Did you like the article?

Showing posts with label Islam. Show all posts
Showing posts with label Islam. Show all posts

Monday, April 1, 2024

 

लेंट सिझन : ख्रिस्ती धर्मियांमधील उपवासाचे चाळीस दिवस

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सध्या सुरु आहेत. ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ-लेंट सिझन-दरवर्षी मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमजान महिना सौरवर्षीय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सध्या सुरु आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. 

खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. मौंडी थर्सडे किंवा पवित्र गुरुवार. याच दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर'ला आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. या जेवणाआधी येशू आपल्या बारा शिष्यांचे चक्क पाय धुतो! कुणीही लहानथोर नाही, असा संदेश या कृतीतून देतो. 

या लास्ट सपरच्या वेळी ख्रिस्ताने धर्मगुरु संस्थेची स्थापना केली असे म्हणतात. "हे माझ्या आठवणीसाठी करत जा,'' असे येशू म्हणाला आणि अशाप्रकारे चर्चमध्ये दरदिवशी आणि रविवारी मिस्साविधी होतो आणि 'लास्ट सपर'ची उजळणी होते. हे शेवटचे भोजन झाल्यावर या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो. रात्रभर येशूचा छळ होऊन दुसऱ्या दिवशी रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : "हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही.'' हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार.

उपवासकाळ म्हटले की हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो,' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या 'भस्म बुधवारा'ने किंवा 'अँश वेन्सडे' या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आदल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हलला सुरुवात होते आणि या उत्सवाची 'भस्म बुधवारा'च्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता. 

भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो. 

माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले. उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही. 

हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात. उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, या काळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात. श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. 
 
कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता! इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिकात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, 'पेनान्स' म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे. 

माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे. त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत. 
 
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे. मध्ययुगीन 'इन्क्विझिशन'च्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की. 

विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही. या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते. यावेळी २४ मार्चला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली. २९ मार्चला गुड ३१ मार्चला ईस्टर संडे आहे.

ख्रिस्ती धर्मातील सर्वपंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात. ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला महत्व आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी 'भस्म बुधवार', गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही. येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. या स्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना!' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले. 

विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना!' हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात. जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये, मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते.

जेरुसलेमी बाळे जमली, 
प्रभुला गाणी गाऊ लागली 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

गाढवावरी येशू स्वार होई 
मधू गाण्यांचा नाद होई 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे ते बोल बोबडे 
रहिवाश्यांच्या कानी पडे 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

शहरवासी डोकावती 
कान देऊन ऐकती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

पंडितशास्त्री धावून येती 
दडपशाही करु लागती 
होसान्ना होसान्ना होसान्ना 

बालकांचे जरी तोंडे दाबिली 
गाण्याची गती तरी नाही थांबली 
होसान्ना होसान्ना होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो द व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले 'द लास्ट सपर' हे चित्र आहे. या 'लास्ट सपर' चित्रात येशूला तीस मोहरांसाठी ज्याने विकले तो ज्युडास त्या पैशाची थैली घेऊन बसलेला दाखवला आहे. पावित्र्याचे प्रतीक असलेली आणि इतर सर्वांच्या चेहेऱ्याभोवती असलेली प्रभावळ मात्र ज्युडासच्या चेहेऱ्याभोवती नाही! 

याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने. 

चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो, गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते. लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा.

गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभर कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करण्यासाठीच. ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो. काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दया याचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. 

येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे. जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके. 

त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे. आता 'अँश वेन्सडेआणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात. हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.
 
- कामिल पारखे 
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.) 

Friday, March 22, 2024

Muslim Christians fasting seasons 




 मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षांतला पवित्र काळ म्हणजे उपवासाचे दिवस सद्या चालू आहेत.

ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात.

मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना सौरवर्षिय ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो.
ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म यांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे या धर्मांतील लोकांनाच माहिती नसते, तर या तिन्ही धर्मांचे नसलेल्या लोकांबद्दल काय बोलायचे ?
विशेष म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याचे बारा शिष्य अन सुरुवातीचे बहुतेक सर्व ख्रिस्तीजन हे यहुदी, ज्यू, होते याकडे दुर्लक्ष होते.
ज्यू हा सुरुवातीचा धर्म, त्यानंतर ख्रिस्ती धर्म आणि त्यानंतर इस्लाम धर्म असा क्रम आहे.
ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे उगमस्थान एकच आहे, ते म्हणजे पश्चिम आशिया. या तिन्ही धर्माची पवित्र भूमी एकच आहे आणि अनेक पवित्र स्थळे एकतर समान आहेत किंवा शेजारी लागून आहेत.
या होली लॅडच्या धार्मिक पर्यटनावर जाणाऱ्या लोकांनी हे चांगले अनुभवलेले असते.
या तिन्ही धर्मांच्या लोकांनी एकदुसऱ्याकडे कुठल्या नजरेने पाहिले आहे, काय वागणूक दिले हे मध्ययुगीन इतिहासातून दिसून येते.
या तिर्थक्षेत्रांवर हक्क सांगण्यासाठी आणि कब्जा मिळवण्यासाठी मध्ययुगात क्रुसेड्स किंवा धर्मयुद्धे झालेली आहेत. .
मध आणि दुधाचा सुपीक प्रदेश देवाने अब्राहामाच्या वंशजांना म्हणजे आपल्याला देऊ केला, ती ही वचनभूमी The Promised Land, असा ज्युंचा दावा आहे.
ज्युंचे या प्रदेशातून झालेले विस्थापन, गेल्या शतकातील इस्राएलची निर्मिती, स्थानिकांची हकालपट्टी आणि त्यातून निर्माण झालेले सद्याचे प्रश्न या अगदी अलीकडच्या घटना.
संपूर्ण जग या संघर्षाच्या आगीचे चटके अधूनमधून भोगत असते.
या तिन्ही धर्मांच्या धर्मग्रंथांत अनेक प्रसंग आणि पात्रे समान आहेत.
उदाहरणार्थ, अब्राहामाने - इब्राहिमने - आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी तयारी करणे.
या तिन्ही धर्मांचे भौगोलिक उगमनस्थान एकच असल्याने या तिन्ही धर्मातील नावे समान आढळतात. अब्राहम - इब्राहिम, ,
`जे; J या रोमन लिपीतील अक्षराचा हिब्रू आणि लॅटिन भाषांत उच्चार य असा होतो, त्यामुळे जिझस - येशू, जोसेफ- युसुफ, जेकब- याकुब
किंग डेव्हिड, दाविद राजा, हा ज्यूंच्या इतिहासातील सर्वांत मोठा, वंदनीय राजा. डेव्हिड.म्हणजेच दाऊद. गॅब्रिएल- गिब्राईल, मायकल- मिखाईल, मारिया- मिरियम, फातिमा अशी काही इतर समान नावे आहेत.
अब्राहाम- इब्राहिम , मोझेस- मोशे, वगैरे व्यक्ती ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तिन्ही धर्मांत वंदनीय आहेत. इतकेच नव्हे तर इसा किंवा येशूला इस्लाम धर्मियांतसुद्धा प्रेषित म्हणून मान्यता आहे, मात्र देव म्हणून नाही.
कॅथोलिक चर्चच्या गुड फ्रायडेच्या उपासनेत अब्राहाम यांचा खास उल्लेख `Abraham, Our Father in Faith' ' म्हणजे ``अब्राहाम, श्रद्धेत आमचे पिता' असा होतो.
या संज्ञेतून अप्रत्यक्षरीत्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांना जोडणारा एक समान दुवा म्हणून अब्राहामाकडे पाहिले जाते.
गुड फ्रायडेची ही एक छोटीशी प्रार्थना कॅथोलिक चर्चमध्ये खास महत्त्वाची आहे.
या गुड फ्रायडेच्या प्रार्थनेत ज्या लोकांच्या माध्यमातून मानवजातीपुढे देव प्रकटला त्या ज्यू लोकांसाठीही खास प्रार्थना केली जाते,
इतर धर्मियांसाठी आणि अगदी नास्तिकांसाठी, देवधर्म न मानणाऱ्यांसाठीसुद्धा प्रार्थना केली जाते.
या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा या रविवारपासून २४ मार्चपासून चालू होईल. २९ मार्चला गुड फ्रायडेला उपवास काळ संपतो,
त्यानंतर ईस्टर संडेला आनंदोत्सव.
एम एफ हुसेन यांनी चित्रित केलेले हे `लास्ट सपर' किंवा येशूचे शेवटचे भोजन चित्र
Camil Parkhe, March 22, 2024

