Did you like the article?

Showing posts with label John Wilson. Show all posts
Showing posts with label John Wilson. Show all posts

Thursday, May 1, 2025

 जोतिबांच्या शाळा 

जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे.
मात्र ते दोघे नेमक्या कुठल्या शाळेत शिकले हे आजही निश्चित नाही. याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता असेलच.
सावित्रीबाईंनी नगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या मिस सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले ती शिक्षणसंस्था म्हणजे या शहरातील माळीवाड्यात आजही चालू असलेली क्लारा ब्रूस स्कुल.
येथेच जोतिबांनी फरार मॅडमची भेट घेतली होती, त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन पुण्यात येऊन त्यांनी तेथे लगेच मुलींसाठी शाळा सुरु केली होती. खुद्द जोतीबांनीच असे लिहिले आहे.
अर्थात क्लारा ब्रूस हे नाव त्यानंतर खूप वर्षांनी या शाळेला देण्यात आले. क्लारा ब्रूस या शाळेच्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या.
पुण्यात फुले दाम्पत्य जिथे शिकले त्या शाळांबाबत मात्र अशी सुस्पष्टता नाही. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, नंतर याच शाळांत ते काही काळ शिक्षक होते.
सावित्रीबाईंनी पुण्यात स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल यांच्याकडे अध्यापनाचे शिक्षण घेतले होते.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण सुरु केलेल्या शाळा नंतर कमिटीकडे देण्यात आल्या आणि त्या शाळा मिसेस मिचेल चालवत होत्या असे म्हटले आहे.
कुठे आहेत आता त्या शाळा आणि शिक्षणसंस्था ?
अपार उत्सुकतेने काही वर्षांपूर्वी याबाबत सुरु झालेल्या माझ्या शोधाला आता एक निश्चित दिशा मिळते आहे असे वाटत आहे.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती या पंधरवड्यातच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे यांनी माझा मोबाईल नंबर मिळवून याबाबत माझ्याकडे चौकशी केली तेव्हा.
त्यानंतर समाज कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांनी मला पुण्यातील स्कॉटिश संस्थांबाबत काही माहिती पुरवली आणि या तपासाला गती मिळत गेली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्कॉटिश मिशनरी मार्गारेट आणि जॉन विल्सन हे दाम्पत्य, जॉन मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट त्याचप्रमाणे पुण्यात मार्गारेट आणि जेम्स मिचेल हे दाम्पत्य शिक्षणकार्य करत होते.
मात्र या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
स्कॉटिश मिशनरींशी संबंध असलेल्या चार नावाजलेल्या शिक्षणसंस्था पुण्यात आजही आहेत हे समजले तेव्हा माझ्या या अज्ञानाबद्दल मला खूप शरमल्यासारखे झाले.
आणि त्याबरोबरच एक सुखद धक्काही बसला होता.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्या शिक्षणसंस्थाशी अतूट आणि दीर्घकाळ संबंध होते त्या याच संस्था असतील हे निःसंशय आहे.
घाशीराम कोतवाल उत्तर पेशवाई काळातील एक वादग्रस्त पात्र. विजय तेंडुलकरांच्या नाटकाने हे नाव अनेकांना परिचित झाले आणि अगदी सातासमुद्रापार पोहोचले.
पुणे कॅम्पात असलेला घाशीराम कोतवालचा ऐतिहासिक वाडा अनेक वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाला. मात्र या वाड्याची माहिती आणि एक छायाचित्र त्या जागी उभे करण्यात आले.
आता अस्तित्वात नसलेल्या या घाशीराम कोतवालच्या वाड्याच्या बाजूला आजही एक जुनी वास्तू आणि शिक्षणसंस्था तग धरुन आहे.
ही शिक्षणसंस्था म्हणजे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा. बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी.
स्थापना सहा जानेवारी १८२७.
याचा अर्थ भारतात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या काही शाळांपैकी ही एक शाळा आहे.
लवकरच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा २०० वर्षे पूर्ण करणार आहे.
