Did you like the article?

Showing posts with label Christianity. Show all posts
Showing posts with label Christianity. Show all posts

Friday, July 14, 2023



ख्रिस्ती समाजात जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला

मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…

Wednesday, November 2, 2022

धर्मांतर कशासाठी ? आत्मसन्मानासाठी कि विद्रोहासाठी ?  



अलीकडच्या काळात धर्मांतर हा कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गंभीर गुन्हा केला गेला असला आणि धर्मांतर (धाकटपटश्यानं, आमिषानं वगैरे वगैरे .) घडवून आणणाऱ्या व्यक्तीला मोठी शिक्षा होत असली तरी मानवी इतिहासात शतकोनुशतको धर्मांतरे होत आली आहेत. अव्वल इंग्रजी अमदानीत देशभर भल्याभल्या लोकांना ख्रिस्ती धर्माने आकर्षित केलं होतं. धर्मांतरांची कारणं मात्र व्यक्तिगणिक आणि समाजागणिक वेगवेगळी होती. पंडिता रमाबाई आणि नारायण वामन टिळक अशा संस्कृत पंडितांनी ख्रिस्ती धर्म कवटाळला त्यामागची कारणं वेगळी आणि समाजातील बहिष्कृत घटकांनी हा धर्म सामुदायिकरीत्या स्वीकारला यामागची कारणं पूर्णतः वेगळी होती.
केरळमधल्या नाडर समाजाने ख्रिस्ती धर्म का स्वीकारला यामागच्या सामाजिक कारणांची समाजमाध्यमात चर्चा झाली. थोड्याबहुत अशाच कारणांनी महाराष्ट्रात आणि देशातील इतर प्रदेशांत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे जर्मन जेसुईट फादर ओटो वाईसहौप्ट हे हातात घंटी घेऊन गावातल्या मुलांना आपल्या शाळेत शिकण्यासाठी बोलावत असत. काळ होता १८९२चा. विशेष म्हणजे ही शाळा समाजातल्या सगळ्या घटकातील मुलांमुलींसाठी खुली होती, महार, मांग, चांभार आणि धनगर यांच्यासाठीसुद्धा !
असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात फ्रेंच धर्मगुरु फ्रांसलियन फादर गुरियन जाकियर यांच्या घोगरगावच्या आणि आजूबाजूंच्या शाळांत होता. संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात त्याकाळात हजारो कुटुंबांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला याबद्दल मग आश्चर्य कसले ?
पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात, मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोर्हे, बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही.
ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.
धर्मांतरे का होतात? आपल्या वाडवडिलांपासून आलेला धर्म सोडून दुसरा धर्म कवटाळण्याची पाळी एखाद्या व्यक्तीवर वा समाजावर का येते? व्यक्तीगत धर्मांतर अर्थातच पूर्णत: त्या व्यक्तीशी संबंधीत असलेल्या मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र जेव्हा एखादा मोठा समूह आपला धर्म सोडून दुसर्या धर्मात जातो, त्यावेळी या धर्मांतरामागची कारणे समजून घेणे आवश्यक ठरते. .
धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे.
“धर्मांतर हा आपल्या देशातील एक युगा-युगापासून चालत आलेला प्रयोग आहे. हिंदू धर्माच्या जाचाला कंटाळून आपल्या उध्दारासाठी अनेकांनी धर्मांतर केले आहे. मुस्लिम राजवटीत अस्पृश्यांतील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारून समतेकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणार्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदर्यात शाळांची स्थापना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या सार्यांचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत. ” 1
दुसर्या एका लेखात डोळस यांनी असे म्हटले आहे: ”वेगवेगळ्या राजवटीतील धर्मांतराचा संदर्भ बदलला तरी त्यामागील धर्मांतरितांची भावना एकसारखीच राहत आली आहे. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, शूद्र या जोखंडातून मुक्त होण्यासाठी लोकांनी धर्मांतरे केली. कधी ते मुस्लीम झाले, कधी ते ख्रिश्चन झाले. नंतर डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. समतेची शिकवण व वागणूक जेथे मिळेल त्या धर्माला आपलेसे करून या लोकांनी प्रस्थापित धर्माविरुध्दचा आपला निषेध नोंदविला आहे.”2
महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे अद्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणार्या फादर डॉ ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:
”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच अध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजार्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्यांकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”3 ख्रिस्ती मिशनरींनी सर्वप्रथम भुकेल्या लोकांची भूक भागविली, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले आणि नंतरच ते अध्यात्म्याकडे वळाले. ’आधी पोटोबा, मग विठोबा’ अशी म्हण या भागात प्रचलित आहे. ती म्हण या मिशनरी लोकांनी आपल्या प्रेषितकार्यात प्रत्यक्षात उतरविली.
धर्मांतरामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना एकोणिसाव्या शतकात सामाजिक अन्यायाचे, छळवणुकीचे बळी ठरलेल्या दलित समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी देवदूतच ठरले असे नाशिकच्या फिलोमिना बागूल यांनी म्हटले आहे.
