Did you like the article?

Showing posts with label Maharashtra. Show all posts
Showing posts with label Maharashtra. Show all posts

Wednesday, December 29, 2021


तमाशाचे फड बंद पाडणारे औरंगाबाद जिल्ह्यातले जाकियरबाबा
पडघम - सांस्कृतिक      'अक्षरनामा' 
कामिल पारखे
  • डावीकडे जाकियरबाबा. उजवीकडील तमाशाविषयीचं छायाचित्र ‘मराठी विश्वकोशा’तून साभार
  • Mon , 27 December 2021
  • पडघमसांस्कृतिकसांता क्लॉजSanta ClausतमाशाTamashaलोककलाFolk Art

‘सांता क्लॉज या विदेशी काल्पनिक पात्राला उत्तेजन देण्याऐवजी वासुदेव यासारखी आपल्या देशी सांस्कृतिक वैभव असलेल्या लोककला जिवंत ठेवायला हवे’, अशी चर्चा या नाताळ सणानिमित्त सोशल मीडियावर झाली आहे. वासुदेवप्रमाणेच तमाशात विविध कामे करणारे तमासगिर लोक, पोतराज, मसणजोगी, नंदीबैलवाले, ग्रहण सुटल्यावर घरोघरी उरलेले अन्न मागणारे लोक, बहिरूपी, थरारक अंगकसरती करणारे डोंबारी लोक, भविष्य सांगणारे कुडमुडे जोशी, वगैरे विविध समाजघटकांनी या लोककला जिवंत ठेवल्या आहेत. पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.

......................................................

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाचा नायक असलेला आदर्श शिक्षक गावात आलेला तमाशाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेला हा शाळामास्तर तमाशाशौकिनांच्या विरोधाची फिकिर न करता आपल्या नैतिक बळावर एकट्याने तमाशाचा रंगात आलेला खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. मुळात तमाशा हा एक अनैतिक प्रकार आहे आणि आपल्या गावच्या लोकांना त्यापासून दूर ठेवणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे, या समजापोटी हे मास्तर तमाशा बंद पाडण्याची धडपड करत असतात. तमाशातील नर्तकीच्या प्रेमात पडून या मास्तरांचे नंतर नैतिक अध:पतन होते, ही गोष्ट निराळी. मात्र तमाशाविषयी समाजात काय प्रतिमा होती, हे ‘पिंजरा’तील आदर्श मास्तरांच्या भूमिकेतून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील घोगरगावात आणि आसपासच्या परिसरातील अस्पृश्‍य लोकांनी तमाशात काम करू नये, तमाशाच्या फडाला हजेरी लावू नये, असा फादर गुरियन जाकियर ( Fr. Gurien Jacquier, MSFS) उर्फ जाकियरबाबा यांचा आग्रह होता. त्यांच्या विरोधास न जुमानता आसपासच्या एखाद्या गावात तमाशाचा फड भरला, तर ऐन रंगात आलेला प्रयोग ते बंद पाडत असत. तमाशा या लोककलेचे जतन करण्यासाठी आज विविध संस्थांतर्फे आणि शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या शतकात या ख्रिस्ती धर्मगुरूने या लोककलेविरुद्ध भूमिका का घेतली होती, हे जाणून घेण्यासाठी तमाशा या लोककलेचे स्वरूप माहिती करून घेतले पाहिजे. 

माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बाजारतळापाशीच तमाशाचे फड भरत असत. आमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरील मैदानात तमाशाचे तंबू उभारले जात असत. ज्येष्ठ तमाशाकलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, कांताबाई सातारकर आणि गुलाबबाई संगमनेरकर वगैरेंच्या तमाशाच्या फडांची दिवसभर चाललेली जाहिरात आम्ही मुले पाहत असू. मात्र घरातील वा शेजारपाजारातील कुणी प्रौढमंडळी या तमाशाच्या खेळाला जात नसत. आठवड्याच्या बाजाराला येणारे आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकच प्रामुख्याने या लोककलेचे आश्रयदाते असत. आम्हा मुलांना सिनेमाला जाण्यास परवानगी असे. मात्र एकदा तरी तमाशा हा काय प्रकार असावा, याचा अनुभव घ्यावा असा विचारही कधी मनात आला नाही, याचे कारण तमाशा म्हणजे एक अश्‍लील कार्यक्रम आणि आंबटशौकीन रसिकांचे करमणुकीचे साधन असा सर्वांचाच समज होता.

“तमाशा कलेत चोरपावलांनी येणारी अनैतिकता हा तर चिंतेचा विषय आहे. महार, मांग, आणि कोल्हाट्याची बाई नाचवणं आणि पैसा फेकून तिला नागवणं, ही उच्चवर्णीय सरंजामी मानसिकता बदलली नाही, तर परंपरा म्हणून तमाशा का टिकवायचा, हाही प्रश्‍न आहे,” असे तमाशा-कलेचे एक अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी आपल्या ‘तमाशा : कला आणि कलावंत‘ या पुस्तकात लिहिले आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तमाशा क्षेत्राची अगदी जवळून ओळख असलेले अभिनेते निळू फुले यांनी म्हटले आहे, ‘‘मागास, अस्पृश्‍य समजल्या जाणाऱ्या महार, मांग, कोल्हाटी, गोपाळ आदी जातीचे कलाकार तमाशात जास्त आहेत. त्यांनीच ही कला टिकवली आहे. तमाशा क्षेत्रात कर्ज हा एक मोठा प्रश्‍न आहे. फडमालक सावकाराकडून कर्ज घेतात. तमाशातला कलाकार फडमालकाकडून कर्ज घेतात. अशा प्रकारे फडमालक कर्जबाजारी, कलाकार-कामगार कर्जबाजारी, कर्जावर चालणारा हा व्यवसाय आहे. कर्जामुळे कोणीही सुखी नाही. तमाशाला पैसे पुरवणारे बहुतेक सवर्ण असतात. तमाशातील स्त्री कलाकार कर्जबाजारी असेल आणि कर्ज फिटले नाही तर तिला भांडवलदाराच्या स्वाधीन व्हावे लागते. सतत दारिद्रयात राहूनही हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा प्रश्‍न नेहमी माझ्या मनात येत असे.’’ कदाचित तमाशा कलेवरील प्रेमापोटीच हा वसा त्यांनी स्वीकारला असावा, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतर तमाशावर अश्‍लीलतेचा आरोप झाला. त्यामुळे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी १९४८ साली तमाशावर बंदी घातली गेली. ही बंदी उठावी म्हणून तमाशा कलावंतांनी प्रयत्न केले.

त्या वेळी खेर यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘तमाशा सुधार समिती’ नेमली होती. या समितीने तमाशाचे संहिता लेखन आणि सादरीकरणाबाबतीत काही अटी घातल्यानंतर तमाशावरील ही बंदी उठवण्यात आली. तमाशात अश्‍लील संवाद नसावेत, दौलतजादा करताना तमासगीर नटीला हात लावू नये वगैरे अटी घालण्यात आल्या.

पुणे विद्यापीठाच्या पवळा पठ्ठेराव बापूराव साहित्य, संगीत, लोककला अकॅडेमी आणि पाथफाइंडर इंटरनॅशनल या संस्थांच्या वतीने पुण्यात २००७च्या ऑक्टोबरात तमाशा महोत्सव व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेत तमाशाबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ‘तमाशा’ शब्द हा फारशीतून उर्दूत आणि उर्दूतून मराठीत आला आहे, असे दिसते. तमाशा हा प्रकार ज्या शाहिरांनी रूढ केला, तो शाहीर (शाईर हा मूळ शब्द) अरबी भाषेतून मराठीत आला आहे. त्यामुळे तमाशा हा कलाप्रकार मुसलमानांच्या प्रभावातून उदयास आला असावा, असे काही संशोधकांचे मत आहे.

महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारुड, लळिते आणि दशावतार या लोककलांचाही अर्थातच तमाशावर प्रभाव आहे. साधारणत: तमाशा ही लोककला महाराष्ट्रात महार, मांग, गोंधळी, कोल्हाटी, डोंबारी यांच्याच हाती राहिली, असे या पत्रिकेतही स्पष्ट म्हटले आहे. उल्लेख केलेल्या या सर्व जाती अस्पृश्‍य, गावकुसाबाहेरच्या जातीजमाती. अर्थात या लोककलेचा आस्वाद घेणारे व पर्यायाने या कलाकारांचे विविध प्रकारे लैंगिक शोषण करणारे रसिकजन अर्थातच उच्चवर्णीय होते. तमाशातील स्त्रीकलाकारांचे लैंगिक शोषण करताना मात्र या कलावंतांची अस्पृश्‍यता तेवढ्यापुरती नजरेआड केली जात असे, हे विशेष.

