पुणे कॅम्प.
पुण्यात अलका चौकातून पाच रस्ते फुटतात, त्यापैकी लक्ष्मी रोड एक . या लक्ष्मीरोडचे दुसरे तोंड शहराच्या दुसऱ्या एका टोकाला उघडते, हे दुसरे टोक म्हणजे पुणे कॅम्प.
तिसेक वर्षांपुर्वी गोव्यातून मी पुण्यात राहायला आलो तेव्हा डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर लॉजवर राहायचो आणि कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये `इंडियन एक्सप्रेस'च्या ऑफिसात कामाला जायचो. दररोज डेक्कनहून सुटणाऱ्या ७४ आणि १७४ या बस नंबरने लक्ष्मी रोडच्या या टोकाहून त्या टोकापर्यंत जायचो.
एक्सप्रेसला असताना दुपारी साडेचारनंतर चहासाठी `महानाझ'ला जाणे व्हायचे. इराणी हॉटेल म्हणजे काय हे मला तेव्हा पहिल्यांदा कळाले. श्रीरामपुरात किंवा गोव्यात इराणी हॉटेल असण्याचा संबंधच नव्हता. माझे अत्यंत आवडीचे हाफ फ्राईड एग किंवा बुल्स आय `महानाझ'ला मिळायचे. तिथे चिकन समोसेसुद्धा मिळायचे. त्याकाळात म्हणजे १९८९ ला एक चिकन समोसा फक्त दहा रुपयाला.
माझ्या लॉजवर मी आणि एक्सप्रेसमधली इतर बातमीदार जोडीदारांनीं जेवणाचे डबे लावले होते पण महिन्यातून अनेकदा हॉटेलांत जेवण व्हायचे.
रुपाली हॉटेलात चारपाच पुऱ्या, दाल, सुकी भाजी आणि दही असलेली राईस प्लेट (किंमत २० रुपये) आणि क्वचितच दाल- राईस (किंमत १२ रुपये).
कधीतरी रात्री बातम्या देऊन झाल्यानंतर एका इराणी हॉटेलात चिकन बिर्याणी किंवा चिकन मसाला यावर ताव मारला जायचा. डेक्कनला गुडलक हॉटेलसमोर इराणी `लकी' हॉटेलांत असेच चिकनचे अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळायचे.
या झाल्या खूप जुन्या गोष्टी.
अलिकडच्या काळात माझा पुन्हा डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि पुणे कॅम्पातला वावर वाढला आहे. पुणे कॅम्पचे एक प्रवेशद्वार असलेल्या क्वार्टर गेटपासून मी चालायला सुरुवात करतो आणि वेस्ट एन्डला पोहोचतो. इथे लक्ष्मी रोड संपतो.
क्वार्टर गेटपासून खऱ्या अर्थाने पुणे कॅम्पची संस्कृती सुरु होते.
त्यादिवशी संध्याकाळी खूप भूक लागली आणि एका कोपऱ्यात एक बेकरी दिसली. पॅटिस किंवा समोसा खाण्याच्या इराद्याने तिथे गेलो तर एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क एग पॅटीस होते !
मला एकदम पणजीतल्या एग पॅटीसबद्दल प्रसिद्ध असलेल्या गीता बेकरीची आठवण झाली. एग पॅटीस विकणाऱ्या किती बेकरी तुम्हाला माहित आहेत?
इथला हा सगळा परिसर चक्क खाऊ गल्ली असावी असा समज होईल इतक्या संख्येने येथे अनेक इटिंग जॉइंट्स आहेत. रस्त्यावरच असलेल्या `गार्डन वडा पाव' येथे लोक चक्क रांगा लावून कुपन घेऊन किंग साईझ वडा पाव घेत असतात.
शहरात पेठांमध्ये जागोजागी अमृततुल्य हॉटेल्स दिसतात येथे कँपात बन मस्का वगैरे पदार्थ असणारी इराणी हॉटेल्स आहेत. त्यांचे फर्निचर खुर्च्या असा काही जुना वेगळाच थाट अजूनही राखला आहे.
काही आठवड्यापूर्वी मेट्रोने वनाज स्टेशनवर उतरलो होतो, भूक लागली म्हणून एखाद्या हॉटेलचा, डिसेंट स्नॅक्स जॉईन्टचा शोध घेऊ लागलो तर एक किलोमीटर अंतरापर्यंत काहीच दिसले नाही. त्यावेळी पुणे कॅम्प किती खवैय्येप्रेमी आहे याची जाणिव झाली होती.
या पुणे कॅम्पातले एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ही हॉटेल्स आणि इतर दुकाने चालवणारी किंवा दुकानांची मालक असणारे अनेक लोक मुस्लीम आहेत, मूळचे इथलेच आहेत आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेले आहेत.
एमजी रोडला `मार्झोरिन' मध्ये आवडीची नॉन व्हेज पदार्थ मिळतात. स्नॅक्सऐवजी भरपेट खायचे असले तर `दोराबजी' मध्ये गरमागरम चिकन समोसे, चिकन कटलेट्सआणि कबाब असे जिभेला तृप्त करतील कितीतरी पदार्थ मिळतात.
पुणे कॅम्पात गेलो आणि रिकामीपोटी घरी परतलो असे सहसा कधी होत नाही. अनेकदा घरी पार्सलसुद्धा आणले जाते..
असे `पुणे कँम्प' जागोजागी उभे राहायला हवेत.
Camil Parkhe January 4, 2024