काही घटना अगदी काही क्षणांच्या, किंवा एक-दोन तासांच्या असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती
पडघम - माध्यमनामाकामिल पारखे
- Tue , 06 April 2021
“नारायण सुर्वे सपत्नीक पणजीला आले आहेत, अल्तिनोला गेस्ट हाऊसवर उतरले आहेत. त्यांना ‘गोवादर्शन’ घडवून आणशील का?”
एक दिवस गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी अनुराधा आठवले यांचा निरोप आला. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीची ही घटना असावी. लँडलाईन फोन दुर्मीळ आणि मोबाईलची संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या त्या काळात हा निरोप माझ्यापर्यंत कसा आला आता आठवत नाही. त्या वेळी मी पणजीतल्या ‘नवहिंद टाइम्स’ या दैनिकात नवशिखा बातमीदार होतो. गंमतीची बाब म्हणजे अनुराधा आठवले या पणजीतल्याच ‘गोमंतक’ या मराठी दैनिकाचे संपादक असलेल्या नारायण आठवले यांच्या पत्नी. त्यामुळे इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या बातमीदाराकडे या कामगिरीसाठी अनुराधाबाईंनी विचारणा करावी, याचे आश्चर्य वाटले. आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार या कामगिरीसाठी परवानगी देतील, याची खात्री असल्याने मीही लगेच होकार कळवला.
महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राबाहेर ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ चालवली जातात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतर राज्यांतील लोकांना परिचय व्हावा, या हेतूने या केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करणे हा त्यापैकीच एक. त्याआधी महाराष्ट्र परिचय केंद्राने पु.ल. देशपांडे यांची तीन व्याख्याने आयोजित केली होती. साहित्यरसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी माझी अनुराधा आठवले यांच्याशी पहिल्यांदा गाठभेट झाली होती.
ठरल्याप्रमाणे सकाळीच मी अल्तिनोवर गेस्ट हाऊसवर गेलो, तेव्हा कवीमहाशय आणि त्यांच्या पत्नी कृष्णाबाई तयारच होत्या. सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हे दोन्ही काव्यसंग्रह माझ्याकडे होते. त्या दोन दिवसांत मी सुर्वे दाम्पत्याला गोव्याच्या काही प्रसिद्ध ठिकाणी घेऊन गेलो.
आठवले यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी यांना कारमधून गोव्यात फिरवून आणण्याची अशीच एक संधी मिळाली. आता नारायण सुर्वे किंवा एन. डी. पाटील यांच्याशी काय गप्पा झाल्या, ते काही आठवत नाही, पण त्या भेटींची स्मरणचित्रे अजूनही ताजी आहेत.
असेच एकदा कुठल्याशा एका साहित्य संमेलनासाठी पणजीहून आम्ही काही बातमीदार कारने निघालो होतो. बहुधा रणजित देसाई उद्घाटक असलेले म्हापसा येथील ते कोकणी साहित्य संमेलन असावे. संमेलनासाठी पत्रकारांना घेऊन जाणाऱ्या आयोजकांनी आमच्या गाडीत एका महनीय पाहुण्यालाही घेतले होते. ही व्यक्ती होती मानेपर्यंत रुळणारे केस असणारे आणि खांद्यावर घडी केलेली शाल टाकलेले ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर!
‘बाकीबाब बोरकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कवीच्या कविता आपण शाळेत शिकलो, तो कवी आज आपल्यासोबत बसून गप्पा मारतो आहे, हे माझ्यासारख्या तरुण बातमीदारासाठी अविश्वसनीय होते. त्याआधी काही काळ बाकीबाब बातम्यांच्या केंद्रस्थानी आले होते, ते दुसऱ्या एका कारणाने. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची त्यांनी लढवलेली निवडणूक अटीतटीची आणि व्यक्तीगत आणि प्रादेशिक पातळीवर तेढ आणि कटुता निर्माण करणारी झाली होती. त्या निवडणुकीत बोरकरांचा पराभव करून गजमल माळी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले होते. बाकीबाब यांना आणि अनेकांना हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यानंतर बाकिबाब ‘कोकणीवादी’ बनले असे म्हटले गेले. त्या कारच्या अर्ध्या तासांच्या प्रवासात मी बाकीबाब यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. माझ्याकडे त्यांच्याशी बोलण्यासारखे काही नव्हतेच. या ज्येष्ठ कविवर्यांचा आपल्याला काही क्षणांचा सहवास लाभला, हे मात्र आजही मी विसरलेलो नाही.
