला अपवाद असेल.
अगदी जवळ आल्यानंतरसुद्धा हे कोडे लवकर सुटत नाही, याचे कारण या वास्तूच्या प्रथमदर्शनी असणारे गोपुर शैलीचे बांधकाम.
त्याशिवाय समोरच्या खालच्या भागात असलेली नक्षीवजा कलाकुसर आणि गोपुराच्या केंद्रस्थानी असलेले कमळाच्या पाकळ्यांवर असलेले शिल्प या कोड्यात भर घालते.
वास्तूच्या कळसाच्या टोकाला असलेला छोटासा लाल रंगाचा क्रूस ही वास्तू म्हणजे एक ख्रिस्ती देऊळ आहे हे सांगत असतो.
पुण्यातील सोलापूर बझार येथील हे सेंट ॲन्स चर्च हे मात्र केवळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोपुर शैलीच्या वास्तुबाबतच प्रसिद्ध नाही.
या रोमन कॅथोलिक चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे दर रविवारी इंग्रजी भाषेशिवाय तामिळ भाषेतसुद्धा एक मिस्साविधी साजरा केला जातो.
पुणे आणि कोल्हापूर शहरांसह आणि चार महसूल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे डायोसिस म्हणजे पुणे धर्मप्रांतातील काही अगदी मोजक्या चर्चेसमध्ये तामिळ भाषेत प्रार्थनाविधी होत असतो.
आता या चर्चमधल्या गोपुर बांधकामशैलीविषयी.
पुण्यात पहिले चर्च बांधले गेले ते सवाई माधवराव पेशवे यांनी १७९२ साली दिलेल्या जमिनीवर. पेशव्याच्या सैन्यात असलेल्या पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील पोर्तुगीज अधिकारी आणि सैनिकांसाठी हे चर्च बांधले गेले तेव्हा साहजिकच ते युरोपियन बांधकाम शैलीत होते.
क्वार्टर गेटला सेंट ऑर्नेलाज स्कुलच्या आवारात असलेले हे अवर लेडी ऑफ इम्यॅक्युलेट कन्स्पेशन चर्च हे आज `सिटी चर्च' या छोट्याशा आणि सर्वांना कळेल अशा नावानेच ओळखले जाते.
मुंबई आणि वसई वगळता महाराष्ट्रातील हे सिटी चर्च सर्वात जुने चर्च.
त्यानंतर पुणे शहरात बांधली गेलेली सर्वच विविध रोमन कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चेस पाश्चात्य गॉथिक बांधकाम शैलीत आहेत.
स्वातंत्र्यानंतर सोलापूर बझार परिसरात नवे चर्च बांधताना मूळचे युरोपियन असलेल्या येशूसंघीय किंवा जेसुईट फादरांनी मात्र भारतीय बांधकाम शैलीचा वापर केला.
गोपुर शैलीतील हे सेंट ॲन्स चर्च नावाचे हे देऊळ अशाप्रकारे १९६२ साली उभे राहिले.
हे चर्च जर्मन फादर जॉन बाप्टिस्ट हॅश (मृत्यू १९८९) यांनी बांधले. या परिसरात त्यांनी तामिळ माध्यमाची प्राथमिक शाळासुद्धा सुरु केली होती.
फादर हॅश स्वतः उत्तम तामिळ बोलत. तामिळ शिकण्यासाठी ते चेन्नई येथे काही वर्षे राहिले होते. पुण्यातच त्यांचे निधन झाले आणि हडपसर येथे त्यांची कबर आहे.
स्थानिक वास्तुपरंपरेनुसार आणि प्रतिकांनुसार प्रार्थनास्थळांचे बांधकाम हा कॅथोलिक चर्चच्या सांस्कृतीकरण किंवा inculturation चा भाग असतो, त्यात विशेष असे काही नाही
सेंट ॲन ही येशू ख्रिस्ताची आजी, मदर मेरी किंवा मारीयाची आई.
या गोपुराच्या प्रथमदर्शनी भागाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी कमळाच्या पाकळ्यांवर काचेने आच्छादित असलेले एक शिल्प आहे.
सेंट ॲन आपल्या लहानग्या मुलीकडे - मदर मेरीकडे - प्रेमभावनेने पाहत आहे असे हे शिल्प आहे.
आता या चर्चमध्ये तामिळ भाषेत होणारा रविवारचा मिस्साविधी.
पुण्यातल्या या चर्चमध्ये तामिळ लोकांसाठी त्यांच्या तामिळ मातृभाषेत दर रविवारी सकाळी सात वाजता प्रार्थनाविधी होतो.
जगभरातील प्रत्येक चर्चच्या सदस्यांची एक आगळीवेगळी ओळख असते. सेंट ॲन्स चर्चसुद्धा त्याला अपवाद नाही.
या परिसरातील अनेक कॅथोलिक लोक मूळचे तामिळनाडू येथील आहेत. अशीच स्थिती खडकीच्या सेंट इग्नेशियस चर्च आणि इतर काही चर्चेसची आहे.
त्यामुळे येथे दर रविवारी तामिळ भाषेत प्रार्थना होते, त्यासाठी इतर चर्चमध्ये असणारे तामिळ भाषक धर्मगुरु खास बोलावले जातात. फादर रॉक अल्फान्सो हे सेंट ॲन्स चर्चचे धर्मगुरु आहेत.
ख्रिस्ती धर्मात चर्चमध्ये नेहेमीच सामुदायिक प्रार्थना होत असते, कॅथोलिक चर्चमध्ये या उपासनेला Holy Mass किवा मिस्साविधी (प्रभुभोजन) म्हणतात.
Missa हा मूळचा लॅटिन शब्द. रविवारच्या मिस्साविधीला चर्चच्या सर्व सदस्यांनी हजर राहावे अशी अपेक्षा असते. इस्लाम धर्मात जसे शुक्रवारच्या प्रार्थनेला महत्वाचे स्थान आहे तसेच
सेंट ॲन आणि सेंट जोकीम यांचा २६ जुलै रोजी असणारा सण आजीआजोबांचा - ग्रॅन्डपॅरेन्ट्स डे - म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी सोलापूर बझार इथले हे सेंट ॲन्स चर्च पुढील रविवारी, २८ जुलै रोजी, सेंट ॲनचा सण -फेस्त - साजरा करणार आहे.
पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रीग्स या सणाच्या मिस्साविधीचे मुख्य पुरोहित असतील.
Camil Parkhe, July 20, 2024