आपल्या देशांत सर्वच पारंपरिक व्यवसाय जातींवर आधारित आहेत आणि सर्व लोककलांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. तमाशा ही लोककला प्रामुख्याने महार आणि मातंग जातीतील लोकांनी विकसित केली. या अस्पृश्‍य जातीतील महिला तमाशात नाचत आणि गात असत, तर पुरुषमंडळी ढोलकी, तुणतुणे, मंजिरा, डफ, हलगी, कड आणि पेटी ही संगीतवाद्ये वाजवत असत. त्यावरून या लोककलेला आणि तिच्याशी संबंधित असलेल्या कलाकारांना उच्चवर्णीयांत काय प्रतिष्ठा असे, याची कल्पना करता येते. तमाशाचा हंगाम पावसाळा आणि शेतीचे कामे संपल्यानंतर दसरा ते अक्षयतृतीया या काळात असतो. लग्नसराईत वाजंत्री काम, यात्रेच्या हंगामात तमाशे इत्यादींतही महार प्रामुख्याने आढळतात. 

मी लहान असताना घोगरगावात माझे मामेभाऊ लग्नसराईत पिपाणी, ढोलकी वगैरे वाद्ये वाजवत असत हे मला आठवते. यामागची कारणमीमांसा वरील संदर्भ वाचल्यानंतरच मला समजली. याचा अर्थ वाद्ये वाजवण्याची कला ते घरातील कुणाकडून किंवा नातेवाईकांकडून शिकले असणार. कुणी सांगावे, कदाचित माझ्या आजोळातील माझे काही नातेवाईकही त्यांच्या तरुणपणात म्हणजे फादर जाकियर यांच्या काळात तमाशातही झीलकरी वा इतर कामे करत असतील.

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरील १९६९ साली लिहिलेल्या एका लेखात तमाशाविषयी केलेली टिपण्णीही या संदर्भात पाहता येईल. सुर्वे म्हणतात, “पंचवीस वर्षांपूर्वी तमाशा हा शब्द एखाद्या अस्पृश्‍यासारखा वापरला जाई. तमाशा म्हणजे सभ्य लोकांनी, शिष्ट लोकांनी, अगर पोळीबाळींनी न पाहावा, असा नाटकाचा एक प्रकार. त्यात नाच्यापोऱ्या असतो, तो घाणेरडे व अश्‍लील हावभाव करतो. शृंगारिक व चावट गाणी म्हणतो, त्याने सुसंस्कृत माणसांची अभिरुची बिघडते. तमाशा करणारे अस्पृश्‍य असतात व तो पाहणे पाप आहे, ही प्रचलित भावना त्या काळात होती.”

तमाशा या लोककलेचे लोकनाट्यात रूपांतर होण्याआधी पारंपरिक तमाशातील कलाकारांची जातीविषयक पार्श्‍वभूमी, स्त्रिकलाकारांचे लैंगिक शोषण आणि या लोककलेतील प्रयोगांतील संवाद आणि नाचगाण्यांतील अश्‍लीलता वगैरे संदर्भ ध्यानात घेतले म्हणजे जाकियरबाबांनी तमाशाला का विरोध केला हे समजते.

‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरही नैतिक दृष्टीकोनातूनच तमाशाच्या खेळास विरोध करत असतात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यात बियरबारमध्ये महिलांच्या नाचगाण्यांवर बंदी घातली आहे. त्यामागेही स्त्रियांच्या लैंगिक शोषणास आणि अश्‍लीलतेस विरोध अशीच त्यांची भूमिका आहे.

वैजापूर तालुक्यातले घोगरगाव माझे आजोळ. माझ्या आईवडिलांनी जाकियरबाबांना जवळून पाहिले. ''घोगरगावचे जाकियरबाबा (मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशनकार्य इ. स. १८९२ पासून ) हे मी लिहिलेले जाकियरबाबांचे चरित्र उषाताई आणि विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशनाने २००८ साली प्रसिद्ध केले
मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डी सेल्स (MSFS) किंवा फ्रान्सलीन या धर्मगुरूंच्या संस्थेचे सदस्य असलेल्या जाकियरबाबांनी १८९२ पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९४७) घोगरगावात मिशनकार्य केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरीक असलेल्या जेसुईट आणि इतर फादरांची हकालपट्टी केली तेव्हा शिर्डीजवळच्या राहाता येथे फादर जाकियर यांनी येशूसंघीय धर्मगुरुंचे काम चालू ठेवले होते. घोगरगावात त्यांची समाधी आहे.
जाकियरबाबांचे या परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहून कॅथोलिक चर्चने त्यांना संत म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.

फादर जाकियर यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या कुठल्याही लिखाणात त्यांनी तमाशाला केलेल्या विरोधाचा उल्लेख माझ्या वाचनात कधी आला नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि घोगरगावातील माझ्या मामांच्या संभाषणात मात्र याबाबतची चर्चा मी अनेकदा ऐकली आहे. शांत्वन आणि वामन शिनगारे या माझ्या दोन मामांनी जाकियरबाबांच्या छकड्यावर गाडीवान म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेली माहिती, याबाबत विश्‍वासार्ह मानता येईल. जाकियरबाबांविषयी घोगरगाव परिसरात अस्पृश्‍य ख्रिस्ती समाजात तसेच उच्चवर्णीय वगैरे मंडळीत मोठा आदर होता.



सरकारदरबारी कलेक्टर आणि तहसीलदार यासारख्या अधिकाऱ्यांशी आणि शेजारपाजारच्या गावांच्या पाटील वगैरे मंडळींशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांतील त्यांच्या कामांमुळे, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्याविषयीचा एक प्रकारचा दराराही असे. उच्चशिक्षित आणि युरोपियन असल्याने ब्रिटिश जमान्यात सरकारदरबारीसुद्धा त्यांचा वचक असे. त्यामुळे जाकियरबाबांनी अस्पृश्‍यतापालनासारख्या एखाद्या अनिष्ट वा अनैतिक सामाजिक रूढीस विरोध केला, तर अशा प्रसंगी त्यांच्या विरोधास जाण्याची कुणाची हिंमत नसायची. जाकियरबाबांनी तमाशाच्या प्रथेस विरोध केला, तेव्हाही असेच झाले असणार.

घोगरगाव आणि आसपासच्या परिसरातील महार समाजातील अनेक ख्रिस्ती स्त्री-पुरुषही त्या काळात तमाशात कलाकार म्हणून काम करत असतील, याविषयी शंकाच नाही. तमाशात नाच्या किंवा मावशीची भूमिका करणाऱ्या पुरुष नटाला लांब केस राखावे लागत. या ग्रामीण भागात अनेक वर्षे राहून या लोककलेचे एकूण स्वरूप समजल्यानंतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूने आपल्या धर्मग्रामातील ख्रिस्ती महिलांस तमाशात नाचण्यागाण्यापासून परावृत्त केले असते. ख्रिस्ती पुरुष मंडळींनी तमाशात अश्‍लील स्वरूपाची नाचगाणी म्हणू नये, नाच्याचे काम करू नये, यासाठी त्यांच्यावरही दबाव आणला असता.

जाकियरबाबांनी तर घोगरगाव परिसरात आपल्या आयुष्याची चार दशके घालवली. या फ्रेंच धर्मगुरूने घोगरगावात आल्यानंतर इंग्रजी आणि मराठी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळवले होते. घोगरगावातील ख्रिस्तराजा मंदिरात त्यांनी अनेक वर्षे नवख्रिस्ती लोकांना मराठी भजने, गायने शिकवली. तमाशाला त्यांनी विरोध करण्याआधी त्यांनी या लोककलेच्या विविध अंगांचा अभ्यास नक्कीच केला असणार.

फादर जाकियर यांचा तमाशाला असलेला कडवा विरोध पाहता ते घोगरगावात असताना या लोककलेचे प्रयोग या गावात झाले असतील, याविषयी दाट शंकाच आहे. मात्र आसपासच्या खेड्यांत तमाशाचे खेळ होतच असत. यात्रेच्या वा इतर कुठल्याही निमित्ताने तमाशाचे प्रयोग असले म्हणजे त्या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पुरुषमंडळी तेथे आवर्जून हजर राहत असत. तमाशाचे हे प्रयोग रात्रीच रंगत असत. ढोलकीच्या आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर तमासगीर महिला आणि पुरुष गात आणि नाचत असत.

अशा वेळी फादर जाकियर आपली घोडागाडी बाहेर काढून त्या आवाजाच्या दिशेने निघत. रात्रीच्या वेळी नदी किंवा ओढे ओलांडून तमाशाच्या जागी ते पोहोचत असत. त्या अस्पृश्‍य स्त्री-पुरुष कलाकारांनी तमाशाच्या माध्यमातून होणारे त्यांचे स्वत:चे लैंगिक शोषण रोखावे म्हणून त्यांना उपदेश करत असत. अनेकदा उपदेशाऐवजी त्या लोकांची कानउघाडणीच केली जात असणार. तमाशापथक मोगलाई परिसरातील असले तर त्यातील बहुतेक तमासगीर जाकियरबाबांच्या धर्मग्रामातील ख्रिस्ती लोकच असत.

