Did you like the article?

Saturday, September 16, 2023

हरेगावचे स्थान

 महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार

अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात.
त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते.
समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी माझे जवळचे नाते आहे.
गेल्या शतकात ब्रिटिश काळात भारतात ग्रामीण भागांत ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली, त्या स्थळांमध्ये हरेगावचे महत्त्वाचे स्थान आहे.
याचे कारण म्हणजे भारतातला पहिलावहिला खासगी साखर कारखाना हरेगावात ब्रिटिश जमान्यात सुरु झाला होता.
हरेगावात ब्रिटीश काळात सुरु झालेली बेलापूर शुगर फॅक्टरी जशी देशातला पहिला खासगी साखर कारखाना तसेच ब्रिटिशांनी भारतात १९२६ साली बांधलेले पहिले धरण अहमदनगर जिल्ह्यातच अकोले तालुक्यात भंडारदरा येथे आहे. आता ११ टीएमसी क्षमता असलेले हे भंडारदरा धरण जिल्ह्याची जीवनदायिनी आहे.
हरेगावच्या या बेलापूर शुगर फॅक्टरी कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सामाजिक, आर्थिक आणि साधनसुविधांबाबत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले.
आमच्या श्रीरामपूर शहराची तर वेगळीच कथा आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातलं एक प्रमुख आणि तालुक्याचं ठिकाण असलेल्या या शहराला शंभर वर्षांचाही इतिहास नाही. बिनवेशीचं आणि अठरापगड जतिजमातीच्या लोकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची मुळी निर्मिती झाली ती इथल्या रेल्वेस्थानकामुळं.
आणि हे रेल्वे स्थानक कशामुळे अस्तित्वात आले ? तर हरेगावातल्या या खासगी साखर कारख्यान्यामुळे!
हे ऐकून नव्या पिढीला आज गंमतच वाटणार आणि सद्याच्या श्रीरामपूर आणि हरेगावची परिस्थिती अगदी विरुद्ध टोकांत बदलली आहे.
आज खुद्द श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यातले एक मोठे शहर आहे आणि हरेगावची ओळख श्रीरामपूर तालुक्यातले गाव अशी करून द्यावी लागते.
ब्रिटिश अमदानीत पुणे-दौंड- मनमाड या मार्गावर रेल्वे धावू लागली आणि श्रीरामपुरात रेल्वेचा एक थांबा सुरु झाला.
ब्रिटिश काळातच श्रीरामपूर इथून बारा-तेरा किलोमिटर अंतरावर असलेल्या हरेगाव येथे देशातला - अन आशिया खंडातलासुद्धा पहिला - साखर कारखाना सुरु झाला.
दी बेलापूर शुगर कंपनी या एका ब्रिटिश कंपनीनं ही शुगर फॅक्टरी १९२४ साली स्थापन केली. सर जोसेफ के हे या साखर कारखान्याचे संस्थापक. सन 1924 ते 1958 या मोठ्या कालखंडात दी बेलापूर शुगर कंपनी या साखर कारखान्याचे ते सलगतेने चेअरमनपद होते. स्वतंत्र भारतामधील म्हणजेच महाराष्ट्रातीलही साखर धंद्याचे जनक असे त्यांना संबोधले जाते.
तेव्हा जवळ असलेल्या बेलापूर गावाचं नाव या कारखान्याला दिलं, बेलापूर शुगर फँक्टरी. या कारखान्याच्या सोयीसाठी या ठिकाणी एक रेल्वे थांबा दिला गेला आणि या रेल्वे स्टेशनची स्थापना झाली.
या रेल्वे स्टेशनला स्थानिक ठिकाणचे नाव हवे म्हणून इथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलापूर गावाचे नाव देण्यात आलं.
श्रीरामपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रेल्वे स्टेशनचे `बेलापूर स्थानक' हे नाव आजतागायत कायम आहे, आहे कि नाही गंमत ?
``बेलापूर- श्रीरामपूर के लिये यहा उतरीये'' असे फलक फलाटावर जागोजागी असायचे, ते वाचून गंमत वाटायची.
पुण्यामुंबईत, नाशिक, मराठवाड्यात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर श्रीरामपूरचे तिकीट मागितले कि तिथला क्लार्क झटकन बेलापूरचे तिकीट देतो, महाराष्ट्राबाहेर मात्र असं चालणार नाही. श्रीरामपूर या नावाचं एक मोठे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे.
तुम्ही महाराष्ट्राबाहेर भारताच्या एखाद्या कोपऱ्यांत असाल आणि तेथून श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचे तिकीट मागितले तर अडचणीत येऊ शकाल. हा खुद्द माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन मी रशिया-बल्गेरियातून भारतात परतलो आणि दिल्लीतून रेल्वे प्रवासात श्रीरामपूरचे तिकीट मागितले तेव्हा गडबडगोंधळ होऊन मला भलतेच तिकीट मिळाले होते.
श्रीरामपूरला (बेलापूरला !) `फॉरेन रिटर्न' मी ओव्हरकोट वगैरे खूप सामानासह उतरलो तेव्हा तिकीट चेकरने अडवल्यावर आणि माझे तिकीट पाहून त्याने मला थांबायला सांगितले.
नंतर कोपरगाव ते श्रीरामपूर असा विनातिकीट प्रवास केल्याबद्दल तिकीट रकमेच्या दुप्पट दंड (सहा रुपये) भरावा लागला होता ! ही घटना १९८६ची आहे.
पुण्यात खडकी येथे लष्कराचे मोठे ठाणे आहे, या विविध लष्करी संस्थांतून रणगाडे, तयार केलेला दारुगोळा, जिप्स वगैरे देशभर वाहून नेण्यासाठी रेल्वेचा वापर केले जातो. तर या वस्तू आणि वाहने मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी खडकी येथील या संस्थापर्यंत रेल्वेचे रूळ जोडले आहेत आणि या रुळांचा वापर केवळ लष्करी सेवांसाठी होतो,
अगदी त्याचप्रमाणे केवळ या साखर कारखान्यासाठी तब्बल तेरा किलोमीटर लांबीचे नॅरो गेज रूळ श्रीरामपूर म्हणजे बेलापूर रेल्वे स्टेशनपासून बेलापूर फॅक्टरीपर्यंत जोडण्यात आले होते.
या बेलापूर शुगर फँक्टरीत कच्चा माल असलेल्या ऊसाची आणि नंतर पक्क्या मालाची म्हणजे साखरेची वाहतूक करण्यासाठी या बेलापूर रेल्वे स्टेशन अन हरेगावचा साखर कारखाना यादरम्यान छोट्या रुळांवर - नॅरो गेजवर - इंजिन आणि मालगाडी धावू लागले. या मालगाडीला `लॅडीस' या नावाने ओळखले जात असे.
हरेगावला आणि श्रीरामपूरला मी असताना अनेकदा या ऊसाने भरलेल्या किंवा मोकळ्या लॅडीसने काही मीटर अंतराचा गार्ड्सची नजर चुकवून अनेकदा प्रवास केला आहे.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
त्याकाळात हरेगावात डी क्वार्टर्स वगैरे साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या बंगलेवजा कॉलनीज होत्या, आजूबाजूला एकवाडी ,दोनवाडी अशा अनेक वाड्या असायच्या, तेथून बैलगाडयांनी ऊस यायचा, दोन-तीन ट्रॉली असलेल्या खूप धिम्या गतीने चालणाऱ्याट्रॅक्टरमार्फतसुद्धा ऊस आणला जायचा, त्या ट्रॉलीमधून ऊस खेचण्यासाठी लहानमोठे सगळेजण प्रयत्न करायचे. हरेगाव असे नुसते गजबजलेले असायचे.
नंतर श्रीरामपूरजवळच दोन किलोमिटर अंतरावर टिळकनगर येथे खासगी मालकीची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी सुरु झाली आणि या आधुनिक औद्योगिक क्रांतीमुळे श्रीरामपूर हा नवा परिसर बाळसे धरू लागला आणि थोड्याच अवधीत ते अहमदनगर शहराच्या खालोखालचे जिल्ह्यातले एक मोठे शहर बनले.
ऐंशीच्या दशकापर्यंत श्रीरामपूरजवळचे हे दोन्ही खासगी साखर कारखाने नव्याने उदयास आलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे बंद पडले. एकेकाळी बारा तालुके असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तेरा साखर कारखाने होते.
बंद पडलेल्या या कारखान्यांवर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या अवलंबून असणाऱ्या पूरक उद्योगांचे, आसपासच्या हजारो लोकांचे आणि कुटुंबांचे रोटी-रोजगार बुडाले आणि श्रीरामपूरच्या वाढत्या आर्थिक वैभवाला खीळ बसली.
शेजारचा अशोक सहकारी कारखाना याबाबतीत फार मदत करू शकला नाही. त्यामानाने शेजारीच असलेल्या लोणी-प्रवरानगर परिसराने -आधी विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय नेतृत्वाखाली खूप मोठी मजल मारली.
एकेकाळी बेलापूर शुगर फॅक्टरीसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले हरेगाव हल्ली तिथं भरणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मदर मेरीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.
तिथल्या सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये १९७०च्या दरम्यान मी दुसरी आणि तिसरीला असताना होतो. या सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पाच लाखाच्या आसपास ख्रिस्ती समाज आणि इतर लोक जमतात.
या हरेगावच्या मतमाऊली यात्रेबाबत मी विस्तृत लेख लिहिलेला आहे. माझ्या ``क्रुसाभोवतालचा मराठी समाज'' या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे,
या यात्रेनिमित्त उद्या ऑगस्ट २९ रोजी हरेगावच्या गगनचुंबी देवळात मदर मेरी मतमाऊलीच्या दहा दिवसांच्या नोव्हेना प्रार्थना सुरु होतील. इथले संत तेरेजा चर्च उंचच-उंच मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इतका उंच चर्च मनोरा तुम्हाला पुण्या-मुंबईत किंवा वसईतसुद्धा सापडणार नाही.
हरेगावात प्रवेश केला कि सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा दिसतो. बाबासाहेबांनी हरेगावला भेट दिली होती, या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. मतमाऊलीच्या यात्रेला येणारे अनेक लोक भक्तिभावाने बाबासाहेबांच्याही पुतळ्याला हार घालत असतात.
मुंबईच्या बांद्रा येथील मौंट मेरी यात्रेला पर्याय म्हणून जर्मन जेसुईट फादर गेराल्ड बाडर यांनी हरेगावची मतमाऊली यात्रा सुरु केली. मतमाऊलीच्या यात्रेचे हे अमृतमहोत्सवी (७५) वर्ष आहे.
आता हरेगावला या यात्रेनिमित्त गेलं आणि तिथल्या रस्त्यांची आणि गल्लीबोळांची दुर्दशा पाहिली कि माझ्यासारख्या अनेकांना या गावाचे गत वैभव आठवते आणि मन अगदी खिन्न होतं.