Thursday, July 11, 2024


निलेश लंके  महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला एक जायंट किलर

महाराष्ट्रातून लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या आणि निवडून आलेल्या लोकांच्या नावांकडे नजर फिरवली तर यापैकी बहुतेक जण प्रस्थापित आहेत हे सहज लक्षात येते.
बहुतेक उमेदवारांना कौटुंबिक राजकीय वारसा होता.
या नव्या ४८ खासदारांमध्ये केवळ एक जण जायंट किलर ठरला आहे.
हे नवे खासदार आहेत अहमदनगर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलेले निलेश लंके.
पारनेर येथील आमदार म्हणून याआधी निवडून आलेल्या लंके यांनी अहमदनगरचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे यांचा अत्यंत अटीतटीच्या लढाईत २९ हजार मतांनी पराभव केला आहे.
राज्यात मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या राधाकृष्ण विखे यांचे सुजय विखे हे चिरंजीव.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ आता आरक्षित असल्याने विखे याचे घराणे आपल्याच बालेकिल्ल्यात विस्थापित झाले आहे.
काँग्रेसचे नेते म्हणून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मुलाला अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2019 साली काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते.
ते शक्य होईना तेव्हा अखेरीस ते सरळसरळ भाजपात सामिल झाले होते आणि मग भाजपच्या तिकिटावर अहमदनगरमधून डॉ सुजय विखे निवडून आले होते.
यावेळीसुद्धा सुजय विखे यांचा विजयाचा मार्ग खूप सुकर होता, मात्र अचानक निलेश लंके यांची एन्ट्री झाली.
अजित पवार राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार असलेल्या लंके यांना पक्षाची उमेदवारी मिळेना तेव्हा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली.
डिट्टो विखे कुटुंब स्टाईलने.
इतिहासाची पुनरावृत्ती या मतदारसंघात झाली होती.
निलेश लंके यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही अशी सुजय विखे यांनी टीका केली होते आणि हे वाक्य या निवडणुकीच्या आखाड्यात खूप गाजले.
फाडफाड इंग्रजी बोलू शकणाऱ्या डॉ सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघाच्या शहरी भागांत मतांची मोठीं आघाडी मिळाली तर निलेश लंके यांना पारनेर, श्रीगोंदा, कर्जत अशा ग्रामीण भागांत मताधिक्य मिळाले.
लंके यांचा विजय आणि सुजय विखे यांचा पराभव हा राज्यातील भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे.
याआधी १९९२च्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत डॉ सुजय विखे यांच्या आजोबांचा - अपक्ष बाळासाहेब विखे यांचा- काँग्रेसचे यशवंत गडाख यांव्याकडून पराभव झाला होता.
जायंट किलर लंके यांनी आता इंग्रजीचे धडे गिरवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
Camil Parkhe.