तमाशाचा ऐन रंगात आलेला प्रयोग अशा प्रकारे बंद पाडल्यानंतरही हे तमासगीर दुसरीकडे कुठेतरी तमाशाचे खेळ चालूच ठेवतील म्हणून फादर जाकियर त्यांची ढोलकी, तुणतुणी, डफ वगैरे वाद्ये आपल्या ताब्यात घेत असत. कलावंतिणीच्या पायातील चार-पाच किलो वजनाचे घुंगरूही काढून घेत. त्याशिवाय पुरुष कलाकारांनी नाच्याची किंवा मावशीची भूमिका करू नये, म्हणून त्यांनी लांब वाढवलेल्या केसांनाही कात्री लावत असत.



जाकियरबाबांच्या आठवणींना माझे आईवडील, मामा आणि इतर जुनी मंडळी उजाळा देत, तेव्हा हे फादर तमाशा कसे बंद पाडत असत, हे याविषयी हमखास बोलले जाई. जाकियरबाबांनी तमासगिरांकडून ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घोडागाडीतून घोगरगावात आणलेल्या ढोलकी, तमासगीर कलावंतिणींचे घुंगरू, तुणतुणे, डफ वगैरे संगीतवाद्यांनी मिशन कंपाऊंडमधल्या दोन खोल्या भरल्या होत्या, हे माझी आई आजही आवर्जून सांगत असते.

मागे घोगरगावला मी भेट दिली, तेव्हा तेथील मुख्य धर्मगुरू फादर स्टीफन अल्मेडा यांनीही यास दुजोरा दिला. तमासगिरांची ती संगीतवाद्ये दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मिशन कंपाऊंडमधील काही खोल्यांत सांभाळून ठेवण्यात आली होती, असे त्यांनी ऐकले आहे, असे त्यांनी मला सांगितले.

महार-मांग या अस्पृश्‍य जातीतील लोकांसाठी तमाशा ही लोककला तर उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. समाजातील या सर्वाधिक उपेक्षित घटकांचा तोंडचा घास हिरावून घेण्याचा फादर जाकियर यांचा मुळीच उद्देश नव्हता. तमाशाबाबत जाकियरबाबांची भूमिका समाजसुधारकाची होती. आपल्या धर्मग्रामातील अस्पृश्‍य लोकांच्या आर्थिक आणि उन्नतीसाठी फादर जाकियर यांनी आणि मोगलाईतील किंवा अहमदनगर जिल्ह्यातील इतर मिशनरींनी अनेक प्रकल्प राबवले होते. लोकांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी ते धावून जात असत. आपल्या धर्मग्रामातील खेड्यांतील मुलांनी साक्षर व्हावे म्हणून जाकियरबाबांनी अनेक गावांत शाळा सुरू केल्या होत्या.

या शाळांत सर्व जाती-धर्मांच्या मुलांना फुकट शिक्षण दिले जात असे. या शाळांच्या मास्तरांच्या निवासस्थानांचा आणि पगाराचा खर्चही फादर स्वत: उचलत असत. तमाशातील काम सोडले तर या लोकांसाठी उदरनिर्वाहाची दुसरे पर्यायही त्यांनी उपलब्ध करून दिले होते.

घोगरगावात सध्या उभ्या असलेल्या उंच शिखरवजा ख्रिस्तराजा मंदिराचे काम एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात वीस वर्षे चालू होते. या बांधकामामुळे आसपासच्या अनेक सुतार, गवंडी अशा कुशल कारागिरांना तसेच इतर अनेक अकुशल कामगारांना अनेक वर्षे रोजगार उपलब्ध झाला होता. जाकियरबाबांचा तमाशाला असलेला विरोध आणि या लोककलेचे प्रयोग बंद पाडण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा याला अर्थातच शंभर वर्षांपूर्वीच्या काळाचा संदर्भ आहे. त्या काळात स्त्रियांनी नाटकांत वा चित्रपटांत काम करणेसुद्धा अनैतिक समजले जाई आणि त्यामुळे अगदी बालगंधर्वांच्या काळापर्यंत पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करत असत.

आज शासन आणि विविध संस्था-संघटना तमाशासारख्या लोककलांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तमाशा या लोककलेने सातासमुद्रापार, पाश्‍चिमात्य देशापर्यंत मजल मारली आहे. मात्र अजूनही या लोककलेचा जातीय संदर्भ नाहीसा झालेला नाही. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतर, अस्पृश्‍यता कायद्याने बंद झाल्यानंतर आजही सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांत सफाई कामगार, भंगी, शिपाई वगैरे कामे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य समाजातीलच लोक करतात. तसेच खेड्यापाड्यांत होणाऱ्या तमाशातील बहुसंख्य स्त्री-पुरुष कलाकार आजही महार, मांग, कोल्हाटी या समाजातीलच आहेत.

‘आजही तमाशात गायक म्हणून महार कलावंताची संख्या जास्त प्रमाणात आहे’, असे डॉ. कसबे यांनी म्हटले आहे. या लोककलेशी निगडित असलेले दलित जातींविषयक संदर्भ अजूनही पुसले गेलेले नाहीत. ‘ब्राह्मणाघरी लिव्हनं, महाराघरी गाणं आणि मांगाघरी वाजवणं’ किंवा ‘महाराचं गाणं आणि मांगाचं डफडं‘ अशा म्हणी प्रचलित आहेत. या जातींविषयक संदर्भांमुळे आणि इतरही काही कारणांमुळे चित्रपटसृष्टीतील आणि रंगभूमीवरील स्त्री-पुरुष कलाकारांना हल्ली मिळणारी प्रतिष्ठा, धनप्राप्ती आणि ग्लॅमरचे वलय तमासगिरांच्या नशिबी अजून तरी नाही.

तमासगीर कलावंतांचे होणारे लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आजही पूर्णत: बंद झालेले नाही. हे शोषण बंद करण्यासाठी तमाशाचे प्रयोग बंद करण्याची मुळीच जरुरी नाही. मात्र तोंडाला रंग फासून रंगमंचावरून, छोट्या वा मोठ्या पडद्यांवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला येणारे आर्थिक आणि इतर लाभ दलित समाजातील या लोककलाकारांनाही मिळावेत, अशी माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

आपल्या मुलांनी आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे प्रथितयश डॉक्टरांना, राजकीय पुढाऱ्यांना आणि इतर काही क्षेत्रांतील लोकांना वाटत असते. तमाशा ही लोककला म्हणून टिकून राहायला हवी, असे म्हणणाऱ्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही आपल्या मुलाबाळांनी या क्षेत्रात पैसा आणि नाव कमवावे असे मनापासून वाटले, तरच या लोककलेला समाजमान्यता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली असे म्हणता येईल.

नजिकच्या काळात तमासगिरांच्या नशिबी ही प्रतिष्ठा आणि सुख मिळण्याची शक्यता नसेल तर हे कलाकार तमाशाला का चिकटून राहिले, असा अभिनेते निळू फुले यांना पडलेला प्रश्‍न इतर कुणालाही पडू शकेल.

पण या लोककला खरेच अभिमानास्पद आहेत काय, असा प्रश्न वासुदेव आणि देशातील इतर अनेक लोककलांबाबत उपस्थित केला जाऊ शकतो.

Thursday, October 28, 2021

 ‘गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा'



 ‘गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा’ या माझ्या नव्याकोऱ्या पुस्तकाची प्रत अर्ध्या तासापूर्वीच माझ्या हातात पडली. या पुस्तकाला गोव्यातील माझा मित्र आणि इंग्रजी वृत्तपत्र माध्यमातील पत्रकार फ्रेडरिक नरोन्हा ( Frederick Noronha ) याने प्रस्तावना लिहिली आहे.