Monday, June 28, 2021

‘सांन जॉव’ São João festival

                                                           


Angelo da Fonseca's 1967 masterpiece painting of St. John the Baptist

पावसाचं आगमन झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस गोव्यातील झरे-ओढे, विहिरी, तलाव आणि तळी पाण्यानं तुडुंब भरतात. सर्व परिसर हिरवाईनं नटतो. या काळात २४ जून रोजी गोव्यात ‘सांन जॉव’ हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अनेक गावांत तरुण या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारून हा सण साजरा करतात.

‘सांन जॉव’ (São João) म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’. St. John the Baptist... (संत जॉन बाप्तिस्ता) हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताचा हा जवळचा नातेवाईक. येशूपेक्षा वयानं केवळ सहा महिन्यांनी मोठा. मात्र ‘देवाचा पुत्र असलेल्या येशू ख्रिस्तासाठी वाट तयार करण्यासाठी आपण आलो आहोत, अरण्यात ओरडणारी वाणी मी आहे’ असं सेंट जॉन द बॅप्टिस्टने स्वतःबाबत म्हटलं आहे. त्याने येशूचा जॉर्डन नदीत पाण्यानं बाप्तिस्मा केल्यानंतरच ‘सुताराचा मुलगा’ असलेला येशू आपलं खरंखुरं जिवितकार्य सुरू करतो.
त्याशिवाय सेंट जॉन द बॅप्टिस्ट हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील अगदी सुरुवातीचा एक हुतात्मा. नव्या करारातील अगदी पहिले हुतात्मे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बेथलेहेम येथील जन्माच्यावेळीच त्या परीसरात जन्मलेली इतर अनेक बाळे. आकाशात अचानक अवतरलेल्या ताऱ्याचा माग काढत आलेल्या पूर्वेकडच्या त्या तीन ज्ञानी राजांनी हेरोद राजाला सांगितले कि नुकत्याच जन्मलेल्या एका राजाचे देर्शन घेण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी ते आले आहेत.
आपल्या सिंहासनाला आव्हान देणारा कुणीतरी जन्माला आहे असे वाटून हेरोद राजा मग त्या परीसरात जन्मलेल्या सर्व बाळांची हत्या करण्याचा आदेश देतो. सुदैवाने मारिया आणि जोसेफ यांनी आपल्या येशू बाळासह तेथून पलायन केल्याने ते बाळ वाचते.
बायबलमधली हत्या झालेल्या निरपराध बाळांची ही कथा राजा कंसाच्या तुरुंगातील वसुदेव-देवकीच्या कृष्णाआधीच्या नऊ अपत्यांची आठवण करून देते.
नाताळाच्या २५ डिसेंबरच्या सणानंतर लगेचच म्हणजे २८ डिसेंबरला हत्या झालेल्या निष्पाप बाळांचा (The Holy Innocents) सण साजरा केला जातो.
हेरोदच्या हत्याकांडातून येशू वाचतो, मात्र जॉन द बॅप्टिस्ट नाही. पुढे अनेक वर्षांनंतर आपल्या मुलीच्या नृत्यकौशल्यावर खूष झालेला राजा हेरोद तिला ‘बक्षीस म्हणून काय हवं?’ असं भरलेल्या दरबारात विचारतो. राजकन्या आपल्या आईच्या सुचनेनुसार तुरुंगात खितपत पडलेल्या जॉन द बॅप्टिस्टच्या शिराचा नजराणा आपल्याला ताबडतोब तबकात घालून मिळावा, अशी मागणी करते. अनिच्छेनेच राजा हेरोद ती मागणी पूर्ण करतो.
सेंट जॉन द बॅप्टिस्ट आणि येशू ख्रिस्त आपापल्या आईंच्या उदरांत असताना त्या दोघींची भेट झाली आणि त्या वेळी झालेल्या एका घटनेशी संबंधित या उत्सवाची जन्मकथा आहे. गॅब्रिएल देवदूताने मारियेला भेट देऊन तिच्या पोटी देवपुत्र येशू जन्माला येणार आहे, असं सांगितलं.
त्यापूर्वी सहा महिने आधी याच देवदूताने मारियेची नातलग असलेल्या एलिझाबेथला भेटून तिच्या पोटी सेंट जॉन जन्माला येईल, असं सांगितलेलं असतं.