त्या म्हणतात: ” मिशनरींनी आम्हाला ख्रिस्ताबरोबर ऐहिक सुखाचा मार्ग दाखविला. दोन हजार वर्षापुर्वी प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, मिशनरींनीही आमच्यासाठी अनेक चमत्कार केले. त्यानी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा क़मी नव्हते. प्रभू ख्रिस्ताने लोकांना जेवण देऊन तृप्त केले. त्याचप्रमाणे मिशनरींनी अनेकांना अन्न देऊन तृप्त केले. प्रभू ख्रिस्ताने अंधांना दृष्टी दिली,त्याचप्रमाणे मिशनरींनी ज्ञान देऊन आम्हाला नवदृष्टी दिली. प्रभू ख्रिस्ताने मुक्यांना वाचा दिली, त्याचप्रमाणे मिशनरींनी हजारो वर्षे वाचा बंद असलेल्या आम्हाला वाचा दिली. ख्रिस्ताने दुखणाइतांना बरे केले, तद्वत मिशनरींनी औषधोपचारांनी रोग्यांना बरे केले. प्रभू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केले. मिशनरींनी मृत्युपंथास टेकलेल्यांना जीवदान दिले. मिशनरींचे हे कार्य आमच्यासाठी एकाएका मोठ्या चमत्काराप्रमाणेच होते. मिशनरींनी आम्हाला क़ाय दिले नाही? त्यांनी आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिले, धर्म दिला, भाकर दिली, आत्मविश्वास दिला, स्वाभिमान दिला, आत्मसन्मान दिला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चवर्णिर्याच्या गुलामगिरीतून मुक्त करुन आमचा कोंडलेला श्वास मुक्त केला.”4
उच्चवर्णियांनी पायंदळी तुडवलेल्या, रोजची भाकरी मिळवण्यासाठी धडपडणार्या अस्पृश्य लोकांना परदेशी मिशनरींनी मायेने जवळ केले. दुष्काळाच्या आणि दोन महायुध्दांच्या काळात आणि इतरही वेळी अन्नपाणी, कपडालत्ता पुरवला. गावाच्या वेशीबाहेर हाकललेल्या या दलित लोकांच्या दृष्टीने तर हे मिशनरी देवदूतच ठरले. या मिशनरींनी दाखवलेल्या देवाचा, धर्माचा आणि ग्रंथाचा त्यांनी कुठल्याही शंकाकुशंका न काढता स्वीकार केला. अशाप्रकारे अनेक गावांतील सर्वच्या सर्व महार वा मांग कुटुंबे काही वर्षांच्या काळात ख्रिस्ती झाली.
गोव्यात ज्या पध्दतीने धर्मांतर झाले तसे महाराष्ट्रात झाले नाही असे अनुपमा उजगरे यांनी म्हटले आहे. ” कोणी बाप्तिस्मा द्या म्हटलं तर मिशनरी त्याला आतून पारखून घेत. तसंच, बाहेर काही काळंबेरं तर नाही ना हेही तपासून बघत. जातिभेदाच्या छळापायी जीव मेटाकुटीला आलेल्या तळागाळातल्यांना, मिशनरींनी देऊ केलेल्या जीवनस्तराचा मोह झाला. त्यामुळे सामूहिक धर्मांतरंही झाली.’‘5
’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे.
मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे ऐहिक आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याचा मिशनरींनी प्रयत्न केला. अहमदनगर हा कायमचा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेसाठी मिझरियोर, कारितास, सीआरएस यासारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने मिशनरींनी विहिरी खोदण्यास, पंप आणि बियाणे खरिदण्यास स्थानिक लोकांना मदत केली. सामाजिक आणि धार्मिक कामांची गल्लत होऊ नये, आध्यात्मिक बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सामाजिक कामांसाठी प्रथम श्रीरामपूर येथे आणि नंतर अहमदनगर येथे सोशल सेंटरची स्थापना करण्यात आली.
लोकांच्या गरजा भागवून, त्यांच्याविषयी आस्था दाखवून जर्मन आणि एतद्देशीय येशूसंघीय व्रतस्थांनी येथील लोकांची श्रध्दा जोपासली. ’प्रारंभी शाळेसाठी एकही विद्यार्थी मिळत नसे. पण आज नगर जिल्ह्यातील येशूसंघीयांच्या व धर्मप्रांतियांच्या शाळात हजारो काथोलिक व अख्रिस्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पहिल्या महायुध्दाच्या सुरुवातीस नगर जिल्ह्यात 10,000 ख्रिस्ती होते व फक्त चार मिशन स्टेशन होती. आज वीस मिशन स्टेशन आहेत व 60,000 ख्रिस्ती लोकांची व अख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक व ऐहिक गरज भागविली जाते,” असे फादर मिस्किटा आणि साळवे यांनी या लेखात म्हटले आहे.6
धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता.
विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही तोच मार्ग पत्करला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली.
खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उ?वर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यांदाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.
हे धर्मांतर रोखण्यासाठी त्या अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय्य समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही.
त्यानंतर काही वर्षांनंतर येवल्यात 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर अखेरीस दोन दशकांनंतर बुध्द धर्माचा स्वीकार करून डॉ आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी एक अभिनव सामाजिक स्थित्यंतर घडवून आणले.
संदर्भ:
1) अविनाश डोळस, ”आंबेडकरी चळवळ: परिवर्तनाचे संदर्भ” , सुगावा प्रकाशन( पान 46), 2) उपरोक्तप्रमाणे, (पान 136)
3) फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके, ’ निरोप्या’ मासिक, ऑक्टोवर 1977 (पान क्रमांक 33)
4) फिलोमिना बागूल, ’मिशन कार्य 150 वर्षे: सामाजिक विकास’, नाशिक कॅथोलिक धर्मप्रांत स्मरणिका (1878-2003), पान 23)
5) डॉ. अनुपमा उजगरे, ’मराठी प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाज’, प्रकाशक: ग्रंथाली ज्ञानयज्ञ, , (पान 22)
6) ’जेसुईटस 2005’, इयर बुक ऑफ द सोसायटी ऑफ जिझस, प्रकाशक : सोसायटी ऑफ जिझस, (पान 135), आणि ’ निरोप्या’ मासिक, फेब्रुवारी 2005 (पान 26)
^^^
(गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज - लेखक कामिल पारखे , चेतक बुक्स, पुणे मधील एक प्रकरण _