पणजीतल्या `द नवहिंद टाइम्स'मध्ये रिको याचे येथे साप्ताहिक सादर असते, हो, पत्रकारितेची सुरुवात मी याच दैनिकांत केली. आपल्या सदरात रिको याने माझ्याविषयी आणि माझ्या लेखनाविषयी लिहिले होते, त्यातील काही मजकूर येथे प्रस्तावना म्हणून वापरली आहे.
डेक्कन हेराल्डमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या फ्रेडरिक नरोन्हा याचे इंग्रजी आणि कोकणी प्रसारमाध्यमात, प्रकाशनक्षेत्रात आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरही काहीबाही उद्योग चालू असतात. पत्रकारांच्या लिखाणावर भाष्य करणारी त्याची ही प्रस्तावना :
----
पत्रकार त्यांच्या कथा का सांगत नाहीत? दिलेल्या वृत्ताच्या पलीकडे पत्रकार त्यांच्या कथा का सांगत नाहीत? कुणालाही असेच वाटेल की, त्यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक कथा असतील.
साथीचा रोग सर्व देशभर किंवा जगभर फैलावलेला असलेल्या काळात, आपल्यापैकी बरेच जण दीर्घकाळापर्यंत घरात अडकले आहेत. तर, वाचणे आणि आठवण काढणे जवळजवळ नैसर्गिकरित्या येते. काहींना हे ऑनलाइन होणे जास्त पसंत नाही. पण, माझ्या मते मेमरी लेनमध्ये जाणे हा आपला अलीकडील इतिहास समजून घेण्याचा एक मार्ग आहे.
काही पत्रकार सहकारी अलीकडच्या काळात आम्हाला गोव्यातील माणसे आणि कार्यक्रम, समस्या आणि प्रवाह समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, १९८०च्या आणि १९९०च्या दशकात गोव्यात पणजीतल्या इंग्रजी दैनिक ‘नवहिंद टाईम्स’मध्ये काम करणारे पत्रकार कामिल पारखे हे ‘फेसबुक’च्या माध्यमातून गोव्यातील त्यांच्या पत्रकारितेतील अनेक घटनांवर मनोरंजक आणि रंगतदार लिखाण करत आहेत.
कामिल पारखे यांची बायलाइन म्हणजे नाव ‘नवहिंद टाईम्स’च्या ज्येष्ठ वाचकांना नक्कीच परिचित असेल. अर्थात्, त्या काळात पत्रकारांना त्यांनी लिहिलेल्या बातम्यांना बायलाइन मिळवणे खूप कठीण होते.
त्यांनी निवडलेल्या विषयांव्यतिरिक्त, कामिलची लेखनाची शैली देखील अतिशय मोहक आणि वाचकांना खिळवून ठेवण्यासारखी आहे. म्हणूनच, पत्रकारांनी वापरावी अशी (आतापेक्षा पूर्वी) अपेक्षा केली जाणाऱ्या अहवालात्मक म्हणजे रिपोर्टरीयल शैली ते जास्त वापरतात. पत्रकारितेतील या शैलीनुसार या कथानकांत कामिल स्वत: पडद्यामागे राहतात आणि या कथांमध्ये विविध घटनांवर, प्रमुख व्यक्तींवर आणि त्या काळातील विविध प्रश्नांवर प्रकाश केंद्रित राहतो.
मूळचा अहमदनगरचा असलेला कामिल हा जेसुइट धर्मगुरू म्हणजे फादर होण्यासाठी गोव्याला (‘माझे पहिले नाव बरोबर उच्चारले जाणारे एकमेव स्थळ’) आला होता आणि शेवटी तो पत्रकार बनला. त्याने येथे गोव्यात, पुणे व इतर ठिकाणी काम केले आहे.
हा, तर मुख्य मुद्दा म्हणजे पत्रकार त्यांच्या कथा का सांगत नाहीत? म्हणजे, त्यांनी ज्या बातम्या दिल्या, त्यापलीकडे जाऊन ते त्या बातम्यांविषयी, बातम्यांमागे दडलेल्या बाबींविषयी आणि छापून आले, त्यापेक्षा अधिक काही, खोलवर का सांगत नाहीत?
गोव्यावर लिहिलेली पुस्तके मी संग्रही ठेवत आलो आहे, या पुस्तकांवर परीक्षणे लिहीत असतो आणि काही पुस्तके प्रकाशित करत असतो. त्यामुळे मला वाटते की, या पत्रकारांकडे अजूनही सांगण्यासारख्या अशा बऱ्याच काही गोष्टी नक्कीच असतील.
‘नवहिंद टाइम्स’चे पूर्वीचे बातमीदार गुरुदास सिंगबाळ, गोव्यातील बस्तोरा गावचे ‘इंडियन एक्सप्रेस’चे वृत्तसंपादक दिवंगत एर्व्हेल मिनिझेस वगैरेंनी आपल्या पुस्तकांत अशा कथा सांगितल्या आहेत. अशा प्रकारे त्यांच्या काळातील गोव्यातील झालेली एखादी घटना आपल्या मताप्रमाणे मांडून (भले त्यांच्या मताशी आपण सहमत होऊ वा न होऊ) त्यांनी त्यांच्या काळातील गोव्यातील या घटना जतन करून ठेवल्या आहेत.
कधीकधी पत्रकारांना त्यांचे लिखाण, स्तंभ किंवा जे काही छापील स्वरूपात आहे, त्याचे संकलन करण्याचा मोह असतो. मी स्वत: असे केल्याने, संकोच न करता असे म्हणू शकतो की, ही कल्पना अगदी वाईट नसली तरी गोष्टी सांगण्याचा हा एक आळशी मार्ग आहे. एक तर पत्रकारितेतील बहुतेक लिखाण सहसा काळाच्या कसोटीवर टिकत नाही. या व्यतिरिक्त भूतकाळातील बऱ्याच वर्षांपूर्वी, दररोजच्या वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या गोष्टीचा संदर्भ नंतर समजणे कठीण आहे.
...तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पत्रकारितेतील अशा कितीतरी गोष्टी अजूनही सांगण्यासारख्या आहेत.''
----
‘गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा’ – कामिल पारखे
चेतक बुक्स, पुणे , मूल्य - ३०० रुपये अमेझॉनमार्फत रुपये २५० फक्त (पोस्टेज खर्चासह )
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी ही लिंक -

Sunday, February 21, 2021


 बार्देसकर समाजाची संस्कृती : भाग २

(फोटोमध्ये लेखक कामिल पारखे एका प्रसिद्ध बार्देस्कराबरोबर, येशूसंघीय फादर प्रभुधर, यांच्याबरोबर पुण्यातील पेपल सेमिनरीच्या आवारात)


महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात राहत असलेले गोयंकार कॅथोलिकांनी म्हणजेच बार्देसकर समाजाने आपल्या मूळ वैशिष्ठ्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा दोनशे वर्षे गोव्यापासून दूर राहूनसुद्धा जपल्या आहेत. त्यांची मातृभाषा कोंकणी टिकवल्यामुळे आणि आंतरजातीय विवाह न केल्यामुळे त्यांना आपली खास ओळख कायम राखण्यात यश आलं आहे. तथापि, त्यांना स्वतःला अथवा त्यांच्या नवीन मातृभूमीतील लोकांना ते `परके’ वाटत नाहीत.

