Did you like the article?

Showing posts with label American Mission. Show all posts
Showing posts with label American Mission. Show all posts

Tuesday, October 20, 2026

 


जोतिबा फुले यांच्या चालू द्विजयंती शताब्दी वर्षात या महान पुरुषाला स्त्रीशिक्षण कार्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरारबाईंच्या नगर येथील समाधीचा अखेर शोध लागावा, यासारखी दुसरी ब्रेकिंग न्युज कुठली असू शकेल?

नाशिकमध्ये काल सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्यावर मी एक छोटेसे व्याख्यान दिले, रात्री बसने पुण्याला परतलो.
आज सकाळी नगरचे साहसी म्हणजे प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संशोधन करणारे प्रशिक्षित इंजिनियर असलेले अभिजीत एकनाथ वाघ, पत्रकारितेतील एक सहकारी भैरवनाथ वाकळे आणि व्यवसायाने टेलर असलेले मास्टर आसिफ खान दुले खान यांचा फोन आला आणि तडक नगरच्या प्रवासाला निघालो.
फरारबाईंच्या समाधीचा शोध लागलाय असे कळल्यानंतर मला घरी स्वस्थ बसेना.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला १९ ऑक्टोबर १८८२ रोजी पुण्यात दिलेल्या आपल्या दीर्घ इंग्रजी निवेदनाच्या पहिल्याच वाक्यात जोतिबा लिहितात :
'' माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती.
म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला झाली व मी आणि माझी पत्नी ( सावित्रीबाई) अशा उभयतांनी कित्येक वर्षापर्यंत त्या शाळेत काम केले. ''
याच परिच्छेदात जोतिबा पुढे लिहितात कि त्यांनी ख्रिस्ती मिशनरींच्या वसतिगृह शाळेत शिक्षकाचे काम केले आहे.
धनंजय कीर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रात जोतिबांनी आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर नगरला सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिली या घटनेवर सविस्तर लिहिले आहे.
हा मजकूर मुळातून वाचण्यासारखा आहे.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र आणि कार्याचे एक महत्त्वाचे संशोधक असलेल्या हरी नरके यांनी सावित्रीबाई फुले यांनी नगरला सिंथिया फरारबाईंकडे आणि पुण्यात मिचेलबाईंकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले होते, याबाबत महात्मा फुले समग्र वाडमय आणि इतर अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे.
फरार मॅडम यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिल्यानंतर, फरारबाईंशी बोलणे झाल्यानंतर जोतिबा खूप प्रभावित झाले असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
नगरहून पुण्याला आल्यानंतर आपण लगेचच मुलींची शाळा सुरु केली असे जोतिबांनी लिहिले आहे. (संदर्भ धनंजय कीरकृत चरित्र )
मिस सिंथिया फरार यांचे अमेरिकेतून मुंबई बंदरात २९ डिसेंबर १८२७ रोजी आगमन झाले. अमेरिकन मराठी मिशनच्या त्या पहिल्या अविवाहित महिला मिशनरी.
मुंबईत मिशनच्या मुलींच्या शाळेत कार्य केल्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे १८३७ साली त्या मायदेशी परतल्या.
मात्र दोनच वर्षांनी १८३९ साली त्या भारतात पुन्हा आल्या त्या कायमच्याच. येथेच देह ठेवण्यासाठी.
नगर येथील अमेरिकन मिशनच्या शिक्षणंकामात रुजू झाल्या त्या त्यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी झालेल्या निधनापर्यंत.
नेमके सांगायचे झाल्यास २५ जानेवारी १८६२ पर्यंत.
नगर येथे अमेरिकन मिशनने १८३८ साली सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत काम केले.
फरारबाईंची मुलींची ही शाळा म्हणजे नगर येथील माळीवाडा बस स्टॅन्डजवळ असलेली आजही चालू असलेली क्लारा ब्रूस गर्ल्स स्कूल.
वर दिलेल्या तारखा, महिने आणि वर्ष अमेरिकन मराठी मिशनच्या वेळोवेळी लिहिलेल्या अहवालांत आणि इतर दस्तऐवजांत नमूद करण्यात आलेल्या आहेत.
' सत्यशोधक ' या हिंदी चित्रपटात जोतिबा आणि सावित्रीबाई फुले घोडाबग्गीतून पुण्याहून फरारबाईंना भेटण्यासाठी येतात, सावित्रीबाई तेथे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतात हा प्रसंग विस्तृतपणे रंगवला आहे.
फरारबाईंचे पात्र या चित्रपटात छान रंगवले आहे.
अध्यापनाचे रीतसर प्रशिक्षण घेणाऱ्या सावित्रीबाई फुले त्यामुळे पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका ठरतात.
फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे हृदयद्रावक वर्णन अमेरिकन मिशनच्या १८६२ च्या वार्षिक अहवालात दिले आहे.
आज शोधण्यात आलेल्या फरारबाईंच्या समाधीवरील स्मृतीवचने त्याच धर्तीची आहेत.
याच वार्षिक अहवालात अमेरीकन मराठी मिशनच्या वतीने मिस सिंथिया फरारबाई यांच्यावर १८६२ साली लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे:
` मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरु करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले.
अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरु केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनीं मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली. ‘’
फरारबाईंच्या कबरीवर आम्ही फुले वाहिली, मेणबत्त्या लावल्या, मी स्वतः छाती आणि खांद्यावर कृसाची खूण करुन क्षणभर नतमस्तक झालो.
या समाधीच्या चिरा आजही शाबूत आहे पण तिथे कधी कुणी पणती लावली असेल याची शक्यता खूप कमी.
गेल्या दीडशे वर्षांत या अमेरिकन मिशनरीच्या चिरविश्रांतीच्या ठिकाणी कुणी आदरांजली किंवा फुले वाहिली असतील असे मला वाटत नाही..
फरारबाईंच्या चरित्राची आणि कार्याची माहिती देणारे त्यांचे पहिलेवहिले चरित्र दोन वर्षांपूर्वी मी लिहिले.
त्यांच्या छायाचित्राचा शोध मात्र मला लागलेला नाही.
आता फरारबाईंच्या समाधीचा शोध लागल्यानंतर त्यांच्या छायाचित्राचा शोध लागणे फार मुश्किल असेल असे मला आता वाटत नाही.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८१३ च्या स्थापनेपासून त्यांचे अनेक अहवाल आज उपलब्ध आहेत.
फरार स्कुल्सच्या मुलींचा एक फोटो मला सापडला तसाच फरारबाईंचा फोटो कुठेतरी नक्की सापडेल अशी ठाम आशा आता निर्माण झाली आहे.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना घडवण्यात फार मोठा हातभार असलेल्या या दुर्लक्षित महिलेला तिचे आदराचे स्थान मिळायलाच हवे.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रात महत्वाची भुमिका असणाऱ्या व्यक्ती, स्थळे आणि वास्तू यांना उजेडात आणायाला हवे.
त्यामुळे भारताचा सामाजिक इतिहास पुर्णतः बदलणाऱ्या फुले दाम्पत्याच्या चरित्रावर अधिक आणि नव्याने प्रकाशझोत टाकण्यात मदत होईल, जोतिबा आणि सावित्रीबाईंची चरित्रे अधिक परिपूर्ण होतील.

