Did you like the article?

Showing posts with label Vailankanni. Show all posts
Showing posts with label Vailankanni. Show all posts

Wednesday, September 9, 2020

इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे !

इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे !
पडघम - सांस्कृतिक

कामिल पारखे 


  • अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रा
  • Mon , 07 September 2020
  • पडघमसांस्कृतिकख्रिश्चनमराठी ख्रिस्ती समाजमतमाऊली

मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाचे पारंपरिक आणि आधुनिक रूपांचे दर्शन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रेत दिसते. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. त्यानिमित्ताने मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीविषयी...

“कामिल सर, तुम्ही चांगले मराठी बोलता... मला माहीतच नव्हते हे..” ‘सकाळ टाइम्स’च्या एका बातमीदार सहकारी महिलेने एके दिवशी मला म्हटले.

न्यूज डेस्कवरून माझी बातमीदार कक्षाकडे बदली झाली, तेव्हा काही दिवसांनंतर हे संभाषण झाले.
“अगं सुप्रिया, मला मराठी बोलता येते, कारण माझी ती मातृभाषाच आहे. मराठीत मी काही पुस्तकेही लिहिली  आहेत,” तेव्हा मी तिला सांगितले.

त्याआधी म्हणजे खूप वर्षांपूर्वी यापेक्षा अगदी उलट अनुभवाचा एक प्रसंग घडला होता. माझ्या लग्नाची पत्रिका पाहिल्यावर एक मित्र मला आश्चर्याने म्हणाला-  “चर्चमध्ये लग्न? का?” आता चकित होण्याची माझी पाळी होती. इतकी वर्षे सिगारेट ओढत तासनतास गप्पा मारणारे आम्ही दोघे मित्र असलो तरी मी ख्रिस्तीधर्मीय आहे, याचा त्याला थांगपत्ताच नव्हता.

‘कामिल पारखे’ असे आगळेवेगळे नाव असल्यामुळे असे खूप गंमतीदार प्रसंग घडतात. हो, कामिल पारखे हे नाव आजही जगात एकमेव आहे, हे सर्वज्ञानी गुगलनेच मला सांगितले आहे. त्यात वेगळी धार्मिक पार्श्वभूमी असल्याने अनेक माझ्याबाबतीत अनेक जण चुकीचे आडाखे बांधतात. एखादी व्यक्ती ख्रिस्ती असल्यामुळे मराठी बोलता येत नसावे असा निष्कारण गैरसमज असतो. याचे सर्वांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, हे उत्तम मराठी बोलतात, छान लिहितात याचे अनेकांना आजही आश्चर्य आणि कौतुक वाटते. पालघर जिल्ह्यातील वसईतला माणूस मराठी बोलणार यात आता आश्चर्याची काय बाब असणार आहे? याचे कारण म्हणजे त्यांचा ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरुपद!

खरे पाहिले तर साडेचारशे वर्षाची पोर्तुगीजांची राजवट असलेल्या गोव्याचा काही बाबतींतला म्हणजे पेहेराव आणि खाद्यसंस्कृती यांचा अपवाद वगळता भारतातील सर्वच प्रदेशांतील ख्रिस्ती समाजाने धर्मांतरानंतरही आपला मूळचा ऐतिहासिक सांकृतिक ठेवा कायम राखला आहे. ‘धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’ असे मराठी पंचकवींतले एक असलेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी असे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ठासून सांगितले होते. त्याच्याही तीन शतके आधीच रॉबर्टे डी नोबिली आणि इतर परदेशी मिशनरींनी हे तत्त्व केरळ आणि तामिळनाडूमध्ये अंमलात आणले होते.