येशूचा जन्म अपौरुषेय म्हणजे पवित्र आत्म्याच्या संयोगानं झाला अशी श्रद्धा आहे. इस्लाम आणि ज्यू धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही एकदेवतावाद (मोनोथिझम) असला तरी ख्रिस्ती धर्मात पिता, (येशू) पुत्र आणि पवित्र आत्मा असं एक त्रैक्य मानलं जातं.
‘बायबल’मध्ये मायकल, राफाएल आणि गॅब्रिएल हे तीन देवदूत वेगवेगळ्या प्रसंगांत प्रकट होतात. यापैकी गॅब्रिएल देवदूताचं मुख्य काम म्हणजे देवाचा निरोप मानवापर्यंत सोपवणं. मानवानं त्याबद्दल शंकाप्रदर्शन करायचं नसतं.
गॅब्रिएल देवदूताने झेकरायहाला ‘तुझी पत्नी एलिझाबेथ गर्भवती राहील’ असा निरोप दिला, तेव्हा त्याने देवदूतालाच उलट प्रश्न केला, ‘असं कसं घडेल? कारण मी तर वृद्ध आहे आणि माझ्या बायकोचंही वय झालं आहे.’ याबद्दल झेकरायहाला कडक शिक्षा मिळाली.
गॅब्रिएलने त्याला म्हटलं- ‘माझे शब्द यथाकाळी खरे ठरतील. परंतु तोपर्यंत तुझी वाचा जाईल आणि तू मुका होशील. कारण तू माझ्या वचनावर विश्वास ठेवला नाहीस.’
याउलट मारियेची वागणूक होती. गॅब्रिएल देवदूत मारियेला भेटला आणि म्हणाला- ‘तुझ्या पोटी पवित्र आत्म्याने संयोगाने देवपुत्र जन्मेल आणि त्याचे नाव येशू ठेव.’ असा निरोप देवदूताने सांगितला त्यावर मारियेने ‘जशी प्रभूची इच्छा’ म्हणून नम्रपणे मान तुकवली. म्हणून तर तिला ‘स्त्रीजातीमध्ये तू धन्य’ असा सन्मान मिळाला.
त्यानंतर मारिया तातडीनं आपल्या बहिणीला भेटायला निघते. त्या भेटतात, तो सेंट लुकच्या शुभवर्तमानातील प्रसंग फादर फ्रान्सिस दिब्रिटो-संकलित ‘सुबोध बायबल’ या ग्रंथात पुढील शब्दांत लिहिला आहे –
“त्या वेळी मारिया घाईघाईने ज्युडेयाच्या पहाडी प्रदेशातील एका गावात गेली. तिने झेकरायहाच्या घरी जाऊन एलिझाबेथला अभिवादन केले. मारियेचे अभिवादन ऐकताच एलिझाबेथच्या उदरातील बालकाने उसळी मारली आणि एलिझाबेथ पवित्र आत्म्याने भरून पावली. ती मोठ्या स्वरात म्हणाली, ‘स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या कुशीचे बालक! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या पायरीवर चढावे, हा माझा किती मोठा सन्मान आहे! पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारली.’ ”
बायबलमधील उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारण्याच्या प्रसंगानिमित्त याच प्रसंगानिमित्त सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या फेस्ताच्या म्हणजे जन्मदिनाच्या सणाच्या दिवशी खोलवर पाण्यात उडी मारुन गोव्यात हा `सांन जॉव' उत्सव साजरा केला जातो.
जूनअखेरीस गोव्यातील नदीओढे, तलाव, तळे आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. किरिस्तांव गोंयेंकारांनी आपल्या या निसर्गदत्त देणगीचा हा सण साजरा करण्यासाठी कल्पकतेनं वापर केला आहे.
गोव्यातल्या तुडुंब भरलेल्या विहिरी आणि तळ्यांवरुन आठवले. १९७०च्या दशकात बार्देस तालुक्यातील शिवोली इथल्या बामणवाडो येथे मित्र लेस्टर फर्नांडिस यांच्या घरी महाविद्यालयीन सुट्टीमध्ये काही दिवस राहिलो होतो. त्याच्या आजीने मासळी आणायला सांगितले, तिचा मुलगा म्हणजे लेस्टरचा मामा बाहेर पडला. मीही त्याच्याबरोबर निघालो. त्या वेळी घरामागच्या टेकडीजवळच्या शेतांपाशी असलेल्या तलावात आम्ही दोघं एक सुती कापड धरून जवळजवळ एक तास थांबलो.
वरून पाऊस कोसळत होता आणि तलाव भरून वाहत होता. त्या दिवशी फिश-करीसाठी आणि तळण्यासाठी पुरेसे मासे पकडल्यानंतरच आम्ही घरी परतलो. स्वतःच्या हातांनी पकडलेले मासे खाण्याचा आनंद काही औरच होता !