Sunday, June 30, 2024

विरोधी पक्षनेता

 भारतात २०१४ सार्वत्रिक निवडणुकीत खूप दीर्घ कालावधीनंतर जनतेने एकाच पक्षाच्या हाती सत्ता दिली. लोकशाही व्यवस्थेत ही निश्चितच चांगली बाब.

टेलिव्हिजनचा जमाना तोपर्यंत रुढ झाला होता, लोकसभेच्या सभागृहात तेव्हा घडत असणारी ती घटना मी छोट्या स्क्रीनवर पाहत होतो ते दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे
नवे सभागृह अस्तित्वात येते त्यावेळी सर्वप्रथम निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी शपथ घेतात. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांना राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडून आधीच शपथ दिलेली असते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची आसनव्यवस्थासुद्धा निश्चित झालेली असते.
तर २०१४ साली संसदेच्या नवे सभागृह अस्तित्वात आले तेव्हा विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा प्रश्न आला.
तेव्हा कुठल्याही विरोधी पक्षांकडे राज्यघटनेने ठरवून दिलेली लोकसभा खासदारांची संख्या नसल्याने आता विरोधी पक्षनेता हे पद असणार नाही असा निवाडा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी दिला.
लोकशाही व्यवस्था आणि अधिकृत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता नाही, असे कधी शक्य तरी आहे का?
हो, तसे शक्य आहे कारण आपल्या राज्यघटनेत तशीच तरतूद आहे.
लोकसभेच्या सभासदांच्या संख्येच्या दहा टक्के सभासद असले तरच त्या पक्षाला अधिकृतपणे विरोधी पक्षाचा दर्जा मिळते आणि त्या पक्षाच्या नेत्याला अधिकृतपणे विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता आणि इतर सर्व हक्क आणि अधिकार मिळतात.
काँग्रेस पक्षाला किंवा इतर कुठल्याही पक्षाला लोकसभेत दहा टक्के म्हणजे ५५ जागा मिळू शकल्या नाही म्हणून कुठलाही पक्ष अधिकृतपणे विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळू शकला नाही.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षाच्या विरोधी आघाडीने दहा टक्क्यांहून अधिक जागा मिळवल्या असल्या तरी ते विचारात घेतले गेले नाही
स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशात पहिल्यांदाच.
असे घडत होते, असे नव्हते.
यापूर्वीही असे अनेकदा घडलेले आहे. विशेषतः देशात काँग्रेसला सगळीकडे जनाधार असायचा त्याकाळात.
विरोधी पक्षाचे महत्त्व, हक्क आणि अधिकार याबाबत देशातील लोक अधिक जागरुक झाले ते सत्तरच्या दशकातील आणीबाणी पर्वाच्या अनुभवानंतर.
मात्र त्यानंतर सुद्धा इथला विरोधी पक्षाचा आवाज पुर्णतः गायब होईल अशी कुणी कल्पना केली नव्हती. कारण आणीबाणीनंतर प्रत्येक वेळी मतदारांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला योग्य ते स्थान आणि जागा दाखविली होती.
देशात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताची म्हणजेच निरंकुश सत्ता येण्यासाठी मोठा कालावधी लागला. हे घडले २०१४ ला
पुढल्या २०१९ च्या निवडणुकीत असेच झाले.
तर २०१४ नंतर इथला लोकशाही कारभार तब्बल दहा वर्षे विरोधी पक्षाविना आणि विरोधी पक्षनेत्याशिवाय चालला.
देशातील जनतेचा हा कौल आहे, सत्ताधारी पक्ष किंवा लोकसभा सभापती याबाबत काहीच करु शकत नाही, असे त्यावेळी म्हटले गेले.
कधीकाळी कुणा राजकीय नेत्याने आपण देश काँग्रेसमुक्त करु असे वक्तव्य केले होते, दुसऱ्या एकाने आपला पक्ष देश विरोधी पक्षमुक्त करु असे म्हटले होते.
त्यामुळे देशात आता विरोधी पक्षच नाही, विरोधी पक्षनेता नाही, याबाबत अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
खरे पाहता काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आघाडीची एकत्रित संख्या मिळून एका पक्षाला विरोधी पक्ष म्हणून आणि पक्षनेता म्हणून मान्यता देणे फार मोठी अवघड बाब नव्हती.
त्यासाठी कायद्यात असलेल्या दहा टक्क्याची अट बदलता येणे सुद्धा सहजशक्य होते.
राज्यघटनाकारांनी या दहा टक्क्याची अट ठेवली तेव्हा या संख्येपर्यंत कुठलाही राजकीय पक्ष मजल गाठू शकणार नाही असा त्यांनी विचारही केलेला नसणार.
काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या 'सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाने मला थायलंड येथे एका आंतरराष्ट्रीय औद्योगिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवले होते. माझ्यासह भारतातले सहा आणि जगातून सत्तरच्या आसपास पत्रकार या परिषदेला हजर होते.