Friday, September 1, 2023

हरेगाव प्रकाशझोतात

 सप्टेंबरच्या सुरुवातीला दरवर्षी श्रीरामपूरपाशी असलेले हरेगाव गजबजलेले आणि प्रकाशझोतात असते.

यावेळीसुद्धा आहे. नेहेमीपेक्षा अधिकच.
त्याबाबतचे कारण तसे फारसे अभिमानास्पद नाही.
``आम्ही हरेगावकर'' या समाज माध्यमवरच्या ग्रुपचा मी सभासद आहे.
इकडच्या दैनिकांतसुद्धा त्याबाबत बातम्या किंवा टिकाटिपण्णी होत नाहीये. परवा हरेगावातल्या त्या अमानुष घटनेतील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना पुण्यात अटक केली तर पुण्यातल्या एका दैनिकात ही बातमी एका आतल्या पानावर संक्षिप्त वृत्तसदरात दोन वाक्यांत दिली होती.
वृत्तवाहिन्या याबाबत बातम्या देताहेत कि नाही हे मला माहित नाही.
आपल्याकडे कुठलीही अभिमानास्पद किंवा लांच्छनास्पद घटना घडली कि आधी त्या घटनेतील व्यक्तींचा आधी धर्म, नंतर जात, त्यानंतर पोटजात पहिली जाते आणि मग त्यानुसार लोक व्यक्त होत असतात.
याबाबतीत सुद्धा तसेच झाले.
प्रत्येक बाबतींत जातीचा आणि धर्माचा संबंध का जोडायचा, असे विचारणे साहजिकच आणि योग्य आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या आणि विशेषतः अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातील सामाजिक परिस्थितीची माहिती असणे त्यासाठी आवश्यक असते.
याचे एक कारण आहे. इथले दलित एकाच कुटुंबातले, नात्यागोत्यातले आणि भाऊबंद असले तरी ते सगळे जण केवळ एकाच धर्मातले असतीलच असे नाही. त्यासाठी अगदी खोलात जाण्याची गरजही नाही.
यांपैकी कुणावरही अन्याय आणि अत्याचार झाला तर आंबेडकरवादी, डाव्या, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी संघटना, कार्यकर्ते आणि पक्ष आणि नेते लगेच धावून येतात, आपले पाठबळ पुरवतात.
यावेळीसुद्धा तसे होत आहे.
पिडीत तरुण दलित आहेत याबाबत अर्थातच शंका किंवा वाद नाही. आपले पोट भरण्यासाठी कोंबडी, शेळी किंवा कबुतर चोरण्याची वेळ वरच्या जातींतील मुलांवर कधीही येणार नाही, तसे त्यांचे संस्कारही नसतात, हे सर्वांनाच मान्य होईल.
दुसरे म्हणजे तसे झाले तरी भर वस्तीत वरच्या जातींतील तरुणांना असे अर्धनग्न अवस्थेत झाडाला टांगून मारण्याची टाप कुणाची कधीही होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये याच मुद्दा मांडला आहे.
असे दुर्भाग्य केवळ खालच्या जातींतील - काही बाबतीत अल्पसंख्य समाजातील - लोकांसाठी आरक्षित असते.
पिडित व्यक्तींमध्ये दलित आहेत, तसेच मध्यम स्तरांतील जातींतील मात्र दलित पिडीतांसारखाच आर्थिक स्तर असलेले आहेत.
गुन्हयांमधील दोन मुख्य आरोपींसाठी काम करणारे आणि प्रत्यक्ष मारहाणीत सहभागी असणाऱे काही जण दलित आहेत.
आरोपींनी बनवलेल्या व्हिडीओमुळेच घटनेला वाचा फुटली.
हातपाय एकत्र बांधून झाडाला उलटे टांगून ठेवलेल्या त्या तरुणाचा फोटो काल मी पाहिला. कल्पना करा,एक तरुण पोर सकाळी दहापासून संध्याकाळी सहा lपर्यंत त्या टांगलेल्या अवस्थेत अधांतरी लटकून होते. फोटो पाहावत नाही, त्यामुळे इथे शेअर करण्याजोगा नाहीये. इंटरनेटवर चेहेरा झाकून उपलब्ध आहे.
घटनेचा व्हिडीओ नसता तर ही घटना उघडकीस आलीही नसती.
तर सद्या हरेगावला येणाऱ्या लोकांची रांग लागली आहे.
परवाच २९ तारखेला हरेगावच्या मतमाऊलीच्या आगामी यात्रेनिमित्त संत तेरेजा देवळासमोर नोव्हेना प्रार्थनानिमित्त ध्वजउभारणी झाली.
यावर्षी ८ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या या यात्रेचे ७५वे वर्ष आहे. नऊ दिवसांच्या नोव्हेना प्रार्थनेसाठी गावोगावचे भाविक दररोज या तिर्थक्षेत्री येत आहेत.
महाराष्ट्रातील विविध पक्षांतील नेतेमंडळी त्या दुदैवी घटनेसंदर्भात श्रीरामपूर आणि हरेगावला भेट देताहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरला दवाखान्यात जखमी झालेल्या तरुणांना भेट दिली आहे.
माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी हरेगावला भेट दिली आहे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज हरेगावला जाणार आहेत तर प्रकाश आंबेडकर उद्या शुक्रवारी १ सप्टेंबरला तेथे जाणार आहेत अशा बातम्या आहेत.
मतमाऊली यात्रेवर यंदा त्या घटनेचे या चित्रात दिसते तसे गडद सावट असणार आहे.

Sunday, July 30, 2023

 



दिड-दोन महिन्यांआधी शंभर किंवा दिडशे रुपये किलो असणारे ओले बोंबील काल साडेतीनशे रुपये किलो होते, माझा आवडीचा `ऑल टाइम फेवरेट' असलेला बांगडा मे महिन्याअखेरीस शंभर रुपये किलो होता, त्याची किंमत सुद्धा आता साडेतीनशेच्या आसपास होती.सहज म्हणून चौकशी केली. सुरमई, रावस प्रत्येकी हजार रूपये किलो. नदीतले काही मासे होते, काळेकुट्ट रंगाचे काही खेकडेपण होती पण त्याबद्दल मी काही चौकशी केली नाही.

जिथे जायचे नाही त्या गावाच्या वाटेची कशाला चौकशी करायची ?

ज्याच्याकडून मी नेहेमी (रविवार सोडून- त्यादिवशी केवळ चिकन ) मासे घेतो तो आमच्या घराशेजारचा मासळी दुकानदार पक्का व्यवहारी, धोरणी आहे. दर सोमवारी आणि महिन्यातील काही विशिष्ट तिथी -सणावारी तो दुकान बंद ठेवतो. अनायसे त्याला आणि कामगारांना सुट्टी मिळते आणि धंद्यातला तोटाही वाचतो.कालचीच गोष्ट पाहा ना.

संध्याकाळी घरी तळण्यासाठी काही न्यावे म्हणून दुकानात गेलो तर 'पुढील आठ दिवस अमुकअमुक तारखेपर्यंत दुकान बंद राहील' अशी पाटी होती.खूप हिरमोड झाला. वर्षातून याच काळात जेव्हा मालाची आणि गिऱ्हाईकांचीही आवक कमी असते नेमके तेव्हाच हा दुकानदार धार्मिक पर्यटन, भटकंती अशी विविध कामे उरकून घेत असतो.


र हमरस्त्यावरच्या या दुसऱ्या दुकानात मी गेलो, तिथे प्रत्येक माशांच्या प्रकारांची किंमत त्या-त्या कंटेनरवर लिहिली होती. मॉलमध्ये असते तशी.आणि मासळीची किंमत काहीही असली तरी अनेक बायापुरुष रांगा लावून, हातांत ट्रे घेऊन आपल्याला हवी ती मासे घेत होती, वजन करायला आणि पैसे द्यायला गल्ल्याकडे जात होती.मासे आणायला गेलो की मला हमखास गोव्यातल्या पणजी फिश मार्केटची आठवण येते.

