आचारसंहितेचा भंग
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातून १९७१ साली झालेली निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७५ साली रद्द ठरवली ती निवडणुक प्रचारात त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून आणि आचारसंहितेचा भंग झाला होता म्हणून.
त्यानंतर मोठा गदारोळ झाला, त्याचीच परिणती आणीबाणी लादण्यात झाली हे सर्वांना माहिती आहेच.
त्यानंतर इंदिराबाईंचा निवडणुकीत पराभव झाला पण त्या हिरीरीने परत जनतेकडे गेल्या.
नंतर मिरामार बिचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर त्यांचे भाषण ऐकले.
आजी आणि माजी पंतप्रधान असलेल्या इंदिराबाई यांच्यासह राजीव गांधी, व्ही पी सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी हस्तांदोलन करण्याची, पत्रकार परिषदेत संवाद साधण्याची आणि सभेत त्यांचे भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली आहे.
मात्र पंतप्रधानपदी असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याबरोबर अर्धा पाऊण तास पुणे विमानतळावरच्या एका छोट्याशा केबिनमध्ये बोलण्याची संधी मला मिळाली.
बरोबर फक्त ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम होते, आणि पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्र जनता दलाच्या अध्यक्ष मृणाल गोरे होत्या.
साल होते १९९०.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग एअर इंडियाच्या प्रवाशी विमानाने पुण्याला आले होते.
निवडणुक आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून.
सोलापूर जवळ कर्नाटकमधील एका पोटनिवडणुकीच्या आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी ते आले होते. पंतप्रधान म्हणून सरकारी विमानाचा वापर त्यांनी टाळला होता.
दिल्लीचे विमान संध्याकाळी होते म्हणून पंतप्रधान विमानतळावर ताटकळत बसले होते.
पंतप्रधान आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी आले असल्याने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) पत्रकारांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाहन व्यवस्थाही केली नव्हती.
त्यावेळी मी इंडीयन एक्स्प्रेसला होतो. मुकुंद संगोराम यांच्या स्कूटर वर बसून त्या रविवारी दुपारी एकच्या आसपास घाईघाईत मी विमानतळावर पोहोचलो होतो.
बोफोर्स प्रकरण उचलून धरणारे सिंग हे त्याकाळी `मिस्टर क्लीन' म्हणून प्रसिद्ध होते.
प्रवाशी विमानाने प्रवास करून पंतप्रधानांनी आपला वेळ वाया घालवू नये असे त्यावेळी काही वृत्तपत्रांनी म्हटले होते.
लोकशाही प्रथेत निवडणुक आचार संहिता हा तसा एक खूप मोठा प्रभावी वचक आहे..
Camil Parkhe
No comments:
Post a Comment