भारतात सर्वप्रथम प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या त्या बंगाल इलाख्यात.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला.
त्यानंतर मिस मेरी अँन कुक यांनी 1822 मध्ये कोलकात्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या.
अमेरीकन मराठी मिशनच्या मिशनरींनी भारतात - मुंबईत - १८१२ साली प्रवेश केल्यानंतर लगेच तेथे शाळा स्थापन केल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे १८२३ साली शाळा सुरु केल्या होत्या.
मार्गारेट आणि जॉन विल्सन हे नवविवाहित जोडपे स्कॉटलंडहून भारतात १८२८ साली आले, कोकणात मराठी शिकल्यानंतर मुंबईत येऊन १८३२ साली त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरु केल्या.
मुंबईत आजही असलेली सेंट कोलंबा गर्ल्स स्कुल आणि विल्सन कॉलेज त्यांनीच स्थापन केले.
पुण्यातील या प्राथमिक शाळेची मालकी आता जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे असली तरी ही शाळा जॉन विल्सन किंवा स्कॉटिश मिशनरींनी सुरु केलेली नसणार.
याचे कारण स्कॉटिश मिशनरी तोपर्यंत १८२७ साली दख्खनेत - पुण्यात - पोहोचलेसुद्धा नव्हते.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मार्गारेट आणि जॉन विल्सन आणि इतर स्कॉटिश मिशनरींवर एक प्रकरण लिहिले आहे.
स्कॉटिश मिशनरींशी निगडीत असलेल्या पुण्यातील इतर शिक्षणसंस्था म्हणजे रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन कॉलेज, लाल देवळामागे पेट्रोल पंपाशेजारी असलेली सेंट अँड्रयूज मराठी स्कुल आणि पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटपाशी असलेले सेंट जॉन स्कुल.

Sunday, March 12, 2023

आद्य ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांचे शिक्षणकार्य

अमेरिकन मराठी मिशनच्या गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या तीन व्यक्ती आधुनिक काळात भारतात मुंबईच्या बंदरावर १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवणारे पहिले तीन मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनने देशात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडण्याचे मोठे योगदान त्यांनी केले. त्यांच्यानंतर काही वर्षांतच स्कॉटिश मिशनरींनीही पश्चिम किनाऱ्यावर, पुण्यात आणि -मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.

या शाळा सर्वांना खुल्या होत्या. ख्रिस्ती मिशनरींच्या धोरणांनुसार स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती.
मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी आणि त्यांनी मुलांमुलींच्या शाळा सुरु करणे आणि एत्तदेश्शीयांच्या शिक्षणप्रसारात रस घेणे याचा काय संबंध असा प्रश्न उभा राहू शकतो. अमेरिकन मराठी मिशनच्या धर्मप्रसाराच्या कार्याबाबत १८८१च्या मेमोरियल पेपरमध्ये लिहिताना रेव्हरंड एस. बी. फेयरबँक यांनी यासंदर्भांत म्हटले आहे: ``मिशनरी कार्य करताना मिशनरींनीं तीन बाबींवर भर दिला. त्यापैकी पहिले कार्य होते शिक्षण, दुसरे कार्य होते धर्माची शिकवण आणि तिसरे कार्य होते धर्मशास्त्रे आणि ख्रिस्ती साहित्य मराठी भाषेत छापणे. ‘’
श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे : ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती, प्रथम त्यांना शिक्षक मिळण्यात अडचण पडली. पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्यांना मिळाले व ते व्हर्नाक्युलर शाळांत शिकवू लागले. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’ हिंदुस्थानात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व जातीधर्माच्या आणि स्त्री-पुरुषांना साक्षर करणाऱ्या आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.’’
सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ``ख्रिश्चन मिशनऱ्यांनीं खाजगी प्रयत्नांचे बळावर बंगाली मुलींना सार्वजनिक शाळा काढून देण्याचा प्रयत्न केला होता (इ. स. १८१९ व १८२४ मध्ये),'' ``इ.स. १८२१ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्त्यामधील मुलींच्या शाळेत संपूर्ण वेळ शिक्षकाचे काम करण्यासाठी म्हणून कु. मेरीअँन कुक या इंग्लंडहून मुद्दाम आल्या होत्या व याच शाळेतून त्या इ स, १८४५ ला सेवानिवृत्तही झाल्या होत्या.''