पणजीतल्या आमच्या The Navhid Times इंग्रजी  दैनिकाचे मुख्य वार्ताहर दुपारी साडेबाराच्या आसपास अगदी शेजारीच असलेल्या या फिश मार्केटमध्ये जायचे. त्याआधी शिपायाकडून प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्रजी किंवा मराठी दैनिकांच्या अंकाची प्रत  मागवायचे आणि त्यात फिश मार्केटमधून मासळी गुंडाळून घेऊन यायचे. स्कुटरच्या डिकीमध्ये ही मासळी ठेवून पर्वरीला ते आपल्या घरी जेवायला आणि दुपारच्या सिएस्ता म्हणजे वामकुक्षीसाठी जायचे.

काही वर्षांनंतर आधी प्रतिस्पर्धी असलेल्या Gomantak Times या दैनिकात ते रुजू झाल्यानंतर मासळी नेण्यासाठी ते काय करायचे हे मला माहित नाही.ताळगावला घरी जाण्याआधी फिश मार्केट मध्ये संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मी जायचो. तिथे बांगडा आणि इतर काही मासळीचे वाटे पसरुन ठेवलेले असायचे. एका वाट्यामध्ये सात आठ बांगडे असायचे. दहा रुपयाला एक वाटा.  बांगडे करी करायला, तळायला सोपे, त्याशिवाय एकच सरळ, मोठा काटा.

हल्ली दहा रुपयाला वाट्यामध्ये मिळणाऱ्या सात-आठ बांगडे माशांची आठवण तशी सुखद वाटते.आणि दुसरे एक.  गोव्यात जसा समान नागरी कायदा शंभर वर्षांपासून, पोर्तुगीज राजवट असल्यापासून, अंमलात आहे, त्याचप्रमाणे तिथे जवळजवळ बहुसंख्य लोक अगदी प्रेमाने, आवडीने मासळी खात असतात. मासळीबाबत अलिखित समान खाद्य संस्कृती ! बंगाली लोकांप्रमाणेच.

अर्थात काही दिवसांचा आणि सणावारांचा तिथेही अपवाद असतोच.काल नेहमीपेक्षा तिपटीने अधिक मासळीची किंमत देऊन मी आलो आणि सहज लक्षात आले.सद्या टमाटे खूप महाग झाले याविषयी सगळीकडे चर्चा झाली, होत आहे, तशी मासळीच्या तात्पुरत्या वाढलेल्या किंमतीची झालेली नाही. 

बहुधा होणारही नाही.

Esakal link 

https://www.esakal.com/blog/price-hike-in-fish-bangda-tomato-inflation-goa-fish-market-kbn00 

Wednesday, July 19, 2023

 भवताल प्रत्येक क्षणाचा, प्रसंगाचा मनसोक्त, समरसून आस्वाद


पुर्व युरोपातल्या बल्गेरियात एका गावाच्या भेटीवर होतो. त्या गावाला भेट देण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं.

वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा कल्पकतेनं वापर करून तिथल्या गावकऱ्यांनी विविध लघु कुटिरोद्योग सुरु केले

होते. गावातून एक मोठा ओढा जात होता. त्या ओढ्याच्या पाण्याचा या लोकांनी यासाठी वापर केला होता.

एका ठिकाणी पाणी वाहत येत होतं तसं तिथं त्या प्रवाहाचा वापर करुन वेगवेगळ्या कुंभारकामासाठी

लाकडी चाकं फिरायची. तिथला कुंभार किंवा कारागीर पाण्याच्या वेगाने गरागरा फिरणाऱ्या चाकाच्या

मदतीनं मातीच्या चिखलाला विविध आकार द्यायचा. त्या वेळी छोट्यामोठ्या आकाराचे माठ वगैरे घरघुती

भांडी आकार घेताना पाहून नवल वाटलं. तसं कुंभारकाम मी अनेकदा पाहिलं होतं पण वाहत्या पाण्याच्या

वेगाचा वापर करून होणारं हे कुंभारकाम अचंबित करणारं होतं. अगदी असाच प्रकार दुसऱ्या ठिकाणी

सुतारकामात दिसला. तिथं त्याच वाहत्या पाण्याच्या वेगाचा वापर लाकूड कापण्यासाठी, लाकडाला आकार

देऊन त्यापासून विविध वस्तू बनवण्यासाठी केला जात होता. अशा प्रकारे तिथं लोहारकाम आणि इतर

कितीतरी पारंपरिक व्यवसाय चालत होते. आणि या कल्पकतेवर आधारीत कामांमुळे ते गाव एक पर्यटनस्थळ

बनून चांगली आर्थिक कमाई पण करत होते.


ही घटना तशी खूप वर्षांपूर्वीची. त्या घटनेच्या वेळी मी ती कलाकुसर पाहण्याचा पुरेपूर आस्वाद घेतला.

त्याऐवजी मी फोटो घेत बसलो असतो किंवा व्हिडिओ शूटिंग करत बसलो असतो तर कदाचित आता माझ्याकडे

इतरांना दाखवण्यासाठी खूप फोटो किंवा व्हिडीओ असते. मात्र ते पाहण्याच्या प्रत्यक्ष आनंदाला मी नक्कीच

मुकलो असतो. त्या गावातली ती कला आणि पाण्याचा अत्यंत नावीन्यपूर्ण वापर मला आजही आनंद देतो याचं

कारण त्यावेळी मी त्या प्रसंगाचा त्यावेळी पुरेपूर आस्वाद घेतला होता.


आणि ही दुसरी अगदी अलिकडची घटना, मागच्या शनिवारची . संध्याकाळीच अचानक बाहेर, हॉटेलात जेवायला

जायचं असं आम्हा दोघा नवरा-बायकोचं ठरलं. एक-दिड तास त्या हॉटेलात निवांतपणे बोलण्यात आणि

खाण्यापिण्याच्या आस्वाद घेण्यात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला आठवलं, काही तरी करण्याचं आम्ही दोघं

पार विसरलोच होतो. नंतर मला एकदम हसू आलं. त्या हॉटेलात आम्हा दोघांचे  जेवण सुरू होण्याआधी, आम्ही

ऑर्डर केलेल्या खाद्य पदार्थांचे आणि तिथल्या एकूण वातावरणाचे मोबाईलवर  फोटो आणि सेल्फी घेण्याचे

आम्ही चक्क विसरलोच होतो. पण लगेचच लक्षात आलं, आम्ही दोघांनाही ही घोडचूक केली होती  याचा अर्थ

आम्ही दोघांनीही हे असं एक दिवस बाहेर जाणं, हॉटेलात जेवणं, गप्पागोष्टी करणं मस्तपैकी एन्जॉय केलं होतं,

खरं कि नाही?