पणजीला कंपाल येथे कला अकादमीचे भव्य, देखणे संकुल उभारले, त्यानंतर लवकरच तेथे गोवा, दमण आणि दीव सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एक नाट्यक्षेत्रातील लोकांसाठी चार दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बाकीचे बातमीदार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहून नंतर आपल्या नेहमीच्या कामाला लागले होते. बातमीदार म्हणून मला मात्र त्या चारही दिवसांच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. रंगभूमीविषयी मला आताही फारसे काही माहीत नाही, तेव्हा तर काही माहिती असणे शक्यच नव्हते. पण तरीही आपण रंगभूमीवरील काही मोठ्या व्यक्तींबरोबर वावरत आहोत, याची मला लगेचच जाणीव झाली होती.
रंगभूमीवर मोठे योगदान आणि वावर असलेल्या त्या व्यक्तींपैकी केवळ एकच नाव मला तेव्हा परिचित होते. ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी. सर रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच प्रदर्शित झाला होता. गोव्यात तोपर्यंत टेलिव्हिजनचा जमाना सुरू झालेला नव्हता. ‘नवहिंद टाइम्स’चे संपादक बिक्रम व्होरा यांनी आमच्या दैनिकाच्या ऑफिसात एका चौकोनी बॉक्सवर तो कृष्णधवल चित्रपट सर्वांना दाखवला होता. धावती चित्रे दाखवणारा आणि आवाज असणारा चौकोनी बॉक्स असलेला व्हिडिओ सेट पाहण्याची आम्हा अनेकांची ती पहिलीच वेळ. या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका केल्याने रोहिणी हट्टंगडी या एकदम प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांचे पती जयदेव हट्टंगडीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी इथे मराठी रंगभूमीवरील दादा मंडळी आहेत, हे लक्षात आले होते. त्यापैकी एक होत्या विजया मेहता, दुसरे होते महेश एलकुंचवार. महाराष्ट्रातील विविध शहरांतील ज्येष्ठ रंगकर्मीही होते, पण इतरांची नावे मला आज आठवत नाहीत.
कार्यशाळेत चर्चा होत असताना अधूनमधून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलायला उभी राहायची, तेव्हा इतर सर्व मंडळी त्यांना अदबीने ऐकून घेत असत. नंतर समजले की, ते मराठी रंगभूमीवरील खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे नाव दामू केंकरे. मूळ गोव्याचे असलेल्या केंकरे यांनीच या कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, असे नंतर समजले.
त्या चार दिवसांच्या कार्यशाळेवर नंतर मी काय बातमी वा वार्तापत्र लिहिले ते आता आठवत नाही. मी स्वतः त्या वेळी नुकतीच विशी ओलांडली होती आणि रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, निळ्या जिन्सवर इन-शर्ट असणारे महेश एलकुंचवार हे लोकसुद्धा त्या वेळी ऐन तरुणाईतच होते. मात्र वास्तुशिल्पकार चार्ल्स कोरिया अफ़ॉन्सो यांनी डिझाईन केलेल्या कला अकादमीच्या त्या नव्या संकुलातील अम्फी थिएटरमध्ये, खुल्या जागेत, हिरवळीवर झालेल्या त्या चर्चांची चित्रे आजही माझ्या नजरेसमोर आहेत. त्यानंतर एलकुंचवार यांची ‘गार्बो’ आणि इतर काही नाटकांची पुस्तके मी आवर्जून विकत घेऊन संग्रही ठेवली होती.
गोव्यात १९८३ साली राष्ट्रकुलातील ३९ देशांतील प्रमुखांची - राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान- यांची अनौपचारिक बैठक (कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग - चोगम रिट्रीट) पार पाडली, तेव्हा गोव्यातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. बेदी या भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) पहिल्या महिला अधिकारी. ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून बेदी यांच्याशी त्या काळात जवळपास रोजच संबंध आला. या काळात वॉकी-टॉकीचा अवजड बॉक्स असलेल्या जिप्सी जीपमधून त्यांच्यासह मी दाबोळी विमानतळ ते आग्वाद ताज व्हिलेजपर्यंत रंगीत तालमीसाठी फिरायचो. एक बातमी देण्यावरून आमच्यात एकदा खडाजंगीही झाली होती. मात्र पुढे देशभर नाव कमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याशी बातमीदार म्हणून एकेकाळी अगदी वैयक्तिक संबंध होते, याचा आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो.