Sunday, February 21, 2021


 बार्देसकर समाजाची संस्कृती : भाग २

(फोटोमध्ये लेखक कामिल पारखे एका प्रसिद्ध बार्देस्कराबरोबर, येशूसंघीय फादर प्रभुधर, यांच्याबरोबर पुण्यातील पेपल सेमिनरीच्या आवारात)


महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात राहत असलेले गोयंकार कॅथोलिकांनी म्हणजेच बार्देसकर समाजाने आपल्या मूळ वैशिष्ठ्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा दोनशे वर्षे गोव्यापासून दूर राहूनसुद्धा जपल्या आहेत. त्यांची मातृभाषा कोंकणी टिकवल्यामुळे आणि आंतरजातीय विवाह न केल्यामुळे त्यांना आपली खास ओळख कायम राखण्यात यश आलं आहे. तथापि, त्यांना स्वतःला अथवा त्यांच्या नवीन मातृभूमीतील लोकांना ते `परके’ वाटत नाहीत.

बार्देसकारांच्या गेल्या कित्येक पिढ्या नेहमी खेड्यातील एकाच भागांत राहुन देखील फक्त त्यांच्या घरातच गोवन कॅथोलिक राहिल्या आहेत. पण तरीदेखील त्यांनी इतर समाजांशी सामंजस्य राखले आहे. ते महाराष्ट्रातील कोंकण आणि कोल्हापूर भागांतील नमुनेदार मराठी आणि कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण कन्नडिगा आहेत.
रोमन कॅथोलिक धर्माप्रमाणे कोंकणी भाषा हा त्यांची पूर्वसुरींच्या भूमीशी (गोव्याशी) नाळ जोडणारा एक महत्वाचा घटक आहे. साहजिकच, कालौघात म्हणजेच त्यांच्या लादलेल्या स्थलांतरपासून बार्देसकरांच्या कोंकणी भाषेत मराठी किंवा कन्नडमधील नवीन शब्द आल्यामुळे बरेच मोठे बदल झाले आहेत. तरीसुद्धा, हे शक्य आहे कि बार्देसकरांच्या कोंकणीत असे बरेच शब्द ते अजूनही वापरत असतील, जे गोव्यातील कोंकणीत कधीच नामशेष झाले आहेत. याशिवाय, कित्येक जुनी कोंकणी लोकगीतं ह्या समाजात प्रचलित आहेत, जी विविध सामाजिक प्रसंगी गायली जातात - जसे लग्न, धर्मगुरुदीक्षा आणि इतर धार्मिक सेवा. कोंकणी भाषेच्या संशोधकांना बार्देसकर बोलत असलेल्या कोंकणीत संशोधनाचे मुबलक विषय मिळू शकतील.
काळाच्या ओघात नष्ट होण्याअगोदर त्यांची कोंकणी लोकगीते पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याची तातडीची गरज आहे. आजदेखील बार्देसकर विविध प्रार्थना म्हणजे पवित्र मिस्सा, रोझरी किंवा पवित्र माळ आणि लितानी कोंकणी भाषेत म्हणतात. गोव्याप्रमाणे इथेही धार्मिक उपासनाविधींसाठी वापरली जाणारी अधिकृत मिस्साग्रंथ किंवा लिटर्जी रोमन लिपीत आहे..
रोजच्या जीवनात कोंकणीचा वापर हा सार्वत्रिक असला तरीदेखील वाङ्मयीन कोंकणी इथपर्यंत अजून पोहचली नाही. काही मोजक्या जेसुईट धर्मगुरुंनी मराठी साहित्यविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांत मराठी निरोप्या मासिकाचे संपादक फादर प्रभुधर आणि फादर कारिदाद द्रागो उर्फ संदीप हळदणकर यांच्या मोजक्या साहित्यकृती आहेत.
बार्देसकरांबाबत आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा गोव्याशी गेल्या दोन शतकात खूपच कमी संपर्क असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या मूळच्या मायभूमीत असलेल्या मालमत्तांवर असलेला हक्क सोडला नाही. हे विस्मयकारक आहे कि गोव्यातील राज्यकर्ते हे नेहमीच ब्रिटिशांच्या अमलात असलेल्या भारतीय भागांतून येणाऱ्या लोकांविषयी साशंक असत, तरीसुद्धा कोंकण, कोल्हापूर आणि बेळगांव जिल्ह्यांत वाढलेल्या व तेथे बरीच वर्षे वास्तव्य असलेल्या बार्देसकरांनी पूर्वजांच्या भूमीतील मालमत्तेवर आपला हक्क आजमितीपर्यंत कायम राखला आहे.
मी माझ्या पश्चिम महाराष्ट्र व बेळगांव जिल्ह्यातील वास्तव्यात बऱ्याच बार्देसकरांना भेटलो आहे, जे स्वतःची ओळख गोवन, गोयंकार अशी करून देतात आणि ते बार्देस तालुक्यातील आल्डोना, शिवोली, पार्रा, तिव्हिम व इतर गावचे असल्याचे सांगतात. असं म्हटलं जातं कि गोव्यातील बार्देसकरांच्या पूर्वजांनी आपल्या मुलांची नांवे त्यांच्या गावातील कम्युनिदाद या पारंपारिक सहकारी संस्थांमध्ये नोंदवून ठेवली होती. कित्येक बार्देसकरांनी ते जेंव्हा-जेंव्हा गोव्याला भेट देत, तेंव्हा आपले या संस्थातील भाग, शेअर्स किंवा झोण मिळविले, मग ते कितीही छोटे असोत.
नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या `परकियां’विरुध्द कडक कारवाई करण्यास सुरुवात केली तेंव्हा अनेक बार्देसकर सेंट फ्रान्सिस झेविअरच्या दर्शनाच्या निमित्ताने किंवा इतर काही कामासाठी सुरक्षा नसलेल्या सीमेवरील गावांतून गोव्यात प्रवेश करत.
कालपरवापर्यंत म्हणजे कोल्हापूर आणि कोंकणातील कॅथोलिक धर्मविभाग गोवा धर्मप्रांतापासून वेगळे होईपर्यंत आणि ते पुणे धर्मप्रांताशी जोडले जाईपर्यंत या भागातील सर्व चर्चमधील बाप्तिस्मा, लग्न, मृत्य, इ. विषयीच्या नोंदी पोर्तुगीज भाषेमध्ये असत. बार्देसकारांच्या पूर्वजांविषयी नोंदी असलेली महत्त्वाची माहिती आजही कोल्हापूर जिल्हयांतील आजरा, हलकर्णी आणि इतर ठिकाणी असलेल्या धर्मग्रामातील म्हणजे पॅरिशमधील चर्चमध्ये उपलब्ध आहे. काळाला बार्देसकरांना त्यांच्या भूतकाळापासून तोडण्यात अपयश आले आहे. त्यांनी आपला हा भूतकाळ प्रामाणिकपणे तर कधी कट्टरपणे सांभाळून ठेवला आहे.
माझ्या मते बदलाला विरोध हा नव्या कालानुरूप सुसुत्रीकरणामुळे नसून केवळ रूढी टिकवण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, कित्येक तरुण बार्देसकरांना त्यांच्या समाजातील काही रितीरिवाजांची कारणे माहित नाहीत तरीदेखील ते पाळण्याची इच्छा त्यांच्यात आहे. परिणामी, बार्देसकर समाजातील विविध गटांत लग्ने होत नाहीत कारण धर्मांतरापूर्वी ते वेगवेगळ्या हिंदू जातींत विभागले गेले होते.
जातीयवादाचं अरिष्ट, जरी कॅथोलिक चर्चची त्यावर अधिकृतपणे बंदी असली तरी, गोव्यात प्रचलित आहे व बार्देसकरांनी ते आपल्याबरोबर गोव्याबाहेर आणलं आहे.
बार्देसकर समाजात काही ‘आंतरजातीय’ विवाह गेल्या काही वर्षात झाले आहेत. काही बार्देसकर अजूनही बिफ खात नाहीत, जे पूर्वाश्रमीचे सवर्ण हिंदू असल्याचे दर्शवते.
त्यांच्या गोव्यातील पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे आजही या भागांतील विविध चॅपेल आणि चर्चमध्ये वार्षिक सणाचा सोहळा साजरा केला जातो. त्याप्रमाणे म्हापसा शहराजवळील शिवोलीहुन आलेले आणि कोल्हापूर जिल्हातील चंदगड तालुक्यातील अडकूर गावी स्थायिक झालेले बार्देसकर सेंट अँथनीचा सण साजरा करतात. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तेथे एक चॅपेल बांधले गेले तेंव्हा शिवोलीतील रिवाजाप्रमाणे ते सेंट अँथनीच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले. गोव्याप्रमाणे येथेही चर्चच्या कारभारात महत्त्व असलेली सामान्य लोकांची कॉन्फ्ररिया आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमेवरील गोवन समुदायाने आपली भाषा, धर्म आणि संस्कृती पोसली आणि सुरक्षितपणे टिकविल्यामुळे त्यांना आपली ओळख पुसली जाण्याची भीती ते रहात असलेल्या नवीन ठिकाणी कधीच वाटली नाही. कारण त्यांची पाळेमुळे तेथे खोलवर रुजली आहेत. बऱ्याच बार्देसकरांना पुणे, कोल्हापूर आणि मुंबई येथे नोकऱ्या मिळाल्या आहेत. तर काही मोजके लोक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत किंवा किंवा आपला व्यवसाय चालवीत आहेत.
((मूळ प्रसिद्धी ३० जून,, १९८५, इंग्रजी दैनिक द नवहिंद टाइम्स, पणजी, गोवा )