त्यादिवशी सकाळी हॉटेलात मी एकटा नाश्त्यासाठी गेली होतो. खाणार होतो पोहे किंवा उप्पीट, मात्र समोर

मांडलेले गोल, गरमागरम बटाटावडे दिसले आणि तोंडाला पाणी सुटलं. शेजारच्या भांड्यात लाल रस्सा

उकळत होता. लहानपणी श्रीरामपूर येथे घराशेजारीच असलेल्या `समाधान’ हॉटेलात लाल रश्श्यात निम्म्या

बुडालेल्या बटाटावड्यांवर आणि  बारीक चिरलेल्या कांद्यावर लिंबाची फोड पिळून मी खात असे, त्याची चव

आजही जिभेवर रेंगाळत असते. तर आता ऑर्डर दिल्यावर हॉटेल मालकाने एकाऐवजी दोन वडे प्लेटमध्ये दिले

होते, मात्र माझी काही तक्रार नव्हती. बटाटावडे रश्शात मस्तपैकी मिसळून त्यावर लिंबाची फोड पिळली

आणि  त्या पदार्थाचा छानपैकी आस्वाद घेतला. मुद्दाम काहीही घाई न करता  एकेक घास चवीनं खाल्ला 

आणि  खरंच खूप समाधान वाटलं. खाद्यपदार्थांचा असा आस्वाद घेणं आपल्याला क्वचितच जमतं याची यावेळी

जाणीव झाली.  

एखाद्या नेहेमीच्या गोष्टीचा किंवा कामाचा सुध्दा कधीकधी कंटाळा येतो किंवा ते काम रटाळवाणे बनते. मग  यातली मजा संपते आणि मग त्यातून अंग काढून घ्यावंसं वाटतं. बागकाम माझा एक आवडीचा छंद. काही दिवसांपूर्वी का कुणास ठाऊक मी माझ्या गच्चीवर माझ्या बागेकडे एकदम दुर्लक्ष केलं. काही दिवस बाहेरगावी, सिल्व्हासा येथे, गेलो होतो. परत आलो तेव्हा दिसलं कि काही नाजूक रोपटयांनी एकदम मान टाकली होती.  काही झाडं अजून तग धरून होती. नंतर अचानक माझं मन बदललं आणि पुन्हा एकदा दिवसांतून दोनदा या  झाडांना मी पाणी देऊ लागलो. तीनचार दिवसांपूर्वी मी पाणी घालत होतो आणि एकदम चमकलो. माझ्याकडे एक दहापंधरा वर्षांपासून एक रोपटे आहे. त्याचं नाव नाही माहित मला. पण कमळाच्या पाकळ्यांसारख्या पानांमुळे मला ते नेहेमीच आवडते. रोपट्याचे खोड आता निब्बर झालं आहे आणि पाणी घातलं नाही तरी दहापंधरा दिवस तग ठेवून धरण्याची क्षमता आहे. तर या. झाडाला पुन्हा पाणी देण्यास सुरुवात केली आणि आता एका वेगळ्याच गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं, त्या रोपट्याच्या निब्बर खोडाला कुंडीतल्या मातीपासून थोडं वर चक्क एक कोवळा कोंब फुटला होता. ते पाहिलं आणि मला झालेला आनंद अवर्णनीय होता.

माझ्या या हरित मित्रांच्या साथीचा आस्वाद घेणं त्यांच्यात काही काळ रमणं याकडे मी दुर्लक्ष केलं याबद्दल वाईट वाटलं.  आता पुन्हा एकदा मी माझ्या या छोट्याशा बागेत दररोज रमतो आहे, माझ्या या हरित मित्रांची ख्यालीखुशाली घेतो आहे. त्यांच्याबरोबर काही क्षण घालवणं म्हणजे म्हणजे त्या दिवसाला रोपट्यांच्या पानाफुलांना आलेल्या टवटवीप्रमाणं आपल्या आयुष्यातल्या त्या दिवसालासुद्धा टवटवी येते हे माझ्या लक्षात आलं आहे.

टेलिव्हिजनवर चित्रपट किंवा एखादी मालिका पाहताना त्यात प्रत्येक वेळी आपण किती समरस होत असतो? माझी थोरली बहिण टेलिव्हिजनवर बातम्या, मालिकांमधले प्रसंग किंवा इतर कुठलेही कार्यक्रम पाहताना पूर्ण समरस होत असते याबद्दल मला नेहेमीच कौतुक वाटते. ती एकटी टेलिव्हिजनसमोर बसलेली असली तरी विनोदी प्रसंगांत ती तोंडाला पदर लावून खळखळून हसते. अधूनमधून ` अगं बया ! असे उद्गार काढत असते. वृत्तपत्रं वाचत असतानासुद्धा ती त्यातल्या बातम्यांशी अशीच एकरूप होत असते. असं कुठल्याही गोष्टीत आणि प्रसंगात पूर्णतः समरस होणं खूप कमी लोकांना जमतं.

टेलिव्हिजनवर किंवा मैदानातील क्रिकेट मॅच विशेषतः भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहताना प्रेक्षक किती समरस होत असतात. या सामन्यांत अनेकदा युद्धजन्य परिस्थिती असते हे सांगायलाच नको. वर्ल्ड फ़ुटबाँल कपासाठी आता चालू असलेल्या मॅचेसमध्ये जगभरातील फ़ुटबाँल चाहते याचा अनुभव घेत आहेत. काही दिवसांपूर्वी टी-२० क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध  सामना अत्यंत पराकोटीच्या प्रतिकूल स्थितीत जिंकला. त्या सामन्याच्या अंतिम क्षणी प्रेक्षकांबरोबर मैदानातली ही मॅच प्रत्यक्ष पाहत असलेले `लिट्ल मास्टर’ सुनिल गावसकर यांचा जल्लोष समाज माध्यमांवर अनेकांनी पाहिला असेलच. याला म्हणतात समरसून आस्वाद घेणे. जीवनाचा प्रत्येक क्षण जगताना आपल्याला असं समरस व्हायला जमायला हवं. हे सहजशक्य नाही हे उघड आहे मात्र त्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

 कुठल्याही मंदिरात, तिर्थक्षेत्री गेल्यानंतर तिथे भावभक्तीने दर्शन घेण्याऐवजी तिथं स्वतःचे फोटो घेण्यातच अनेकांना अधिक रस असतो. सहलीसाठी एखाद्या सुंदर, निसर्गरम्य ठिकाणी गेलं कि तिथंही हाच प्रकार ! निसर्गात वावरताना, सहलीला गेल्यावर, आपण काय करत असतो हे स्वतःला विचारुन पहा. तिथल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याऐवजी बहुसंख्य लोक आपल्या मोबाईलमध्ये फोटो आणि सेल्फीज घेण्यात दंग असतात. तीच गोष्ट मित्रांसमवेत, सहकाऱ्यांबरोबर एखाद्या कार्यक्रमाला आल्यावर घडते आणि तिथं खास भेटण्यासाठी, बोलण्यासाठी जमलेल्या त्या लोकांशी बोलायचे राहून जाते.