आपल्या ‘भारत जोडो’ या अभियानाच्या निमित्ताने गोव्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या दौऱ्याचे वार्तांकन केले, नोबेल पारितोषक विजेत्या आणि भारतरत्न किताबाच्या मानकरी मदर तेरेसा यांच्या गोवा दौऱ्यात त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. भारताच्या दहा दिवसांच्या पाळकीय दौऱ्यावर असताना पोप जॉन पॉल दुसरे १९८६मध्ये पणजीला आले होते. तेव्हा बुलेटप्रूफ पोपमोबाईलमधून गर्दीतून हिंडत, उजवा हात उंचावून क्रुसाची खूण करून भाविकांना आशीर्वाद देताना त्यांना मी अगदी जवळून पाहिले.
अशीच गोष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबाबाबत. गोवा सोडून पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला रुजू झाल्यानंतर हजारे यांच्या राळेगण सिद्धीला अनेकदा गेलो, तेथे काही दिवस मुक्कामही केला. अण्णा पुण्यात शनिवार पेठेतल्या राष्ट्रभाषा भवनात राहायला आल्यावर हमखास आमच्या भेटी व्हायच्या, पत्रव्यवहारही असायचा. नंतर या भेटी विरळ होत गेल्या, गेली कित्येक वर्षे तर प्रत्यक्ष भेट किंवा फोनवरही संभाषण नाही. मात्र राळेगण आणि हजारे यांच्याशी असलेले जुने संबंध आजही विसरलेलो नाही. आम्हां दोघांचे कृष्णधवल, काही रंगीत फोटो आणि काही पत्रव्यवहार आजही मी जपून ठेवले आहेत.
औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ला असताना तेथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे बिट माझ्याकडे होते. या खंडपीठातील ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर माझे सर्वांत महत्त्वाचे सोर्स. त्यांनी इंग्रजीत डिक्टेट केलेली खटल्याची ब्रिफिंग मी अगदी जशीच्या बातमीत वापरायचो, इतकी त्यांची वैचारिक स्पष्टता आणि अचूकता असायची. हे चपळगावकर नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. माझ्या बातमीदारीतील कारकिर्दीतील न्यायमूर्ती चपळगावकर हे एक अत्यंत आदरणीय सोर्स आणि व्यक्ती आहेत.
पुण्यात बातमीदारी करताना कुटुंबनियोजनाच्या चळवळीत रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदतीचा हात देणाऱ्या रँग्लर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९९०च्या सुरुवातीला माझे जवळकीचे संबंध निर्माण झाले. मिठाईचा डबा हातात घेऊन मांजरांना खेळवत, पनामा सिगारेट पित, निरागस हसत माझ्याशी गप्पा मारणाऱ्या लेखिका, माजी राज्यसभा सभासद, पद्मविभूषण सन्मानित शकुंतलाबाई आजही माझ्या नजरेसमोर आहेत.
काही घटना अगदी काही क्षणांच्या, मिनिटांच्या किंवा एक-दोन तासांच्याच असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी शिथिल करून निवडणुका जाहीर केल्या तेव्हाची ही घटना. तुरुंगातून राजकीय नेत्यांच्या सुटका झाल्यावर निवडणूक प्रचारावर येणाऱ्या नेत्यांचे देशभर उत्साहाने स्वागत केले जात होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असूनही आणीबाणीला विरोध करून तुरुंगात जाणारे, तरुण तुर्कांपैकी एक असणारे मोहन धारिया श्रीरामपूरला आले, तेव्हा झालेल्या त्यांच्या जंगी स्वागताला आणि नंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेला मी हजर होतो. त्या वेळी मी नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर १२ वर्षांनी ‘इंडियन एक्सप्रेस’चा पुण्यातील बातमीदार म्हणून मी मोहन धारिया यांना भेटलो, तेव्हा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कुठल्याशा निर्णयाला विरोध करण्यासाठी गोळीबार मैदानापाशी अण्णा बेमुदत उपोषणाला बसलेले होते.