बार्देसकर Part one

गोव्यातील बार्देस तालुक्यातील बार्देसकर !


गोव्यातील बार्देस तालुक्यातील बार्देसकर !
गोव्याच्या सीमेबाहेरच्या नजिकच्या परिसरांत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यांत आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात फर्नांडिस, डिसोझा, मस्कारेन्हास अशी गोव्यात आढळणारी आडनावे असणारी अनेक लोक आहेत. रोमन कॅथोलिक असलेली ही मंडळी घराबाहेर मराठी आणि घरात आपली मातृभाषा कोकणी बोलतात. या लोकांना बार्देसकर म्हणूनही ओळखले जाते. हे लोक मूळचे गोव्यातील बार्देस तालुक्यातील म्हणून बार्देसकर !
गोयंकारांबद्दल म्हणजे मूळचे गोवन असलेल्या लोकांबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे. मुंबईत किंवा आखाती देशांत स्थायिक होऊन देखील त्यांनी आपलं वेगळं सांस्कृतिक अस्तित्व कायम ठेवलं आहे. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या मायभूमीशी आपलं घट्ट नातं कायम ठेवलं आहे. गोव्यात राहणाऱ्या त्यांच्या सग्यासोयऱ्यांना याबद्दल त्यांच्याविषयी खूपच अभिमान वाटत आला आहे.
मात्र गोव्यापासून फक्त २०० कि.मी. अंतरावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भागात २०० वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या गोवन कॅथोलिक समाजाच्या एका मोठ्या समुदायाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. आपल्या मायभूमीशी इतकी वर्षे फारसा संबंध नसूनदेखील त्यांनी आपली मूळ गोवन संस्कृती, कोकणी मातृभाषा आणि ख्रिस्ती धर्म टिकवून ठेवला आहे.
मागील २०० वर्षांतील स्थित्यंतरामुळे व बार्देस्करांच्या समाजातील विशिष्ट स्थानामुळे हा समाज ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक व भाषिक संशोधनाचा विषय झाला आहे. बार्देसकरांनी त्यांच्या मूळच्या व स्थानिक अशा दोन वेगळ्या संस्कृतींचा अफलातून संगम साधला आहे.
बार्देसकर समाज छोट्या-छोट्या समूहांमध्ये या सीमावर्ती परिसरात - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ज़िल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांत तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी, कुकेरी आणि खानापूर तालुक्यांत स्थायिक झाले आहेत.
गमतीचा भाग असा कि गोव्यातील लोकांचे ह्या स्थलांतरित गोयंकारांबद्दल खूप गैरसमज आहेत. गोवा पोर्तुगीजांच्या जोखंडातून १९६१ साली मुक्त झाल्यावर काही मोजके बार्देसकर आपल्या मूळ गावी गेल्यावर स्थानिक लोकांनी त्यांना परकं मानलं. त्यांची आडनावं डिसोझा, फर्नांडिस, डीकोस्टा अशी असूनसुद्धा काही वेळा त्यांची 'घाटी' (म्हणजे घाटमाथ्यावर राहणारे) म्हणून संभावना केली जाते. गोव्यातील ऐतिहासिक घटनांवर फक्त एक दृष्टिक्षेप, अठराव्या शतकाच्या अखेरीस बार्देसकरांचं शेजारच्या प्रदेशांत झालेलं स्थलांतर आणि त्यानंतरचं त्यांचं जीवन ह्या गोष्टी त्यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सद्यस्थितीवर प्रकाश टाकू शकतात. अठराव्या शतकाच्या शेवटी त्यांनी केलेल्या मोठ्या स्थलांतराबद्दल आपण खात्रीने बोलू शकतो, परंतु हे स्थलांतर का झालं? यावर इतिहासकारांचं एकमत नाही.
काहींच्या मते बार्देसकरांच्या या एकगठ्ठा स्थलांतरामागे काही राजकीय कारण असू शकतात त्याकाळी भारतात ब्रिटिशांची सत्ता काही भागातच होती. पोर्तुगीजांकडून गोवा काबीज करण्याच्या इराद्याने त्यांनी सत्तारीच्या राणेंची मदत घेतली. प्रतिकार करताना पोर्तुगीजांनी इंग्रजांची बाजू घेणाऱ्या खालच्या जातींतील गोयंकरांना पकडले व दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने त्यांची कापलेली शरीरे सार्वजनिक ठिकाणी टांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे बार्देस्करांनी पोर्तुगीज वसाहतीतून पलायन करून कोल्हापूर, व बेळगाव परिसरात आश्रय घेतला.
तथापि, हे पुरेसं पटणारं नाही कारण स्थलांतर करणारे फक्त कॅथोलिक होते आणि ते सर्व कनिष्ठ वर्गातील नव्हते. एक लोकापवाद असाही आहे कि पश्चिम युरोपात उदयास आलेल्या इन्क्विझिशन कॅम्पेन या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या कडव्या ख्रिश्चन कॅथोलिक चौकशी मोहिमेमुळे हे स्थलांतर झाले असावे.
या मताप्रमाणे, पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांचं धर्मपरिवर्तन केल्यानंतर ख्रिश्चन धर्मतत्वांचा चुकीचा अर्थ लावून त्यांना जबरदस्तीने पाश्चात्य पद्धतीची जीवनशैली स्वीकारण्यास भाग पाडलं. पोर्तुगीजांनी स्थानिक ख्रिश्चन लोकांचा Aqui e Portugal' (Here is Portugal!) या मोहिमेचा भाग म्हणून अत्याचार करण्यास सुरवात केली. मूळच्या उच्च आणि कनिष्ठ स्तरांतील हिंदूंचा या लोकांमध्ये समावेश होता. ह्या पाश्चात्तीकरणाचा भाग म्हणून नवख्रिश्चनांना पाश्चात्य कपडे घालण्यास तसेच खाण्याच्या सवयी बदलण्यास सांगितले गेले. गोमांस खायला लावणे हे स्थानिक ख्रिश्चनांच्या सहजासहजी पचनी पडणारे नव्हते कारण त्यांची नाळ हिंदू धर्माशी जोडली गेली होती. ह्या अतिरेकी चौकशी मोहिमेचा धसका घेऊन प्रामुख्याने बार्देस तालुक्यातील बहुसंख्य कॅथोलिक कुटुंबांनी १७६१ ते १७८० च्या दरम्यान ह्या सीमावर्ती भागात स्थलांतर केले असावे.