सरोजिनी बाबर पुढे लिहितात : इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनऱ्यांनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय. त्यानंतर दोनतीन वर्षांतच मुलींच्या शाळांनीही संख्या नवावर गेली व सुमारे ३०० मुली शिक्षण घेऊ लागल्या. इ स १८२९ मध्ये विद्यार्थिनींची संख्या ४०० वर गेली. त्या वेळच्या एका शाळेस जोडून मुलींचे वसतिगृहदेखील होते हे विशेष होय. ही शाळा मुंबईत भायखळ्यास चालू होती.''
अमेरिकन मराठी मिशनची भायखळ्याची ही शाळा आणि वसतीगृह सिंथिया फरार चालवत होत्या.
``इ स १८३०च्या सुमारास हिंदुस्थानभर खास मुलींच्या अशा तीस एक तरी शाळा स्थापन झाल्या होत्या आणि त्यांमधून ५०० च्या आसपास मुली शिक्षण घेत होत्या ही वस्तुस्थिती आहे. मिस कुक (मिसेस विल्सन ) यांच्या प्रयत्नामुळे इ स १८४० मध्ये बंगाल इलाख्यात ५०० मुली शिक्षण घेत होत्या हेही विशेष होय. त्याच साली प्रसिद्ध झालेल्या शिक्षण खात्याच्या वृत्तांतातील माहितीवरून त्यावेळी पुण्यात मुलींच्या पाच शाळा होत्या असे दिसते,'' असे सरोजिनी बाबर यांनी लिहिले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध' या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली. जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीहि तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या. .
विल्सनची पत्नी मार्गारेट हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागली. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे तिने ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या. १८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असे, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.
मार्गारेटने पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. प्रामुख्याने मराठी माध्यम होते. विल्सनने २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत. हिंदुस्थानात अशा प्रकारे पहिल्यांदाच आधुनिक शिक्षणाचा पाया रचला जात होता. १९ एप्रिल १८३५ला मार्गारेटचे मुंबईतच निधन झाले.
रेव्हरँड आय बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या सुरुवातीपासून १८१३ ते १८८१ पर्यंत शैक्षणिक कार्याच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.
सावित्रीबाई फुले यांचे एक चरित्रकार असलेल्या मा. गो. माळी यांनी महात्मा फुले गौरव ग्रंथातल्या `क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले: काळ व कर्तृत्व' या लेखात म्हटले आहे:
`` एकोणिसाव्या शतकात स्त्री व अतिशूद्र यांच्या शिक्षणाचे कार्य करणे किती महाकठीण काम होते याची कल्पना येते. त्यातल्यात्यात पुण्यासारख्या ठिकाणी मुलांसाठी व अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करणे आणि ती चालवून दाखविणे म्हणजे तर एक दिव्यच होते, प्राणावरचा प्रसंग होता. कारण पुणे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील भटभिक्षुकांच्या भाकड व भोगळ लोकांचे माहेरघर, भटभिक्षुक निर्मित धर्म व धर्माचाराची राजधानी. मग अशा ठिकाणी स्त्रीशूद्रांना शिक्षण देण्यासाठी शाळा चालू करणे हे तत्कालीन मिशनरी लोकांनासुद्धा जमले नाही. मिस (मेरी अँन ) कुक यांनी १८२० साली बंगालमध्ये काही शाळा चालू केल्या. त्यानंतर त्या १८२९ साली मुंबईस आल्या. त्यांनी मि. वुईल्सन साहेबाशी लग्न केले. त्या मिसेस वुईल्सन झाल्या. मुंबई इलाख्यात त्यांनी सहा शाळा काढल्याची नोंद आढळते. त्या बाई मोठ्या जिद्दीच्या व कल्पक होत्या. पण पुण्यामध्ये मात्र त्याची डाळ शिजली नाही. १८३० साली पुण्यात त्यांनी शनिवारवाडयात शाळा काढल्याचा दाखला मिळतो. सरकारने ही जागा दिली होती. बार्ट फ्रिअर हा मिशनरी म्हणतो की या शाळेत फक्त आठ मुली येत होत्या. त्या ५-६ वर्षांपेक्षा मोठया नव्हत्या. तरीपण त्यांना शिकविण्याचे काम फार गुप्तपणे चाले. त्या शाळेत मुली शिकायला लपत-छपत येत व शाळेतून बाहेर पडताच चोरट्यासारखे घरी निघून जात. ही शाळा कशीबशी १८३२ पर्यंत चालली. शेवटी यशस्वी म्हणून गाजलेल्या मिसेस वुईल्सन हिला ती बंद करावी लागली.
