जॉन मरे मिचेल``स्कॉटलंडमध्ये (रॉबर्ट ) बर्न्स इतका लोकप्रिय नसेल जितके तुकाराम ( ते स्वतःला तुका असेच संबोधतात) महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.'' इति जॉन मरे मिचेल
संत तुकाराम यांचे अभंग इंग्रजीत भाषांतर करणारे, संत ज्ञानेश्वर यांची आणि तुकोबांची एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य जगाला ओळख करून देणारे जॉन मरे मिचेल बहुधा पहिलीच युरोपियन व्यक्ती.
महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा इतिहास जॉन मरे मिचेल यांना डावलून पूर्ण होणार नाही इतके या स्कॉटिश मिशनरीने सुरुवातीला मुंबई-पुण्यात आणि नंतर काही वर्षे
कोलकात्यात विविध क्षेत्रांत कार्य केले आणि विपुल प्रमाणात विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.
असे असले तरी जॉन मरे मिचेल हे नाव तसे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचे अभ्यासक आणि संशोधक असलेल्या तज्ज्ञांनासुद्धा फारसे परिचित नाही.
खरे सांगायचे झाल्यास मीसुद्धा हे नाव एक वर्षांपूर्वी ऐकलेसुद्धा नव्हते.
जॉन मरे मिचेल यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकले तेव्हा काही काळ मरे मिचेल या शाळेत शिक्षक होते.
अर्थार्जनासाठी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत जोतिबा १८५२ नंतर काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करत असत.
पुण्यात मरे मिचेल यांनी १८६२च्या सुमारास केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालवली.
जॉन मरे मिचेल यांना टाळून महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याचे जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही
एक संदर्भ म्हणून जॉन मरे मिचेल यांनी आपल्या विविध पुस्तकांत लिहिलेल्या या नोंदींना अतोनात महत्त्व आहे.
ही सर्व इंग्रजी पुस्तके अर्थातच स्कॉटलंडमध्ये प्रकाशित झाली होती. त्यामुळेच बहुधा स्थानिक अभ्यासकांचे या मौल्यवान ग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असावे. .
जॉन मरे मिचेल (१८१५ ते १९०४) असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते.
जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे :
``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’
पुण्यात १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे मरे मिचेल हे या संस्कृत कॉलेजचे (नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे ) काही काळ प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे १८३८ च्या नोव्हेंबर भारतात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी कृष्णशास्त्री यांच्या हाताखाली मराठीचा अभ्यास केला. रेव्ह. जॉन स्टिव्हन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास केला.
प्राचीन मराठी वाड्यमयाचा अभ्यास करून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. बायबलचे मराठी भाषांतर सुधारण्यात त्यानीं मोठे योगदान दिले.
स्कॉटिश मिशनरी अलेक्झांडर डफ १८३५ ला विश्रांतीसाठी मायदेशी परतले त्यावेळी एडिनबर्ग कॉलेजात शिकत असलेल्या जॉन मरे मिचेल त्यांना भेटले.
या तरुणाला मिशनकार्याची आवड आहे हे पाहून `आता लगेच माझ्याबरोबर भारतात ये' असे रेव्ह. डफ मरे मिचेल यांना म्हणाले. मात्र मरे मिचेल यांनीं एडिनबर्ग येथील आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर तीन वर्षांनी मरे मिचेल यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्कॉटलंडच्या मिशन अधिकाऱयांनी मरे मिचेल यांना कोलकात्याऐवजी मुंबईत मिशनकार्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात रेव्हरंड अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर काम करण्याची आपली इच्छा पूर्ण होणार नाही हे कळून मरे मिचेल काहीसे नाराज झाले होते.
मात्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कधी कुणाला कल्पना असते?
