Did you like the article?

Showing posts with label Ramayana. Show all posts
Showing posts with label Ramayana. Show all posts

Friday, January 19, 2024

फादर कामिल बुल्के !
श्रीरामपूरात आमचे घर मध्यवर्ती भागांत बाजारतळापाशी आहे. शहराची विभागणी रेल्वेच्या अलीकडे आणि पलीकडे अशी होते. दर रविवारी सकाळी आमच्या घरातली सर्व मंडळी देवळाला जाण्यासाठी रेल्वे ओलांडून जर्मन दवाखान्यापाशी म्हणजे संत लूक दवाखान्याकडे जायची.
यानिमित्ताने दर वेळेस आजही बेलापूर रेल्वे स्टेशन असे नाव असलेल्या (`बेलापूर स्टेशन: श्रीरामपूरके लिए यहा उतरीये') रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जाणे व्हायचे.
साठ आणि सत्तरच्या दशकातली ही घटना आहे. वाचायला शिकल्यापासून मुख्य दरवाज्यापाशी वर असलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे.
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून वापरली जावे यासाठी काही महनीय व्यक्तींची वाक्ये त्या फलकावर लिहिली होती. महात्मा गांधी, आचार्य काका कालेलकर वगैरेंची वाक्ये त्यात होती.
यापैकी आचार्य काका कालेलकर यांचा सातारा जिल्ह्यातील नीरा या गावाविषयीचा एक धडा आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता.
त्या फलकावर असलेल्या एका नावाने मात्र मला अचंबित केले होते.
ते नाव होते फादर कामिल बुल्के !
तोपर्यंत माझ्यासारखे `कामिल' हे नाव असलेली इतर कुठलीही व्यक्ती मी पाहिली नव्हती आणि ऐकली नव्हती.
कोण असतील हे फादर कामिल बुल्के असा प्रश्न मनात यायचा. गोव्यात गेल्यानंतर मात्र कामिल नावाच्या कितीतरी व्यक्ती मला भेटल्या.
नंतर फादर कामिल बुल्के हे नाव मी विसरून गेलो. हिंदी राष्ट्रभाषासंबंधी काहीही विषय निघाला कि मात्र हे नाव लगेचच स्मृतीपटलावर लगेच वर यायचे, अजूनही येत असते.
नंतर मी स्वतःच जेसुईट फादर होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात गेलो, तेथेच अनेक वर्षे स्थिरावलो. जेसुईट असलेल्या आणि तेव्हाही हयात असलेल्या या फादर कामिल बुल्केची मात्र कधीच कुठे, पुस्तकांतसुद्धा गाठभेट झाली नाही.
काही वर्षांपूर्वी `मी ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या विषयावर इंग्रजी आणि मराठी पुस्तके लिहिली, तेव्हा अनेक वर्षे ओळखीचे असूनही गायब झालेल्या या फादर कामिल बुल्के यांची अचानक भेट झाली.
पण तोपर्यंत मी स्वतः संन्याशी जेसुईट होण्याचा विचार सोडून गृहस्थाश्रम स्विकारला होता.
मुळचे बेल्जीयम असलेले फादर कामिल बुल्के हे त्यांच्या हिंदी-इंग्रजी डिक्शनरीसाठी प्रसिद्ध आहेत, संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद त्यानीं केला.
संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पंडित असलेल्या या प्राच्यविद्या तज्ज्ञाचा भारत सरकारने पद्मभूषण 'किताब देऊन मानसन्मान केला आहे. राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांनी हा किताब फादर बुल्के यांना प्रदान केला.
त्याशिवाय भारत पारतंत्र्यात असताना हिंदी भाषेतून हिंदीतून डॉक्टरेट करणारे ते पहिलेच संशोधक.
आणि अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट करण्यासाठी फादर कामिल बुल्के यांनीं प्रबंधासाठी विषय निवडला होता " राम कथा : उत्पत्ती और विकास'
ख्रिस्ती धर्मगुरू असलेले फादर कामिल बुल्के हे आजही राम कथा, तुलसी रामायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या राम चरीत मानस या विषयांवरचे तज्ज्ञ समजले जातात.
माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या इंग्रजी आणि मराठी पुस्तकांत फादर बुल्के यांच्यावर एक प्रकरण आहे.
रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंचा हा थोडक्यात परिचय

कहाणी रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 12 h ago
फादर कामिल बुल्के
फादर कामिल बुल्के

 