त्या दरम्यान नुकत्याच खिस्ती झालेल्या मोडक नावाच्या व्यक्तीने महार- वाड्यात एक मुलीची शाळा काढली. परंतु कर्मठ भटभिक्षुकांनाही मागे टाकणान्या रुढीप्रिय शूद्र-अतिशूदांनी ती बंद करण्यास भाग पाडले. १८४४ साली चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनने मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली, तीत पुरोपियन शिक्षिका व पुरेशी साधनसामग्री अशी सर्व सोय केली होती. परंतु १८४७ साली ही शाळा बंद पडली. या तपशीलावरून पुण्यामध्ये एकोणिसाव्या शतकात स्त्री व शूद्र यांच्यासाठी शाळा सुरू करून त्यापुढे चालविण्याचा सर्व प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येईल.’’
याच काळात अमेरीकन मराठी मिशनचे रेव्हरंड अँलन ग्रेव्हज आणि त्यांच्या पत्नी मेरी हे दाम्पत्य अनेक वर्षे महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी मुलींच्या शाळा चालवत असत.
`सावलीचा शोध' या पुस्तकात नरेंद्र चपळगावकर यांनी स्कॉटिश मिशनच्या शिक्षणकार्याविषयी माहिती दिली आहे. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली. बाणकोट आणि हर्णै येथे १८२९ च्या दरम्यान स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या असे चपळगावकर यांनी लिहिले आहे.
अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडण्यात आली. देशाच्या या भागात मुलीची ही पहिलीच शाळा होती. गंगाबाई या नावाच्या एक भारतीय शिक्षिका या शाळेत शिकवत असत. मुलींची ही शाळा उघडताच मुंबईतल्या दोन ब्रिटिश महिलांनी या शाळेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीत मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. मृत गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने ही शाळा बंद करावी लागली.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या वर्धापनानिमित्त एका अहवालात मिसेस एल. एस. गेट्स लिहितात : ``माझ्या माहितीनुसार मुलींसाठी पहिली शाळा पश्चिम भारतात १८२४ साली स्थापन करण्यात आली. गंगा या नावाच्या मुलीला मिशनरी महिलांनी शिकवले होते. मुलींच्या या पहिल्या शाळेत शिकवण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. काही ब्रिटिश महिला आणि पुरुषांनी या शाळेचा आर्थिक भर उचलण्याची तयारी दाखवली होती. मात्र कॉलरा साथ आली आणि निष्ठावान गंगा यांचा या प्राणघातक रोगाने बळी घेतला.''
या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो असे अमेरिकन मराठी मिशनच्या या वर्धापनावेळी सांगितले गेले. या गंगाबाई स्वतः कुठे शिकल्या होत्या? स्त्रीशिक्षणाबाबत प्रचलित समाजात अत्यंत प्रतिकूल भावना असताना या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याचे धाडस त्यांनी कसे केले? अशी अनेक प्रश्ने काळाच्या उदरात गडप होऊन आतापर्यंत अनुत्तरित राहिली आहेत असे या अहवालात म्हटले आहे.
यदाकदाचित भविष्यकाळातील संशोधनातून देशातील आधुनिक काळातील या पहिल्यावहिल्या एतद्देशीय शिक्षिकेबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल.
अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत टाऊन हॉल येथे ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झालेल्या शताब्दीसोहोळ्यात भारतीय ख्रिश्चनांच्या वतीने बोलताना बापुराव एन आठवले (बीए, एलएलबी, जेपी) यांनीं म्हटले होते ``
``भारतीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने येथे बोलताना अमेरीकन मराठी मिशनच्या आमच्या बंधूंनीं केलेल्या कार्याचे आम्ही कौतुक करतो आणि या मिशनच्या शताब्दी सोहोळ्यात आनंदाने सहभागी होत आहोत. या मुद्द्यावर बोलत असताना या देशात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनचे आपण सर्वांनी स्तुती करावी असे मी तुम्हा सर्वांनां आवाहन करत आहे. गॉर्डन हॉल आणि सॅम्युएल नॉट यांच्या १८१३ सालच्या आगमनानंतर केवळ अकरा वर्षातच भायखळा येथे मुलींची पहिली शाळा गंगाबाई नावाच्या महिला शिक्षिकेच्या देखरेखीखाली सुरु झाली.. त्याकाळी अंधश्रद्धेच्या खडकातून बाहेर पडलेला हा पाण्याचा झरा वाढत्या ताकदीने देशाच्या कानाकोपऱ्यांत इतक्या प्रमाणात वाढला आहे कि आता आपण पाहतोच आहे कि महिला हल्ली त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलेजेस आणि विद्यापीठे उघडण्यात यावी यासाठी संघर्ष करत आहेत.''
``मराठीत उपलब्ध असलेल्या एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासाचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा भारतात झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या आगमनाने येथील एकूण जीवनांत जे काही बदल झाले त्यांचा सविस्तर, साद्यन्त, तर्कशुद्ध आणि तटस्थ इतिहासच लिहिला गेला नाही याची आपणास जाणीव होते असे ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक सुधीर रसाळ यांनी म्हटले आहे.
`` भारताच्या सामाजिक इतिहासाची कितीतरी सामग्री ख्रिस्ती साहित्यात दडलेली आहे. जोपर्यंत ख्रिस्ती साधनसामुग्रीचा वापर करून एकोणिसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जात नाही तोपर्यंत तो पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही,’’ असे सुधीर रसाळ यांनी माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या `सावलीचा शोध’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
ही टिपण्णी सर्वार्थाने खरी आहे याची प्रचिती अमेरीकन मराठी मिशनच्या कार्याचा आणि या संस्थेने मागे ठेवलेल्या अमूल्य दस्तऐवजांचा अभ्यास करताना येते.
मुंबईत भायखळा इथली मुलीची ही पहिली शाळा बंद पडल्यावर लगेचच पुन्हा नव्या जोमाने मुलींची शाळा उघडण्याचे प्रयत्न झाले.
हिंदुस्थानात ब्रिटिश अमदानीत सर्वप्रथम आगमन केलेल्या आणि या देशात पहिल्यांदाच मुलं-मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांचे २० मार्च १८२६ रोजी वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी नाशिकजवळ दोडी दापुर या गावी निधन झाले, हा अमेरिकन मराठी मिशनला मोठा धक्का होता.
त्यानंतर अमेरिकेतून या मिशनच्या आणखी काही मिशनरींचे मुंबईत आगमन झाले. डेव्हिड ओ अँलन, त्यांच्या पत्नी एज्युबा अँलन, सायरस स्टोन, त्यांच्या पत्नी अँटोसा स्टोन यांचे २९ डिसेंबर १८२७ रोजी आगमन झाले होते आणि त्यांच्या बरोबर आणखी एक व्यक्ती होती.
ती व्यक्ती म्हणजे स्टोन यांच्या जवळच्या नातेवाईक, बहुधा चुलतबहिण, (कझन ) असलेल्या मिस सिंथिया फरार. हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्या अविवाहित महिला ख्रिस्ती मिशनरी.
सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या या शिक्षिका.
(पूर्वार्ध)