विहिरी हा गोव्यातल्या जुन्या घरांचा एक अविभाज्य भाग असतात. पणजीजवळच सान्त इनेझपाशी असलेल्या ताळगावात १९८०च्या दशकात मी राहात होतो. त्या घराच्या शेजारी वापरात असलेली विहीर होती. माझ्या भाटकाराच्या (घरमालकाच्या) त्या विहिरीचे पाणी आम्ही सर्व जण पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरायचो. (भाटकार म्हणजे शेतमालक आणि मुंडकार म्हणजे शेती कसणारा, हे खास गोमंतकातले विरुद्धअर्थी शब्द!) या काळात ताळगावच्या या विहिरी जवळ जवळ काठोकाठ भरलेल्या असत.
मला आठवते तेव्हा याकाळात ताळगावच्या या विहिरीत अगदी जमिनीच्या समांतर रेषेत पाणी असायचे ! बादली किंवा कळशी बांधलेला पोहोरा विहिरीत दोनतीन फूट खाली सोडला तरी ती बादली वा कळशी पाण्यात लगेचच बुडायची.
गावांत सगळीकडे विहिरी, ओढे, तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असताना आणि वरून पाऊस कोसळत असताना साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाची मजा काही वेगळीच असते. उत्तर गोव्यात आणि विशेषतः बार्देस तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
उत्तर गोव्यातल्या साळगाव, शिवोली वगैरे गावांत या उत्सवादरम्यान तरुण मुलांना ‘सांन जॉव’ असे ओरडत पाण्यात सूर मारताना मी पाहिले आहे. विविध पानेफुले यापासून तयार केलेले कॉपेल (मुकुट) डोक्याला लावून पाण्यात डूब मारली जाते. पारंपरिक संगीताची साथ असतेच.
समुद्रात डुंबणे आणि पोहोणे मला आवडत असले तरी विहिरीत मी कधीही उडी घेतलेली नाही. त्यामुळे या उत्सवात मी प्रेक्षक म्हणूनच सहभागी होत असतो. आजपावेतो तरी ‘सांन जॉव’ हा लोकांचा फेस्त राहिला आहे.
विशेष म्हणजे हा सण जगभरातील ख्रिस्तीविश्वात सगळीकडे चर्चमधील उपासनेत साजरा केला जात असला तरी केवळ गोव्यातच, कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि पोर्तुगीजांच्या राजकीय वसाहतीचा इतिहास असलेल्या गुजरातेजवळील दमण वगैरे परीसरात हा सण अशा प्रकारे साजरा होतो.
या दिवशी गोव्यात सर्वच चर्चमध्ये प्रार्थना होत असल्या तरी या उत्सवात कॅथोलिक चर्चचा कुठल्याही प्रकारचा सक्रिय सहभाग नसतो.
कार्निव्हल हासुद्धा ख्रिस्ती धर्मातील संकल्पनेशी आणि श्रद्धेशी संबंधित असलेला आणखी एक लोकप्रिय उत्सव आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत सुरू होणाऱ्या ‘ऍश वेन्सडे’ किंवा भस्म बुधवारापासून ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांचा ‘लेन्ट सिझन’ हा उपवासाचा काळ सुरू होतो. या भस्म बुधवाराच्या आधीच्या शनिवारी हा चार दिवसांचा कार्निव्हल फेस्टिव्हल गोव्यात, युरोपातील आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत सुरू होतो.
अशाच प्रकारे ‘सांन जॉव’ हा उत्सवही अलीकडे गोव्याबाहेर काही ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. विहिरी-तलावांत डूब मारून नाही तर ‘रेन डान्स’च्या शैलीवर पाण्याच्या कारंजात गाऊन-नाचून तो साजरा केला जातो.
या उत्सवाचे कार्निव्हलसारखे सुदैवाने मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेले नाही. गोव्यातील लोकसंस्कृतीचा तो एक भाग राहिला आहे आणि तो तसाच राहावा ही अपेक्षा. गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी या उत्साहावर करोना महामारीचं सावट, त्यामुळे अनेक बंधनंही होती.
गोव्याप्रमाणेच त्या काळी पोर्तुगिजांची वसाहत असलेल्या आणि गुजरातजवळील दमण येथे जन्म झालेले चित्रकार आणि व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा हे मूळचे दक्षिण गोव्यातील लुथाली या गावचे. मारिओ मिरांडा यांनी गोव्याची संस्कृती दर्शवणारी अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. ‘सांन जॉव’ या सणाची वैशिष्ट्यं दाखवणारं त्यांचं एक सुंदर चित्र प्रसिद्ध आहे.