कढी हा माझ्या आवडीचा एक खाद्यपदार्थ. इतर ठिकाणचं मला माहित नाही पण आमच्या औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत माझ्या लहानपणी कुठल्याही लग्नांत आणि इतर कार्यक्रमांत लापशी, शाक (म्हणजे वांगे आणि बटाट्याची भाजी ) या पदार्थांबरोबर कढी हा खाद्यप्रकार असायचाच. पत्रावळीत साध्या भातात गोल आळं केल्यावर त्यात कढी ओतली जायची. आजकाल आठवड्यातून एकदा तरी घरी मी दह्याची कढी करुन त्यात भजी टाकत असतो. काही खाद्यपदार्थांत अपायकारक तर काहींमध्ये उपयुक्त जिवाणू असतात. दह्यामंध्ये आंबवण्याची प्रक्रिया करणारे उपयुक्त जिवाणू असतात. तर काही दिवसांपूर्वी वाचलं कि दही उकळलं तर त्यात उपयुक्त असलेले जिवाणू बॅक्टेरिया मरतात आणि मग या कढीचा काही उपयोग नसतो. ते वाचून मी खट्टू झालो. एका ज्येष्ठ सहकाऱ्याशी हा विषय चर्चेत निघाला तेव्हा ते म्हणाले, ;''कामिल, तुला   कढी आवडते ना, मग विसरा कि हे सारं आणि मस्तपैकी कढीचा आणि भज्यांचा आस्वाद घ्या ! 

आस्वाद कसा घ्यावा याचा हा उत्तम वस्तुपाठ होता.


^^^^

 

