Did you like the article?

Showing posts with label Onam. Show all posts
Showing posts with label Onam. Show all posts

Friday, January 17, 2025

 परवाच्या भोगी आणि कालच्या संक्रान्त सणांनिमित्ताने एकच गोष्ट करण्याच्या तीन अगदी वेगळ्या तऱ्हा नजरेस आल्या.

आपल्या भारतीय संस्कृतीतील संक्रांत हा पोंगल, पोळा, ओणम, भाऊबीज, नारळी किंवा राखी पौर्णिमा या सणांसारखा निधर्मी सण असावा.
एक तर पाश्चात्य मूळ असलेल्या ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार हा सण १४ जानेवारीला आणि लिप वर्षात १५ जानेवारीला साजरा होतो.
दुसरे म्हणजे या सणाचे मूळ पुर्णतः भौगोलिक स्वरुपाचे आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन.
त्यानिमित्त आज मी माझ्या एक मित्राला यानिमित्त चक्क इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या शरपंजरी भीष्माचार्यांची कथा ऐकवली.
भोगीनिमित्त आमच्याही घरी बाजरीची भाकर आणि चवदार मिश्र भाजींचे जेवण होते.
संक्रांतीनिमित्त तिळ आणि गुळाच्या चपात्या होत्या.
तर त्या दिवशी सकाळी फिरायला गेलो असताना मोटारसायकलवर आलेले तीन तरुण दिसले. डोक्याला कानटोपी असलेल्या त्या तिन्ही तरुणांच्या अंगांत वासुदेवाचे अंगरखे होते.
आपल्या गाड्या एका ठिकाणी पार्क करून गोल कानटोपीवर जिरेटोपासारखी वासुदेवाची टोपी चढवून `वासुदेव आला, वासुदेव आला, दान करा' अशी गाणी म्हणत रस्त्यांवरील लोकांकडून, दुकानदारांकडून ते भोगी सणानिमित्त पैसे मागत होते.
त्या तिन्ही वासुदेवांना लोकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद होता, काहीजण त्यांच्याकडून भविष्य ऐकत होते, त्याबद्दल काही रक्कम देत होते. त्या तिन्हीही वासुदेवांचे सफेद आणि रंगीत कपडे बऱ्यापैकी स्वच्छ होते.
विशिष्ट जमातीचे ते असले तरी ते अगदीच भिकारी दिसत नव्हते. त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असावी, त्यांचे शालेय शिक्षण झालेले असणार.
चौकांत एकमेकांना भेटल्यानंतर ते काही हास्यविनोदसुद्धा करत होते.
त्यांच्या खानदानीत आणि त्यांच्या जमातीत पिढीजात असलेली वासुदेवाची ही भूमिका ते वर्षातून काही दिवस पार्टटाइम करत असावेत हेही उघड होते.
काल संक्रांतीच्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी त्या सणानिमित्त लोकांकडून पैसे मागणारी एक बाई दिसली.
कमरेपाशी असलेल्या डोलकीवर गुबुगुबू आवाज करत ती येणाऱ्याजाणाऱ्या लोकांसमोर पैशासाठी हात पुढे करत होती.
पाचसहा वर्षांची असलेली त्या बाईची मुलगी रस्त्यावर इकडेतिकडे पळत येणाऱ्याजाणाऱ्या लोकांचे हात पकडून भीक मागत होती.
बहुतेक लोक त्या दोघींना टाळण्याचे प्रयत्न करत होती. ती मुलगी जवळ येण्याआधीच मी एका कॉर्नरपाशी माझी वाट बदलली होती.
वयाच्या विशीत असली तरी आता कालबाह्य होत आलेले नऊवारी लुगडे त्या बाईने नेसले होते. ती पूर्णतः निरक्षर होती आणि तिची मुलगी कुठल्याही शाळेत जात नव्हती हे उघडच होते.
लाचारी आणि अगतिकता त्यांच्या चेहेऱ्यांवर स्पष्टच जाणवत होती. समाजाच्या अगदी खालच्या थरातील त्या दोघी होत्या अन त्यांना मदत करण्यास कुणी पुढे आलेले मला तरी दिसले नाही.
आज दुपारी घरीच होतो. बेल वाजली म्हणून पुढे आलो तो डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर गंध आणि शुभ्र कपडे घातलेला एक तरुण दिसला.
``मी अमुक अमुक जातीचा आहे, शेजारच्या देवळातून आलो आहे. संक्रांत सणानिमित्त भिक्षा द्या !''
मी त्याकडे निरखून पाहिले.
भिक्षा मागत असला तरी तेजस्वी आणि करारी चेहरा असलेल्या त्या तरुणाची मान ताठ होती. लाचारीचा त्या नजरेत लवलेशसुद्धा नव्हता.
इमारतीच्या लिफ्टचा वापर करुन तो आमच्या मजल्यावर पोहोचला होता. सहसा सेल्सवाले लोकसुद्धा असे धाडस करत नाही, वासुदेव आणि इतर लोकांबद्दल तर बोलायलाच नको.
वासुदेव आणि त्या बाईसारखा हा तरुणसुद्धा पैसे मागत असला तरी त्यासाठी त्याने भिकेऐवजी 'भिक्षा' असा अधिक प्रतिष्ठित शब्द वापरला होता.
भिक्षा देण्यास अर्थातच मी सरळसरळ नकार दिला, इतर शेजाऱ्यांनीही तसेच केले.
आपल्या भारतीय संस्कृतीत बहुतेक सर्वच धर्मांत जातीजमाती अजूनही आपले पाय घट्ट रोवून आहेत.
असे जातीनिहाय जगणे, वागणे आणि व्यवसायसुद्धा आजही तसेच कायम राहिले आहेत. त्यात कालपरत्वे अगदी थोडाबहुत फरक होत असेल इतकेच.
Camil Parkhe, January 15, 2025