स्कॉटलंडमध्ये कॉलेजात शिकत असताना आलेल्या एका अनुभवाचे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``माझ्या या ईशज्ञानाच्या चौथ्या किंवा अखेरच्या वर्षाला मी ग्रामर स्कुलच्या एका वर्गाला शिकवले. शाळेतल्या एका शिक्षकाने अचानक काम सोडले होते आणि दुसऱ्या शिक्षकाची लगेच नेमणूक करणे नव्हते. रेक्टर डॉ. मेल्विन यांनी मला एक वर्षासाठी त्या एका वर्गात शिकवण्याची मला विनंती केली.. मला ते काम खूपच आवडले आणि त्या वर्गात मला कधीही कुणाही व्रात्य विद्यार्थ्याला बडवण्याची वेळ आली नाही याचा मला विशेष अभिमान वाटला. वर्गातल्या त्या छोट्या मुलांना हाताळणे मला सहज शक्य झाले.''
स्कॉटलंडमधील हा अनुभव मरे मिचेल यांना पुण्यात आणि शेजारच्या परिसरांत ख्रिस्ती धर्माची लोकांना शिकवण देण्याच्या कामात फायदेशीर ठरला असावा.
मरे मिचेल आणि इतर ख्रिस्ती मिशनरी प्रवचनासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांची टिंगलटवाळी होत असे.
भारतात आल्यानंतर आपण खिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कायकाय प्रयोग केले याचे वर्णन जॉन मरे मिचेल यांनी केले आहे :
``आपल्या स्वतःच्या घराच्या आवारात इतरांना आपला धर्म शिकवताना आपण आपले स्वतःचे नियम आणि अटी लागू करू शकता. अशावेळी तुम्हाला कुणी व्यक्ती त्रास देण्याची शक्यता नसते. मात्र आपल्या घरापासून दूर, परक्या स्थळी आणि रस्त्यांवर ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्यासाठी इतरांना न दुखावण्याचे खास कसब, अमर्याद सहनशीलता आणि खूप संयम असणे अत्यावश्यक असते.
यासाठी मी एक मार्ग निवडला होता. समुद्रकिनाऱ्यावर सकाळी लोक जमलेले असताना घोड्यावर बसून मी तेथे जात असे आणि त्या लोकांना प्रवचन देत असे. जोपर्यंत तो जमाव शांतपणे माझे बोलणे ऐकत असे तोपर्यंत माझे प्रवचन चालू असायचे. त्या लोकांनी गोंधळ करायला सुरु केले तर मी लगेच माझा घोडा दुसरीकडे नेऊन तेथे पुन्हा नव्याने प्रवचन सुरु करत असे.
प्रवचनाच्या दरम्यान अधेमध्ये एखाददुसरा प्रश्न आला तरी काही बिघडत नसे. मात्र हे लोकसुद्धा गडबडगोंधळ करू लागले कि मी माझा घोडा पुन्हा एकदा नव्या दिशेने नेत असे. ‘’
भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणाबाबत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लीम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत जॉन मरे मिचेल लिहितात :
``मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.
सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता. या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती.
त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती, ‘’ असे जॉन मरे मिचेल यांनी म्हटले आहे.
मात्र केवळ मुस्लीम मुलींसाठी पुण्यात चालवली जाणारी ही तशी अगदी पहिलीवहिली शाळा नव्हती. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३०ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. त्यानंतर स्कॉटिश मिशनच्या सुरुवातीच्या काळात पुण्यात रेव्हरंड वजिर बेग यांनी मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती.
पुना कॉलेजचे प्राचार्य असलेले मेजर थॉमस कँडी काही काळासाठी आपल्या मायदेशी जाणार होते, कँडी यांच्या गैरहजेरीत यांनी या कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्यांना विनंती केली.
आपल्या आत्मचरित्रात जॉन मरे मिचेल लिहितात:
``हो-ना असे करत अखेरीस करत मी ते पद स्वीकारण्याचे ठरवले. कॉलेजच्या इंग्रजी विभागात मी आठवड्यातून दोनदा नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असे. माझ्या या वर्गांत हजेरी ऐच्छिक होती. असे असले तरी प्रगतशील असलेले तीस लोक या व्याख्यानाला नियमितपणे उपस्थित राहत असत आणि ते सर्वच जण खूपच .चांगले वागत असत.
