Did you like the article?

Showing posts with label Sikkim. Show all posts
Showing posts with label Sikkim. Show all posts

Friday, December 6, 2024

 

हे. ऐंशीच्या दशकातली. आधीची नगर परिषद जाऊन महापालिका बनलेले पिंपरी चिंचवड शहर नव्याने आकार घेत होते.
मुंबई-पुणे हमरस्त्यावर चिंचवडमध्ये असलेल्या कॅथोलिक चर्चच्या कल्याण केंद्राने या परिसरातील लोकांसाठी एमआयडीसी परीसरात एका शेडमध्ये नवी शाळा सुरु केली होती. उद्योगनगरीत स्थायिक होणाऱ्या लोकांसाठी शाळा सुरु करणे आवश्यक होते.
नव्यानेच सुरु केलेल्या या शाळेसाठी खोल्या बांधण्याची परवानगी महापालिकेकडून घेणे गरजेचे होते. कल्याण केंद्रात नेमणूक झालेले तरुण फादर साल्वादोर उर्फ सालू पिंटो त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यालयात नियमितपणे जात होते. मात्र महापालिकेचे अधिकारी मात्र त्यांना तशी परवानगी देण्यास टाळाटाळ करत होते.
असे अनेक दिवस गेले. फादर साल्वादोर पिंटो महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांना भेटून शाळेसाठी बांधकाम करण्यासाठी वेगवेगळे अर्ज देत होते. त्यांच्या फायलीत अर्जांचा आणि इतर कागदपत्रांचा गठ्ठा वाढत चालला होता. मात्र शाळेसाठी बांधकाम करण्याची परवानगी मिळेल अशी काही चिन्हे दिसत नव्हती.
फादर पिंटो यांनी मात्र आपला धीर आणि संयम सोडला नव्हता. चिकाटीने ते महापालिकेच्या इमारतीतील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना भेटत राहिले. आपल्या शाळेतील मुलांमुलींना शाळेत सुरक्षित छत असणे आवश्यक आहे हे अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न फादर सालू करत होते.
शाळेच्या बांधकामासाठी परवानगी मिळवण्यासाठी महापालिकेच्या कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला लाच देण्यास मात्र फादर सालू पिंटो तयार नव्हते.
एक दिवस मात्र फादर सालू पिंटो यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोच्च अधिकारी असलेल्या आयुक्तांची यासाठी भेट घेण्याचे ठरवले. त्यांना यासाठी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश सुद्धा मिळाला.
त्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त होते श्रीनिवास पाटील.