१९६०च्या दरम्यान भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेमुळे यात बदल झाला आणि रोमन कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणावादी वारे वाहू लागले. या परिषदेमुळे सांस्कृतिकीकरणाच्या प्रकियेस आणि आंतरधर्मीय सुसंवादास चालना मिळाली. महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांत काम करणाऱ्या  जर्मन, फ्रेंच, अमेरिकन आणि इतर परदेशी मिशनरींनी मात्र दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेआधी कितीतरी दशके आधीच येथील नवख्रिस्ती समाजात सांस्कृतिकीकरणाचे (इन्क्लरेशन) धोरण राबवले होते. त्यामुळेच धोतर, सदरा आणि पागोटे घालणारा धोंडीबा यमाजी आढाव आणि नऊवारी पातळ, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, आणि पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असणारी आणि नाकात जड अशी नथ घालणारी त्याची बायको धुरपदाबाई ख्रिस्ती म्हणून विनासंकोच  वावरू लागले. रेव्ह. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक ही नावे बदलली नाही. त्यांच्या पेहरावात, नावांत वा आडनावांत बदल करण्याची गरज ना त्यांना वाटली ना त्यांना बाप्तिस्मा देणाऱ्या त्या जर्मन, अमेरिकन व स्कॉटिश मिशनरींना. चित्रपट अभिनेते शाहू मोडक आणि क्रिकेटपटू विजय हजारे,  चंदू बोर्डे ही नावे ख्रिस्तीधर्मीयांची आहेच हे अनेकांना माहीतही नसते ! 

गोव्यात १९७८ च्या दरम्यान आई-वडील माझ्याकडे राहण्यास पणजीला आले होते, तेव्हा त्यांना घेऊन मी ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये गेलो होतो, तेव्हाचा प्रसंग मला आजही आठवतो. अंगात नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगलसूत्र, पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे आणि मराठमोळी पद्धतीने डोक्यावरून घेतलेला पदर या पोशाखातील माझी आई, मार्थाबाई, जेव्हा बॉम जेजू बॅसिलिकात पवित्र कम्युनियनसाठी रांगेत उभी राहिली होती. त्या वेळी गोव्यातील फादर तिला हिंदू समजून कम्युनियन देण्याचे नाकारतील की, काय या शंकेने मी तिच्यापाठोपाठच रांगेत उभा राहिलो होतो. मात्र ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक संस्कृतीची जाण असलेल्या त्या धर्मगुरुने डोळे मिटून हात जोडून उभे राहिलेल्या बाईच्या जिभेवर कम्युनियन ठेवले, तेव्हा अशी शंका घेतल्याबद्दल क्षणभर मलाच अपराध्यासारखे वाटले.

धर्मांतरानंतर दोनशे वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर आजही अहमदनगर, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर आणि नाशिक वगैरे जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांत हेच चित्र दिसते. जर्मन मिशनरी आर्चबिशप हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात केंदळ या गावात सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेले ‘निरोप्या’ हे मराठी मासिक पुण्यातील स्नेहसदन संस्थेतून आजही प्रसिद्ध होते. त्यातल्या वाढदिवसांच्या, लग्नांच्या वर्धापनदिनाच्या आणि चाळिसाव्याच्या छायाचित्रांसह असलेल्या जाहिराती पाहिल्या म्हणजे मी काय म्हणतो हे लक्षात येईल.

गोव्यात आणि वसईला मात्र धार्मिकदृष्ट्या कर्मठ असलेल्या पोर्तुगीजांनी धर्मांतरित लोकांना स्वतःची पोर्तुगीज (ख्रिस्ती नव्हे!) नावे आणि आडनावे लावण्याचा अट्टाहास धरला आणि त्यामुळे तेथील देशी ख्रिस्ती लोकांनाही फ्रान्सिस, कॅरोलिना, क्लारा, मिंगेल, कामिलो, रोनाल्ड, सॅव्हियो, मार्टिन अशी नावे आणि डिसोझा, रिबेलो, फर्नांडिस अशी पोर्तुगीज धर्तीची आडनावे मिळाली. विशेष म्हणजे यापैकी एकही ख्रिस्ती नाव वा आडनाव नाही. ख्रिस्ती नाव म्हणायची झाल्यास सायमन (शिमोन), मोझेस (मोशे). जोसेफ (योसेफ) पीटर (पेत्र), मेरी (मरियम), जेकब (याकोब), मायकल (मिखाईल) अशी बिबलिकल म्हणजे बायबलमधली नावे. पण ही नावे ज्यू आणि इस्लाम धर्मियांमध्येही असतात! त्यामुळे माझे कामिल हे नावसुद्धा खरे तर ‘ख्रिस्ती’ नाव नाही! आता भारतात ख्रिस्ती कुटुंबात मुलांना भारतीय संस्कृतीतली नावे देण्याची पद्धत सुरू झाली आहे.

