प्रमुख राजकीय पक्षांकडून मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख लोकांना कुठल्याही पातळीवरच्या निवडणुकीत शक्यतो उमेदवारी दिली जात नाही.
मात्र या लोकांनी तथाकथित निधर्मी पक्षांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही बाळगली जाते.
ओवेसी बंधूंच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळवललेया शंभराहून अधिक जागांबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
एके काळी ख्रिस्ती समाजाचे डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे महापौर होते, नंतर त्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात आरोग्य खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते.
त्याच्याही खूप दशके आधी अत्यंत अल्पसंख्य असलेल्या पारशी समाजाचे मुंबईत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वर्चस्व होते.
सर फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले अनभिषिक्त सम्राट, (लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांच्या हातून पराभव चाखणारे स. का. पाटील हे खूप नंतरचे.)
हा आता भूतकाळ झाला आहे.
मुंबई-पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय असले तरी त्यांना प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळत नसते. या कारणामुळे या समाजाला कुठल्याही शहरात आणि राज्यातही राजकीय नेतृत्व असे नाहीच.
गेल्या निवडणुकीत (२०१७) ओवेसींच्या एमआयएमने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अश्विनी लांडगे या ख्रिस्ती महिलेला तिकीट दिले आणि त्या चक्क निवडून आल्या.
त्याआधी अनेक वर्षे पुणे महापालिकेत ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्वच नव्हते.
यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि महापालिकेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने पुण्यात आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड येथेही इतरही सात जणांना उमेदवारी दिली होती. पण ते निवडून आले नाहीत.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी वांद्रे पूर्व (वॉर्ड क्र. ९०)मध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या सात मतांच्या फरकाने विजय मिळवला.
ट्यूलिप मिरांडा या वकील असून त्यांनी यापूर्वी महापालिकेत कालिना–वांद्रे पूर्व परिसराचे प्रतिनिधित्व केले होते. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी हाच वॉर्ड जिंकला होता. या परीसरात ख्रिस्ती मतदारांचे प्रमाण खूप आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात काँग्रेस नेतृत्वाने ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
ट्यूलिप मिरांडा यांच्यासह आणखी दोन ख्रिस्ती नगरसेवक मुंबई महापालिकेच्या सदनात असणार आहेत.
ते आहेत काँग्रेस पक्षाचे १०१ वॉर्ड क्रमांकचे कॅरेन डिमेलो आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे धारावीच्या १७८ वॉर्ड क्रमांकचे जोसेफ कोळी
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षावर यावर्षी मुस्लीम आणि ख्रिस्ती मतदारांनी विश्वास टाकला आहे असे दिसते. मुंबईत आणि पुण्यात या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत त्यात विजयी मुस्लीम उमेदवारांचे - आणि त्यातही महिलांचे - प्रमाण लक्षणीय आहे.
मागच्या वेळी २०१७ साली पुणे महापालिका निवडणुकांत काँग्रेस पक्षाने फक्त नऊ जागा जिंकल्या होत्या. त्याच्या तुलनेत यावेळी पक्षाने सहा जागांची वाढ केली आहे.
एकूण पंधरा जागा जिंकल्या आहेत. यात मोलाचा वाटा मुसलमान आणि ख्रिस्ती मतदारांचा आहे.
याशिवाय वसई विरार महापालिकेत ख्रिस्ती समाजाचे दहा उमेदवार निवडून आले आहेत.
त्यापैकी एक काँग्रेसचे असून बाकीचे नऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आहेत. बविआने यावेळी वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.
१. सॅरल डाबरे (काँग्रेस) - वाघोली मर्देस
2. अरुणा डाबरे (भुईगाव)
3. डॉमणिक रुमाव (नंदाखाल)
4. मार्शल लोपीस (नानभाट)
5. बिना फुट्यार्डो (पापडी)
6. लॉरेल डायस (मर्सेस)
7. अलका गमजा (कोळीवाडा)
8.अजय रॉड्रिग्ज (चुळणा)
9. प्रकाश रॉड्रिग्ज (माणिकपूर) आणि
10. मार्शलिन चाको (स्टेला माणिकपूर)
त्याशिवाय वसईजवळच्या मीरा भाईंदर महापालिकेत पुढील सात ख्रिस्ती उमेदवार निवडून आले आहेत :
नीला सोन्स (भाजप)
आयरिन क्वाड्रोस (काँग्रेस)
टॅरेन मेंडोन्सा (काँग्रेस)
फ्रिडा बर्नार्ड डिमेलो (शिंदेसेना)
शॉन कोलासो (काँग्रेस)
शर्मिला विन्सन बागजी (शिंदेसेना)
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये यावेळी मेघाली सचिन खेमा या ख्रिस्ती महिला भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत यापूर्वी त्यांचे पती सचिन खेमा हे भाजपतर्फेच निवडून आले होते.
नाशिक महापालिकेत समीर उर्फ जॉय कांबळे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. जॉय कांबळे यांचे वडील उत्तमराव कांबळे नाशिक महापालिकेत पूर्वी अनेकदा निवडून आले होते.
नगर शहर हे मराठी ख्रिस्ती जनतेचे येरुशलेम. येथील महापालिकेत मात्र याहीवेळेस एकही ख्रिस्ती नगरसेवक निवडून आलेला नाही.
राज्यातील इतर दोनेक महापालिकेत प्रत्येकी एक ख्रिस्ती नगरसेवक निवडून आले आहेत.
^^^
Camil Parkhe


No comments:
Post a Comment