बार्देसकारांच्या गेल्या कित्येक पिढ्या नेहमी खेड्यातील एकाच भागांत राहुन देखील फक्त त्यांच्या घरातच गोवन कॅथोलिक राहिल्या आहेत. पण तरीदेखील त्यांनी इतर समाजांशी सामंजस्य राखले आहे. ते महाराष्ट्रातील कोंकण आणि कोल्हापूर भागांतील नमुनेदार मराठी आणि कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण कन्नडिगा आहेत.
रोमन कॅथोलिक धर्माप्रमाणे कोंकणी भाषा हा त्यांची पूर्वसुरींच्या भूमीशी (गोव्याशी) नाळ जोडणारा एक महत्वाचा घटक आहे. साहजिकच, कालौघात म्हणजेच त्यांच्या लादलेल्या स्थलांतरपासून बार्देसकरांच्या कोंकणी भाषेत मराठी किंवा कन्नडमधील नवीन शब्द आल्यामुळे बरेच मोठे बदल झाले आहेत. तरीसुद्धा, हे शक्य आहे कि बार्देसकरांच्या कोंकणीत असे बरेच शब्द ते अजूनही वापरत असतील, जे गोव्यातील कोंकणीत कधीच नामशेष झाले आहेत. याशिवाय, कित्येक जुनी कोंकणी लोकगीतं ह्या समाजात प्रचलित आहेत, जी विविध सामाजिक प्रसंगी गायली जातात - जसे लग्न, धर्मगुरुदीक्षा आणि इतर धार्मिक सेवा. कोंकणी भाषेच्या संशोधकांना बार्देसकर बोलत असलेल्या कोंकणीत संशोधनाचे मुबलक विषय मिळू शकतील.
काळाच्या ओघात नष्ट होण्याअगोदर त्यांची कोंकणी लोकगीते पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याची तातडीची गरज आहे. आजदेखील बार्देसकर विविध प्रार्थना म्हणजे पवित्र मिस्सा, रोझरी किंवा पवित्र माळ आणि लितानी कोंकणी भाषेत म्हणतात. गोव्याप्रमाणे इथेही धार्मिक उपासनाविधींसाठी वापरली जाणारी अधिकृत मिस्साग्रंथ किंवा लिटर्जी रोमन लिपीत आहे..
रोजच्या जीवनात कोंकणीचा वापर हा सार्वत्रिक असला तरीदेखील वाङ्मयीन कोंकणी इथपर्यंत अजून पोहचली नाही. काही मोजक्या जेसुईट धर्मगुरुंनी मराठी साहित्यविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांत मराठी निरोप्या मासिकाचे संपादक फादर प्रभुधर आणि फादर कारिदाद द्रागो उर्फ संदीप हळदणकर यांच्या मोजक्या साहित्यकृती आहेत.
बार्देसकरांबाबत आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा गोव्याशी गेल्या दोन शतकात खूपच कमी संपर्क असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या मूळच्या मायभूमीत असलेल्या मालमत्तांवर असलेला हक्क सोडला नाही. हे विस्मयकारक आहे कि गोव्यातील राज्यकर्ते हे नेहमीच ब्रिटिशांच्या अमलात असलेल्या भारतीय भागांतून येणाऱ्या लोकांविषयी साशंक असत, तरीसुद्धा कोंकण, कोल्हापूर आणि बेळगांव जिल्ह्यांत वाढलेल्या व तेथे बरीच वर्षे वास्तव्य असलेल्या बार्देसकरांनी पूर्वजांच्या भूमीतील मालमत्तेवर आपला हक्क आजमितीपर्यंत कायम राखला आहे.
मी माझ्या पश्चिम महाराष्ट्र व बेळगांव जिल्ह्यातील वास्तव्यात बऱ्याच बार्देसकरांना भेटलो आहे, जे स्वतःची ओळख गोवन, गोयंकार अशी करून देतात आणि ते बार्देस तालुक्यातील आल्डोना, शिवोली, पार्रा, तिव्हिम व इतर गावचे असल्याचे सांगतात. असं म्हटलं जातं कि गोव्यातील बार्देसकरांच्या पूर्वजांनी आपल्या मुलांची नांवे त्यांच्या गावातील कम्युनिदाद या पारंपारिक सहकारी संस्थांमध्ये नोंदवून ठेवली होती. कित्येक बार्देसकरांनी ते जेंव्हा-जेंव्हा गोव्याला भेट देत, तेंव्हा आपले या संस्थातील भाग, शेअर्स किंवा झोण मिळविले, मग ते कितीही छोटे असोत.
नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या `परकियां’विरुध्द कडक कारवाई करण्यास सुरुवात केली तेंव्हा अनेक बार्देसकर सेंट फ्रान्सिस झेविअरच्या दर्शनाच्या निमित्ताने किंवा इतर काही कामासाठी सुरक्षा नसलेल्या सीमेवरील गावांतून गोव्यात प्रवेश करत.
कालपरवापर्यंत म्हणजे कोल्हापूर आणि कोंकणातील कॅथोलिक धर्मविभाग गोवा धर्मप्रांतापासून वेगळे होईपर्यंत आणि ते पुणे धर्मप्रांताशी जोडले जाईपर्यंत या भागातील सर्व चर्चमधील बाप्तिस्मा, लग्न, मृत्य, इ. विषयीच्या नोंदी पोर्तुगीज भाषेमध्ये असत. बार्देसकारांच्या पूर्वजांविषयी नोंदी असलेली महत्त्वाची माहिती आजही कोल्हापूर जिल्हयांतील आजरा, हलकर्णी आणि इतर ठिकाणी असलेल्या धर्मग्रामातील म्हणजे पॅरिशमधील चर्चमध्ये उपलब्ध आहे. काळाला बार्देसकरांना त्यांच्या भूतकाळापासून तोडण्यात अपयश आले आहे. त्यांनी आपला हा भूतकाळ प्रामाणिकपणे तर कधी कट्टरपणे सांभाळून ठेवला आहे.
माझ्या मते बदलाला विरोध हा नव्या कालानुरूप सुसुत्रीकरणामुळे नसून केवळ रूढी टिकवण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, कित्येक तरुण बार्देसकरांना त्यांच्या समाजातील काही रितीरिवाजांची कारणे माहित नाहीत तरीदेखील ते पाळण्याची इच्छा त्यांच्यात आहे. परिणामी, बार्देसकर समाजातील विविध गटांत लग्ने होत नाहीत कारण धर्मांतरापूर्वी ते वेगवेगळ्या हिंदू जातींत विभागले गेले होते.
जातीयवादाचं अरिष्ट, जरी कॅथोलिक चर्चची त्यावर अधिकृतपणे बंदी असली तरी, गोव्यात प्रचलित आहे व बार्देसकरांनी ते आपल्याबरोबर गोव्याबाहेर आणलं आहे.
बार्देसकर समाजात काही ‘आंतरजातीय’ विवाह गेल्या काही वर्षात झाले आहेत. काही बार्देसकर अजूनही बिफ खात नाहीत, जे पूर्वाश्रमीचे सवर्ण हिंदू असल्याचे दर्शवते.
त्यांच्या गोव्यातील पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे आजही या भागांतील विविध चॅपेल आणि चर्चमध्ये वार्षिक सणाचा सोहळा साजरा केला जातो. त्याप्रमाणे म्हापसा शहराजवळील शिवोलीहुन आलेले आणि कोल्हापूर जिल्हातील चंदगड तालुक्यातील अडकूर गावी स्थायिक झालेले बार्देसकर सेंट अँथनीचा सण साजरा करतात. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तेथे एक चॅपेल बांधले गेले तेंव्हा शिवोलीतील रिवाजाप्रमाणे ते सेंट अँथनीच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले. गोव्याप्रमाणे येथेही चर्चच्या कारभारात महत्त्व असलेली सामान्य लोकांची कॉन्फ्ररिया आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमेवरील गोवन समुदायाने आपली भाषा, धर्म आणि संस्कृती पोसली आणि सुरक्षितपणे टिकविल्यामुळे त्यांना आपली ओळख पुसली जाण्याची भीती ते रहात असलेल्या नवीन ठिकाणी कधीच वाटली नाही. कारण त्यांची पाळेमुळे तेथे खोलवर रुजली आहेत. बऱ्याच बार्देसकरांना पुणे, कोल्हापूर आणि मुंबई येथे नोकऱ्या मिळाल्या आहेत. तर काही मोजके लोक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत किंवा किंवा आपला व्यवसाय चालवीत आहेत.
((मूळ प्रसिद्धी ३० जून,, १९८५, इंग्रजी दैनिक द नवहिंद टाइम्स, पणजी, गोवा )

Wednesday, April 1, 2020

ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!


ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना 
अर्थात मार्शल अखेरपर्यंत सामान्य ‘शिवसैनिक’च राहिला!

पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
कामिल पारखे
  • बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मार्शन जॉन पारखे
  • Thu , 23 January 2020
  • पडघमकोमविपशिवसेनाShiv Senaबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayमार्शल पारखेMarshal Parkhe
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीरामपूरला आमच्या घरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चे गजर घुमायला लागले. माझा थोरला भाऊ, मार्शल मॉडर्न स्कूलमध्ये मॅट्रिकला म्हणजे अकरावीला शिकत होता. त्याला एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या प्रभावाने शिवसेनेच्या ज्वराची लागण झाली आणि आमच्या घरातले वातावरण शिवसेनामय बनले. त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच मार्शल पहिल्यांदा आपल्या शाळेच्या आणि नंतर बोरावके कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि इतर मित्रांबरोबर लेझीम खेळू लागला. या खेळाच्या माध्यमातून शिवसेनेचा आमच्या घरात प्रवेश झाला.
मार्शल दररोज भल्या पहाटे तालमीत जायचा, तेथे लंगोट लावून घाम घाळायचा, आपल्या मित्रांबरोबर मल्लखांबावर कसरती करायचा. रात्री भिजवून ठेवलेली हरबऱ्याची डाळ सकाळी खायचा आणि दररोज संध्याकाळी आपल्या वयाच्या तरुणांना घेऊन मैदानावर ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे गर्जत लेझीम खेळायचा. संगमनेरला येशूसंघीय धर्मगुरूंच्या ज्ञानमाता शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना मार्शलने आपल्या नेतृत्वगुणांची झलक दाखवून दिली होती. या गुणांचा विकास या काळात होत गेला. आमच्या घरात लोखंडी पलंगांखाली अनेक लेझीम आणि ताशे असायचे. तेव्हा मार्शल आणि त्याच्या सहकाऱ्यांबरोबर मैदानावर या मर्दानी खेळाचा एक-दोनदा अनुभव घेतल्याचे आठवते. यादरम्यान मार्शलने शिवसेनेचा तो खास पटका आपल्या गळ्याभोवती कधी गुंडाळला आणि भगवा टिळा कपाळावर कधी लावला, हे माझ्या लक्षातही आले नाही. 
याच काळात वयाच्या पंधराव्या वर्षी फादर म्हणजे कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी मी घर आणि कुटुंब सोडले होते. गोव्यात मिरामार येथे प्री-नोव्हिशिएट वा पूर्व-सेमिनरीत राहून हायर सेकंडरीचे आणि नंतर पदवीचे शिक्षण घेताना सुट्टीवर श्रीरामपूरला आलो म्हणजे मार्शलचे ते भगवे रूप मला अचंबित करून जायचे. मार्शल माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा. माझ्याहून धाकट्या दोन बहिणी त्याला ‘आप्पा’ म्हणायच्या आणि मग हळूहळू घरातले सर्वच जण त्याला ‘आप्पा’ म्हणू लागले.  
कॉलेजच्या सुट्टीत गोव्याहून घरी परतलो की, मार्शल आणि त्याच्या मित्रांकडून मुंबईच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनेक चुरस आठवणी ऐकवल्या जायच्या. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा उत्सवानिमित्त होणारे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक मुंबईला येत असत. दसऱ्याआधी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे थवेच्या थवे मुंबईच्या दिशेने रेल्वेने निघायचे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत खच्चून गर्दी असे. “मात्र या दिसांत कुठल्या बी रेल्वे स्टेशनच्या एकाही टिकेट कलेक्टर (टीसी)ची रेल्वे डब्यात चढण्याची वा प्रवाश्यांना तिकीट विचारायची टाप नसते. परतीच्या प्रवासात बी अशीच स्थिती असते!” अशी वाक्ये मी त्या वेळी अनेकदा ऐकत असे.
या वार्षिक मुंबई दौऱ्यात शिवसैनिकांना रोमांचित करणारा एक खास अनुभव असे, तो म्हणजे दसऱ्यानंतर मातोश्रीवर होणारी खुद्द बाळासाहेबांची भेट! दसरा मेळाव्याच्या मुंबईच्या वारीत राज्यातील शिवसैनिकांना आपल्या दैवताला भेटण्यासाठी मातोश्रीत मुक्त प्रवेश असे. बाळासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटण्यासाठी, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मार्शल आणि त्याच्याबरोबर आलेले त्याचे इतर शिवसैनिक अगदी आतुर असायचे. शिवसेनेची मुंबई महापलिकेत सत्ता येण्यास अजून बराच काळ होता. त्यामुळे त्या काळात मातोश्रीवर आजच्यासारखे सुरक्षेचे अवडंबर नसायचे. बाळासाहेबांना मुंबईबाहेर दौरे करण्याची तोपर्यंत गरज भासली नव्हती. शिवसेनेचा विस्तार तोपर्यंत औरंगाबाद सोडा, ठाण्यातसुद्धा झाला नव्हता. मात्र बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने तेव्हाच्या शहरी आणि गावगाड्यांतील तरुणांमध्ये गारूड निर्माण केले होते. तोपर्यंत शिवसेनेने पूर्ण वेळ राजकारण करण्याचा निर्णय घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसे आजही स्वत:ला पूर्णत: सांस्कृतिक संघटना म्हणवून घेतो, तसेच शिवसेना त्याकाळी स्वत:ला केवळ एक सामाजिक संघटना, लुंगीवाल्या मद्राशी (दाक्षिणात्र) लोकांविरुद्ध लढणाऱ्या मराठी माणसांची संघटना असे म्हणवून घेत असे. तोपर्यंत शिवसेनेने अधिकृतरित्या हिंदुत्वाचा गंडा स्वत:ला बांधून घेतला नव्हता.
दसरा मेळाव्यानंतरचा सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीतील दरबार हा एक खास सोहळा असायचा. शिवसैनिकांची त्या वेळी मातोश्रीत अगदी रीघ लागत असे. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या सणात शरद पवार आपल्या मित्रमंडळीला, पक्ष कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना बारामतीला  आपल्या घरी भेटत असतात. तसलाच हा मातोश्रीवरचा त्या काळातला एक सोहळा होता. मार्शल हा श्रीरामपूरचा म्हणजे एका शहराचा शाखाप्रमुख असल्याने दरवर्षी त्याला आपल्या जोडीदारांबरोबर आपल्या ‘विठ्ठला’चे दर्शन घेण्याची संधी मिळायची. आपल्या आसनावर बसलेल्या बाळासाहेबांना मुजरा करून आम्ही मागे चालत जातो, ही भेट काही क्षणांचीच असते, पण स्मरणीय असते, असे मार्शल म्हणायचा. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच्या त्या जमान्यात आपली छायाचित्रे काढणे वा इतरांकडून काढून घेणे खूप अशक्यप्राय असायचे. पुढे कलर फोटोग्राफीच्या काळात काही मोजक्या लोकांच्या हातात कॅमेरे आले आणि विशेष घटना कॅमेऱ्यात बंदिस्त करणे शक्य होऊ लागले. याच काळात मार्शलने बाळासाहेबांची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीचे छायाचित्रे घेण्यात आले. ते त्यानंतर मार्शलच्या जीवनातील एक मोठ्या घटनेचा ऐवज म्हणून जपून ठेवण्यात आले होते.
सत्तरच्या दशकात मुंबईत ‘दलित पँथर’ने दलित तरुणांमध्ये नवे वारे निर्माण केले होते, तसेच त्या नंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे वारे तयार झाले होते. गावोगावी वेशीपाशी शिवसेनेच्या नव्या शाखांचे बोर्ड लावले जात होते. शिवसेनेच्या शाखा बनवणाऱ्या या तरणाबांड पोरांपैकी बहुसंख्य जण मार्शलसारखेच सुशिक्षित बेरोजगार असायचे. आक्रमकता आणि बेडरपणा हा त्यांचा जणू स्थायीभावच असायचा.
‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचे नाटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित रामायणातील ‘रीडल्स’चा वाद आणि त्यानंतरचे मराठवाडा विद्यापीठ नामांतर, यांबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिका वादग्रस्त ठरल्या. बाळासाहेबांविषयीचा कमालीचा आदर असल्याने त्यांचा आदेश पाळणे हे शिवसैनिकांचे कर्तव्यच असायचे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या धोरणास पाठिंबा देण्याबाबत मार्शलही अगदी ठाम असायचा! त्याबाबत कधीही मतांतरे वा दुमत नसायचे. या प्रकरणासंबंधींचे काही वाद अनेक महिने, काही वर्षे चालले होते. एका ख्रिस्ती कुटुंबातील व्यक्तीला शिवसैनिक या नात्याने स्वत:च्या विचारसरणीच्या वा हिताच्या अगदी विरुद्ध भूमिका का घ्यावी, असा माझा त्याला सवाल असायचा. याबाबत आमच्या दोघांच्या नेहमी खडाजंगी व्हायच्या.
सत्तरच्या दशकात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाविरोधात सनातनी मंडळींनी आवाज उठवला होता. या नाटकावर बंदी घालण्यात यावी यासाठी दबाव आणण्यात आला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या नाटकाविरोधी भूमिका घेतली. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठे वादळ उभे राहिले होते. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत मार्शलशी माझा झालेला वाद मला आजही आठवतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्यातील ‘रामायणातील रीडल्स’ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये, अशी जोरदार मागणी त्या वेळी करण्यात आली होती. याही वादात उडी घेत शिवसेनेने ‘रीडल्स’विरोधी भूमिका घेतली होती. दीर्घकाळ चाललेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनातही शिवसेनेने नामांतरविरोधी भूमिका घेऊन दलित संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. दलित संघटना आणि शिवसेना त्या काळात आमनेसामने उभ्या राहिल्या होत्या.