पाश्चात्य संस्कृतीत डोक्यावरची हॅट काढून आदर व्यक्त करण्याची आणि प्रार्थनेच्या वेळी हॅट काढण्याची प्रथा आहे. भारतीय परंपरात मात्र असा शिष्टाचार पाळला जात नाही. मुस्लीम वा शीख धर्मस्थानांत याउलट म्हणजे बोडक्या डोक्याने प्रवेश करणे निषिद्ध मानले जाते. महाराष्ट्रातील वा संपूर्ण देशातीलच ख्रिस्ती समाजात भक्तीच्यावेळी पागोटे वा टोपी काढून ठेवण्याची परंपरा कशी सुरू झाली हे कळत नाही. लहानपणी हरेगावच्या मतमाऊलीच्या म्हणजे मारियामातेच्या यात्रेत लांबवरच्या खेड्यांतून थकून आलेले खेडूत आपले सामान सांभाळत टोपी वा पागोट्यासह देवळात बसकण मारत, तेव्हा त्यांच्याशेजारचे चारपाच जण तरी त्यांना त्यांची टोपी वा पागोटे काढून ठेवण्याची आठवण करून देत असे, हे मी अनेकदा पाहिले आहे. बाया मात्र डोक्यावरील आपला पदर देवळात नेहमीपेक्षा अधिक सावरून बसत असतात.

अर्थात सांस्कृतिकीकरणाची ही परंपरा ख्रिस्ती महामंडळाच्या दोन हजार वर्षांइतकीच जुनी आहे. इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते या धर्माने अगदी जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत स्वीकारले आहे. नाताळ सणाच्या बाबतीतही असेच घडले. येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या तारखेला झाला हे कुणालाच ठाऊक नाही. ख्रिस्ती धर्म रोमन साम्राज्यात पसरला तेव्हा त्या काळात रोमन लोक २५ डिसेंबरला सूर्यदेवाचा सण साजरा करत असत. म्हणून ख्रिस्ती लोक या दिवशी  ख्रिस्तजयंतीचा सोहळा साजरा करू लागले. आज जगभर ख्रिस्ती धर्माशी जोडल्या गेलेल्या अनेक प्रथा रीतीरिवाज या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या आहेत. मग तो सांता क्लॉज असो वा नाताळाची भेट कार्डस, ख्रिस्तमस ट्री असो.

‘हिंदुस्थानातील पूर्ण राष्ट्रीय अशा सणांचा आपण (ख्रिस्ती लोकांनी) का त्याग करावा, हे मला समजत नाही’ असे ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांनी नागपुरात १९३३ साली भरलेल्या चौथ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून  म्हटले होते. दसरा, पोळा, वर्षप्रतिपदा, संक्रांत  वगैरे धर्मभेदातीत ठेवता येण्यासारखे सण ख्रिस्ती लोकांना उचलण्यास काय हरकत आहे असे त्यांनी विचारले होते.

लक्ष्मीबाई  टिळकांच्या या मतात वावगे असे काही नाही. मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या घरी दिवाळीच्या चारही दिवस अंगण शेणाने सारवून रांगोळी काढली जात असे. घरात दिवाळीशी संबधित कुठलेही धार्मिक रिवाज पाळले जात नसत, भाऊबीज मात्र इतर शेजारच्या घराप्रमाणेच थाटामाटात साजरी व्हायची. पुरणपोळीच्या जेवणानंतर आई आणि बहिणी या वेळी माझ्या वडिलांना आणि आम्हां सर्व भावांना ‘इडा पिडा टळो’ म्हणून ओवाळत असे. प्रत्येकास त्यावेळी कमरेस गुंडाळण्याची लाल गोंडा असलेला काळा कंबरदोटा मिळत असे. ताटात ओवाळणी म्हणून टाकण्यासाठी पाच-दहा पैशांचे नाणे आम्हांला आधीच मिळालेले असायचे.

दसऱ्याच्या आणि संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी ख्रिस्ती घरातली आम्ही मुलेमुली शेजारीपाजारी सोने देण्यासाठी आणि तिळगूळ घेण्यासाठी जात असू, वडिलधाऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत असू. तेव्हा ही परंपरा आपल्या धर्मात नाही असे बाई-दादांनी आम्हांला कधीही ऐकवले नाही. माझी आई पूर्ण अशिक्षित आणि वडील दुसरीपर्यंत शिकलेले असतांनासुद्धा त्यांना हिंदू आणि ख्रिस्ती धर्मातील तत्त्वांची अशी सुंदर सांगड घालण्याचे कसे सुचले, याचे मला आश्चर्य वाटायचे. पण महाराष्ट्रातील सगळ्याच मराठी ख्रिस्ती कुटुंबांत असेच चालते, असे नंतर लक्षात आले. 

