जोतिबांच्या शाळा
जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे.
मात्र ते दोघे नेमक्या कुठल्या शाळेत शिकले हे आजही निश्चित नाही. याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता असेलच.
सावित्रीबाईंनी नगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या मिस सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले ती शिक्षणसंस्था म्हणजे या शहरातील माळीवाड्यात आजही चालू असलेली क्लारा ब्रूस स्कुल.
येथेच जोतिबांनी फरार मॅडमची भेट घेतली होती, त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन पुण्यात येऊन त्यांनी तेथे लगेच मुलींसाठी शाळा सुरु केली होती. खुद्द जोतीबांनीच असे लिहिले आहे.
अर्थात क्लारा ब्रूस हे नाव त्यानंतर खूप वर्षांनी या शाळेला देण्यात आले. क्लारा ब्रूस या शाळेच्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या.
पुण्यात फुले दाम्पत्य जिथे शिकले त्या शाळांबाबत मात्र अशी सुस्पष्टता नाही. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, नंतर याच शाळांत ते काही काळ शिक्षक होते.
सावित्रीबाईंनी पुण्यात स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल यांच्याकडे अध्यापनाचे शिक्षण घेतले होते.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण सुरु केलेल्या शाळा नंतर कमिटीकडे देण्यात आल्या आणि त्या शाळा मिसेस मिचेल चालवत होत्या असे म्हटले आहे.
कुठे आहेत आता त्या शाळा आणि शिक्षणसंस्था ?
अपार उत्सुकतेने काही वर्षांपूर्वी याबाबत सुरु झालेल्या माझ्या शोधाला आता एक निश्चित दिशा मिळते आहे असे वाटत आहे.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती या पंधरवड्यातच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे यांनी माझा मोबाईल नंबर मिळवून याबाबत माझ्याकडे चौकशी केली तेव्हा.
त्यानंतर समाज कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांनी मला पुण्यातील स्कॉटिश संस्थांबाबत काही माहिती पुरवली आणि या तपासाला गती मिळत गेली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्कॉटिश मिशनरी मार्गारेट आणि जॉन विल्सन हे दाम्पत्य, जॉन मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट त्याचप्रमाणे पुण्यात मार्गारेट आणि जेम्स मिचेल हे दाम्पत्य शिक्षणकार्य करत होते.
मात्र या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
स्कॉटिश मिशनरींशी संबंध असलेल्या चार नावाजलेल्या शिक्षणसंस्था पुण्यात आजही आहेत हे समजले तेव्हा माझ्या या अज्ञानाबद्दल मला खूप शरमल्यासारखे झाले.
आणि त्याबरोबरच एक सुखद धक्काही बसला होता.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्या शिक्षणसंस्थाशी अतूट आणि दीर्घकाळ संबंध होते त्या याच संस्था असतील हे निःसंशय आहे.
घाशीराम कोतवाल उत्तर पेशवाई काळातील एक वादग्रस्त पात्र. विजय तेंडुलकरांच्या नाटकाने हे नाव अनेकांना परिचित झाले आणि अगदी सातासमुद्रापार पोहोचले.
पुणे कॅम्पात असलेला घाशीराम कोतवालचा ऐतिहासिक वाडा अनेक वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाला. मात्र या वाड्याची माहिती आणि एक छायाचित्र त्या जागी उभे करण्यात आले.
आता अस्तित्वात नसलेल्या या घाशीराम कोतवालच्या वाड्याच्या बाजूला आजही एक जुनी वास्तू आणि शिक्षणसंस्था तग धरुन आहे.
ही शिक्षणसंस्था म्हणजे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा. बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी.
स्थापना सहा जानेवारी १८२७.
याचा अर्थ भारतात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या काही शाळांपैकी ही एक शाळा आहे.
लवकरच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा २०० वर्षे पूर्ण करणार आहे.
भारतात सर्वप्रथम प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या त्या बंगाल इलाख्यात.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला.
त्यानंतर मिस मेरी अँन कुक यांनी 1822 मध्ये कोलकात्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या.
अमेरीकन मराठी मिशनच्या मिशनरींनी भारतात - मुंबईत - १८१२ साली प्रवेश केल्यानंतर लगेच तेथे शाळा स्थापन केल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे १८२३ साली शाळा सुरु केल्या होत्या.
मार्गारेट आणि जॉन विल्सन हे नवविवाहित जोडपे स्कॉटलंडहून भारतात १८२८ साली आले, कोकणात मराठी शिकल्यानंतर मुंबईत येऊन १८३२ साली त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरु केल्या.
मुंबईत आजही असलेली सेंट कोलंबा गर्ल्स स्कुल आणि विल्सन कॉलेज त्यांनीच स्थापन केले.
पुण्यातील या प्राथमिक शाळेची मालकी आता जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे असली तरी ही शाळा जॉन विल्सन किंवा स्कॉटिश मिशनरींनी सुरु केलेली नसणार.
याचे कारण स्कॉटिश मिशनरी तोपर्यंत १८२७ साली दख्खनेत - पुण्यात - पोहोचलेसुद्धा नव्हते.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मार्गारेट आणि जॉन विल्सन आणि इतर स्कॉटिश मिशनरींवर एक प्रकरण लिहिले आहे.
स्कॉटिश मिशनरींशी निगडीत असलेल्या पुण्यातील इतर शिक्षणसंस्था म्हणजे रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन कॉलेज, लाल देवळामागे पेट्रोल पंपाशेजारी असलेली सेंट अँड्रयूज मराठी स्कुल आणि पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटपाशी असलेले सेंट जॉन स्कुल.