ह्या स्थलांतरित कॅथोलिक समाजात गेल्या २०० वर्षांत काय बदल घडले असावेत? आणि अशा कोणत्या गोष्टी होत्या कि ज्यामुळे ते गोव्यातील पोर्तुगीज सत्ता हे ब्रिटिश अमलाखालील भारतात राहण्याऱ्या लोकांच्या विरोधात असून देखील आपल्या मायभूमीच्या, मूळ संस्कृतीच्या संपर्कात राहू शकले? असं म्हटलं जातं कि ब्रिटिश सत्ता असलेल्या प्रदेशातील भारतीयांना गोव्यात प्रवेश करण्यास बंदी असून देखील बरेच बार्देसकर आपल्या मूळगावी जात असत. आणि दरवर्षी गोयंच्या सायबाचं म्हणजे सेंट फ्रान्सिस झेवियरचं दर्शन ३ डिसेम्बरला या संताच्या फेस्ताला, फिस्ट डे म्हणजे सणाला घेत असत.
बार्देसकरांचा त्यांच्यावर लादलेल्या स्थलांतरापासून ते आजमितीचा इतिहास थक्क करणारा आहे. तो वाचल्यावर ह्या समाजाचं कुणालाही कौतुक करावंसं वाटेल सुरुवातीला अत्यंत हालअपेष्टा सहन करून त्यांनी आपल्या नव्या प्रदेशांत आपले बस्तान बसवले, स्वतःसाठी सन्माननीय स्थान निर्माण केलं. ह्या कॅथोलिक समाजाने आपल्या भोवतालच्या बहुसंख्य समाजाच्या चालीरीतींशी जुळवून घेतले आहे. नव्या जागी ही बार्देसकर मंडळी इतकी मिळून मिसळून राहिली कि कालांतराने त्यांची ही स्थलांतरित गावंच त्यांची दुसरी मायभूमी बनली. त्या ठिकाणी त्यांनी शेती केली तर काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले. ते पश्चिम महाराष्ट्रात मराठी तर कर्नाटकात कन्नड अस्खलितपणे बोलू लागले. तरीदेखील त्यांनी वेगवेगळ्या खेड्यांत आणि गोव्यापासून दूर राहून देखील आपली मायबोली म्हणजे ‘आमची भास’ कोंकणी जिवंत ठेवली.
बार्देसकर महिला सुके-ओले मासे विकतात. बाजाराच्या दिवशी वेंगुर्ल्याहून मासळीचा पुरवठा होतो. गोव्याच्या अगदी विरुद्ध, जिथे हिंदूंना ख्रिश्चन लोक 'कोंकणो' संबोधतात, ख्रिस्तीधर्मीय बार्देस्करांना मात्र स्थानिक लोक ‘कोंकणी’ म्हणतात कारण ते कोंकणी भाषा बोलतात म्हणून.
बार्देसकरांची अतिशय नवलाची बाब अशी कि ख्रिश्चन धर्मात एकत्रित मिस्साविधी, प्रार्थना व जीवनाच्या विविध टप्प्यांतील स्नानसंस्कार म्हणजे सप्त सांक्रामेंत महत्वाचे समजले जातात. असे असूनही त्यांनी कित्येक दशके धर्मगुरूंच्या उपस्थितीविना आपला धर्म सांभाळला. ह्या समाजाने आपल्या गोव्यातील पूर्वसूरींच्या धर्माचं पालन करत कोणतंही धर्मशास्त्राचे ज्ञान नसताना आणि धर्मगुरु नसताना प्रार्थना आणि धार्मिक चालीरीतींचे जतन केले, कौटुंबिक प्रार्थना, रोझरी जपमाळ आणि लितानी चालू ठेवल्या. गोयंचो सायबा म्हणजे सेंट फ्रान्सिस झेव्हिअर हा त्यांचा अर्थातच महत्त्वाचा संत होता. नंतरच्या काळात गोव्यातील धर्मगुरूंना बार्देसकरांच्या धार्मिक गरजांसाठी वेळोवेळी या परिसरांत पाठवण्यात येत असे.
पोर्तुगिजांच्या सत्तेतून १९६१ साली गोवा मुक्त होईपर्यंत सावंतवाडी आणि कोल्हापूर हे विभाग गोवा धर्मप्रांताचे भाग होते. नंतर त्यांचा पुणे धर्मप्रांतात समावेश करण्यात आला. धर्मगुरूंशिवाय किंवा धर्मशिक्षकांविना धर्मपालन करीत राहणाऱ्या ह्या समाजाविषयी चर्चच्या अधिकाऱ्यांना आजतागायत कोडं पडलं आहे. नंतर जेसुइटांनी बार्देसकरांच्या नव्या पिढीला ख्रिश्चन धर्माचरण नव्याने शिकविण्यास सुरवात केली. ह्या समाजाने २०० वर्षांच्या कालखंडात आपल्या वाडवडिलांच्या धर्मात राहून आणि धार्मिक उपासनाविधींपासून वंचित राहूनसुद्धा आता मुख्य प्रवाहात येऊन ख्रिश्चन धर्मातील आधुनिक प्रवाहांचं स्वागत केलं आहे.
( मूळ प्रसिद्धी : कामिल पारखे. जून २३, १९८५, इंग्रजी दैनिक द नवहिंद टाइम्स, पणजी, गोवा )

Wednesday, September 9, 2020

इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे !

इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे !
पडघम - सांस्कृतिक

कामिल पारखे 


  • अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रा
  • Mon , 07 September 2020
  • पडघमसांस्कृतिकख्रिश्चनमराठी ख्रिस्ती समाजमतमाऊली

मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाचे पारंपरिक आणि आधुनिक रूपांचे दर्शन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रेत दिसते. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. त्यानिमित्ताने मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीविषयी...

“कामिल सर, तुम्ही चांगले मराठी बोलता... मला माहीतच नव्हते हे..” ‘सकाळ टाइम्स’च्या एका बातमीदार सहकारी महिलेने एके दिवशी मला म्हटले.