त्यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांतील पत्रकारांशी मला संवाद साधता आला, अनेकांशी मैत्रीही झाली.
एकदा असेच बसमधून प्रवास करताना आम्ही एका चीनमधील एका तरुण पत्रकाराशी बोलत होतो. संभाषण अचानक लोकशाही व्यवस्थेकडे वळले.
"तुमच्या चीनमध्ये लोकशाही पद्धत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?" असे एकाने म्हटले.
"लोकशाही? लोकशाही म्हणजे काय?
I have not experienced what is democracy. And so I don't know what you are talking about!" असे त्या विशीतल्या पत्रकाराने म्हटले होते!
यावर लोकशाही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष वगैरे मुद्दे चर्चेत आले अन् बसप्रवास संपला त्यामुळे आमचे संभाषणसुद्धा थांबले.
त्यानंतर त्या तरुण चिनी पत्रकाराशी पुन्हा बोलण्याची मला संधी मिळाली नाही.
तर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना सभागृहात आणि बाहेर जाब विचारु शकतो, विरोधी मत मांडू शकतो. विरोधी पक्षनेता हे पद केवळ आणि केवळ अस्सल लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशातच असू शकते.
चीनमध्ये, रशियात किंवा इतर तथाकथित लोकशाही असणाऱ्या देशांत तसेच लष्करशाही, राजेशाही किंवा उघडउघड हुकूमशाही असणाऱ्या देशांत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता असूच शकत नाही.
यापैकी काही देशांत विरोध करणाऱ्या नेत्यांची जागा तुरुंगात किंवा अंधारकोठडीत असते. त्यांची सरळसरळ हत्याही होत असते हे आपण वृत्तपत्रांत वाचत असतो.
खोटेनाटे आरोप करुन या विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबले जाते, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असलेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांना तर तडकाफडकी फाशीही दिले जाते.
त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता असणे आणि महत्त्वाचे म्हणजे हे पद सन्मानाचे असणे सुद्धा महत्त्वाचे असते.
एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातली पिंपरी चिंचवड महापालिका मी बातमीदार म्हणून कव्हर करत होती. आम्ही काही बातमीदार मंडळी कुठल्याशा कारणाने श्रीरंग बारणे यांना भेटायला त्यांच्या कक्षात गेलो. बारणे त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेता होते
बारणे मूळचे काँग्रेसचे नगरसेवक, नंतर शिवसेनेत जाऊन दोनदा नगरसेवक झाले. शिवसेनेने त्याकाळात महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या, त्यामुळे बारणे यांना विरोधी पक्षनेता हे पद मिळाले होते.
तर विरोधी पक्षनेता म्हणून बारणे यांना खूप मोठे कशा आणि दालन मिळाले होते, महापालिकेच्या सभागृहात आणि कामकाजात त्यांचा दबदबा होता.
विरोधी पक्षनेता पद किती महत्त्वाचे आणि आवश्यक असते याची जाणीव यावेळी पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली होती. (श्रीरंग बारणे यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत).
हिच परिस्थिती लोकशाही व्यवस्थेत राज्यपातळीवर आणि देशपातळीवर असणे आवश्यक असते. विविध देशांतील प्रमुख आणि राजकीय नेते दुसऱ्या देशांच्या भेटीवर येतात तेव्हा सत्ताधारी नेत्यांना भेटून झाल्यावर ते विरोधी पक्षनेत्यांना भेटण्याचा संकेत जरुर पाळत असतात.
सुदृढ लोकशाहीतली ही एक चांगली परंपरा आहे, कारण आजचा विरोधी पक्ष विरोधी पक्षनेता आगामी काळातला सत्ताधारी असू शकते, ही त्यामागची जाणिव असते.
आपल्या देशात इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, राजीव गांधी, पी व्ही. नरसिंह राव, सुषमा स्वराज, शरद पवार, सोनिया गांधी यांना विरोधी पक्षनेता हे पद सन्मानाने देण्यात आले होते.
महाराष्ट्रात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विरोधी पक्षनेता या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. यात अतिशयोक्ती मुळीच नाही.
दहा वर्षांच्या काळानंतर भारतात पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता या पदावर एका व्यक्तीची सन्मानपूर्वक नेमणूक होत आहे, ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे.
Camil Parkhe,