कामिल पारखे 
 
`रामायण' आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचा एक महान ठेवा. या दोन महाकाव्यांवर विविध दृष्टिकोनांतून आणि पैलूंनी सतत लिहिले गेले आहे. वाल्मिकीकृत रामायण जसे लोकप्रिय आहे तसेच उत्तर भारतात संत तुलसीदास यांनी रचलेले `रामचरितमानस' खूप लोकप्रिय आहे. या काव्याला `तुलसी रामायण' या नावानेही ओळखले जाते. युरोपातून आलेल्या आणि भारतालाच आपली कर्मभूमी बनवणाऱ्या एका ख्रिस्ती धर्मगुरूला या `रामचरितमानस'ने भुरळ घातली अन मग त्यानी अनेक वर्षे या हिंदी काव्यावर मूलभूत स्वरूपाचे मौलिक संशोधन केले. या जेसुईट धर्मगुरूंचे नाव आहे फादर कामिल बुल्के. 

फादर कामिल बुल्के यांचा जन्म १ सप्टेंबर १९०९ रोजी बेल्जियममध्ये झाला. कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी येशूसंघात दाखल होण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. १९३५ मध्ये ते भारतात आले आणि १९४१ मध्ये धर्मगुरू म्हणून त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी संस्कृत विषयात पदवी संपादन केली, त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’.  

विशेष बाब म्हणजे जन्माने युरोपियन असलेल्या फादर बुल्के यांचा हा प्रबंध अलाहाबाद विद्यापीठातील हिंदी साहित्यावरील पहिलाच हिंदी प्रबंध होता. तोपर्यंत भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये प्रबंध हे केवळ इंग्रजीतूनच लिहिले जात असत. रामकथेवर हिंदीतूनच प्रबंध लिहिण्यावर फादर कामिल बुल्के ठाम होते. अखेरीस विद्यापीठाने प्रचलित नियम बदलून हिंदी भाषेतून संशोधनात्मक प्रबंध लिहिण्यास त्यांना परवानगी दिली.  ही घटना आहे १९४५ ची. 

जन्माने बेल्जियम आणि ख्रिस्ती धर्मगुरु असलेल्या फादर कामिल बुल्के यांना १९४९ मध्ये हिंदी भाषेतील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा मान मिळाला. फादर बुल्के यांचा हा प्रबंध स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सादर केला गेल्याने त्यांचे नाव प्रकाशझोतात आले. 

आपण हिंदी भाषा आणि तुलसीदासांच्या `रामचरितमानस'कडे कसे आकर्षित झाले याचे स्पष्टीकरण फादर कामिल बुल्के यांनी दिले आहे. त्यांची गुरुदीक्षा होण्याआधी पाच वर्षे ते झारखंड येथे जेसुईट संस्थेच्या एका शाळेत शिक्षक होते. त्यावेळी स्थानिक लोकांना इंग्रजी भाषेत संभाषण करणे अभिमानास्पद वाटे. स्थानिक संस्कृतीचे त्यांना फारसे ज्ञान किंवा अभिमान नव्हता असे त्यांना जाणवले.  त्याचवेळी कामिल बुल्के यांनी भारतीय भाषांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा निर्धार केला.   

राम कथेवर संशोधन पूर्ण केल्यानंतर फादर कामिल बुल्के पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे म्हणजे झारखंडला परतले. जेसुईट संस्थेच्या तेथे असलेल्या सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये फादर बुल्के यांनी संस्कृत आणि हिंदी विभागाची स्थापना केली.   

ख्रिस्ती धर्मगुरु म्हटले की आपल्या नजरेसमोर ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे लोक अशी प्रतिमा उभी राहते. मात्र सर्वच ख्रिस्ती धर्मगुरु  धर्मप्रसाराचे कार्य करत नाहीत. बहुतांश ख्रिस्ती धर्मगुरु शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात. 
 
कॅथोलिक चर्च ही जगातील एक सर्वांत मोठी संस्था आहे. चर्चच्या विविध कार्यांना वाहून घेणाऱ्या धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या संस्था-संघटनाही आहेत. उदाहरणार्थ, जेसुईट्स, डॉन बॉस्को आणि मदर तेरेसा सिस्टर्स. यापैकी `जेसुईटस' म्हणजे सोसायटी ऑफ जिझस या धर्मगुरूंच्या  संघटनेचे सदस्य. जेसुईट धर्मगुरुंनी शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
  
जेसुइट संस्थेचे मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेज तसेच जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यात लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे संबोधन देण्यात आले आहे ते यामुळेच. फादर कामिल बुल्के याच परंपरेचे पाईक होते.   
 