मी असे ऐकले होते कि पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा या संस्कृत कॉलेजचे प्रिंसिपल म्हणून एक युरोपियन (मेजर थॉमस कँडी) व्यक्तीची नेमणूक करण्यात आली तेव्हा त्यांच्या आगमनाच्यावेळी प्रवेशद्वारात अडथळे उभारण्यात आले होते. आणि आता माझी म्हणजे एका मिशनरीची अधिकृत व्हिझिटर म्हणून नेमणूक झाली असताना या लोकांचा प्रतिसाद वेगळा असा काय असणार होता?
मात्र या संस्कृत कॉलेजातील पंडित माझ्याशी खूपच अगत्याने वागले आणि या अगत्याचा प्रतिसाद अगत्यानेच द्यायचा असेच माझे धोरण होते. ‘’ .
महात्मा जोतिबा फुले यांनी रेव्ह. जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत एक महार मुलगा पाठवला होत्या, त्या अस्पृश्य मुलाची हृदयदावक कहाणी मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.
जोतिबा आणि जॉन मरे मिचेल यांच्या संदर्भातील ``चटईचाही विटाळ’ ही घटना धनंजय कीर यांनी महात्मा फुले चरित्रात पुढील शब्दांत सांगितली आहे:
``माझे स्नेही जोतीराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हित व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हीन जातीचे.
जोतीरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठविला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्याइतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता.
त्याला शाळेत प्रवेश देताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्या मुलांचे काळेभोर डोळे चकाकत होते आणि त्यांचे हावभाव मनातील हेतू प्रदर्शित करीत होते.
ते म्हणाले, "तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत.'
मी म्हणालो, "अरे, मला वाटते एकच मुलगा आहे."
"होय. एक काय आणि दहा काय, सारखेच."
"मग काय त्या मुलाला हाकलून देऊ?"
"ते आम्हाला काय सांगता? आमचे म्हणणे एवढेच की, तो राहिला तर आम्ही जाणार!"
"तुमची इच्छा नसेल तर त्याला तुम्ही शिवू नका. तुम्ही वर्गातील हुशार मुले आहात, तुमचा क्रमांक नेहमी वरच असणार, तो वेगळ्या बाकावर बसतो.'
"ते खरे, परंतु चटई जमिनीवर असते ना? तिचा विटाळ आम्हांस होतो. आता सर्वांना विटाळ झाला आहे. आता घरी जेवणापूर्वी स्नान करून हा विटाळ घालविला पाहिजे."
"मी ती चटई काढून टाकावी अशी तुमची इच्छा आहे का ?"
"आम्ही वर्गातच नसतो तर बरे झाले असते."
"ठीक तर. काही झाले तरी मी त्या मुलाला वर्गाबाहेर हाकलून देऊ शकत नाही."
मी अगदी गोंधळून गेलो. एक तर ब्राह्मण मुलांना हाकलून देण्याची माझी इच्छा नव्हती आणि माझ्या सदसदविवेकबुद्धीप्रमाणे मी त्या महार मुलालाही शाळेतून बाहेर काढू शकत नव्हतो.
मी म्हणालो, "उद्यापर्यंत थांबा. वर्गांची उद्या फेररचना करू आणि तशातही तुम्ही आता वरच्या वर्गात उत्तीर्ण होऊन जाणार."
हा ना करता ब्राह्मण मुले दुर्मुखलेल्या चेहेऱ्यांनी निघून गेली.
तो महार मुलगा शाळेत फिरून आलाच नाही.