Wednesday, May 8, 2024

 


इम्तियाझ जलील सईद
ही तशी अगदी अलीकडची बाब, म्हणजे आता मध्यम वयातील लोकांना नक्की माहित असणार.
नगरपालिका आणि महापालिका निवडणुका पार पडल्या, निकाल जाहीर झाले की पुढील काही दिवस आम्ही पत्रकार मंडळी प्रस्थापित लोकांच्या बातम्या छापायचो त्याचप्रमाणे काही एखाद्या एकदम सामान्य व्यक्ती निवडून येत असत, त्यांच्याही बातम्या करत असू.
प्रत्येक गावागावांत आणि शहराशहरांत असे काही धक्कादायक निवडणूक निकाल असायचेच.
एखाद दुसरा/दुसरी जायंट किलर म्हणून नाव कमवायचे.
तिसेक वर्षांपूर्वी गावांत आणि शहरांत एखाद्या प्रमुख ठिकाणी पानटपरी असलेल्या व्यक्तीचे तिथल्या स्थानिक लोकांशी प्रचंड जनसंपर्क असायचा.
तीच गोष्ट चौकात दुचाकींचे पंक्चर काढणाऱ्या, गॅरेज असणाऱ्या व्यक्तींचे असायचे.
यापैकी कुणी एकाने लोकाग्रहास्तव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज भरला तर तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी आणि त्यामुळे अटीतटीच्या या निवडणुकीत अशा सामान्य लोकांना आजूबाजूचे लोक मत द्यायचे आणि हे अतिसामान्य लोक चक्क निवडूनसुध्दा यायचे.
राज्यात आणि देशात असे जायंट किलर्स आजही परिचित आहेत.
मुंबईत स. का. पाटील यांना १९६७च्या लोक सभा निवडणुकीत हरवणारे समाजवादी, कामगार नेते जॉर्जे फर्नांडिस.
रायबरेलीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १९७७ साली हरवणारे राज नारायण.
आमच्या शहरात महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी असेच एक नाव गाजले. मारुती भापकर.
अण्णा हजारे, अरविंद हजारे, किरण बेदी प्रभुतींनी नवी दिल्लीत २०१४ सालापूर्वी लोक आंदोलन चालवले तेव्हा लोकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
सामान्य लोकांचे खरेखुरे नेते पुढील निवडणुकीत निवडून येऊ शकतील असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते.
याच भावनेतून मुंबईत मेधा पाटकर यांनी २०१४ लोकसभेची निवडणूक लढवली,
पुण्यात सुभाष वारे आणि मावळ मतदारसंघात मारुती भापकर यांनी निवडणूक लढवली.
या तिन्हीपैकी कुणीही करोडपती नव्हते.
मात्र हे तिघेही पराभूत झाले होते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवणारे आणि जिंकणारे बहुतेक जणांनी पोटापाण्यासाठी कधीही नोकरी केलेली नसते, तशी गरज त्यांना कधी भासलेली नसते.
त्यामुळे पत्रकार म्हणून पुण्यात आणि इतरत्र नोकरी केलेल्या इम्तियाझ जलील सईद यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून २०१९ला अत्यंत अटीतटीच्या चौरंगी लढ्यात चार हजारांच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला तेव्हा ती राष्ट्रीय पातळीवरची बातमी बनली होती.
यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत असे जायंट किलर्स कुणी असू शकतील काय?
Camil Parkhe,