आपल्याकडे वर्षभराचं पंचाग असतं, तसं कॅथोलिक चर्चचं पूर्ण वर्षाचे (विविध संतांच्या सणांचं, आगमन, ख्रिस्तजन्मसोहळा आणि उपवासकाळ अशा विविध हंगामांचं) कॅलेंडर असते.
जगभरातील ख्रिस्ती समाजाप्रमाणेच जॉन हे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजातीलसुद्धा एक सर्वसामान्य नाम आहे, जसे फ्रान्सिस, मारिया, एलिझाबेथ, गॅब्रिएल, फातिमा, बेन्यामीन, पौलस. इत्यादी. येशू हे नाव मात्र कधीही कुणाला दिले जात नाही.
ख्रिस्ती धर्मात नामकरणविधी या बाप्तिस्मा स्नानसंस्काराच्यावेळी होत असतो, त्यामुळेच बॅप्टीझम या विधीला ख्रिस्टनिंग समारंभ असेही म्हटले जाते. बाप्तिस्मा विधीचे पौराहित्य धर्मगुरु करत असल्यामुळेच बहुधा येशू हे अतिपवित्र समजले नाव इतर कुणालाही दिले जात नाही.
ख्रिस्ती धर्माच्या कॅलेंडरमध्ये वर्षभर दररोज कुणा न कुणा संतांचा सण असतो, जसे कि तीन डिसेंबर हा संत फ्रान्सिस झेव्हियरचा सण. या दिवशी कुणाचा जन्म झाला तर त्या अपत्याला फ्रान्सिस किंवा फ्रान्सिका ते नाव देण्याची पद्धत असायची. माझा जन्म १७ जुलैचा आणि हा संत कामिल्स याचा सण. म्हणून श्रीरामपूर पॅरिश (धर्मग्राम) चे जर्मन जेसुईट धर्मगुरु फादर आयवो मायर यांनी माझा बाप्तिस्मा करताना माझे नाव कामिल असे ठेवले.
तर जॉन हे माझ्या वडिलांचेही नाव. जून महिन्याअखेरीस ते `माझा सण जवळ आला’ असे ते म्हणत असत. इंदिरा गांधींचा आणि माझा जन्म एकाच सालचा, असेही ते म्हणत असत. दादांच्या जन्मदिवसाचा किंवा शालेय शिक्षणाचा कागदोपत्री कुठलाही पुरावा नसल्याने त्यांचे हे म्हणणे आम्ही हसण्यावारी नेत असू.
पंधरा वर्षांपूर्वी दादांचे नव्वदाव्या वर्षी निधन झाले. त्यानंतर कुठलेसे कागदपत्र शोधत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील घोगरगाव येथील ख्रिस्तराजा चर्चच्या शिक्क्यानिशी त्यांच्या बाप्तिस्म्याचा दाखला अचानक सापडला.
फादर जॉन मेरी बेर्जे (Berger) या फ्रान्सिलियन (MSFS) संस्थेच्या फ्रेंच धर्मगुरुंनी १९१७ साली त्यांचा बाप्तिस्मा करुन त्यांना जॉन असे नाव दिले होते असे त्या जीर्ण कागदपत्रावर लिहिले होते ! आम्ही पारखे मंडळी वाहेगावची, मात्र त्याकाळात तेथे देऊळ आणि फादर नसल्याने तेरा किलोमीटर अंतरावर असलेले घोगरगाव हीच आमची पॅरिश होती.