न्यूज डेस्कवरून माझी बातमीदार कक्षाकडे बदली झाली, तेव्हा काही दिवसांनंतर हे संभाषण झाले.
“अगं सुप्रिया, मला मराठी बोलता येते, कारण माझी ती मातृभाषाच आहे. मराठीत मी काही पुस्तकेही लिहिली  आहेत,” तेव्हा मी तिला सांगितले.

त्याआधी म्हणजे खूप वर्षांपूर्वी यापेक्षा अगदी उलट अनुभवाचा एक प्रसंग घडला होता. माझ्या लग्नाची पत्रिका पाहिल्यावर एक मित्र मला आश्चर्याने म्हणाला-  “चर्चमध्ये लग्न? का?” आता चकित होण्याची माझी पाळी होती. इतकी वर्षे सिगारेट ओढत तासनतास गप्पा मारणारे आम्ही दोघे मित्र असलो तरी मी ख्रिस्तीधर्मीय आहे, याचा त्याला थांगपत्ताच नव्हता.

‘कामिल पारखे’ असे आगळेवेगळे नाव असल्यामुळे असे खूप गंमतीदार प्रसंग घडतात. हो, कामिल पारखे हे नाव आजही जगात एकमेव आहे, हे सर्वज्ञानी गुगलनेच मला सांगितले आहे. त्यात वेगळी धार्मिक पार्श्वभूमी असल्याने अनेक माझ्याबाबतीत अनेक जण चुकीचे आडाखे बांधतात. एखादी व्यक्ती ख्रिस्ती असल्यामुळे मराठी बोलता येत नसावे असा निष्कारण गैरसमज असतो. याचे सर्वांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, हे उत्तम मराठी बोलतात, छान लिहितात याचे अनेकांना आजही आश्चर्य आणि कौतुक वाटते. पालघर जिल्ह्यातील वसईतला माणूस मराठी बोलणार यात आता आश्चर्याची काय बाब असणार आहे? याचे कारण म्हणजे त्यांचा ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरुपद!

खरे पाहिले तर साडेचारशे वर्षाची पोर्तुगीजांची राजवट असलेल्या गोव्याचा काही बाबतींतला म्हणजे पेहेराव आणि खाद्यसंस्कृती यांचा अपवाद वगळता भारतातील सर्वच प्रदेशांतील ख्रिस्ती समाजाने धर्मांतरानंतरही आपला मूळचा ऐतिहासिक सांकृतिक ठेवा कायम राखला आहे. ‘धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’ असे मराठी पंचकवींतले एक असलेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी असे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ठासून सांगितले होते. त्याच्याही तीन शतके आधीच रॉबर्टे डी नोबिली आणि इतर परदेशी मिशनरींनी हे तत्त्व केरळ आणि तामिळनाडूमध्ये अंमलात आणले होते.

१९६०च्या दरम्यान भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेमुळे यात बदल झाला आणि रोमन कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणावादी वारे वाहू लागले. या परिषदेमुळे सांस्कृतिकीकरणाच्या प्रकियेस आणि आंतरधर्मीय सुसंवादास चालना मिळाली. महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांत काम करणाऱ्या  जर्मन, फ्रेंच, अमेरिकन आणि इतर परदेशी मिशनरींनी मात्र दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेआधी कितीतरी दशके आधीच येथील नवख्रिस्ती समाजात सांस्कृतिकीकरणाचे (इन्क्लरेशन) धोरण राबवले होते. त्यामुळेच धोतर, सदरा आणि पागोटे घालणारा धोंडीबा यमाजी आढाव आणि नऊवारी पातळ, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, आणि पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असणारी आणि नाकात जड अशी नथ घालणारी त्याची बायको धुरपदाबाई ख्रिस्ती म्हणून विनासंकोच  वावरू लागले. रेव्ह. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक ही नावे बदलली नाही. त्यांच्या पेहरावात, नावांत वा आडनावांत बदल करण्याची गरज ना त्यांना वाटली ना त्यांना बाप्तिस्मा देणाऱ्या त्या जर्मन, अमेरिकन व स्कॉटिश मिशनरींना. चित्रपट अभिनेते शाहू मोडक आणि क्रिकेटपटू विजय हजारे,  चंदू बोर्डे ही नावे ख्रिस्तीधर्मीयांची आहेच हे अनेकांना माहीतही नसते ! 

गोव्यात १९७८ च्या दरम्यान आई-वडील माझ्याकडे राहण्यास पणजीला आले होते, तेव्हा त्यांना घेऊन मी ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये गेलो होतो, तेव्हाचा प्रसंग मला आजही आठवतो. अंगात नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगलसूत्र, पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे आणि मराठमोळी पद्धतीने डोक्यावरून घेतलेला पदर या पोशाखातील माझी आई, मार्थाबाई, जेव्हा बॉम जेजू बॅसिलिकात पवित्र कम्युनियनसाठी रांगेत उभी राहिली होती. त्या वेळी गोव्यातील फादर तिला हिंदू समजून कम्युनियन देण्याचे नाकारतील की, काय या शंकेने मी तिच्यापाठोपाठच रांगेत उभा राहिलो होतो. मात्र ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक संस्कृतीची जाण असलेल्या त्या धर्मगुरुने डोळे मिटून हात जोडून उभे राहिलेल्या बाईच्या जिभेवर कम्युनियन ठेवले, तेव्हा अशी शंका घेतल्याबद्दल क्षणभर मलाच अपराध्यासारखे वाटले.

धर्मांतरानंतर दोनशे वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर आजही अहमदनगर, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर आणि नाशिक वगैरे जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांत हेच चित्र दिसते. जर्मन मिशनरी आर्चबिशप हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात केंदळ या गावात सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेले ‘निरोप्या’ हे मराठी मासिक पुण्यातील स्नेहसदन संस्थेतून आजही प्रसिद्ध होते. त्यातल्या वाढदिवसांच्या, लग्नांच्या वर्धापनदिनाच्या आणि चाळिसाव्याच्या छायाचित्रांसह असलेल्या जाहिराती पाहिल्या म्हणजे मी काय म्हणतो हे लक्षात येईल.