कॉलेजच्या सुट्टीत आणि नंतर नोकरी लागल्यावर रजा काढून पणजीहून मी श्रीरामपूरला येई, तेव्हा या आंदोलनांच्या काळात दरवेळी मार्शलशी आणि इतर शिवसैनिकांशी माझे खटके उडत असत. आपण स्वत: दलित असताना अशा सरसकट दलितविरोधी भूमिकांचे समर्थन कसे करता येईल, असा माझा मार्शलला सवाल असे. पण मार्शलने नेहमीच बाळासाहेबांच्या भूमिकेची पाठराखण केली. “(शिवाजी) महाराजांनी कधी जाती-धर्माचा बागुलबुवा केला नाही. त्यांच्या मावळ्यांत सगळ्या जातींचे आणि मुसलमान लोकही होते. तसेच साहेब पण (बाळासाहेब ठाकरे) जाती-धर्माचा असा संकुचित विचार करत नाहीत!,” असे मार्शलचे म्हणणे असायचे. शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये आणि सैन्यातसुद्धा मुसलमान होते, तसेच शिवसेनेतही आमदार साबिर शेख आहेत, असा तो नेहमी दाखला द्यायचा.
एकदा नाताळाच्या सुट्टीत मी घरी आलो होतो, तेव्हा ओट्यापाशी रस्त्याला लागून खांबावर उंच जागी नेहमीप्रमाणे ख्रिस्तजन्माची शुभवार्ता देणारा तारा लावलेला होता. सारवलेल्या अंगणात  ‘नाताळाच्या शुभेच्छा’ असे रंगीत रांगोळीने लिहिले होते आणि घराच्या पत्र्यावर टांगलेल्या उंच बांबूवर भगवा झेंडाही फडकावलेला होता. मला आठवते- घरावर फडकावलेला तो भगवा झेंडा पाहिल्यावर मी चांगलाच चरफडलो होतो. ओट्यावर थंडीत ऊन खात बसलेल्या दादांना मी त्याबद्दल विचारले, तर हाताच्या दोन्ही मुठी तोंडापाशी धरून हताशपणे ते गप्प राहिले होते. ऐन सणासुदीला मार्शलबरोबर वाद नको म्हणून मीही तेव्हा गप्प राहिलो.
त्या काळात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या दलित पँथर आणि शिवसेनेच्या अनेक सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना जे काही भोगावे लागले, ते सर्व मार्शलच्याही वाट्याला आले. मोर्चे, दमदाटी, सरकारी कामकाजामध्ये आडकाठी वगैरे अनेक आरोपांत तो अनेकदा गुंतला गेला. पोलिसचौकशा आणि कोर्टकचेऱ्यांचा त्याच्यामागे ससेमिरा सुरू झाला. मी गोव्यात असल्याने सटी-सहामाही श्रीरामपूरला आल्यावर यासंबंधीची अगदी तुरळक माहिती बाईकडून मला मिळायची. (अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आईला ‘बाई’ हेच संबोधन असते!) डोळ्यातील पाणी पदराने टिपत बाई मला ही माहिती सांगायची, तेव्हा माझाही थरकाप उडायचा. त्या काळात मार्शलच्या तुरुंगाच्या किती वाऱ्या झाल्या असतील, याची मला आजही कल्पना नाही. त्याला ताबडतोब जामीन मिळवून त्याची सुटका करणारे शिवसेनेचे इतर नेते, त्या वेळी आजच्याइतके प्रस्थापित झालेले नव्हते.
मार्शलचे शिवसेनेचे हे प्रकरण कुठल्या पातळीवर पोहोचले असेल याची अंधुकशी कल्पना मला त्या दिवशी आली. यादरम्यान पणजीत ब्रदर म्हणून प्राथमिक दीक्षाविधी होऊन सफेद झगा मिळण्याआधीच फादर होण्याचा निर्णय मी बदलला होता. मात्र मी गोव्यातच स्थायिक झालो होतो. पणजीतील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात मी त्या वेळी बातमीदार होतो. “इथल्या पोलिसांनी जारी केलेली तडीपार नोटीस रद्द करण्यासाठी तू काही करू शकशील काय?” असे मार्शलने मला विचारले होते. गोव्यात मी क्राईम रिपोर्टर असलो तरी अहमदनगर जिल्ह्यात पोलीस खात्यात मला कोण ओळखणार किंवा कोण माझे ऐकणार होते? मी त्याला अहमदनगरचे शिवसेना नेते अनिल राठोड यांना याबाबत भेट असे सांगितले. यावर मार्शल नुसताच हसला. त्यानंतर मार्शलच्याच एका सहकाऱ्याने मला सांगितले की, मार्शल आणि राठोड या दोघांची चांगली ओळख आहे. 
एकदा बाई सांगत होती. बहुधा १९८४ला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर श्रीरामपुरात बाजारपेठेत झालेल्या जाळपोळ आणि लुटालुटीनंतरची ही घटना असावी. “गेल्या महिन्यात ऐन मध्यरात्री घराच्या मागल्या आणि पुढच्या दारांवर जोरदार थापा पडल्या, काठ्यांचे आवाज आले... पोलिसांची पुन्हा एकदा धाड पडली होती. उघडलेल्या दोन्ही दारांतून काठ्यांचा आवाज करत पोलिसांनी झोपलेल्या सर्वांच्या अंगावरच्या गोधड्या आणि चादरी दूर केल्या होत्या. मोठी बाया-माणसं आवाजानं जागी झाली तरी पोरंसुरं झोपलेलीच होती. पोलिसांनी मग दोन्ही-तिन्ही खोल्यांतील पलंगांखाली वाकून, तिथल्या सामानांत आणि भरलेल्या बोचक्यांत काठ्या फिरवल्या. मग परत जाताना त्या पोलिसांचा सायब तुझ्या दादांकडे वळून म्हणाला, ‘पारखे टेलर, माफ करा, घरातल्या तुम्हा सगळ्यांना रात्री-अपरात्री हा तरास होतो. पन यावेळी आम्हाला मार्शलला पकडायचेच आहे!’ ते पुलिस गेल्यानंतर एक तास उलटला तरी पलंगाखाली गोवऱ्या आणि ऊसांच्या खोडक्यांच्या पोत्यांमागे लपलेला मार्शल बाहेर आला नाही. पहाटे बाहेर आला आणि काही दिवस पुन्ना गायबच झाला.” असे प्रकार अनेकदा होत असत, असे बाईच्या बोलण्यावरून लक्षात आले.
सुरुवातीच्या काळात शिवसेनेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे प्रमाण होते. मुंबईत केवळ छगन भुजबळ आणि मनोहर जोशी हे या संघटनेचे प्रमुख राजकीय चेहरे होते.  हळूहळू शिवसेनेचा राज्यभर विस्तार होत गेला. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या आणि राजकारण वर्ज्य मानणाऱ्या या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून वावर सुरू केला, तेव्हा मार्शलनेसुद्धा राजकारणात उडी घेतली. श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तो उभा राहिला. ‘मार्शल जॉन पारखे’ या नावाचा युवक बहुसंख्य हिंदू असलेल्या वार्डातून खुल्या वर्गातून उमेदवार म्हणून उभा राहिला होता. दलित असला तरी ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्याला आरक्षण नव्हते. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. मार्शलचा पराभव झाला. आमच्याच चाळीतील एक उमेदवार निवडून आला आणि त्यानंतर तो प्रस्थापित नगरसेवक बनला.
या निवडणुकीचा धडा घेऊन पुढच्या पालिका निवडणुकीत जर्मन दवाखान्याच्या परिसरातील वार्डातून मार्शल उभा राहिला. जर्मन मिशनरींनी उभारलेला तो दवाखाना, तेथील ख्रिस्ती देऊळ, येशूसंघीय फादरांतर्फे चालवल्या जाणाऱ्या आरटीआर, सोशल सेंटर वगैरे संस्थांच्या आसपासच्या त्या परिसरातील ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय होती. पण येथेही माशी शिंकली. मार्शल हा त्या परिसरातील सर्वांना परिचित असणाऱ्या पारखे टेलरांचा मुलगा होता, त्यालाही बहुतेक सर्व ख्रिस्ती मतदार ओळखत होते. मात्र या ख्रिस्ती तरुणाने शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या वार्डात मते मागावीत, हे त्या लोकांच्या पचनी पडले नाही. ‘ना घरका, ना घाटका’ असे बनलेल्या मार्शलचा त्या निवडणुकीतही पराभव झाला. 
त्यानंतर मार्शल निवडणुकीच्या फंदात पडलाच नाही. या क्षेत्रात आपल्याला फार मजल मारता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले होते. पैशाचे आणि आपापल्या ज्ञातबांधवांचे पाठबळ असलेल्या शिवसेनेतील त्याच्या बरोबरीच्या इतरांना मात्र हे शक्य झाले. श्रीरामपूर शहरातला शिवसेनेचा एक संस्थापक सभासद असलेला मार्शल अखेरपर्यंत सामान्य शिवसैनिकच राहिला. त्याच्याबरोबर असलेल्या आणि त्याच्यानंतर या संघटनेत आलेल्या अनेक जणांनी नंतर राजकारणात जम बसवला, काहीजण तर आमदार आणि मंत्रीही झाले. मार्शलने स्वत: कुठलीही नोकरी केली नाही, कुठल्याही व्यवसायात त्याला कधी यश आले नाही. आयुष्यभर त्याच्या वाटेला परवडच आली, कुटुंबाला तो आर्थिक स्थैर्य देऊ शकला नाही.
दहा-बारा वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने मार्शलचे निधन झाले, तेव्हा श्रीरामपूर आणि अहमदनगरहून प्रसिद्ध होणाऱ्या विविध दैनिकांत छोट्याशा एक कॉलममध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत ‘एक जुने, कट्टर शिवसैनिक’ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या चाळीसाव्यानिमित्त कबरीपाशी प्रार्थना झाल्या, फुले वाहण्यात आली. यानिमित्त जमलेल्या लोकांना बसण्यासाठी मार्शलच्या घराभोवती छोटासा मांडव घालण्यात आला होता. घराच्या पहिल्याच खोलीत दोन्ही हात जोडून आपल्या दैवताला - बाळासाहेब ठाकरेंना - दंडवत घालणाऱ्या मार्शलचे ‘ते’ छायाचित्र होते. मांडवात जेवणासाठी मांडी घालून बसल्यावर घराच्या पत्र्यांवर उंचावर उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याकडे माझे सहज लक्ष गेले. खूप दिवसांपूर्वी उभारलेल्या त्या भगव्या झेंड्याचा रंग आता मूळ रंग ओळखू न यावा इतका फिका पडला होता.
................................................................................................................
.....................................................................................