फादर साल्वादोर पिंटो यांनी आपले मत आयुक्तांसमोर थोडक्यात आणि स्पष्टपणे मांडले.
त्यांनी आयुक्तांना सांगितले कि या क्षणाला कल्याण केंद्राच्या या शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी परवानगी देणे शक्य नसल्यास निदान शाळेतील विद्यार्थिनीसाठी स्वच्छतागृह बांधण्याची परवानगी देण्यात यावी.
मुलींसाठी शाळेत स्वच्छतागृह असणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यासाठी बांधकामास परवानगी देण्यास यावी असे फादर पिंटो यांनी महापालिका आयुक्त पाटील यांना विनंती केली.
महापालिका आयुक्तांनी फादरांना विचारले कि यासंदर्भात आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे देण्यात आली आहेत काय?
फादर सालू यांनी तत्क्षणी आपल्या जवळ असलेली अर्जाची आणि कागदपत्रांची जाडजूड फाईल आयुक्तांना दाखवली.
``मी संबधित अधिकाऱ्यांशी याबाबत बोलतो आणि योग्य तो निर्णय घेतो'' असे आयुक्तांनी फादरांना आश्वासन दिले आणि लगेचच संबंधित सर्व विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बैठकीसाठी बोलावले.
फादर साल्वादोर अर्थातच या बैठकीला होते.
बैठक सुरु होताच कल्याण केंद्राच्या या शाळेसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जाचे काय झाले असा थेट प्रश्न आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारला. या बैठकीत नगर अभियंता (सिटी इंजिनियर), आरोग्य, बांधकाम, वगैरे खात्यांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
या सर्व विभागांत जाऊन या अधिकाऱ्यांना फादर पिंटो अनेकदा भेटले होते.
आयुक्तांनी या अर्जाबाबत जाब मागितल्याने सर्वच अधिकऱ्यांची गाळण उडाली होती.
परवानगी का दिली जात नाही असे विचारल्यावर आयुक्तांना थातुरमातुर उत्तर देणे त्यांना शक्यच नव्हते. सर्व कागदपत्रे असल्याने बांधकामास परवानगी देण्यास तशी काहीच अडचण नव्हती.
``शाळेसाठी बांधकाम करण्याची परवानगी देण्यास काही अडचण नाही असे दिसते. त्यामुळे आज संद्याकाळपर्यंत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी फादरांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी देणारी पत्रे द्यावीत,'' असा आदेश महापालिका आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी दिला आणि बैठक संपली.
शाळेच्या खोल्यांच्या बांधकामासाठी अंतिम परवानगी मिळण्यास मात्र एक मोठी अडचण .होती.
सकाळी झालेल्या महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सिटी इंजिनीयर नव्हते आणि त्यांच्या विभागाची परवानगी यासाठी सर्वात आवश्यक होती.
मात्र यावर लगेचच तोडगा निघालासुद्धा.
इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी सिटी इंजिनियर साहेबांना सांगितले कि महापालिका आयुक्तांनी शाळेच्या बांधकामासाठी आज संद्याकाळपर्यँत सर्व परवानग्या देण्याचे आदेश दिले आहेत.
अशी परवानगी देण्यास काही कायदेशीर आणि इतर अडचणी असल्यास सिटी इंजिनियर याबाबत खुद्द आयुक्तांना तसे सांगू शकतील असेही सिटी इंजिनियरांना सांगण्यात आले.
ही मात्रा लगेच लागू पडली आणि शाळेसाठी बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानगीचे कागदपत्र सही आणि शिक्क्यांसह फादर साल्वादोर पिंटो यांच्या हातात त्या दिवशी संघ्याकाळीच पडली.
नागरिकांच्या हितांसाठी आवश्यक ते निर्णय धडाडीने घेणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी त्यानंतर राज्य प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या,
श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांचे हरहुन्नरी व्यत्क्तिमत्व अनुभवण्याची मला संधी मिळाली ती १९९१ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणींच्या वेळी.
त्यावेळीही आपल्या झुबकेदार मिशीने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असत.
त्या जमान्यात आजचे वादग्रस्त ठरलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन किंवा ईव्हीएम नव्हते. प्रत्यक्ष मतदान पत्रिका मोजल्या जायच्या आणि हे काम दिवसभर आणि क्वचित रात्रभर सुद्धा चालायचे.
त्यावेळी मी इंडियन एक्सप्रेसला बातमीदार होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ आणि भाजपचे लक्ष्मण सोनोपंत तथा अण्णा जोशी उमेदवार होते. त्याविषयी सविस्तर नंतर कधीतरी.
तर त्यावेळी जिल्हाधिकारी या नात्याने श्रीनिवास पाटील निवडणूक अधिकारी होते आणि माईकवर सतत बोलून आपल्या प्रगल्भ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आम्हा पत्रकाराना आणि मतमोजणी केंद्रात हजर असलेल्या लोकांना अनुभूती देत होते.
लोकप्रिय कविता आणि शेरोशायरी.. चपखल टिपण्णी वगैरे..आजही मतमोजणी केंद्रातील ते दहाबारा तास माझ्या नजरेसमोर आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले श्रीनिवास पाटील पुढे लोकसभेवर सुद्धा निवडले गेले आणि नंतर सिक्कीमचे राज्यपाल बनले.
तो अलीकडचा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच.
चिंचवडच्या कल्याण केंद्रातर्फे सुरु करण्यात आलेली मुलांमुलींची शाळा आज सेंट अँड्रयूज स्कुल म्हणून नावारूपास आली आहे.
कल्याण केंद्र आज मुंबई-पुणे हायवेवर जयश्री टॉकीजच्या दुसऱ्या टोकाला असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्च या नावाने ओळखले जाते.
फादर साल्वादोर पिंटो यांनी आता वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत.
पुण्याचे बिशप आणि शनिवारीच मुंबईचे आर्चबिशप ओसवाल्ड ग्रेशियस यांचे वारसदार म्हणून नेमणूक झालेले पुण्याचे बिशप जॉन रॉड्रिग्स यांच्या हस्ते त्यांचा यानिमित्त रविवारी संध्याकाळी सत्कार झाला. पुणेरी पगडीसह !!
फादर सालू पिंटो याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
Camil Parkhe December 2, 2024