ग्रामीण भागातील ख्रिस्ती लोकांनी आपल्या नव्या धर्माची आपल्या पारंपरिक संस्कृतीशी सांगड घातली आहे. हरेगावात तेथील ख्रिस्ती शेतकरी बैल पोळा अगदी उत्साहाने साजरा करत असत. हरेगावच्या खासगी बेलापूर साखर कारखान्याभोवती वसलेल्या एकवाडी, दोनवाडी, आठवाडी वगैरे वाड्यांत राहणारे ख्रिस्ती शेतकरी आपल्या बैलांना रंगवून, शिंगांना बेंडे आणि गोंडे लावून, सजवून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून त्यांना देवळात आणत असत. देवळाच्या पायऱ्यांवर  सफेद झग्यांत उभे राहिलेले युरोपियन फादर रिचर्ड वासरर, फादर हुबर्ट सिक्स्त व फादर बेंझ या बैलांच्या जोड्यांवर पवित्र पाणी शिंपडून त्यांना आशिर्वादीत करत. आर्शिवादानंतर बैलांचे मालक बैलांना घेऊन देवळाला प्रदक्षिणा घालत आणि आपल्या घरी परतत. संध्याकाळी उशीरापर्यंत बैल पोळ्याचा हा समारंभ आम्ही बोर्डिंगची मुले कुतूहलाने पाहत असू. गेल्या महिन्यात बैलपोळ्यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील माळीघोगरगाव येथल्या शंभर वर्षे जुन्या असलेल्या ख्रिस्तराजा मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी सजवलेले बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे फोटो फेसबुकवर पाहिले आणि या आठवणी ताज्या झाल्या.

माझी मुलगी आदिती तीन-चार वर्षांची असल्यापासून तिला मी पिंपरी-चिंचवडमधील आमच्या कॉलनीतल्या बिल्डिंगमधील शेजाऱ्यांकडे दसरा-संक्रांतीनिमित्त सोने वाटण्यासाठी आणि तिळगूळ घेण्यासाठी घेऊन जाऊ लागलो, तेव्हा सर्वांनाच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले होते. आजही दरवर्षी मला राखी पौर्णिमेच्या वेळी माझ्या बहिणीकठून पोस्टाने राखी येत असते, आणि या राखी सणानंतर एक-दोन दिवस उशीरा मिळाल्या तरी मी त्या घालतोच. या वेळी उशिरापर्यंत पार्किंगमधल्या पोस्टाच्या बॉक्समध्ये राखी दिसली नाही, तेव्हा मन खट्टू झाले होते आणि नंतर लगेचच करोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनची आठवण झाली.  

ख्रिस्ती झाल्यानंतही लक्ष्मीबाई टिळक अनेक वर्षे कुंकू लावत असत व त्याबद्दल रेव्ह. टिळकांनी किंवा कुठल्याही परदेशी मिशनरीने त्याबद्दल नापसंती व्यक्त केली नव्हती. महाराष्ट्रीय प्रोटेस्टंट पंथियांनी मात्र सांस्कृतिकीकरणाबाबत जरा सोवळे धोरण स्वीकारलेले दिसते. या पंथियांमध्ये बहुसंख्य स्त्रियांनी कुंकू लावण्याची प्रथा ख्रिस्ती धर्माशी विसंगत म्हणून बंद केली आहे. कॅथोलिकांमध्ये मात्र स्त्रियांनी सर्व सौभाग्यलेणी - कुंकू, मंगळसूत्र, मुरणी वा नथ, बांगड्या, पायांत चाळ, पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे वापरण्याची प्रथा चालू ठेवली आहे.

आमच्या ख्रिस्ती घरातील भावांच्या आणि बहिणींच्या लग्नांत सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे, मुंडळ्या लावलेल्या नवरदेवाची वरात, वरातीतल्या पाहुण्यांसाठी पायघड्या अंथरणे, त्यांची पायधुणी, सोयऱ्याधोयऱ्यांचे आणि भाऊबंदांचे मानपान वगैरे सर्व कार्यक्रम झाले आहेत.