श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतःही  गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे. आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरु आहेत. 

बेल्जियममधून भारतात आल्यापासूनच फादर कामिल बुल्के या देशाच्या प्रेमात पडले. फादर बुल्के यांनी धर्मगुरुपदाचे कार्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक लोकांशी आणि संस्कृतीशी एकरूप होण्यावर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी १९५० मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले.

अलाहाबाद विद्यापीठाने फादर कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’ हा प्रबंध १९५० मध्ये प्रसिद्ध केला आणि त्या प्रबंधाची विस्तारित म्हणजे ८१८ पानांचे ‘रामकथा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. रामकथेवर डॉक्टरेट मिळवल्यानंतरसुद्धा अनेक वर्षे  या विषयावर फादर बुल्के यांचे संशोधन सुरूच होते. आणि पुस्तकाच्या सुधारित आवृत्या प्रसिद्ध होत होत्या. या तीन आवृत्तींच्या प्रकाशनांवरुन जवळजवळ पंचवीस वर्षे फादर बुल्के हे रामकथेच्या कसे प्रेमात पडले होते हे दिसून येते.

फादर बुल्के यांची साहित्यक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन १९५० मध्ये बिहार राज्याच्या राज्यपालांनी बिहार साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून केंद्र सरकारतर्फे त्यांची निवृत्ती करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

रामकथेच्या संशोधनानंतर फादर बुल्के यांनी इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती आणि संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचा ‘इंग्रजी-हिंदी कोश’ १९६८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर या शब्दकोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९७७ मध्ये संपूर्ण नव्या कराराचा म्हणजे बायबलच्या दुसऱ्या खंडाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला. 

फादर बुल्के हिंदी भाषिक प्रदेशातील बिगर ख्रिस्ती समाजात ‘बाबा बुल्के’म्हणून ओळखले जात. हिंदी आणि संस्कृतव्यतिरिेक्त फादर बुल्के यांना हिब्रू, ग्रीक, लॅटिन भाषा अवगत होत्या. डच, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा ते उत्तमरीत्या संभाषण करत असत.

कॅथोलिक चर्चमध्ये आंतरधर्मीय सामंजस्याचे आणि सुसंवादाचे वारे १९६२मध्ये भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर सुरू झाले, पण या परिषदेपूर्वीच फादर बुल्के यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना अनेकदा विरोध आणि टीकेस तोंड द्यावे लागले. आज मात्र फादर बुल्के यांनी केलेल्या कार्यास सगळीकडे मान्यता मिळाली आहे. 

भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन महान कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा यांना ‘भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे रामकथेवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणाऱ्या, इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या फादर कामिल बुल्के या जन्माने बेल्जियम असणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूचाही १९७४ मध्ये ‘पद्मभूषण' हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. 

प्राच्यविद्यापंडित, संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करणारे अनुवादक, हिंदी व संस्कृत भाषेचे पंडित म्हणून फादर बुल्के यांचा खास उल्लेख केला जातो. फादर बुल्के यांचा इंग्रजी-हिंदी शब्दकोश आजही नावाजला जातो. फादर बुल्के १९५० ते १९७७ या काळात यांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये हिंदी आणि संस्कृत विषयांचे विभागप्रमुख होते. यावरून त्यांनी या विषयांमध्ये किती प्राविण्य मिळवले होते, याची कल्पना येते.

त्यांच्या निधनानंतर रेडिओवर आणि दूरदर्शनवर या प्राच्यविद्यापंडिताच्या कार्यावर आधारित खास कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता . त्यात एका हिंदी समीक्षकाने म्हटले होते की ‘जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाते, तोपर्यंत बाबा बुल्के हे नाव विसरले नाव विसरले जाणार नाही.’ 

फादर कामिल बुल्के यांच्या निधनानंतर पस्तीस वर्षांनी दिल्लीतील त्यांचे अवशेष त्यांच्या कर्मभूमीला म्हणजे रांची येथे नेण्यात आले आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत तेथे समारंभपूर्वक पुरण्यात आले. रांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजात त्यांचा एक अर्धपुतळा उभारण्यात आला असून तेथील रस्त्याला त्यांचे नावही देण्यात आले. 

- कामिल पारखे  
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

Camil Parkhe