Tuesday, March 5, 2019

अभिनंदन, दहावीत बोर्डात तुझा पहिला नंबर आला! SSC results


अभिनंदन, दहावीत बोर्डात तुझा पहिला नंबर आला!
कॅम्पस रिपोर्टर नात्याने मे महिन्याचा अखेरचा आठवडा माझ्या दृष्टीने अगदी तणावाचा असायचा. या काळात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेले गोवा, दमण आणि दीव एसएससी बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करत असे. त्यानिमित्त पणजीतल्या मांडवी हॉटेलात एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद एक वार्षिक सोहोळा असे.
त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होई.  दुदैवाने एसएससी बोर्डाची ही पत्रकार परिषद मला कधीच एन्जॉय करता आली नाही. याचे कारण परीक्षेच्या निकालाची छापील प्रत हातात पडतात मला तातडीने ते हॉटेल सोडून बातमीसाठी बाहेर पडावे लागायचे. तो दिवस म्हणजे माझ्या कॅम्पस रिपोर्टिंगचा वर्षातील सर्वांत अधिक कष्टाचा, ताणतणावाचा आणि अगदी व्यावसायिक तृप्ततेचाही असायचा.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात गोवा बोर्डाचे एसएससीचे एकूण विद्यार्थी असायचे बारा हजारांच्या आसपास आणि बारावीचे विद्यार्थी असायचे चार हजार! त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. या निकालाची तारीखही आधी जाहीर केली जात नसे. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती. संपूर्ण गोव्यात फिरून संध्याकाळपर्यंत पणजीला नवहिंद टाइम्स कार्यालयात येऊन डेडलाईन संपायच्या आत मला बातमी देणे भाग होते. ‘संपूर्ण वर्षभरात या दिवशी एक दिवस तरी कामिल भरपूर,चांगले काम करत असतो,” असे आमच्या इंग्रजी दैनिकाचे माझे मुख्य बातमीदार थोडे गंमतीने आणि अधिक तथ्य अशा शैलीमध्ये म्हणायचे. याचे कारण त्याकाळात मी नोकरीबरोबरच पदव्युत्तर शिक्षणही घेत होतो.
त्या हॉटेलातून बाहेर पडताच आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. (मोटारसायकल पायलट ही प्रवासाची आगळीवेगळी सुविधा भारतात फक्त गोव्यातच आढळते. आपल्याकडे चौकाचौकात ऑटोरिक्षा स्टॅण्ड असतात तसे त्याकाळात जागोजागी मोटारसायकल पायलट आपल्या काळ्या-पिवळ्या मोटसायकलसह गिऱ्हाईकांची वाट पाहत असत.) पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या गावी पोहोचल्यावर पहिल्यांदा मी त्यांच्या शाळेत जात असे, तेथून त्या विद्यार्थ्यांचा निवासी पत्ता घेतल्यानंतर त्या मुलाचा/मुलीचा फोटो शाळेच्या दप्तरातून उचकटून घेऊन मार्गस्थ होत असे. १९८०च्या दशकात विद्यार्थ्यांचे फोटो त्यांच्याकडे वा त्यांच्या पालकांकडे असतीलच याची शाश्वती नसायची आणि पटकन फोटो काढून घेण्याची यंत्रणाही नव्हती. शाळेच्या रजिस्टरमध्ये चिटकवलेले विद्यार्थ्यांचे फोटो उचकटून आम्हा पत्रकारांनांदेण्यास शाळांचे मुख्याध्यापक आणि इतर मंडळींनीही आधी आढेवेढे घेतले नाही याचे मागे वळून पाहताना मला आता विशेष कौतुक वाटते!
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे. ‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’  त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद  घ्यावा लागे. तो पाहुणचार चालू असताना विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यावी लागे. प्रश्न नेहेमीचेच म्हणजे पुढे काय करणार आणि होणार असे असायचे आणि त्यांची उत्तरेही एकाच पठडीतली  असायची. विशेष म्हणजे या सात-आठ वर्षांच्या काळात माझ्यावर कुणीही कधी अविश्वास दाखविला नाही वा माझे ओळखपत्र, व्हिझिटिंग कार्ड विचारले नाही. मात्र प्रत्येक कुटुंबातला पाहुणचार काही मिनिटांत आटपून मला उरलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी निघावे लागे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी तोच उपक्रम असायचा.  काही वेळेस टॉप रँकरच्या घरी गेल्यावर तेथे घराला टाळे असायचे, विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी मुंबईला वा दुसरीकडे गेलेला असायचा. अशावेळी शाळेतून घेतलेला तिचा/त्याचा फोटो कामाला यायचा.
संध्याकाळी उशिरा पणजीत ऑफिसांत पोहोचेपर्यंत पहिल्या दहा गुणवंतांपैकी दुसऱ्या, सातव्या किंवा दहाव्या गुणवंताचा फोटो वा मुलाखत नसायची. अशावेळी नवहिंद टाइम्सचे जुळे भावंड असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या स्थानिक वार्ताहराने पाठवलेला फोटो, मुलाखत माझी अब्रू वाचवायची. सर्व गुणवंताचे फोटो आणि मुलाखती छापण्यासाठी पणजीतील गोमंतक वा मडगावच्या राष्ट्रमत या दैनिकांशी आमची स्पर्धा असायची. शिवाय मिळालेला एक फोटो दुसऱ्यांशी शेअर करणे त्यावेळच्या वेळखाऊ ब्लॉक मेकिंगच्या जमान्यात अशक्य होते.
त्यावेळच्या गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात गोव्यातील दहा तालुके, दमण तालुका आणि दीव तालुका आहि एकूण बारा तालुके समाविष्ट होते. यापैकी गुजरातपाशी असलेले दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो कोस आहेत. केवळ पोर्तुगीजांचे गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांवर डिसेंबर १९६१ पर्यंत राज्य होते केवळ याच कारणांमुळे हे तीन प्रदेश एकत्र होते. बाकी भौगोलिक व सांस्कृतिकदृष्टया त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्रिही दमण आणि दीव या तालुक्यांना क्वचितच भेट देत असत. त्याकाळात दमण आणि दीव या ग्रामीण तालुक्यांतील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला नाही, या यादीत तेथील विद्यार्थी झळकले असते तर, गुणवत्ता यादीत त्यांचे केवळ नाव छापून असते, त्यांचे फोटो छापणे शक्यच नव्हते. (गोव्याला १९८६ला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर दमण आणि दीवशी या प्रदेशाचा उरलासुरलेला संबंध संपला)   
दहावी आणि बारावीच्या बोर्डांच्या निकालांचे अशा प्रकारे सूप वाजल्यानंतर मी मोटारसायकल पायलटच्या खर्चाची बिले संपादकांच्या सहीसह अकाउंट्स खात्यांकडे जमा करी, तेव्हा तेथे नेहेमीच तेच तेच सवाल-जबाब झडत असत. “एका दिवसात तीनशे रुपये प्रवास भाडे ?मोटारसायकल पायलट कशाला, बसने जाता  आले नसते का?”  या प्रश्नाला काय उत्तर देणार?  त्याकाळात पालेकर वेतन आयोगानुसार माझा मासिक पगार पाचशे तीस रुपये होता. मात्र, संपादकांकडून बिल मंजूर झाले असल्यामुळे मला ती रक्कम मिळत असे.
काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात एसएससी महामंडळाचे विभागवार बोर्ड नसायचे, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य स्तरीय, प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवरचे सगळे दैनिके संपूर्ण राज्याचा निकाल छापत असत. त्यादिवशी या सगळ्याच दैनिकांच्या खपात प्रचंड वाढ होत असे. मात्र त्याकाळात बोर्डाचा दहावीचा निकाल तीस टक्क्यांच्या आसपास असे यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. बहुतांश विद्यार्थी गणित आणि इंग्रजी विषयांत गटांगळी खाऊन शिक्षणाचा नाद सोडत असत. त्यामुळे पास झालेल्या फक्त तीस टक्केच विद्यार्थ्यांचे क्रमांक दैनिकांत छापले जायचे.
कालांतराने विभागवार एससीसी बोर्ड स्थापन झाले, आणि स्थानिक वृत्तपत्रांत फक्त त्या विभागाचा दहावी आणि बारावीचा निकाल छापून येऊ लागला. काही वर्षांनंतर परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत  सर्वच दैनिकांनी बंद केली.
आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत आहे. चाळीस वर्षांपूर्वी टेलिग्राम हिच सर्वाधिक वेगवान संपर्क सेवा होती. त्याकाळात बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यांनतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना सोळा-अठरा तासांच्या आत कळवण्यात वृत्तपत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असत. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे आज तशी गरजही राहिलेली नाही.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)