पुण्यातील ‘आयुका’चे संचालक असलेले डॉ. जयंत नारळीकरांची खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संगीता जैन-जहागिरदार आणि मी मुलाखत घेतली. त्या वेळी मुलाखतीस वेळेवर यावे, नारळीकर वक्तशीरपणाबाबत किती जागरूक याविषयी त्यांच्या सचिव महिलेने वारंवार बजावले होते, ते आजही आठवते. एक तास चाललेल्या या मुलाखतीत नारळीकर यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज त्यांना जगातील कुठल्याही व्यक्तीचा शोधनिबंध ‘इलेक्ट्रॉनिक मेल’मुळे काही क्षणात उपलब्ध होतो, असे म्हटले तेव्हा मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. ते साल होते १९९१ आणि सर्व क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार होते. त्या वेळी माझ्या अगदी डोक्यावरून गेलेल्या ‘ई-मेल’शिवाय आज कुणाचे चालू शकणार आहे का? छापलेल्या मुलाखतीची वृत्तपत्रांतील कात्रणे मी डॉ. नारळीकरांना एक छोटेशा पत्रासह पोस्टाने पाठवली, तेव्हा उलटटपाली मला पाठवलेल्या माझ्या त्याच टाईप केलेल्या पत्रावर नारळीकरांनी दोन ओळींत धन्यवाद दिले होते. नारळीकरांच्या स्वाक्षरीचा तो ३० वर्षांपूर्वीचा तो कागद आजही माझ्या संग्रही आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. नारळीकरांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याची बातमी ऐकली, तेव्हा त्या भेटीची चित्रफित नजरेसमोर झळकली.
पुणे जिल्ह्यातल्या आंबेठाण गावातून शेतकरी संघटनेच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या शरद जोशींना भेटण्यासाठी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अभय वैद्यसह मी १९९१ साली गेलो होतो, ती भेट विसरणे तर अशक्य. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावावर निवडणूक प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांविरुद्ध शरद जोशी यांनी त्या खेड्यात राहून जोरदार मोहीम राबवली होती. काही काळानंतर धर्माच्या नावाने निवडणुकीत मते मागितल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर आमदार रमेश प्रभू यांच्यांवर निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर आणि निवडणुकीत भाग घेण्यावर बंदी आणली होती. स्वतः शरद जोशीच नंतर भाजपचे खासदार बनले, पण तो वेगळा विषय आहे.
मुस्लीम समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुण्यातील सय्यदभाई यांनी केलेल्या कामाबाबत दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान केली. त्या वेळी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात प्रसिद्ध शाह बानो प्रकरणात सय्यदभाईंनी केलेल्या चळवळीचा बहुतेकांना माहितीही नव्हती. त्या काळात म्हणजे १९९०ला ‘इंडियन एक्सप्रेस’साठी मी त्यांची मुलाखत घेतली होती, हे या पदमश्री पुरस्काराच्या निमित्ताने आठवले. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, बोहरी समाजातील कार्यकर्ते ताहेर पूनावाला यांच्याही मुलाखती ‘इंडियन एक्सप्रेस’साठी घेतल्या होत्या.
सत्ताधारी आणि इतर राजकिय नेत्यांशी आम्हा पत्रकारांचा नेहमीच संबंध येतो. मात्र समाजमनावर राज्य करणाऱ्यांमध्ये, समाजाला प्रेरित करणारी सामान्यांमधील असामान्यजनही असतात. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मृतदेहाचा तुटवडा पडतो, हे लक्षात आल्यावर आपल्या वृद्धापकाळी देहदानाची चळवळ राबवणारे पुण्यातील ग. म. सोहोनी अशांपैकी एक. त्यांच्यावरही मी अनेक बातम्या केल्या. समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांनी स्वतः देहदानाच्या अर्जावर सह्या करून या सोहोनींना नैतिक पाठबळ दिले. नानासाहेबांची देहदानाची इच्छा त्यांच्या अमेरिकास्थित मुलीच्या प्रखर विरोधामुळे साकार होऊ शकली नाही, हा भाग वेगळा.
गोवा आणि महाराष्ट्रातील माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायातील या काही आठवणी. ३०-४० वर्षांच्या कालखंडातील घटना आणि व्यक्तींबद्दलच्या या आठवणी काही नव्या, ताज्या घडामोडींमुळे परत ताज्यातवान्या होतात. काळाचा महिमा असा की, त्याबद्दल आता खेद किंवा खंत नसते, क्वचित त्या घटनेवरून स्वतःशीच हसणे होते. एकतर त्या घटनेत आपल्यासह सहभागी असणारे आता आपल्याशी संपर्कात नसतात किंवा काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. भूतकाळातल्या या आठवणींना ऐतिहासिक मूल्यही असू शकेल, असे म्हणणे आत्मप्रौढीचे ठरू शकते. या घटनांना आणि व्यक्तींना अशा प्रकारे उजळणी देताना त्या काळात पुन्हा वावरल्याची आणि त्या व्यक्तींना पुन्हा एकदा भेटल्याची अनुभूती येते, हे मात्र खरे!