गोव्यातील बार्देस तालुक्यातील बार्देसकर !
गोव्याच्या सीमेबाहेरच्या नजिकच्या परिसरांत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यांत आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात फर्नांडिस, डिसोझा, मस्कारेन्हास अशी गोव्यात आढळणारी आडनावे असणारी अनेक लोक आहेत. रोमन कॅथोलिक असलेली ही मंडळी घराबाहेर मराठी आणि घरात आपली मातृभाषा कोकणी बोलतात. या लोकांना बार्देसकर म्हणूनही ओळखले जाते. हे लोक मूळचे गोव्यातील बार्देस तालुक्यातील म्हणून बार्देसकर !
गोयंकारांबद्दल म्हणजे मूळचे गोवन असलेल्या लोकांबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे. मुंबईत किंवा आखाती देशांत स्थायिक होऊन देखील त्यांनी आपलं वेगळं सांस्कृतिक अस्तित्व कायम ठेवलं आहे. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या मायभूमीशी आपलं घट्ट नातं कायम ठेवलं आहे. गोव्यात राहणाऱ्या त्यांच्या सग्यासोयऱ्यांना याबद्दल त्यांच्याविषयी खूपच अभिमान वाटत आला आहे.
मात्र गोव्यापासून फक्त २०० कि.मी. अंतरावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भागात २०० वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या गोवन कॅथोलिक समाजाच्या एका मोठ्या समुदायाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. आपल्या मायभूमीशी इतकी वर्षे फारसा संबंध नसूनदेखील त्यांनी आपली मूळ गोवन संस्कृती, कोकणी मातृभाषा आणि ख्रिस्ती धर्म टिकवून ठेवला आहे.
मागील २०० वर्षांतील स्थित्यंतरामुळे व बार्देस्करांच्या समाजातील विशिष्ट स्थानामुळे हा समाज ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक व भाषिक संशोधनाचा विषय झाला आहे. बार्देसकरांनी त्यांच्या मूळच्या व स्थानिक अशा दोन वेगळ्या संस्कृतींचा अफलातून संगम साधला आहे.
बार्देसकर समाज छोट्या-छोट्या समूहांमध्ये या सीमावर्ती परिसरात - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ज़िल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांत तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी, कुकेरी आणि खानापूर तालुक्यांत स्थायिक झाले आहेत.
गमतीचा भाग असा कि गोव्यातील लोकांचे ह्या स्थलांतरित गोयंकारांबद्दल खूप गैरसमज आहेत. गोवा पोर्तुगीजांच्या जोखंडातून १९६१ साली मुक्त झाल्यावर काही मोजके बार्देसकर आपल्या मूळ गावी गेल्यावर स्थानिक लोकांनी त्यांना परकं मानलं. त्यांची आडनावं डिसोझा, फर्नांडिस, डीकोस्टा अशी असूनसुद्धा काही वेळा त्यांची 'घाटी' (म्हणजे घाटमाथ्यावर राहणारे) म्हणून संभावना केली जाते. गोव्यातील ऐतिहासिक घटनांवर फक्त एक दृष्टिक्षेप, अठराव्या शतकाच्या अखेरीस बार्देसकरांचं शेजारच्या प्रदेशांत झालेलं स्थलांतर आणि त्यानंतरचं त्यांचं जीवन ह्या गोष्टी त्यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सद्यस्थितीवर प्रकाश टाकू शकतात. अठराव्या शतकाच्या शेवटी त्यांनी केलेल्या मोठ्या स्थलांतराबद्दल आपण खात्रीने बोलू शकतो, परंतु हे स्थलांतर का झालं? यावर इतिहासकारांचं एकमत नाही.