 

पंडित भीमसेन जोशी

पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेसला मी रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. साल होते १९९०.
गोव्यात पणजीला हायर सेकंडरी, पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिथेच `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात पत्रकारीतेला सुरुवात केली होती. या दीर्घ कालावधीत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक घडामोडींशी फारसा संबंध राहिला नव्हता.
पुण्यात तर कधी राहिलोही नव्हतो. या शहरात बातमीदारी करताना हळूहळू येथील लोकजीवनाची आणि विविध क्षेत्रांतली प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख होत होती.
गोव्याच्या तुलनेत विविध क्षेत्रांत आपापला दबदबा राखून असलेली अशी दिग्गज मंडळी येथे खूप मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे नरुभाऊ लिमये, पु ल देशपांडे, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरूप, शकुंतला परांजपे, विद्या बाळ ही त्यापैकी काही ठळक नावे.
त्या एका रविवारच्या संद्याकाळी आम्हा बातमीदाराच्या दैनंदिन डायरीत माझ्या नावावर एक कार्यक्रम लिहिला होता.
पुण्यातल्या आमच्या `इंडियन एक्सप्रेस'मध्ये त्यावेळी मुख्य वार्ताहर नव्हता. आताचे आम्ही सर्व बातमीदार लोक विशीतले होतो, नरेंद्र करुणाकरन, शुभा गडकरी, संगीता जहागिरदार-जैन, अवर्तिन्हो मिरांडा, विश्वनाथ हिरेमठ, माधव गोखले आणि मी स्वतः.
प्रकाश कर्दळे `मास्तर' हे निवासी संपादक होते आणि बातमीदारांची कामकाजाची दैनंदिन डायरी आम्हापैकी एक बातमीदार लिहित असे.
तर शहरातील कन्नड संघ या संस्थेने भरत नाट्य मंडळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंडित भीमसेन जोशी होते.
बातमीच्या दृष्टीने भाकड असलेल्या रविवारी शहर आवृत्ती असलेल्या दैनिकांची स्थानिक पाने भरण्यासाठी बातम्या आणि फोटो कमी पडतात, त्यामुळे एक बऱ्यापैकी लांबीची बातमी मिळेल अशा हेतूने मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
त्या मोठ्या हॉलमध्ये गर्दी तशी कमीच होती. मला वाटते हॉल निम्मासुद्धा भरला नव्हता, कारण कन्नड संघ या सांस्कृतिक संस्थेची ती सभा होती.
व्यासपीठावर अगदी मोजकीच म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासह पाचसहा माणसे होती. कन्नड संघाच्या अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती दिली, अहवाल वाचले.
कुठल्याही कार्यक्रमाची बातमी घेण्याऱ्या बातमीदाराच्या नशिबी हा रटाळपणा त्याच्या नेहेमीच्या कामकाजाचा भाग असतो, मुख्य वक्ता आपले भाषण सुरू करीपर्यंत बातमीदाराला अशी भाषणे ऐकून घेण्यावाचून इतर काही पर्याय नसतो.
बातमीच्या अनुषंगाने मी मोजकीच टिपणे घेत होतो. रविवार संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला बातमीदार असा मी एकटाच होतो. पण अनेक कार्यक्रमांना पुष्कळशी बातमीदार मंडळी फिरकतसुद्धा नसतात असा अनुभव असल्याने त्याबद्दल मला विशेष असे काही वाटले नाही.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर पंडित भीमसेन जोशी भाषणासाठी उभे राहिले.
