परवाच्या भोगी आणि कालच्या संक्रान्त सणांनिमित्ताने एकच गोष्ट करण्याच्या तीन अगदी वेगळ्या तऱ्हा नजरेस आल्या.
आपल्या भारतीय संस्कृतीतील संक्रांत हा पोंगल, पोळा, ओणम, भाऊबीज, नारळी किंवा राखी पौर्णिमा या सणांसारखा निधर्मी सण असावा.
एक तर पाश्चात्य मूळ असलेल्या ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार हा सण १४ जानेवारीला आणि लिप वर्षात १५ जानेवारीला साजरा होतो.
त्यानिमित्त आज मी माझ्या एक मित्राला यानिमित्त चक्क इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या शरपंजरी भीष्माचार्यांची कथा ऐकवली.
भोगीनिमित्त आमच्याही घरी बाजरीची भाकर आणि चवदार मिश्र भाजींचे जेवण होते.
संक्रांतीनिमित्त तिळ आणि गुळाच्या चपात्या होत्या.
तर त्या दिवशी सकाळी फिरायला गेलो असताना मोटारसायकलवर आलेले तीन तरुण दिसले. डोक्याला कानटोपी असलेल्या त्या तिन्ही तरुणांच्या अंगांत वासुदेवाचे अंगरखे होते.
आपल्या गाड्या एका ठिकाणी पार्क करून गोल कानटोपीवर जिरेटोपासारखी वासुदेवाची टोपी चढवून `वासुदेव आला, वासुदेव आला, दान करा' अशी गाणी म्हणत रस्त्यांवरील लोकांकडून, दुकानदारांकडून ते भोगी सणानिमित्त पैसे मागत होते.
त्या तिन्ही वासुदेवांना लोकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद होता, काहीजण त्यांच्याकडून भविष्य ऐकत होते, त्याबद्दल काही रक्कम देत होते. त्या तिन्हीही वासुदेवांचे सफेद आणि रंगीत कपडे बऱ्यापैकी स्वच्छ होते.
विशिष्ट जमातीचे ते असले तरी ते अगदीच भिकारी दिसत नव्हते. त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असावी, त्यांचे शालेय शिक्षण झालेले असणार.
चौकांत एकमेकांना भेटल्यानंतर ते काही हास्यविनोदसुद्धा करत होते.
त्यांच्या खानदानीत आणि त्यांच्या जमातीत पिढीजात असलेली वासुदेवाची ही भूमिका ते वर्षातून काही दिवस पार्टटाइम करत असावेत हेही उघड होते.
काल संक्रांतीच्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी त्या सणानिमित्त लोकांकडून पैसे मागणारी एक बाई दिसली.
कमरेपाशी असलेल्या डोलकीवर गुबुगुबू आवाज करत ती येणाऱ्याजाणाऱ्या लोकांसमोर पैशासाठी हात पुढे करत होती.
पाचसहा वर्षांची असलेली त्या बाईची मुलगी रस्त्यावर इकडेतिकडे पळत येणाऱ्याजाणाऱ्या लोकांचे हात पकडून भीक मागत होती.
बहुतेक लोक त्या दोघींना टाळण्याचे प्रयत्न करत होती. ती मुलगी जवळ येण्याआधीच मी एका कॉर्नरपाशी माझी वाट बदलली होती.
वयाच्या विशीत असली तरी आता कालबाह्य होत आलेले नऊवारी लुगडे त्या बाईने नेसले होते. ती पूर्णतः निरक्षर होती आणि तिची मुलगी कुठल्याही शाळेत जात नव्हती हे उघडच होते.
लाचारी आणि अगतिकता त्यांच्या चेहेऱ्यांवर स्पष्टच जाणवत होती. समाजाच्या अगदी खालच्या थरातील त्या दोघी होत्या अन त्यांना मदत करण्यास कुणी पुढे आलेले मला तरी दिसले नाही.
आज दुपारी घरीच होतो. बेल वाजली म्हणून पुढे आलो तो डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर गंध आणि शुभ्र कपडे घातलेला एक तरुण दिसला.
``मी अमुक अमुक जातीचा आहे, शेजारच्या देवळातून आलो आहे. संक्रांत सणानिमित्त भिक्षा द्या !''
मी त्याकडे निरखून पाहिले.
भिक्षा मागत असला तरी तेजस्वी आणि करारी चेहरा असलेल्या त्या तरुणाची मान ताठ होती. लाचारीचा त्या नजरेत लवलेशसुद्धा नव्हता.
इमारतीच्या लिफ्टचा वापर करुन तो आमच्या मजल्यावर पोहोचला होता. सहसा सेल्सवाले लोकसुद्धा असे धाडस करत नाही, वासुदेव आणि इतर लोकांबद्दल तर बोलायलाच नको.
वासुदेव आणि त्या बाईसारखा हा तरुणसुद्धा पैसे मागत असला तरी त्यासाठी त्याने भिकेऐवजी 'भिक्षा' असा अधिक प्रतिष्ठित शब्द वापरला होता.
भिक्षा देण्यास अर्थातच मी सरळसरळ नकार दिला, इतर शेजाऱ्यांनीही तसेच केले.
आपल्या भारतीय संस्कृतीत बहुतेक सर्वच धर्मांत जातीजमाती अजूनही आपले पाय घट्ट रोवून आहेत.
असे जातीनिहाय जगणे, वागणे आणि व्यवसायसुद्धा आजही तसेच कायम राहिले आहेत. त्यात कालपरत्वे अगदी थोडाबहुत फरक होत असेल इतकेच.
Camil Parkhe, January 15, 2025
No comments:
Post a Comment