पाण्याच्या बाहेर माशाची जशी स्थिती होते तशीच त्याची हया शाळेत झाली. इतर उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय मुलगे या बाबतीत अचल राहिले. ’’
जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रातली दुसरी एक घटना धनंजय कीर यांनी आपल्या जोतिबा फुले यांच्या चरित्रात सांगितली आहे. कीर यांनी लिहिले आहे :
``कनिष्ठ वर्गाच्या उद्धाराविषयी उदासीनवृत्ती दिसून येत होती, तरी त्या वर्गातील काही मुलांनी त्या काळी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला.. रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली.
त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत.
आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
मरे मिचेल १८६३ साली कोलकात्याला अलेक्झांडर डफ यांच्याबरोबर मिशनकार्य करण्यासाठी गेले होते. आता खूप वर्षानंतर मरे मिचेल यांना आपली मनिषा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती.
भारतातील म्हणजे मुंबई, पुणे आणि नंतर कोलकाता येथील आपल्या मिशनकार्यांची समाप्ती करुन जॉन मरे मिचेल आपल्या पत्नीसह मायदेशी स्कॉटलंडला परतले. त्यानंतरसुद्धा भारतातील अनेक व्यक्तींशी आणि जोतिबा फुले यांच्याशी त्यांनी संपर्क ठेवला होता.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस जोतिबा अर्धांगवायुने बिछान्याला खिळले तेव्हाही मरे मिचेल यांनी त्यांना स्कॉटलंडहून पत्र लिहिले होते.
जोतिबा, जेम्स मिचेल आणि मरे मिचेल या तिघांचेही स्नेही असलेल्या बाबा पद्मनजी यांनी जोतिबांवर लिहिलेल्या मृत्युलेखात जोतीरावांचे जेम्स मिचेल आणि मरे मिचेल यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``त्यास (जोतिबा फुले यांना) ख्रिस्ती धर्माविषयी पुष्कळ ज्ञान होते, ते त्यास त्यांचे जुने मित्र रे. जेम्स मिचेल व डॉ.मरे मिचेल व त्यांची पत्नी हयांपासून प्राप्त झाले होते. डॉ.मिचेलसाहेब हयांनी तर थोडया महिन्यामागे स्कॉटलंडांतून त्यांस पत्र पाठवून त्यात त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाची कळकळ दर्शविली होती. ‘’
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांना ८९ वर्षे इतके दीर्घायुष्य लाभले. मायदेशी परतल्यावरही त्यांनी भारताविषयी पुस्तके लिहिणे चालू ठेवले.
एका पुस्तकाच्या अखेरीस ताजा कलम म्हणून काही शब्द..
या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकांपैकी हारमदजी पेस्तनजी आणि डॉ नारायण शेषाद्री यांचे त्यांच्या श्रद्धापूर्वक परिश्रमानंतर निधन झाले आहे. सन १८३९ साली ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता ते धनजीभाई नौरोजी ते आजही हयात असून ज्येष्ठ मिशनरींमध्ये त्यांच्या समावेश होतो, सगळीकडे त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जात असते.
बाबा पद्मनजी आज खूप वयोवृद्ध झालेले असले तरी त्यांची लेखणी आजही थकलेली नाही. मराठी बायबलच्या सुधारित आवृती आणण्यासाठी ते कार्य करत आहेत.
आमच्या शाळेचे दुसरे एक विद्यार्थी गणपतराव आर नवलकर यांनी भरपूर आणि उत्तम साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले मराठीचे व्याकरण खूप विस्तृत स्वरूपाचे आणि चांगल्या दर्जाचे आहे.
माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींचे निधन होऊन मी मात्र अजूनही हयात आहे याबद्दल कधीकधी मला आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, गार्डनर, स्टोथर्ट आणि स्मॉल हे खूपच आदरणीय मिशनरी होते.
पुण्यात मी दुसऱ्यांदा राहायला आलो तेव्हा श्रीयुत गार्डनर हे खूप जवळच्या नात्याचे माझे सहकारी होते.''