याचे कारण म्हणजे त्याबाबत तडजोड करायला लग्नातील दोन्ही बाजू तयार नसायच्या. परदेशी ख्रिस्ती मिशनरींनीसुद्धा या सांस्कृतिक परंपरांना विरोध केला नाही. त्यामुळेच पांढरीशुभ्र साडी किंवा पाश्चात्य पद्धतीचा वेडिंग गाऊन घातलेली नवरी आणि सुटाबुटांत असलेल्या नवरदेवाच्या सोन्याच्या अंगठ्यांना चर्चमध्ये फादर आशीर्वाद देऊन नंतर नवदाम्पत्य त्या अंगठ्या एकमेकांच्या बोटांत घालतात. धर्मगुरु याच वेळी सोन्याच्या मंगळसूत्रास आशीर्वाद देतात आणि त्यानंतरच नवरदेव नवरीला ते मंगळसूत्र घालतो. एकमेकाला सुखदुःखास साथ देण्याच्याही  आणाभाका या वेळी घेतल्या जातात. पाश्चात्य आणि देशी संस्कृतीचा असा सुंदर मिलाप भारतात खूप वर्षांपूर्वीच  घडला आहे.

याच्याही पुढे जाऊन मराठी ख्रिस्ती समाजाने ‘ओम’ या आपल्या जुन्या संस्कृतीतील पवित्र, मंगल शब्दांचाही ही स्वीकार केला आहे. ‘ओम भगवान, प्रभु ख्रिस्त भगवान’ हा नामजप ख्रिस्ती देवळांत अनेक वर्षांपासून पेटी-तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गायला जात आहे. यात कुणालाच काही विशेष वाटत नाही.

महाराष्ट्रातील ख्रिस्ती माणसे तर या मातीत जन्मलेली आणि इथल्याच संस्कारांत वाढलेली. मग ती परकी का वाटावीत? तीही आपली बोली बोलणाऱ्यांना, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अनुपमा उजगरे यांनी विचारला आहे. “अनुभव असा आहे की, प्रत्यक्षात दोन्ही समाजातील व्यक्तींचा एकमेकांशी संबंध आला की, गैरसमज दूर होतात आणि ‘अरे, वाटलंच नाही तुम्ही ख्रिस्ती असाल !’ असे आश्चर्योद्वारे ऐकू येतात,” असे उजगरे यांनी लिहिले आहे.

पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक वर्षे इंग्रजी शाळेचे (कॉन्व्हेंट!) प्राचार्य असलेले फादर नेल्सन मच्याडो एकदा बालगंधर्व रंगमंदिरात मराठी नाटक पहायला गेले, तेव्हा तेथे आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने त्यांना नाटकाचे मराठीत भाषांतर करून देण्याची तयारी दर्शवली होती. तेव्हा ‘‘अहो मॅडम, मला मराठी चांगले कळते. मी वसंत कानेटकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात लाल्याची आणि इतरही खूप नाटकांत भूमिका केलेल्या आहेत’’ असे वसईचे सुपुत्र असलेल्या फादर मच्याडो यांनी त्यांना सांगितले होते. 

अशा या मराठमोळ्या ख्रिस्ती समाजाचे पारंपरिक आणि आधुनिक रूपांचे दर्शन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या यात्रेत दिसते. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. मतमाऊली हा शब्द मुंबईतील बांद्राच्या माऊंट मेरीचा अपभ्रंश! बांद्रा येथील प्रसिद्ध माऊंट मेरी बॅसिलिकायेथे माऊंट मेरीची नऊ दिवसांची नोव्हेना प्रार्थना वा यात्रा आठ सप्टेंबरपासून सुरू होते. तिथे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील बहुसांस्कृतिक आणि मिश्रभाषिक ख्रिस्ती भाविक येतात.

करोनाच्या पार्श्वभूमीवर हरेगाव आणि बांद्रा येथील धार्मिक उत्सवावर बंधने असली तरी या आठवड्यात ख्रिस्ती भाविकांचे या दोन्ही तीर्थक्षेत्रांकडे लक्ष लागून राहिले आहे.