Camil Parkhe October 16 2026


Sunday, March 29, 2026

भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा एक जनक गॉर्डन हॉल

द्विशताब्दी स्मृतीवर्ष २० मार्च २०२६ पासून

दोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघालेल्या तीन व्यक्तींनी १२ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पाय ठेवला. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट  या त्या तीन व्यक्ती होत्या.  त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ख्रिस्ती धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते.  

ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार चालत होता आणि प्रचलीत ब्रिटिश कायद्यानुसार भारतात मिशनरींना येण्यास बंदी होती. त्यामुळेच विल्यम कॅरी यांना डॅनिश वसाहत असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्यांना मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती. ब्रिटिश संसदेने १८१३च्या जुलैत ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार या मिशनरींना भारतात काम करण्याची मुभा देण्यात आली.

गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकारी मिशनरींनी मुंबईत आणि इतरत्र मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक सामाजिक क्रांती घडवली. कॉलऱ्याच्या साथीत रूग्णांना औषधोपचार देताना गॉर्डन हॉल यांचे नाशिकजवळ दोडी दापूर येथे २० मार्च १८२६ रोजी मृत्युमुखी पडले. दिनांक २० मार्च २०२६ पासून त्यांचे द्विशतकी स्मृतीवर्ष सुरु होत आहे.  

श्री. म. पिंगे यांनी `युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे: ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’   रेव्हरँड इमॅन्युएल बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात मध्य भारतातील हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.  अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या १८१८पर्यंत अकरा झाली आणि या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.

गॉर्डन हॉल यांनी मराठी शिकून नंतर या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची विस्तृत माहितीसुद्धा पिंगे यांनी आपल्या ग्रंथात दिली आहे.  ``सामान्य माणसाला लिहितावाचता आले तरच तो बायबल वाचू शकणार होता. त्यासाठी मिशनरी लोकांनी मुद्रणयंत्र आणले, बायबलची छपाई सुरु केली, शाळा सुरु केल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरींनी आपलया आगमनानंतर केवळ चार वर्षांच्या कालावधीत २५ शाळा सुरु केल्या, त्यात बाराशे मुले होती,’’ असे `अमेरीकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात नमूद केले आहे. 

स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.

अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली.  ``या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो,’’ असे रेव्हरंड बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत १८८१ साली साजरा झालेल्या अर्धशतकी वर्धापनावेळी सांगितले गेले.

सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या पुस्तकात लिहिले आहे.  इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनरींनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय.’’

गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला.  परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागत असे.  प्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला. गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.

गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत. तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री व इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर व अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.

मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले. त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या मिशनकार्याचा काळ केवळ १२ वर्षांचा होता.   




सावलीचा शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र चपळगावकर लिहितात: ``भारतात ज्या परिस्थितीत मिशनरींना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनरींना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठी भाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. ’’ 

``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत अमेरिकन मराठी मिशनने गॉर्डन हॉल यांचे वर्णन केले आले आहे.  दोडी दापूर येथे त्यांचे दफन करण्यात आले, तेथे एक दगडी कबर बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील मजकूर कोरलेला होता :  ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती व त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''

दोडी दापूर येथील  गॉर्डन हॉल यांची कबर आणि त्यावरील स्मृतीफलक अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदी सुस्थितीत होती.  दहाबारा वर्षांपूर्वी तो स्मृतीफलक उखडून टाकला गेला होता.  नाशिक येथील गिरीश भालतिडक यांनी त्या स्मृतीफलकाचे तीनचार तुकडे मिळवले आणि ते एकत्र जोडून शरणपूर येथील आपल्या घरी ठेवले आहेत.

 Camil Parkhe 

 

 

^^^^^