आधी आलेली मरगळ झटकून मी पेन सरसावून मी त्यांच्या संपूर्ण भाषणाचे टिपण काढण्यासाठी सज्ज झालो
खांद्यावर असलेली शाल ठिकठाक करत पंडितजींनी उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने मी सर्द झालो.
संगीतातले मला काहीएक कळत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमात पंडितजी संगीताविषयी बोलतील किंवा श्रोत्यांच्या आवडीचा असलेला एखादा राग किंवा गीत गातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती.
त्याआधी पंडितजींची कितीतरी मराठी गीते मी ऐकली होती, त्यापैकी अभंगवाणीसारखी `इंद्रायणीकाठी', `कानडा हो विठ्ठलु', अशी काही लोकप्रिय गायने मला बऱ्यापैकी तोंङपाठसुद्धा होती.
ण तरीसुद्धा पंडितजींनी यावेळी जो राग आळवायला सुरुवात केली होती तो राग खूपच अनपेक्षित होता, एकदम अनोळखी होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
पंडितजींनी सुरु केलेल्या त्या रागाने मी वगळता इतर सर्व श्रोते एकदम खुश झाले होते, कान देऊन ते पंडितजींना ऐकत होते.
मोठ्या उत्सुकतेने बातमीसाठी टिपणी घेण्यासाठी पेन सरसावून बसलेलो मी मात्र एकदम दिग्मूढ झालो होतो.
पुढील पाचदहा मिनिटे पंडितजींचा आवाज कानावर पडत होता, काहीच अर्थबोध होत नसल्याने मी चुपचाप होतो.
अर्थात जे काही घडत होते त्यात वावगे असे काहीच नव्हते.
तो कार्यक्रम पुण्यातल्या कन्नड संघाचा होता, पंडितजींसह तिथे हजर असलेली सर्व मंडळी पुणेकर असली तरी मुळची कन्नडभाषिकच होती. त्यामुळेच तर भीमसेनजींनी कन्नड भाषेत बोलणे अगदी सुसंगत होते.
आधीचे सर्व वक्ते स्थानिक मराठी भाषेत बोलले होते तरी पंडितजींना आपल्या मातृभाषेत या कानडी लोकांशी संवाद साधणे उचित वाटले होते.
पुण्यात अनेक वर्षे राहून पुणेकर बनलेल्या कन्नड संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यातल्या या कार्यक्रमात मराठीतच बोलणे जितके संयुक्तिक वाटले तितकेच कन्नड भाषेत बोलून या लोकांशी असलेली आपली नाळ दाखवणे पंडितजींना संयुक्तिक वाटले असणार.
पंडित भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले आणि कन्नडभाषिक आहेत हे मला तोपर्यंत माहित नव्हते आणि गडबड इथेच झाली होती.
पंडितजींचे कन्नड भाषेतले ते भाषण संपताच मी तेथून बाहेर पडलो, रात्रीचे आठ वाजले होते आणि मला पुणे कॅम्पात ऑफिसला जायचे होते.
इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसात परतल्यावर जेमतेम तीनचार परिच्छेदांची एक कॉलमी बातमी मी टाईप केली.
कार्यक्रमाला गेलोच होतो तर निदान तेव्हढी तरी बातमी देणे गरजेचे होते. त्या बातमीत `प्रमुख पाहुणे आणि वक्ते पंडित भीमसेन जोशी होते' असे एक वाक्य होते.
दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या बातमीदार सहकाऱ्यांना हा किस्सा सांगितला, माझी कशी फटफजिती झाली हे सांगितले तेव्हा तिथे पिकलेला हंशा आजही माझ्या आठवणीत आहे.

