उपवासकाळ  किंवा लेन्ट सिझन 
उपवासकाळ म्हटले कि हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड  फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते.  येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला  'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या.  
या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता.    
भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच)  या  संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर  तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो.   
माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा,  शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले. 
पूर्ण वर्षभर शुक्रवारी घरात नेहेमी होणारे बिफ कधीही खाल्ले जात नसे, त्याऐवजी ताजे मासे किंवा सुके बोंबील यासारखे कुठलेही सुके मासे चालायचे, उपवासकाळात शनिवारी आणि बुधवारी मात्र बिफचे कालवण वर्ज्य नसायचे यामागचे तार्किक कारण मला कधीच कळाले नाही.       
उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक (ऑब्लिगेटरी) आहे.  आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही.  
हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात. 
उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, याकाळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे रंगाचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात. 
श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी  धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता !  
इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिमात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, पेनान्स म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहेमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादेवेळेस आवडत्या फळांचे  किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. 
दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे.     
माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे. 
त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी  उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे  अशा गोष्टी मी टाळल्या आहेत. 
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे.    
मध्ययुगीन इन्क्विझिशनच्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत  कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की.  
विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने  कर्मठ  कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल.अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे  नाही .     
या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते. 
यावेळी १० एप्रिलला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली आहे. 
ख्रिस्ती धर्मातील सर्व पंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात, ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला आहे.  ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी भस्म बुधवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.          
येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत  'होसान्ना, होसान्ना ! '' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले. 
विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे  स्वरुप होते.  येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या  या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती  करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते.  झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक  काढली जाते. 
विशेष म्हणजे  `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात, जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी  झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये ,मधुर चालीत गायले  गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते 
जेरुसलेमी बाळे जमली, 
प्रभुला गाणी गाऊ लागली       
होसान्ना`होसान्ना`होसान्ना 
गाढवावरी येशू स्वार होई 
मधू गाण्यांचा नाद होई 
होसान्ना`होसान्ना`होसान्ना  
बालकांचे ते बोल बोबडे 
रहिवाश्यांच्या कानी पडे 
होसान्ना`होसान्ना`होसान्ना 
शहरवासी डोकावती 
कान देऊन ऐकती 
होसान्ना`होसान्ना`होसान्ना 
पंडितशास्त्री धावून येती 
दडपशाही करु लागती 
होसान्ना`होसान्ना`होसान्ना 
बालकांचे जरी तोंडे दाबिली 
गाण्याची गती तरी नाही थांबली 
होसान्ना`होसान्ना`होसान्ना
पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो दा  व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे.  गोवन चित्रकार अँजेलो  डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले `द लास्ट सपर' हे चित्र इथे मी दिले आहे.  
याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे  ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला  येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. 
मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र  तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.  
चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह  साधारणतः एक तासापुरता असतो ,  गुड फ्रायडेची  प्रार्थना मात्र  थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे  या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहेमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही  प्रार्थना केली जाते.     
लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच  सांगता होते.  बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा.. 
गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो.  ख्रिस्ताच्या दुःखसहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभऱ कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहोळा साजरा करण्यासाठीच.
ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो.    
काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप  बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दयायाचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे.       
जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत  आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची  तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.   
त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे, आता अँश वेन्सडे आणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते,  गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !  
हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना  लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. 
हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.