एकदोन महिन्यांपुर्वीची ही गोष्ट. दादरा, नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातून मुंबईकडे परत येत होतो. कारच्या ड्रायव्हरने महमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची जुनी `टॉप हिट्स’ हिंदी गाणी लावली होती. एकापाठोपाठ गाणी ऐकू येत होती आणि मी चमकलो .
साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांतील त्यापैकी अनेक गाणी मला जवळजवळ तोंडपाठ होती. त्या गाण्याचं एखादं कवडं गायलं जात असताना त्यापुढील शब्द मला आठवत होते आणि पुढची संगीतधून सुद्धा.!
आहे की नाही गंमत? आणि हे कसं शक्य आहे?'' असं मी स्वतःलाच विचारत होतो.
याचा सरळसरळ अर्थ म्हणजे ही जुनी गाणी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात माझ्या नकळत आपली जागा राखून होती आणि आता जागृत पटलावर येत होती. ही गाणी कुठल्या चित्रपटातील आहेत, कोण पार्श्वगायक आणि पार्श्वगायिका आहेत, कुणा अभिनेत्यावर किंवा अभिनेत्रीवर हे गाणं चित्रित झालं आहे, हेसुद्धा स्पष्टपणे आठवत होते.
`जब जब फुल खिले, संगम, वक्त, जंगली, गीत, अंदाज, आराधना, हाथी मेरे साथी, राम और श्याम, तेरे मेरे सपने, मुघले आझम अशी त्या चित्रपटांची कितीतरी मोठी यादी होती. `अच्छा, तो हम चलते है...' अशी कितीतरी उडत्या चालीची कितीतरी गाणी अगदी तोंडपाठ.
कारचा ड्रायव्हर माझ्यापेक्षा वयानं लहानच होता, त्यामुळं त्या गाण्यासंबंधीची त्याला माहित नसलेली माहिती मी त्याला सांगत होतो. उदाहरणार्थ, `वक्त' चित्रपटातलं शशिकला यांच्यावर चित्रित झालेलं `आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू' हे गाणं आणि ते सांगत असताना माझ्या स्मृतीतून अचानक वर येणाऱ्या या माहितीबद्दल मी स्वतःच अचंबित होत होतो.
ही जुनीपुराणी गाणी मला आणि तसं पाहिलं तर माझ्या पिढीतल्या अनेक लोकांना मुखोदगत असण्याचं खास कारण म्हणजे काही दशकांपुर्वी रेडिओ हे एकमेव करमणुकीचं, ज्ञानाचं आणि बातम्या देणारं साधन असायचं. दिवसातून फक्त काही ठराविक तास कार्यक्रम असणाऱ्या रेडिओवर जुनीनवी गाणी ऐकायला मिळत आणि घरोघरी रेडिओ दिवसभर आणि रात्री साडेदहापर्यंत कायम चालू असल्यानं मग ही गाणी ओठांवर यायची आणि लक्षातसुद्धा राहायची.
त्याशिवाय दर बुधवारी रात्री आठ वाजता सुरु होणारा अमिन सयानी यांचा 'बिनाका गीत माला' हा कार्यक्रम नवनवी गाणी लोकप्रिय करत असे. यामुळं त्यावेळी सतत ऐकलेली गाणी आजही ओठांवर येणार यात आश्चर्य कसलं ?
काही बाबी, घटना आणि व्यक्ती आपल्या स्मृतीत अगदी घट्ट बदलेल्या असतात. कितीही वर्षांचा काळ उलटला तरी आपल्या आठवणीतून या घटना आणि व्यक्ती नाहीशी होत नाहीत.
खरं पाहिलं तर आपल्या जीवनात हर घडीला सातत्यानं किती तरी घटना घडत असतात आणि कितीतरी लोकांना आपण सामोरं जात असतो. मानवी मेंदूत या सर्व घटना आणि व्यक्तींना साठवून ठेवणे, त्यांना कायम आठवणीत ठेवणं शक्यच नसतं आणि गरज सुद्धा नसती.
काल सकाळी नाश्त्याला काय खाल्लं होतं, दिवसभर कुणाकुणाशी काय बोलणं झालं हे सर्व कायम आठवणीत ठेवण्याची गरजच काय?
त्यामुळे मग ठराविक घटना आणि आणि व्यक्ती आपला मेंदू स्मरणात ठेवतो आणि कधीकाळी स्मृतीमधून बाहेर काढून आपल्यासमोर ठेवतो. कालांतराने यापैकीसुद्धा अनेक प्रसंग कायमस्वरूपी स्मृतींतून नाहीसे होतात. गरज नसलेला फाफटपसारा आणि नुसतीच अडगळ होऊन बसलेल्या आठवणी कायमस्वरुपी बाद होतात.
मोजक्याच काही आठवणी त्या व्यक्तीला काही वर्षांनीं आणि दशकांनी सुद्धा आठवतात, जसं काही शाळेतील काही मित्र आणि शिक्षक आणि एखाददुसरा प्रसंग.
मानसशास्त्र असं सांगतं कि विशिष्ट घटना आणि व्यक्तीच तुम्हाला आठवतात याचं कारण म्हणजे या घटनांनी आणि व्यक्तींनी तुमच्या आयुष्यात केलेला बरावाईट खोल परिणाम, या घटना दुःखद असू शकतील व सुखद असू शकतील मात्र त्या घटनांनी तुमच्या जीवनाला एक कलाटणी दिलेली असते, त्यामुळं तुमच्या स्मृतीच्या कप्प्यात त्यांना कायमची जागा मिळते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रसिद्ध चित्रकार गोपाळराव देऊस्कर जर्मनीत गेले होते. त्यांना तिथे एके ठिकाणी खूप मोठी सभा दिसली. ते तिकडे गेले तर सैनिकी गणवेशातला एक माणूस अतिशय आक्रमकतेने भाषण देत होता.
तो चक्क पॉल जोसेफ गोबेल्स होता, हुकूमशहा अडॉल्फ हिटलरचा प्रचारप्रमुख.