काहींच्या मते बार्देसकरांच्या या एकगठ्ठा स्थलांतरामागे काही राजकीय कारण असू शकतात त्याकाळी भारतात ब्रिटिशांची सत्ता काही भागातच होती. पोर्तुगीजांकडून गोवा काबीज करण्याच्या इराद्याने त्यांनी सत्तारीच्या राणेंची मदत घेतली. प्रतिकार करताना पोर्तुगीजांनी इंग्रजांची बाजू घेणाऱ्या खालच्या जातींतील गोयंकरांना पकडले व दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने त्यांची कापलेली शरीरे सार्वजनिक ठिकाणी टांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे बार्देस्करांनी पोर्तुगीज वसाहतीतून पलायन करून कोल्हापूर, व बेळगाव परिसरात आश्रय घेतला.
तथापि, हे पुरेसं पटणारं नाही कारण स्थलांतर करणारे फक्त कॅथोलिक होते आणि ते सर्व कनिष्ठ वर्गातील नव्हते. एक लोकापवाद असाही आहे कि पश्चिम युरोपात उदयास आलेल्या इन्क्विझिशन कॅम्पेन या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या कडव्या ख्रिश्चन कॅथोलिक चौकशी मोहिमेमुळे हे स्थलांतर झाले असावे.
या मताप्रमाणे, पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांचं धर्मपरिवर्तन केल्यानंतर ख्रिश्चन धर्मतत्वांचा चुकीचा अर्थ लावून त्यांना जबरदस्तीने पाश्चात्य पद्धतीची जीवनशैली स्वीकारण्यास भाग पाडलं. पोर्तुगीजांनी स्थानिक ख्रिश्चन लोकांचा Aqui e Portugal' (Here is Portugal!) या मोहिमेचा भाग म्हणून अत्याचार करण्यास सुरवात केली. मूळच्या उच्च आणि कनिष्ठ स्तरांतील हिंदूंचा या लोकांमध्ये समावेश होता. ह्या पाश्चात्तीकरणाचा भाग म्हणून नवख्रिश्चनांना पाश्चात्य कपडे घालण्यास तसेच खाण्याच्या सवयी बदलण्यास सांगितले गेले. गोमांस खायला लावणे हे स्थानिक ख्रिश्चनांच्या सहजासहजी पचनी पडणारे नव्हते कारण त्यांची नाळ हिंदू धर्माशी जोडली गेली होती. ह्या अतिरेकी चौकशी मोहिमेचा धसका घेऊन प्रामुख्याने बार्देस तालुक्यातील बहुसंख्य कॅथोलिक कुटुंबांनी १७६१ ते १७८० च्या दरम्यान ह्या सीमावर्ती भागात स्थलांतर केले असावे.
ह्या स्थलांतरित कॅथोलिक समाजात गेल्या २०० वर्षांत काय बदल घडले असावेत? आणि अशा कोणत्या गोष्टी होत्या कि ज्यामुळे ते गोव्यातील पोर्तुगीज सत्ता हे ब्रिटिश अमलाखालील भारतात राहण्याऱ्या लोकांच्या विरोधात असून देखील आपल्या मायभूमीच्या, मूळ संस्कृतीच्या संपर्कात राहू शकले? असं म्हटलं जातं कि ब्रिटिश सत्ता असलेल्या प्रदेशातील भारतीयांना गोव्यात प्रवेश करण्यास बंदी असून देखील बरेच बार्देसकर आपल्या मूळगावी जात असत. आणि दरवर्षी गोयंच्या सायबाचं म्हणजे सेंट फ्रान्सिस झेवियरचं दर्शन ३ डिसेम्बरला या संताच्या फेस्ताला, फिस्ट डे म्हणजे सणाला घेत असत.