गोव्यात आणि वसईला मात्र धार्मिकदृष्ट्या कर्मठ असलेल्या पोर्तुगीजांनी धर्मांतरित लोकांना स्वतःची पोर्तुगीज (ख्रिस्ती नव्हे!) नावे आणि आडनावे लावण्याचा अट्टाहास धरला आणि त्यामुळे तेथील देशी ख्रिस्ती लोकांनाही फ्रान्सिस, कॅरोलिना, क्लारा, मिंगेल, कामिलो, रोनाल्ड, सॅव्हियो, मार्टिन अशी नावे आणि डिसोझा, रिबेलो, फर्नांडिस अशी पोर्तुगीज धर्तीची आडनावे मिळाली. विशेष म्हणजे यापैकी एकही ख्रिस्ती नाव वा आडनाव नाही. ख्रिस्ती नाव म्हणायची झाल्यास सायमन (शिमोन), मोझेस (मोशे). जोसेफ (योसेफ) पीटर (पेत्र), मेरी (मरियम), जेकब (याकोब), मायकल (मिखाईल) अशी बिबलिकल म्हणजे बायबलमधली नावे. पण ही नावे ज्यू आणि इस्लाम धर्मियांमध्येही असतात! त्यामुळे माझे कामिल हे नावसुद्धा खरे तर ‘ख्रिस्ती’ नाव नाही! आता भारतात ख्रिस्ती कुटुंबात मुलांना भारतीय संस्कृतीतली नावे देण्याची पद्धत सुरू झाली आहे.

पाश्चात्य संस्कृतीत डोक्यावरची हॅट काढून आदर व्यक्त करण्याची आणि प्रार्थनेच्या वेळी हॅट काढण्याची प्रथा आहे. भारतीय परंपरात मात्र असा शिष्टाचार पाळला जात नाही. मुस्लीम वा शीख धर्मस्थानांत याउलट म्हणजे बोडक्या डोक्याने प्रवेश करणे निषिद्ध मानले जाते. महाराष्ट्रातील वा संपूर्ण देशातीलच ख्रिस्ती समाजात भक्तीच्यावेळी पागोटे वा टोपी काढून ठेवण्याची परंपरा कशी सुरू झाली हे कळत नाही. लहानपणी हरेगावच्या मतमाऊलीच्या म्हणजे मारियामातेच्या यात्रेत लांबवरच्या खेड्यांतून थकून आलेले खेडूत आपले सामान सांभाळत टोपी वा पागोट्यासह देवळात बसकण मारत, तेव्हा त्यांच्याशेजारचे चारपाच जण तरी त्यांना त्यांची टोपी वा पागोटे काढून ठेवण्याची आठवण करून देत असे, हे मी अनेकदा पाहिले आहे. बाया मात्र डोक्यावरील आपला पदर देवळात नेहमीपेक्षा अधिक सावरून बसत असतात.

अर्थात सांस्कृतिकीकरणाची ही परंपरा ख्रिस्ती महामंडळाच्या दोन हजार वर्षांइतकीच जुनी आहे. इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते या धर्माने अगदी जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत स्वीकारले आहे. नाताळ सणाच्या बाबतीतही असेच घडले. येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या तारखेला झाला हे कुणालाच ठाऊक नाही. ख्रिस्ती धर्म रोमन साम्राज्यात पसरला तेव्हा त्या काळात रोमन लोक २५ डिसेंबरला सूर्यदेवाचा सण साजरा करत असत. म्हणून ख्रिस्ती लोक या दिवशी  ख्रिस्तजयंतीचा सोहळा साजरा करू लागले. आज जगभर ख्रिस्ती धर्माशी जोडल्या गेलेल्या अनेक प्रथा रीतीरिवाज या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या आहेत. मग तो सांता क्लॉज असो वा नाताळाची भेट कार्डस, ख्रिस्तमस ट्री असो.

‘हिंदुस्थानातील पूर्ण राष्ट्रीय अशा सणांचा आपण (ख्रिस्ती लोकांनी) का त्याग करावा, हे मला समजत नाही’ असे ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांनी नागपुरात १९३३ साली भरलेल्या चौथ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून  म्हटले होते. दसरा, पोळा, वर्षप्रतिपदा, संक्रांत  वगैरे धर्मभेदातीत ठेवता येण्यासारखे सण ख्रिस्ती लोकांना उचलण्यास काय हरकत आहे असे त्यांनी विचारले होते.

लक्ष्मीबाई  टिळकांच्या या मतात वावगे असे काही नाही. मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या घरी दिवाळीच्या चारही दिवस अंगण शेणाने सारवून रांगोळी काढली जात असे. घरात दिवाळीशी संबधित कुठलेही धार्मिक रिवाज पाळले जात नसत, भाऊबीज मात्र इतर शेजारच्या घराप्रमाणेच थाटामाटात साजरी व्हायची. पुरणपोळीच्या जेवणानंतर आई आणि बहिणी या वेळी माझ्या वडिलांना आणि आम्हां सर्व भावांना ‘इडा पिडा टळो’ म्हणून ओवाळत असे. प्रत्येकास त्यावेळी कमरेस गुंडाळण्याची लाल गोंडा असलेला काळा कंबरदोटा मिळत असे. ताटात ओवाळणी म्हणून टाकण्यासाठी पाच-दहा पैशांचे नाणे आम्हांला आधीच मिळालेले असायचे.

दसऱ्याच्या आणि संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी ख्रिस्ती घरातली आम्ही मुलेमुली शेजारीपाजारी सोने देण्यासाठी आणि तिळगूळ घेण्यासाठी जात असू, वडिलधाऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत असू. तेव्हा ही परंपरा आपल्या धर्मात नाही असे बाई-दादांनी आम्हांला कधीही ऐकवले नाही. माझी आई पूर्ण अशिक्षित आणि वडील दुसरीपर्यंत शिकलेले असतांनासुद्धा त्यांना हिंदू आणि ख्रिस्ती धर्मातील तत्त्वांची अशी सुंदर सांगड घालण्याचे कसे सुचले, याचे मला आश्चर्य वाटायचे. पण महाराष्ट्रातील सगळ्याच मराठी ख्रिस्ती कुटुंबांत असेच चालते, असे नंतर लक्षात आले. 

ग्रामीण भागातील ख्रिस्ती लोकांनी आपल्या नव्या धर्माची आपल्या पारंपरिक संस्कृतीशी सांगड घातली आहे. हरेगावात तेथील ख्रिस्ती शेतकरी बैल पोळा अगदी उत्साहाने साजरा करत असत. हरेगावच्या खासगी बेलापूर साखर कारखान्याभोवती वसलेल्या एकवाडी, दोनवाडी, आठवाडी वगैरे वाड्यांत राहणारे ख्रिस्ती शेतकरी आपल्या बैलांना रंगवून, शिंगांना बेंडे आणि गोंडे लावून, सजवून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून त्यांना देवळात आणत असत. देवळाच्या पायऱ्यांवर  सफेद झग्यांत उभे राहिलेले युरोपियन फादर रिचर्ड वासरर, फादर हुबर्ट सिक्स्त व फादर बेंझ या बैलांच्या जोड्यांवर पवित्र पाणी शिंपडून त्यांना आशिर्वादीत करत. आर्शिवादानंतर बैलांचे मालक बैलांना घेऊन देवळाला प्रदक्षिणा घालत आणि आपल्या घरी परतत. संध्याकाळी उशीरापर्यंत बैल पोळ्याचा हा समारंभ आम्ही बोर्डिंगची मुले कुतूहलाने पाहत असू. गेल्या महिन्यात बैलपोळ्यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील माळीघोगरगाव येथल्या शंभर वर्षे जुन्या असलेल्या ख्रिस्तराजा मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी सजवलेले बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे फोटो फेसबुकवर पाहिले आणि या आठवणी ताज्या झाल्या.