आपल्याकडं जसं चाणक्यनिती म्हटलं जात तसंच या गोबेल्सनं राबवलेलं धोरण गोबेल्सनिती म्हणून प्रसिद्ध आहे. कुठलीही एक गोष्ट - मग ती खोटी असली तरी रेटून आणि सतत सांगितली कि ती असत्य घटना लोकांना सत्य वाटू लागते हा या गोबेल्स नितीचा सार.
त्यानंतर `गोबेल्स ऐकलेला माणूस’ असं विशेषण देऊस्कर यांना माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी आपल्या एका लेखात लावलं आहे. देऊस्कर यांच्या स्मरणात गोबेल्स कायम राहिला असणार याबद्दल शंकाच नको.
नुसतं गोपाळराव देऊस्कर असं म्हटलं तर या व्यक्तिमत्वाविषयी कदाचित अनेकांना चटकन उलगडा होणार नाही. पुण्यातल्या बालगंधर्व थिएटरमध्ये बालगंधर्व यांची दोन पोर्ट्रेस लावली आहेत. `अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात हे पोट्रेस अगदी सुरुवातीच्या भागात दाखवतात.
तर बालगंधर्वांची पुरुष आणि स्त्रीवेषांतील ही दोन्ही पोर्ट्रेस गोपाळराव देऊस्कर यांनीच केली आहेत.
तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणीत अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका असलेल्या `अशी ही बनवाबनवी' या गाजलेल्या चित्रपटातले काही प्रसंग किंवा बालगंधर्व थिएटरमध्ये असलेले बालगंधर्वाच्या त्या दोन पोट्रेसनी असंच कायमच घर केलेलं असेल.
अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बर्डे यांची आपण अनेक चित्रपट पाहिलेले असतात, मात्र `अशी ही बनावबनवी' सारखे काही मोजकेच चित्रपट आपल्या आठवणीत कायम असतात हे विशेष.
काही वर्षांपूर्वी गोव्यात घडलेला हा प्रसंग. बायको आणि मुलीबरोबर फेरीबोटने प्रवास करत होतो. गोव्यात आजही अनेक छोटोमोठी बेटे आहेत कि जिथं येण्याजाण्यासाठी फक्त फेरीबोटचा पर्याय असतो. शोराव कि दिवार अशा कुठल्यातरी बेटावरुन परत येताना फेरीबोटमध्ये आपल्या सशस्त्र अंगरक्षणकांसह उभ्या असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला पाहिलं आणि मी चमकलो.
त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत असलो तरी ते कोण आहेत हे कुणी सांगायची मुळी गरज नव्हती.
ऐंशीच्या दशकात अशांत पंजाब राज्यात अतिरेक्यांच्या कारवायांचा यशस्वीपणे पुरेपूर बिमोड करणारे भारतातले ते `सुपरकॉप' ज्युलिओ रिबेरो होते. त्यामुळे त्यांना कायम सुरक्षा पुरवली जात असते. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रुमानिया या देशात भारताचे राजदूत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता.
रिबेरो यांना त्या दिवशी असं अगदी जवळून प्रत्यक्ष पाहिलं त्या घटनेस काही वर्षे झाली आहेत. मात्र कधीही या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव वाचलं कि फेरीबोटमधली त्यांची ती छबी हमखास डोळ्यांसमोर झळकते.
काही मोजक्याच व्यक्ती आणि मोजकेच प्रसंग जसे आपल्या कायम स्मरणात राहतात अगदी तसंच काही कलाकृतींच्या बाबतीत होत असतं. शालेय जीवनापासून आपण अनेक पुस्तकं वाचत असतो अनेक चित्रपट पाहत असतो अनेक चित्रं आणि शिल्पा पाहत आलेलो असतो. मात्र यापैकी काही ठराविकच पुस्तकं चित्रपट किंवा चित्रपटातील काही प्रसंग मनात कायम घर करून असतात.
वि स खांडेकर यांच्या ययाती’ कादंबरीला ज्ञानपीठ मिळालं तेव्हा सत्तरच्या दशकात मी ही कादंबरी अधाशाप्रमाणे वाचून काढली होती. त्यावेळी मी दहावीला होतो. आज पाच दशकांच्या कालावधीनंतर आजही या कादंबरीचे कथानक, त्यातली ययाती, शुक्रांची कन्या देवयानी, राजकन्या शर्मिष्ठा, कच आणि पुरु ही पात्रे माझ्या स्मरणात आहे.
रणजित देसाई यांच्या `स्वामी’ वगैरे कादंबऱ्या पू ल देशपांडे यांच्या अनेक पुस्तकातली पात्रे आजही अजूनमधून नजरेसमोर येत असतात.
रोम येथे सहलीवर असताना व्हॅटिकनमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकात मायकल अँजेलो यांनी साकारलेले अप्रतिम `ला पिएता’ हे संगमरवरी शिल्प तर मी कधीही विसरू शकणार नाही.
आपण सर्वांच्या आयुष्यांत घडलेल्या प्रसंगाची, अनुभवलेल्या घटनांची, आणि भेटलेल्या व्यक्तींची स्मरणचित्रे आपल्या मनात कायमची कोरलेली असतात. त्यातील काही दुःखद घटनांतील दुःखाची तीव्रता काळाच्या औषधांनी कमी केलेली असते, आनंददायी, सुखद घटना मात्र कायम आनंद देत असतात.
जीवनात सुखीसमाधानी राहण्यासाठी यापैकी कुठल्या आठवणींना सतत गोंजारत राहायचे आणि कुठल्या आठवणी कायमच्या दूर लोटायच्या हे आपल्या हातात असते.
आणि त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही कडुगोड आठवणींत न रमता वर्तमानकाळातच जगलं तर अधिक चांगलं !

