Did you like the article?

Showing posts with label Bangda. Show all posts
Showing posts with label Bangda. Show all posts

Friday, January 19, 2024


बांगडा:

आजकाल बाजारात बांगडा नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकारात मिळतो आहे. आणि बऱ्यापैकी स्वस्त. इतर कुठल्याही मासळीपेक्षा मला स्वतःला बांगडा अधिक आवडतो.

याचे कारण म्हणजे साफ करायला, तळायला आणि करीमध्ये वापरायला बांगडा मला अधिक सोयिस्कर वाटतो. अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणाजे चवीबद्दल तर काय बोलणार? .
ओले बोंबिल पण मला आवडतात. तेसुद्धा साफ करायला एकदम सोयिस्कर. मात्र तळायला भयंकर वेळ लागतो आणि रात्री आपण घाईत असलो तर अशा प्रकारचे वेळखाऊ मासे नकोच वाटतात.
तर काल संध्याकाळी एक किलो बांगडा घेतले, त्या किंगसाईझ आकारामुळे किलोत जेमतेम सहा आले.
बांगडा मी नेहेमी दुकानातून साफसूफ आणि पूर्ण डोके कापून घेतो, मात्र चिरे न मारता. त्यामुळे घरी आल्यावर पुन्हा एकदा ते साफ करता येतात. कल्ले वगैरे नीट साफ करता येतात,
काल घरी साफ करताना काही बांगड्याच्या पोटांत जाडजूड अंडी मिळाली. ही अंडी सुद्धा तळून चवीने खाल्ली जातात हे मला माहित आहे मात्र मी स्वतः खात नाही. तरीही ती अंडी टाकून देताना वाईट वाटलेच.
मागे एकदा एका जणाला कोंबडीच्या पाचसहा अंडयांतील पिवळे बलक (हानिकारक किंवा कोलेस्ट्रॉल असणारे म्हणून) असेच टाकून देताना पाहिले होते आणि वाईट वाटले होते, त्याची आठवण झाली.
तर मग बांगडे चिरून, त्यावर मस्तपैकी मसाला चोपडून मंद आचेवर तळून घेतले. अन मग ...
यापैकी तळलेले काही बांगडे करीसाठी वापरले. ओले खोबरे घालून तयार केलेली फिशकरी आणि राईस माझी एक आवड आहे.
Camil Parkhe January 18, 2024

Sunday, July 30, 2023

 



दिड-दोन महिन्यांआधी शंभर किंवा दिडशे रुपये किलो असणारे ओले बोंबील काल साडेतीनशे रुपये किलो होते, माझा आवडीचा `ऑल टाइम फेवरेट' असलेला बांगडा मे महिन्याअखेरीस शंभर रुपये किलो होता, त्याची किंमत सुद्धा आता साडेतीनशेच्या आसपास होती.सहज म्हणून चौकशी केली. सुरमई, रावस प्रत्येकी हजार रूपये किलो. नदीतले काही मासे होते, काळेकुट्ट रंगाचे काही खेकडेपण होती पण त्याबद्दल मी काही चौकशी केली नाही.

जिथे जायचे नाही त्या गावाच्या वाटेची कशाला चौकशी करायची ?

ज्याच्याकडून मी नेहेमी (रविवार सोडून- त्यादिवशी केवळ चिकन ) मासे घेतो तो आमच्या घराशेजारचा मासळी दुकानदार पक्का व्यवहारी, धोरणी आहे. दर सोमवारी आणि महिन्यातील काही विशिष्ट तिथी -सणावारी तो दुकान बंद ठेवतो. अनायसे त्याला आणि कामगारांना सुट्टी मिळते आणि धंद्यातला तोटाही वाचतो.कालचीच गोष्ट पाहा ना.

संध्याकाळी घरी तळण्यासाठी काही न्यावे म्हणून दुकानात गेलो तर 'पुढील आठ दिवस अमुकअमुक तारखेपर्यंत दुकान बंद राहील' अशी पाटी होती.खूप हिरमोड झाला. वर्षातून याच काळात जेव्हा मालाची आणि गिऱ्हाईकांचीही आवक कमी असते नेमके तेव्हाच हा दुकानदार धार्मिक पर्यटन, भटकंती अशी विविध कामे उरकून घेत असतो.


र हमरस्त्यावरच्या या दुसऱ्या दुकानात मी गेलो, तिथे प्रत्येक माशांच्या प्रकारांची किंमत त्या-त्या कंटेनरवर लिहिली होती. मॉलमध्ये असते तशी.आणि मासळीची किंमत काहीही असली तरी अनेक बायापुरुष रांगा लावून, हातांत ट्रे घेऊन आपल्याला हवी ती मासे घेत होती, वजन करायला आणि पैसे द्यायला गल्ल्याकडे जात होती.मासे आणायला गेलो की मला हमखास गोव्यातल्या पणजी फिश मार्केटची आठवण येते.

पणजीतल्या आमच्या The Navhid Times इंग्रजी  दैनिकाचे मुख्य वार्ताहर दुपारी साडेबाराच्या आसपास अगदी शेजारीच असलेल्या या फिश मार्केटमध्ये जायचे. त्याआधी शिपायाकडून प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्रजी किंवा मराठी दैनिकांच्या अंकाची प्रत  मागवायचे आणि त्यात फिश मार्केटमधून मासळी गुंडाळून घेऊन यायचे. स्कुटरच्या डिकीमध्ये ही मासळी ठेवून पर्वरीला ते आपल्या घरी जेवायला आणि दुपारच्या सिएस्ता म्हणजे वामकुक्षीसाठी जायचे.

काही वर्षांनंतर आधी प्रतिस्पर्धी असलेल्या Gomantak Times या दैनिकात ते रुजू झाल्यानंतर मासळी नेण्यासाठी ते काय करायचे हे मला माहित नाही.ताळगावला घरी जाण्याआधी फिश मार्केट मध्ये संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मी जायचो. तिथे बांगडा आणि इतर काही मासळीचे वाटे पसरुन ठेवलेले असायचे. एका वाट्यामध्ये सात आठ बांगडे असायचे. दहा रुपयाला एक वाटा.  बांगडे करी करायला, तळायला सोपे, त्याशिवाय एकच सरळ, मोठा काटा.

हल्ली दहा रुपयाला वाट्यामध्ये मिळणाऱ्या सात-आठ बांगडे माशांची आठवण तशी सुखद वाटते.आणि दुसरे एक.  गोव्यात जसा समान नागरी कायदा शंभर वर्षांपासून, पोर्तुगीज राजवट असल्यापासून, अंमलात आहे, त्याचप्रमाणे तिथे जवळजवळ बहुसंख्य लोक अगदी प्रेमाने, आवडीने मासळी खात असतात. मासळीबाबत अलिखित समान खाद्य संस्कृती ! बंगाली लोकांप्रमाणेच.

अर्थात काही दिवसांचा आणि सणावारांचा तिथेही अपवाद असतोच.काल नेहमीपेक्षा तिपटीने अधिक मासळीची किंमत देऊन मी आलो आणि सहज लक्षात आले.सद्या टमाटे खूप महाग झाले याविषयी सगळीकडे चर्चा झाली, होत आहे, तशी मासळीच्या तात्पुरत्या वाढलेल्या किंमतीची झालेली नाही. 

बहुधा होणारही नाही.

Esakal link 

https://www.esakal.com/blog/price-hike-in-fish-bangda-tomato-inflation-goa-fish-market-kbn00