Monday, April 1, 2024

 

लेंट सिझन : ख्रिस्ती धर्मियांमधील उपवासाचे चाळीस दिवस

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सध्या सुरु आहेत. ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ-लेंट सिझन-दरवर्षी मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमजान महिना सौरवर्षीय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सध्या सुरु आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. 

खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. मौंडी थर्सडे किंवा पवित्र गुरुवार. याच दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर'ला आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. या जेवणाआधी येशू आपल्या बारा शिष्यांचे चक्क पाय धुतो! कुणीही लहानथोर नाही, असा संदेश या कृतीतून देतो. 

या लास्ट सपरच्या वेळी ख्रिस्ताने धर्मगुरु संस्थेची स्थापना केली असे म्हणतात. "हे माझ्या आठवणीसाठी करत जा,'' असे येशू म्हणाला आणि अशाप्रकारे चर्चमध्ये दरदिवशी आणि रविवारी मिस्साविधी होतो आणि 'लास्ट सपर'ची उजळणी होते. हे शेवटचे भोजन झाल्यावर या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो. रात्रभर येशूचा छळ होऊन दुसऱ्या दिवशी रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : "हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही.'' हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार.

उपवासकाळ म्हटले की हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो,' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या 'भस्म बुधवारा'ने किंवा 'अँश वेन्सडे' या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आदल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हलला सुरुवात होते आणि या उत्सवाची 'भस्म बुधवारा'च्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता. 

भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो. 

माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले. उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही. 

हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात. उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, या काळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात. श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. 
 
कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता! इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिकात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, 'पेनान्स' म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे. 

माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे. त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत. 
 
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे. मध्ययुगीन 'इन्क्विझिशन'च्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की. 

विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही. या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते. यावेळी २४ मार्चला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली. २९ मार्चला गुड ३१ मार्चला ईस्टर संडे आहे.

ख्रिस्ती धर्मातील सर्वपंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात. ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला महत्व आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी 'भस्म बुधवार', गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही. येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. या स्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना!' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले. 

विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना!' हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात. जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये, मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते.

जेरुसलेमी बाळे जमली, 
प्रभुला गाणी गाऊ लागली 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

गाढवावरी येशू स्वार होई 
मधू गाण्यांचा नाद होई 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे ते बोल बोबडे 
रहिवाश्यांच्या कानी पडे 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

शहरवासी डोकावती 
कान देऊन ऐकती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

पंडितशास्त्री धावून येती 
दडपशाही करु लागती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे जरी तोंडे दाबिली 
गाण्याची गती तरी नाही थांबली 
होसान्ना होसान्ना होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो द व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले 'द लास्ट सपर' हे चित्र आहे. या 'लास्ट सपर' चित्रात येशूला तीस मोहरांसाठी ज्याने विकले तो ज्युडास त्या पैशाची थैली घेऊन बसलेला दाखवला आहे. पावित्र्याचे प्रतीक असलेली आणि इतर सर्वांच्या चेहेऱ्याभोवती असलेली प्रभावळ मात्र ज्युडासच्या चेहेऱ्याभोवती नाही! 

याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने. 

चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो, गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते. लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा.

गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभर कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करण्यासाठीच. ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो. काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दया याचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. 

येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे. जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके. 

त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे. आता 'अँश वेन्सडेआणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात. हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.
 
- कामिल पारखे 
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)