Sunday, July 16, 2023

पुण्याची खाद्ययात्रा; लक्ष्मी रोडच्या दोन्ही टोकांवर सुखाने नांदणाऱ्या दोन खाद्यसंस्कृती

काल शनिवारी संध्याकाळी पुणे कॅम्पात सहज चक्कर मारायला गेलो होतो. ईस्ट रोडवर पार्किंगला जागा मिळाली नाही म्हणून एम. जी. रोडवर आलो अन वेस्ट एन्डला वळसा घालून परतण्यासाठी पुणे स्टेशनकडे निघालो. डाव्या हाताला `दोराबजी' दिसले अन थोडे पुढे गेल्यावर चौकात आडोशाला चक्क पार्किगसाठी जागा दिसली. तिथे गाडी पार्क करून आम्ही दोघे `दोराबजीं'कडे चालत आलो.

खूप वर्षांपूर्वीच रिनोव्हेट झालेल्या दोराबजी शॉपमध्ये आम्ही दोघे पहिल्यांदाच येत होतो, जवळजवळ तीस वर्षानंतर.

नव्वदच्या दशकात `वेस्ट एन्ड' थिएटर असलेल्या अरोरा टॉवर्समध्ये मी काम करत असलेल्या Indian Express इंग्रजी दैनिकाचे ऑफिस होते. महिन्यातून किमान एक शनिवारी संध्याकाळी छोट्या आदितीला घेऊन जॅकलीन निगडीच्या बसने `वेस्ट एन्ड' बस स्टॉपला उतरायची, माझ्या बातम्या देऊन झाल्यानंतर आम्ही तिघे कॅम्पात भटकंतीला निघायचो.

त्यावेळी `फॅशन स्ट्रीट' एम जी रोडच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर होता. तिकडे खरेदी व्हायची, दोघी जणी आईस्क्रीम खायच्या, कधी कॅफे महानाझ मध्ये चिकन समोसे आणि बन मस्का हा मेन्यू असायचा.

त्यानंतर एकमजली, बैठे दुकान असलेल्या दोराबजी शॉपमध्ये वेगळॆ खरेदी व्हायची. तिथे काचेच्या पारदर्शी बॉक्समध्ये चिकन सॉसेजेस, फ्रोझन चिकन, चिकन क्युब्स वगैरेची खरेदी व्हायची. हे पदार्थ मिळण्याचे हे एकमेव दुकान आम्हाला माहित होते.

तर आता दोराबजीत प्रवेश केल्यावर काचेच्या कपाटात कितीतरी खाद्यपदार्थ दिसले. केक्स, पेस्ट्रीज, चिकन सामोसे, चिकन कटलेटस, लेग पिसेस आणि काय-काय.

लगेच चिकन समोशांची ऑर्डर देऊन तिथल्या खुर्च्यांवर आम्ही बसलो. त्याशिवाय घरी विकेण्डसाठी लेग पिसेस आणि कटलेट्स पार्सल करण्यासाठी सांगितले.

काही विशिष्ट खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी विशिष्ट जागी जावे लागते.

पुणे कॅम्पातले `वेस्ट एन्ड' थिएटरचा परिसर हे अलका थिएटर चौकापासून सुरु होणाऱ्या लक्ष्मी रोडवरचे दुसरे एक टोक. पुण्यातल्या दोन संस्कृतींची ही दोन विरुध्द टोके. अलका चौक परिसरात वेगळी संस्कृती नांदत असते आणि वेस्ट एन्ड थिएटर परिसरात दुसरी वेगळी संस्कृती.

मागे काही दिवसांपूर्वी म्हणजे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच रोजी आलेल्या त्या दिवशी मी क्वार्टर गेटपासून अरोरा टॉवर्सकडे पायी येत होतो त्यावेळी हे प्रकर्षाने जाणवले. एरव्ही गर्दीने गजबजलेला असणारा तो परिसर `गार्डन वडा पाव' आणि इतर बहुसंख्य दुकाने बंद असल्याने जवळजवळ निर्मनुष्य होता.

मी राहतो त्या परिसरात पुणे कॅम्पात मिळणारे खाद्यपदार्थ मिळू शकत नाही. गोव्यात पणजीला ऐन चौकात गीता बेकरीमध्ये एग्स पॅटीस मिळायचे तसे एग्स पॅटीस क्वचितच मिळतात. गोव्यात एखाद्या किरिस्तांव दुकानांत मिळणारे चमचमीत `चोरीस पाव' हा खाद्यपदार्थ इतर इतरत्र कुठेही मिळत नाही.

औरंगाबादला The  Lokmat Times ला मी असताना तिथे एस टी डेपोच्या समोर रांगेत असलेल्या हॉटेलांत दहा रुपयांना प्लेटभर बिर्याणी मिळायची ! अर्थात ही गोष्ट आहे १९८८ ची. आमचा क्राईम रिपोर्टर मुस्तफा आलममुळे मला औरंगाबादच्या आगळ्यावेगळ्या खाद्य संस्कृतीची ओळख झाली.

असले खाद्यपदार्थ त्या-त्या परिसराची एक खास ओळख बनतात. अधूनमधून अशा परिसरांना भेट देऊन जिभेचे चोचले पुरवायला हवे.



Friday, July 14, 2023



ख्रिस्ती समाजात जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला

मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…