प्रत्येक व्यक्तीच्या बाप्तिस्म्याची, लग्नाची आणि इतर सांक्रामेंतांची अगदी मृत्यसंस्कारांची त्या त्या चर्चच्या रजिस्टरमध्ये नोंद होत असते. चर्चची या जुन्यापुराण्या नोंदवह्या त्यामुळेच इतिहासाची खाणच असतात. त्या जुन्या सापडलेल्या कागदामुळे आजकाल `सांन जॉव’ फेस्त साजरा करताना दादांचीही आठवण हमखास येतेच.
चर्चच्या या कॅलेंडरमध्ये गॅब्रिएल देवदूताने मारियेला निरोप सांगितला, तो दिवस १४ मार्चला साजरा होतो, म्हणजे नाताळाआधी बरोबर नऊ महिने.
गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा काळ ध्यानात ठेवून चर्चने या काही सणांची तारीख मुक्रर केली आहे. २४ जूननंतर बरोबर सहा महिन्यांनी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ख्रिस्तजन्माचा म्हणजे नाताळाचा आनंदमयी उत्सव सुरू होतो.
-------
`सांन जॉव' सणानिमित्त गोव्यातील पत्रकार विवेक मिनिझेस यांनी प्रसिद्ध गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी १९६७ साली भारतीय शैलीत आणि प्रतिमांसह काढलेले संत जॉन बाप्तिस्ता याचे फेसबुकवर शेअर केलेलेे हे चित्र. सोबत मिनिझेस यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिलेली टिपण्णीही देत आहे. संत जॉन याच्या हातात असलेले कोकरु (The Lamb of God) अर्थातच येशू ख्रिस्ताची एक प्रतिमा आहे.
--------
Writes Vivek Menezes on his Facebook wall
''Shared this last year, but it belongs even better in the privations of our age of contagion. today - 24 June - the feast of St. John the Baptist, is traditionally celebrated in Goa as bacchanalian water carnival, with unmistakable eco-spiritual roots that underlie + pre-date the Konkani Catholic practices.
All that fluid cultural complexity informs this 1967 Angelo da Fonseca masterpiece, where the biblical ascetic is depicted - highly suitably! - as a sadhu in the Hindu/Jain tradition, but with another layer of Buddhist meaning as well. the compelling mystic figure stands under a bodhi/ peepul sacred fig tree with its distinctive heart-shaped leaves, revered symbol of the site where Siddhartha Gautama attained enlightenment after 49 days of immersive meditation. it's something to savour on this unique feast day.

Viva San Joao!''
-
.....