Sunday, December 8, 2024


श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, पोळा हा त्यापैकी एक.

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत.
पोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांच्या एकदोन जोडी घरात यायच्या.
त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा.
पोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, होली विकमध्ये झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच.
काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.
श्रीरामपुरात शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा.
आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू, अंतोन किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा.
रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले किंवा बटाट्याची सुकी भाजी असायची. , पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा.
भामाठाणला आले कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरचा हा भाग. मामाची मुले तहानलेल्या बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो.
गोदावरीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा.
शिवराम मामा, शाहू, अंतोन आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचे आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचे .
एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे.
घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचे.
शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा खळाळते पाणी वर येताना मी अचंबून पाहत राहायचो. विहिरीवर प्रत्यक्ष मोट चालवली जाताना मी पहिल्यांदा आणि शेवटी तिथेच पाहिली.
शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगे हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा.
`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असे कुणी म्हणायचे.
शिवराम मामांकडे एक शेळीसुद्धा होती. त्यामुळे शहरातील आम्ही मुले आजोळी आल्यानंतर त्यांच्याकडे कोरा चहाऐवजी दुधाचा चहा मिळायचा हे मला आजही आठवते.
शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडे असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत.
एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडे बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते, असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचे नसते .
श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या छोट्याशा मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथे मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत.
हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत.
पोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत.
त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत.
देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर लोक उभे राहत आणि ख्रिस्ती भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत.
बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी आहे असे त्यावेळी कुणाला वाटले नाही. आजही तसे वाटत नाही.
आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि पोळा हा सण साजरा होईल.
भारतातील अनेक सण धर्म आणि जातिनिरपेक्ष आहेत, पोळा, भाऊबीज, रक्षाबंधन, पोंगल, ओणम वगैरे सणांचा धर्माशी संबंध नसतो.
अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला पोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात पोळा साजरा होतो.
पोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा...
(फोटोओळी : स्व. फादर जेम्स शेळके पोळा सणानिमित्त सजवलेल्या खिलारी बैलजोडीला आशिर्वादित करताना )
Camil Parkhe,