माझी मुलगी आदिती तीन-चार वर्षांची असल्यापासून तिला मी पिंपरी-चिंचवडमधील आमच्या कॉलनीतल्या बिल्डिंगमधील शेजाऱ्यांकडे दसरा-संक्रांतीनिमित्त सोने वाटण्यासाठी आणि तिळगूळ घेण्यासाठी घेऊन जाऊ लागलो, तेव्हा सर्वांनाच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले होते. आजही दरवर्षी मला राखी पौर्णिमेच्या वेळी माझ्या बहिणीकठून पोस्टाने राखी येत असते, आणि या राखी सणानंतर एक-दोन दिवस उशीरा मिळाल्या तरी मी त्या घालतोच. या वेळी उशिरापर्यंत पार्किंगमधल्या पोस्टाच्या बॉक्समध्ये राखी दिसली नाही, तेव्हा मन खट्टू झाले होते आणि नंतर लगेचच करोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनची आठवण झाली.  

ख्रिस्ती झाल्यानंतही लक्ष्मीबाई टिळक अनेक वर्षे कुंकू लावत असत व त्याबद्दल रेव्ह. टिळकांनी किंवा कुठल्याही परदेशी मिशनरीने त्याबद्दल नापसंती व्यक्त केली नव्हती. महाराष्ट्रीय प्रोटेस्टंट पंथियांनी मात्र सांस्कृतिकीकरणाबाबत जरा सोवळे धोरण स्वीकारलेले दिसते. या पंथियांमध्ये बहुसंख्य स्त्रियांनी कुंकू लावण्याची प्रथा ख्रिस्ती धर्माशी विसंगत म्हणून बंद केली आहे. कॅथोलिकांमध्ये मात्र स्त्रियांनी सर्व सौभाग्यलेणी - कुंकू, मंगळसूत्र, मुरणी वा नथ, बांगड्या, पायांत चाळ, पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे वापरण्याची प्रथा चालू ठेवली आहे.

आमच्या ख्रिस्ती घरातील भावांच्या आणि बहिणींच्या लग्नांत सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे, मुंडळ्या लावलेल्या नवरदेवाची वरात, वरातीतल्या पाहुण्यांसाठी पायघड्या अंथरणे, त्यांची पायधुणी, सोयऱ्याधोयऱ्यांचे आणि भाऊबंदांचे मानपान वगैरे सर्व कार्यक्रम झाले आहेत.

याचे कारण म्हणजे त्याबाबत तडजोड करायला लग्नातील दोन्ही बाजू तयार नसायच्या. परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीसुद्धा या सांस्कृतिक परंपरांना विरोध केला नाही. त्यामुळेच पांढरीशुभ्र साडी किंवा पाश्चात्य पद्धतीचा वेडिंग गाऊन घातलेली नवरी आणि सुटाबुटांत असलेल्या नवरदेवाच्या सोन्याच्या अंगठ्यांना चर्चमध्ये फादर आशीर्वाद देऊन नंतर नवदाम्पत्य त्या अंगठ्या एकमेकांच्या बोटांत घालतात. धर्मगुरु याच वेळी सोन्याच्या मंगळसूत्रास आशीर्वाद देतात आणि त्यानंतरच नवरदेव नवरीला ते मंगळसूत्र घालतो. एकमेकाला सुखदुःखास साथ देण्याच्याही  आणाभाका या वेळी घेतल्या जातात. पाश्चात्य आणि देशी संस्कृतीचा असा सुंदर मिलाप भारतात खूप वर्षांपूर्वीच  घडला आहे.

याच्याही पुढे जाऊन मराठी ख्रिस्ती समाजाने ‘ओम’ या आपल्या जुन्या संस्कृतीतील पवित्र, मंगल शब्दांचाही ही स्वीकार केला आहे. ‘ओम भगवान, प्रभु ख्रिस्त भगवान’ हा नामजप ख्रिस्ती देवळांत अनेक वर्षांपासून पेटी-तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गायला जात आहे. यात कुणालाच काही विशेष वाटत नाही.

महाराष्ट्रातील ख्रिस्ती माणसे तर या मातीत जन्मलेली आणि इथल्याच संस्कारांत वाढलेली. मग ती परकी का वाटावीत? तीही आपली बोली बोलणाऱ्यांना, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अनुपमा उजगरे यांनी विचारला आहे. “अनुभव असा आहे की, प्रत्यक्षात दोन्ही समाजातील व्यक्तींचा एकमेकांशी संबंध आला की, गैरसमज दूर होतात आणि ‘अरे, वाटलंच नाही तुम्ही ख्रिस्ती असाल !’ असे आश्चर्योद्वारे ऐकू येतात,” असे उजगरे यांनी लिहिले आहे.

पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक वर्षे इंग्रजी शाळेचे (कॉन्व्हेंट!) प्राचार्य असलेले फादर नेल्सन मच्याडो एकदा बालगंधर्व रंगमंदिरात मराठी नाटक पहायला गेले, तेव्हा तेथे आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने त्यांना नाटकाचे मराठीत भाषांतर करून देण्याची तयारी दर्शवली होती. तेव्हा ‘‘अहो मॅडम, मला मराठी चांगले कळते. मी वसंत कानेटकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात लाल्याची आणि इतरही खूप नाटकांत भूमिका केलेल्या आहेत’’ असे वसईचे सुपुत्र असलेल्या फादर मच्याडो यांनी त्यांना सांगितले होते. 

अशा या मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाचे पारंपरिक आणि आधुनिक रूपांचे दर्शन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रेत दिसते. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. मतमाऊली हा शब्द मुंबईतील बांद्राच्या माऊंट मेरीचा अपभ्रंश! बांद्रा येथील प्रसिद्ध माऊंट मेरी बॅसिलिकायेथे माऊंट मेरीची नऊ दिवसांची नोव्हेना प्रार्थना वा यात्रा आठ सप्टेंबरपासून सुरू होते. तिथे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील बहुसांस्कृतिक आणि मिश्रभाषिक ख्रिस्ती भाविक येतात.

करोनाच्या पार्श्वभूमीवर हरेगाव आणि बांद्रा येथील धार्मिक उत्सवावर बंधने असली तरी या आठवड्यात ख्रिस्ती भाविकांचे या दोन्ही तीर्थक्षेत्रांकडे लक्ष लागून राहिले आहे.