बार्देसकरांचा त्यांच्यावर लादलेल्या स्थलांतरापासून ते आजमितीचा इतिहास थक्क करणारा आहे. तो वाचल्यावर ह्या समाजाचं कुणालाही कौतुक करावंसं वाटेल सुरुवातीला अत्यंत हालअपेष्टा सहन करून त्यांनी आपल्या नव्या प्रदेशांत आपले बस्तान बसवले, स्वतःसाठी सन्माननीय स्थान निर्माण केलं. ह्या कॅथोलिक समाजाने आपल्या भोवतालच्या बहुसंख्य समाजाच्या चालीरीतींशी जुळवून घेतले आहे. नव्या जागी ही बार्देसकर मंडळी इतकी मिळून मिसळून राहिली कि कालांतराने त्यांची ही स्थलांतरित गावंच त्यांची दुसरी मायभूमी बनली. त्या ठिकाणी त्यांनी शेती केली तर काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले. ते पश्चिम महाराष्ट्रात मराठी तर कर्नाटकात कन्नड अस्खलितपणे बोलू लागले. तरीदेखील त्यांनी वेगवेगळ्या खेड्यांत आणि गोव्यापासून दूर राहून देखील आपली मायबोली म्हणजे ‘आमची भास’ कोंकणी जिवंत ठेवली.
बार्देसकर महिला सुके-ओले मासे विकतात. बाजाराच्या दिवशी वेंगुर्ल्याहून मासळीचा पुरवठा होतो. गोव्याच्या अगदी विरुद्ध, जिथे हिंदूंना ख्रिश्चन लोक 'कोंकणो' संबोधतात, ख्रिस्तीधर्मीय बार्देस्करांना मात्र स्थानिक लोक ‘कोंकणी’ म्हणतात कारण ते कोंकणी भाषा बोलतात म्हणून.
बार्देसकरांची अतिशय नवलाची बाब अशी कि ख्रिश्चन धर्मात एकत्रित मिस्साविधी, प्रार्थना व जीवनाच्या विविध टप्प्यांतील स्नानसंस्कार म्हणजे सप्त सांक्रामेंत महत्वाचे समजले जातात. असे असूनही त्यांनी कित्येक दशके धर्मगुरूंच्या उपस्थितीविना आपला धर्म सांभाळला. ह्या समाजाने आपल्या गोव्यातील पूर्वसूरींच्या धर्माचं पालन करत कोणतंही धर्मशास्त्राचे ज्ञान नसताना आणि धर्मगुरु नसताना प्रार्थना आणि धार्मिक चालीरीतींचे जतन केले, कौटुंबिक प्रार्थना, रोझरी जपमाळ आणि लितानी चालू ठेवल्या. गोयंचो सायबा म्हणजे सेंट फ्रान्सिस झेव्हिअर हा त्यांचा अर्थातच महत्त्वाचा संत होता. नंतरच्या काळात गोव्यातील धर्मगुरूंना बार्देसकरांच्या धार्मिक गरजांसाठी वेळोवेळी या परिसरांत पाठवण्यात येत असे.
पोर्तुगिजांच्या सत्तेतून १९६१ साली गोवा मुक्त होईपर्यंत सावंतवाडी आणि कोल्हापूर हे विभाग गोवा धर्मप्रांताचे भाग होते. नंतर त्यांचा पुणे धर्मप्रांतात समावेश करण्यात आला. धर्मगुरूंशिवाय किंवा धर्मशिक्षकांविना धर्मपालन करीत राहणाऱ्या ह्या समाजाविषयी चर्चच्या अधिकाऱ्यांना आजतागायत कोडं पडलं आहे. नंतर जेसुइटांनी बार्देसकरांच्या नव्या पिढीला ख्रिश्चन धर्माचरण नव्याने शिकविण्यास सुरवात केली. ह्या समाजाने २०० वर्षांच्या कालखंडात आपल्या वाडवडिलांच्या धर्मात राहून आणि धार्मिक उपासनाविधींपासून वंचित राहूनसुद्धा आता मुख्य प्रवाहात येऊन ख्रिश्चन धर्मातील आधुनिक प्रवाहांचं स्वागत केलं आहे.
( मूळ प्रसिद्धी : कामिल पारखे. जून २३, १९८५, इंग्रजी दैनिक द नवहिंद टाइम्स, पणजी, गोवा )